जगभरातील जवळपास २३ देशांच्या शालेय शिक्षणपद्धतीविषयीचे आणि ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या ज्ञानशाखेतले मराठीतले बहुधा पहिलेच अनुभवसंपन्न करणारे पुस्तक
ग्रंथनामा - झलक
धनवंती हर्डीकर, अजित तिजोरे आणि डॉ. माधव सूर्यवंशी
  • ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 06 December 2022
  • ग्रंथनामा झलक देशोदेशीचे शालेय शिक्षण Deshodeshiche Shaley Shikshan वसंत काळपांडे Vasant Kalpande धनवंती हर्डीकर Dhanvanti Hardikar शिक्षण Education शालेय शिक्षण School education शिक्षणपद्धती Education system

करोनाकाळात यशवंतराव चव्हाण सेंटरने ‘शिक्षण विकास मंच’तर्फे ऑनलाईन झूम मिटिंगचा वापर करत ‘करोळाकाळात शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्या बदलत्या भूमिका’, ‘इलेक्ट्रॉनिक माध्यम संवादाचा भाषा अध्यापनात वापर’, ‘वर्गाध्यापन ते ऑनलाईन अध्यापन’, ‘शंभर दिवसांत दहावीची तयारी’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अशा अनेक विषयांवर व्याख्याने आणि चर्चासत्रे आयोजित केली. ‘देशोदेशीच्या शिक्षणपद्धती’ ही व्याख्यानमाला त्यापैकीच एक. या व्याख्यानमालेला मोठा प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे त्या त्या देशांतील नागरिकांनीही त्याचा लाभ घेतला. यात १० डिसेंबर २०२० ते १० एप्रिल २०२२ या साधारण चार-पाच महिन्यांच्या काळात १६ व्याख्याने झाली. त्यात अधिक लेखांची, माहितीची, संदर्भांची भर घालून ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे पुस्तक नुकतेच यशवंतराव चव्हाण सेंटर व डिजिटिकल वर्क्स एलएलपी यांच्यातर्फे प्रकाशित करण्यात आले आहे. ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या ज्ञानशाखेतले मराठीतले बहुधा हे पहिलेच पुस्तक असावे. या पुस्तकात भारतासह जगातील जवळपास २३ देशांच्या शालेय शिक्षणपद्धतीविषयीच्या लेखांचा समावेश आहे. डॉ. वसंत काळपांडे यांची मूळ संकल्पना व मार्गदर्शन असलेल्या या पुस्तकाचे संपादन धनवंती हर्डीकर, अजित तिजोरे आणि डॉ. माधव सूर्यवंशी यांनी केले आहे. या संपादक मंडळाचे हे मनोगत…

.................................................................................................................................................................

‘देशोदेशीच्या शिक्षणपद्धती’ या सुमारे चार महिने चालू असलेल्या साप्ताहिक व्याख्यानमालेला पुस्तकाचे स्वरूप दयायचे ठरले, तेव्हा या प्रस्तावित पुस्तकातील लेखांची सगळी सामग्री तर तयारच आहे, त्यामुळे पुस्तक तयार होण्यास फारसा वेळ लागणार नाही, असे वाटत होते, पण प्रत्यक्षात मात्र या ‘स्पीच टू टेक्स्ट’ प्रवासाला बराच वेळ लागला. त्यामध्ये सगळ्यांत जमेची बाजू होती, ती म्हणजे व्याख्यात्यांनी दिलेले सहकार्य. व्याख्यानांचे लेखांत रूपांतर करण्याच्या कल्पनेचे सर्वांनी स्वागतच केले. एखादा अपवाद वगळता सर्वांनीच आपले व्याख्यान लिखित स्वरूपात तत्परतेने पाठवून दिले. इतकेच नाही, तर त्याबाबत संपादक मंडळाने केलेल्या सूचना स्वीकारून वेळोवेळी स्वतः बदल करून दिले आणि पुढील संपादकीय संस्कारांना हरकत घेतली नाही. त्यांनी आनंदाने देऊ केलेल्या सहकार्याशिवाय हे पुस्तक आकार घेऊ शकले नसते.

