प्रसिद्ध शास्त्रीय गायक सत्यशील देशपांडे यांचं ‘गान गुणगान : एक सांगीतिक यात्रा’ हे पुस्तक नुकतंच राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
अगदी लहानपणी वडलांनी माझ्यावर केलेले संगीताचे संस्कार हे जयपूर घराण्याच्या मोकळ्या आवाजाचे होते. आज असं लक्षात येतं की, त्या आवाजात जिव्हाळा नव्हता. त्यामुळे त्याचा लळा लागण्याच्या प्रश्नच उद्भवत नव्हता. या पुस्तकात ख्यालातल्या धुनेची जी थोरवी मी वर्णन केली आहे, ती आपल्या गुणगुणण्यानं माझ्यात उतरवली माझ्या आईनं. तिचा गळा गोड होता. भाषेची गोडीही तिनंच मला लावली. ती कविताही करत असे. अनेक सुंदर कविता व लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृतिचित्रे’ तिला पाठ होतं. तिनं विवाहोत्तर बी.ए. ही केलं होतं. ती सातारच्या जोशी कुटुंबातली. एके काळी सातारमधून निघणाऱ्या ‘ऐक्य’ या वृत्तपत्राची मालकी या कुटुंबाकडं होती. माझे मामा सदुभाऊ जोशी वकील असून रेडिओवर गातही असत. कलाकारांनी व नातेवाइकांनी कलंडणारा माझ्या वडलांच्या संसाराचा गाडा तिनं मोठ्या शिताफीनं कोणाचाही तोल जाऊ न देता ओढला. वडील आर्थिक हलाखीतून वर आलेले होते आणि त्यांच्या सर्वच भावंडांसाठी अन् अनेक कलाकारांसाठी आधारवड होते. तिनं या आधारवडाच्या सर्वच पारंब्यांना माया दिली. संसारात तिला काही चिंता सतावत असत.
माझ्या सर्वांत मोठ्या भावाचं नाव ‘सुरेश’ ठेवलं गेलं, कारण वामनराव तेव्हा सुरेशबाबू मान्यांच्या गाण्यानं भारावून गेले होते. माझ्या मधल्या भावाच्या वेळी ती गरोदर असताना वामनराव अल्लादियाखांचे भाचे नत्थनखाँकडं शिकत होते. तेव्हा जर मुलगा झाला, तर त्याला ‘नत्थन’ असं नाव देतील की काय, ही तिची प्रमुख चिंता होती.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
नत्थनखाँची माझ्या वडलांना जी तालीम असे, ती जयपूर घराण्याला अभिप्रेत असलेल्या आवर्तनांच्या व्यवस्थित मांडणीची असे. त्यात एखादाही अनावश्यक सूर लागला, तर तो तिथं खपवून घेतला जात नसे. पण असे हे खाँसाहेब शिकवायला आले की, माझ्या आईनं व्यवस्थित लावलेल्या खोलीची मांडणी बिघवडून टाकायचे. फ्लॉवरपॉट ठेवलेलं टेबल कोपऱ्यात जाई, पलंगाची जागा बदलून त्या जागी सतरंजी टाकली जाई व खुर्ची हटवून तिथं तबलजीची बैठक मांडली जाई. नत्थनखाँची तालीम म्हणजे, दोन-चार व्यवस्थित मांडलेल्या आवर्तनांची स्वरवलयं ते वामनरावांना ऐकवीत. मग वामनराव त्यांनी सांगितल्याप्रमाणं त्या आवर्तनाची आवृत्ती करत, तेव्हा ते विडी पेटवून काही धूम्रवलयं वातावरणात सोडत. मग पुन्हा स्वतः गाऊन दाखवायची वेळ आली की, बसलेला गालिचा वर उचलून त्याच्याखाली राख झटकून, उर्वरित विडी पुढच्या खेपेसाठी विझवून ठेवत असत.
एकदा आईनं चिडून हडकुळ्या नत्थनखाँची समग्र रक्षा ज्याच्यात सामावेल, एवढं मोठं रक्षापात्र त्यांच्यासमोर विडीची राख झटकण्याकरता ठेवलं, तरी नत्थनखाँनी सवयीनं पुढच्या खेपेस गालिचा वर उचलून विडी त्याच्या खालीच झटकली अन् काही वेळानं पुन्हा पेटवली.
