प्रसिद्ध लेखक, संशोधक, संपादक, अनुवादक आणि समाजसेवक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या सत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने १५ ऑक्टोबर २०२० रोजी एकदिवसीय ऑनलाइन नॅशनल वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. त्या मंथनातून ऑक्टोबर २०२२मध्ये ‘डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य समीक्षा’ (संपादक – जी. पी. माळी), ‘डॉ. सुनीलकुमार लवटे : अमाप माणूस’ (संपादक – अर्जुन चव्हाण) आणि ‘डॉ. सुनीलकुमार लवटे : बहुविध संवाद’ (संपादक – विश्वास सुतार) या त्रिखंडी गौरवग्रंथाची निर्मिती झाली. हा ग्रंथ भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर यांनी प्रकाशित केला आहे. या तिन्ही खंडांनी संबंधित संपादकांनी लिहिलेल्या मनोगतांचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
साने गुरुजी आणि वि. स. खांडेकर यांचे सच्चे अनुयायी आणि कृतिशील वारसदार - जी. पी. माळी
ज्येष्ठ लेखक, संशोधक, संपादक, अनुवादक, समाजसेवक, समुपदेशक, वक्ते आणि विचारवंत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या सत्तराव्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापुरातल्या ‘भाग्यश्री प्रकाशना’च्या वतीने १५ ऑक्टोबर २०२० रोजी आयोजित केलेल्या ‘डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे साहित्य व विचार’ या विषयावरील एकदिवसीय ऑनलाइन नॅशनल वेबिनारच्या निमित्ताने डॉ. लवटे यांच्या संवेदनशील, सर्जनशील, चिंतनशील आणि ऋजू व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या समग्र साहित्यसंपदेची आणि सामाजिक बांधिलकीयुक्त वैचारिक उक्ती आणि कृतीची सर्वंकष चर्चा झाली.
या अनुषंगाने प्रकाशकांच्या आवाहनास उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन काही अभ्यासू लेखकांनी आपले शोधनिबंध सुपुर्द केले. प्राप्त झालेल्या शोधनिबंधांचा धांडोळा घेतला असता बरीच पुस्तके त्यात समाविष्ट नसल्याची बाब प्रकर्षाने लक्षात आली. या गोष्टीचा सारासार विचार करून एक कृतियोजना राबविण्याचा निर्णय घेतला गेला. डॉ. लवटे यांच्या उर्वरित पुस्तकांच्या परीक्षणांचे संकलन करावयाचे आणि अद्याप परीक्षणात्मक लेखन न झालेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहून घेण्याचा निर्धार केला. लवटे सरांच्या सर्व म्हणजेच सत्तावीस पुस्तकांचे परीक्षण अंतर्भूत असलेला समीक्षात्मक ग्रंथ साकार करण्याचा संकल्प सोडला आणि माझ्यासह डॉ. अर्जुन चव्हाण, श्री. विश्वास सुतार, सौ. भाग्यश्री पाटील-कासोटे असे आम्ही सर्वजण धडाडीने कामाला लागलो.
वेबिनारच्या माध्यमातून मोजकेच शोधनिबंध प्राप्त झाले होते. विविध ग्रंथांतून वा विशेषतः नियतकालिकांतून लिहिल्या गेलेल्या परिचयात्मक वा परीक्षणात्मक लेखांची शोधमोहीम राबवली असता आठ पुस्तकांवरील बारा लेख उपलब्ध झाले. परीक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्वच ग्रंथांवरील लेख मागवण्याच्या दृष्टीने त्या त्या क्षेत्रातील ज्येष्ठ, जाणकार आणि अभ्यासू लेखकांशी संपर्क साधून ग्रंथाला पूर्णत्वाकडे नेण्याच्या दृष्टीनेही कसोशीने प्रयत्न केले.
डॉ. लवटे सरांची लोकप्रियता, समाजाभिमुख सेवाभावी दृष्टी आणि विविध क्षेत्रांतील सकारात्मक कार्यशैली उपयुक्त ठरल्यामुळेच अपेक्षित ध्येयपूर्ती होणे सुकर झाले. विविध मान्यवरांचे एकूण पंचवीस लेख मिळाले. सत्तावीस ग्रंथांवरील सदतीस लेखांची मोलाची उपस्थिती लाभली, म्हणूनच प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती झाली, याचा मला अत्यानंद होत आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
डॉ. लवटे यांचा जीवनप्रवास व लेखक म्हणून होत गेलेला विकास यांवर प्रकाश टाकण्याचं कारण म्हणजे त्यांची आगळीवेगळी, शून्यातून विश्व निर्माण करणारी, स्वतःबरोबरच सहप्रवाशांचा सहानुभूतीने आणि आत्मीयतेने विचार करणारी आदर्श, अनुकरणीय आणि अलौकिक अशी, दमदार पण काळजाला भिडणारी अखंड वाटचाल. या खडतर मार्गक्रमणाचा वेध घेणारा वैशिष्ट्यपूर्ण आणि अभ्यासपूर्ण ग्रंथ साकार झाल्यास तो वाचकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळण्यास कारणीभूत ठरेल, अशा मनोभूमिकेतून मी संपादनाची जबाबदारी आनंदाने आणि अभिमानाने स्वीकारली.
