‘सोयरीक घराशी’ : चिंतनशील घरांच्या उन्नत नजरेसमोर भविष्यकाळातील सूर्योदय असतो; म्हणूनच त्यांच्या खांद्यावर ‘उद्याची घरं’ उभी राहू शकतात
ग्रंथनामा - आगामी
अंजली कीर्तने
  • ‘सोयरीक घराशी’
  • Thu , 15 December 2022
  • ग्रंथनामा आगामी सोयरीक घराशी Soyrik Gharashi अंजली कीर्तने Anjali Keertane

घर आणि माणूस यांतील विविधरंगी नात्याचा बहुस्तरीय शोध घेणारं आणि देशविदेशातील घरांचं व्यक्तिचित्रण करणारं अंजली कीर्तने यांचं ‘सोयरीक घराशी’ हे ललितरम्य व चिंतनशील पुस्तक लवकरच ‘मनोविकास प्रकाशना’तर्फे प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला लेखिकेनं लिहिलेलं हे मनोगत….

.................................................................................................................................................................

पशूंप्रमाणे गुहांत राहणाऱ्याला आदिमानवाला स्वत:साठी घर बांधण्याची कल्पना कशी सुचली असेल? कदाचित त्यानं घरटी बांधणाऱ्या पक्ष्यांचं अनुकरण केलं असेल. अवतीभवतीच्या प्रदेशात जे उपलब्ध झालं, त्यातून निवारा तयार करायला तो शिकला असेल. बर्फाळ प्रदेशातील एस्किमोंनी बर्फाची घरं बनवली. घनदाट जंगलातील माणसांची घरं झाडावर जाऊन बसली. समुद्राकाठची घरं नारळाच्या झावळ्यांनी शाकारली गेली. बाहेरच्या जगाकडे बघण्यासाठी आणि ऊन, वारा व उजेडासाठी घराला खिडक्या आल्या. सुरक्षिततेसाठी दार आलं. नैसर्गिक आपत्तींपासून स्वत:चं संरक्षण करण्यासाठी माणसानं घरं बांधली. शेती करून धान्य पिकवण्याची विद्याही त्यानं आत्मसात केली. त्यामुळे त्याच्या जीवनाला स्थैर्य आलं.

मागे परसू, पुढे अंगण, अंगणात तुळशी-वृंदावन, स्वयंपाकघर-माजघर, घरावर माडी, माडीत दिवाणखाना असे प्रशस्त देहाचे वाडे; राजांचे महाल, फ्रेंच सरदारांचे शातो, इटालियन व्हिला, ऑक्टोबरक्रांतीनंतर ‘स्वायत्तपणा’ हरवून ‘सामायिक’ बनलेली रशियन घरं, मध्यमवर्गीयांचे ब्लॉक्स, चंद्रमौळी कौलारू घरं, एकमेकींना खेटून उभ्या राहणाऱ्या झोपड्या, आधुनिक धनवंतांच्या गगनचुंबी हवेल्या; दुसऱ्या महायुद्धात हॉलंडसारख्या देशात जागेच्या अभावी पाण्यावर वसवण्यात आलेली बोट-हाउसेस् आणि हिटलरी सैतानांपासून बचाव करण्यासाठी भूमिगत झालेल्या ज्यूंनी वसवलेले गुप्त निवारे; हे सारे विभिन्न देशकालपरिस्थितीतले घरांचेच चेहरेमोहरे. नामोच्चाराबरोबर त्यांच्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय अथवा ऐतिहासिक परिस्थितीची स्पंदनं मनाला स्पर्श करतात.