तिच्या दृष्टीनं नत्थनखाँचा एक अपराध तर केवळ अक्षम्य होता. एकदा खोलीला नवा रंग लावण्यात आला होता आणि कदाचित शिकवणीमध्ये रंग भरत नसेल, म्हणून की काय कोण जाणे, तान फेकावी तशी बसल्या जागेवरून नत्थनखाँनी तोंडात रंगलेल्या पानाची पिचकारी कोपऱ्यात फेकली.
एकूण आईचा जयपूर घराण्यावर राग होताच. ती म्हणायची की, “हे सुरेशबाबूंच्याकडं शिकत असताना संध्याकाळी गायला बसले की, ते गाणं कसं गोड वाटायचं. नत्थनखांनी मात्र ह्यांना ‘आवाज खुली लगाओ’ म्हणत म्हणत सोसायटीच्या वॉचमनसारखं ओरडायला लावलं!” ज्या गाण्यात गोडवा नाही, त्या गाण्याचं आकारसौंदर्य आणि मांडणी चुलीत घालायची का, असं तिला वाटे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
या विषयावर माझ्या आई-वडलांच्या छोट्या-मोठ्या कुरबुरी कायम चालायच्या. वामनरावांच्या नव्या बदललेल्या आवाजाचं खापर ती गोविंदराव टेंब्यांच्यावर फोडायची, कारण त्यांनी वामनरावांना जयपूर घराण्याची आवड लावली होती. गोविंदराव टेंब्यांचं आमच्या घरी इतकं दीर्घ वास्तव्य असे की, ते क्वचितच स्वतःच्या घरी पाहुणा आल्यासारखे जात.
आई आपल्या सासऱ्यांच्या म्हणजेच माझ्या आजोबांच्या प्रेमळ स्वभावाचं खूप वर्णन करे. आणि नवऱ्यानं आपल्या उरावर हा विकतचा सासरा म्हणजे गोविंदराव टेंब्यांना आणून बसवल्याबद्दल ती आपल्या नशिबाला आणि त्यांना दोष देई. तिला पाहुण्यांचा तिटकारा नव्हता. हिराबाई बडोदेकर घरी राहायला आल्या की, तिला मोठी बहीण घरी आल्यासारखं वाटे. ती त्यांना माहेरी आल्यासारखी वागवे.
आज मला तटस्थपणानं बघताना असं वाटतं की, एकतर तो वामनरावांच्या व्यावसायिक आणि सांगीतिक संघर्षाचा काळ होता. संगीतातील घराण्यांच्या गानप्रपंचाची विवंचना वामनरावांना एवढी असे की, आपल्या घर-संसाराची आणि आपल्या पत्नीच्या कलागुणांची मानसिक जोपासना त्या प्रमाणात त्यांच्याकडून झाली नाही. अन्न, वस्त्र, निवारा त्यांनी नक्कीच दिला; पण तिच्या एकटेपणाच्या दुःखावर फुंकर मारायला त्यांना उसंत मिळत नसे. तिलाही त्याची सवय झालेली होती. म्हणूनच मी जेव्हा गाऊ लागलो, तेव्हा ती भाबडेपणानं मला सांगायची की, “ह्यांच्यासारखा तू इतरांच्या गाण्याचा विचार करू नकोस. तू स्वतःच्या गाण्याचा विचार कर.”
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
१९७५ साली वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी अकाली मृत्यू पावलेल्या माझ्या मनोहर या भावाचे स्मरण करणे माझ्या सांगीतिक वाटचालीत अनिवार्य आहे. तो आर्किटेक्ट असून सुशिक्षित तबलावादक होता. तो आमच्याकडे येणाऱ्या सर्व प्रथितयश कलाकारांचा लाडका रसिक श्रोता व संगतकार होता. तो माझी तबलासंगत करे, मला प्रोत्साहन देई. वेगवेगळ्या कलाकारांच्या मैफिलींना तो मला घेऊन जाई. माझी संगीतविषयक आवड आणि जाण चौफेर व विस्तृत करण्यात त्याचा महत्त्वाचा वाटा होता.
माझी धर्मपत्नी उषा ही माझ्यापेक्षा कैकपटीनं सधन असलेल्या मारवाडी कुटुंबातली आहे. भारतातल्या सर्वांत जुन्या असलेल्या तीन प्रकाशनांपैकी एक असलेल्या ‘व्यंकटेश्वर प्रेस’चा वारसा तिला मिळाला आहे. ‘तुलसीरामायण’, ‘सूरसागर’, ‘शतपथ ब्राह्मण’, ‘अठरा पुराणं’ अशा जवळजवळ दोन हजार हिंदी व संस्कृत भाषेतील प्रकाशनं गाठीशी असणारं हे प्रकाशनगृह आहे. राजस्थानी लोकधुनांचं औचित्य, त्या मागचे रीतिरिवाज, सामाजिक पार्श्वभूमी आणि मर्म सांगणारे, व सोबत तिनं गायलेल्या लोकगीतांच्या ध्वनिमुद्रणासकटचं तिचं ‘मरुभूमि में गुंजे गीत’ पुस्तक नुकतंच प्रसिद्ध झालं आहे. ख्यालातल्या धुनेसारखीच माझ्या संसारात तिची साथ आहे.
माझ्या या पुस्तकाचं हिंदी भाषांतर करण्याचा विडा तिनं उचलला आहे.
‘उम्र ए दराज़ से मांग के लाये थे चार दिन
दो आरजू में कट गए, दो इंतज़ार में’
तद्वत आमचं सध्याचं सहजीवन अर्धं लिहिलेले समजून देण्या-घेण्यात व अर्धं त्याच्या अनुवादात व्यतीत होत आहे. वादविवादांपेक्षा हे नक्कीच बरं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
इथं हृदयनाथ मंगेशकरांच्या आणि माझ्या चाळीस-पंचेचाळीस वर्षांच्या नातेसंबंधांवर लिहायलाच हवं. या आमच्या नातेसंबंधात त्यांनी मला जेवढं स्वत:चं गाणं ऐकवलं आहे, त्यापेक्षा जास्त माझं गाणं त्यांनी ऐकलं आहे. माझ्या स्वत:च्या आणि मी गोळा केलेल्या बंदिशींमध्ये नेहमीच औत्सुक्य दाखवलं आहे. दिलफेक दाद दिली आहे. प्रतिक्रिया म्हणून स्वतःच्या खजिन्यातल्या दुर्मीळ बंदिशी ऐकवल्या आहेत. यात त्यांच्या गानलुब्ध स्वभावाचा जेवढा भाग आहे; तेवढाच गायकाला उत्तेजन देऊन, गातं करून, त्याच्यातल्या उत्तमाला वाट करून देणारं त्यांच्यातलं संगीतदिग्दर्शकाचं कसबही आहे. गायकीच्या घुघटाआड दडलेल्या एखाद्या बंदिशीच्या अस्सल सौंदर्याचा पट त्यांना ऐकवत आहे, ते ऐकत आहेत, म्हणूनच माझ्याकडून अलवार उलगडले गेले आहेत. त्यांच्या दाद देण्यातून, त्यांच्या आवडीनिवडीतून त्यांची सौंदर्यदृष्टी मला समजून घेता आली आहे आणि एक प्रकारची मायेची ऊबही मला मिळाली आहे.
पण या चाळीस वर्षांपूर्वी स्वत:लाच आपली कलात्मक ओळख न झालेल्या माझ्यासारख्या गायकाच्या सांगीतिक पिंडाची दखल घेणारं त्यांचं ममत्व आणि रसिकताच यातून जाणवेल.
इथं हे सांगायला हवं की, गायक आणि श्रोता म्हणून माझ्या हिश्शात आलेल्या हृदयनाथांचे मला जाणवणारे स्पंद हे दोन तंबोऱ्यांत बसून गाणाऱ्या चौमुखी गवयाचे आहेत. हृदयनाथांचं सुगम संगीत कोणाला आवडो किंवा नावडो… पाश्चिमात्य संगीतातल्या chordsची ‘पहेली’ त्यांच्या रचनांची कधी ‘सहेली’ झाल्याचं जाणवतं. ‘harmony’तील मूलतत्त्वांची त्यांनी आपल्या अंगानं उपज केली आणि या अभिनव स्वरमेळांचं समर्पक कलम आपल्या चालीत रुजवलं. नवे काव्यप्रवाह संगीतात आणले आणि एक ताजेपणाही. हे खरं असलं, तरी संगीतातल्या ‘गाण्या’शी, त्यातल्या धुनेशी, चिकटलेली त्यांची नाळ अजून अतूट आहे, असंच मला वाटत आलं आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मंगेशकर कुटुंबाशी जुळलेली माझी एक महत्त्वाची आठवण म्हणजे, २००५ साली त्यांच्याच मा. दिनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठाननं प्रकाशित केलेला माझ्या स्वरचित आणि माझ्या साठ्यात असलेल्या पारंपरिक बंदिशींचा संच. त्यामागं एक भूमिका होती. ती अशी की, सहसा मंचावरून एका रागात विलंबित व त्या पाठोपाठ द्रुत ख्याल गाण्याची पद्धत आता इतकी रूढ झाली आहे की, त्यामुळे गायकांच्या ठेव्यात असलेल्या अनेक अनोख्या महत्त्वाच्या बंदिशींपासून रसिकवृंद वंचित राहतो. या बहुतेक मध्य-द्रुत लयीतल्या बंदिशी रागाच्या वेगवेगळ्या profiles सामावून असतात व चढत्या क्रमानं रागाची बढत करण्याच्या रूढ पद्धतीमध्ये बसत नाहीत. अशा बंदिशी, त्यांच्यात दडलेल्या निराळ्या रागरूपाची, त्यांच्या विशिष्ट ‘कहन’ची जोपासना करत मांडाव्यात, अशा भूमिकेतून ‘कहन’ याच नावानं हा संच आम्ही प्रकाशित केला. ‘कहन’चं ध्वनिमुद्रण होत असताना हृदयनाथ उपस्थित असत व खुद्द लतादीदीसुद्धा तासन्तास तिथं बसून ध्वनिमुद्रण ऐकत, मला प्रोत्साहन व आशीर्वाद देत. लतादीदींनी आपणहून या संचात आपलं मनोगत म्हणून ही भूमिका बोलून दाखवली आहे, ती अशी -
“हमारे विशाल देश की सांस्कृतिक विविधताएँ, अलग अलग प्रकार की गायकी को सदियों से निर्माण करती आ रही हैं। हर गायक का बंदिश कहने का एक अलग तरीका होता है, और इस वजह से संगीत परंपरा बहुत संपन्न बनी हैं। राग, ताल की शुद्धता को निभाते हुए प्रतिभाशाली कलाकार बंदिश गाते हुए अपनी संवेदनाओं की खूबसूरती के साथ अदायगी करता हैं। अपनी बात कहता हैं। यही वजह हैं कि, एक बंदिश गौड़ मल्हार की होती हैं, लेकिन गौड़ मल्हार का संपूर्ण रूप एक बंदिश में समा नहीं पाता। कुछ समा बचा ही रहता हैं। सत्यशीलजी ने गुरुजनों से, गुणीजनों से बहुत बंदिशें सुनी हैं। उनकी कहन में बसी गीत-संगीत की सुंदरता अनुभव की हैं। इन सब से प्रेरित होकर सत्यशीलजी ने इस भाग कुछ बंदिशें पेश की हैं। मास्टर दीनानाथ स्मृति प्रतिष्ठान, सहर्ष प्रस्तुत कर रहा हैं ‘कहन’.”
दीदींचं हे भाष्य व या सर्व बंदिशी यूट्यूबवर उपलब्ध आहेत. या संचाचं विमोचन लतादीदींच्याच हस्ते मा. दीनानाथ मंगेशकर पुण्यतिथीच्या जाहीर समारोहात झाले. याच्यापेक्षा अधिक मोठा पुरस्कार मला मिळूच शकत नाही. या पुरस्काराला शोभेल अशा लायकीचं काम माझ्या हातून होत राहावं, अशी प्रामाणिक इच्छा आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
कलाकाराला कलेसाठी पोषक न समजलं जाणारं आर्थिक स्थैर्य आहे आणि ते चिरंतन आहे, असा गैरसमज मी जोपासून आहे. माझ्या कलेआड माझं ऐहिक स्थैर्य येतं की, त्या स्थैर्याआड कला येते, हे मला अजून उमगलेलं नाही. कलाकाराच्या घडणीसाठी आवश्यक समजले जाणारे कटू अनुभव नाहीत, कुठलं दुःख नाही, याची खंत वाटावी; तर तसंही काही होत नाही आहे. पण सूर अजून चांगला लागायला हवा, बंदिशी अजून चांगल्या उलगडायला हव्यात, या विवंचनेत मी सतत असतो.
रोज सकाळी काल केलेल्या, झालेल्या चुकांसाठीचं प्रायश्चित्त नव्यानं घेण्याचा, त्यासाठी तौबा करण्याचा उत्साहही माझ्याकडं आहे. वरवर सर्व काही आलबेल आहे, पण आतून घालमेल आहे.
‘गान गुणगान : एक सांगीतिक यात्रा’ – सत्यशील देशपांडे
राजहंस प्रकाशन, पुणे, मूल्य – ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment