‘भूमी’दर्शन : ‘द्रौपदी’ होऊ इच्छिणाऱ्या ‘मैथिली’चे… माणसाच्या अस्तित्वाला झोंबणारे प्रश्न पडलेली स्त्री
ग्रंथनामा - झलक
संकलन-संपादन - विजय बाणकर
  • कथा-कादंबरीकार आशा बगे आणि त्यांच्या ‘भूमी’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Mon , 13 March 2023
  • ग्रंथनामा झलक आशा बगे Aasha Bage जनस्थान पुरस्कार Jansthan Puraskar भूमी Bhumi

नुकतेच, १० मार्च २०२३ रोजी ज्येष्ठ कथा-कादंबरीकार आशा बगे यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘झुंबर’, ‘त्रिदल’, ‘सेतू’ या महत्त्वाच्या कादंबऱ्यानंतरची ‘भूमी’ ही कादंबरी एका स्त्रीच्या आत्मभानाची, स्वत्वाची कहाणी आहे. त्यांच्या या कादंबरीला २००६ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. या कादंबरीविषयी आशाताईंनी एके ठिकाणी म्हटले आहे -“काही लेखनात उत्कटता खूप असते. उत्कटतेमुळेच चांगली निर्मिती होते. ‘भूमी’ त्या उत्कटतेचाच आविष्कार असूही शकेल. ‘भूमी’ एका पोरक्या व बरेचसे बंधन असलेल्या मुलीची कथा असून, समुद्र किनाऱ्यावरील आपल्या घरात ती नेहमी बंधनातून कधी मुक्त होईल, याची वाट पाहत असते. हा एक ओळीचा विषय असला तरीही त्यातील भावना अत्यंत विशाल आहे.” या कादंबरीची ही ओळख…

.................................................................................................................................................................

मुलगी म्हणून...

काल एक रेड इंडियन लोककथा ती वाचत होती. इंग्रजीतून मुलान नावाच्या मुलीची. ती मुलगी तिला फार आवडली होती. त्या देशातल्या राजाचा नागरिकांना युद्धावर जाण्याचा हुकूम येतो. प्रत्येक घरातून एक एक. मुलानला भाऊ नसतो. वडील वृद्ध... म्हणून मुलानच मुलाचा वेश घेऊन जाते. रीतसर युद्धाचं शिक्षण घेते. विजय मिळवून देते. पण ती मुलगी असल्याचं कळल्यावर लोक बिथरतात. तो विजयही स्वीकारत नाहीत. पण ती संघर्ष करते; मग तो स्वीकारला जातो. तिचं सेनापतीबरोबर लग्न होतं. ती मग आपल्या गावी, आपल्या घरी परत येते. मैथिलीला आवडलेली असते ती मुलानची दुसरी लढाई, जिंकल्यानंतरची मुलगी म्हणून करावी लागणारी. - पृष्ठ २१

मग वाईट गोष्टी का होतात?

रविवार होता. मैथिलीच्याच वयाची लहान मुलं (रेडिओवर) प्रार्थना म्हणत होती. मैथिलीला ती ऐकावीशी वाटली. ती संस्कृतमध्ये होती. तिच्या डॅडींना चांगलं येणाऱ्या संस्कृतमध्ये. “याचा अर्थ काय?” तिनं आत्याला विचारलं.

“ती सरस्वतीची प्रार्थना आहे. सरस्वती बुद्धीची देवता.”

“म्हणजे इंटेलिजन्सची?”

“नाही मैथिली. इथं बुद्धीचं असं भाषांतर होऊ शकत नाही.”

“का?”

“कारण, सरस्वती ही नुसती बुद्धी या घटकाची देवता नाही, तर त्या मागं असणाऱ्या शक्तीची देवता आहे.”

“म्हणजे ही प्रार्थना केली की झालं!”

“सांगितलं नं की, ही फक्त मागची प्रेरक शक्ती आहे म्हणून.”

“ही शक्ती फक्त चांगल्याच गोष्टीमागं असते ?”

“हो.”

“मग वाईट गोष्टी का होतात?”

“कुठल्या वाईट गोष्टी?”

“हेच ना, अम्मा गेली; मला माझी शाळा सोडावी लागली, इथं यावं लागलं....” - पृष्ठ २६

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मैथिलीची गोष्ट

तिनं वाचलेल्या फेअरी टेलचं तिनंच... एक छोटंसं नाटुकलं लिहिलं, पण स्टोरी बदलवून… आभाळात समुद्रावरून उडत येणारे पक्षी त्या झाडावर बसतात, रात्री विसाव्याला येतात, नि सकाळी उडून जातात… म्हणून ते झाड गाणं म्हणायला लागतं. पक्ष्यांची, झाडांची भाषा आणि ते मुलीलाच समजतं फक्त; आणि परीला वरून आकाशातून खाली येऊन या मंडळींशी दोस्ती करावीशी वाटते. आपलं परी असणंच ती विसरते. अशी मैथिलीची गोष्ट. टीचरनं ती (गॅदरिंगमध्ये बसवताना) बदलवून टाकली. ते मैथिलीला मुळीच आवडलं नाही. पण टीचर म्हणाल्या की, तुझं इंग्रजी चांगलं आहे; आणि त्यांनी तिला नाटकात घेतलंही. मग झाड तर झाड. तेही तिनंच लिहिलेलं. मैथिलीनंच स्वतःची समजूत घातली. - पृष्ठ २७

पूर्ण ते सार्थ

आपला इंग्रजीचा पेपर चांगला गेला; पण त्याला काही अर्थ नाही. काही उपयोग नाही त्याचा. पूर्ण जे आहे, असेल त्यालाच अर्थ असतो. इंग्रजीमुळं सगळ्या विषयात थोडीच पास होऊ? ती तिच्या घराजवळ आली. आत शिरून जिने चढावे वाटेना. - पृष्ठ ३२

ती अेमलेस नव्हती तर!

मार्कलिस्ट हाती आल्यावर मात्र स्वतःचं नापास होणं तिला जाणवलं. तिच्या जवळचं, आसपासचं कुणीही नापास नव्हतं. तीही यापूर्वी त्या जुन्या शाळेत कधी नापास नव्हती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. किती वर्षांनी! तिला खूप मोठ्यानं रडावंसं वाटलं. म्हणजे इंग्रजीचे सर म्हणतात तसे ती अेमलेस नव्हती तर! अजून डोळ्यात पाणी शिल्लक होतं! - पृष्ठ ३३

बाहेर पडण्याचा मार्ग (?)

अम्मा मात्र नोकरी करूनही मॅथ्यूज टीचरची वाट पाहत राहिली. ती अशी (बीनासारखी) स्मार्ट नव्हती. कुणाची, कशाची तरी वाट पाहत राहणारी माणसं अशी अम्मासारखी होत असतील! या खुराड्यातून आपण कधी बाहेर पडू? तो बाहेर पडण्याचा मार्ग परीक्षा, अभ्यास हाच असेल का? - पृष्ठ ३५

भरोसा फक्त स्वतःचा करावा!

“उदय हे लग्न होणार नाही, सांगून ठेवते. ती पास होईल, शिकेल. आपल्या पायावर उभी राहील. तोवर तू थांबलास तर ती तुझा विचार करील. त्या वेळी तू तिला योग्य वाटलास तरच. त्यावेळी निवड तिची राहील. समजलं? अरे तिचं काय रे - लहान पोर ती! तुमचा काही भरोसा नसतो. सोडून देशील तिचा हात.” मग आत्या आत आली. ओट्याशी खिळून उभ्या असलेल्या मैथिलीला म्हणाली, “भरोसा फक्त स्वतःचा करावा, तोही स्वतःचा स्वत:ला करता यावा, याकरता काही करावं लागतं, मैथिली! असं दुसऱ्याच्या मागं जाऊन तो नाही येत.” - पृष्ठ ३९

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हे सुचणं मात्र वेगळं!

पुस्तकांचा... तो वास मैथिलीला हवाहवासा वाटायला लागला. त्याहीपेक्षा आपलासा वाटायला लागला. हे नवंच होतं काही... डॉक्टरांनी लिहिलेली, आपल्या अनुभवांची पुस्तकं. पेशंटनी आपल्या रोगाबद्दल लिहिलेली, त्यांनी घेतलेली झुंज हे वाचायला तिला जास्त आवडलं. हे सगळं एक वेगळंच जग जणू तिला गवसलं होतं... लहानपणी वाचलेल्या फेअरी टेलपेक्षाही (हे जग) अदभुत. तरीही विश्वास ठेवता यावं असं!

या दोन महिन्यात मैथिली जणू एकदम प्रगल्भ झाली. जे वाचलं त्यावर लिहावं, मग आणखी काही सुचत जावं, अशीही एक वेगळी वाट तिला सापडली. ही वाट काही संपूर्णपणे नवी नव्हती. तिला लहानपणीही काहीबाही सुचत राहायचंच, पण हे सुचणं मात्र वेगळं. तो प्रकाश जिथून येत होता, ते सगळं नवं होतं तिला. - पृष्ठ ४२

प्रत्येक गोष्टीची वेळ असते

ते दहावीचं वर्ष संपलं. निकाल हाती पडला, तर ती पाहत राहिली. ऐंशी टक्के मार्क्स होते… (एकदा नापास झाल्याने) हे वाया गेलेलं एक वर्ष कधीच नाही भरून निघणार! ती शांतपणे घरी आली. तिनं हसतच मार्कलिस्ट आत्याला दिली. आत्याला पण खूप आनंद झाला. पण मैथिलीला वाटलं, वेगळा असा नवा, ताजा आनंद हा नसावा. काही तरी शिळं होतं. एकेका गोष्टीची एकेक वेळ ठरलेली असते. - पृष्ठ ४४

मलाही जमायचं नाहीच!

“नर्स?” बाईंच्या कपाळावर आठी. “मिशनरी हॉस्पिटल म्हणजे तू, तुम्ही खिश्चन?”

“माझी अम्मा खिश्चन, ओरिजिनली तमिळीयन.

“मला जरा आपल्यातील मुलगी हवी होती,” त्या म्हणाल्या, “मला मग तुझे कॅरेक्टर सर्टिफिकेटही लागेल.”

मैथिली ताडकन् उठली.

