अजूनकाही
ज्येष्ठ पत्रकार रविराज गंधे यांचं ‘भिरभिरं’ हे नवं पुस्तक परवा, रविवारी, १२ फेब्रुवारी २०२३ रोजी गोरेगाव, मुंबई इथं समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने गंधे यांनी या पुस्तकाला लिहिलेलं प्रास्ताविक आणि त्यातील लेखनाचा एक नमुना…
.................................................................................................................................................................
माणसाचं मन आणि डोळे तो जन्मल्यापासूनच भिरभिरत असतात. पाळण्यामध्ये पडल्या पडल्या वर टांगलेल्या भिरभिरणाऱ्या रंगीबेरंगी चिमण्यांकडे टकाटका पाहत बालपणीचे दिवस भुर्रकन उडून जातात. लहानपणी घरातील आई, बाबा, अंगणातील गाय, झाड, कुत्रा, दिवा कुतूहलाने पाहणारे डोळे पुढे शाळेतील मुलींच्या लाल-निळ्या रिबिनीवरून भिरभिरायला लागतात. नंतर हीच नजर कॉलेजमध्ये गेल्यावर, आपल्या वेणीच्या शेपट्याची पाठीवरून छातीवर अशी सहेतुक हालचाल करणाऱ्या मुलींच्या वेण्यांवर झुलायला लागते.
मग नजरेचं हे भिरभिरणं काही तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. कधी जाणता तर कधी अजाणता, कधी कुतूहलापोटी, कधी आवडीने तर कधी अतीव दुःखी होऊन तीव्र वेदनेने तुमचे डोळे जनसागरातील लोकांच्या दुःखाचा, गुणावगुणांचा अन् भवतालाचा शोध घेत तुमच्या अखेरच्या श्वासापर्यंत सुख- भिरभिरत असतात!
अशा भिरभिरणाऱ्या मनाचे अनवट अंतरंग उलगडून दाखवणारं माझं ‘भिरभिरं’ हे पुस्तक हा कथा, लेख, मुलाखती, पत्रव्यवहार आदी विविध साहित्याचा एक कोलाज आहे. खरं तर कथालेखक म्हणून माझी फारशी ओळख नाही. कारण अर्थातच या क्षेत्रात माझी नजरेत भरण्याजोगी कामगिरी झालेली नाही. याची मला जाणीव आहे आणि त्याबद्दल खूप खंतही वाटते. वयाच्या पंचविशी-तिशीच्या काळात मी कथा-लेखन करत असे. त्या वेळी माझ्या काही कथा ‘सत्यकथा’, ‘वसुधा’ आदी मासिकांतून प्रसिद्ध झाल्या होत्या, त्या आणि इतर मासिके अन् वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या कथांचा मी पुस्तकात समावेश केला आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
यातील ‘भिरभिरं’, ‘पेशंट’ अशा काही कथा चोखंदळ वाचक अन् समीक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या! सिद्धार्थ पूरकर या तरुण गुणी रंगकर्मीने ‘पेशंट’ या कथेची एकांकिका अतिशय नाट्यपूर्ण अन् प्रभावीपणे पुण्याच्या सुप्रसिद्ध ‘पुरुषोत्तम करंडक’ स्पर्धेत सादर केली होती. तिला सर्वोत्कृष्ट एकांकिकेचा पुरस्कारही प्राप्त झाला होता. मुंबई येथील जुहू सेंटर इथे भरणाऱ्या ‘थेस्पो’ या नाट्यमहोत्सवामध्ये ती सादर केली गेली. इतर शहरांतही या प्रायोगिक एकांकिकेचे प्रयोग झाले. ‘बहुविध डॉट कॉम’ या साहित्यविषयक प्रसिद्ध पोर्टलवर अक्षय वाटवे याने केलेल्या या कथेच्या सुंदर अभिवाचनाला समाजमाध्यमावरील मंडळींनी उत्तम दाद दिली.
त्या वयात मला असलेल्या साहित्यिक जाणिवा अन् समज-उमजेतून लिहिल्या गेलेल्या या कथांचे संदर्भ तात्कालिक आहेत. मराठी साहित्य विश्वात एक काळ असा होता की, जाणकार प्रकाशक-संपादक हे लेखक घडवायचे. ‘मौज’चे संपादक राम पटवर्धन हे त्यातील एक अग्रणी नाव. माझ्या कथा-लेखनादरम्यान त्यांचा अन् माझा काही पत्रव्यवहार झाला. ‘भिरभिरं'मध्ये समाविष्ट केलेली अशी काही संपादकांची पत्रं रसिक-जाणकार वाचकांना नक्कीच भावतील. आजचं कथाविश्व हे विषय, कथावस्तू, आशय, शैली या बाबतीत अधिक वैविध्यपूर्ण आणि समृद्ध झालं आहे. असं असलं तरी या पुस्तकातील माझ्या कथा वाचकांना आपल्या वेगळेपणामुळे पसंतीला येतील, अशी आशा आहे.