विसाव्या शतकाच्या प्रारंभी एकत्र कुटुंबांची अविभक्त घरं अस्तित्त्वात होती. नंतर कामधंद्यानिमित्त नवशिक्षित पिढीनं आपापला मार्ग सुधारल्यावर अस्तित्त्वात आली, ती छोट्या कुटुंबांची एककेंद्री घरं. शिक्षणाच्या प्रसारानंतर मोठ्या प्रमाणावर स्त्रियाही नोकरी करू लागल्या. तेव्हा घरसंसाराची गरज म्हणून परत आजी-आजोबांना सामावून घेणारी ‘मिनी एकत्र कुटुंबं’ अस्तित्त्वात आली. या सर्व गृहप्रकारांतून समाजातील स्थित्यंतरांचा आणि बदलत्या वास्तवाचा  प्रत्यय येतो.

एकाच काळात पण विभिन्न देशांतही  माणसांच्या गरजांनुसार घरांचं स्वरूप बदलतं. प्रत्येक कुटुंबाचं वेगळं घर; प्रत्येकाची स्वतंत्र खोली; त्यावर तिच्या अभिरूचीचा ठसा; अशा व्यक्तिनिष्ठ घरांच्या देशांतून  भारतात येणाऱ्या ब्रिटिशांना येथील सामूहिक घरांचं नवल वाटे. जगाची सफर करायला निघालेलं बियाट्रिस आणि सिडनी वेब हे ब्रिटिश दांपत्य १९१२ साली कलकत्त्याला भूपेंद्रनाथ बसू यांच्या घरी उतरलं होतं. तीन पिढ्यांतील तीस-चाळीस माणसं एका छपराखाली नांदतात; अधिकाराची शिस्तबद्ध उतरंड तयार होऊन, घरातील कर्त्या पुरुषाचा शब्द हाच इथे कायदा बनतो; हा अनुभव त्यांना चकित करणारा होता. या घरातील मुख्य स्त्रीच्या आदबशीर पण सत्तेची सखोल जाणीव असलेल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बियाट्रिस म्हणते, “Our host’s wife was a woman of singular charm, with the expression of Mother Superior of a Catholic  Convent.”

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माणसाचं माणसाशी जसं जिवाभावाचं नातं असतं तसंच घराशीदेखील असतं. घर या साध्यासुध्या शब्दात आत्यंतिक जिव्हाळा आणि ममत्वाची भावना साठवलेली असते. माणसाच्या मनाचा एक कोपरा घरांच्या रंगीबेरंगी आठवणींनी व्यापलेला असतो. या आठवणींच्या संदुकीत काय साठवलेलं नसतं? काहीही असतं! घरापासून लांब जाऊन घर आठवताना बारीकसारीक तपशीलही पालवतात. कधी मन घराच्या क्लोझपमध्ये जातं आणि भिंतीवर हौशीनं लावलेलं नववर्षाचं कॅलेंडर फडफडतं. मागोमाग फरशांवरची रंगीत नक्षी, रंग उडालेला भिंतीचा एखादा कोपरा, गच्चीतल्या गुलाबाला आलेलं पहिलं फूल अगदी डोळ्यांसमोर दिसतं. न्हाणीघरातून साबणाचा, शिकेकाईचा गंध दरवळतो. घरातले प्रकाश आणि ध्वनी-परिणाम कित्येक वर्षांनंतरही जसेच्या तसे अनुभवता येतात. खिडकीतून येणारी उन्हाची तिरीप, मध्यरात्री चोरपावलांनी घरात येणारं चांदणं, भिंतीवर हलणाऱ्या झाडांच्या सावल्या; घराच्या घंटीचा आवाज, टळटळीत उन्हात आरोळी ठोकणारा, ‘जुन्ना पुराना सामानवाला’ मनात किती खोलवर रुजलेला असतो, हे आपलं आपल्यालाही ठाऊक नसतं. यांपैकी कशाचीही चाहूल लागून मन फ्लॅशबॅकनं भूतकाळात फेकलं जातं.