डॉ. लवटे यांनी विविध वाङ्मयप्रकार हाताळून आपले गुरू आणि आदर्श असलेल्या वि. स. खांडेकरांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल केली, म्हणूनच ते मला प्रामुख्याने खांडेकरांचे आणि बऱ्याच बाबतींत साने गुरुजींचे कृतिशील आणि प्रतिभासंपन्न वारसदार किंवा सच्चे अनुयायी वाटतात. आत्मकथन, वैचारिक व सामाजिक लेखसंग्रह, काव्यसंग्रह, कथासंग्रह, स्फुटसंग्रह, व्यक्तिलेखसंग्रह, भाषणसंग्रह, मुलाखतसंग्रह, प्रस्तावनासंग्रह, पुस्तक परीक्षणसंग्रह, बालसाहित्य, समीक्षा, ग्रंथवेध, चरित्रग्रंथ, शिक्षणव्यवस्थेची चिंता व चिंतन करणारा ग्रंथ, आत्मचरित्रपर लेख असे विविध प्रकारचे विपुल लेखन करून डॉ. लवटे यांनी केले आहे.
‘खाली जमीन वर आकाश’ या आत्मकथनाद्वारे डॉ. लवटे यांच्या ग्रंथनिर्मितीचा श्रीगणेशा झाला. फेब्रुवारी २००६मध्ये हे आत्मकथन प्रसिद्ध झालं आणि वाचक-समीक्षकांकडून त्याचं प्रचंड स्वागत झालं. सचिन तेंडुलकरनं पहिल्याच चेंडूवर षटकार मारावा आणि क्रिकेट शौकिनांची मनं जिंकावीत, असाच हा प्रकार होता. मग मात्र लवटे सरांनी एका पाठोपाठ एक ग्रंथ लिहून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. प्रत्येक ग्रंथाचं वेगळेपण त्यांच्या बहुरंगी आणि बहुआयामी प्रतिभासामर्थ्यावर शिक्कामोर्तब करणारं ठरलं. ‘वाचन’ हे या मालिकेतील २०१८मध्ये प्रसिद्ध झालेलं अखेरचं वाङ्मयीन अपत्य.
म्हणजे २००६ ते २०१८ हा एका तपाचा कालावधी सत्तावीस पुस्तकांना जन्म देणारा ठरला. विशेष म्हणजे हे झपाटलेपण केवळ लेखनाच्या बाबतीतच होतं असं नाही, तर विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्याच्या बाबतीतही तेवढ्याच झपाट्यानं तनमनधन अर्पण करून सुरू होतं. महावीर महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा यशस्वीरित्या सांभाळून प्रशासकीय जबाबदारी पार पाडण्यातही ते कुठेच कमी पडले नाहीत, हे लक्षात घेण्यासारखे आहे.
डॉ. लवटे यांच्या समग्र साहित्यावर नजर टाकली असता सामाजिक भान आणि कर्तव्याची जाण असलेला लेखक ही त्यांची खरी ओळख ठरते. दलित, वंचित, आदिवासी, गोरगरीब, अंध, अपंग, मूकबधिर इत्यादी घटकांच्या उद्धारासाठी, स्थैर्यासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी ते सर्व सामर्थ्यानिशी कार्यरत राहिले. ‘सुधारक’कार गोपाळ गणेश आगरकरांनी ‘इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार’ अशी परखड भूमिका उराशी बाळगून समाजसुधारणेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. त्यांनी बोलके सुधारक, कर्ते सुधारक आणि सुधारणानिंदक असे सुधारकांचे तीन प्रकार सांगितले. या दृष्टीने पाहता डॉ. लवटे हे कर्ते सुधारक असल्याचे साधार सिद्ध होते. कारण ते एका बाजूला लिहीत राहिले आणि त्याच दरम्यान ते लेखनाशी सुसंगत, पूरक आणि प्रेरणादायी काम करत राहिले. प्रस्तुत ग्रंथाचे संपादन करताना ही गोष्ट प्रकर्षाने अधोरेखित व्हावी, म्हणून कसोशीने प्रयत्न करून कर्तव्यपूर्ती केली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
डॉ. लवटे हे अनाथपण आणि उपेक्षा वाट्याला आलेले अपवादात्मक व्यक्तिमत्त्व. प्रतिभावंत लेखक आणि सेवाभावी वृत्तीचा कार्यकर्ता, अशी दुहेरी भूमिका वठवताना समाज, शिक्षण, शोषण, अध्यापन, व्यक्तिचित्रण, संगोपन, पुनर्वसन, भारतीय भाषा व साहित्य इत्यादी विषयांवर विपुल लेखन करताना ‘आधी केले मग लिहिले’ हा महात्मा फुल्यांचा मार्ग त्यांनी अनुसरला. म्हणूनच ते सर्वांच्या कौतुकास व आदरास पात्र ठरले. त्यांच्या साहित्यकृतींवर पुरस्कारांचा वर्षाव झाला.
