वंदना सोनाळकर या स्त्रीवादी अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्त्या. त्या मुंबईतील ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’ (TISS)च्या निवृत्त प्राध्यापिका. तिथं त्यांनी स्त्री आणि लिंगभाव या विषयांचं अध्यापन केलं. त्याचबरोबर या विषयावर लेखन-संशोधनही. २०२०मध्ये त्यांचं ‘Why I am not a Hindu Women : A Personal Story’ हे इंग्रजी पुस्तक प्रकाशित झालं. यात त्यांनी वैयक्तिक अनुभव आणि लिखित व अनुभवजन्य पुराव्याआधारे जातकेंद्री परंपरा आणि व्यवहारांचे समीप दर्शन घडवले आहे. त्याचबरोबर राजकीय हिंदुत्व आणि व्यापक हिंदू धर्म या दोहोंची चिकित्सा करताना एक स्त्री म्हणून जन्माला येऊनसुद्धा स्वत:ची धार्मिक ओळख आपण का नाकारली, याची तर्कसंगत मांडणी केली आहे. या पुस्तकाचा ‘मी हिंदू स्त्री का नाही : माझा लढा, माझी कहाणी’ या नावाने पत्रकार व अनुवादक शेखर देशमुख यांनी नुकताच मराठी अनुवाद केला आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातल्या पहिल्या परिचय प्रकरणाचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
१.
मी स्वतः एका हिंदू कुटुंबात जन्माला आलेली स्त्री आहे. परंतु, आचारविचारांनी मी निरीश्वरवादी आहे. एक स्त्रीवादी आहे. एक निवृत्त शिक्षिका आहे. जिचे जगाबद्दलचे आकलन मुख्यतः मार्क्सवादाच्या प्रभावातून विस्तारत गेले आहे आणि ही शिक्षिका गेली कित्येक दशके आपल्या समाजातील जातव्यवस्थेची गुंतागुंत समजून घेत, त्याला पूर्ण ताकदीनिशी विरोध करण्याचा प्रयत्न करत आली आहे. अर्थात जेव्हा आपल्याकडचे हिंदुत्व किंवा राजकीय हिंदुधर्मतत्त्ववादी अत्यंत आक्रमक होतात, आक्रमक होऊन देशातल्या मुस्लिमांचे ते अपमान करतात, त्यांची निंदानालस्ती करतात आणि त्यांच्या विरोधात थेट युद्ध पुकारतात, तेव्हा एक स्त्री म्हणून मला अक्षरश: थबकायला होते.
मला याची पूर्ण जाणीव आहे की, मुस्लिमांना शत्रू मानणारा हा हिंदुधर्मतत्त्वाचा म्हणून जो काही अवतार आहे, तो मुख्यतः ब्राह्मण्यवादी हिंदुधर्मतत्त्वाचा एक प्रकार आहे. धर्मात वर्चस्व राखून असलेले हे ब्राह्मण्यवादी हिंदुधर्मतत्त्व शूद्रांना आणि समाजातल्या मधल्या स्तरावरच्या जातींना मुस्लिमांविरोधातल्या युद्धात कपटाने सामील करून घेणाऱ्यांपैकी आहे. हे करत असताना ब्राह्मण्यवादी पुरुषसत्ता आणि समाजातल्या जातीच्या उतरंडीला धक्का लागणार नाही, ती अस्पर्शित राहील हेही आवर्जून बघितले जात आहे.
