स्वदेशात व समाजात आवश्यक कर्तव्यकर्मे करून स्वावलंबन साध्य करता करता स्वाध्याय, स्व-अनुशासन, उद्योग व सहयोग याद्वारे जी स्वत:ची व समाजाची ओळख प्राप्त होते, ते शिक्षण!
ग्रंथनामा - झलक
अभय बंग
  • प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अभय बंग आणि ‘या जीवनाचे काय करू?...आणि निवडक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Mon , 13 February 2023
  • ग्रंथनामा झलक अभय बंग Abhay Bang नयी तालीम Nai Talim गांधी Gandhi विनोबा Vinoba शिक्षण Education शाळा School

‘या जीवनाचे काय करू?’ हा माणसासमोर उभा असलेला एक सनातन प्रश्न! आपल्या जन्मासोबतच हा प्रश्नही जन्माला येतो. त्याचे उत्तर शोधल्याशिवाय समाधान नाही!! ...पण हा शोध सोपाही नाही. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात मदत व्हावी, या हेतूने घेऊन अभय बंग यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या ‘या जीवनाचे काय करू?...आणि निवडक’ या लेखांचा व दिलेल्या भाषणांचा निवडक संग्रह. नुकताच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकातील हा एक लेख…

.................................................................................................................................................................

पु.लं.चा ‘बिगरी ते मॅट्रिक : एक भारी बिकट वाट’ हा एक भारी लेख आहे. त्या लेखात ते म्हणतात – ‘‘बिगर यत्तेपासून ते मॅट्रिक होईपर्यंत माझे सारे आयुष्य मोठ्या हलाखीत गेले. शैशव, बाल्य, कौमार्य, पौगंड असल्या अवस्थांच्या जाळपोळीचा हा इतिहास आहे.... शाळेला काही लोक कोंडवाडा म्हणतात. आमचा कोंडवाडा नव्हता; कसाईखाना होता.... माझ्या लहानपणी सार्‍या चांगल्या चांगल्या गोष्टींचे ‘धडे’ झाले. ‘विषय’ झाले. प्रत्येकावर शंभरापैकी इतके, पन्नासापैकी तितके, अशी किमतीची लेबले लागली. सगळे शिक्षक विद्यार्थ्याला विषयाची गोडी लागेल म्हणून भीत असत... गोखल्यांच्या गणिताचे सारेच पुस्तक फुटके आणि गळके हौद, पाली, अ-ब आणि क – नामक असल्या दुर्गंधींनेच भरलेले असायचे... ‘गप्प बसा’ संस्कृतीत शंका विचारणे हा गुन्हा होता. ‘द्रौपदी कपाळावर कुंकवाचे पाच ठिपके लावीत होती का?’ या प्रश्नात खरे म्हणजे मार खाण्यासारखे काय आहे? पण मी खाल्ला आहे... कोणाशा सिंहाच्या गुहेत आत शिरलेल्या जनावरांच्या खुरांचे ठसे दिसत, पण बाहेर येणार्‍यांचे दिसत नसत, म्हणतात. शाळेत शिरताना उत्साही असलेले बाल्य अकरा वर्षांनंतर जळून राख होऊन बाहेर पडत असे.’’

आजच्या शाळेचे याहून अधिक भेदक वर्णन करणे कठीण आहे.

‘लातूर पॅटर्न’ की ‘नयी तालीमचे शिक्षण’ अशी निवड समाजाला करायची आहे. विद्यार्थ्यांना विचाराल तर निवड करायला त्यांना कदाचित क्षणाचाही वेळ लागणार नाही. पण केव्हा? जर त्यांना ‘नयी तालीम’ची सर्जनात्मक आनंददायी शिक्षण देणारी शाळा कशी असते, तेथील शिक्षणाचा अनुभव कसा असतो, याची चव चाखायला मिळाली असेल तर; आणि निवड करण्याचे स्वातंत्र्य त्यांना कुणी दिले तर.

एकदा गडचिरोली जिल्ह्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मी आनंददायी मुक्त शिक्षणाची कल्पना वर्णन करून सांगितली, व विचारले, ‘कुणा-कुणाला अशी शाळा आवडेल?’

सर्व मुले निर्विकार चेहर्‍याने चुपचाप बसून राहिली. कोणीच हात वर केला नाही. अशी शाळा असू शकते, यावर त्यांचा विश्वासच बसला नसावा. शिवाय समोर त्यांचे शिक्षक उभे होते. त्यांच्या देखत ‘आम्हाला तुमची सध्याची शाळा नको, अशी शाळा हवी’ अशी आवड व्यक्त करण्याची त्यांची बिशाद नव्हती. प्रश्न असा उठतो की, शिक्षण व शाळा कशा असाव्यात, याचा निर्णय करण्याचा अधिकार कुणाचा? सध्या तो अधिकार विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना नाही. तो पूर्णपणे शिक्षक, शाळांचे चालक, शिक्षणतज्ज्ञ व शिक्षण खात्यातली नोकरशाही यांच्या हातात एकवटला आहे. ‘शिक्षणाचा अधिकार’ कायदेशीर केला आहे. पण कोणत्या शिक्षणाचा? शिक्षण विभाग व शिक्षक देतील तेच शिक्षण आहे, असे मानून ते स्वीकारणे कायद्याने आवश्यक केले आहे. शिक्षणावर त्यांची एकाधिकारशाही आहे. ते पुरवतील तोच माल, तेच शिक्षण मुकाट्याने घेतल्याशिवाय विद्यार्थी व त्यांच्या पालकांना गत्यंतर नाही. शाळा व शिक्षण हे पुरवठा करणार्‍यांच्या मर्जीने व हितासाठी चालत आहेत. मग ते कसे बदलणार?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

आमच्या घरी एक छोटासा प्रयोग घडला. घडला यासाठी म्हणतो, कारण तो जाणूनबुजून योजनाबद्धरीत्या नाही केला. तो घडला. आमचा छोटा मुलगा अमृत लहानपणापासून गडचिरोलीतच वाढला. त्याने पहिलीपासूनच शाळेत जाण्याप्रती तीव्र नावड दाखवली. विद्रोहच पुकारला. सुदैवाने त्याच्या शाळेचे शिक्षक व शिक्षणाधिकारी यांनी अपवाद करून त्याने वाटल्यास घरीच अभ्यास करावा, पण परीक्षा मात्र शाळेत द्याव्या, अशी व्यवस्था मान्य केली. त्यामुळे अमृतचे नववीपर्यंतचे बहुतेक शिक्षण घरीच झाले. तो फार कमी दिवस शाळेत जायचा. त्याला कोणतीच शिकवणी लावली नाही. रोज सकाळी तो व मी मिळून त्याचा ‘आजचा अभ्यासक्रम’ ठरवायचो. संध्याकाळी पूर्ण केलेला अभ्यास तो मला दाखवायचा व असल्यास अडचणी विचारायचा. त्या सोडविल्या की, आम्हाला इतर गोष्टी करायला भरपूर वेळ मिळायचा. यातून तो स्वत:च्या वेळेचे व मनाचे अनुशासन स्वत:च करायला शिकला. शाळेच्या पाठ्यपुस्तकातला अभ्यासक्रम तो स्वत:च घरी पूर्ण करायचा. पण परीक्षांमध्ये सहसा जिल्ह्यातून पहिला यायचा. त्यामुळे त्याचे शिक्षक व शाळा हे त्याला दिलेली मोकळीक सार्थ मानत. मित्रांची आठवण आली, क्रिकेट खेळावेसे वाटले, शाळेत स्नेहसंमेलन असले की, त्या दिवशी तो शाळेत जात असे. अन्य दिवशी त्याची स्वत:ची शाळा तो स्वत:च घरी भरवायचा. त्याचे कारण तो असे द्यायचा की, ‘शाळेत सहा-आठ तासांत जे शिकवतात, ते मी घरी दोन तासांत शिकतो. मग सहा तास मला इतर सर्व गोष्टी करायला वेळ मिळतो. मग मी शाळेत वेळ का वाया घालवू?’ शाळेचे ओझे नसल्याने अवांतर वाचन, छंद, जिज्ञासा, खेळ, प्रयोग, जंगल, कला, सामाजिक सेवांमध्ये सहभाग या सर्व गोष्टींसाठी त्याला भरपूर वेळ मिळायचा. त्याचे बालपण हेवा वाटण्यासारखे गेले.

शाळा आनंददायी नसते, या अनुभवामुळे अमृतने स्वत:ची शाळा स्वत: घडवली. मी त्याला मदत करत गेलो. माझ्या ‘नयी तालीम’ शाळेतील काही आठवणी व पद्धती मी उपयोगात आणल्या. त्याच्या शिक्षकांनी त्याला स्वातंत्र्य व कौतुक दिले. पण तरीही त्याचा शालेय अभ्यासक्रम मी कृतिशील व आनंददायी करू शकलो नाही. एक न टाळता येण्यासारखी ब्याद असे मानून तो अभ्यासक्रम अमृत पूर्ण करायचा व परीक्षा द्यायचा. पण त्याचे खरे शिक्षण त्याने शाळेपासून वाचवलेल्या मोकळ्या वेळेत झाले. छोटीशी ‘नयी तालीम’.

माझ्या मनात सहज कल्पना येते, की घरोघरी अशी शाळा – ‘नयी तालीम’ ही हायब्रिड पद्धत करणे का शक्य होऊ नये? त्यावर बहुतेक पालक म्हणतील, ‘पण अमृतला घरी शिक्षक म्हणून तुम्ही उपलब्ध होता. योग्य शिक्षकाशिवाय आम्हाला हे कसं करता येईल?’ शिक्षकाची भूमिका किती महत्त्वाची?

दादा धर्माधिकारींनी स्वातंत्र्यपूर्व काळातली एक आठवण लिहिली आहे. ते प्राचार्य असलेल्या राष्ट्रीय शाळेच्या एका कार्यक्रमाला त्यांनी विनोबांना बोलावले. स्वागताचे बोलताना दादा म्हणाले, ‘विद्यार्थ्यांच्या ज्ञानात काही कमतरता आढळली, तर ती आम्हा शिक्षकांची कमी आहे असं समजा, आडात नाही तर पोहर्‍यात कुठून येणार?’

‘तुम्ही फार गर्विष्ठ शिक्षक दिसता. स्वत:ला ज्ञानाची विहीर व विद्यार्थ्यांना रिकामी बादली समजता काय? शिक्षकाला जास्तीत जास्त बादलीचा दोर म्हणता येईल!’ विनोबांनी मार्मिक टीका केली. शिक्षक केवळ मदत करतो.

शिक्षण हा जीवनापासून तोडलेला वेगळा अनुभव नसतो, तर जीवन जगताना येणार्‍या अनुभवालाच शैक्षणिक अनुभवात परिवर्तित करायचे असते, हे विनोबांनी पन्नास वर्षांपूर्वी मांडलेले तत्त्व आता कॅनडामधील मॅकमास्टर विद्यापीठातील नवीन मेडिकल शिक्षणाचे आधारभूत तत्त्व बनले आहे. कळसापासून सुरुवात तर झाली. प्राथमिक शाळेच्या पायापर्यंत ते केव्हा पोचणार?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

तज्ज्ञांना जे दिसत नाही, समाजत नाही ते कधी कधी कवींना कळते असे म्हणतात. म्हणून ‘ईशावास्योपनिषद’मध्ये कवीला ‘क्रांतदर्शी’ म्हटले आहे. मी तर एका अशा वैज्ञानिकाविषयी वाचले आहे, जो संशोधनाची नवी कल्पना सुचली की प्रथम त्याविषयी कवी व साहित्यिकांनी काय लिहून ठेवले आहे, हे शोधतो. त्यांना फार अगोदर दिसते, कळते असा त्याचा अनुभव.

वर्ध्याचे तरुण कवी श्री. भिमनवार यांची बर्‍याच वर्षांपूर्वी लिहिलेली एक कविता अशीच क्रांतदर्शी आहे-

‘छप्पर भिंती खडू फळ्याविण अशी असावी शाळा

पुस्तक पाटी नको नसाव्या अभ्यासाच्या वेळा ।। धृ ।।

किलबिलणार्‍या पक्षासंगे मुक्त प्रार्थना गावी

चिंचा, पेरू, वैâर्‍यांची पण रोज हजेरी घ्यावी

हातामधले पेरू बघुनी पोपट व्हावे गोळा ।। १ ।।

वेगवेगळी फुले खुडूनी बेरीज करून घ्यावी

झाडावरले पक्षी उडवीत वजाबाकी मांडावी

फळ्याऐवजी आकाशातील मेघच घ्यावा काळा ।। २ ।।

पाटी, पुस्तक नको, वह्यांचे पाठीवरती ओझे

विषय अमुचे आम्हीच निवडू, आम्हास रुचती जे जे

मनासारखा बदलून घेऊ शिक्षणक्रमही सगळा ।। ३ ।।’

आजच्या समाजात अशा शिक्षणाला भवितव्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर शिक्षण क्षेत्राच्या पलीकडे लपलेले आहे. अर्थव्यवस्था व समाज स्पर्धामय केल्यानेच माणसे जीव तोडून काम करतात; स्वत:चे व समाजाचे भले साधतात, अशा विचारसरणीवर आधारित समाजात सर्जन-आनंद देणारे शिक्षण अनफिट ठरेल. माणूस स्पर्धेच्या यशानेच प्रेरित होतो म्हटल्यावर सर्जन व आनंद दोन्ही दुय्यम ठरतात. केवळ स्पर्धेची तयारी करणारा ‘लातूर पॅटर्न’ मुख्य बनतो.

अतिस्पर्धेने थकून माणसे मोडकळीला आली की, मग या समाजव्यवस्थेविषयी व सोबतच स्पर्धात्मक परीक्षाकेंद्री शिक्षणाविषयी पुनर्विचार करायला बाध्य होतील. कर्ममय सर्जन, आनंदमय शिक्षण हा निव्वळ शिक्षणविचार नाही. पूर्ण जीवनाचे साफल्य कशात आहे, यासंबंधी काही वेगळ्या धारणांवर तो आधारित आहे. माणूस घडवण्याचे ते शिक्षण आहे.

विनोबांची शिक्षणविषयक सर्वांत मोठी व्याख्या आहे ‘आत्मज्ञान’ आणि सर्वांत छोटी व्याख्या आहे ‘सत्संग’. मी कोण आणि कसा आहे यापासून विनोबांचा शिक्षण विचार सुरू होतो. शिक्षण हे शिक्षककेंद्रित नसून विद्यार्थिकेंद्रित असावे, हा विचार आता जगात सर्वश्रुत आहे. पण तो विद्यार्थी कोण, त्याची ओळख काय, याबाबतीत विनोबांचा विचार बहुतांश शिक्षणतज्ज्ञांपेक्षा वेगळा आहे. विनोबा म्हणतात, ‘समोर बसलेला विद्यार्थी, ज्याला शिक्षण घ्यायचे आहे, तो साक्षात आत्मा आहे. पुराणपुरुष आहे. अनेक जन्मांपासून शिक्षण घेत घेत (उत्क्रांती?) तो येथपर्यंत पोहोचला आहे. ज्ञानरूप आत्मा त्यामध्ये वसलेला आहे. त्याला स्वत: ईश्वराने जन्म दिला आहे आणि आपण ईश्वरापेक्षा मोठे नक्कीच नाही.’

‘ईशावास्य-वृत्ती’ या पुस्तकात विनोबांनी फार सुंदर विचार मांडला आहे. ईशावास्य उपनिषदात म्हटले आहे - ‘पूर्णात पूर्णम् उदच्यते’. पूर्णातूनच पूर्ण जन्म घेते. हा आध्यात्मिक विचार विस्ताराने समजाविताना विनोबा सांगतात, ‘उत अच्यते म्हणजे, जे आत आहे त्याला बाहेर प्रकट करणे’. आणि मग विनोबा तीन शब्दांची एक अर्थगर्भ पुस्ती जोडून देतात. ‘हेच शिक्षण शास्त्र’. एका वाक्यात सांगायचे झाल्यास बाहेरची खूप सारी माहिती विद्यार्थ्याच्या मेंदूत भरणे म्हणजे शिक्षण नाही, तर त्याच्या आत जे अप्रकट रूपात आधीच आहे त्याला प्रकट होण्यासाठी केवळ मदत करण्याची प्रक्रिया म्हणजे शिक्षणशास्त्र. मोठा क्रांतिकारी विचार विनोबांनी मांडला आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

मायकल एंजेलो इटलीतील खूप प्रसिद्ध मूर्तिकार होते. ते फार सुंदर मूर्ती घडवायचे. लोक त्यांना विचारायचे की, तुम्ही इतक्या सुंदर मूर्ती कशा घडवता? यावर ते म्हणायचे, ‘मी कुठे मूर्ती घडवतो? मूर्ती तर आधीच त्या दगडामध्ये असते. मी केवळ त्यावरील नको असलेला भाग हटवितो. मूर्ती आपोआप प्रकट होत जाते.’ विद्यार्थ्याला स्वत:ची ओळख व्हावी, आत्मभान प्राप्त व्हावे, यासाठी मदत करणे एवढेच शिक्षकाचे काम आहे. विद्यार्थी मुळात अगोदरच असतो.

आता हे आत्मभान कसे प्राप्त होईल? तत्त्वज्ञ म्हणतात की ‘सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट.’ म्हणजेच स्व हा किरणासारखा असतो. प्रकाशकिरण हा अदृश्य असतो. जोपर्यंत किरण कुठल्या गोष्टीवर आदळत नाही, तोपर्यंत तो दिसत नाही. स्वबाबतही असेच होत असते. स्व हे शून्यात प्रकट होत नाही. जेव्हा मी आव्हान घेतो, स्वधर्मरूप कर्म करतो; तेव्हाच हा स्व प्रकट होतो. कर्म करता करता जेव्हा मी अडचणींचा सामना करतो, तेव्हाच मला माझ्यातील शक्ती, माझे स्वरूप आणि स्वची ओळख होते. स्वधर्मरूप कर्म करताना जो स्व माझ्यासमोर व्यक्त होतो, तेच माझे खरे शिक्षण. त्यामुळे शिक्षण हे दिले

जाऊ शकत नाही, तर ते आतून अंकुरित होते. या प्रक्रियेत शिक्षक केवळ बाहेरून मदत करतो.

एकदा मी विनोबांना प्रश्न विचारला होता की, हा स्वधर्म कुठे शोधायचा आणि तो आचरणात कुठे आणायचा? ते म्हणाले, ‘स्वधर्म शोधायला दिवा घेऊन बाहेर फिरायची गरज नाही. तो तुझ्या समोर कर्तव्य म्हणून उपस्थित असतोच. फक्त डोळे उघडून पहा म्हणजे दिसेल.’ तुम्ही जिथे आहात, त्याच जागेवर स्वधर्माचे आचरण करावे लागते. आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास, ‘हिअर अँड नाऊ’. इथेच आणि याच क्षणी. मी ज्या क्षणी जिथे आहे, तिथली माणसे, समाज, प्राणी, वनस्पती, सृष्टी तोच माझा स्वदेश आणि तिथे माझे जे कर्तव्य आहे, तोच माझा स्वधर्म. पण आपली अडचण ही की, आपण जिथे असतो, तिथे खरे तर नसतोच. आपण शिक्षणाच्या शोधात जगभर सैरभैर हिंडत असतो. वर्तमानात जगणे, हे जागृतीचे लक्षण आहे. यातूनच आपल्याला स्वचे भान येते. मनाला त्याची सवय लावली पाहिजे. हेच खरे शिक्षण.

शिक्षणातून स्वावलंबन साध्य झाले पाहिजे. जेथे आर्थिक स्वावलंबन नसते तेथे तुमचे स्वातंत्र्य तुम्ही आईवडील, मालक किंवा सरकारकडे गहाण ठेवता. स्वत:साठी अर्थार्जन करणे आणि त्यासाठी कुठल्या एका मूलभूत आवश्यकतेचे उत्पादन कार्य करणे हे शरीर, मन, बुद्धी यांसह इतरही अंगांच्या विकासासाठी आवश्यक असते. त्याद्वारे आपण समाजाशी जोडले जातो. ज्ञान मिळविण्याबाबतीतही स्वावलंबन फार आवश्यक असते. याला आपण ‘सेल्फ लर्निंग’ म्हणतो. सतत मार्गदर्शकाची गरज नसावी. स्व-अध्ययन, निरीक्षण, चिंतन करून ज्ञान वाढविणे, या बाबी स्वावलंबनात अंतर्निहित असतात.

वस्तुत: अशी स्थिती व्हावी की, पुढील जीवनाची पूर्वतयारी म्हणून पंधरावीस वर्षे शाळा-कॉलेजमध्ये शिक्षण घेत राहण्याऐवजी जीवनातील स्वधर्म करत करत जे काही अनुभवजन्य शिकायला मिळते आहे, ते शिकत जाणे. पुढील जीवनात अनपेक्षित असे घडणारच. कोणतेही विद्यालय मरेपर्यंत येणार्‍या प्रत्येक प्रसंगाचे पूर्व शिक्षण देऊच शकत नाही. त्यामुळे जीवनात येणार्‍या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी आधीच तयारी करून ठेवणे, असा शिक्षणाचा अर्थ होत नाही. जीवनात कितीही अनपेक्षित प्रसंग आले तरी त्याची उत्तरे शोधणे म्हणजे सेल्फ लर्निंग. शिक्षणातील स्वावलंबन.

मग प्रश्न पडतो की, यादरम्यान शाळा कुठून आली? आजची शाळा आपल्याला या ना त्या प्रकारे स्वधर्मापासून दूर लोटते. समाज आणि स्वावलंबनापासूनही ती आपल्याला दूर घेऊन जाते. शाळा स्वाध्यायाची कला न शिकवता शिकवणी वर्गावरील अवलंबन शिकवीत आहे. स्व अनुशासनच शाळेत शिकवले जात नसल्याने स्वभाव कसा कळणार, आत्मज्ञान कुठून मिळणार? आजची शाळा, आजचे शिक्षण प्रत्येक अर्थाने शिक्षणविरोधी आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मग ‘नयी तालीम’मधील शिक्षणाचे मॉडेल कसे असेल? विनोबांनी याबाबत फार सुंदर प्रकारे सांगितले आहे. उपनिषद मॉडेल ऑफ एज्युकेशन. जे प्रत्यक्ष कृती, आचरण करणारे आचार्य आहेत, सज्जन व्यक्ती आहेत; त्यांच्याजवळ जाऊन बसणे, त्यांचे जीवन पाहणे, त्यांना ऐकणे आणि त्यांच्यापासून शिकणे. याला ‘उपनिषद’ म्हणतात. याला सोप्या भाषेत आपण ‘सत्संग’ म्हणू शकतो. ही शिक्षणाची एक पद्धत झाली.

दुसरी पद्धत खुद्द गीतेची आहे. गीतेला आपण एखाद्या ‘एज्युकेशन सेशन’सारखे पाहू या. तो शिक्षणाचा एक अमर वर्ग होता, जो तीन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला व आजही चालतोच आहे. याचे तीन घटक आहेत. एक आहे विद्यार्थी असलेला अर्जुन. तो एक प्रतिभावंत विद्यार्थी होता. अर्जुनाच्या मनात एक गंभीर प्रश्न आहे. प्रश्न नसेल, तर गीता प्रकट होऊच शकत नाही. त्यामुळे ‘नयी तालीम’ किंवा गीतेच्या मॉडेलमध्ये अर्जुन फार महत्त्वाचा घटक आहे. दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे कृष्ण, जो उत्तर देतो. तो योगेश्वर कृष्ण असून त्याच्या जीवनात प्रत्यक्ष योग प्रकट झाला आहे. तो एक आदर्श आचार्य आहे, ज्याच्या आचरणातून विद्यार्थी काही शिकत असतो. यातील तिसरा घटक म्हणजे कुरुक्षेत्र. यालाही गीतेच्या ‘एज्युकेशन मॉडेल’मध्ये महत्त्वाचे स्थान आहे. कारण तिथे स्वधर्माची संधी आहे. अर्जुनाला प्रश्न कुरुक्षेत्रात उपस्थित झाला. शिक्षणाची कुठलीही प्रक्रिया घडण्यासाठी एका कुरुक्षेत्राची गरज असते. सोबतच एका अर्जुनाची आणि एका गुरुचीही गरज असते, जो आपल्या जीवनातून प्रत्यक्ष शिकवितो. विनोबांनी आजच्या शिक्षणाची आपल्या ‘शिक्षणविचार’ पुस्तकात समीक्षा केली आहे. एका ठिकाणी तर विनोबा खूपच मार्मिक टिप्पणी करतात की, कृष्णाने अर्जुनाला आधी शिकवणी वर्ग लावून कुरुक्षेत्रात उतरविले नाही. कुरुक्षेत्रात जेव्हा संधी आली, आव्हान आले; तेव्हा ‘गीता’ प्रकट झाली.

विचार करा, की आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि गुरूने ‘गीता मॉडेल’ वापरले तर किती गीता, कालातीत साहित्य निर्माण होईल!

विनोबांनी शिक्षणविचार फार पुढे नेला आहे. ते म्हणतात, ‘असं म्हटलं जातं की, ‘नयी तालीम’ म्हणजे जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण, जीवनातून शिक्षण. पण अजूनही यात द्वैत कल्पिलं असून जीवन वेगळं आणि शिक्षण वेगळं असं मानलं जातं. हा भेद मला मान्य नाही.’ पुढे ते म्हणतात, ‘जीवन हेच शिक्षण’. पहिल्यांदा जेव्हा मी हे वाक्य वाचले तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. माझ्या दृष्टीने हे शिक्षण क्षेत्रातील सर्वांत क्रांतिकारी वाक्य आहे. शिक्षणाच्या क्षेत्रातील महावाक्य. जीवनापेक्षा वेगळे असे काही शिक्षण नसतंच.

वस्तुत: असे शिक्षण रोज मोठ्या प्रमाणात घडतेच आहे. आपल्यापैकी किती लोकांना चालता येते? कुठल्या शाळेत चालणे शिकले? लहानपणी आईची कूस व पाळणा सोडून रांगण्याची व मग चालण्याची नैसर्गिक प्रेरणा प्रत्येक मुलाला असते. ‘चालू नको, पडशील’, असे म्हटले तरी ते स्वत: चालून पाहते. धडपडते, उठते, व काही महिन्यांत स्वत:च चालायला शिकते. निसर्गात सर्वत्र असे शिक्षण रोज घडते आहे. मातृभाषा सर्वांनाच येते. ती आपण कुठल्या शाळेत शिकलो? घरीच ऐकून आपण सर्व जण मातृभाषेत बोलायला शिकलो आणि समज येण्याआधीच बोलायलाही लागलो. स्त्रिया स्वयंपाक कुठल्या महाविद्यालयात शिकल्या? शेतकरी शेत नांगरतो, बाया शेतात धान्य पेरतात, कापतात. हे सगळे ते कुठून शिकले? हे जीवन पुढे जात आहे आणि कोट्यवधी लोक रोज शिकत आहेत. विनोबा हेच म्हणतात, की जीवन हेच शिक्षण. हे वाक्य केवळ आदर्श नाही, तर वास्तव आहे. संपूर्ण जगात हा प्रकार घडत आहे. विनोबा जेव्हा म्हणतात की विद्यापीठांची कुठली गरजच नाही, याचा अर्थ होतो की, हे जगच एक महान विद्यापीठ आहे. ‘नयी तालीम’बाबत या सर्व विचारांचा सारांश असा मांडता येईल.

‘नयी तालीम’ शिक्षणविचाराची सात तत्त्वे

पहिले तत्त्व – शिक्षण कोणाचे? तर हे शिक्षण ‘स्व’चे आहे. हा ‘स्व’ कोण? आपल्या आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये अशी कल्पना आहे, की हा ‘स्व’ एक रिकामा डबा आहे. त्या रिकाम्या डब्यामध्ये म्हणजे डोक्यामध्ये माहितीचा माल टाकायचा. काही उपयोगी, काही निरुपयोगी. तो माल नीट भरला की नाही, याची परीक्षा घ्यायची. ‘नयी तालीम’मधील ‘स्व’ची अशी कल्पना आहे की, हा साक्षात आत्मा आहे! तो स्वयंप्रकाशी आहे. त्यावरचे फक्त झाकण तेवढे शिक्षणाने काढायचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये भविष्यातील माणूस आजही आहेच. त्याच्यावरील निरुपद्रवी सालपटे फक्त बाजूला केली पाहिजेत. शिक्षकाने माळ्याची भूमिका घेतली पाहिजे. माळी बीजामधून झाड काढतो का? मग झाड कुठून येते? ते बीजात असतेच! माळी फक्त त्या झाडाला आवश्यक अशी परिस्थिती निर्माण करतो. झाड स्वत:च वाढते.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

................................................................................................................................................................

नयी तालीमचे दुसरे तत्त्व – स्वत:ला ओळखणे म्हणजे शिक्षण. ‘मी कोण? मी कसा? व मी कुणाचा?’ या तीन प्रश्नांतून स्वत:ची ओळख होते. हे स्वत:ला ओळखणे कसे व्हावे?

भारतीय परंपरेत अजून एक शब्द आहे, स्वधर्म. स्वधर्म म्हणजे समाजामध्ये माझे इतरांच्या प्रति असलेले कर्तव्य. तिसरे तत्त्व – समाजामध्ये स्वधर्म करता करता मला जे शिक्षण मिळते, ते ‘नयी तालीम’चे शिक्षण. विद्यार्थ्याला स्वधर्म करण्याची संधी दिली जाते. या शिक्षण प्रक्रियेत कृतिहीन ज्ञान नाही, कृतीसोबत ज्ञान जोडले आहे. स्वधर्माचे कर्तव्यकर्म ज्ञानमय होऊन जाते. येथे ज्ञानही मिळते आणि कौशल्येही. वांगेही वाढते आणि विद्यार्थ्याचे ज्ञानही!

स्वधर्म करतांना शिक्षण घडते, हे ‘नयी तालीम’चे तिसरे शिक्षणतत्त्व आहे. एका सामाजिक आव्हानाला मी सामोरा जातो; तेव्हा माझ्यातील क्षमता, माझ्यातील गुण, माझ्या मर्यादा, मला काय करायला आवडते, मला काय करायला जमते, माझा कल काय, माझी अ‍ॅटिट्यूड्स काय, माझी कुवत काय हे सगळे मला दिसू लागते. म्हणून स्वधर्म करता करता जे स्वविषयी ज्ञान प्राप्त होते, ते शिक्षण.

चौथे तत्त्व – स्वधर्म करायचा कुठे? मी जिथे आहे तिथे! मी जिथे प्रत्यक्ष आहे, राहतो; त्याला गांधींच्या परिभाषेत ‘स्वदेश’ म्हणतात. हा स्वदेश म्हणजे ‘भारतमाता’ नाही. तुम्ही ज्या जागेशी बांधलेले आहात; तो समाज, ती जागा, तो निसर्ग, ते गाव, ती भूमी, त्याला स्वदेश म्हणतात. तर, स्वधर्म स्वदेशात करायला पाहिजे. ज्या समाजाचा मी भाग आहे, ज्याचे मी देणे लागतो, तिथे मी माझे कर्तव्यकर्म, म्हणजे स्वदेशात स्वधर्म करता करता जे मला स्वत:विषयी ज्ञान प्राप्त होते, ते शिक्षण.

‘नयी तालीम’चे पाचवे तत्त्व – शिक्षणासोबतच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन झाले पाहिजे. कारण स्वावलंबन नसेल, तर जीवनामध्ये स्वातंत्र्य टिकू शकत नाही. आर्थिक परावलंबन शेवटी परतंत्रच राहणार. ‘नयी तालीम’ जेव्हा स्वावलंबन देते, तेव्हा ती स्वातंत्र्यही देते.

‘नयी तालीम’चे सहावे तत्त्व – शिक्षणाद्वारे समाजदर्शन व्हायला हवे. किंवा असेही म्हणता येईल, की समाजदर्शनातून शिक्षण घडते. शिक्षण शाळेच्या चार भिंतींमध्ये नाही, प्रत्यक्ष समाजात जगल्याने घडते.

नयी तालीमचे सातवे तत्त्व – शिक्षण घडण्यासाठी चार पद्धती आवश्यक. स्व-अनुशासन, स्वाध्याय, उद्योग आणि सहयोग. समाजातील इतरांसोबत सहयोग करण्याचेही शिक्षण घडायला हवे.

या सर्वांमधून ‘नयी तालीम’ शिक्षणाची सर्वांगीण व्याख्या बनते. स्वदेशात व समाजात आवश्यक कर्तव्यकर्मे (स्वधर्म) करून स्वावलंबन साध्य करता करता स्वाध्याय, स्व-अनुशासन, उद्योग व सहयोग याद्वारे जी स्वत:ची व समाजाची ओळख प्राप्त होते, ते शिक्षण.

किंवा, शेवटी विनोबांच्या अप्रतिम शब्दांत,

‘जीवन हेच शिक्षण!’

‘या जीवनाचे काय करू?...आणि निवडक’ - डॉ.अभय बंग

राजहंस प्रकाशन, पुणेमूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

Post Comment

Gamma Pailvan

Mon , 13 February 2023

अप्रतिम लेख. मर्मभेदी व अचूक भाष्य आहे. बालपणीचं शिक्षण ही माझीच ष्टोरी आहे. मी 'हुशार' असलो तरी गुण कधीच उत्तम नव्हते. शाळा मला कंटाळवाणी वाटायची. कुठल्याशा घीश्यापीट्या विषयांचा पाषाणयुगीन तपशील आठवून परीक्षेत लिहायचा हे मुळातच मान्य नव्हतं. पण शाळेतल्या उनाडक्या खूप आवडायच्या. शाळेत असतांना इतकी मस्ती केली की कॉलेजात गेल्यावर वेगळी मस्ती करायची गरजच भासली नाही. तेव्हा मात्र भरपूर अभ्यास केला. १० वीत यथातथाच गुण लाभले, तरी १२ वीला चांगले गुण काढले कारण विषय आवडते होते. आवडता विषय पटलावर येईपर्यंत दं धरावा लागला. अन्यथा माझ्या शैक्षणिक कारकिर्दीचं काही खरं नव्हतं.
माझ्यासारख्या 'हुशार' मुलाची ही गत असेल तर साधारण मुलाची काय हालत होत असेल बरं?
-गामा पैलवान


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......