प्रस्तुत ग्रंथ परिपूर्ण व्हावा, या भूमिकेतून काही पुस्तकांवर एकापेक्षा अधिक लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. डॉ. लवटे यांच्या व्यक्तिमत्त्वाऐवजी त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वावर अधिक भर देऊन, हा समीक्षाग्रंथ सिद्ध करण्याचे विचारपूर्वक आणि जाणीवपूर्वक ठरवले आहे. अर्थात, साहित्याच्या अभ्यासाच्या अनुषंगाने लेखकाच्या व्यक्तिमत्त्वाचा परामर्श ओघाने येणे स्वाभाविक आणि आवश्यकच असले तरी पुस्तकाचा केंद्रबिंदू साहित्यसंपदा असण्याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. कारण कवी कळाल्याशिवाय कविता कळत नाही, नाटककार उमगल्याशिवाय नाटकाचं सूत्र उलगडता येत नाही; याप्रमाणेच डॉ. लवटे ही व्यक्तिरेखा कळली की, त्यांच्या साहित्याचं आकलन होणं सुकर ठरतं, हे निश्चित.
प्रस्तुत ग्रंथाची निर्मिती म्हणजे त्यांच्या साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा, स्वरूप, वैशिष्ट्ये आणि सृजनात्मक पाऊलखुणांचा सूक्ष्म, सखोल अभ्यास आणि कार्यगौरव असे म्हणता येईल.
.................................................................................................................................................................
डॉ. लवटे म्हणजे ‘सत्यवादी’, डॉ. लवटे म्हणजे ‘सच्चाई’ हे समीकरण होऊन गेले आहे... - अर्जुन चव्हाण
सुमारे दोन-अडीच दशकांपूर्वीची गोष्ट आहे. कोल्हापुरात गुन्हेगारी व न्यायालयीन क्षेत्रात खळबळ माजवणारी घटना घडली. आपल्या दोन मुलींच्या साथीने अंजना गावितकडून एक डझनभर बालकांची अमानुष हत्या झाली. सगळं कोल्हापूर हादरून गेलं. मातांची हृदये पिळवटून निघाली. न्यायालयात निवाडा झाला. खुन्यांना फाशी झाली. वृत्तपत्रांमध्ये पहिल्या पानावर तशा बातम्या छापून आल्या. बालकांचा घेतला गेलेला जीव परत येणार नव्हता, परंतु समाजात न्याय मिळाल्याची समाधानाची लाट पसरली.
पण दुसऱ्या दिवशी डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा लेख छापून आला आणि तो अधिक खळबळ माजवणारा ठरला. आशय होता, बाळाला आईपासून वंचित करण्याचा कोणाला अधिकार? गावित मायलेकींना झालेल्या फाशीच्या शिक्षेने साऱ्या पंचक्रोशीला दिलासा मिळाला खरा, पण या लेखाने खळबळ उडाली. अनेकांनी डॉ. लवटे यांना फोन करून प्रतिक्रिया दिल्या. कित्येकांना लेखाचा विषयच कळला नव्हता. त्यामुळे डॉ. लवटे यांना बोलावे लागले. त्यांना आरोपीला झालेल्या शिक्षेवर भाष्य करायचे नव्हते, तर बालहक्काचा मुद्दा उपस्थित करायचा होता. न्यायालयापासून जेलच्या दारापर्यंत रेणुका गावितचं लहान बाळ तिच्या कडेवर होतं. आईला आत जेलात नेलं व बाळाला तिच्यापासून काढून घेतलं. आई गुन्हेगार आहे खरंय, पण शिक्षा बाळाला. कारण त्याला वंचित केलं गेलं.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
वंचितांचे जीवन वाट्याला आलेल्या व मानवतेने गदगदलेल्या डॉ. लवटे यांच्या लेखणीतून नाण्याची दुसरी बाजू पुढे येऊ शकते हेच खरे. जेव्हा कायदा अपुरा पडतो, तेव्हा विचारवंतच दिशा देत असतो. पुढे सदर लेखाबद्दल न्यायदानाचे काम करणाऱ्या खुद्द न्यायाधीश महोदयांचा डॉ. लवटे यांना फोन आला आणि त्यांनीही मोठ्या मनाने मान्य केले की, “सर, तुम्ही मांडलेल्या विचारांचा मी आदर करतो, पण आमचे हात कायद्याने बांधलेले आहेत.'
डॉ. लवटे हे सारासार विचार करणारे सच्चे सार्वभौम व्यक्तिमत्त्व वाटल्यामुळेच पुढे ‘मानव अधिकार आयोग’ (Human Right Comission) दिल्ली यांनी त्यांना या आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्त केले. कोल्हापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व त्यांनी कित्येक वर्षे केले. त्यांच्या कार्यकाळात कायद्याच्या चाकोरीत व न्याय प्रांगणात असंख्य अन्यायग्रस्तांना, वंचित-उपेक्षितांना तर न्याय मिळालाच, परंतु न्यायालयाच्या बाहेर, वैयक्तिक पातळीवर जाऊन त्यांनी खचलेल्या, रंजल्या-गांजलेल्यांना, शरीर व मनाने कोसळलेल्यांना समर्थपणे उभे केले. अमाप शक्ती आणि सामर्थ्य असलेला बाप माणूसच हे करू शकतो.
‘डॉ. सुनीलकुमार लवटे : अमाप माणूस’ या संपादित ग्रंथात पंचवीसभर लेखक-विचारवंत, जाणकार यांनी त्यांच्याबद्दल उत्स्फूर्तपणे लेख लिहून आपले निखळ, प्रांजळ विचार मांडले. यातून प्रामुख्याने त्यांच्या शैक्षणिक, साहित्यिक, प्रशासनिक, सामाजिक, प्रायोगिक आणि सुधारणावादी व्यक्तिमत्त्वाचे नितळ व प्रांजळ दर्शन घडते.
डॉ. लवटे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे! क्रिकेटच्या भाषेत ज्याला ‘ऑल राउंडर’ म्हणतात. सामाजिक प्रश्नांची धमाकेदार फलंदाजी, नैतिक रूपांची सकस गोलंदाजी, सुधारणेचे सक्षम क्षेत्ररक्षण, आदर्श खिलाडू वृत्तीची आतषबाजी, प्रेरणादायी संघनायकी, मानवतेचे सांघिक नेतृत्व आणि सार्थक जीवन खेळाचे नेटके कर्तृत्व असलेले...
डॉ. लवटे यांचे सेवाकार्य हेवा वाटावे असे आहे. प्रत्येक क्षेत्रातील सेवा त्यांच्या वाट्याला हेवासुद्धा देऊन गेली. त्यामध्ये शिक्षण, संशोधन, अध्यापन, लेखन, संपादन, शोध मार्गदर्शन, प्रशासन, प्रबोधन, पर्यवेक्षण आणि वंचितांचे-उपेक्षितांचे संरक्षण, या सर्व पातळ्यांवरील त्यांचे कार्य डोळ्यांत अंजन घालणारे असल्याने काहींचे डोळे द्वेषानेही दिपले. परंतु त्यांनी त्याची तमा केली नाही. अनेक ठिकाणी संघर्ष झाले, कडवट प्रसंग निर्माण झाले. त्याची किंमतही मोजावी लागली. त्या त्या वेळी त्यांनी ती मोजलीदेखील. परंतु आपला ‘सुधारवादी कृतिशील जाहीरनामा’ (अजेंडा) ना मागे घेतला, ना स्थगित केला. त्यांच्या कृतीतील सकारात्मक जोम हे त्यांच्या विरोधात स्तोम माजवणाऱ्यांना पुरून उरले. बरेचसे विरोधकच कालांतराने त्यांचे प्रशंसक झाले. पण महत्त्वाचे हे की, याचे श्रेय डॉ. लवटे यांच्यातील क्षमाशीलतेला जाते. त्यांचे कित्येक विरोधक पुढे त्यांचे समर्थक म्हणून वावरू लागल्याचे आम्ही कोल्हापूरकर साक्षीदार आहोत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
प्रभावशाली वक्ते आणि बदलाचे भोक्ते असलेले डॉ. लवटे हे जसे हाडाचे शिक्षक, तसेच परिवर्तनाचे पाईक. जगण्यातली आणि वागण्यातली त्यांची कृतिशीलता केवळ थक्क आणि अंतर्मुख करणारी आहे. ते आयुष्यभर बोलत, चालत आणि जबाबदाऱ्या पेलत राहिले. यासंबंधी शेकडो दाखले देता येतील. पण दोनच उदाहरणे वानगीदाखल पुरेशी आहेत. पहिले उदाहरण म्हणजे महावीर कॉलेज, कोल्हापूरचे प्राचार्य म्हणून काम करत असतानाचे. एका मोठ्या समारंभात सभागृहात मंचावर आसनस्थ असलेले मान्यवर आणि विद्यार्थ्यांतून वाजवलेली शिट्टी, झालेला रसभंग, प्राचार्य म्हणून डॉ. लवटे यांनी ‘शिक्षा करणार नाही पण चूक कबूल करण्याचे’ केलेले आवाहन, त्याला प्रतिसाद न मिळाल्याने संस्कारांत मीच कमी पडलो म्हणून स्वतः स्वतःचे अंगठे पकडून करून घेतलेली शिक्षा आणि शेवटी विद्यार्थ्याचे पुढे येऊन माफी मागणे, हे सर्व सदोष माणसातील बदलांवर त्यांचा असलेला विश्वास दर्शवणारे आहे.
दुसरं उदाहरण कळंबा कारागृहातील कैद्यांचं आहे. गांधीजींच्या अहिंसेचा अंगीकार करून डॉ. लवटे यांनी कोल्हापुरातील कळंबा कारागृहामध्ये ईदच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी एक सार्थक, प्रबोधक व संमोहक भाषण दिले. त्यातून मन व हृदय परिवर्तनासाठी साद घातली. त्यांना जो कैद्यांचा प्रतिसाद मिळाला, गुन्हेगारी मनोवृत्तीतून बाहेर पडण्याचा त्यांनी जो संकल्प केला, तो प्रसंग ऐतिहासिक म्हणावा लागेल. डॉ. लवटे यांच्यासारखे प्रबोधनकार वक्ते जर गुन्हेगारांच्या पुढे बोलत राहिले, तर या देशात कारागृहांची संख्या आणि त्यांच्या भिंती वाढवण्याची गरज पडणार नाही.
डॉ. लवटे यांच्याबद्दल एक आश्चर्यजनक सत्य या निमित्ताने सांगणे औचित्यपूर्ण होईल. त्यांची मराठी साहित्यसंपदा विपुल आहे. बहुसंख्य मराठीभाषी वाचकांना ते मूळचे हिंदीचे लेखक आहेत, हे माहिती नाही. प्रख्यात हिंदी साहित्यिक प्रभाकर माचवे, गजानन माधव मुक्तिबोध, माधवराव सप्रे, अनंत गोपाल शेवडे, नाटककार डॉ. शंकर शेष ही सगळी दिग्गज मंडळी मूळ मराठीभाषी आहेत हे सांगावे लागते. कारण मराठीभाषी असूनेदखील त्यांनी हिंदीत जे योगदान दिले, त्याचा हा परिणाम. डॉ. सुनीलकुमार लवटे यांचा प्रवास याउलट दिसतो. संशोधक, अभ्यासक, लेखक, मार्गदर्शक, अनुवादक या सर्व रूपांत मूळचे ते हिंदीचेच. त्यांच्या हिंदी साहित्यसंपदेत प्रामुख्याने मूलभूत रूपाने यशपाल, डॉ. शंकर शेष, अनंत गोपाल शेवडे आणि हिंदी वेब साहित्य यांसह जवळपास वीस ग्रंथांचा समावेश दिसतो. त्यामध्ये संशोधन, मौलिक सृजन, समीक्षा, अनुवाद आणि संपादन इत्यादी ग्रंथ आहेत.
डॉ. लवटे यांच्याबद्दल नक्की निर्णय करणं कठीणच आहे की, ते नेमके कोण आहेत? त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अत्यंत प्रभावी पैलू हा समाजसुधारकाचा आहे. तो सर्वमान्यही आहे. त्यांनी आजवर वंचित, उपेक्षित, पीडित, त्रस्त, अन्यायग्रस्त, तळागाळातील अस्वस्थ समाजासाठी, त्यांच्या ऊर्जितावस्थेसाठी आपल्या जीवनातील उमेदीच्या काळातील जो वेळ दिला, त्यातून त्यांच्यातील समाजसुधारक साऱ्या आसमंतात भरून उरला. त्याचा प्रभाव असा झाला की, डॉ. लवटे हे हिंदी-मराठी लेखक यापेक्षा समाजसुधारक म्हणूनच सर्वसामान्यांचा आधारवड होऊन गेले.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
डॉ. लवटे यांच्या वाट्याला प्रामुख्याने तिहेरी जीवन आल्याचे दिसते. मातृ-पितृ छत्रविहीन कर्णाचं, आदर्श गुरू म्हणून गुरुवर्य द्रोणाचार्याचं आणि समाजकार्यातून मिळालेल्या लोकमान्यतेमुळे सत्यभाषी युधिष्ठिराचं. अर्थात, जशी कर्ण, द्रोण आणि धर्मराज यांच्यातील साधर्म्याची बलस्थानेही डॉ. लवटे यांच्या व्यक्तिमत्त्वातून डोकावतात, तशी त्यातील दरी किंवा फरकही गडदपणे जाणवतो. इथे तुलनात्मक मूल्यमापन करून लहान-मोठेपण दर्शवणे हा उद्देश नसून वेगळेपण, गुणवैशिष्ट्य आजच्या काळात किती व कसे प्रासंगिक आहे एवढाच कटाक्ष अभिप्रेत समजावा. माता कुंतीनेच त्याग केल्याने खऱ्या मातापित्यांपासून वंचित-उपेक्षिताचे जीवन कर्णाच्या वाट्याला आले. कौरव-पांडव युद्ध प्रसंगी जेव्हा माता कुंतीकडून कर्णाला युद्धभूमीवर समजते की, ‘तू माझा मुलगा आहे, पांडव तुझे भाऊ आहेत. तू त्यांच्याशी युद्ध करू नकोस.’ तेव्हा मातेशी सडेतोड संवाद करणारा कर्ण आपल्या आईचा चांगलाच समाचार घेतो. आक्रोश व्यक्त करतो. डॉ. लवटे यांच्या बाबतीत इथे वेगळेपण दिसते. आपल्या अनाथपणाची जाणीव होणं, पंढरपुरातील अनाथालयातील दाई (पुढे त्यांचा त्यांनी आई म्हणून सांभाळ केला) यांना आपली आई कोण आहे, याबद्दल प्रश्न विचारणं, मिळालेली उत्तरं समाधानकारक न वाटणं, नजर चुकवून कार्यालयातील दप्तरात आईबाबतीत असलेली नोंद वाचणं, तिच्या आयुष्यात आपण पुन्हा गेलो, तर तिचं पुढील जीवन उद्ध्वस्त होण्याची जाणीव होणं, तिची व्यथा समजून घेऊन तिला माफ करण्याची मनोवृत्ती तयार होणं आणि पुढे आईबद्दल कधीही आक्रोश किंवा चीड व्यक्त न करणं, हे सगळे डॉ. लवटे यांच्या ‘अमाप’ व्यक्तिमत्त्वाचा भाग वाटतो.