ही ब्राह्मण्यवादी पुरुषसत्ता स्वातंत्र्य आणि समानतेचा पुकारा करणाऱ्या महिलांकडे तिरस्कारयुक्त नजरेने पाहणारी, त्यांना वठणीवर आणण्यासाठी तत्पर असणारी अशी राहिली आहे. ही ब्राह्मण्यवादी पुरुषसत्ता दलित आणि आदिवासींच्या व्यथा-वेदना तसेच अस्तित्व कायम अदृश्य राहील असे पाहत आली आहे. त्याच वेळी दलित आणि आदिवासी आपल्या हक्क-अधिकारांची मागणी करण्यासाठी जेव्हा पुढे सरसावतात, तेव्हा हिंदुधर्मतत्त्वातली ब्राह्मण्यवादी पुरुषसत्ता त्यांच्याविरोधात हिंसेला प्रोत्साहन देण्यासाठी, हिंसा लादण्यासाठी आक्रमक होत आहे. स्वातंत्र्यानंतर मोठ्या मेहनतीने आकारास आणलेल्या धर्मनिरपेक्ष संस्थांचे हे उद्ध्वस्तीकरण आहे. या संस्था कितीही सदोष असल्या तरीही याच संस्थांनी, शोषणावर आधारित सामाजिक रचनेत बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने प्रस्थापितविरोधी चळवळींसाठी आवश्यक तो अवकाशही मिळवून दिलेला आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हिंदूधर्मतत्त्वाचा हा जो काही राजकीय अवतार दिसतो आहे, त्याला मी नेहमीच विरोध करत आले आहे. त्याचा मी कठोर शब्दांत निषेधही नोंदवत आले आहे. सध्याच्या काळात जगभरातल्या तमाम प्रतिगामी शासनसत्तांची ही अशीच विचारसरणी राहिली आहे. तर एका बाजूला जागतिक स्तरावरची भांडवलशाही मानवतेचे हित साधण्यात, तसेच पर्यावरणाचे रक्षण करण्यास अपयशी ठरते आहे. या दोन गोष्टी भिन्न भासत असल्या तरीही, त्यांच्यात संगती लावणे फारसे अवघड नाही.
या सगळ्यात माझ्याकडील दुसरी निषेधनोंद अशी आहे, ज्यात ‘मी हिंदू स्त्री नाही?’, हे विधान शब्दश: कोरून ठेवले आहे. याचा थेट संबंध भारतीय समाजात आज ज्या पद्धतीने हिंदू धर्म पाळला जातो, किंवा मला स्मरते तेव्हापासून पाळला गेला आहे, त्याच्याशी अधिक आहे. त्या अर्थाने, मुख्यतः प्राचीन काळातल्या हिंदू धर्माशी, त्यातल्या पवित्र वचनांशी आणि वर्तमानात प्रभाव राखून असलेल्या हिंदू धर्माच्या इतिहासाशी वा निगडित साहित्याशी माझे फारसे देणेघेणे नाही.
आपल्याला ठाऊक असलेला हा हिंदू धर्म अंगभूत स्त्रीद्वेष्टा राहिला आहे. इतर धर्म हे मुख्यतः पुरुषकेंद्री आहेत. हा स्त्रीद्वेष्टा हिंदू धर्म जातिपातींवर आधारलेला आहे. एखाद्याची हिंदू ओळख ही नेहमीच त्याच्या जातीची ओळख राहिली आहे. या धर्मातली जातभेदी वृत्ती आणि इथली पितृसत्ताक व्यवस्था एकमेकांना पूरक आणि प्रसंगी खूप क्रूरही ठरल्या आहेत. म्हणूनही वैश्विक नैतिकता आणि जीवन-मूल्यांवर एक धर्म म्हणून या जातभेदी पितृसत्ताक व्यवस्थेचा विश्वास नाही. या धर्माच्या मूळ तत्त्वांमध्येच आज राबवल्या जात असलेल्या जात आणि धर्मभेदी राजकारणाला भरपूर आधार आहे.
२.
माझी वैचारिक निष्ठा निरीश्वरवादाशी आहे. परंतु ज्यात मी जन्मले आहे, त्या हिंदू धर्माविरोधात बंडखोरीचा मार्ग पत्करून मी निरीश्वरवादाकडे वळलेले नाही. अगदीच स्पष्ट करून सांगायचे झाल्यास, निरीश्वरवादी वडिलांच्या प्रभावातून मी या विचारांकडे वळले आहे. मला आता स्पष्टपणे जाणवते ते हे की, माझ्या वडिलांमध्ये रुजलेला निधर्मी तर्कवाद हा १९व्या शतकातला उत्तरार्ध आणि २०व्या शतकातला प्रारंभ या काळात महाराष्ट्रात घडून आलेल्या प्रबोधनपर्वाशी नाते सांगणारा होता. त्या काळाच्या प्रभावातून तो मुख्यतः स्फुरलेला होता. ब्रिटनमधल्या फेबियन समाजवादाच्या जवळ जाणारा असेही या दृष्टीकोनाचे वर्णन करता येते.
माझी आई मात्र, धार्मिक वृत्तीची नि व्रतवैकल्ये पाळणारी होती. त्यात आक्रमकता नव्हे, तरलता होती. सर्वसमावेशकता होती. तिने कधीही वडिलांच्या नास्तिकतेवर सवाल उपस्थित केले नाहीत. किंबहुना, तसे काहीही न करता तिने तिच्या श्रद्धा ठामपणे जोपासल्या. याचा एक अर्थ, ती तिच्यापेक्षा भिन्न म्हणता येईल अशा निधर्मी विचारांचा आदर करणारी होती. या आदर करण्याच्या तिच्या वृत्तीतून कोतेपणाऐवजी मनाचा मोठेपणाच दिसत होता.
त्या अर्थाने, तिची श्रद्धा पूर्णपणे उदारतेकडे झुकणारी होती. आमच्या या घरावर विशिष्ट जातीची छाप होती. आम्ही सीकेपी म्हणजेच चांद्रसेनीय कायस्थ प्रभु आहोत. हा महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेला छोटासा, परंतु उच्चजातींमध्ये गणला जाणारा जातसमूह आहे. मात्र, हा जातसमूह ब्राह्मण नाही. म्हणूनच हिंदू धर्मातल्या धार्मिक अधिकारांवर हक्क सांगण्याचा जेव्हा मुद्दा येतो, तेव्हा या जातीला त्यात स्थान असत नाही. मी हे सगळे विस्ताराने सांगत आहे कारण, दरदिनी आपण पाहतो, हिंदू धर्मात शेवटी जातीचाच सगळ्यात मोठा प्रभाव राहिला आहे. जात हाच इथे निर्णायक घटक राहिला आहे. अर्थात, हे वास्तव समजून घेण्यास मला एक मोठा काळ जावा लागला, हेही तितकेच खरे आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
मी पहिल्यांदा जेव्हा परदेशी वास्तव्यासाठी आणि मग १९६०-७०च्या दशकात ब्रिटनच्या साहेबी संस्कार असलेल्या शिक्षणव्यवस्थेमार्गे मराठवाड्यातल्या सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या भागात शिकवण्यासाठी म्हणून माझ्या सीकेपी कुटुंब छत्रापासून दूर गेले, तेव्हा जातीशी निगडित दाहक वास्तव आणि क्रौर्याने मला अंतर्बाह्य हादरवून टाकले. पुढे जाऊन, जातव्यवहारातून झळकणारी क्रूरता ही हिंदुधर्मातल्या नित्याच्या स्त्रीद्वेष्टेपणाशी थेटपणे जोडलेली आहे, या वास्तवाचेही मला भान येत गेले. तसतसे माझ्या तोवरच्या समाजविषयक आकलनासही नव्याने आव्हान मिळत गेले. आपले समाजाबद्दलचे आकलन तोकडे आहे, याची मला प्रकर्षाने जाणीव होत गेली.
तोवर जन्माने स्त्री असल्याकारणाने माझ्यावर परंपरेने जी बंधने लादली होती, त्या विरोधात मी वैयक्तिक पातळीवर बंड पुकारले होते. पण आमचे कुटुंब तुलनेने उदारमतवादी असल्याने ते बंड तितकेसे महत्त्वाचे नव्हते. इथे मी, जातश्रेणीतल्या वरच्या स्थानामुळे म्हणा किंवा हिंदू धर्मातला अविभाज्य घटक म्हणता येईल, अशा पुरुषसत्ताक ब्राह्मण्यावादी वर्चस्वामुळे म्हणा, स्वतःला कधी हिंदू स्त्री म्हणवून घेतले नाही. या सगळ्याचा अर्थ काय किंवा मला नेमके काय म्हणायचे आहे, यावर मी माझे म्हणणे मांडत जाईन त्यानुसार पुढे जाऊन स्पष्ट करीत जाईन.
मी जो काही मार्क्सवाद शिकले आहे, त्याने मला एक गोष्ट शिकवली आहे. आणि त्यावर माझा ठाम विश्वासही आहे. ती म्हणजे : जग बदलण्याच्या, तेही कृतीतून बदलण्याच्या इराद्यानेच एखाद्याने जग समजून घ्यावे. अंशाअंशाने जगाचे आपले आकलन वाढवावे. याच विचारातून मी माझ्या जातीच्या आणि समाज वर्गाच्या बाहेर लग्न केले. पुढील काळात वैवाहिक आयुष्यातले अपरिहार्य ताणतणाव वगळता, मी माझ्या मुलांना (आणि माझ्या नवऱ्यालाही) त्यांच्या जातीच्या स्थानावरून काय काय भोगावे लागले हेदेखील मी पाहिले, जवळून अनुभवले.
२०१८च्या शेवटाचा तो काळ होता. अभिव्यक्त होण्याचा हाच तो क्षण आहे, असे मला तीव्रतेने वाटून गेले. त्या उत्कट क्षणात जसे मी पुस्तक लेखनास प्रारंभ केला, ऐतिहासिकदृष्ट्या अनन्यसाधारण म्हणाव्यात अशा घटना एकापाठोपाठ एक अशा घडत गेल्या.
३.
मी या लेखनास सुरुवात केली, मोदी सरकारने चौथ्या वर्षात प्रवेश केला होता. बाबरी मशिदीचा विध्वंस घडल्यानंतर पंचवीसहून अधिक वर्षे उलटून गेली होती. ‘प्रोजेक्ट हिंदुत्व’ने आता नुसताच जोर पकडलेला नव्हता, तर समाजात खोलवर पाळेमुळेही धरली होती. एवढ्या-तेवढ्यावरून हिंदूंच्या भावना दुखावत असल्याचे कथन रचले जाऊ लागले होते. त्यातूनच संस्कृतिरक्षकांच्या टोळ्या मोकाट सुटू लागल्या होत्या. या टोळ्या हिंसक होत गेल्याने झुंडबळीच्या घटना घडू लागल्या होत्या. यामुळे दररोज या ना त्या गावात-शहरात मुस्लिमांची छळवणूक सुरू झाली होती. कायद्याचे रक्षक असलेले पोलीस या गुंडगिरीकडे एकतर हेतूपुरस्सर दुर्लक्ष तरी करत होते किंवा प्रत्यक्ष झुंडींच्या हिंसेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभागी तरी होताना दिसत होते. एका बाजूला दलितांविरोधातला हिंसाचार वाढीस लागला होता. त्यातही दलित महिलांवरच्या अत्याचारात चिंताजनक वाढ होऊ लागली होती. शैक्षणिक संस्थांमध्ये दलितांशी भेदभाव करणे, विद्यार्थी आरक्षणाच्या नियमांचा बेदरकारपणे सर्रास भंग करणे या घटना नित्याच्या होऊन गेल्या होत्या.
एरवीसुद्धा खेड्यांमध्ये दलित आणि आदिवासी महिलांविरोधात झालेली हिंसा सहन करण्याकडे किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याकडेच कल राहिला आहे. हेच कशाला, जेव्हा खैरलांजीमध्ये सुरेखा आणि प्रियांका भोतमांगे हत्याकांड प्रकरण (२००६) घडले, तेव्हासुद्धा जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याच्या इराद्याने आणि मुख्य म्हणजे, हिंसक हल्ल्यात सहभागी असलेल्या आरोपींचा जातीच्या द्वेषातून उफाळून आलेला हेतू लपवण्यासाठीच न्यायालये आणि एकूण न्याययंत्रणेने पुढाकार घेतला होता.
तसे पाहता, आपला समाज आणि आपले शासन दलित महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना हलगर्जीपणा करत नेहमीच पाठीशी घालत आले आहे. आता तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या आरोपींना मोकाट सोडणे हे सार्वत्रिक चित्र बनले आहे. हे मोकाट सुटलेले लोक समाजमाध्यमांवर विरोधी विचार मांडणाऱ्या महिलांचा आता दरदिवशी पिच्छा करू लागले आहेत. तसे करताना हिंसक भाषा वापरू लागले आहेत, बलात्काराची आणि काही प्रकरणात खुनाची धमकीदेखील देऊ लागले आहेत.
अशा या विषाक्त वातावरणात सीमेवर झालेल्या युद्धात आपल्या वडिलांना गमावलेली एक २१ वर्षीय तरुणी म्हणाली की, पाकिस्तानने नव्हे, युद्धाने माझ्या वडिलांचा बळी घेतला, तेव्हा तिच्यावर समाजमाध्यमांतल्या टोळभैरवांनी चहुबाजूंनी हल्ला केला. तिला ‘अँटि-नॅशनल’ म्हणजे ‘देशद्रोही’ घोषित केले. तो सारा हिंसक खेळ पाहून मी खूप दुखावले. मला या सगळ्याचा त्रास अधिक झाला, कारण त्या तरुणीने प्रखर सत्य मांडण्याचे अकल्पित धाडस दाखवले होते. त्याचा आदर करण्याऐवजी तिलाच लक्ष्य केले गेले होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
हे पुस्तक लिहायला घेतल्यापासून गेल्या दोन वर्षांत जेव्हा जेव्हा अत्याचारग्रस्तांनी आवाज उठवल्याच्या आणि महिलांनी प्रतिकार केल्याच्या बातम्या आल्या, त्या-त्या वेळी न चुकता हिंदू बहुसंख्याक सत्तेच्या समर्थक-अनुयायांनी त्या अत्याचारग्रस्तांवर, प्रतिकार करणाऱ्या महिलांवर शाब्दिक हल्ले केले. २०१८मध्ये महिलांच्या शबरीमला मंदिर प्रवेशाचे प्रकरण चर्चेत आले.
तत्पूर्वी, १० ते ५० या वयोगटातल्या मुख्यत: मासिक पाळी येत असलेल्या महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश निषिद्ध असल्याचा आदेश १९९१मध्ये केरळ उच्च न्यायालयाने दिला होता. परंतु सप्टेंबर २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय फिरवणारा निकाल दिला. या निकालानुसार मासिक पाळी असलेल्या महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणे म्हणजे अस्पृश्यतेच्या प्रथेला धग देण्यासारखे होते, आणि म्हणून तसे करणे घटनाविरोधीदेखील होते. परिणामी, काही महिला भाविक आपला मंदिर प्रवेशाचा हक्क बजावण्यासाठी पुढे सरसावल्या, तसे प्रतिगामी मनोवृत्तीच्या निदर्शकांनी त्यांना त्यापासून रोखण्यासाठी हिंसक मार्गाचा अवलंब केला गेला एक प्रकारे या निदर्शकांनी सर्वोच्च न्यायालयासही विरोध दर्शवला.
महिलांना शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यापासून रोखणे आणि कोणी हिंमत केलीच, तर त्यांच्याविरोधात आक्रमक निदर्शने करणे, या गोष्टी ज्यांनी केल्या, त्यांचा महिलांना असलेला विरोध मुख्यतः दोन स्त्रीद्वेष्ट्या तत्त्वांवर आधारलेला होता. त्यातले पहिले कारण म्हणजे, मासिक पाळी येत असलेल्या महिला 'अपवित्र' आणि 'अस्वच्छ' असतात. म्हणून त्यांना मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे. दुसरे म्हणजे, शबरीमला मंदिरातला देव हा ब्रह्मचारी आहे. त्यामुळे लैंगिकदृष्ट्या कृतिशील असलेल्या महिलांचे तिथे असणे त्याच्या ब्रह्मचर्यालाच एक प्रकारे चाळवणे आहे.