एमिली डिकिन्सन या अमेरिकन कवयित्रीच्या कवितांत घर ही अशी एक व्यक्ती बनतं, ज्याच्याशी ती मनातलं मोकळेपणी बोलू शकते. आयुष्याची शेवटची पंचवीस वर्षं तर तिनं घराबाहेर पाऊलही टाकलं नव्हतं. “I do not cross my Father’s ground to any house or town.” अशी मर्यादा तिनं  स्वत:ला घातली होती. तिच्या सुखदु:खांत, समाधानात आणि कवितांच्या आनंदात घरच तिची सोबत करायचं. तिच्या कवितांची मोहक फुलपाखरं घराच्या अंगाखांद्यावर बागडत. घराभोवतीच्या बागेत निर्भरपणे हिंडत. तिच्या मनाचे सुंदर बहर आणि त्यामागचं एकाकीपण पाहून घराचे डोळे भरून येत. माणूस आणि घर यांतील नाती ही झाडांच्या केशमुळांसारखी सूक्ष्म, गुंतागुंतीची आणि मनाच्या मातीत खोलवर गेलेली असतात.

एकोणिसाव्या शतकात हिंदुस्तानात आलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या स्त्रियांचे येथील घरांसंबंधीचे अनुभव मोठे मजेदार आहेत. सामायिक कुटुंबांसाठी बांधलेल्या घरांना खाजगीपणा कसा तो नव्हताच. ही ‘समूह-घरं’ ब्रिटिशांना अस्वस्थ करत. त्यात भर म्हणजे गुपचूप पावलांनी वावरणारे, टकामका बघणारे नोकरचाकर. त्यांच्या अनाकलनीय भाषा. तापदायक उन्हाळा आणि सोबतीला साप, पाली, उंदीर, अगडबंब आकाराची झुरळं आणि चावऱ्या डासांच्या टोळ्या. लष्करातील कमांडर-इन-चीफ सर हेन्री फेन आणि त्यांची कन्या इझाबेला यांच्या घरी ६८ नोकर होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा लवाजमा सतत घरात वावरत असे. नोकरांना हाक मारण्यासाठी खोल्यांत घंटा नसत. दाराबाहेर पाय मुडपून हे हरकामे बसलेले असत. हरकामे नेहमी हिंदू असत. मेणबत्त्या आणून देणं, चिठ्यांची नेआण करणं, निरोप पोहोचवणं अशी कामं ते करत. पण अन्नाचं ताट उचलायचं असेल, तर हिंदू त्याला हात लावायचे नाहीत. बिछाना तयार करणारी, झाडलोट करणारी माणसं वेगळी. मात्र बिछान्याजवळ जर टॉयलेटची खुर्ची असेल तर भंगीकाम करणाऱ्याला बोलावलं जाई. या जातिव्यवस्थेच्या नेमनियमांमुळे तत्कालीन ब्रिटिशांच्या घरात माणसं कमी आणि नोकर अधिक, अशी परिस्थिती असे.

पंजाबमधील जेम्स विल्सन या सेटलमेंट अधिकाऱ्याच्या पत्नीसारख्या, म्हणजे अ‍ॅनी विल्सनसारख्या काही अपवादात्मक स्त्रियाच या परदेशी घरांना आणि माणसांना आहे तसं स्वीकारत आणि त्यांच्यावर प्रेमही करत. माणसांसारखाच घरांनाही जीव लावावा लागतो. ज्यांच्यापाशी ही ताकद असते त्यांना परक्या देशातील, अनोळख्या स्वभावाची घरंसुद्धा बघताबघता वश होतात. घराची प्रथमभेट लेडी विल्सनलाही धक्कादायकच होती. ब्रिटिश चर्चसारख्या उंचचउंच खोल्या, मातीच्या जमिनी आणि अंधेरं स्वयंपाकघर पाहून या वास्तूला घर म्हणायला तिचं मन तयार होईना. वास्तूंचंसुद्धा माणसांशी नातं जुळावं लागतं. सहवास घडावा लागतो.

अ‍ॅनीनं ‘फॉरिन हाऊस’शी समजुतीनं घ्यायचं ठरवलं. आपल्या गृहविषयक इंग्रजी कल्पना बाजूला सारल्या. गोडीगुलाबीनं हिंदुस्तानी घराशी संवाद साधायचा प्रयत्न केला.

लेडी विल्सनची घराची कल्पना अतिशय व्यापक होती. घराच्या चार भिंतींत आपलं इंग्रजपण जपणारं ते संकुचित घर नव्हतं.तिच्या घराच्या व्याप्तीत भोवतालचा परिसर, वस्त्या,गावं हे सारं सामावलेलं होतं. घोड्यावर मांड टाकून ती घराबाहेर पडायची आणि अवतीभवतीच्या परिसरात हिंडायची. अनोळखी पौर्वात्य माणसांच्या जीवनव्यवहारांची अपूर्व आणि गूढसंदर लिपी उलगडायचा छंद तिला जडला होता. म्हणूनच परिचयाच्या सुरुवातीला मनात उगवलेल्या स्नेहांकुराचं बघता बघता डेरेदार प्रेमवृक्षात रूपांतर झालं आणि हिंदुस्तानातील घरंच नव्हे तर माणसांची मनंही तिनं आपलीशी केली. मायदेशी परततानाच उलट हिंदुस्तानी घराच्या उंबरठ्यावर तिचा पाय अडखळला. आपलं हे पौर्वात्य घर आता आपल्याला कायमचं दुरावणार याची हुरहूर तिला लागली.

कलकत्ता हे मुळात गंगेकाठचं एक लहानसं गाव. पण ब्रिटिश अमदानीत त्याचं व्यक्तिमत्त्व बदललं. जमीनदारी वाडे आणि टुमदार कौलारू घरांच्या जोडीला उंच मनोरे, चर्चेस्, ब्रिटिश पद्धतीची घरं उभी राहिली. हिंदुस्तानच्या गव्हर्नर जनरलचं वास्तव्य कलकत्त्यात असायचं. त्याचं गव्हर्नमेंट हाऊस एखाद्या राजवाड्याच्या तोलामोलाचं होतं. घराच्या मध्यभागी असलेल्या लांबरुंद पायऱ्या ओलांडल्या की, खांबाखांबांचा द्वारमंडप.माथ्यावरचा सुंदर घुमट खांबांनी तोललेला. मुख्य इमारत आणि गव्हर्नर जनरलचं राहतं घर कमानदार सज्जांनी जोडलेलं.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

१८५७च्या बंडाच्या वेळी गव्हर्नर जनरल असलेला लॉर्ड कॅनिंग याच्या पत्नीच्या, शार्लटच्या स्मृतिकथनातून या घराचं दर्शन घडतं. लेडी शार्लटसाठी स्वतंत्र बैठकीची खोली, खाजगी दिवाणखाना आणि शयनगृह होतं. तिनं मोठ्या हौशीनं घर सजवलं. पडद्यांसाठी पांढऱ्या पार्श्वभूमीवर गुलाबकळ्या व निळे पट्टे असलेलं कापड वापरलं. जागोजाग झाडांच्या कुंड्या ठेवल्या. खोलीत आवडती पुस्तकं मांडली. भिंतींवर तिनं काढलेली पेंटिंग्ज आणि राजघराण्यातील व्यक्तींची छायाचित्रं लावली. चित्रकार स्विंटन यांनं रेखाटलेलं तिचं स्वत:चं लंबगोल पोर्ट्रेटही भिंतीवर होतं. तिच्या बैठकीच्या खोलीला खूप खिडक्या होत्या. त्यातून भोवतालची गर्द झाडी दिसत असे. त्या झाडीत रंगीबेरंगी पक्ष्यांची घरटी होती. गुलाबी कंठांचे हिरवेगार पोपट तर दिवसभर चीत्कारत असतं. या घरानं शार्लटला लळा लावला. भारतातील एका अत्यंत धोकादायक, अस्वस्थ पर्वात ती इथं जगली. तरीसुद्धा या प्रिय घराचा निरोप घेताना तिचं मन गलबललं.

कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आपल्या प्रिय घराचा निरोप घ्यायची वेळ माणसांवर अनेकदा येते. माणसांप्रमाणेच घरांचा विरह देखील सोसेनासा असतो. अर्थार्जनासाठी, शिक्षणासाठी अथवा नोकरीधंद्यानिमित्तही माणसांना घराचा निरोप घ्यावा लागतो. स्वत:च्याच घरात परकी वा उपरी ठरलेली मुलं नशीब काढायला घरातून पळून जातात. दुष्काळ, पूर, भूकंप, वादळ, ढगफुटी यांसारख्या अस्मानी संकटांत, जड अंत:करणानं घराला एकटं ठेवून, स्थलांतर करावं लागतं. काही वेळा तर या संकटांत घरं नामशेष होतात.

पोटापाण्यासाठी खेड्यातला माणूस शहरात येतो, तेव्हा ग्रामीण संस्कृतीपेक्षा पूर्णपणे भिन्न अशा शहरी संस्कृतीत फेकला जातो. त्याच्या जीवनाची गती बदलते. भाषा, वाहनं, जीवनव्यवहार, नातीगोती सारं बदलतं. घड्याळाच्या काट्यांना धरून  धावावं लागतं. ज्या घराच्या खांद्यावर मान टाकून या बदलांशी जुळवून घ्यावं ते घरसुद्धा शहरी संस्कृतीतलं असतं. ते परकं वाटतं. झाडांत लपलेल्या ‘खेड्यामधले घर कौलारू’चं रूपांतर महानगरीत जणू जादूनं, दहा बाय बाराच्या खोलीत किंवा वन रूम कीचनच्या ब्लॉकमध्ये झालेलं असतं. खेड्यात परतायचा मार्ग बहुधा बंद झालेला असल्यानं, समजूतदारपणे हेच घर गोड मानून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. अशा वेळी आयुष्यातून निघून गेलेलं, जुनं घर हे हरवलेलं पण हवंहवंसं स्वप्न बनतं.

मनातलं सुंदर घर आयुष्याच्या उत्तरार्धात बांधायचं; त्यासाठी आत्तापासून शिल्लक टाकायची आणि शहरातील नकोशा गती-गर्दीपासून दूर जायचं, असं एक नवंच स्वप्न मनाला खुणावू लागतं. ते अनेकदा स्वप्नच राहतं. प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांच्या ‘गृहप्रवेश’ या चित्रपटामधलं अमर-मानसी हे जोडपं अशाच स्वप्नातील घरासाठी, जीवनातील सुखं आणि छोटेछोटे आनंद नाकारतात. काटकसरीनं पै-पैसा जमवू लागतात.या चित्रपटाविषयी बोलताना बासूदा एकदा म्हणाले, “या अमर मानसीला हे कळत नाही की, निघून गेलेले तरुण दिवस परतणार नसतात. जमवलेली पुंजी आणि घराची वाढत गेलेली किंमत यांचा मेळ कधीच बसणार नसतो. मात्र चित्रपटाच्या शेवटी जुन्या लहान घरातूनच मोकळ्या मनाचं घर मानसी प्रयत्नपूर्वक उभारते, कारण तिला उमजतं- ‘मकान खरीदा जा सकता हैं, लेकिन घर बनाना पडता हैं।”

विशिष्ट राजकीय परिस्थिती, सामाजिक प्रक्षोभ, हिंसाचाराचं थैमान यांमुळेही माणसांची आणि घरांची ताटातूट होते. कधी कधी तर अगदी कायमची. अशा वेळी  ते घर, तो परिसर, तेथील जीवन स्वप्नवत् बनून जातं. मानवी इतिहासात अशी हिंसक भयपर्वं अनेकदा आली आणि निरपराध लोकांना घरादाराचा त्याग करून पलायन करावं लागलं. विशिष्ट धर्माच्या वा वंशाच्या माणसांचा विच्छेद करण्यात आला. माणसांबरोबरच त्यांची भाषा, प्रथा, परंपरा, संस्कृती, त्यांची घरं नामशेष झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या नाझी सैतानांनी ज्यू धर्मीयांच्या कत्तली करायला, त्यांचा अनन्वित छळ करायला सुरुवात केली. जर्मनीतून पळ काढण्यावाचून ज्यूंच्या पुढे पर्यायच नव्हता. जिथे जिथे हिटलर पोहोचला, त्या त्या देशातूनही त्यांना परागंदा व्हावं लागलं. ज्यांना हे जमलं नाही, ते भूमिगत तरी झाले अथवा छळछावण्यांत नामशेष  झाले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्यू मंडळींनी आपल्या हरवलेल्या घरांसंबंधी बरंच काही लिहून ठेवलं आहे. त्यांपैकीच एक म्हणजे जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या घराची कथा. त्यालाही आपल्या घराचा चिरविरह सोसावा लागला. बर्लिनमध्ये प्रशियन अकादमीत पदार्थविज्ञानाचा प्राध्यापक म्हणून तो काम करायचा. होती नव्हती तेवढी पुंजी पणाला लावून त्यानं कापूथ गावी, खास संशोधन-चिंतनासाठी म्हणून एक छोटंसं घर बांधलं. या अभ्यासगृहाचा उल्लेख तो ‘माझं नंदनवन’ म्हणून करायचा. त्याचं मौलिक संशोधन, त्याच्या मनातील बौद्धिक वादळं, त्यानं घेतलेला विश्वरहस्याचा शोध यांना साक्षी असलेलं घर आजही आईनस्टाईनच्या मागे उरलं आहे. आता त्याचं घरपण हरवलं आहे. एकीकडून ते वस्तुसंग्रहालय आहे; तर दुसरीकडून ती वारसदारांच्या वादात सापडलेली वास्तू आहे.

याच घरात आईनस्टाईनला भेटायला त्याचे शास्त्रज्ञ मित्र येतं. त्यांच्या चर्चांतून नवविज्ञानाची भूमी नांगरली जाई. ते होते ज्ञानमार्गावरचे झपाटलेले, वेडे प्रवासी. बौद्धिक दमणूक झाली की, मन सैलावण्यासाठी त्यांना बरोबर घेऊन आईनस्टाईन घराजवळच्या पाईनच्या जंगलात जायचा. तल्लीनपणे व्हॉयलीन वाजवायचा. मोझार्टच्या सोनाटानं त्याला भुरळ घातली होती. हिटलरपर्वाची झळ लागण्यापूर्वीच आईनस्टाईनला भविष्याची चाहूल लागली. तो अमेरिकेत स्थलांतरित झाला. मात्र त्याच्या या लाडक्या घराला तो कधी विसरू शकला नाही. पाईनच्या रानाचा गंध त्याला आठवणींतही वेडावून टाकायचा. छोट्याशा कापूथ गावचा आईन्स्टाईन संपूर्ण जगाचा झाला. मागे एकटं राहिलं ते त्याच्या बौद्धिक वैभवाचं साक्षीदार असलेलं त्याचं घर!

प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते, गायक, लेखक यांच्या घरांविषयी माणसांना कुतूहल असतं. घर पिढीजात असो, भाड्याचं असो अथवा स्वत: हौशीनं बांधलेलं असो, लेखक या घरात आपल्या लेखनासाठी एक छोटंसं बेट तयार करतो. तिथं रमून जातो. त्याचं घर त्याच्या तंद्रीला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतं. घर लेखकाच्या मनाचे रंग धारण करतं. लेखकाला स्फूर्ती देतं आणि त्याच्या कथाकवितांतही स्थान मिळवतं. घर नावाचं माणूस लेखकाच्या मनात आणि शब्दांतही कसं घर करून राहतं हे इथं बघायला मिळतं.

विंदा करंदीकर म्हणतात, “आमच्या घरातही माझे एक घर आहे… माझ्या घरात तुला शिरायचे असेल तर तीन वाटा आहेत. एक वाट माझ्या लघुनिबंधांतून शिरते, एक माझ्या कवितांमधून शिरते आणि एक वाट जिन्यावरून पुढच्या दारानं येणारी आहे.” घर जुनं झालं, माणसांना राहण्यासाठी धोकादायक झालं, तर घर पाडावं लागतं. आपलं प्रिय घर कायमचं जमीनदोस्त होताना पाहणं अत्यंत यातना देणारं असतं. ते घाव केवळ घराच्या देहावर पडत नाहीत तर माणसांच्या मनावरही पडतात.

घर आपलं जिवलग बनतं म्हणूनच प्रिय व्यक्तीसारखी घराचीही आस लागते. घर डोळ्यांना कधी दिसतंय असं होतं. घराच्या भिंती दमल्याभागल्या माणसांना त्यांच्या गुणावगुणांसकट पोटाशी घेतात. घर हे केवळ ऊब देणारं, सुखकर विश्रांतिस्थान नसतं. घरांना माणसांसाठी आणि माणसांना घरासाठी खूप काही सोसावं लागतं. घरातल्या माणसांत बेबनाव झाला; घर दुभंगायची वेळ आली, तर घरावरही शोककळा येते. ते पोरकं दिसू लागतं. माणसांना अशा वेळी समंजसपणे घर सावरावं लागतं. ज्या घरांचा पाया मजबूत असतो; खांबांचा कणा ताठ असतो; भिंतींपाशी सोसायची ताकद असते; तीच घरं उन्मळून पडतापडतासुद्धा स्वत:ला सावरू शकतात.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

समाजाचा विरोध पचवूनही कणखरपणे आपलं अस्तित्त्व टिकवून धरायची वेळ काही वेळा घरांवर येते. या संघर्षाचा परिणाम, जीवनाची नवी वाट चोखाळणाऱ्या घरांवर होत असतो. समाजाचा विरोध कधी इतका उग्र बनतो की, प्रगतिपथावरच्या सुजाण घरांचं मोल न समजल्यामुळे त्यांना वाळीत टाकलं जातं. माणसं बहिष्कृत होतात. त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही असा अलिखित दंडक समाजपुरुष घालून देतो. जे समाजसुधारक समाजाच्या विरोधाची पर्वा न करता, रूढी-परंपरेच्या जोखडातून माणसांना मुक्त करू पाहतात; विरोध करणाऱ्या समाजाच्याच उन्नतीसाठी झगडतात, त्यांचं मोल बरेचदा ओळखलं जात नाही. म्हणूनच त्यांची घरं एकटी पडतात. न केलेल्या अपराधाची शिक्षा त्यांना भोगावी लागते.

मग ते घर संत ज्ञानेश्वरांचं असो वा गोपाळ गणेश आगरकरांचं! मात्र विचारनिष्ठेच्या खांबांनी अशा घरांची छपरं तोलून धरलेली असतात. खिडक्या असतात त्या स्वत:त मिटून बसण्यासाठी नव्हे; तर उघड्या डोळ्यांनी जगाकडे आणि जीवनाकडे पाहाण्यासाठी. घरापुढे आकाशाचं विशाल अंगण असतं. दूरची क्षितिजं डोळ्यांना खुणावत असतात. कोणत्याही काळात अशी घरं अत्यल्पच असतात. पण अशा चिंतनशील घरांच्या उन्नत नजरेसमोर भविष्यकाळातील सूर्योदय असतो; म्हणूनच त्या प्रगल्भ घरांच्या खांद्यावर ‘उद्याची घरं’ उभी राहू शकतात.             

‘सोयरीक घराशी’ - अंजली कीर्तने

मनोविकास प्रकाशन, पुणे, मूल्य - ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......