माझ्या दूरदर्शन आणि पत्रकारितेच्या माध्यमयात्रेत विविध क्षेत्रांतील अनेक गुणी, हरहुन्नरी अन् कर्तबगार माणसं-कलावंत मला भेटली. अशा अनेकविध मंडळींच्या मी घेतलेल्या मुलाखती ‘महाराष्ट्र टाईम्स’, ‘लोकसत्ता’ आणि अन्य मासिकांमध्ये वेळोवेळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या तुम्हाला पुस्तकातील ‘मुलखावेगळी माणसं’ या विभागात वाचयला मिळतील. या व्यतिरिक्त साहित्य, सिनेमा, वाचनसंस्कृती, माध्यम, पर्यावरण आदी विविध विषयांवर विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झालेल्या माझ्या प्रासंगिक लेखांचाही पुस्तकात समावेश केला आहे. हे लेख वाचकांचं उद्बोधन करतील.
लेखक-कलावंत हा आत्मनिष्ठ वा आत्ममग्न असतो असं म्हटलं जातं. असं असलं तरी लेखकाने-कलावंताने आपल्याच जगात-कोषात रममाण न होता थोडं सामाजिक भान आणि बांधीलकी जपणं गरजेचं आहे असं मला वाटतं. समाजाचा एक जबाबदार, जागरूक घटक म्हणून प्रत्येक लेखक- कलावंताने सामाजिक-राजकीय विषयावरील आपले विचार, मतं जाहीरपणे मांडली पाहिजेत, त्यावर चर्चा केली पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. सदर पुस्तकातील ‘लोकमानस’ या विभागात मी ‘लोकसत्ता’मध्ये लिहिलेली विविध विषय अन् प्रासंगिक घटनांवरील पत्रं वाचकांचं सामाजिक भान जागवून त्यांच्या विचारमंथनाच्या प्रक्रियेला चालना देतील, अशी आशा आहे.
असं हे रंगीबेरंगी साहित्याने नटलेलं ‘भिरभिरं’ रसिक वाचकांना आवडेल अन् त्यांच्या मनात आनंदाची एक छोटीशी झुळूक निर्माण करेल, अशा आशा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
................................................................................................................................................................
‘सत्यकथा’च्या जुलै १९७९च्या अंकात ही कथा पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. लेखनाचा एक वेगळाच बाज, शैली आणि कथन यात पाहायला मिळतो.
एका बड्या मासिकात माझी कथा आली. आईला दाखवली. तिनं ती वाचून पोस्टकार्ड दिल्यासारखी परत दिली अन् म्हणाली, “ह्या धंद्यात काही राम नाही. तू म्हशी विकत घे!”
- एक संवाद कानी पडला. पाच वर्षे वयाचा मुलगा तीन वर्षाच्या मुलाला म्हणत होता, “अरे! गोडं तेल आठ रुपये वीस पैसे झालं!”
- आज चमत्कारच झाला. आमच्या समोरची, लाल डूल आणि निळा स्कर्ट घालून थेट दांडीवरून सायकल चालवणारी कमल, तब्बल सहा वर्षांनी तिच्या सासरहून घरी आली. माजघरात आईला म्हणत होती, “साखरेत चार लवंगा टाकल्या म्हणजे मुंग्या लागत नाहीत.”
- परवा नेन्यांकडं देवघरात पाहिलेली केशवपन केलेली, गंध उगाळणारी तरूण बाई डोळ्यासमोरून जात नाही.
- काल बाळ्या घाईघाईत सायकलची किल्ली देऊन गेला, पण ती फक्त उलटी लागते हे सांगायचं विसरला.
- दोन तास झाले, समोर उलट्या पडलेल्या चपलेमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.
- आज जेवताना आई बाबांना म्हणाली, “शोभाला आता स्थळं पाहायला पाहिजेत.”
बाबा म्हणाले “हो”.
त्यावर आई म्हणाली, “ ‘हो’ काय? तुम्हाला तर फक्त तोंडासमोर वर्तमानपत्र धरून बसता येतं!”
- सकाळी बाळ्याला एक धपाटा घातला. भिंतीवर नखं ओढत होता!
- दाढी करता करता सहज पाहिलं, तर बाबा एका पाकिटावरचं शिक्का न लागलेलं तिकीट काढत होते.