परंतु, इथे माझा प्रश्न असा आहे, नैसर्गिक शारीरिक चक्रातून जाणाऱ्या एखाद्या महिला भाविकाच्या प्रवेशाने मंदिराची जागा प्रदूषित होऊच कशी शकते? आणि हिंदूधर्मीयांच्या अनेक मंदिरातली निषिद्धतेची प्रथा पाहता, विशिष्ट जातीतले भाविक देवाच्या दर्शनाला आले, तर ती मंदिरे प्रदूषित कशी काय होऊ शकतात?
खरे तर हिंदुधर्मतत्त्व हा एक श्रद्धेचा भाग आहे. ती श्रद्धा पाळण्याचा भाग आहे. जीवन जगण्याचा एक मार्ग आहे. यात जातिभेद आणि पुरुषसत्ताक मनोवृत्ती शिरजोर असली तरीही, या देशात हिंदुधर्म एकत्रितपणे नांदलेला आहे. परंतु ‘हिंदुत्व’ ही एक राजकीय विचारसरणी आहे, ती मुख्यतः परधर्मद्वेषावर आधारलेली आहे. तसेच हिंदू धर्मीयांवर जात श्रेष्ठत्वाची भावना लादणारी अशी ही विचारसरणी आहे. मी जेव्हा असे म्हणते, की ‘मी हिंदू स्त्री नाही’ तेव्हा हे असे जाहीर करण्यामागे हिंदू धर्माचा अविभाज्य घटक असलेल्या जातींमध्ये खोलवर रुजलेली पितृसत्ता हा मुख्य संदर्भ आहे.
मी या ठिकाणी अशी घटना नमूद केली आहे, ज्यामध्ये शबरीमला मंदिर प्रवेशासंबंधातल्या एका याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने २०१८मध्ये निर्णय दिला. हे जातींमध्ये मुरलेल्या पितृसत्तेच्या अलीकडच्या काळातल्या अनेक उदाहरणांपैकी एक उदाहरण आहे. एक स्त्री म्हणून मी हिंदू धर्मात जन्माला आले खरे, पण मी आयुष्यभर धर्मातल्या रूढी-परंपरांना विरोध केला आहे. बुरसटलेल्या रूढी- परंपरांविरोधात सवाल विचारले आहेत. अगदी जेव्हा मला हेदेखील ठाऊक नव्हते की, मी नेमके काय करते आहे, तेव्हासुद्धा मी धर्मातल्या प्रतिगामी प्रवृत्तींना विरोध करताना डगमगलेले नाही.
मग अशा प्रसंगी, एक हिंदू स्त्री असणे किंवा नसणे याचा नेमका अर्थ काय आहे?
४.
अर्थात, हे सारे का गरजेचे आहे, याविषयी माझे म्हणणे मांडणेही मला इथे गरजेचे भासत आहे. जे माझ्यासारखे लोक ‘हिंदू’ अशी ओळख असलेल्या कुटुंबांमध्ये जन्माला आलेले आहेत, त्यांचे स्थान कांचा इलय्यांसारख्यांपेक्षा निश्चितच वेगळे आहे. मी जसे या प्रकरणात नमूद केले आहे, त्यानुसार मी एका अब्राह्मण परंतु उच्चजातीय समूहाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे इलय्या यांनी उल्लेखिलेल्या कारागीर समूहांकडे असलेल्या ज्ञानाशी मी बरोबरी करूच शकत नाही. तसे असले तरीही, केवळ बुद्धिवादी वा नैतिकदृष्ट्या स्त्रीवादी दृष्टिकोनातून नव्हे, तर एक सामान्य स्त्री म्हणून मला माझे विधान करण्याची गरज भासते आहे. स्त्रीद्वेष्टेपणाची पाळेमुळे हिंदू पितृसत्ताक व्यवस्थेत खोलवर रुजलेली आहेत. ती प्रत्येक जातीत रुजलेली आहेत आणि प्रत्येक जातीत भक्कमपणे टिकूनही आहेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हिंदू धर्मात कोणताही एक प्रमाण धर्मग्रंथ नाही. या धर्मातल्या कर्मकांडांत, स्थानिक देवतांत आणि पारंपरिक श्रद्धांमध्ये बहुविधता आहे. असे असूनसुद्धा जात आणि स्त्री-पुरुष लिंगभावाचा मुद्दा येतो, तेव्हा हा धर्म मानवतेची विटंबना करणाऱ्या विषमतेच्या प्रथेला दैवी रचना समजून मान्यता देतो. त्यामुळे मी हिंदू स्त्री का नाही, यासंबंधाने लिहिताना जात आणि लिंगभावाशी निगडित माझ्या अनुभवांची चिकित्सा करणे मला आवश्यक वाटते.
हा असा क्षण आहे, असा तिठा आहे आणि असा संदर्भ आहे, त्याच्या अनुषंगाने मी वयाची साठ वर्षे ओलांडलेली स्त्री, ‘मी हिंदू स्त्री का नाही?’, हे विस्ताराने सांगू इच्छिते. माझे इंग्रजी माध्यमात शिक्षण झालेले आहे, तसेच मी बहुसांस्कृतिक स्वरूपाच्या महानगरी तसेच प्रादेशिक वातावरणाशी परिचित आहे. मी स्वतः स्त्रीवादी आहे. मला माझ्या सुस्थित उच्चजातीय असण्याची जाण आहे. अशा वेळी वेगवेगळ्या सामाजिक पार्श्वभूमी असलेल्या स्त्रीवाद्यांनी युक्तिवादाच्या माध्यमातून दिलेली आव्हाने स्वीकारण्याची माझी तयारी आहे. लहानपणी माझ्या वाट्याला आलेल्या नातेसंबंधांतून, माझ्या वाट्याला आलेल्या वैवाहिक आयुष्यातून आणि आता एका मुलीची सासू या साऱ्या बदलत्या नात्यांतून माझ्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली आहे. यातूनच माझ्यात बंडखोरी आणि चिकित्सेची सवय मुरली आहे नि याच दोन सवयींनी मला आजवर तगवलेसुद्धा आहे.
‘मी हिंदू स्त्री का नाही : माझा लढा, माझी कहाणी’ – वंदना सोनाळकर
लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने – १६४ | मूल्य – २८० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Gamma Pailvan
Wed , 18 January 2023
वंदनाताई,
ब्राह्मण्यवाद काय असतो हो? फार पूर्वी ब्राह्मणवाद नावाचा थोतांडी बागुलबुवा तुम्हां पुरोगाम्यांनी उभा केला होता. तेव्हा माझ्यासारख्यांनी 'ब्राह्मणवादाचे पुरावे दाखवा' म्हणून प्रतिप्रश्न केला. त्यावर असे कुठलेही पुरावे मिळालेले नाहीत. तीच गत तुमच्या नव्या ब्राह्मण्यवादाचीही होणार आहे. हिंदूंमधला एक गोट सरसकट स्त्रियांच्या, मुस्लिमांच्या, दलितांच्या, वनवासींच्या विरोधात आहे हा आरोप कमालीचा हास्यास्पद आहे. कारण की ठाम आरोप लावता येईल असा एकही माणूस तुम्हांस दाखवता येणार नाही. याउलट इस्लामिक दहशतवादाचे आरोप असलेले कित्येक मुसलमान सापडतील. म्मच्या बडबडीकडे आम्ही का लक्ष द्यायचं?
तुम्हाला काहीतरी लपवायचंय. त्यासाठी तुम्ही खऱ्या समस्येपासून लक्ष उडून इतरत्र वेधले जावे, असा प्रयत्न करता आहात. तुम्ही खऱ्या गुन्हेगारांना पाठीशी घालीत आहात.
आपला नम्र,
-गामा पैलवान