बरेचसे लेख हाती आल्यानंतर प्रस्तावित पुस्तकाचे साधारण स्वरूप कसे असेल, त्याचा अंदाज येऊ लागला. व्याख्यानमाला तसे म्हटले तर अनौपचारिक होती. परदेशात स्थायिक झालेल्या, तिथे काही काळ वास्तव्य केलेल्या, भेट दिलेल्या भारतीय व्यक्ती तेथील शिक्षणव्यवस्थेबाबतची माहिती आणि मुख्यतः आपले अनुभव, निरीक्षणे, ‘शिक्षण विकास मंच’ या शिक्षणप्रेमी मंडळींच्या व्यासपीठावर मांडतील आणि त्यानंतर त्या संदर्भात प्रश्नोत्तरे होतील, असे या ऑनलाईन कार्यक्रमांचे स्वरूप होते. बहुतेक सर्व व्याख्यात्यांनी त्यासाठी ‘पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन’चा आधार घेऊन त्यामध्ये अतिशय माहितीपूर्ण तक्ते, आलेख, काही फोटो अशा दृश्य साधनांचा वापर केला होता. फोटोंसह केलेल्या निवेदनामुळे त्या त्या देशाचे एक जिवंत चित्र उभे राहत असे. शिक्षणपद्धतीचा विचार स्वतःच्या अनुभवांच्या संदर्भात मांडल्याने त्याला आपोआपच एक भारतीय बैठक मिळाली होती, तसेच त्यात सहजताही होती. व्याख्यात्यांची पार्श्वभूमी खूपच वेगवेगळी होती...

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यात शिक्षणसंशोधक, अभ्यासक, शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव असणारे शिक्षक होते, तसेच शिक्षणाशी मुख्यतः पालक या नात्याने जोडले गेलेले इंजिनियर, बँकर, कायदेशीर सल्लागार, चार्टर्ड अकाउंटंट असे आई-वडील, आजोबाही होते. त्यांचे अनुभवकथन एकसारखे असणे शक्य नव्हते. पण सर्वच व्याख्यानांमध्ये असणारा एक समान धागा म्हणजे शालेय शिक्षणावर दिलेला भर. ‘शिक्षण विकास मंच’ या व्यासपीठाचे कार्यक्षेत्र लक्षात घेतल्यामुळे बहुतेक सादरीकरणे शालेय स्तराबाबतची होती. त्यामुळे ‘देशोदेशीच्या शिक्षणपद्धती’ या ऐवजी ‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ हे नाव पुस्तकाला द्यावे, असे ठरले.

प्रत्येक लेखाचा विचार करता, सुरुवातीला त्या देशाची थोडक्यात माहिती द्यावी आणि नंतर शिक्षणविषयक चर्चा घ्यावी, अशी रचना नैसर्गिकपणे डोळ्यासमोर आली. त्या त्या देशातील भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय घटकांचा परिणाम होऊनच तेथील शालेय शिक्षण आकाराला येते, हे व्याख्यानांमध्ये पुरेसे स्पष्ट होत होते. पण हा ढोबळ आराखडा असला तरी सर्व लेख एका साच्यात बसवता येणार नाहीत, हेही दिसू लागले. प्रत्येक व्याख्यानाची आणि व्याख्यात्याची एक विशिष्ट शैली होती. एका साच्याचे लेख तयार व्हावे, असा आग्रह धरल्यास त्यात खूप कृत्रिमता येईल, म्हणून तो आग्रह संपादक मंडळाने धरला नाही. त्यामुळे या पुस्तकात अभ्यासपूर्ण मांडणी करणारे लेख आहेत, तसेच डोळस अनुभवकथन, मुलाखतींचे शब्दांकन अशा अनौपचारिक धाटणीचेही लेख आहेत.

वस्तुनिष्ठ माहिती आणि आकडेवारीच्या अभ्यासातून शिक्षणव्यवस्था किती न्याय्य, प्रगतिशील, यशस्वी आहे, तिची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, व्हायला हवी आहे, शैक्षणिक समस्यांची मुळे आर्थिक, सामाजिक, भौतिक, राजकीय अशा कोणत्या स्वरूपाची आहेत आणि एकमेकांत कशी गुंतली आहेत, ते स्पष्ट होते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्यातून ही माहिती देऊन त्याचा अन्वयार्थ स्पष्ट करणारे लेख या पुस्तकात आहेत. वर्तमानातील आणि भविष्यातील प्रश्नांचे विवेचन करणाऱ्या अभ्यासपूर्ण लेखांमुळे हे पुस्तक समृद्ध झाले आहे. त्याचबरोबर येथे विद्यार्थ्यांच्या किंवा आपल्या पाल्यांच्या संदर्भात अगदी व्यक्तिगत स्तरावरील निरीक्षणे नोंदवणारे लेखही आहेत. वस्तुनिष्ठ माहिती आणि आकडेवारीतून जे कळत नाही, ते कधी कधी आपल्या जवळच्या व्यक्तीबद्दलचे आस्थेने, आपुलकीने व्यक्त केलेले विचार ऐकताना, वाचताना उमजते. मन, विचार, वृत्ती यांची जडणघडण करणाऱ्या ‘शिक्षण’ या विषयाच्या संदर्भात तर ते आणखीच खरे आहे. या व्यक्तिगत अनुभवांच्या नोंदींमुळे पुस्तकाला मानवी संवेदनांचे अधिक स्पष्ट परिमाण मिळाले आहे.

या पुस्तकातील लेख संमिश्र स्वरूपाचे आहेत. त्यामुळे त्यातील भाषेवरदेखील फार ‘संपादकीय संस्कार’ करून ‘फक्त शुद्ध मराठी’चा आग्रह धरायचा नाही, असेही संपादक मंडळाने ठरवले. शालेय शिक्षणाचे वेगवेगळे स्तर, विषय, अध्ययन-अध्यापन तंत्रे या सगळ्यांना वेगवेगळ्या देशांत थोडी वेगळी नावे आहेत. एकाच ठिकाणी अनौपचारिक आणि औपचारिक संदर्भात वेगवेगळ्या संज्ञा वापरल्या जातात, असेही दिसते. त्या सर्व संज्ञांचे मराठीकरण करणे थोडे गोंधळाचे झाले असते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

महाराष्ट्रातीलच उदाहरण घ्यायचे, तर एकाच स्तराला ‘उच्च माध्यमिक’ आणि ‘कनिष्ठ महाविद्यालयीन’ अशी दोन्ही नावे आहेत, आणि घरी सहज बोलताना पाल्य ‘शाळेत’ गेला आहे की, ‘कॉलेज’मध्ये, हे त्या शैक्षणिक संस्थेच्या स्वरूपावर अवलंबून असते. त्यामुळे या संज्ञा मूळ लेखकांनी ज्या वापरल्या असतील, त्याच कायम ठेवणे, जिथे सुस्पष्ट मराठी पर्याय आहेत, तिथे ते वापरणे आणि त्या त्या लेखात त्याबाबत सातत्य ठेवणे, अशी पद्धत वापरली आहे. मूळ लेखांमध्ये इंग्रजी शब्दांचा वापर सढळपणे केलेला होता. त्याचे भाषांतर करणे जिथे कृत्रिम वाटेल, तिथे तसे करण्याचा प्रयत्न केलेला नाही. उदाहरणार्थ, अपर्णा लळिंगकर यांच्या लेखात अगदी ओघवते मराठी असले, तरी ‘सेकंड हँड पुस्तके’, ‘अ‍ॅडव्हान्स्ड गणित’ असे संदर्भ येतात. त्यांचे मराठी भाषांतर करून संपादक मंडळाने लेखनाच्या ओघात अडथळा आणलेला नाही. ‘स्टार्टअप’सारख्या संज्ञाही स्वीकारल्या आहेत. बुद्ध्यांक, भावनांक याप्रमाणेच आधुनिक काळात महत्त्वाचा मानला जाणारा ‘सामाजिक बुद्ध्यांक’. पण या संज्ञेपेक्षा मिलिंद चिंदरकर यांनी सहज वापरलेल्या ‘सामाजिक कोशंट’ या शब्दाचा संदर्भ तेथे चटकन समजतो, म्हणून तो तसाच ठेवला आहे.

‘फक्त मराठी’चा आग्रह धरून लेखनशैलीत कृत्रिमता आणि बोजडपणा आणायचा की, जागतिक संदर्भात विचार करताना सर्वत्र प्रचलित असलेले इंग्रजी शब्द आणि त्या अनुषंगाने मराठी माणसांच्या बोलण्यात येणारे मराठी-इंग्रजी संमिश्र शब्द किंवा वाक्प्रचार स्वीकारून या प्रकारच्या संवादांतील मराठी शब्दसंग्रहाची व्याप्ती वाढवायची, या दोन पर्यायांपैकी संपादन मंडळाने दुसरा पर्याय निवडला आहे. त्याचप्रमाणे संख्या, आकडेवारी देताना आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे वापरली असली, तरी संख्या व्यक्त करण्यासाठी भारतीय पद्धत वापरली आहे. म्हणजेच मिलियन्स-बिलियन्स अशा टप्प्यांऐवजी लक्ष-कोटी हे भारतीय टप्पे वापरले आहेत. त्यामागेही मराठी वाचकाची सोयच प्रामुख्याने लक्षात घेतली आहे.

मूळ व्याख्यानमालेची सुरुवात करताना देशोदेशींच्या शिक्षणपद्धतींची माहिती घेऊन भारतीय शिक्षणपद्धतीबद्दलच्या समजुती, जाणिवा, आशाआकांक्षा आणखी स्पष्ट होत जातील अशी अपेक्षा होती. त्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे करण्याचीही सोय होती. पण व्याख्यानमालेचे पुस्तकात रूपांतर करताना सुरुवातीलाच दोन बाबींची व्यवस्थित मांडणी करणे आवश्यक आहे, असे लक्षात आले.

पहिली बाब म्हणजे ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या अलीकडच्याच काळात आकाराला येत असलेल्या विद्याशाखेचा परिचय करून देणे. व्याख्यानमालेत ते काम किशोर दरक यांनी केलेच होते. त्यांच्या अभ्यासपूर्ण आणि परखड लेखात त्यांनी प्रामुख्याने या क्षेत्रातील समस्यांचा विचार केला आहे. या शाखेचे स्वरूप, तिचा उगम कसा झाला, त्यातील पद्धती, तंत्रे, मुख्य चर्चेचे विषय या सगळ्यांचे विवेचन देणेही आवश्यक वाटले.

व्याख्यानमालेची मूळ संकल्पना डॉ.वसंत काळपांडे यांची होती आणि त्या संपूर्ण काळात श्रोते, व्याख्याते या सर्वांशी त्यांचा संपर्क असल्याने या विषयाबाबत अधिक माहिती, स्पष्टीकरण हवे असल्यास मार्गदर्शन घेण्याची एक हक्काची जागा होती. पुस्तकाच्या वाचकांनाही तो लाभ मिळावा म्हणून त्यांनी व्याख्यानमालेत जरी ‘बीजभाषण’ केले नसले, तरी पुस्तकाची सुरुवात मात्र त्यांच्या ‘बीजलेखा’ने केली आहे. ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या विषयाच्या अभ्यासकांना सुरुवातीचे दोन्ही लेख उपयुक्त ठरतील.

तुलनेसाठी किमान दोन बाजूंची आवश्यकता असते. या पुस्तकातील विविध लेख वाचून एकाच वेळी अनेक देश, अनेक पद्धती यांची तुलना करणे शक्य होईलच, पण या सगळ्या उपक्रमाचा मूळ हेतू भारतीय शिक्षणव्यवस्थेत, विशेषतः शालेय शिक्षणात काय आणि का घडते आहे, घडायला हवे आहे, ते समजून घेणे असा होता.

‘भारतीय शिक्षण’ या गाभ्याच्या भोवती वाचकांना त्यांच्या त्यांच्या इच्छेनुसार आणि गरजेनुसार इतर शिक्षणव्यवस्थांचे ‘शत्रुसंधो विश्लेषण’ (SWOT Analysis : Strengths\शक्तिस्थाने – Weaknesses\त्रुटी – Opportunies\संधी – Threats\धोके) करता यावे, यासाठी एक विस्तृत संदर्भलेखही सुरुवातीला देणे गरजेचे वाटले. डॉ.वसंत काळपांडे यांनी ‘भारतातील शालेय शिक्षणाचा पट’, त्यातील बऱ्या-वाईट सर्वच गोष्टींचा आढावा घेत, जरूर तेथे अधिक विवेचन करत उलगडून दाखवल्यामुळे ती गरज पूर्ण झाली आहे. हा लेख वाचकांना आणि अभ्यासकांना तुलना आणि स्वतंत्र अभ्यास या दोन्ही दृष्टींनी उपयुक्त ठरेल.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

या पुस्तकाचे संपादन करत असताना ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्र’ या विषयावरचे किंवा अनेक देशांच्या शालेय शिक्षणाची एकत्रित माहिती देणारे फारसे लेखन मराठीत उपलब्ध नाही, असे लक्षात आले. त्यामुळे पुस्तकाची व्याप्ती अधिक वाढवावी, असेही ठरले. त्यामुळे व्याख्यानमालेत ज्या देशांचा विचार झाला नव्हता, अशा देशांवरही लेख समाविष्ट करण्याचे ठरले. जपान, पाकिस्तान या देशांवरचे लेख त्यासाठी संबंधितांना विनंती करून मागवून घेतले आणि त्या लेखकांनीही या विनंतीला मान दिला. दरम्यानच्या काळात व्याख्यानमालेत ज्यांचा सक्रिय सहभाग होता, त्या शुभदा चौकर स्वीडन येथे वास्तव्याला गेल्यावर तिथे त्यांच्या अनुभवाला आलेले पैलू त्यांनी इतक्या प्रभावीपणे सांगितले की, यावर एक स्वतंत्र लेखच घ्यायला हवा, असे वाटले.

पुस्तकाच्या कक्षा विस्तारण्यासाठी सर्वाधिक मदत गजानन जोशी यांची झाली. या विषयाच्या प्रेमापोटी त्यांनी दक्षिण आफ्रिका, चीन आणि मंगोलिया येथील त्यांच्या संपर्कातील लोकांशी बोलून एकूण पाच लेखांची भर घालण्यासाठी जे प्रयत्न केले, त्यासाठी त्यांचे आभार मानावे, तितके थोडे आहेत. इतर लेख भारतीय किंवा मूळ भारतीय नागरिक असलेल्या व्यक्तींनी लिहिलेले आहेत, तर हे लेख त्या देशांतील नागरिकांनी लिहिले आहेत. आपल्या देशातील शालेय शिक्षणाबाबतचे त्यांचे लेख नवीन दृष्टी देणारे आहेत, तसेच त्यांच्या आपल्या विचारांची नाळ जोडणारेही आहेत. या लेखांशिवाय हे पुस्तक अपूर्ण राहिले असते. बहुतेक सर्व खंडांतील देशांचा विचार पुस्तकात झाला आहे, पण दक्षिण अमेरिकेतील प्रातिनिधिक देशांचा मात्र समावेश करता आला नाही, त्याची रुखरुख राहिली. पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीच्या वेळी ही त्रुटी भरून काढता येईल.

पुस्तकातील लेखांना आकार देणारे व्याख्याते, काही लेखांचे शब्दांकन करणाऱ्या, भाषांतर करणाऱ्या व्यक्ती आणि संपादक या सर्वांनी भाषा, वर्ग, राजनैतिक मतभेद यापलीकडे जाऊन लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. सकारात्मक बाबींमुळे आलेले भारावलेपण काही ठिकाणी दिसेल, पण पूर्वग्रह आणि नकारात्मक भाव मुळातच न ठेवल्यामुळे त्या प्रकारची कटुता कुठेही आली नाही. ‘तुलनात्मक शिक्षणशास्त्रा’तील ही अपेक्षा पूर्ण करण्याचा सर्वांनीच मनापासून प्रयत्न केला आहे.

एकेका देशातील व्यवस्थेची माहिती घेतल्यानंतर शिक्षणव्यवस्थेचा जागतिक स्तरावर विचार करणे सोपे जावे, या दृष्टीने शेवटी काही परिशिष्टांचा समावेश करण्यात आला आहे. या पुस्तकात घेतलेल्या देशांच्या संदर्भात, शिक्षणावर परिणाम करणाऱ्या घटकांची माहिती संख्यात्मक स्वरूपात दिली आहे. त्यात लोकसंख्येचे वयानुसार वितरण, शहरी-ग्रामीण वितरण, राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत शिक्षणावर होणारा खर्च, मानव विकास निर्देशांक या बाबी दर्शवणारे तक्ते आणि आलेख दिले आहेत.

करोनाकाळात ‘सोशल डिस्टन्सिंग’मुळे व्यक्ती-व्यक्तींच्या समक्ष भेटीत अंतर ठेवणे गरजेचे झाले, एकत्र येणे अवघड झाले; पण त्याच वेळी सगळ्या जगाला एकाच समस्येने भेडसावलेले असल्याने आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पुरवलेल्या सुविधांमुळे जग मात्र जास्त जवळ आल्यासारखे वाटू लागले. पूर्वी प्रादेशिक स्तरावर होणारा विचार आता अगदी सहजसहज आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागला. शालेय शिक्षणाबाबत बोलायचे, तर कोणत्या देशांत शाळा बंद आहेत, ऑनलाइन सुविधा कशा वापरल्या जात आहेत, याच्या चर्चा शिक्षणक्षेत्रात सहज घडू लागल्या. एकूणच ऑनलाइन उपक्रमांचे प्रमाण वाढले. या पुस्तकाचा आधार असलेली व्याख्यानमाला त्यामुळेच आकाराला आली. त्या दृष्टीने हे पुस्तक करोनाकाळाला समर्पित आहे असे म्हणावे लागेल.

या पुस्तकाची सुरुवात जेथून झाली, त्या व्याख्यानमालेतील व्याख्याने यूट्यूबवर उपलब्ध आहेत. त्याच्या लिंक्स क्यू आर कोडच्या मदतीने लेखांच्या शेवटी दिलेल्या आहेत. परदेशी लेखकांचे मूळ इंग्रजी लेखही क्यू आर कोडच्या मदतीने पाहता येतील.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या पुस्तकात उपयुक्त आणि अद्ययावत माहितीचा समावेश असला, तरी संदर्भग्रंथ म्हणून त्याची रचना केलेली नाही. शिक्षणक्षेत्रात रस असणारे पालक, शिक्षक, संस्थाचालक, अभ्यासक आणि सर्वसामान्य वाचक, असा सर्व प्रकारचा वाचकवर्ग डोळ्यासमोर ठेवून त्याचे स्वरूप बहुपदरी, लवचीक ठेवले आहे. प्रत्येकालाच त्यातून काहीतरी मिळेल आणि वाचनीयता वाढल्यामुळे या विषयाचा आणखी प्रसार होईल, पुढे यावर अधिक विचारमंथन घडू लागेल, अशी अपेक्षा आहे.

या वेगळ्या, नवीन विषयावरच्या पुस्तकाच्या संपादनाची संधी ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’ने दिली, म्हणून संपादक मंडळ त्यांचे ऋणी आहे.

पुस्तक तयार होत असताना त्याची व्याप्ती हळूहळू वाढत गेली, तशी संपादक मंडळाच्या आकलनाची, जाणिवांची व्याप्तीही वाढत गेली. त्याबद्दल या पुस्तकात योगदान देणाऱ्या सर्वांचेच ऋण मान्य केले पाहिजे.

‘देशोदेशीचे शालेय शिक्षण’ : संकल्पना व मार्गदर्शन – डॉ. वसंत काळपांडे

संपादक मंडळ - धनवंती हर्डीकर, अजित तिजोरे आणि डॉ. माधव सूर्यवंशी

यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई व डिजिटिकल वर्क्स एलएलपी, पुणे

पाने – २८८ (मोठ्या आकाराचे संपूर्ण रंगीत पुस्तक), मूल्य – ४९९ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......