या माझ्या जुन्या गोष्टी किमान चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात तरंगत आलेल्या आहेत…
ग्रंथनामा - झलक
सुभाष अवचट
  • ‘दोन दीर्घकथा : मॅडम\धुरकट’चे मुखपृष्ठ
  • Fri , 20 January 2023
  • ग्रंथनामा झलक दोन दीर्घकथा : मॅडम\धुरकट Don Dirghakatha - Madam/Dhurkat सुभाष अवचट Subhash Awachat स्मिता पाटील Smita Patil

प्रसिद्ध चित्रकार, मुखपृष्ठकार आणि लेखक सुभाष अवचट यांचे ‘दोन दीर्घकथा : मॅडम\धुरकट’ हे पुस्तक नुकतेच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झाले आहे. त्याला अवचट यांनी लिहिलेले हे मनोगत...

.................................................................................................................................................................

या नव्या संग्रहात तुम्ही माझ्या ज्या जुन्या गोष्टी वाचाल, त्या किमान चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात तरंगत आलेल्या आहेत. कशा, ते सांगतो. १९७०चं दशक.

त्या काळी जे जे म्हणून जुनं, जुनाट, कालबाह्य आहे, ते ते सगळं जाळून समकालीन महत्त्वाचं असं काहीतरी नवंकोरं घडवण्याच्या अट्टाहासानं पेटलेली माणसं महाराष्ट्रात होती. लेखक होते, कवी होते, कार्यकर्ते होते. त्यात मीही होतो. चित्रांचा नाद होताच; शिवाय आपले अनुभव, आपलं म्हणणं, आपल्या रचना, आपलं तत्त्वज्ञान, आपले पाठिंबे आणि विरोध हे सगळं लिहून समाजापुढे ठेवण्याची अहमहमिका लागलेल्या मित्रांच्या संगतीमुळे लिहायचीही ओढ लागलेली होती. पण एक नक्की!

मी काही ‘लेखक’ नव्हे.

मला त्याही काळात हे पक्कं माहीत होतं.

लेखकाकडे म्हणून एक क्राफ्ट असावी लागते. तिच्या आधारे तो व्यक्तिरेखा आणि त्यांच्या कहाण्या रचत जातो. त्या रचण्यात निरनिराळे प्रयोग करतो. मला ते येत नाही. मी जे पाहिलं-अनुभवलं नाही, जे माझ्या काळजात रुतलं आणि रुजलेलं नाही, असं काहीही मला लिहिता येत नाही. कारण एखादं बीज घेऊन कल्पनाविलासाच्या आधारानं ते फुलवण्याची क्राफ्ट. ती माझ्याजवळ नाही.

-तरी मी लिहायला लागलो. कारण अनुभव. आणि माणसं.

माझं आयुष्य तऱ्हेतऱ्हेच्या माणसांनी भरलेलं असे. त्या काळात तर फारच गर्दी. तिरपागडी माणसं मला आवडतात. इतरांना विचित्र वाटणाऱ्या त्यांच्या आयुष्यात मी सहज शिरू शकतो. अशा भणंग, सरकलेल्या, गोंधळलेल्या, बिचकलेल्या, कुचंबलेल्या आयुष्यांचे कुणाला न दिसणारे कप्पे पाहण्याची नजर माझ्याकडे तेव्हाही होती. त्यातून तुकडे तुकडे उचलून आणत राहिलो आणि त्या काळात माझ्याकडून काही कथा लिहिल्या गेल्या. त्यातलीच एक गाजलेली दीर्घकथा म्हणजे ‘मॅडम’.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

ती प्रसिद्ध झाली, तेव्हा माझे काही मित्र म्हणाले, “सुभ्या, ही ‘मॅडम’ म्हणजे स्मिताच! नक्की!”

मी म्हणालो, “चक्रम आहात का तुम्ही?”

स्मिता ही मॅडम कशी असेल?

- ती नव्हतीच अर्थात!

एक कबूल करतो : स्मिताच्या बेबंद स्वभावातले काही धागे मी उचलले होते.

ते अपरिहार्यही होतं.

स्मिता म्हणजे अर्थातच स्मिता पाटील.

माझी जिवाची मैत्रीण. त्या काळात आम्ही सतत बरोबर असू. इतरांना भणंग वाटेल, अशा आमच्या तरुण आयुष्यांना अर्थ देण्याच्या, खड्ड्यात पडून पुन्हा उठून पळत सुटण्याच्या धडपडीत स्मिता माझी पार्टनर होती. ती कठीण होती. तिची पत्रं. तिच्या भेटीगाठी. अख्खं आयुष्य भसाभस पिऊन टाकण्याच्या घाईत आगीच्या दिशेनं स्वतःहून धावत जाऊन वणव्यात घुसण्याचा तिचा वेडा स्वभाव. तिची कळकळ. तिची अखंड अस्वस्थता. सापडत नाही, ते शोधत राहण्याचा तिचा ध्यास. तिची तहान.

मीही तसाच होतो. भणंग. बेबंद. कशाची पर्वा नसलेला. रक्त गरम होतं.

आम्ही माणसांच्या जंगलात उनाड भटकत असू.

त्या जंगलातच ही ‘मॅडम’ मला भेटली. नेमकं सांगायचं, तर पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये. जग बदलून टाकतील असे सिनेमे बनवण्याची स्वप्नं पाहाणाऱ्या तिथल्या तरुण गर्दीत ती होती. मला वाटतं, श्याम बेनेगलच त्यानं तिला आपल्या सिनेमात काम दिलं होतं. तिनं त्यासाठी आपला जीव ओतला होता. पुढे यथावकाश तो सिनेमा रिलीज झाल्यावर तिला कळलं की, त्या अख्ख्या सिनेमात ती कुठेच नाही. तिचा संपूर्ण रोलच एडिट टेबलावर कापला गेला होता. या धक्क्यानं ती उन्मळली. वाहवत गेली. आधीच कासरे सैल सुटलेले होते आयुष्याचे, ती पुढे गांजापासून सगळ्या नशा करायला लागली. शरीराचे भोग आणि नशेची धुंदी. बास!

मी तिच्याबरोबर असे. आपल्या मनातलं सगळं सांगण्याच्या तिच्या एकटदुकटच जागा होत्या. त्यातला एक मी. तिच्या कहाणीने मी पुरता हललो. एखादं कॅरेक्टर डोक्यात घुसावं, तसं झालं होतं. त्यावर उतारा म्हणून एके दिवशी कागद पुढे ओढले आणि डोक्यातला सगळा कल्लोळ उतरवून काढला. ती एक गोष्ट झाली. तिचं नाव ‘नागडं माकड’.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

- एवढं झालं, तरी डोक्यात घुसलेली ती माझा ताबा सोडीना. तिच्यासारख्याच आणखी कुणीकुणी येऊन तिच्यात मिसळत गेल्या. त्यात एक गडद रंग स्मिताचाही होता.

-पुन्हा काहीतरी लिहिलं.

स्मिताला दाखवलं.

ती म्हणाली, “अरे, किती फिजिकल आहे हे सगळं? फार बोल्ड झालंय. त्रास होतो.”

मी म्हणालो, “पण जे आहे, ते फिजिकलच तर आहे ना? मग का नाही लिहायचं?”

हा त्या वयातला उद्धटपणा!

तो मला लेखनातही कामाला आला.

मला जे दिसतं, टोचतं, सुचतं; तेवढंच मी लिहीन.... विस्तारबिस्तार मला येत नाही, तर मी त्या भानगडीत पडणार नाही; असा माज मी मित्रांमध्ये करीत असे.

माझे हे मित्र या ‘मॅडम’मुळे भेलकांडलेच होते.

गोविंद निहलानी, गिरीश कार्नाड अशा मित्रांसमोर त्या काळात ही कथा मी वाचली होती. ते मुळापासून हलले होते. यात अजून काम कर, आपण सिनेमा करू; म्हणून त्यांनी माझ्या अक्षरश: विनवण्या केल्या.

- पण मी त्यातून बाहेर पडलो होतो.

पुन्हा अडकलो नाही.

वेळ कुठे होता?

आणि मॅच्युरिटी म्हणतात, ती तरी कुठे होती त्या वयात?

नव्हती, ते एक बरंच म्हणजे!

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माझं मूळ गाव ओतूर. दाट जंगलांनी वेढलेलं. टळटळीत उन्हातसुद्धा रस्त्यावरचा गारवा जराही ढळू नये, अशा घनदाट वडा-पिंपळांच्या घट्ट दुहेरी रांगांनी ओथंबलेलं.

लहानपण सरलं. पुढे यथावकाश मी त्या गावातून बाहेर पडलो, पण ते गाव माझ्या आत राहायला आलं, ते जन्मभरासाठी. तिथली माणसंही माझ्याबरोबर आली. राहिली. त्यांतल्या काही माणसांच्या पुढे गोष्टी झाल्या, अनेक माणसं माझ्या चित्रांमध्ये सतत डोकावत राहिली.

माणसंच का? - ओतूरचे वाडे, त्या वाड्यांच्या जाड्या, बलदंड, खरबरीत मातीच्या भिंती, त्या भिंतीतली बळदं, कधी काळी तेल पिऊन दांडगे असलेले, पण पुढे काळानुरूप करकरू लागलेले जड दरवाजे - हे सगळं सतत माझ्याबरोबर माझ्या डोक्यात भिरभिरत असतं. ओतूरचे वाडे ही कधीही कुणी न वाचलेल्या रहस्यकथांची गूढ दालनंच आहेत. त्या कथांचे नायक होते, नायिका होत्या, व्हिलन तर खूपच होते. डोंगरांच्या कुशीत, जंगलाच्या पोटात ज्या काळात हे गाव वसलं, त्या काळात सगळी लढायांची धामधूम असे. शत्रूसैन्याचे हल्ले, लुटालूट, धावपळ हे सगळं नेहमीचं. त्यामुळे गावातले सावकार, रईस यांचे वाडे चौसोपी. भोवताली तटबंदीसारखी भिंत, मध्ये मोठा चौक आणि त्या चौकाच्या कडेनं लहानमोठ्या खोल्या. पुढल्या दाराचा आडणा ओढला, की अख्खा वाडा बंद. चिटपाखरूही आत येणं मुश्कील! पुढे या लढाया सरल्या, जंगलं विरळ झाली, सावकारी आटत आटत संपली; तरी वाडे उरलेच. ढासळत्या भिंती सावरत सावरत भूतकाळाला लटकलेली जुनाट माणसं त्या वाड्यांच्या आधारानं कशीबशी जगत राहिली.

अशाच एका वाड्यात काहीतरी घडताना मी अगदी जवळून पाहिलं होतं. लहान वयात. काय चाललंय, ते कळायची शक्यता नव्हती, तरी या वाड्यातली भुतं माझ्या मानेवर बसली होती. सावकाराचा वाडा. सावकारापश्चात त्याची पत्नी आणि पाच मुलं मागे उरलेली. या बाई आमच्या घरी येत. माझ्या आईपाशी मन मोकळं करायला, कधी पिशवीभर तांदूळ किंवा असंच काहीतरी किडूकमिडूक मागायला. दोन वेळा घासभर अन्न सगळ्यांच्या ताटात जेमतेम पडत असावं; पण बाकी सगळ्याचाच दुष्काळ! आयुष्यातला सगळा ओलावा, सगळं सुख जणू शोषलं गेलं असावं, अशी कोरडी खरबरीत भिरभिरी माणसं.

त्या कुटुंबातला एक मुलगा माझा घट्ट मित्र होता. झुंग्या. त्याच्या त्या वाड्यात जायला भीतीच वाटायची, कारण अंधार. दारं, उंबरठेही दिसू नयेत असा अंधार; शिवाय दारं सारखी बंदच. कुठून फट मिळाली, तर सूर्यप्रकाश आत गळणार, एवढंच. वातावरणात एक विचित्र कोंदट वेड होतं. सगळीच माणसं वेडाच्या तारेत असल्यासारखी असत. वाड्यात मोठमोठे खांब. माझा मित्र झुंग्या त्या खांबाला टेकून नखांनी जमीन कुरतडत बसलेला असे. खांबाभोवती आतून पोखरत गेलेले नक्षीचे ढलपे होते. एकदा केव्हातरी झुंग्यानं किंवा कुणीतरी सहज त्या नक्षीच्या पापुद्र्याला हात लावला तर बोट भसकन आतच गेलं. आणखी कुरतडून पाहिलं, तर त्या भल्याभक्कम जुन्या खांबाच्या पोटात एक उभीच्या उभी सोन्याची कांब होती!

- झालं!

वाड्यात एकच कल्लोळ उसळला. फटाफट दरवाजे बंद केलेले गेले. पूर्वजांची संपत्ती? गुप्तधन?

सगळे त्या शक्यतेनं वेडे होऊन गेले.

कोणाला काही सुचेना. वाड्याच्या खांबात सोनं, वाड्याच्या जमिनीत सोनं.. आणखी कुठे असेल? बळदात असेल? धान्याच्या कणगीच्या खाली असेल? वरच्या माळ्याच्या जमिनीत पुरलेलं असेल? छपराच्या आड्यात दडवलं असेल? बघता बघता सगळ्यांनी मिळून तो अख्खा वाडा उकरायला घेतला. वरच्या मजल्यावरली जमीन उकरून उकरून खाली माती गळत राहिली. खांब पोकळ झाले. वाड्याच्या भिंती, वासे, आढे काही म्हणता काही सोडलं नाही.... जो तो आपला गुपचूप उकरतोय.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आमच्या डोळ्यांदेखत त्या वाड्याची उरलीसुरली रया गेली आणि माणसांची वाताहत होत राहिली. वेडाची एक विद्री लहर होतीच, ती गडद झाली. जो तो भ्रमिष्ट. नादावलेला. दारिद्र्य होतंच, ते आणखी दाट होऊन तो अख्खा वाडाच मटकावून बसलं.

पुढे पुढे कुणीच घराबाहेर पडेनासं झालं. जो तो खिडकीत बसलेला दिसे. नजर रिकामी. बाहेर रोखलेली...

पुढे सगळी वाताहत!

मनात कोरलं गेलेलं ते ‘धुरकट’ चित्र-रंगरेषांऐवजी शब्दात कसं आलं, ते मला आज सांगता येणार नाही... पण मी लिहीत गेलो खरा! त्या वाड्यातल्या माणसांमध्ये मग मी आणखीही कोणाकोणाचे रंग मिसळले... माझी ‘भागी’ उभी राहिली. भागीची विचित्र वेडी मुलं आणि त्या विचित्र अंधारात लपून राहिलेले त्यांचे लैंगिक गुंते! झुंग्या होताच माझ्या मनाला शिवलेला. माझी गोष्ट सुरू झाली आणि संपलीही. त्या गोष्टीत मीही आहे. झुंग्याचं मांजर तो मी.

त्या काळात मी लिहिलं की, मित्रांना वाचायला देई. धुरकट वाचून लोक वेडे झाले होते. अनेकांना त्यात सिनेमा दिसला. मी अजून एक्सप्लोर करू शकेन, असे तुकडे दिसले. सदाशिव अमरापूरकरनं यावरून एक एकांकिका बसवली. नगरला तिचे प्रयोग झाले. बक्षीसही मिळालं होतं.

कुणी म्हणे, ‘सिनेमाचं स्क्रिप्ट कर रे, सुभ्या’... कुणी म्हणे- ‘यात कादंबरी आहे पूर्ण लांबीची. लिही.’

मी लिहिली नाही.

म्हटलं, ‘हे जेवढं लिहिलंय, तेवढं बास!’

- बाकीची ‘धुरकट’ माझ्यापाशी आहे. अजूनही आहे.

आणखी एक गंमत म्हणजे या नव्या संग्रहासाठी ‘धुरकट’ची जन्मकथा लिहीत असताना सिडनीहून एक ताजी बातमी हाती आली आहे. रवी देशपांडे हा माझा फिल्म इन्स्टिट्यूटमधला जुना मित्र. गेली अनेक वर्षं रवी ऑस्ट्रेलियात सिडनीला स्थायिक आहे. ही कथा जन्माला आली, तेव्हापासून या कथेतल्या पात्रांनी रवी झपाटलेला होता. तेव्हाच त्याला या कथेवर सिनेमा बनवायचा होता... आता इतकी वर्षं उलटली, तरी रवीच्या मानेवरचं ‘धुरकट’चं भूत उतरायला तयार नसावंसं दिसतंय. कारण रवी म्हणतो, ‘माझं स्क्रीप्ट तयार आहे आणि सिनेमाचं शूटिंग लवकरच सुरू होईल.’

- तर अशा या दोन दीर्घकथा!

गेली अनेक वर्षं उपलब्ध नव्हत्या.

आता वाचा!

‘दोन दीर्घकथा : मॅडम\धुरकट’ – सुभाष अवचट

राजहंस प्रकाशन, पुणे | पाने – १७५ | मूल्य – २२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......