“मलाही जमायचं नाहीच, माझं हे बारावीचं वर्ष आहे. प्रोफेसर देवस्थळींची पुस्तकं पाहिली म्हणून खरं म्हणजे मला यावंसं वाटलं.” ती

 त्यांचा निरोपही न घेता बाहेर आली. संताप मनात मावत नव्हता. त्या प्रोफेसरांची खूप सारी पुस्तकं... ते कपाट, ती लायब्ररी... इथून तो त्या देवस्थळीबाईंच्या घरापर्यंतचं सगळं तिनं रागानं पुसून टाकलं. - पृष्ठ ४८

मैथिलीचे वेगळेपण

कामं झाली की गॅलरीत. अभ्यासाची नाही तर इतर पुस्तकं. या वयात मुलींमध्ये बदल होतोच, पण वेगळा बदल. त्या स्वप्नाळू होतात, मैथिली तशी होत नव्हती. उलट आपलं स्वप्नाळू वय जसं मुद्दाम बाजूला करावं अशीच काहीशी. रागवावं, नावं ठेवावीत असं काही नाही; पण... - पृष्ठ ४९

धक्के देणारी मुलगी

मैथिलीनं बाईंकडे पाहिलं. बाईही तिच्याकडे पाहत होत्या. या मुलीबद्दल त्यांच्या मनात एक सूक्ष्म राग होता. साचलेला. तिचा ताठपणा, अभिमान, बुद्धी, समज, वाचनाची आवड आणि रूपही. सुंदर म्हणता यावं असं नाही; पण एकूण अविर्भाव देखणेपणाचा, एक वाचनाची, पुस्तकांची आवड सोडली, तर हे त्यांचंच जणू तरुणपणांच रूप. त्या कदाचित देखण्याही होत्या जास्त. ही मुलगी त्यांच्या एका अभेद्य कोटाला वारंवार धक्के देत होती. - पृष्ठ ५६

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी

फिक्शन-लेखकाच्या कल्पनेतलं एक खरंखुरं विश्व तिला आवडायला लागलं. आपल्या नेहमीच्या रुटीनचा शिळा वास त्याला नव्हता. ‘इट वॉज अ फ्लोईंग वॉटर’, असं तिला इंग्रजीतूनच सुचलं होतं. तसं वाहतं पाणी हेदेखील तिनं पुस्तकातूनंच तर अनुभवलं होतं! हे वाचलेलं, सुचलेलं ती टिपून ठेवू लागली... या वाचण्यातून तिलाही वेगळं काही सुचू लागलं. हे सुचणं सर्वस्वी नवीन होतं. ते तिचंच होतं. तिच्याच तळातून ते घुसळून वर येत होतं. - पृष्ठ ६२

अतीत

…(प्रोफेसर साहेब)...ते आपलं स्वत:चं असं वेगळं आयुष्य जगत होते. ते आमच्यापासून दूरच असत. मुलावर त्यांचं प्रेम होतं गं! पण मुलाचा क्रम त्यांच्या विषयानंतरचा. प्रोफेसर नुसते (आजारी) शंतनूजवळ बसून राहत आरामखुर्ची घेऊन. पण हातातलं पुस्तक सुटत नव्हतं. आय हेट दोज बूक्स. ती फक्त त्यांची होती. पण पुस्तकं तर सगळ्यांची असू शकतात, असतात... मैथिलीला वाटलं. - पृष्ठ ६५

उलगडा

“मैथिली, तू फार लहान आहेस. तुला कळणार नाही, पण आपल्या काही गरजेनं जेव्हा आपण एखाद्या पुरुषाला जवळ करतो नं, तेव्हा आपल्याला त्याची विपरीतच किंमत मोजावी लागते.” मैथिलीच्या डोळ्यांपुढे (अम्माकडे येणारे) मॅथ्यूज टीचर आले... - पृष्ठ ६५

मानिनी

मला नाही कुणाची प्रेयसीबियसी व्हायचं. कुणाची कोण म्हणजे दुय्यम भूमिका. मला ते कुणी तरीच असायला आवडेल. ज्याचे संदर्भ सततच इतरांना असतील. - पृष्ठ ६७

हीच इथली शोकांतिका!

‘टू बी ऑर नॉट टू बी’ हाच काही हॅम्लेटचा प्रश्न नाही.

“मग?”

“खरं म्हणजे मला कळत नाही की, छोटासा सत्त्वांश घेऊन साधंसुधं जगू पाहणाऱ्या माणसाला का म्हणून असं एका आवर्तात फेकलं जातं! तेही एका अतर्क्य वेगानं. याला उत्तरच नाही नं!”

“ते तर नाटकातल्या प्रत्येकालाच म्हणता येतं. पण ते हॅम्लेटबद्दलच जास्त म्हणता येतं, खऱ्या अर्थानं हीच इथली ट्रॅजडी असेल.” मैथिलीनं सुस्कारा टाकला. - पृष्ठ ६९-७०

स्वतःला खाली बघू नये

“तुझी नसच कलावंताची आहे, चेतन.”

“कसला कलावंत गं! भंकस सगळं!”

“इतर कुणी म्हणोत रे, पण आपणच आपल्याला कधी असं म्हणू नये. इतकं खाली बघू नये. आपण असं करतो, तेव्हा आपणच खूप छोटे होत जातो आणि असे तर आपण कधीच नसतो नं!” मैथिली म्हणाली. - पृष्ठ ७२

आवड

“असा पाऊस मला आजकाल आवडायला लागला आहे,” मैथिली म्हणाली.

“मला तर तो आवडतोच, बेफाम- बेभान. आपण असे कधी नसतो नं!” मिलिंद म्हणाला. - पृष्ठ ७७

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ही स्टाईल शिकली पाहिजे

बेसीनवर हात धुताना मिलिंद हळूच मैथिलीला म्हणाला, “काय गोड हाक देतात बायकोला! प्रॉणिता.... प्रॉणिता - ही स्टाईल शिकली पाहिजे.”

“काय म्हणतोस?” चेतन म्हणाला. मिलिंद काही बोलण्याआधीच मैथिली तिथून सटकली. - पृष्ठ ७८

‘मुलगी’ नव्हे; माणूस!

मैथिलीला ऐकवेना... अन् हे ‘मुलगी, मुलगी’ काय चाललंय? आपलं नाव तर ‘मैथिली’ आहे. नेहमीच तर म्हणतात! आता लग्नाचा संदर्भ आहे म्हणून ‘मुलगी’. तो समुद्र किनारा, ती वाळू, होड्या, नारळाची झाडं, समुद्राच्या वाटेवरलं ते देऊळ, चर्च, शाळा, प्रार्थना, अम्माचं हॉस्पिटल, तिची खोली, खिडकी, रेलगाडी... गवताचा उग्र ओला वास... शाळेत बोलवायला आलेला वेणूगोपाळ... यांत कुठला धर्म होता! ही तर फक्त माणसाची गोष्ट होती! - पृष्ठ ८१

वाट पाहता येते, पण...

“पण मैथिली, थोडी वाट पाहिली तर? एक वर्ष काही खूप मोठी गोष्ट नाही?” मिलिंद म्हणाला.

“प्रश्न तो नाही मिलिंद! तू अमेरिकेला जाऊन आलास, वर्ष-दोन वर्षं लागली तरी काय! वाट पहायची तर कितीही पाहता येते. पण पाहायचीच नसेल तर...!” खरं तर तिला म्हणायचं होतं की, या वाट पाहण्यात माझ्या बाजूनं तूच ठामपणे उभा नसलास तर काय अर्थ? - पृष्ठ ८३

हे त्याला कधी कळणारंच नाही

“मग दोघं जेवायला या एकदा. सेलिब्रेशन!”

“मिलिंद अमेरिकेत गेला आहे.”

“अरे! माहीत नव्हतं!” मग त्यांच्यापासून लपवायचं नाही म्हणून तिनं सांगून टाकलं, “ते सगळं संपलं सर.

“संपलं?” ते गोंधळले, “पण”. ते अजूनही काही म्हणत होते, पण मैथिलीच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि थांबले, मग तिच्याजवळ गेले. तिला थोपटत म्हणाले, “त्यानं काय गमावलं आहे, हे त्याला कधी कळणारच नाही.” - पृष्ठ ८७

साड्या नि पुस्तकं एक नाहीत

“मैथिली, एकदा तू सर्व पुस्तकं घेऊन गेली होतीस नं!”

“हो, मी विसरले नाही ते.”

“तशा आता माझ्या सगळ्या साड्या घेऊन जा. भारी भारी साड्या खूप आहेत. मी फारशा नेसत नाहीच.”

“नको. मीही कुठं नेसते साड्या! आणि तशाही साड्या नकोतच, बाई.

“का नको? मी होऊन देते नं.

“साड्या नि पुस्तकं एक नाहीत, बाई. पुस्तक घेताना मला शरमिंदं वाटलं नाही. साड्या घेताना मात्र वाटेल.” - पृष्ठ ८९

निर्भय याचक

दांडेकरांनी चमकून पाहिलं. सतत काही मागायलाच येणाऱ्यांतली ही मुलगी नव्हती. याचना करतानाही ती निर्भयपणं त्यांच्या डोळ्याला डोळा भिडवत होती. मैथिली आता उठलीच. तिनं हात जोडले, “येते मी”. वळूनही पाहिलं नाही. - पृष्ठ ९१

बुद्धी + मन = बुद्धिमान

“मला तसं काम नको होतं, बुद्धीचा उपयोग होईल असं-”

“बुद्धी? हॉ! काय तुम्हा लोकांच्या वेडगळ कल्पना! कुणाला चॉईस आहे? आपल्या देशातला प्रत्येक प्रज्ञावंत हा अनेक वर्ष कारकुनी करत असतो, माहीत आहे मी केलेली आहे. माझा मुलगा बी.ई. होऊन अमेरिकेला गेला. तिथंही तो कारकूनच होता किती वर्ष. दर्जा वरचा, एवढंच!”

“सगळेच तसे नसतात... प्रोफेसर देवस्थळीच नव्हते तसे. तुम्ही जवळून पाहिलं आहे त्यांना. एखादा माणूस हे नाकारूही शकतो. बुद्धी आणि मन यांची फारकत तो करत नाही.” ती नम्रपणे पण तीव्रतेनंच म्हणाली, आणि मनातच डॉ. मिश्राही उभे राहिले. “हो, आणि डॉ. मिश्राही” - ती मनातच म्हणाली. – पृष्ठ ९१

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

हॅम्लेटलाही असं वाटत असेल?

ती चौघंही जणं तो पाऊस पाहत, अनुभवत राहिले... चालू होतं ते बोलणंही थांबलं. पावसाच्या या धारांतूनच मैथिलीला ऐकू आलं : टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज् दि क्वेश्चन, धारांच्या, वाऱ्याच्या सगळ्या एकजीव ओल्या रसायनातून तेच जणू शब्द - फक्त हेच दोन पर्याय आहेत : जगणं किंवा मरणं! असणं किंवा संपून जाणं. हॅम्लेटला याचं उत्तर सापडलं? संपूनच जायचं तर मुळात जगायचंही कशाला? या दोन पर्यायांमध्ये काही तरी आहे नक्की. ते हॅम्लेटलाही नसेल सापडलं. सापडावं असं मात्र वाटत असेल! काय असेल ते? काय असेल? विलक्षण जीवघेण्या घुसमटीनंतर पडलेल्या या पावसासारखं. या पावसाचीच किती रूपं... त्या ओल्याचिप्प स्टेशनावर मिलिंदला भेटायला लावणारा अनोखा पाऊस, जणू दूतच कुणी; आणि शेवटची भेट - तीही होऊ न देणारा- जसा काही वैरीच. मैथिलीच्या डोळयात पाणी आलं. - पृष्ठ ९६

पांडव व आपण

“पण मैथिली, आपले सगळे दिवस आठवतात. नाटकाचे, कॉलेजचे... मग वाटतं, आपण कसं कुठून कुठं फेकले गेलो. मीही दूर निघून आले त्या सगळ्यापासून. पांडवांना नाही का त्यांची पांडव म्हणून असलेली सगळी वस्त्रं शमीच्या झाडावर बांधून ठेवावी लागली. पांडवांची ती अवस्था काही काळच होती. माझी मात्र...” कीर्ती म्हणाली, “पण आपण काही तेवढे सामर्थ्याचे नाहीही,” कीर्ती पुन्हा म्हणाली. - पृष्ठ ९९

निर्णयाचा थकवा

मग लोकलचा आवाज ऐकला. जरा कुठं थोड वेळ टेकलेली रात्र संपली. मैथिलीला आज त्या लोकलचा आवाजही हवासा वाटला. या महानगरीची ही जागं होण्याची चाहूल तिला प्रथमच आपली वाटली. आपण फार थकलो आहेत हे तिला जाणवलं. तो थकवाही कळला, समजला, एवढी मोठी वाट तुडवून आल्याचा थकवा! घेत असलेल्या निर्णयाचा थकवा. “आत्या, बाईंच्या मुलाला हो म्हणायचं मी ठरवलं आहे...” सकाळचा चहा गाळणाऱ्या आत्याला मैथिली म्हणाली. - पृष्ठ १०८

साहोनि जावे!

पद्मनाभन सायकॉलॉजीचे प्रोफेसर. रँकचे. एकदम जीनियस! हे पाहताक्षणीच जाणवतं. खरं तर ते सिनिऑरिटीनं त्यांच्या डिपार्टमेंटचे हेड व्हायला हवेत. पण त्यांचा क्लेम डावलला जातो. त्यांची तक्रार नसते. ते आपल्या विषयात मस्त असतात. त्यांचे पीरियड झाले की, एक मिनिट थांबत नाहीत. - पृष्ठ १९६

पोकळी... भरली (!?)

मैथिली लवकर घरी आली. आजकाल लवकर घरी येते. सारखी लायब्ररीत बसत नाही. आताशा एक पोकळी वाटते. आयुष्य व्यापून टाकणारं एखादं मूल असावं वाटतं. लहान मुलाचं चिमुकलं जग खुणावतं. पण ते आता परीकथांशी जोडावं वाटत नाही. तिला लिहावं वाटतं. या मुलांबद्दल....त्यांच्या गोष्टी - अम्मा हॉस्पिटलला असताना काय काय सुचायचं. त्यांचा ओघ कमी कां झाला नाही? तिनं कागद पुढं ओढले. बराच वेळ ती लिहीत होती. सगळं काही मनासारखं उतरलं असं नाही. पण वेगळ्या जगाशी ती जोडली गेली. तिला बरं वाटलं. संध्याकाळचे एकाकी प्रहर भरून निघत होते. - पृष्ठ ११९

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तुझं कुठं तसं आहे?

“ऑफिसला जायचं- संध्याकाळी परत यायचं. तीच माणसं, तेच रस्ते.” शंतनू म्हणाला.

“सगळ्यांचं तसंच तर असतं!” मैथिली म्हणाली.

“तुझं कुठं तसं आहे? फेलोशिप घेतलीस, पीएच्.डी.ही मिळाली. यूनिव्हर्सिटीत शिकवतेस. तुझं जग विस्तारलं. यू आर मेकिंग रॅपिड स्ट्राईइस. मी मात्र थांबलो आहे. - फार पूर्वीच.”

मैथिली स्तब्ध झाली. तिचेही केवढे चढ-उतार! पण शंतनूला ते कळणार नाहीत. - पृष्ठ १२३

ओढ सृजनाची

...आज एक वेगळ्याच ओढीनं ती शंतनूजवळ गेली होती. ती ओढ फक्त देहाची नव्हती, गरज फक्त अनुनयाची नव्हती. त्याला लागूनच एक वेगळी अननुभूत ओढ, शरीरापलीकडली... सृजनाची... आपल्या या शरीरातून आपल्या सारखंच कुणी निर्माण होण्याची. याखेरीज या समागमालाही काही अर्थ नसेल का! - पृष्ठ १२४

स्त्रीचं खास अंतर्विश्व

त्याच्याकडे (नवऱ्याकडे) बघता बघता मैथिलीला वाटलं, हा का म्हणून दुःख करतो! हा समोरचा अनोळखा माणूस! हे सगळं दुख तिचं एकटीचंच आहे. ते आता दुःखही नाही. तो एक खोल, गाढ, मर्माचा असा अनुभव होऊन शिल्लक राहणार आहे. त्याचं पुन्हा बीज पडेल, या संपूर्ण अनुभवाचं. कुठल्याही बाईला हे नवीन नाही. देवस्थळी बाईंनाही हाच अनुभव. येरझारा तर चालूच राहतील. स्वतःच्याच पेशीतून पोसलेला तो जीव. आपण भोगल्या त्या कळा- कमरेतून ओटीपोटापर्यंत भिनत गेलेल्या. या माणसानं त्यावर का म्हणून अधिकार सांगायचा! हा माणूस आपल्या जगण्यात बाहेरचाच आहे. हाही नाही. सगळेच तसे असतील. बाहेरचे. याचं दुःख आपलं नाही. - पृष्ठ १२७

