उमेदीच्या बळावर ‘धर्मरेषा’ ओलांडून प्रेम शिकवणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या या कहाण्या खूप काही सांगतात, शिकवतात. दहशत आणि द्वेष याविरुद्ध प्रेमासह जगून दाखवण्याला पर्याय नाही!
ग्रंथनामा - झलक
हिनाकौसर खान
  • ‘धर्मरेषा ओलांडताना’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 03 March 2023
  • ग्रंथनामा झलक धर्मरेषा ओलांडताना Dharmaresha Olandtana हिंदू Hindu मुस्लीम Muslim सहजीवन Symbiosis आंतरधर्मीय विवाह Intercaste Marriage लवजिहाद Love jihad

‘धर्मरेषा ओलांडताना’ या पुस्तकात हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाहितांच्या १५ मुलाखती आहेत. त्या घेतल्या आहेत पत्रकार हिनाकौसर खान यांनी. आणि हे पुस्तक प्रकाशित केलंय साधना प्रकाशनाने. या मुलाखतींमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याचा आणि देण्याचा प्रयत्न असला तरी एकंदर सहजीवनाकडे पाहण्याचा व्यापक दृष्टीकोनही त्यांत पाहायला मिळतो. या पुस्तकाला हिनाकौसर यांनी लिहिलेल्या सविस्तर मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

Close your eyes

fall in love

stay there

- रूमी

तेराव्या शतकातला हा आवडता कवी तत्त्ववेता रूमी. तो सांगून गेलाय... काय? तर प्रेमात राहा. त्याचं हे थेट, सरळ, साधं म्हणणंय. पण तेच इतकं अवघड का वाटत असेल? कदाचित प्रेम करण्यात काहीच अवघड वाटत नसणार; पण बिनशर्त प्रेम करण्यात आणि त्यात संपूर्णपणे खरं उरण्यात निश्चितच काहीतरी कष्ट असणार. कष्ट करायची इच्छा कुणाकडेय? नाहीतर आपल्या आसपास इतका विद्वेष, इतकं जहर, इतकं सततचं दुभंगलेपण डोकं वर काढून नसतं.

अलीकडं तर आणखीच एक पेव फुटलंय. कुणी काही म्हणण्याचा अवकाश की, आपली मनं लगेच आजारतात. दुखणंच येतं आणि तेही साधंसुधं नाही, एकदम संसर्गजन्य. एकाला धरलं की, आळीभर पसरलं तसं काही. भावना तर इतक्या कमकुवत आणि आंधळ्या झाल्यात की त्या सतत धडपडत असतात. त्यांना सारखीच ठेच लागते. ती तेवढी ठेचही सहन करण्याचं अवसान तिच्याकडं नाही. मग सगळ्या क्रिया-प्रतिक्रिया ‘लाऊड’ होऊन जातात. जणू आक्रस्ताळेपणा केल्याशिवाय चालणार नाही. अशावेळी संवादाची जागा वजा; पण त्याचंही कुणाला काय पडलंय? उलट टक्करबाज उच्छादाचं आकर्षण अधिक; पण एखादी मिठी मारण्याची फुरसत नकोय. शहाणपणानं वागणं तर त्याहून नकोय. ‘नफरत स्वस्त म्हणून फुकट, प्रेम अनमोल म्हणून अप्राप्य’ अशा काळात आपण जगतोय की काय, असं वाटत राहतं. की प्रत्येकच काळात थोड्याफार फरकानं हीच स्थिती होती/आहे आणि मग, म्हणूनच की काय त्या त्या काळात उत्तराच्या शोधात भटकणं क्रमप्राप्त ठरतं! तसंच असणार...

टाटा कंपनीच्या दागिन्यांची ब्रॅण्ड असणाऱ्या ‘तनिष्क’ची एक दृक्श्राव जाहिरात ९ ऑक्टोबर २०२० रोजी प्रसिद्ध झाली होती. ‘एकत्वम- द ब्युटी ऑफ वननेस’ या नावानं त्यांनी त्यांच्या दागिन्यांची जाहिरात केली होती. जाहिरात कुणाही शहाण्याला कळेल इतकी साधी होती. सासरच्या मुस्लीम कुटुंबात सामावून गेलेल्या हिंदू सूनेच्या डोहाळजेवणाचा समारंभ जाहिरातीत दाखवण्यात आला होता. समारंभानं भारावून जात सून सासूला म्हणते की, “आई ही प्रथा तर तुमच्या घरात नसते ना. तर सासू त्यावर म्हणते, “पण मुलींना खूश करण्याची प्रथा तर प्रत्येकच घरात असते.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दोन धर्मांचा, संस्कृतींचा मिलाफ-संयोग दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र सोशल मीडियावर ही जाहिरात वायरल झाली आणि काही सनातनी लोक त्याच्यावर तुटून पडले. जाहिरातीतून ‘लवजिहाद’ला प्रोत्साहन दिलं जातंय, हिंदू संस्कृतीला बदनाम केलं जातंय, असा एक तर्क दामटला गेला. यापुढं जाऊन ‘बॉयकॉटतनिष्क’ हा हॅशटॅग वापरत दागिन्यांवरच बहिष्काराची भाषा बोलली गेली.

शेवटी काही दिवसांतच ‘तनिष्क’ने ही जाहिरात मागं घेतली. आता एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. लवजिहाद म्हणजे आंतरधर्मीय विवाह असा जर सरळ अर्थ घेणार असाल, तर तो सपशेल चूक आहे. लवजिहाद ही संकल्पनाच मुळी हिंदुत्ववादी विचारसरणीने रेटलेली आहे, तेव्हा मुस्लीम पुरुष ‘फूस लावून/भरीस पाडून/आकर्षित करून’ हिंदू मुलीशी लग्न करतात आणि त्यांचं धर्मांतर करतात, त्याला ‘लवजिहाद’ म्हटलं जातं.

यातलं उपकथानक असंय की, हिंदू मुलींना कुणीही सहज फूस लावू शकतं. त्यांच्याकडे जणू स्वतःच्या निवडीची क्षमता, सद्सदविवेक नाहीये आणि त्या कुणा अन्य मुस्लिमांच्या घरात गेल्या, तर मोठीच नामुष्की हिंदुधर्मीयांवर येणार.

थोडक्यात ‘तनिष्क’च्या जाहिरातीमुळे असा बवाल घडणार होता. हिंदू मुली पटापट मुस्लीम मुलांशी विवाहबद्ध होणार होत्या. त्यामुळे व्यापक जनहितार्थ लोकांनी त्या जाहिरातीचा बाजार उठवला. जाहिरात आली आणि गेली. यामुळे तसा फारसा काही फरक पडणार नव्हता. मात्र जाहिरात मागे घेणं, म्हणजे त्यात मांडला जाणारा विचारदेखील मोडीत काढणं, असा त्याचा अर्थ होता.

‘लवजिहाद’चं मिथक आपल्याला अलीकडचं वाटत असेल, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘पांचजन्य’ आणि ‘ऑर्गनायझर’चा ७ सप्टेंबर २०१४चा अंक हा ‘लवजिहाद’ केंद्रित आहे. ‘पांचजन्य’च्या मुखपृष्ठावर अरबी पोशाख घातलेला पुरुष आहे. त्याची दाढी हृदयाच्या आकाराची आहे आणि कुटिल काळ्या चष्म्यातून प्रश्न करतोय- ‘प्रेम अंधा या धंदा?’ यातून काय प्रकारचं आणि कोणासाठी चित्रण मांडायचं आहे, हे उघड आहे.

स्त्रीवादी इतिहासकार चारू गुप्ता यांनी ‘लवजिहाद’चं मिथक वसाहतिक काळात असल्याचं नोंदवलं आहे. १९२० नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये हिंदू आणि मुस्लीम यांच्यातील विभाजन तीव्र करण्यासाठी हिंदू स्त्रियांच्या अपहरणाचं अभियान छेडलं गेलं. स्त्रियांच्या लैंगिकतेला महत्त्वाचं हत्यार म्हणून वापरण्यात आलं.

हे मिथक केवळ उत्तर प्रदेशच्या व्होटबँकेपोटी नव्हतं, तर त्यात मुस्लीम पुरुषाची कामुक, लंपट म्हणून प्रतिमा उभं करणं; त्यातून तो व्यभिचारी, कामांध, कट्टर आणि हिंसक दाखवणं हाही हेतू होता. त्यासोबत हिंदू स्त्रियांवर संपूर्ण नियंत्रण मिळवून पितृसत्तेची पुनर्रचना करणं हेही मुद्दे अंतर्भूत होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

स्त्रीचे शरीर हिंदू प्रचारकांसाठी मध्यवर्ती प्रतीक बनल्याचे गुप्ता सांगतात. पुढं हेच कथानक वापरून मुस्लीम लोकसंख्या वाढवली जात आहे अशा चर्चा सुरू झाल्या. मात्र हे कथानक वापरून केवळ हिंदू-मुस्लीम फूट इतकाच मुद्दा नाही तर दलित समूहालादेखील हिंदुत्व या मोठ्या संकल्पनेत सामावून घेण्याचा छुपा अजेंडा आहे. दंगली करून, मशिदींवर हल्ले करून सर्व दलितांना आकर्षित करता येणार नाही, मात्र स्त्रियांच्या रक्षणासाठी म्हणून त्यांना एकत्र आणता येणं शक्य आहे, हे हिंदुत्ववादी संघटनानी ओळखले. (संदर्भ- ‘पुरुषत्वाच्या प्रतिमा’ - चारू गुप्ता, हरिती प्रकाशन) त्यानंतर २००९मध्ये ‘लवजिहाद’चा मुद्दा जोरकसपणे पुन्हा चर्चेत आला.

सप्टेंबर २००९मध्ये केरळ कॅथॉलिक बिशप कौन्सिलनं ४५०० मुलींचे धर्मपरिवर्तन करून त्यांना गायब करण्यात आल्याचा मुद्दा मांडला. चर्चचे म्हणणे ख्रिश्चन मुलींबद्दल होते, पण ऑक्टोबर २००९मध्ये हिंदुत्ववादी गटानं हे प्रकरण ‘लव्ह जिहाद’च्या दिशेनं वळवलं आणि ख्रिश्चनऐवजी हिंदू मुली धर्मांतरित किंवा गायब होत असल्याच्या अफवा उठवल्या. त्यानंतर कर्नाटकातून ३० हजार मुली गायब असल्याचा आकडादेखील या गटांनी जाहीर केला.

केरळ विधानसभेत तत्कालीन मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी २५ जून २०१४ रोजी लेखी निवेदन दिलं की, २००६पासून इस्लाम धर्म स्वीकारणाऱ्यांमध्ये २६६७ तरुणींचा समावेश आहे. मात्र राज्यात सक्तीने धर्मांतर केल्याचा कोणताही पुरावा नाही आणि ‘लवजिहाद’ची भीती निराधार आहे. आम्ही जबरदस्तीनं केलेल्या धर्मांतराला परवानगी देणार नाही. त्याच वेळी आम्ही लवजिहादच्या नावाखाली मुस्लिमांविरुद्ध द्वेषाची मोहीमही पसरवू देणार नाही.

२०१४मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ‘लवजिहाद म्हणजे काय?’ याची व्याख्या समजून घेणं आवश्यक असल्याचं मान्य केलं आहे. फेब्रुवारी २०२०मध्ये भाजप नेते आणि गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी लोकसभेत सांगितले की, “ ‘लवजिहाद’ हा शब्द सध्याच्या कायद्यानुसार परिभाषित केलेला नाही. ‘लवजिहाद’चं एकही प्रकरण केंद्रीय एजन्सीने नोंदवलेलं नाही.”

ऑक्टोबर २०२०मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि ट्विट केलं की, ‘महाराष्ट्रात ‘लवजिहाद’ प्रकरणांमध्ये वाढ या विषयावर कोश्यारी यांच्याशी चर्चा केली.’ याविषयी जेव्हा आयोगाकडे माहिती अधिकार अर्ज दाखल केला आणि आकडेवारी विचारण्यात आली, तेव्हा आपल्याकडे अशी एकही तक्रार नोंदवली गेली नसल्याचं सांगितलं गेलं. त्यानंतर शर्मा यांनी या ट्विटवरून घूमजावही केला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

थोडक्यात, ‘लवजिहाद’चा बागुलबुवा तसा काही नवा नाहीच. पण त्या भ्रामक संकल्पनेचा प्रभाव जनमानसात इतका रुजलाय की, विरोधाचा जनरेटा निर्माण झाला ही गोष्ट अस्वस्थ करणारी होती. याच घटनेच्या अनुषंगानं प्राध्यापिका-लेखक समीना दलवाई यांनी १५ ऑक्टोबर २०२० रोजी ‘इंडियन एक्सप्रेस’मध्ये ‘आय अॅम द अनबॉर्न बेबी’ या नावाचा एक लेख लिहिला. ज्यात त्यांनी आपल्या आंतरधर्मीय आईवडिलांमुळे आणि पुढं त्यांनी स्वतः व भावानं केलेल्या आंतरराज्य, आंतरदेशीय विवाहामुळं काय संचित मिळालं, याचं खुसखुशीत वर्णन केलंय.

लेखाच्या शेवटी त्यांनी म्हटलं होतं, “आम्ही भिन्नवंशीय नुसतं सहजीवन जगतायेत असं नव्हे, तर ते सहसमृद्ध होत होत जगतोय.” हे म्हणणं फारच अर्थपूर्ण आणि महत्त्वाचं होतं. हाच धागा धरून आंतरधर्मीय विवाह झालेल्या लोकांशी बोलून एखादा लेख किंवा मालिका असं काही करता येईल का, असा विचार ‘साधना’चे विश्वस्त सुहास पळशीकर यांनाही वाटू लागलं आणि ‘धर्मरेषा ओलांडताना’ ही मालिका आकाराला आली. या मालिकेची मूळ कल्पना पळशीकर सरांची.

संपादक विनोद शिरसाठ यांनी पळशीकर सरांची ही कल्पना ‘साधने’च्या संपादकीय टीमसमोर मांडली. चुकीचे नरेटिव्ह असणाऱ्या संकल्पना रुजत असतील, तर त्यांच्या मुळांची माती सैल करण्यासाठी दीर्घ स्वरूपातलं लेखन असावं, असं आम्हाला वाटू लागलं. त्यातून वर्षभर चालणारी मालिका असावी, या मुद्द्यावर शिक्कामोर्तब झालं. मालिका ठरली तरी त्याची दिशादेखील ठरणं महत्त्वाचं होतं. अंदाधुंदपणे विषय मांडण्यातून साध्य काहीच होणार नव्हतं. मग पुन्हा ब्रेनस्टॉर्मिंग सुरू झालं. ‘लवजिहाद’ म्हणत ट्रोल आणि हिंसा करणाऱ्यांना ‘आमचं जगणं हेच उत्तर आहे’, असं दलवाईनी लेखात म्हटलं होतं. मनाशी तो विचार घोळत होता.

शिवाय विभिन्नधर्मी प्रेमविवाहांचा स्वीकार, ऑनरकिलिंगला विरोध आणि सांस्कृतिक प्रथा-परंपरांची सरमिसळ व्हायची असेल, तर मिश्रविवाहांचं सामान्यीकरण होणं गरजेचं वाटत होतं. आंतरधर्मीय विवाहित म्हणजे परग्रहावरचे वासी किंवा अदृश्य जमात असंच बहुतेकांना वाटत असल्यामुळे ते कुतूहल शमवणंदेखील महत्त्वाचं वाटत होतं. म्हणजे एकाच धर्मातले, जातीतले वा एकाच उपजातीतल्या लोकांचं सहजीवन आणि या वेगवेगळ्या धर्मातल्या व्यक्तींच्या सहजीवनातलं साम्य/फरकही समोर यायला हवं असंही वाटत होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशा अमूर्त मुद्द्यातून एखादं सूत्र आकाराला येईल का यावर खल सुरू झाला. सरतेशेवटी दीर्घकाळ एकत्र असणाऱ्या जोडप्यांची एकमेकांना असणारी समृद्ध सोबत, सहजीवन आणि त्यांचं जगणं, हेच मांडूयात यावर एकमत झालं आणि त्या सगळ्याचं खोदकाम मुलाखतीच्या माध्यमातून करायचं, हेही पक्कं झालं.

मालिका, त्याची दिशा आणि मुलाखत हा लेखनप्रकार असं ठरल्यानंतर आमच्याशी संवाद साधू शकणाऱ्या जोडप्यांचं संशोधन सुरू केलं. त्याबाबतही एक निकष ठरवणं आवश्यक होतं. कारण आमच्यासमोर काही नावं ही अगदीच नवविवाहित या प्रकारात मोडणारी होती. मग आम्ही किमान दहा वर्षं वा अधिक सहजीवन असणारी जोडपी घेण्याचं ठरवलं. त्यानुसार या मालिकेत १५ जोडप्यांच्या मुलाखती आहेत. सहजीवनाचं वयोमान या निकषावर विशाल आणि आरजू यांचा केवळ अपवाद आहे; पण नियम सिद्ध करायला एखादा अपवाद असावाच लागतो. तर केवळ हे जोडपं मुलाखतीच्या वेळी सहजीवनाची ५ वर्षे वय असलेलं आहे. ‘लवजिहाद’चं नरेटिव्ह हे फक्त मुस्लीम पुरुष-हिंदू स्त्री असं असलं तरी मुलाखती घेताना त्यापलीकडं जाण्याचा कटाक्षानं प्रयत्न केला. त्यातही केवळ ते हिंदू-मुस्लीम इतकंच सीमित राहणार नाही असं पाहिलं. या मालिकेच्या मर्यादित अवकाशात सर्वच धर्मांना स्पर्श करता आलं नसलं, तरी हिंदू, मुस्लीम, बौद्ध, शीख, ख्रिश्चन या धर्मांपैकी प्रातिनिधिक जोडप्यांपर्यंत पोचण्यात सफल झाले.

सर्वच मुलाखतीत दोन्ही जोडीदार अत्यंत मोकळेपणानं बोललेत. ‘सहजीवन’ फोकस्ड असल्यानं दोघांनी बोललं पाहिजे, हे गृहीतच होतं. पण दोघांनी बोलावं म्हणजे निम्मंनिम्मं असं गणितीय विभाजनही नको होतं. दाम्पत्यांची मुलाखतीत आस्थापूर्ण गुंतवणूक असावी, म्हणजे दोघांचाही दृष्टीकोन समजायला सोपं जाईल इतकंच अपेक्षित होतं. झालंही तसंच. आमच्या मुलाखतवजा गप्पा प्रत्येक जोडप्यानं मिळून पुढं नेल्या. दोघांनी एकमेकांच्या अडलेल्या, विसरलेल्या रिकाम्या जागा भरल्या. हे असं आणि एवढं पुरेसं होतं.

गंमत अशी की, प्रत्येक जोडप्यात एक बोलकी एक मितभाषी व्यक्ती होती, ते पथ्यावर पडलं. या १५ मुलाखतींमधून त्या-त्या जोडीच्या सहजीवनातले चढउतार, या प्रकारच्या लग्नामुळे वैयक्तिक आणि सामाजिक वर्तुळातल्या वावरामध्ये झालेला बदल वा परिणाम, निकटच्या आणि दूरच्या नातेवाईकांसोबतच्या संबंधांतली गुंतागुंत, त्यातून त्यांनी काढलेला मार्ग, कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देताना झालेली ओढाताण/दमणूक, सहवासात एकमेकांबाबत झालेला नवा साक्षात्कार, अपत्यांविषयीचे प्रश्न, अपत्यांचे प्रश्न, त्यांना उमजलेला प्रेम आणि सहजीवनाचा अर्थ अशा काही मुद्द्यांचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

ही मालिका १४ फेब्रुवारी ते २४ ऑक्टोबर २०२१ या काळात ‘कर्तव्य साधना’ या डिजिटल पोर्टलवर प्रसिद्ध झाली. त्याचं हे पुस्तक. मलिकेतल्या एकेका मुलाखतींतून दोन व्यक्तींचं सामायिक आणि स्वतंत्र आयुष्य, त्यांचं जगणं, भोगणं, उभं राहणं आपल्यापुढं येतं. त्या मुळातूनच वाचायला हव्यात. तरीही मुलाखत घेणं, मग लेखन, वाचन, पुनर्लेखन, वाचन अशा प्रक्रियेत पहिल्यापासूनच असल्यानं काही गोष्टी अधोरेखित करण्याचा मोह होतोय.

मुलाखतीतल्या कुठल्याही जोडप्यांनी आपल्या जोडीदाराचं धर्मपरिवर्तन केलेलं नव्हतं. कुणी कुणाला बुरखा घालण्याची किंवा दाढी-टोपी ठेवण्याची सक्ती केली नव्हती की, कुणी कुणाला टिकली लावण्याचा किंवा नाम ओढण्याचा हट्ट केला नव्हता. आंतरधर्मीय लग्नासाठी तुम्हाला जन्मानं मिळालेला धर्म सोडायलाच हवा असंही काही नव्हतं. केवळ नास्तिक असल्यावरच किंवा धर्म नाकारल्यावरच आंतरधर्मीय लग्न करता येईल, ही कथित समजूत यामुळं निकाली निघाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मुलाखतींतले काही जण धार्मिक होते. धर्माचरण करणारे होते. मुद्दा इतकाच होता की, कुणाही जोडीदारानं धर्मपालन/ धर्माचरण करावं यासाठी आग्रही नव्हतं. माझे संस्कार असतील म्हणून, इतक्या वर्षांची सवय म्हणून किंवा अगदी आवडतं, आनंद वाटतो म्हणूनही धार्मिक गोष्टी, उपासतपास, साग्रसंगीतपद्धतीनं सणवार करणारे होते. पण त्यामुळे त्यांच्या सहजीवनावर नकारात्मक प्रभाव पडला नाही. हा दोघांमधला समंजसपणा महत्त्वाचा वाटला.

खरं तर सजातीय असतानाही अनेकदा घराघरातली पद्धत भिन्न असते. पण आपल्याकडे बहुतांश जणांना मुलीनं सासरी आल्यावर माहेरचं सगळं विसरून जावं असंच वाटतं. अगदी जेवण बनवण्याची पद्धतही ‘आमच्याकडची’च हवी असते. त्या पार्श्वभूमीवर हा समजंसपणा काही केवळ धार्मिक आचरणाच्याच नव्हे, तर एकूणच सर्वच देवघेवच्या व्यवहारासाठी किती आवश्यक आहे, हे लक्षात येतं. त्या समजूतदारपणामुळेच सहजीवन असतं, असंही म्हणायला हरकत नाही.

बरं, यातील बहुतांश सर्वच जोडप्यांनी लग्नानंतर स्वतंत्रपणे घरोबा केला. असतील-नसतील त्या हालअपेष्टा एकत्र सोसल्या; पण कुटुंबीयांबरोबर सोबत राहण्यातला ताणतणाव टाळला. मुळातच कुटुंबीयांचा थेट विरोध किंवा पुरेसा स्वीकार नसतानाही तिथंच गुंता करत राहण्यात काहीच हशील नसतं. रुसवेफुगवे, हेवेदावे, हालहाल, छळवणूक, भांडण-तंटे यांना आपोआप फाटा मिळाला. यामुळेदेखील जेव्हा दोन्हीकडच्या कुटुंबीयांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि जाणं-येणं वाढलं, तेव्हा त्यांचा निकोप स्वीकार झाला. तसंच आपल्या जोडीदारानं कुटुंबीयांचे तीव्र वाग्बाण झेलण्यासाठी पहाडासारखं उभं राहावं, यातला रोमान्सही त्यांना अनुभवता आला.

तुमचं आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचं हा मुद्दा सर्वच मुलाखतींतून वारंवार प्रकट होत होता. आंतरधर्मीय, आंतरजातीय वा सजातीय असो प्रेमविवाह करताना, तर गाठीला पैसे असायलाच हवे, हा जणू अलिखित नियम आहे. कुणावरचंही विशेष करून पालकांवरच आर्थिक अवलंबित्व असलं तर तुम्हाला तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहता येत नाही. पालकांकडून आर्थिक कोंडी केली जाण्याची शक्यता असते. मालमत्ता/संपत्तीतून बेदखल केलं जाण्याची धमकी दिली जाते. नातं मोडण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो; पण जर तुम्ही पुरेसं कमवते असाल, तर आपोआपच तुम्हाला निर्णयस्वातंत्र्य मिळतं आणि मग निर्णयस्वातंत्र्य आलं की, कुठलाही विवेकी निर्णय घेण्यास तुम्ही स्वतंत्र असता. जोडीदार निवडीचं स्वातंत्र्यदेखील अखंडित राहतं. थोडक्यात, प्रेम करण्यासाठी पैशांची गरज नसली तरी ती निभावण्यासाठी असतेच हा व्यावहारिकपणा यातून स्पष्ट होत होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इब्राहीम खान यांनी मुलाखतीत एके ठिकाणी म्हटलंय, “वैचारिकदृष्ट्या फार स्पष्ट असणं, तुमचा विचारांचा पाया पक्का असणं, अशा विवाहाचं महत्त्व पटलं म्हणून ते करायला तयार असणं, हे सगळे मुद्देच गौण असतात. तुमचा तुमच्या प्रेमावर विश्वास आणि धाडस करण्याची तयारी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फार बुद्धिवादाची गरज नाही. प्रेमात असणारी, बाकी जग माहीत नसलेली साधी सरळ माणसंसुद्धा किती सुखाने राहतात; कारण त्यांचा प्रेमावर आणि त्यासाठी वाट्टेल त्या खस्ता खाण्याच्या तयारीवर विश्वास असतो.”

हा मुद्दा फार महत्त्वाचा वाटतो. म्हणजे आंतरधर्मीय/जातीय विवाह करण्यासाठी तुम्ही अभ्यासू, विचारवंत, वैचारिकदृष्ट्या प्रगल्भ, तर्कबुद्धीचे, आधुनिकतावादी दृष्टीकोन बाळगणारे इत्यादी इत्यादी असण्याची काहीएक गरज नाही. मात्र आर्थिक स्वातंत्र्याबरोबरच दोन अत्यंत मूलभूत गोष्टी हव्यात. त्या म्हणजे प्रेम करण्याचीच धमक आणि वेळ पडल्यास त्या प्रेमाची पाठराखण करण्याचं धाडस. या दोन्ही गोष्टी ‘यू मस्ट हॅव’ कॅटेगरीत येतात.

वधु-वर संशोधनातल्या बायोडाटामध्ये जसं जोडीदाराविषयीच्या अपेक्षा लिहिलेल्या असतात, तशाच या मिश्रविवाहातल्या न उच्चारलेल्या अपेक्षा म्हणाव्या लागतील. एखाद्या व्यक्तीला आंतरधर्मीय/जातीय लग्नांचं सामाजिक महत्त्व पटलेलं असेल, वैचारिक स्पष्टता असेल तर ते बोनस धरता येईल; पण सामाजिक महत्त्व आणि वैचारिक स्पष्टता याची जाण असूनही जर ऐनवेळी व्यक्ती कुठल्याही दबावाला बळी पडणार असेल, कच खाणार असेल आणि जोडीदाराला तोंडघशी पाडणार असेल तर ते निव्वळ ‘पुस्तकी’ज्ञान. त्याचा व्यावहारिक उपयोग शून्य. हेही या मुलाखतींतून जाणवत होतं.

“आंतरधर्मीय विवाहितांचे आईवडील आणि त्यांची मुलं यांना मानसशास्त्रीयदृष्ट्या विनाकारणच जरा जास्त भोगावं - सहन करावं लागतं. आईवडिलांना मनाविरुद्ध चौकटी मोडाव्या लागतात आणि मुलांना इतर सर्वसामान्य कुटुंबांपेक्षा वेगळं काही वाट्याला आलं आहे याचा अनुभव घ्यावा लागतो.” श्रुती पानसे यांचं हे वस्तुनिष्ठ निरीक्षण कित्येक दिवस मनात राहिलं. बऱ्याचदा आंतरधर्मीय विवाहितांच्या पालकांकडे ‘व्हिलन’ म्हणूनच पाहिलं जातं. आपल्याच देशात ‘ऑनर किलिंग’सारखे प्रकार घडत असले, तरी सर्वच पालक काही मुलांच्या मुळावर उठलेले नसतात. जगण्याविषयीच्या त्यांच्या स्वतःच्या धारणा, समजुती असतात. मुला/मुलींच्या निर्णयाबाबत विरोधापेक्षाही नाराजी अधिक असते.

काही वेळा त्यांना त्यांच्या दृष्टीनं ‘वेळेवर’ न सांगितल्याचं दुखावलेपण असतं आणि बहुतांश वेळा आपल्या अपत्याविषयी काळजी असते. काळजीचा मुद्दा तर आईवडील स्वतः मुलांसाठी जोडीदार निवडतात तेव्हाही असतोच. त्याच सगळ्या भावनिक उलथापालथीतून काही वेळा संताप केला जातो. बोलणं बंद केलं जातं. काही पालकांना सामाजिक अवहेलना नको असते. ती सोसण्याची ताकद नसते. अशा वेळी ते मुलांपासून दुरावतात.

पण याच मुलाखतींतून लक्षात आलं की, पालकांच्या वागण्या-बोलण्याचा राग मनात न ठेवता मुलांनी सातत्यानं पाठपुरावा केला, तेव्हा तीच नाराजी प्रेमात रूपांतरित झाली. काही जण त्यांच्या समजुतींना मोडून मुलांसाठी स्वतःत बदल घडवतात. नातेवाईक किंवा मित्रपरिवारातल्या टोमण्यांचे वार झेलतात. तेव्हा श्रुतीताईंच्यां म्हणण्यातलं हे मर्म अधिक खोलपणे समजून घ्यायला हवं असंच वाटलं.

मुलांबाबतही तेच. आपल्या आईवडिलांचं सहजीवन हे सामाजिकदृष्ट्या असमान्य आहे, हे उमजून घ्यायला कष्ट घ्यावे लागतात. शाळेत, सार्वजनिक ठिकाणी काही वेळा कुतूहलानं, तर कधी कुजकेपणानं विचारलेल्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं, ते दुर्लक्षून कसं चालणार. इथं पालकांना स्वतःची वेगळी ऊर्जा द्यावी लागते. शिवाय आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलामुलींचं लग्न हा चिंतेचा विषय म्हणून समोर आला. त्यांनी स्वतःचे जोडीदार निवडले तर उत्तमच; पण तसं नसेल तर मग मुलामुलींचा धर्म कुठला, हा मुद्दा येतो. भारतीय परिप्रेक्ष्यात तो बहुतांश वेळा वडिलांचाच असतो. एक सामाजिक चौकट मोडली, तरी सर्वच चौकटी मोडता येतात असं नाही. त्यामुळं मालिकेतल्या कुटुंबांवरदेखील पितृसत्तेचा प्रभाव जाणवतोच.

बाकी दोन वेगळ्या धर्मातली, संस्कृतीतली माणसं एकत्र येत होती म्हटल्यावर खानपान, सणवार, प्रथा, परंपरा यात वैविध्य असणारच होतं. त्यात ‘तडजोड’ करायची, असा विचार न करता त्यातून आनंद घ्यायचा, खाद्यसंस्कृती अनुभवायची असाच दृष्टीकोन प्रत्येक जोडीत दिसत होता. याचा अर्थ या सर्वच जणांच्या सहजीवनात सगळंच छानछान होतं असं नाही. घरकाम आणि आर्थिक जबादाऱ्यांच्या वाटणीमध्ये इथंही बोंबाबोंब होतीच.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

प्रेम असलं तरी ‘पुरुष’ असल्याच्या प्रिविलेजमधून सुटका करून घेता आली नाही. त्यामुळं घरकामात जोडीदाराची एकतर ‘मदत’ इतकीच भूमिका राहिली किंवा हातच वर असाही तोरा राहिला. घरकामात ते ‘तू अर्धं, मी अर्धं’ अशा भूमिकेतून मी बघत नव्हतेच. ज्याच्याकडे वेळ आहे आणि काम पडलंय, त्यानं ते करावं. मग काम कोणतंही असो. कामाची अर्धी वाटणी असं घरकामात तरी शक्य नाहीये, कारण त्याचा रोजचा क्वांटम वेगवेगळा असतो. तेव्हा तो मुद्दा कामाची दोघांच्या क्षमतेनुसार पूरक वाटणी असावी, इतकं नक्कीच वाटत होतं.

आर्थिक जबाबदाऱ्याही वाटून घ्यायच्या असतात, ही गोष्टदेखील आपल्याकडे रूढ नाही. इथंही ते अर्धं-अर्धं नाहीच. कमाईनुसार वाटा असावा इतकंच सूत्र होतं; पण काही कुटुंबात स्त्रियांची नोकरी/काम करण्याची इच्छा असतानाही त्यांना कुटुंबाला प्राधान्य द्यावं लागलं. आपल्यावरच्या पुरुषसत्ताक विचारांचा, संस्कारांचा परिणाम नाकारून चालणार नाही. आपण अजूनही समाज म्हणून प्रगल्भ नाहीयोत. उलट अशा सर्वच मुद्द्यांवर आपली 'सामूहिक समज' कधी वाढवणार असा प्रश्न पडला.

प्रेम, लग्न-संसार, जोडीदार, सहजीवन या संकल्पना कधीच आदर्शवत नसतात. परिपूर्णही. बरं त्यांचा जाती-धर्माशी काही संबंधही नाही. तुम्ही आंतरधर्मीय लग्न असो वा सधर्मीय काही टक्केटोणपे तर तुम्हाला खावेच लागतात. यशस्वी सहजीवनाचा कुठलाही ‘रेडिमेड फॉर्म्युला’ असत नाही, हेही पुन्हा एकदा या मुलाखतींतून प्रतीत झालं. या मुलाखतींतून प्रेम, साथ, सहजीवन, कम्पॅनियनशीप याविषयी बारकुली बारकुली नजर देणारं हे एक दस्ताऐवज तयार झालं.

आंतरधर्मीय सहजीवनासाठी ‘प्रिपेअर’ होणाऱ्या आणि आधीच ‘ॲपीअर्ड’ असणाऱ्या अशा दोघांनाही या प्रत्यक्ष अनुभवांतून काहीतरी संचित मिळेल याची खात्री आहे.

हे मनोगत लिहिण्यास बसले तेव्हा समोर पडलेल्या वर्तमानपत्रावरची बातमी लक्ष वेधत होती. वसईतल्या एका आंतरधर्मीय नवविवाहित जोडप्यानं रिसेप्शनचा कार्यक्रम ठरवला होता. त्याची कार्यक्रमपत्रिका व्हायरल झाली आणि घाबरून नवविवाहितांच्या कुटुंबीयांनी कार्यक्रमच रद्द केला, अशी ती बातमी होती. थंडीतल्या दिवसांत देशभर ‘लवजिहाद’चं धुगधुगतं लाकूड पेटलेलं होतंच. त्यामुळे कार्यक्रमात धर्माच्या कथित रक्षकांनी खोडा घातला तर...

अधिक स्पष्ट बोलायचं तर राडा घातला तर काय करणार म्हणून रद्द झाला होता. कुठल्याही दहशतीपोटी एखादा समारंभ रद्द व्हावा, हे आरोग्यदायी समाजाचं लक्षण असू शकत नाही. हे भय अस्वस्थ करणारं आहे.

अशा बातम्या समोर येतात, तेव्हा समंजसपणे सकारात्मक आणि आनंदी जगणाऱ्या माणसांच्याच कहाण्या वारंवार का सांगाव्या लागतात याचा अर्थ उमगतो. उत्तराचं एक टोक गवसतं. शोध मात्र संपत नाही. त्यासाठीचं भटकणं निरंतर सुरू राहतं... भटकंती जारी असेल तरच इष्टस्थळी पोचण्याची उमेद कायम राहते. त्याच उमेदीच्या बळावर धर्मरेषा ओलांडून प्रेम शिकवणाऱ्या, ऊर्जा देणाऱ्या या कहाण्या एकमेकांना सांगत राहू.

दहशत आणि द्वेष याविरुद्ध प्रेमासह जगून दाखवणे, याला पर्याय नाही!

‘धर्मरेषा ओलांडताना – आंतरधर्मीय विवाहितांच्या मुलाखती’ - हिनाकौसर खान

साधना प्रकाशन, पुणे | पाने – २२४ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......