गावाचा विकास झाला, तर शहरांनादेखील लाभ होणार आहे. हा समतोल साधायला हवा, ही माझी भावना आहे!
ग्रंथनामा - झलक
मनोहर सप्रे
  • ‘होल्टा : आठव, अनुभव, अनुभूती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 17 February 2023
  • ग्रंथनामा झलक होल्टा मनोहर सप्रे

ज्येष्ठ पत्रकार मनोहर सप्रे यांचं ‘होल्टा : आठव, अनुभव, अनुभूती’ हे आत्मकथन नुकतंच सदामंगल पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालंय. हे पुस्तक रूढार्थानं आत्मकथन नाही. कोकणातल्या एका निसर्गरम्य गावी जन्मलेल्या लेखकाला लहाणपणी पुण्यात यावं लागलं, पण त्याची वयाच्या सत्तरीतही गावाची ओढ कमी झालेली नाही. हिरवीगार झाडं, माती, नदी, आणि गावाचा तो चिरपरिचित निर्मळ, नितळ वास… एका संवेदनशील पत्रकाराची ही स्मरणयात्रा आहे. या पुस्तकाला लेखकाने लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

माझा जन्म १९५५ साली रत्नागिरी जिल्ह्यात लांजा तालुक्यातील वेरवली खुर्द या गावी झाला. खुर्द आतल्या बाजूला आणि बुद्रुक हमरस्त्याला. एसटी बससाठी बुद्रुकला यायचे, तर दोन किलोमीटर पायपीट करत यावे लागे. आज दर तासाला एसटी आहे आणि दिवसभरात आमच्या गावातही एसटीच्या चारपाच खेपा होतात. गावात काही मोटारसायकली, मोटारी दाखल झाल्या आहेत. साठ वर्षांपूर्वी गावात किराणा माल घेऊन ट्रक यायचा. तोही पंधरा दिवसातून एकदा. अन्यथा गावातल्या एक-दोन बैलगाड्या आणि पायपीट करणारे दोन पाय एवढीच वाहतूक. कोणी शहाणा म्हशीच्या पाठीवर बसून जायचा; पण तिची खात्री कोणी देऊ शकत नाही.

तर अशा गावात माझा जन्म झाला. मला एक भाऊ आणि सहा बहिणी. गावातल्या नदीच्या काठावर आमची २८ गुंठे जमीन आहे. या जमिनीत आमचे घर होते. ते कोणी बांधले, कधी बांधले याची मला काही माहिती नाही. याचे कारण मी जेव्हा हे घर पाहिले, तेव्हा फक्त एक चौथरा बाकी होता. अजूनही त्याच्या खुणा आहेत.

वयाच्या आठव्या वर्षी मी पुण्याला आलो. एका दिवसात आयुष्यात झालेला नाट्यपूर्ण बदल अनुभवला. गावात असलेले जुने घर कोसळून गेल्यानंतर दगड, लाकडं, गवत गोळा करून आईने उभारलेल्या दुसऱ्या घरात मी आणि माझ्यापेक्षा दोन मोठ्या बहिणी आईसह राहत होतो. भाऊ पुण्यातून त्याला मिळणाऱ्या पैशातून बचत करून पंधरा-वीस रुपयांची मनीऑर्डर पाठवायचा. शिवाय घरचे थोडेफार भात यायचे. त्यामुळे तांदळाची वर्षाची गरज भागायची.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मला बागडण्यासाठी विस्तीर्ण असा गाव होता. आंब्याच्या सीझनला कुठला तरी आंबा धरायचाच, फणसाची झाडे होती. इतर हंगामी फळे खायला मिळायची. गावात गाय वा म्हैस व्याली तर कोणी तरी खरवसाचा चीक आणून द्यायचे. कित्येक वर्षं पायात चप्पल नसायची; पण पाय जमिनीला टेकलेले असायचे. करवंदाच्या डहाळ्या भरल्या की झाडालगत उभे राहून करवंदे खाण्याचा आनंद होता. जांभळे, आवळे भरभरून खायला मिळायचे. समोरच्या दुकानात पंधरा दिवसातून एकदा ट्रक किराणा माल घेऊन यायचा, तेव्हा शेंगदाण्याच्या पोत्याला भोक पाडून काढलेले शेंगदाणे आणि गुळाच्या ढेपेचा पोत्याच्या फटीतून निघालेला तुकडा खाण्यात मजा असायची. दोन-चार सवंगडी खेळायला असायचे. विहिरीवर जाऊन रहाटाने पाणी खेचून गार पाण्याने अंघोळ करण्याची मजा होती. पावसात नदी आणि ओढा पाण्याने दुथडी भरून वाहताना पाहण्याचा आनंद होता आणि महत्त्वाचे म्हणजे मोकळा परिसर, गायीम्हशींचा सहवास, सगळा आनंदीआनंद.