ही मैथिली... कुणी वेगळीच स्त्री आहे

त्याच्या मुलाची ती आई आहे. हेच त्याचं तिच्याशी नातं. बस्स. तिचं त्याच्याशी काय नातं असेल, तो तिच्या लेखी काय असेल हे त्याला माहीत नाही. माहीत करून घेण्याची गरज नाही. त्याच्या ऑफिसच्या जगात तो जसा बसत नाही, तसाच तिच्याही तो उपरा असेल. ती कॉलेजकरता तयार होताना, तयार होऊन जाताना, रात्री टेबल लॅपच्या उजेडात कॉलेजच्या उद्याच्या लेक्चरची तयारी करताना, तिच्या गोष्टी लिहिताना, तिच्या आवडत्या तिन मुद्दाम इथं आल्यावर तिच्याकरता करवून घेतलेल्या, तिच्या पुस्तकाच्या शेल्फपाशी उभं राहून पुस्तकं काढताना, पुस्तक वाचताना, घेतलेल्या झुल्यावर बसलेली, आत्ममग्न अशी ती पाहताना त्याला सतत बोचलं की, ही मैथिली त्याच्याकरता नाही. ती कुणी वेगळीच स्त्री आहे. केव्हाही तिच्याबद्दल एक अस्पष्टशी भीती त्याच्या मनात असते. आणि तिच्याशी होणारा संबंधसुद्धा या भीतीनंच ग्रासलेला असतो. तिचं त्याचं लग्न हा एक अपघातच. दोघांची मिळून अशी एकच गोष्ट - अंशुमन. बाकी घरात सर्वत्र तिच्याच खुणा आहेत. तिच्या एकटीच्या. तिनंच ते घर झळाळून टाकलं आहे. शंतनूला ते माहीत आहे. हिच्यापेक्षा एखादी साधी संसार करणारी बाई त्याला चालली असती. - पृष्ठ १३३

पती-पत्नी आणि स्त्री-पुरुष

“पण एक आहे. आता इतरांची म्हणजे मुलांची आणि आपली चाल जुळत नाही. जग खूप फास्ट चाललं आहे. त्या गतीशी जमवून घेता येत नाही. आम्ही खूप वेगळ्या काळातून गेलो... त्या मानानं तुम्हा लोकांचं, तुमच्या पिढींचं जगणं जास्त गुंतागुंतीचं आहे, वेगाचं आहे. आम्हाला तो वेग आता सोसवत नाही. बोअर तर करत नाही नं मी तुम्हाला?”

“नाही, नाही.” ती म्हणाली, “तुम्ही तर मर्माचं बोलताहात. आम्ही वेगळं जगतो आहोत, खरं आहे. तुम्ही लोक पतिपत्नी म्हणून जगत आलात. आम्ही स्त्री-पुरुष म्हणून जास्त जगतो. पण तुम्ही एकमेकांशी बांधले जात होता. एका घरातील तर होताच; पण वेगवेगळीही लोकं एकमेकांशी जोडून होतां. आम्ही हे सगळं गमावून बसलो आहोत. तुम्ही म्हणता त्या वेगानं जाताना आम्हाला कुणाला बरोबर घेता येत नाही. आमची ही ट्रॅजिडीच आहे.” मैथिली थांबली... आमचं बोलणं छान रंगलं होतं. - पृष्ठ १३८-३९

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भीती बाहेर नसते; आपल्यात असते

...तिला समोरचा शंतनु दिसला. सदैव कशाला तरी भ्यालेला, गोंधळलेला. नोकरी तर त्याची आज गेली होती! घरी तर तो आता बसला होता. पण भ्यालेला तो आधीचाच होता. निर्भय तो नव्हताच कधी! आणि ती निर्भय होत गेलेली.... भीती बाहेर नसतेच. ती आपल्यातच असते! एकटा शंतनूही होत गेला. एकटी तीही होती आहे. पण तिचीच तिला सोबत झाली... शंतनूला ते जमलं नाही. जमू शकणारंही नव्हतंच. केवढा टोकाचा विरोध! या स्वतःलाच भ्यालेल्या माणसाचं कसलं दुःख! आणि अपेक्षाही कुठली! तिचा आवेग ओहोटीचं पाणी मागं हटावं तसा मागं झाला. - पृष्ठ १५४

मनोभूमिका

सायकॉलॉजी डिपार्टमेंटला एक चांगलं व्याख्यान होतं... विषय मैथिलीला चांगला वाटला... (त्यातील) त्यांची काही निरीक्षणंही तिला विचार करावीशी वाटली. जी गोष्ट चांगली, आवडलेली असं वारंवार मन उच्चार करत असतं, ती गोष्ट पुष्कळदा त्याच्यावर लादली गेलेली असते. जी गोष्ट नको नको म्हणून दूर सारलेली असते - मुद्दाम हट्टानं, ती मनाच्या एखाद्या कोपऱ्यात रुतूनच बसते... विषयाचा विचार आज भारतीय समाजाच्या मानसिकतेतून त्यांनी केला होता. पुढं कधी अधिक व्यापक स्वरूपात या विषयाला स्पर्श करता येईल असे ते म्हणाले. ते विषयाची फक्त काही सैद्धान्तिकच बाजू मांडत नव्हते. - पृष्ठ १६७

‘भूमी’कार आपणच

“सांगितलं नं... कुणाला कुणासाठी करता यावं असं हे नाही. तू अजून पुष्कळ लहान आहेस, अंशुमन... सगळं तुला कळू शकणार नाही, तरीही सांगावंसं वाटतं. आपल्यात जे घडतं बरं-वाईट किंवा क्वचित काही वेळ सगळं थांबूनच जातं ते सगळं काही दुसऱ्या कुणामुळं होत नाही. आपल्याचमुळं घडतं. त्याची सगळी केंद्रं आपल्यातच असतात. आपणच कुठंतरी कमी पडत असतो. नाही तर सगळं समजून कळून घेऊन त्यापलीकडे तरी जात असतो. पण असे पलीकडे जाणारे फार थोडे इतक्या सगळ्या जणात.” - पृष्ठ १७४

अ-बद्ध मी!

“थांबू या आपण.” ती म्हणाली. समोरचं पुस्तक घेतलं. ती वर्गाबाहेर पडताना एक खसखस पिकली. ‘शिअर बोअरडम!’ कुणी तरी म्हणालं. ती एखाद्या जखमी पक्ष्यासारखी वर्गाबाहेर निघाली. इतकी वर्षं शिकवत आहोत, कधी बेईमान झालो नाही. आज फक्त एक दिवस... आपले कुणाशीच काही बंध जुळले नाहीत. आपलेपणाचे नाहीत, विरोधाचेही नाहीत. विरोधही आपलेपणाचीच एक बाजू असावी. शिकवत आलो त्या शब्दाशीच नाही, तर इतर कुणाशी कसे...! - पृष्ठ १७७

विरागिनी व अ-ज्ञानी!?

मंदिराच्या सभागृहात... सुस्नात, जरीची कोरी वस्त्रं आणि अलंकार घालून सजलेल्या त्या स्त्रिया... त्या भजनातून मात्र श्रीकृष्णाच्या विरागी विराट स्वरूपाला आळवीत होत्या. ते शब्द पण तिला ते ऐकावंसं वाटलं. या शांत वेळी ते स्वर, फार चांगलेही वाटले. पावलोपावली असंख्य प्रार्थनांना नकार नोंदवतानाही त्या देवाच्या घरातले ते पूजेचे शब्द... त्यांनी क्षणमात्र थांबवलं होतं… आकाशात पतितं तोयं यथा गच्छति सागरं... आकाशातून पडलेले पाणी जसे सागराकडे जाते तसे... इथे माणसाच्या इच्छेचा काय प्रश्नच नसावा! हेच अटळ! सतत जाणवत राहणाऱ्या गर्भित प्रकाश- अंधाराचं हेच एक सूत्र! यापलीकडचा प्रदेश अज्ञाताचा! तिथं कुठलेही किनारे नाहीत, होड्या नाहीत! मुळात मग समुद्र तरी आहे की नाही! की तोही त्या अज्ञाताचाच एक अंश! म्हणूनच तो इतका निर्विकारही होऊ शकतो! - पृष्ठ १७९

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

निसटलेली वेळ

तिनं मग नवऱ्याची ओळख करून दिली. थोडा वेळ चिवचिव करून ती गेली. मैथिलीला वाटलं, ती पूर्वी कधी अशी होती! असेल तरी लक्षात नाही. हीसुद्धा एक वेळ असतेच आणि ती आपली कधी नव्हतीच. बस आली. तिला कुणी तरी चढण्यासाठी मागून रेटा दिला. ती बसमध्ये चढली. - पृष्ठ १८७

‘द्रौपदी’ होऊ पाहणारी मैथिली

माझी मैत्रीण मला नेहमी म्हणायची की, मैथिली हे नाव मला शोभत नाही. मी-माझं जे काही व्यक्त रूप आहे ते त्या पुराणकालीन मैथिलीच्या नावाशी एकदम न जुळणारं आहे... यावरून मग मला सारखं वाटायचं की, अयोनीसंभवा अशी ती एक वेगळी स्त्री (वाल्मिकींना) अभिप्रेत होती, पण रामानं तिचं तेज झाकोळून टाकलं... रामाचाच संदर्भ घेऊन ती वावरली. इथं वाल्मिकी हा रामायणाचा लेखक, पण तो एक पुरुष होऊनच सीतेला बघतो, मापतो. इथं वाल्मिकी त्यांच्या काळापलीकडे ही जात नाही. पण द्रौपदी मात्र वेगळी झाली आहे. व्यासांनी तिला आपल्या काळातीत असं पाहिलं. नवऱ्याच्या बरोबर वनवासात जातानाही पावलं तिची स्वतःचीच आहेत. शिष्टाई करायला आलेल्या कृष्णाला ती कळकळून विचारते की, तू युद्ध टाळतो आहेस का? मला तो तिचा प्रश्न फार मर्माचा वाटतो. मैथिलीची मुलं राज्य करतात, द्रौपदीची मारली जातात. माणसाच्या अस्तित्वालाच झोंबलेले प्रश्न पडलेली ही एकमेव स्त्री मला वाटते. मला हे सगळं लिहायचं आहे... माझा प्रवासही मोठा लांब आहे. मला त्या काळापासून माझ्यापर्यंत पोचायचं आहे आणि ती कदाचित माझी ताकदच नसेल. - पृष्ठ १९८

ढोंग

प्रेम करायला (ही) शिकावं लागतं. एकदा एक माणूस गौतम बुद्धाकडे गेला. म्हणाला, “मी आयुष्याला कंटाळलो, हेवेदावे, तिरस्कार....उबगलो मी. मला दीक्षा द्या.”

गौतम बुद्ध त्याला म्हणाले, “मला आताच तुला दीक्षा देता येणार नाही.” “का...?”

ते त्याला म्हणाले की, “प्रथम तू न स्वीकारलेली माणसं किती आहेत, ते पाहा. त्यांची संख्या शून्यावर तर येणार नाही, पण कमी करता आली तर पाहा. मग दीक्षा देईन तुला.”

“मग मिळाली का दीक्षा त्याला नंतर?” हे भाबडेपणी विचारणाऱ्या मैथिलीकडे त्यांनी पाहिलं, “मला तरी याचं उत्तर कुठं ठाऊक आहे, मैथिली. तू राग, तिरस्काराबद्दल म्हणालीस. मी त्याबद्दल सांगितलं. सुरुवात आपल्या मुलांपासून सुद्धा करायची असते. त्यांच्यावरसुद्धा प्रेम करायला आपल्याला शिकावं लागतं...” - पृष्ठ २१४-२१५

बाहेर पडण्याचाही रस्ता हवा!

तिची जुनी गोष्ट... तिनं लिहिलेली... एक लहान मुलगा समुद्राच्या वाळूत किल्ला बांधतो. खूप उंच आत रस्ते, भुयारं, गोष्टीत वाचलेलं सगळं! राहण्याची सोय, सगळ्या सुख सोयी- बाहेर येण्याचीही तशी गरज नाही. आई म्हणते, “अरे, एकच रस्ता केलास किल्ल्याला? जाण्याचा, आत जाण्याचा. बाहेर पडण्याचा नको का?” मुलगा म्हणाला, “बाहेर कशाला पडायचं पण! आत सगळं आहेचं.” आई म्हणते, “अरे कोणती वेळ कशी येते सांगता येत नाही...” थोड्याच वेळात समुद्राच्या लाटा येतात. किल्ल्याला जो एक रस्ता असतो तिथूनच पाणी घुसतं. तो किल्ला पडतो. वाळूतच वाळू मोडून पडते. आई म्हणते, “बघ दुसरा रस्ता असता, तर आतल्या माणसांना बाहेर नसतं पडता आलं!” मुलाला पटतं. मुळात सगळा खेळच. पण त्यातही दोन रस्ते. एक सुखाचा, आनंदाचा, यातून आत शिरता येतं. दुसरा वेदनेचा, क्लेशांचा, तिथून बाहेर पडता येतं. तोच नसता तर...! - पृष्ठ २१७

स्वाधीन नसतंच काही

(कुणी अडवावं किंवा जा म्हणावं) “मला या दोन्हीच्या अपेक्षा नाहीत. पण माझं मी जगत आहे. मला ते आवडतही आहे. आपण सगळ्या जणी थोड्या फार फरकानं एकच तर लढाई लढत असतो! तीव्रता कमी अधिक असते, इतकंच. पण त्यात भाग घ्यायचा की नाही, हे मात्र आता आपल्या स्वाधीन राहिलेलं नाही”, मैथिली म्हणाली. - पृष्ठ २२६

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

तळ ढवळून काढणारी चळवळ हवी!

“या फेस्टिवलचे चित्रपट ही एक चळवळच असते. नवीन काही हे लोक देऊ पाहतात. पण लोकच अनुत्सुक झालेत.” मैथिली म्हणाली, “असं का म्हणावं?” अंशुमन म्हणाला, “कारणं अनेक असतील, पण महत्त्वाचे हेही असेल का, की जगण्याची गती खूप फास्ट होत चालली आणि अस्सल जातिवंत कला कधी तशी नसते. आपल्या भूमीचे पाझर समजून, पचवून कधी त्याच्या बाजूनं तर कधी त्याच्या विरोधात बाहेरचं जग अनुभवत ती पाय रोवू पाहते. तिचे पाय रोवले गेले की, मग तिच्या काळाच्या कक्षा ओलांडेलही. पण तोपर्यंत या सगळ्या चळवळी म्हणजे समुद्रावर एखादी बोट वेगानं गेलेली तू पाहिली आहे का, तशा असतात. ती जसजशी जाते तसतशी मागं लांबवर प्रचंड लाट वेगानं उसळून येते आणि समुद्रात काही दूरपर्यंत जातेही. पण समुद्राचा तळ त्यानं ढवळला कुठं जातो!” “तू खूप छान उदाहरण दिलंस गं!” सुभद्रा म्हणाली. - पृष्ठ २२८

आई-मुलीचं नातंच वेगळं!

....पत्र हाती घेऊन ती स्तब्ध बसून राहिली. वाटलं या वेळी एखादी मुलगी हवी होती आपल्याचसारखी दिसणारी. आपल्यासारखाच विचार करणारी. थोडी हट्टी, थोडी आडमुठी- जराशी अविचारीसुद्धा. आई-मुलीचं नातंच वेगळं. दोघींच्या कळाही एक. मुलांचं तसं नसतं. मुलगे तसेही वेगळेच वाढत असतात. आईशी त्यांचे बंधही जरा फटकूनच असतात. काहीसे प्रवाहाविरुद्ध जाणारे. - पृष्ठ २५२

‘आपण’रूपी भूमी

“युद्धभूमीवर एवढी युद्धं लढली जातात, पण त्यातलं हरणं किंवा जिंकणं हे त्या भूमीचं नसतं... तुझ्याकडं पाहिलं नं की मैथिली, हे विशेष जाणवतं.” मैथिलीला वाटलं, आता आपल्या डोळ्यात पाणी येणार. - पृष्ठ २५८

‘भूमी’ – आशा बगे | मौज प्रकाशन गृह, मुंबई | दुसरी आवृत्ती, १५ जून २००६

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......