‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे सुनील देशमुख : महाराष्ट्रातल्या धडपडणाऱ्या माणसांना ‘एम्पॉवर’ करणारा माणूस
ग्रंथनामा - झलक
कुमार केतकर
  • ‘सावध ऐका पुढल्या हाका’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि सुनील देशमुख
  • Fri , 03 February 2023
  • ग्रंथनामा झलक सुनील देशमुख Sunil Deshmukh सावध ऐका पुढल्या हाका Savadh Yeka Pudhalya Haka महाराष्ट्र फाउंडेशन Maharashtra Foundation

१९९४ पासून महाराष्ट्र फाउंडेशनमार्फत मराठी साहित्य आणि महाराष्ट्रातील समाजकार्य पुरस्कार योजना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण रितीने राबवणारे सुनील देशमुख यांचे ४ जानेवारी २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या काही निवडक लेखांचं ‘सावध ऐका पुढल्या हाका’ हे पुस्तकं नुकतेच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला ज्येष्ठ संपादक कुमार केतकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

सुनील देशमुख कवी नव्हता वा कथा-कादंबरीकार नव्हता, लौकिक अर्थाने तो (प्राध्यापकी) साहित्य-समीक्षकही नव्हता. पण त्याची साहित्याची जाण विलक्षण होती. विशेषतः त्यातील पुरोगामी-प्रतिगामी आशयाची, प्रगतिशील संकल्पनांची आणि सनातनी वृत्ती-विचारांची त्याची साहित्यदृष्टी इतकी तीक्ष्ण होती की, तो त्या साहित्यकृतीचे विश्लेषणच नव्हे, तर त्या लेखक-कवी वा नाटककाराची वैचारिक कुंडली अचूक मांडत असे.

कवितेचाच नव्हे तर त्या कविमनाचाही नेमका वेध तो घेऊ शकत असे. केवळ एखादे पुस्तक गाजले आहे वा गाजावाजा - चर्चेत आले आहे; त्यामुळे तो प्रभावीत होत नसे. तो त्या लोकप्रियतेच्या पलीकडच्या परिघावर नजर ठेवत असे. वृत्तपत्रांतील परीक्षणे तो पाहत असे, पण त्यामुळे तो प्रभावीत होत नसे. एखादा लेखक वा कवी प्रचंड खपाची पुस्तके लिहितो आहे वा तो सभा-संमेलने गाजवणारा सेलिब्रेटी आहे, या बाबी सुनीलच्या दृष्टीकोनातून फारशा महत्त्वाच्या नसत. त्याच्या साहित्याचा बाज समाज परिवर्तनीय आहे की, पारंपरिक व स्थितिशीलतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन करणारा आहे, हे तो बारकाईने पाहत असे. केवळ तो साहित्यिक वा समीक्षक दलित वा ओबीसी वा आदिवासी आहे, म्हणजे तो आपसूकपणे ‘पुरोगामी’च असेल अशी ‘अंधश्रद्धा’ तो बाळगत नसे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सनातनी वा संघप्रवृत्तीच्या विचारांना गोंजारणारे दलित वा ‘पुरोगामी’ लेखक त्याने पाहिले होते. त्यांचे राजकारणही तो निरखत असे. संघ-भाजप व मोदी विचारांशी सत्तेसाठी वा पद-प्रतिष्ठेसाठी जुळवून घेणारे साहित्यिक तो ओळखून होता. कदाचित त्याच्या या अस्सल बुद्धीवादी आणि नि:पक्षपाती, परखड आणि विचक्षक जाणतेपणामुळे प्रस्थापित-प्रथितयश सेलेब्रिटी वर्तुळांमध्ये तो दिसत नसे. त्याने काही मोजक्या व विश्वासू मित्रांशी सल्लामसलत करून स्वतःची विजेत्यांची यादी तयार ठेवलेली असे. पण ती तो इतरांवर लादत नसे. आग्रह अर्थातच असे, पण त्याचे मन खुले असे.

त्याची विचारसरणी वैज्ञानिक, वृत्ती उदारमतवादी, स्वभाव दिलखुलास आणि बिनधास्तसुद्धा; दृष्टीकोन पुरोगामी, पाय वर्तमानात पण डोळे भविष्याकडे, कृतिशीलता आजची पण परिणाम दूरगामी ठरणारी, कुटुंबवत्सलता असूनही कौटुंबिक थोंबाळणेपणा नाही, बायको-मुलांची काळजी आणि त्यांच्यावर नितांत प्रेम पण त्याचे अवाजवी प्रदर्शन नाही, घरी पाळलेल्या कुत्र्यांवर तेवढाच जीव मित्रमैत्रिणींवर!

असा हा माणूस पन्नासहून अधिक वर्षे अमेरिकेत राहून जेवढा महाराष्ट्राला न विसरणारा, भारतीय असूनही ग्लोबल! आणि वैश्विकसुद्धा!

खरे म्हणजे, ही सुनीलच्या व्यक्तिमत्त्वाची लक्षणे मला १९६९-७०च्या आसपास तशी जाणवली नव्हती. लक्षातही आली नव्हती. आमची पहिली भेट त्या वेळची. मला नक्की आठवत नाही, मी कुणामुळे व कुणाबरोबर त्याच्या वर्तुळात आलो. दादरला पोर्तुगीज चर्चजवळ एका फ्लॅटमध्ये चर्चा-गप्पांचे सत्र होते. सगळे जण पंचवीस-तिशीतले. उत्साही आणि काहीतरी केले पाहिजे, अशी उमेद आणि रग अंगात असणारे! साने गुरुजींनी ‘धडपडणारी मुले’ लिहिले, तेव्हा त्यांना १९३०-४०च्या दशकात अशीच मुले भेटलेली असणार. तो काळ वेगळा, परिसर वेगळा, माणसे वेगळी, समाज वेगळा!

आम्ही स्वातंत्र्यानंतर वा त्या सुमारास जन्माला आलेलो. साने गुरुजींची ‘धडपडणारी मुले’ स्वातंत्र्य चळवळ सुरू असतानाची. ही तुलना आहे फक्त ती उमेद, उत्साह, जिज्ञासा आणि जिद्दीची - बाकी संदर्भ अर्थातच वेगळे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सुनील कायम अशा धडपडणाऱ्या मुलांच्या, मुलींच्या, माणसांच्या, संस्थांच्या, चळवळींच्या, कलाकार- साहित्यिकांच्या शोधात असे. त्यांना अधिक (आणि लढाऊसुद्धा) कृतिशील करणे, हल्लीच्या भाषेत त्यांना ‘एम्पॉवर’ करणे, हे त्याला त्याचे कर्तव्य वाटत असे.

तसे पाहिले तर सुनीलने आदिवासी चळवळीत वा कामगार चळवळीत वा दलित चळवळीत प्रत्यक्ष सक्रिय भाग घेतला नसला, तरी त्या, तसेच अंधश्रद्धाविरोधी चळवळ आणि पर्यावरणविषयक जागृती आंदोलन, यालाही त्याचे सक्रिय (आर्थिक) प्रोत्साहन असे. त्याचे विशेष प्रयत्न स्त्री-पुरुष समानता, स्त्री-मुक्ती चळवळ, त्यांची प्रकाशने आणि संघटना यांसाठी असत. अशा सर्व स्त्री (व स्त्रीवादी) संघटनांना सुनील एक मोठा आधार होता.

सुनील स्वत: विचार व वृत्तीने कट्टर नास्तिक होता. फक्त भारतातल्या नव्हे तर जगातील अनेक नास्तिकवादी संस्थांशी त्याचा संपर्क होता. नास्तिकवादावरचे परिसंवाद व चर्चासत्रेही तो आयोजित करत असे. त्याच्या अंधश्रद्धाविरोधी विचाराला नास्तिकवादाचे परिमाण होते, तसेच विज्ञानवादाचे. अनेक विज्ञानप्रसार, लोकविज्ञान व इहवादी विचार मांडणाऱ्या व प्रचारणाऱ्या व्यक्तींबरोबर व संस्थांबरोबर तो प्रबोधनाचे काम करत असे.

या सर्व वैचारिक व सक्रिय चळवळींमुळे त्याचा संबंध वैज्ञानिकांशी आणि सामाजिक विचारवंतांशी, पत्रकारांशी आणि अॅकॅडमिक वर्तुळाशी कायमचा असे. अशी अनेक वर्तुळे तो एखाद्या बहुआयामी माणसाप्रमाणे (अगदी रिंगमास्टरप्रमाणेसुद्धा) सहज पेलत असे.

एका वेगळ्या अर्थाने सुनीलचा नैतिक व वैचारिक दबदबा (दरारा!!) या सर्व वर्तुळातील माणसांनी अनुभवला आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे काटेकोर वेळापत्रकानुसार आणि व्यवस्थित आयोजन करण्याबाबत तो आग्रही असे. (कदाचित त्यामुळेच त्याचे डॉ. नरेंद्र दाभोलकर व विनोद शिरसाठ यांच्याशी समीकरण जुळत असे.)

वर म्हटल्याप्रमाणे साहित्यिक वा मान्यवर समीक्षक नसूनही तो उत्तम समीक्षक होता, तसेच प्रत्यक्ष आदिवासींबरोबर जंगलांमध्ये व कामगारांबरोबर कामगार वस्तीत वा दलितांबरोबर कुठल्या सिद्धार्थनगर वा बीडीडी चाळीत नसतानाही त्याला त्या सर्व चळवळींची, समस्यांची आणि संबंधित व्यक्तींची इत्यंभूत माहिती (आणि अंतर्ज्ञानही) असे.

काही लोकांचा (त्याला न भेटलेल्या अर्थातच) असा समज होता (वा आहे) की, सुनील अशा विचारविश्वात व चळवळीअभिमुख वातावरणात वावरत असल्यामुळे तसा बराचसा ‘रूक्ष’ होता. पण त्याला प्रत्यक्ष ओळखणाऱ्या व त्याच्या सोबत काम करणाऱ्या (असंख्य) लोकांना त्याची स्नेहभावना, जिव्हाळा, जबाबदारीची भावना जाणवत असे. ज्यांनी सुनीलला त्याच्या कुत्र्यांबरोबर खेळताना पाहिले आहे, त्यांना त्याच्या त्या आगळ्या प्रेमाचीही ओळख आहे. एकदा त्याचा एक कुत्रा आजारी होता. मी त्यांच्या स्टॅमफोर्डच्या घरी होतो. त्या कुत्र्याची सेवा करताना व चौकशी (आणि शुश्रूषा) करताना त्याच्या मनाच्या हळवेपणाची जाणीव मला झाली होती.

जरी अमेरिकेत राहून महाराष्ट्रावर सर्वंकष लक्ष सुनील ठेवत असला, तरी अमेरिकेतील राजकारण, कृष्णवर्णीयांच्या चळवळी, समतावादी आंदोलन यांतही त्याचा तेवढाच उत्साह, रस आणि सहभाग असे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मी गेल्या तीस वर्षांत साधारणपणे वीस वेळा अमेरिकेला गेलो आहे आणि माझी एकही अमेरिका व्हिजिट त्याच्याबरोबर दोन-तीन दिवस काढल्याशिवाय गेलेली नाही. त्या काळातही तो त्याला सुचलेले ‘महाराष्ट्र फाउंडेशन’चे नवे प्रोजेक्ट्स, नव्या संकल्पना, त्याला ‘सापडलेले’ नवे कार्यकर्ते, नवे लेखक यांबद्दल चर्चा वा चौकशा करत असे.

इतक्या दूर, इतकी वर्षे राहूनही त्याला महाराष्ट्रातील व्यक्ती (आणि वल्ली), वाद-विवाद, गोंधळ, भानगडी यांबद्दल सर्व माहिती नेमकेपणाने असे. (कित्येकदा मलाच महाराष्ट्रातल्या काही बाबी त्याच्याकडून कळत मी संपादक असूनही!) इतकेच नव्हे तर, इकडे परत आलो असतानाही तो मला तिकडून इकडे घडणाऱ्या घटनांबद्दल ‘अॅलर्ट’ करत असे. (त्याला नेटवर इथल्यापेक्षा अगोदर वृत्तपत्रे मिळत असत.)

अमेरिकेत माजी उपाध्यक्ष अल गोर यांच्यापासून ते राजीव गांधींचे सल्लागार ख्यातनाम सॅम पित्रोदा यांच्यापर्यंत अनेक ज्येष्ठ, प्रसिद्ध, नामवंत मंडळी त्याच्या वर्तुळात होती - पण त्याचा त्याने कधी ‘शो ऑफ’ किंवा ‘नेम ड्रॉपिंग’चा वापर केला नाही. अमेरिकेतील कित्येक अनिवासी भारतीय उर्फ एनआरआय ज्याप्रमाणे आपण परग्रहावरील विशेष कुणी आहोत, असा आविर्भाव आणतात, तसा तर त्याने कधीही आणला नाही.

आपण मुख्यतः स्टॉक मार्केटच्या माध्यमातून बरेच कोटी रुपये मिळवले, ते आपल्या व्यक्तिगत कर्तबगारीतून आलेले नाहीत, तर लाखो अदृश्य कामगार-कर्मचाऱ्यांच्या श्रमातून जी संपत्ती निर्माण होते, त्यातून ते आले आहेत आणि म्हणून ते अशा लोकांच्या चळवळींसाठी त्यांना ‘एम्पॉवर’ करण्यासाठी गेले पाहिजेत, ही त्याची भूमिका होती, म्हणून त्याने त्याचा विनियोग त्यासाठी केला.

‘महाराष्ट्र फाउंडेशन’ ही संस्था अमेरिकेतील मराठी लोकांनी स्थापन केलेली होती. ती कार्यरतही होती. त्या सर्वांशी सुनीलचे सौहार्दाचे संबंध होते. त्या माध्यमातून व स्वतंत्रपणे सुनीलचे मराठी मित्रमंडळही प्रचंड होते. दिलीप व शोभा चित्रे, शिरीष गुप्ते, राजन गडकरी, अशोक व शैला विद्वांस, रामानंद व शकून पानसे, विक्रम राजाध्यक्ष, जीवा जगताप, श्री. व श्रीमती हेरेकर, अनिल व मीना नेरूरकर अशी ती प्रचंड मोठी मांदियाळी आहे - जशी महाराष्ट्रातही आहे.

महाराष्ट्रात ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’मधली अनेक मंडळी, षांताराम पवार, मोहन देशमुख, १९६५पासून त्याच्या संपर्कात असलेले क्रांती शहा, ज्येष्ठ कॉर्पोरेट कायदातज्ज्ञ नितीन पोतदार, जगदीश गाडगीळ कुटुंबीय मोठीच्या मोठी यादी होईल. ‘साधना’ परिवार तर त्याच्या सामाजिक कुटुंबाचाच भाग होता. हा सर्व वैचारिक - सामाजिक - सांस्कृतिक परिवार मागे ठेवून तो आता चिरंतनात विलीन झाला आहे.

‘सावध ऐका पुढल्या हाका’ – सुनील देशमुख

साधना प्रकाशन, पुणे | मूल्य – ७५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......