जिथे बालपणातली काही वर्षे गेली आणि आपले अस्तित्व जाणवू लागले, तो परिसर कधीच सोडू नये असे वाटायचे; पण अचानक पुण्याला येणे झाले. आधी गावातून एसटीने कोल्हापूरला आणि तेथून रेल्वेच्या खचाखच भरलेल्या डब्यात बोचक्यावर डोके ठेवून केलेला पाच-सहा तासांचा प्रवास. पुणे रेल्वे स्थानकावर उतरून टांग्यात बसून शिवाजीनगर भागात एका जुन्या वाड्यात एका खोलीत मी दाखल झालो, तो क्षण अजूनही विसरलो नाही. मला मार्गी लावण्यासाठी इथे आणले गेले होते. शिकून मोठा होईल, नोकरदार होईल. पगार मिळवील आणि नाव कमवील, वगैरे.

माझ्या व्यावसायिक जीवनाविषयी म्हणजे नोकरी वगैरे या संदर्भात सांगण्यासारखे काही नाही, कारण खूप मोठ्या पदावर नोकरी करून मी निर्णय वगैरे घेतलेले नाहीत. त्यामुळे माझ्या निर्णयांचा काही दूरगामी परिणाम वगैरे झालेला नाही. दखल घेण्याची गरज नाही, अशा सदरातील व्यक्तींमध्ये माझा समावेश होऊ शकतो आणि मला काही व्हायचेच नव्हते, त्यामुळे ते माझे ‘लक्ष्य’ आपोआप साध्य झाले.

मोठे घर, संपत्ती, मोटार अशाचाही मला कधी सोस नव्हता. पन्नास वर्षांपूर्वी जेव्हा स्कूटर हे वाहन असणे प्रतिष्ठेचे मानले जात होते, तेव्हा सुदैवाने माझ्याकडे स्कूटर आली होती. त्यासाठी प्रशिक्षण वगैरे घेऊन, रीतसर परवाना काढून मी स्कूटर चालवत असे. तेव्हा वसाहतीत चारपाच लोकांकडे स्कूटर असायची. अशांमध्ये मी एक होतो. “एक चक्कर मारून आण ना” अशी विनवणी माझे मित्र करायचे. तो काळ मी अनुभवला. आज पन्नास वर्षांनंतर मला स्कूटर हेच वाहतुकीचे उत्तम साधन वाटते. मोटारीमध्ये बसून दूरवर फेरफटका मारणे हा आनंद असतोच; पण मला त्याचेही फारसे आकर्षण नाही. सगळीकडे मोटारींचे खच पडलेले आहेत. पुण्यासारख्या शहरांमध्ये चालू असलेली वाहने ‘नो पार्किंग’मध्ये लावली तर पोलीस उचलून नेतात आणि रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे बंद अवस्थेत सडत पडलेल्या मोटारी मात्र नेत नाहीत. त्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडावी लागते. व्यवहारी भूमिका घेऊन कोणती सरकारे निर्णय घेत नाहीत, आणि कोणी घेतलेच तर त्याची अंमलबजावणी होत नाही. शहर आणि ग्रामीण असा समतोल त्यामुळे साधला जात नाही.

हातातोंडासाठीच्या आणि अस्तित्वाच्या लढाईत दिवस, महिने निघून जातात. करायचे असते ते तसेच राहून जाते. हिंमत करून काही केले तर बरेच काही चांगले घडू शकते; पण हिय्या करूनही ते होत नाही. मला काही करायचेच नव्हते. रीतीनुसार कामकाज करून पोटापुरते पैसे मिळवावेत, लग्न करावे, एखादे घर असावे, घरात आवश्यक वस्तू असाव्यात यापलीकडे काही नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शहरात थोडेफार स्थिर झाल्यावरही कोकणात आपल्या मूळ गावी जाण्याची सतत ओढ असायची. काही निमित्त मिळाले की, पावले एसटी स्थानकाकडे वळायची. रात्रीचा प्रवास अधिक चांगला. पहाटे चारच्या सुमारास रत्नागिरीच्या अलीकडे पाली गावात उतरलं की, पहाटेसुद्धा तेथून लांज्याकडे जाणाऱ्या गाड्या मिळतात. नाहीतर वर्तमानपत्राची पार्सले नेणाऱ्या मोटारी उभ्या असतात. या मोटारीमधून अर्धा-पाऊण तास प्रवास करत गेल्यावर लांज्याचा स्टँड येतो. एसटी स्टँड आणि एसटी बस ही सर्वांत सुरक्षित जागा. एसटीचे कंडक्टर आणि ड्रायव्हर हे अर्धे पोलीस आहेत असेच मला वाटत आले आहे. बसमध्ये आधी कंडक्टर येतो. तिकिटे कापण्याचे काम सुरू झाले की, थोड्या वेळाने ड्रायव्हर येतो. त्याने कळ दाबली की, गाडी सुरू होते. आपल्याला कुठे जायचे असेल ते ठिकाण जवळ येऊ लागते. हा प्रवासाचा आनंद मनात साठवण्यासारखा.

पुण्यात घर असले तरी गावात म्हणजे आपल्या जन्मगावात जिथे घर होते, तिथेच आपले घर असावे, आपण बाहेरच्या अंगणात बसावे, कोणी आपल्याला भेटण्यास यावे, आपण हाक मारून चहा आणायला सांगावा एवढे साधे स्वप्न होते. आज करू, उद्या करू अशा चालढकलीत ते राहूनच गेले. वेळोवेळी गावी येण्याचे स्वप्न पहायचो; पण पुन्हा तेच. अशात गावातून बाहेर गेलेल्या कोणीतरी घर बांधले, जुने घर दुरुस्त केले असे दिसायचे. कौलारू घरे पावसाळ्याआधी शाकारली जातात. आमचे घर शाकारण्याचा कधी योगच आला नाही.

कधी विहिरीत जमा झालेला पालापाचोळा काढून घेण्याचा कार्यक्रम असायचा. आमच्या विहिरीत माती आणि पालापाचोळा साठून विहिरीची खोली बरीच कमी झालेली होती. या विहिरीची लांबी-रूंदी बरीच कमी; पण विहिरीत पूर्वी भरपूर पाणी असायचे आणि रहाटाने कोणीना कोणी इथे पाणी काढत असायचे अशा गोष्टी ऐकलेल्या. रहाट मोठ्या आकाराचा, तो फिरवण्यासाठी पायाने दाब देऊन हाताने ओढायचा. रहाटाला बांधलेले पत्र्याचे डबे, नाहीतर मातीची मडकी पालथ्या बाजूने विहिरीत जाऊन पाण्यानं भरून रहाटाबरोबर वर यायची. सुपारीच्या पडलेल्या झाडांचे ओंडके लावलेले असायचे. त्यातून पाणी वेगाने एका टाकीत जायचे. ही टाकी झटपट भरली की, मग पिण्याचे पाणी याच प्रवाहातून किंवा वेगळ्या जागेवरून थेट विहिरीत दोरीला बांधून डबा खाली सोडून वर खेचले जायचे. पावसाळ्यात ही विहीर झटपट भरून जायची. जणू विहिरीला पूर यावा, तशी ती चौथडी भरून वाहायची.

अशा भरून वाहणाऱ्या विहिरी बघण्याचा योग कधीकधी आलेला. नदी आणि ओढ्याचा दणदणाटी पूर बघण्याचाही कधीकधी योग आलेला; परंतु गावात रहावे, धुंद पावसाळ्याचा आनंद घ्यावा, शेतात पेरणी, लागवड आणि कापणी करायला जावे, झोडणीच्या वेळी जाऊन आजूबाजूला पसरलेले भात एकत्र करावे, कणग्या भरून ठेवाव्यात हे सगळे पुण्यात आल्यावर गमावले ते कायमचेच. परत ते दिवस आलेच नाहीत.

पुण्यात संसारात गुरफटत गेलो. पोटापाण्यासाठी काम करत राहिलो. या वर्तमानपत्रातून त्या वर्तमानपत्रात असे सुरू होते. तरी गावी जाण्याची ओढ कायम असायची. कधी कुठे “चला, गावी परत जाऊ” अशा प्रकारचे लेखन झाले. त्यातून आंतरिक भावना प्रकट झाल्या. एकदा ज्येष्ठ राजकीय नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मोहन धारिया यांची भेट मुलाखतीच्या निमित्ताने झाली. त्यांनी त्यांच्या ‘वनराई’ या संस्थेच्या वतीने राज्याच्या अनेक गावांमध्ये सुरू केलेल्या विकासाच्या कार्यक्रमाची माहिती घेतली. शहरात गेलेले बरेच लोक त्यांच्या गावांकडे परत आले. पुण्या-मुंबईत झोपडपट्ट्यांमध्ये राहून थोडेफार पैसे मिळवणाऱ्या माणसांना शहरी जीवनाची एकदा आवड निर्माण झाली की, गावाशी संपर्क तुटायला वेळ लागत नाही. वेळ एवढा झटपट निघून जातो की, गावी परत येणे हा विचारच मनात येत नाही; पण ‘वनराई’मुळे अनेक लोक गावांत परतले.

माझ्या मनात मात्र पुण्यातून सगळं सोडून गावी यावे, घर बांधावे, इथेच रहावे, थोडीफार शेती आहे ती करावी, इथून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन काही उद्योग करावा, अशा विचारांचे काहूर उठायचे. धारियांशी बोलताना त्यांनी काजूची लागवड करण्याचा सल्ला दिला. सुदैवाने त्या काळात फलोत्पादन योजना महाराष्ट्रात सुरू होती. साधारण १९९३-९४च्या सुमारास अर्ज केला. त्यानुसार वेंगुर्ला जातीच्या काजूची सुमारे दोनशे रोपे जागेवर आणून मिळाली. रोपांची लागवड केली.

थोडीफार झाडे जगली. काही वाढली, पूर्वी लावण्यात आलेली किंवा आपोआप उगवलेली झाडे आहेतच. अशी दहा-बारा झाडे चांगले उत्पादन देतात. काजूच्या बिया, बोंडे यांचा उत्तम प्रकारे उपयोग केला, तर त्यातून काही रक्कम उभी राहू शकते. एकंदरीत माझा ही झाडे लावण्याचा प्रयोग फारसा यशस्वी झाला नाही. आमची काजूची शंभर-सव्वाशे झाडे आहेत, एवढे सांगण्याइतपत व्यवस्था झाली.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कोणतीही जोखीम घेण्यापासून मी पळ काढला असे म्हटले तरी चालेल. आणि आपलीच जागा आहे, तिथे फार्म हाऊस उभारू, चार माणसे कामाला ठेवू असे चर्चा करण्यापुरते ठीक असते. वास्तवात ते व्यवहार्य ठरतेच असे नाही. भरपूर पैसे आहेत म्हणून फार्म हाऊस बांधून होईल असे नाही आणि पैसे नाहीत म्हणून अन्य काही मार्ग नाही असेही नाही. ते करण्यासाठी लागणारी खुमखुमी, शारीरिक शक्ती असे सगळे योग यायला हवेत. अशा अनेक यशोगाथा आहेत. सरकारची मदत, गावकऱ्यांची मदत असेही योग यायला पाहिजेत.

माझ्या बाबतीत असे कुठलेच योग जमले नाहीत. बरेचसे बोलण्यातच गेले. गावात अशा कामासाठी जाऊन मुक्काम करायचा, तर तशी सोय असायला हवी. दुसऱ्या कोणाचे घर बघून आपलेही असेच असावे, असे वाटणे वेगळे, आणि त्यासाठी अनेकांचे हात लागणे वेगळे. माझा प्रवास त्या बाबतीत एकट्याने होत राहिला. माझ्या स्वप्नांसाठी इतरांनी फरफटत जावे, असे मला कधी वाटले नाही. मी कोणावर माझी मते का लादावीत?

माझ्या पुण्यात जन्मलेल्या मुलाने माझ्या जन्मगावी येण्यासाठी त्याची कामे सोडावीत, अशी अपेक्षा का करावी? माझे वय, प्रकृती यामध्ये चढ-उतार होत राहणार. म्हणजे वय चढते राहणार आणि प्रकृती उतरती राहणार, हे अपेक्षित असल्याने कुटुंबियांना माझी काळजी राहणार. मला एसटीचा प्रवास आवडतो, म्हणून त्यांनाही तो आवडावा असा आग्रह मी कसा करणार? मनामध्ये नेहमी अशा प्रश्नांचे वादळ घोंघावत राहत असे. हे साकार होणारे स्वप्न नव्हे, ते कधीच लक्षात आले होते; पण स्वप्न बघायला कुणाची बंदी नाही.

आमच्या गावातून कोकण रेल्वे गेली. आमची तीन-चार एकर जमीन त्यासाठी संपादित केली गेली. पंचवीस वर्षांपूर्वी असलेल्या दराने काही हजार रुपये मिळाले. आता सहज म्हणून एकमेकांकडे जाण्याचा काळ संपला. पूर्वी आम्हाला आजोळला जायचे, तेव्हा आधी सांगून जाण्याचा विषयच नव्हता. थेट एसटी पकडायची आणि जायचे. दारात कोणी उभे असेल आणि लांबवरून येणाऱ्या कोणाचा पायरव लागला की, अरे हा अमका आला असेल याचा अंदाज यायचा. लगेचच घरातल्या महिलांचे काम वाढणार, कुठलाही कंटाळा न करता आधी चहाचे आधण आणि नंतर वरणभात किंवा पिठलंभात असं काही तयार असणार. कधी निघालास, एसटी वेळेत मिळाली का, असे साधे प्रश्न प्रवासाचा शीण कमी करणारे. आता कोणाकडेही येण्याचे निमंत्रण असतेच. फोन करून जावे, असा औपचारिकपणा आलेला आहे.

एकूणच गावचे माझे आकर्षण कायम आहे. आपणही गावाला परत जाऊ शकतो, हे कधी मनोमन वाटायचे. त्यासाठी शहरामधून गावाकडे परतलेल्या काही कुटुंबाच्या गोष्टी मला वरंध आणि वाडा या गावांमध्ये ऐकायला मिळाल्या.

मला अजूनही होल्टा म्हणजे दांडके मारून पाडलेला आणि खाली पडून फुटलेला आंबा खायला आवडतो. त्यामुळे माझे बालपण विविध अंग आणि रंगांनी माझ्यापुढे उभे राहते. नदीच्या काठावर उभे राहून महापूर बघण्याचा आनंद मला अनुभवायचा असतो; पण तो योग येत नाही. मोबाइलच्या पडद्यावर अशी दृश्ये सहज बघायला मिळतात. नद्यांचा रौद्रावतार, खवळलेला समुद्र, हे जगात कुठेना कुठे सुरू असतेच; पण आपला अनुभव आणि अनुभूती वेगळी.

२०१९ मध्ये कोविड - १९ प्रकरण उपटले. देशभरातील लाखो श्रमिक शहरे सोडून आपापल्या गावी परतत आहेत, असे अभूतपूर्व चित्र बघायला मिळाले. केंद्र सरकार गोंधळात पडले. माझ्या गावातून बातम्या येऊ लागल्या की, मुंबई आणि अन्य भागातून चाकरमानी गावाला येत आहेत. खूप लोक गावी आले आणि नंतर बरेचसे गावातच स्थिरावले.

आज देशाच्या अनेक भागात शहरांमधून लोक गावी परतले आहेत. आकडेवारी काही असली तरी प्रमाण मोठे आहे. या कारणामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे, असेही सांगण्यात येते. आपल्या गावात मेहनत करू, निदान भोजनासाठी कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत. विचार वाईट नाही; पण संकट येण्याची वाट कशासाठी बघायची? गावाचा विकास झाला तर शहरांनादेखील लाभ होणार आहे. हा समतोल साधायला हवा, ही माझी भावना... वयाच्या सत्तरीकडे प्रवास करताना आठवणींचे हे बोचके सोबत आहे, म्हणून आयुष्य आनंददायी आहे.

‘होल्टा : आठव, अनुभव, अनुभूती’ - मनोहर सप्रे

सदामंगल पब्लिकेशन, मुंबई,

पाने – २०७ | मूल्य – ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......