डॉ. लवटे यांना व्रतस्थ समाजसेवेतून लाभलेली प्रसिद्धी, मिळालेली लोकमान्यता आणि लोकविश्वास यांतून त्यांची ‘सत्यवादी’ अशीच ओळख निर्माण झाली. डॉ. लवटे म्हणजेच ‘सच्चाई’ हे समीकरण होऊन गेले. सर्वांत वडील पांडव बंधू युधिष्ठिर अर्थात धर्मराजांसारखी विश्वसनीयता ही त्यांना त्यांच्या नैतिक कर्तृत्वातून लाभली. ते धर्मराजासारखे सत्यवादी तर मानले जातातच, परंतु त्यांनी कधीही ‘नरो वा कुंजरो’ अशी अर्धसत्यदर्शी भूमिका घेतली नाही. ते मितभाषी जरूर आहेत, पण स्पष्ट, परखड व सडेतोड यामध्ये बिनजोड.
पारितोषिके, मानसन्मान, पुरस्कार, सत्कार हे डॉ. लवटे यांच्या कार्याचा शोध घेत, त्यांच्या पाठीमागे धावत आलेले आहेत. त्यातून त्यांना बळ मिळत गेले. चांगल्या कामासाठी ऊर्जा व शक्ती मिळत गेली. सत्कार्यावरील त्यांचा विश्वास अढळ होत गेला. आज त्यांच्या चौफेर कार्याचा डोंगर पाहायला मिळतो. त्यातून कित्येकांना चांगुलपणा जोपासण्याची, सत्कार्याची, निरपेक्ष सेवेची प्रेरणा मिळते. जे सतत क्रियाशील, कार्यरत असतात, अडथळे, अडचणी, संकटेही त्यांच्याच वाट्याला येतात.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे जरी खरे असले तरी अभावातून प्रभावाकडे, वंचित अपूर्णतेतून वांछित परिपूर्णत्वाकडे आणि संघर्षातून उत्कर्षाकडे जाता येते याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजेच डॉ. लवटे. ‘अनाथ आश्रम’, ‘रिमांड होम’ यांचे ‘बालकल्याण संकुला’मध्ये रूपांतर करणारे डॉ. लवटे यांच्यासाठी ‘बालकल्याण संकुल’ हे जीव की प्राण! परंतु तिथेही त्यांच्या कार्यात 'अर्थ' शोधत त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यातून त्यांना वेगळं व्हावं लागलं. नावारूपास आलेल्या संस्थेतून. परंतु त्यांच्यातील ऊर्मी, ऊर्जा इतर अनेक क्षेत्रांत धांडोळा घेत राहिली. त्याची दखल राज्यभर, देशभर घेण्यात आली. त्यांना कैक मानसन्मान, पुरस्कार मिळाले आणि त्या पोटी मिळालेली लाखोंची रक्कम, त्यांनी समाजकार्यात मग्न असलेल्या सामाजिक संस्थांना, गरजूंना दान केली. खऱ्या समाजसेवकाच्या कार्याचे खोटे ‘अर्थ’ लावणाऱ्यांना याहून समर्पक व कृतिशील उत्तर काय असू शकते?
‘डॉ. सुनीलकुमार लवटे : अमाप माणूस’ या ग्रंथाचे संपादन आनंददायी होते. यातील प्रत्येक उदगार लेखकांच्या अंत:करणातून आलेला असल्याने तो जाणून घेण्याची जिज्ञासा वाढत होती. यातील लेखक वेगवेगळ्या वर्गातील, भागांतील व जगातील असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. यातील प्रत्येक लेखक डॉ. लवटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेगळा पैलू अधोरेखित करतो…
.................................................................................................................................................................
जणू हा मुलाखतींचा क्ष-किरण व्यक्ती उकल करतानाचा संवाद परिमल (सुगंध) आहे - विश्वास सुतार
कोल्हापुरातील डॉ. सुनीलकुमार लवटे हे ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून सुपरिचित आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध आणि शोध घेणारा ‘डॉ. सुनीलकुमार लवटे : बहुविध संवाद’ हा मुलाखत संग्रह वाचकांसमोर सादर करताना मला आनंद होत आहे.
डॉ. लवटे यांचा जन्म ११ एप्रिल १९५० रोजी पंढरपूर येथील ‘वा. बा. नवरंगे बालकाश्रमा’त झाला. वयाची नऊ वर्षे तिथे ते वाढले, खेळले आणि सुरुवातीचे प्राथमिक शिक्षणही शिकले. पुढे संस्थेच्या नियमानुसार त्यांचे स्थलांतर कोल्हापुरातील रिमांड होम या अनाथाश्रमात झाले. तिथे राहून त्यांनी शिक्षण घेतले. गारगोटी येथे पदवी शिक्षण घेऊन ते शिक्षक झाले. पुढे पीएच.डी. पदवी प्राप्त करून प्राध्यापक, प्राचार्य झाले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून ते तावून-सुलाखून निघाले. उत्कृष्ट ग्रंथ आणि ध्येयवादी माणसांच्या सहवासाने ते समृद्ध झाले. त्यांना जीवनदृष्टी मिळाली आणि कार्याची दिशा निश्चित झाली.