- परवा डेक्कनवर सुधीर एकदम ओरडला, “अरे! हाच तो कंडक्टर, त्या दिवशी पाच पैसे सुटे नाहीत म्हणाला!”
- मोलकरीण आईला म्हणत होती, “रेशनची ज्वारी तुम्ही सोडणार आहात काय?”
- आमचे एक दूरचे नातेवाईक वारल्याचं कळालं. आई म्हणाली, “पत्र लिहायला पाहिजे”.
- काल काका भेटले. म्हणाले, “म्हातारपण वाईट! सूनबाईला किती सांगितलं, अगं मूठभर जांभळं आण. आताशा बाजारात छान येतात.”
- एकदा आमच्या शेजारचे लेले म्हणाले, “आपले क्रिकेटीयर काय पण विटीदांडू खेळतात! पण बाईंच्या पॉलिसीज बरोबर आहेत हां! अहो, ‘कोशिश’मध्ये संजीवकुमारनं काम काय तोडलंय! अरे! नळ आला वाटतं? चला, पाणी भरायला!”
- आई जेव्हा देवघरातल्या समईवर हळदीकुंकू वाहते, तेव्हा त्यातून लालपिवळ्या सुंदर ठिणग्या उडतात.
- नेवाशाला असताना एकदा असाच झडझडून पाऊस आला अन् माळवदावर वाळत घातलेले कपडे काढायला बाळ्या धावला. खूप मजा आली. कितीतरी वेळ पागोळ्या पडणारं पाणी आम्ही पाहत होतो. मग आईला म्हणालो, “आता गरम गरम धिरडी कर!”
- आमच्या फरसबंदी अंगणात एकदा पिंपळाचं हिरवं रोप तरारलं. त्याला आळं करावं म्हणून मी एक फरशी काढली, तर मुळाभोवती लालजर्द गांडुळं वळवळत होती.
- अभ्यंगस्नानाच्या वेळी भल्या पहाटे उठून स्नान केल्यानंतर मग काय करायचं? हा प्रश्न मला ह्या दिवाळीतही सुटला नाही.
- बाळ्याला एकदम फटाक्यांची लड उडवलेली आवडत नाही. हिरवे, लाल लवंगी फटाके सुटे करून खिशात ठेवतो; अन् उदबत्ती घेऊन एक एक वाजवतो. लाल फटाके जोरात वाजतात, असं तो म्हणतो.
- मला तर फटाक्यावरच्या लक्ष्मीच्या - रामाच्या चित्रांच्या चिंध्या झालेल्या पाहवत नाहीत.
- आमचा पिंटू फटाक्याला फार घाबरतो. दिवसभर नुसत्या गुलकाड्या पेटवतो.
- आमच्याकडे मुंबईचे पाहुणे आले होते. त्यांनी मला सिगरेटी आणायला सांगितलं. आमचा नेहमीचा दुकानवाला त्यानंतर माझ्याकडे पाहिनासा झाला.
- काल आई मोरीत पडली. चष्म्याची काच फुटली. वडील म्हणाले, “आता एक तारखेनंतर आणू.”
- बाळ्या कटींग करून आला. एकदम पांडू स्टाईल! दिवसभर कटलाइनीवरून उलटा अंगठा फिरवीत होता.
- दूधवाल्याचं म्हणणं असं की, “गेल्या रविवारी मी पाव लिटर जादा घातलं.”
तर आई म्हणते, “गेल्या रविवारी आम्ही इथे नव्हतोच.”
तो म्हणतो, “अहो...”.
आई म्हणते, “तुझं दूध आम्हाला नको!”
- काल आई वेगळं अंथरूण भिंतीशी घालून पडली होती. मी म्हणलं, “काय झालं?”
आई म्हणाली, “कावळा शिवला!” मग आमचा छोटा बाळ्या कपडे काढून तिच्याजवळ गेला.
- परवा रात्री बाबा कसला तरी हिशेब करीत होते. आई म्हणाली, “इतकं कर्ज झालंच कसं? तुमचा कारभारच असा!”
- येत्या रविवारी कॉलेजची ट्रीप महाबळेश्वरला जाणार आहे. सुधीर म्हणाला, “येणार का?”
मी म्हणलं, “पाह्यलंय!”
त्याला खरंच वाटलं.
- बाबांनी आज एक चांदीचा पेला गहाण ठेवला. माझ्या लक्षात आलं. पैशाचा कागद रेडिओखाली ठेवला होता. “तुमचा जन्मजात स्वभावच असा पडला. तुम्हाला जमलंय काय! त्या सान्यांचं पहा जरा...” मी माजघरात येताच आईची वाक्यं बंद पडली अन् बाबा अपराध्यासारखे निमूटपणे बाहेर आले.
- रात्री मला अचानक जाग आली. आई रडत होती अन् बाबा तिच्या डोक्यावरून हात फिरवीत, “पुढल्या महिन्यात ओव्हरटाईम आला की आणू” असं कायसं म्हणत होते.
- आज बाबांचे सेव्हिंग सर्टिफिकेटचे पैसे आले. आई म्हणाली, “पावशेर खवा आण.”
- बाबा म्हणाले, “ ‘नटसम्राट’चे दर फार आहेत. आज आपण श्रुतिका लावू.”
- अलिकडं शोभी वाजवीपेक्षा जास्त वेळ आरशासमोर उभी असते. सटकावली पाहिजे.
- बशीतल्या गाजरांच्या रोपाला काल पाणी घातलं नाही, म्हणून शोभी भडकली. मी म्हटलं, “तू घालीत जा!”
- रोज घरी येणारा पोस्टमन थिएटरवर सिव्हिलमध्ये दिसला. क्षणभर ओळखलंच नाही.
- आईनं दाणकन स्टोव्ह माझापुढं आदळला अन् म्हणाली, “पहा रे आज काय अंगात आलंय याच्या!”
- आयुष्यात पहिल्यांदा कुत्र्यांची कीव आली. दुपारी चौकात अट्टी पडली होती अन् पोरं मधे दगड घालीत होती.
- परवा वाईचे खोत म्हणून आले. म्हणाले, “जालन्याचे इरिगेशनमधले देशपांडे तुमचे कोण? त्यांची मुलगी बीडला दिक्षितांना दिलीय पहा अन् मुलाची नुकतीच मुंबईला रिझर्व बँकेत बदली झालीय. प्रमोशन मिळालं ना! पण मुलगी चांगल्या घरी पडली हो! सासरे चीफ अॅडिशनल जज्ज आहेत रत्नांग्रीला!”
मी म्हटलं, “चहा घ्या”.
- काल पोरांची गाण्याची बैठक झाली. बाळ्याला म्हटलं, “गाणं म्हण” जाम म्हटलं नाही. प्रोग्राम झाल्यावर सतरंजी झटकताना मात्र गुणगुणत होता.
- वरणाला फोडणी दिल्यानंतर आई पुन्हा थोडं वरण पळीत घालते. आपल्याला काय, दोन वेळा मस्तपैकी चर्र ऐकायला मिळतं.
- शोभी गणितात नापास झाली. विचारलं तर म्हणाली, “त्या दिवशी तुळशीचं पान खाल्लं नव्हतं.”
- आज मामा आले. चहा पाणी झाल्यावर म्हणाले, “अरे, तो पिशवीतला आंबा काढ.”
- संध्याकाळी एक स्कूटरवाला मित्र वह्या घ्यायला आला होता. आई म्हणाली, “कोण आहे हा?”
- शोभीचं आज सरकारी दवाखान्यात टॉन्सिल्सचं ऑपरेशन झालं. दिवसभर आईसक्रीम खात होती.
- सकाळी उठल्यावर आपल्या अंगावर दोन चादरी कशा येतात हे मला काल कळलं. आई पहाटेच उठते.
- वडील जेवताना गंभीरपणे म्हणाले, “आता तुला हात-पाय हलवायला पाहिजेत! माझी सर्व्हिस संपत आली.” त्या दिवशी मी खूप लांब फिरायला गेलो.
- वडील आज पुन्हा म्हणाले, “मला पेन्शन वगैरे मिळणार नाही. आपण काहीतरी धंदा सुरू करू.”
- मी अर्जांचा सपाटा लावला. रोज मारुतीला जायला लागलो.
- आश्चर्य! आज रेव्हेन्यूत क्लार्कची नोकरी मिळाली. वडील जाम खूष झाले. म्हणाले, “शेरभर गुलाबजांब आण.”
आई म्हणाली, “देव पावला!”
- आज जेवताना वेगळंच वातावरण होतं. हेडक्लार्क बडवेची कशी तासली, हे वडील सांगत होते; तर शिपाई माझ्या टेबलावर किती आदबीनं कागद ठेवतो, हे मी खुलवून सांगत होतो. सगळे आनंदी होते. शोभी-बाळ्या आताच नव्या कपड्यांचा क्लेम लावत होती. आई आग्रह करकरून वाढत होती. सर्व जण मनमुराद हसत होते… आणि इतिहासातली पानं मात्र आम्हाला उल्लू बनवून हसत होती.
‘भिरभिरं’ - रविराज गंधे | नवचैतन्य प्रकाशन, मुंबई | पाने - १७६ | मूल्य - ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment