या संग्रहाच्या लेखकाला राजकीय आशय आणि लिंगाधाळेपणा दिसतो. त्यामुळे ते स्त्रियांविषयी लिहिताना शेरेबाजी करत नाहीत
ग्रंथनामा - झलक
विद्युत भागवत
  • ‘फिरत्या चाकावरती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 18 March 2023
  • ग्रंथनामा झलक फिरत्या चाकावरती Firtya Chakabhovti प्रवीण घोडेस्वार Pravin Ghodeswar महिला Women स्त्रिया लिंगभाव Gender

‘फिरत्या चाकावरती’ हे प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांचे पुस्तक नुकतेच आऱ्हान बुकस्मिथस्, नाशिकतर्फे प्रकाशित झाले आहे. यात वाहन चालकाचा व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या श्रमजीवी सर्वसामान्य स्त्रियांच्या यशोगाथा आहेत. प्रत्येकाने आवर्जून वाचावे असे हे पुस्तक आहे. या पुस्तकाला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’च्या ‘स्त्री आणि लिंगभाव अभ्यास विभागा’च्या संस्थापक आणि माजी संचालक प्रा. डॉ. विद्युत भागवत यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांनी २०२० या वर्षी एक महत्त्वाचं काम केलं. दैनिक ‘दिव्य मराठी’च्या ‘मधुरिमा’ पुरवणीतून वाहन चालकाचा व्यवसाय करून उपजीविका करणाऱ्या श्रमजीवी स्त्रियांच्या कहाण्यांबद्दल लिहिलं. मला अत्यंत आनंद होतो आहे की, या लेखांच्या संग्रहाचं पुस्तक करताना एक भरगच्च प्रस्तावना मी लिहावी, अशी त्यांनी विनंती केली.

जातव्यवस्था, लिंगभाव व्यवस्था, शहरं आणि ग्रामीण भाग, यांतील एकमेकांना छेदणाऱ्या अक्षांची गुंतागुंत आजही कळीची, महत्त्वाची आहे. हे लक्षात घेऊन मी ही प्रस्तावना लिहिते आहे. इतके निर्मितीक्षम आणि सर्जनशील डोक्याला चालना देणारे काम हाताशी आल्यावर माझ्यासारख्या अभ्यासकांना एक वेगळाच हुरूप येतो.

साधारणतः सरळसोट पद्धतीनं विचार करणारी मंडळी ‘स्त्रिया’ आणि ‘लिंगभाव’ हे शब्द सरमिसळ करून वापरतात. हे शब्द आलटून-पालटून आपल्या सोयीनं वापरतात. तसेच ‘घाला जेंडर आणि ढवळा’ अशी थट्टाही केली जाते. म्हणजे स्त्रिया बिचाऱ्या गरीब आणि मूलतः बळी पडणाऱ्या असतात. त्यांच्या घडणीमध्येच काही तरी कमतरता असते आणि पुरुषांपेक्षा त्या वेगळ्या असल्याने पाळी येणे, गर्भधारणा होणे इत्यादी जैविक पातळीवरील भिन्नतेमुळे त्या एक तऱ्हेने अपंग असतात, असं मानून जेंडरचा खरा अर्थ न समजून घेता, विनाचिकित्सा वापरला जातो.

घोडेस्वार यांचे वैशिष्ट्य असे की, त्यांनी जे लेख लिहिले, ते असे धोके लक्षात घेऊन वेगळ्या जाणिवेतून लिहिले. आणि विशेष म्हणजे त्यांच्या या पहिल्याच सदर लेखनाला दाददेखील मिळाली. त्यांना ‘Population first’ या संस्थेतर्फे लिंगभावाची जाणीव असणारे लेखन म्हणून ‘Laadali Media Award for Gender Sensitivity’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

शहरांमध्ये रिक्षा, कार, ट्रक, बस व रेल्वे चालवणाऱ्या आणि इतर वाहने चालवणाऱ्या, पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या कनिष्ठ वर्गातल्या मुली दिसतात. साधारणतः त्यांच्याबद्दल गाडी चालवणाऱ्या चालकांचा सर्वसाधारण दृष्टीकोन असा असतो की, ‘आता तरुण पुरुषांची जागा या मुलींनी घेतली आहे, यांनी घरात बसून भाजीभाकरी करावी, मुलं जन्माला घालावी आणि शहरातल्या बेरोजगार तरुणांचा संसार करावा’. लेखकाला यातील राजकीय आशय आणि लिंगाधाळेपणा दिसतो. त्यामुळे ते स्त्रियांविषयी लिहिताना शेरेबाजी करत नाहीत.

या संग्रहातील पहिलाच लेख जयपूर शहरातील तरुणीने रिक्षा चालवून व्यवसाय करण्याची सुरुवात कशी केली, याबद्दल तपशीलात माहिती देतो. यातला श्रेयाचा भाग असा की, रिक्षा चालवणारी पहिली स्त्री म्हणून तिच्या दारिद्रयाचे वर्णन घोडेस्वार करत नाही. शहरांमध्ये वेगळ्या वाटेनं चालणाऱ्या स्त्रियांकडे पाहण्याची घोडेस्वार यांची दृष्टी लिंगभाव संवेदनक्षम आहे. त्यामुळे दारिद्रय आणि वंचितता यांची दया-करुणेच्या चौकटीत केलेली वर्णनं इथं आढळत नाहीत. हेमलता कुशवाह ही जयपूरसारख्या शहरामध्ये दोन भावांची एकुलती एक बहीण म्हणून जन्मल्यामुळे तिचं बालपण आनंदाचं, सुखाचं होतं, हे घोडेस्वार आवर्जून नमूद करतात.

शहर विरुद्ध खेडे अशी मांडणी होते, तेव्हा शहरांमध्ये स्त्रियांचे बळी जाणं किंवा वेश्याकरण होणं, यावर भर दिला जातो. आणि शहरं म्हणजे स्त्रियांसाठी शोषण करणारी चौकट असे मांडले जाते. घोडेस्वार यांनी शहरांमधील स्त्रीवादी चळवळीने निर्माण केलेला अवकाश नेमका हेरला आहे आणि त्याचं वर्णन केलं आहे. त्यांच्या लेखनाला ‘लिंगभाव संवेदनक्षम’ का म्हणायचे, याचं उत्तर आपण समजावून घेतलं पाहिजे. म्हणजे हेमलताच्या धडपडीकडे पाहतानाच ही धडपड किती खडतर आहे, हेही त्यांनी दाखवलं आहे.

स्वप्न पाहणं न थांबवणारी हेमलता आणि तिला शब्दांत आणि वृत्तपत्रांतून प्रकाशात आणणारे घोडेस्वार यांनी खूपच महत्त्वाचं काम केलं आहे. एकेका वाक्यामध्ये छळ म्हणजे काय आणि अडचणी म्हणजे काय हे विषद करणारे हे लेख आणखी एक महत्त्वाचं पाऊल टाकतात. ते म्हणजे, कमला भसीन यांच्यासारख्या स्त्रीवादी व्यक्ती आणि त्यांनी स्थापन करण्यात सहभाग घेतलेल्या ‘आझाद फाउंडेशन’च्या मदतीनं हेमलता आपल्या पायावर कशी उभी राहिली, हे घोडेस्वार सांगतातच, परंतु ते सांगताना राजस्थानमधील लोकप्रिय नृत्यप्रकार भवई आणि इतरही प्रकार स्वतःच्या पायावर करणारी हेमलता मुळातच वेगळी होती, हे सांगायला विसरत नाहीत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

शहरांमध्ये स्त्री प्रश्नाची चिकित्सक जाणीव घेऊन आभा भैय्या, कमला भसिन अशा कितीतरी स्त्रिया उभ्या होत्या आणि स्त्री मुक्तीचा मोक्षदायी अर्थ प्रत्यक्षात आणत होत्या. म्हणजे कमला भसीन जेव्हा बारीक केस कापून पुरुषांचा आणि स्त्रियांचा संमिश्र पेहराव करून गात असत, तेव्हा त्या डफावर थाप देऊन

‘लोग मरीजोको लाये हैं,

सुना हैं यहा बडे बडे डाक्टर आये हैं

ये दवाईवाले डाक्तर नहीं,

ही सिर्फ किताबे लिखते हैं

इन्हे कोई पढता नहीं’

असं म्हणत.

कमला भसीन यांनी डिग्रा आणि क्लिष्ट लेखनामध्ये स्त्रीमुक्तीचा आशय गुंतवू नये आणि त्याला कष्टकरी स्त्रियांपर्यंत वाट मोकळी करून द्यावी, यासाठी जे प्रयत्न केले, त्या प्रयत्नांची जाण या पुस्तकातील लेखांमध्ये स्पष्ट दिसते.

शहर काय आणि खेडी काय, त्याच पुरुषसत्ताक मातीतून घडतात. त्याला मोक्षदायी अर्थ देण्याचं काम स्त्री चळवळ कशी करते, याचं एक सुंदर चित्र या लेखनातून दिसतं. मार खाऊन जिद्दीनं मोक्षदायी विचार पुढे नेणारी हेमलता घोडेस्वार यांनी रंगवली आहे. प्रशासनाशी संपर्क करून महिलांना ऑटोस्टँडवर पिण्याचं पाणी, कचराकुंडी, प्रसाधनगृह, सावलीसारख्या सुविधांसाठी ती वेळोवेळी पाठपुरावा करते. अशा हेमलतासारख्या जागरूक आणि सर्वसामान्य परिस्थितीतून मार्ग काढणाऱ्या स्त्रीचं चित्रण ‘लिंगभाव संवेदनक्षम’ केलं गेलं आहे, हे महत्त्वाचं!

स्त्री चळवळीमध्ये सातत्यानं काम करणारी ‘जागोरी’ ही एक सम्यक विचार करणारी, तरुण आणि पौगंडावस्थेतील मुलींना जागरूक आत्मविश्वास निर्माण करणारी आणि जबाबदार नागरिक तयार करणारी संघटना आहे. न्याय मिळवण्यासाठी स्त्रियांचा कृती कार्यक्रम ‘जागोरी’ने चालू केला. स्त्रियांच्या विरुद्ध होणारे काम पुढे आणून आरोग्याच्या क्षेत्रात ते पुढे यावे आणि स्त्रियांचे नेतृत्व उभे राहावे, हा त्यांचा प्रयत्न असतो. ‘सफल’ नावाच्या कार्यक्रमातून सेंद्रीय उत्पादन आणि पारंपरिक ज्ञान ज्यामधून आरोग्याविषयीची आणि चिरंजीव विकासाविषयीची जागरूकता निर्माण करणं, आणि लैंगिक छळाविषयी अधिक सजगता निर्माण करणं, इत्यादी जागोरीचं ग्रामीण भागातील काम अधिक लक्षणीय वाटतं. हिमाचल प्रदेशमधील कांग्रा खोऱ्यांमध्ये ते ठळकपणे दिसून येत आहे. मानवी इतिहासातच भिन्नलिंगीय सर्वसामान्य मानून त्यापलीकडे जाणाऱ्यांना सामान्य भाषेत नपुंसक लिंगीय म्हटले जाते, त्यांच्यावर होणाऱ्या हिंसाचाराविरोधी काम करणे, हे जागोरीचे मोठे योगदान आहे.

एका ‘व्हॅलेंटाइन डे’ला जागोरीनं आवाज दिला की, भिन्न लिंगीयतेला फक्त अधिकृत मानणाऱ्या दृष्टीकोनामध्ये काय प्रकारे अत्याचार होऊ शकतात आणि म्हणून त्यांनी बाई किंवा पुरुष या अस्मितेपलीकडे जाणाऱ्या व्यक्तीचे सहन करणं, सोसणं, विशेषतः मारहाण आणि बलात्कार या विरोधात आवाज उठवला. आता हिमाचल प्रदेशात प्रमुख कार्यालय असणाऱ्या जागोरी या संघटनेचं काम समलिंगी अस्मिता असणाऱ्या मंडळींसाठी जोरात चालू आहे.

या लेखनात यासंदर्भातील संवेदनक्षमता दिसते, हे महत्त्वाचं आहे. शिक्षणासाठी हिमालयातल्या मुली आत्मविश्वासानं उभ्या राहतात. चंबा, कांग्रा, सिर्मूद या तीन जिल्ह्यांमध्ये मुली शिक्षणासाठी सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे ‘जागोरी’ने जिथं आधुनिकता पोहचत नव्हती, तिथं पोहचवली आहे, असं म्हणता येईल. समानतेची ही लढाई आणि त्याच वेळी भिन्न लिंगीयता फक्त मान्य करणं, याला विरोध, असं काम करणाऱ्या ‘जागोरी ट्रस्ट’मधून आपल्या लक्षात येतं की, ग्रामीण भाग नावाची एकसाची प्रतिमा डोळ्यासमोर न आणता पुण्या-मुंबई जवळच्या ग्रामीण विभागांमधील संकुचितता आणि हेकटपणा बाजूला सारून जागोरीचं काम पाहिलं, तर त्यातलं वेगळेपण लक्षात येतं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

एकाअर्थी घोडेस्वार यांनी हे लेख लिहून एक वेगळी जाणीव जागृती केली आहे, असं म्हणता येईल. त्यांच्या लेखनात अशी सुप्त शक्ती आहे, असं निर्विवाद म्हणता येतं, कारण हे लेखन ‘लिंगभाव संवेदनक्षम’ का म्हणायचं, याचं उत्तर आपण ज्याप्रकारे ‘जागोरी’चं कार्य लक्षात घेतो त्यात मिळतं. घोडेस्वारांच्या लेखनातील एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या स्त्रिया या रिक्षा किंवा चारचाकी वाहन शिकलेल्या आहेत. ड्रायव्हिंग शिकणं कशा तऱ्हेनं मुक्तिदायी होऊ शकतं, हे घोडेस्वार यांनी दाखवलं आहे. त्यांच्या लेखनात ‘लिटरसी इंडिया’तर्फे जे प्रशिक्षण दिलं जातं, त्याचाही उल्लेख आहे.

वर्तमानपत्रात असे लेख आले की, अशा शहरातल्या संस्थांची माहिती मिळते. ‘माय-लेकीच्या जिद्दीचा प्रवास’ या लेखात ‘सावित्री आणि पूनम’ यांची कहाणी सापडते. ‘लिटरसी इंडिया’ या संस्थेनं ड्रायव्हिंग शिकवायला सुरुवात केल्यानंतर सावित्री आणि पूनम यांनी किती जिद्दीनं आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं, याचं वर्णन माय-लेकींच्या प्रवासामध्ये येते. या प्रशिक्षणामध्ये सुरुवातीला पाच दिवस थिअरी (Theory) व दहा दिवस प्रात्यक्षिक (Practicle) हे शिकवतानाच स्त्रियांचे हक्क, कायदे, लिंगभाव, इंग्रजी संभाषण इत्यादींचं मार्गदशनही त्यांना मिळालं. पूनमने ड्रायव्हिंगचं कौशल्य लवकर आत्मसात केलं, परंतु सावित्रीला घरगुती जबाबदऱ्यांच्या जाच होता. ड्रायव्हिंग शिकण्याचं शुल्क (फी) ‘लिटरसी इंडिया’ने भरलं. पूनमला सावित्रीच्या आधी काम मिळालं. एका स्त्रीच्या शाळकरी मुलीला क्लासेसला नेण्या-आणण्याचं ते काम होतं. थोडक्यात शहरामध्ये आपण मिळवलेल्या कौशल्याच्या आधारे पोट भरण्याची एक वेगळी संधी दोघींनाही मिळाली.

या लेखनाचं वैशिष्ट्य असं आहे की, दिसायला साधे शब्द दिसले तरी त्यात खूप महत्त्वाची माहिती येते. एका लेखात ‘रब्बूनिशा’ नावाच्या मुस्लीम स्त्रीच्या संघर्षाची कहाणी येते. पण त्यातही पुन्हा टेम्पो सर्व्हिस व टॅक्सी ड्रायव्हिंग या मार्गानं मोक्षदायी अनुभव येतो. जागोरी संस्थेच्या मार्गदर्शनाखाली खूप काही शिकू पाहणारी रब्बू महत्त्वाची आहे.

‘खुशी’ या मध्य प्रदेशातील झांशीमध्ये जन्मलेल्या स्त्रीचाही वाहन चालक म्हणूनच आनंददायी प्रवास अधोरेखित केला गेला आहे. घोडेस्वारांचे अभिनंदन अशासाठी की, खुशीसारखी मुलगीसुद्धा ‘मला नाव कमवायचे आहे’ असं जाहीरपणे म्हणते. दिल्लीत आल्यानंतर प्राप्त झालेल्या मुक्त वातावरणात स्वाभिमानाचा मार्ग मिळवणारी खुशी किंवा आपल्या आयुष्यावर नितांत प्रेम करणारी ‘सुनिता’ या व्यक्तीरेखा साध्या शब्दांत मांडून घोडेस्वारांचं लेखन आपल्याला भरारी घेणाऱ्या, स्वप्न पाहणाऱ्या मुलींची ओळख करून देते. थोडक्यात, गाडी चालवणारी ‘शन्नो’ विमान उडवण्याचे स्वप्न पाहते किंवा मेट्रो चालवण्याचे स्वप्न पाहते, हे महानगरीतील योगदान फार मोठं आहे.

‘स्त्री जन्मा ही तुझी कहाणी... हृदयी अमृत ठेऊन डोळ्यात पाणी आणणारी करुण कहाणी’ आपण आजवर वाचली आहे. परंतु घोडेस्वारांनी ठामपणे महानगरामधला जो अवकाश आहे, त्याचा वापर करून कधी मायलेकी होऊन एकमेकींचे हात बळकट करणाऱ्या स्त्रिया दाखवल्या आहेत, तर कधी ‘जागोरी’सारख्या संघटनांच्या प्रयत्नांचा परिचय करून देऊन अर्थपूर्ण असे मोक्षदायी उपक्रम नमूद केले आहेत. महानगरामध्ये नाव कमावून स्वतःच्या मालकीची गाडी घेणारी शन्नो मुलांचं शिक्षण पूर्ण करते आहे इतकंच नाही, तर स्वतःचं शिक्षणही पूर्ण करायचं आहे, अशी जिद्द ठेवते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

................................................................................................................................................................

घोडेस्वरांना फिरत्या चाकावर बसणाऱ्या कष्टकरी थरातल्या ज्या स्त्रिया दिसल्या, विद्रोहाचं आयुष्य जगणाऱ्या गीतासारख्या स्त्रिया दिसल्या, हे महत्त्वाचं आहे. काळाबरोबर खूप काही बदलते. तुम्ही यशस्वी असाल, तर सारे साथ देतात, पण लढाईची सुरुवात स्वतःलाच करायला लागते. सध्या तिच्यासमवेतच सभोवतालचं वातावरणही बदलायचा ती प्रयत्न करतेय. कोणी आपल्या बायकोला मारत असेल, तर मध्ये पडून विचारणा करते. आजूबाजूचे आता तिचा सल्ला घेतात. ज्यांनी मुलींची शाळा बंद केली होती ती पुन्हा सुरू केलीय. गीताला अजून प्रगती करायची आहे, ज्यामध्ये बायकांची हक्क आणि अधिकाराविषयी जाणीव - जागृती करण्यासाठी, अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यासाठी वकील व्हायचं आहे. याबरोबरच इतर अनेक स्त्रियांच्या आयुष्यातील प्रकाशकिरण व्हायचं आहे.

प्रत्येक लेख हा सकारात्मक चौकटीतील महानगरातील स्त्रियांच्या संघर्षाकडे पाहतो. म्हणजे काबाडकष्टाच्या रडकथा लिहून स्त्री जन्माच्या जन्मजात दुबळेपणावर बोट ठेवत स्त्रिया म्हणजे बळी जाणाऱ्या असं हे चित्र नाही. महानगरीमध्ये शिक्षण थांबले तरी ब्युटीपार्लर, शिवणकाम या मर्गाने जाणारी ‘ललिता’ फिरत्या चाकावर बसून जीवन उभारते. विशेषतः निर्भया प्रकरण घडल्यानंतर आपल्याला या प्रकारात निर्भयावर झालेले अत्याचार आणि त्यातून एक तऱ्हेची पराभूतता आली होती, ती जाण्यास या लेखनाचा किती जबरदस्त पाठिंबा मिळतो, हे लक्षात येतं.

बसचालक होणारी ‘सरिता’ हे एक झळझळीत उदाहरण आहे. दिल्लीमध्ये पहिली महिला बसचालक होणारी सरिता हे सरळच निर्भयाच्या शोकांतिकेला न बोलता घोडेस्वारांनी उत्तर दिलं आहे. ट्रक चालवणारी ‘योगिता रघुवंशी’ त्यातलीच एक आहे, आणि अशा वाहन चालकांना उभारी देणारी ‘शबाना’ दिसते. ‘प्रेमा’ नावाच्या मुलीने ड्रायव्हिंगसाठी थेट ट्रक चालवण्याचे शिक्षण घेतलं, हे आपल्याला कल्पनेपलीकडे वाटतं. पुरुष वाहन चालकांची मक्तेदरी आणि प्राबल्य मोडून काढत प्रेमा रामण्णा नाडपट्टी भेटते. घोडेस्वार म्हणतात, प्रेमा बंगळूरू महानगरपालिका परिवहन मंडळ इथे अर्ज करते. त्यामध्ये एकूण सहा स्त्रियांची निवड होते आणि त्यामधील प्रेमा मात्र वाहकाऐवजी ‘वाहनचालका’ची जबाबदारी स्वीकारते.

ड्रायव्हिंगची आवड आणि त्यासाठी परवाना मिळवून प्रेमा यांनी स्वतःच्या आवडीचं रूपांतर नोकरी व्यवसायात करता येऊ शकतं, हे लिंगकेंद्री समाजव्यवस्थेला दाखवून दिलं. फिरत्या चाकावर शहरांमध्ये स्त्रियांसाठी वाट काढणाऱ्या कष्टकरी थरातल्या मुली ‘गरीब बिचाऱ्या’ नाहीतच, पण एक नवीन व्यवसायाचा पायंडा घालतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या लेखसंग्रहात ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकून स्त्रियांचा गाडी चालवण्यासाठी काळजीपूर्वक आणि दक्ष राहून शिकवण्याचा प्रयत्न, म्हणजे अलीकडच्या काळात पुण्या-मुंबईत वरच्या जात, वर्ग आणि धर्मातील श्रीमंत स्त्रिया आपल्या फॅशनेबल गाड्या घेऊन इकडे-तिकडे जाताना दिसतात, परंतु त्यांना सर्व सामान्य स्त्रियांचं जगणं कसं असतं, याचं भान नसतं. गाड्यांची चाकं बसवणं, गॅरेजमध्ये काम करणं, आणि आपल्या कष्टानं सन्मानाचं जीवन जगणं, अशा स्त्रियांबद्दल जेव्हा घोडेस्वार लिहितात, तेव्हा नवऱ्याच्या जिवावर उत्कृष्ट गाडी हाती घेऊन शहरात इथं-तिथं जाणाऱ्या, पण त्यांच्या हातून चूक घडली, तर न थांबणाऱ्या, आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचं भान न ठेवणाऱ्या, आपल्या कष्टकरी समाजातल्या माणसांना न्याय देणं म्हणजे काय, याचा विचार न करणाऱ्या शहरी स्त्रिया स्पष्ट शब्दात सांगायचं तर गाडीची क्षमता पुरेपूर वापरून भरधाव जाणाऱ्या शहरी स्त्रियांना वेगळं प्रशिक्षण घ्यायला हवं, असं यातून सुचवलेलं दिसतं.

मी स्वतःसुद्धा शहरातील सुखवस्तू सवयीपासून दूर आहे का, असा प्रश्न मला पडतो. मला इलेक्ट्रॉनिक उपकरणं, नवं तंत्रज्ञान, मोबाईलचे विविध उपयोग, यासाठी माझ्या नवऱ्यावर अवलंबून राहावं लागतं आणि त्यालाच मी जोडलेपणा समजते. हा दुहेरीपणा शहरात येतोच. म्हणून या लेखनात कष्टकरी थरातल्या स्त्रिया निवड करून जेव्हा जोखीम स्वीकारतात, तेव्हा ते स्वातंत्र्यशील वाटतं.

सार्वजनिक अवकाशातील स्त्रियांचं काम आणि त्यासाठीची धडपड, ही कामाचं उत्पादन आणि पुनरुत्पादन यातील आंतरसंबंध नेहमीच अधिक प्रमाणात लिंगभावी दृष्टीचे असतात. आणि त्याला काहीसा छेद देण्याचं काम ‘आझाद’ व ‘जागोरी फाऊंडेशन’च्या मदतीने राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश-गोरखपूर, मध्य प्रदेश, बिहार, कर्नाटक-बंगरूळ आणि इतर भागात स्त्रिया करत आहेत.

प्रा. घोडेस्वार यांनी शहरातील कष्टकरी थरातील स्त्रिया जे काम निवडतात, त्यावर लिहिलं हे महत्त्वाचंच आहे. परंतु कुठेही सल्ला देण्याच्या आविर्भावात न लिहिता साध्या शैलीत लिहिल्यानं हे पुस्तक वेगळा दृष्टीकोन देतं.

‘फिरत्या चाकावरती’ – प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार | आऱ्हान बुकस्मिथस्, नाशिक | पाने – ८८ | मूल्य – १२० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......