दरम्यान उपजत प्रतिभा, निरीक्षण आणि कष्टातून त्यांनी सातत्याने लेखन केले. वंचितांच्या उत्थानासाठी स्वतःला झोकून दिले. यासाठी देशविदेशात संचार केला. आयुष्यात अनेक चढउतार येऊनही ते स्थितप्रज्ञ राहिले.
२०२० मध्ये डॉ. लवटे यांनी वयाची सत्तर वर्षे पूर्ण केली. त्यांच्या आयुष्याचा, कार्याचा, वाङ्मयाचा आणि विचारांचा समग्र धांडोळा घेण्यासाठी ‘भाग्यश्री प्रकाशना’ने नियोजनपूर्वक अभिनव वेबिनारचे आयोजन केले. वाचक, लेखक, वक्ते यांना लिहिण्यासाठी आवाहन केले. सर्वांचा चांगला प्रतिसाद मिळाला. १५ ऑक्टोबर २०२० या ‘वाचन प्रेरणा दिनी’ दिवसभर विविध लेख व मनोगते सादर झाली. तत्पूर्वी कालक्रमाने विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले. या सर्व मुलाखतींचे संपादन व मांडणी म्हणजे प्रस्तुत ग्रंथ होय.
मुलाखत... व्यक्तीला, त्याच्या विचाराला समजून घेण्याचा एक सुलभ व उत्कृष्ट मार्ग होय. माणूस समजून घेण्यासाठी मुलाखतीसारखा देखणा मार्ग तसा विरळच आहे, असे प्रतिपादन साहित्यिक उत्तम कांबळे यांनी केले आहे. मुलाखत म्हणजे दोन वा अनेक व्यक्तींचा प्रत्यक्ष मौखिक संवाद होय. प्रश्नोत्तरातून परस्पर संवाद विस्तारत जातो.
हिंदीत मुलाखतीस ‘मुलाकात’, ‘साक्षात्कार’, ‘भेंटवार्ता’, ‘साहब-सलामत’, ‘मेल-मिलाप’, ‘हेलमेल’ इत्यादी अनेक पर्यायी शब्द आहेत. यातील ‘साक्षात्कार’ हा शब्द अधिक समर्पक वाटतो. मराठीतील ‘मुलाखत’ हा शब्दसुद्धा हिंदी-उर्दूतून आलेला आहे. त्याचे मूळ मात्र अरबी भाषेत आहे. प्रत्यक्ष भेट, साक्षात्कार, परिचय, जान-पहचान हे त्याचे अनेक अर्थ आहेत. या सगळ्यांतून मुलाखतीची व्याप्ती स्पष्ट होते.
प्रस्तुत मुलाखत संग्रहाचा संपादित ग्रंथ वाचक अभिरुची वृद्धिंगत होण्यास साह्यभूत आणि उचित ठरणारा आहे, असे वाटते. या ग्रंथातून डॉ. सुनीलकुमार लवटे यांचे जीवन, कार्य, विचार आणि वाङ्मय उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. जणू हा मुलाखतींचा क्ष-किरण व्यक्ती उकल करतानाचा संवाद परिमल (सुगंध) आहे; जो तात्त्विक आणि सात्त्विक आधार असलेला आहे. हा ग्रंथ व्यक्तिकेंद्रित आहे. या ग्रंथाचे नायक आहेत डॉ. लवटे. त्यांच्या बहिरंग व अंतरंगाचा शोध घेत असताना एकूण बावीस मुलाखतींचा समावेश या ग्रंथात केलेला आहे. दोन भागांत या मुलाखती वर्गीकृत केल्या आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
पहिल्या विभागात दहा मुलाखतींतून डॉ. लवटे यांच्याशी संवाद साधत त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘आकाशवाणी’, ‘जीवनतत्त्व’, ‘संशोधन’ आणि ‘हिंदी साक्षात्कार’ या प्रकारात या दहा मुलाखतींची रचना करण्यात आली आहे. वेबिनारच्या निमित्ताने डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत अत्यंत प्रभावी आहे. ही सर्वांत अलीकडील आणि सर्वंकष मुलाखत. उर्वरित नऊ मुलाखती या पूर्वी प्रसिद्ध झालेल्या आहेत. यातील आकाशवाणीवरील पाच मुलाखती शब्दांकित करून समाविष्ट केल्या आहेत.
ज्येष्ठ संपादक व साहित्यिक उत्तम कांबळे यांनी नाशिक आकाशवाणीवरून घेतलेली स्पष्ट व परखड मुलाखत आहे. आकाशवाणी पुणे केंद्राचे निवृत्त संचालक गोपाळ अवटी यांनी घेतलेल्या दोन मुलाखतीही अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ‘वि. स. खांडेकरांचे संपादित साहित्य आणि जतन साक्षरता’ या महत्त्वपूर्ण विषयावर नवा प्रकाश टाकणाऱ्या या मुलाखती वाचनीय आहेत. कोल्हापूर आकाशवाणीवरील कार्यक्रम अधिकारी श्रीपाद कहाळेकर यांनी ‘भारतीय भाषा व साहित्य’ आणि ‘वि. स. खांडेकर स्मृतिसंग्रहालय’ या संदर्भाने घेतलेल्या मुलाखती आशयगर्भ आहेत.
हिंदीचे तज्ज्ञ प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण यांनी इंग्लंडमधील बर्मिंगहम येथून ऑनलाइन पद्धतीने घेतलेली डॉ. सुनीलकुमार लवटे यांची हिंदीतील गाजलेली व नावाजलेली मुलाखतही दिलेली आहे.
डॉ. लवटे यांच्या साहित्यावर डॉ. राजकुमार तरडे आणि वृषाली वाडकर या संशोधक अभ्यासकांनी संशोधनपर प्रबंध लिहिले आहेत. या अनुषंगाने त्यांनी घेतलेल्या मुलाखती डॉ. लवटे यांच्या व्यक्तिमत्त्वाची उकल करण्यास उपयुक्त आहेत. लंडनस्थित ‘गीतांजली परिवार’ यांनीही आभासी पद्धतीने डॉ. लवटे यांच्या दोन मुलाखती आयोजित केल्या होत्या. त्या मुलाखती हिंदीमध्ये शब्दबद्ध करून उपलब्ध केल्या आहेत.
दुसऱ्या विभागात डॉ. लवटे यांचा सहवास व स्नेहबंध ज्यांना लाभला आहे, अशा महनीय व्यक्तींच्या मुलाखती आहेत. तिसऱ्या दृष्टीकोनाने (Third Angle) केलेल्या निरीक्षणांचा आणि आकलनाचा समग्रपणे घेतलेला डॉ. लवटे यांचा हा धांडोळा आहे.
या विभागातील बारा मुलाखतींचे विषय आपण पाहिले तर त्यामधील विविधता आपल्या लक्षात यावी. यामध्ये साहित्य, समाजसेवा, शिक्षण आणि सांस्कृतिक या अंगांनी मुलाखतींची मांडणी केली आहे. अविनाश सप्रे, अनिल मेहता, वैजनाथ महाजन, प्रा. डॉ. अर्जुन चव्हाण, डॉ. बी. वाय. यादव, विश्वास सुतार, प्रभाकर हेरवाडे अशा साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनी डॉ. लवटे यांच्या विचार, वाङ्मय व जडणघडण यांविषयी आपले अनुभव व आकलन स्पष्ट केले आहे. डॉ. गिरीश मोरे यांनी वंचितांचा साहित्यप्रवाह निर्माण करण्यात डॉ. लवटे यांचे योगदान विदित केले आहे.
कांचनताई परुळेकर या कोल्हापुरातील ‘स्वयंसिद्धा’ संस्थेच्या सर्वेसर्वा आहेत. त्यांच्या संस्थेशी आलेला डॉ. लवटे यांचा मार्गदर्शनपर ऋणानुबंध त्यांनी ओघवत्या भाषेत व्यक्त केलेला आहे. ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’चे अध्यक्ष पी. डी. देशपांडे यांनीही आपल्या मुलाखतीत ‘समाजसंवेदी माणूस’ म्हणून डॉ. लवटे यांचे वर्णन केले आहे. प्रा. डॉ. शिरीष शितोळे यांनी डॉ. लवटे यांची प्राचार्यपदाची प्रशासकीय कारकीर्द प्रयोगशीलतेसह स्पष्ट केली आहे. संजीव संकपाळ, अतुल डहाके यांनी स्मृतिसंग्रहालय निर्मिती करताना डॉ. लवटे यांच्यासोबत आलेले अनुभव प्रवाहीपणे सांगितले आहेत.
मुलाखतकारांनी विषयानुषंगाने प्रश्नांची मांडणी करत मुलाखत प्रवाही ठेवण्याचे कार्य केले आहे. हा ग्रंथ वाचून वाचकांच्या जीवनास दिशा आणि प्रेरणा मिळेल. आपणांसमोर हा खंड सादर होत आहे. तथापि शेवटी संत ज्ञानेश्वरांची ओवी- ‘तरी न्यून ते पुरते | अधिक ते सरते | करूनि घ्यावे हे तुमचे | विनविले मिया’
‘डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य समीक्षा’ – संपादक – जी. पी. माळी | पाने – २९० | मूल्य – ४०० रुपये
‘डॉ. सुनीलकुमार लवटे : अमाप माणूस’ – संपादक – अर्जुन चव्हाण | पाने – १६० | मूल्य – २०० रुपये
‘डॉ. सुनीलकुमार लवटे : बहुविध संवाद’ – संपादक – विश्वास सुतार | पाने – ३१६ | मूल्य – ४०० रुपये
प्रकाशक - भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment