धर्म आणि त्याचे प्रयोजन, संविधान आणि धर्म यांच्यातले पेच, आजची आव्हाने आणि पुढील दिशा शोधण्याचा एक प्रयत्न…
ग्रंथनामा - झलक
सुरेश सावंत
  • ‘धर्म आणि संविधान’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Thu , 24 November 2022
  • ग्रंथनामा झलक धर्म आणि संविधान सुरेश सावंत

भारतात धर्म राजकारणाचा आणि अर्थकारणाचा अविभाज्य भागच बनला आहे. खरं म्हणजे धर्म राजकारण वा अर्थकारणाचा भाग बनणं आणि कुठलंही सरकारी धर्माधिष्ठित तत्त्वांचा जयघोष करणारं असणं, हे लोकशाहीसाठी अंतिमत: घातकच ठरतं. याची भारतीय संदर्भात चर्चा करणारे ‘धर्म आणि संविधान’ हे सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत यांचे पुस्तक नुकतेच दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटतर्फे प्रकाशित झाले आहे. त्याला लेखकांनी लिहिलेले हे मनोगत…

..................................................................................................................................................................

ही पुस्तिका लिहीत असताना उदयपूरमध्ये एक निर्घृण खून झाला आहे. दोन मुस्लीम तरुणांनी कन्हैयालाल नावाच्या हिंदू शिंप्याची त्याच्या दुकानात माप घेण्याच्या बहाण्याने येऊन तलवारीचे बेछूट वार करत हत्या केली. त्यांना अटक झाली. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे. उदयपूर शहरात या घटनेविरोधात उग्र निदर्शने झाली. जाळपोळ झाली. कर्फ्यू लागला. एरवी, पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले हे शांत शहर खूप अस्वस्थ झाले. तेथील तसेच देशातील अन्य भागांतील मुस्लीम समाजात सध्या असुरक्षिततेची भावना आहे. या घटनेत पुढील उत्पाताची भीती आहे.

ही भीती यासाठी की, एका हिंदूचा दोन मुसलमानांनी आपसातील वैयक्तिक हेवेदाव्यांतून हा खून केलेला नाही, तर त्यांच्या दृष्टीने पैगंबरांचा अवमान केल्याची ही शिक्षा आहे. खून करणारे व ज्याचा खून झाला, ते परस्परांच्या ओळखीचेही नव्हते. नुपुर शर्मा या भाजपच्या प्रवक्त्या बाईंनी काही दिवसांपूर्वी पैगंबरांचा अवमान करणारी विधाने जाहीरपणे माध्यमांवर व्यक्त केली. या नूपुर शर्मांना पाठिंबा देणारी पोस्ट कन्हैयालाल यांनी समाजमाध्यमांवर टाकली होती. खुन्यांच्या लेखी नुपूर शर्माप्रमाणेच त्यांना पाठिंबा देणारा कन्हैयालालही धर्मद्रोही होता. अशा धर्मद्रोह्याला काही मुस्लीमदेशांत देहान्ताची शिक्षा आहे. ‘सच्चे मुसलमान’ म्हणून हे धर्मकर्तव्य खुनी मुस्लीम तरुणांनी पार पाडले. हत्या करून ते बेनाम राहिले नाहीत, तर त्यांनी या हत्येचा व्हिडिओ करून, या हत्येची जबाबदारी घेऊन असे करू धजणाऱ्यांना जाहीर इशारा दिला. नूपुर शर्मांनाही हीच शिक्षा त्यांच्या लेखी आहे, पण त्या कडक सुरक्षेत आहेत. कन्हैयालाल हा सामान्य टेलर त्यांना सहज सापडला.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

अमरावती शहरात उमेश कोल्हे नावाच्या एका केमिस्टची हत्या झाली. त्याही बाबत नूपुर शर्माची कोल्हेंनी बाजू घेतल्याने त्यांचा खून झाला, असा नवा दावा पोलिसांनी राज्यातले सरकार बदलल्यावर केला आहे. या घटनांचे निमित्त साधून हिंदूंच्या मनातल्या स्वाभाविक संतापाला चेतवणे आणि मुस्लिमांवरील हल्ल्यांना प्रवृत्त करणे, हे हिंदूंच्यातील कट्टरपंथी करू शकतात. या हिंदू कट्टरपंथीयांच्या नावे अशा हत्या वा हिंसा गेले पाऊण दशक अगणित आहेत. हिंदू-मुस्लीम तणाव हा जुना मामला. पण केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आल्यानंतर हिंदू कट्टपंथीयांना विलक्षण जोम चढला आहे. गुजरातमधील उना शहरात गाईंना मारून नेत असल्याच्या वहिमावरून काही दलित युवकांना बेदम मारहाण करून त्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवरून या कट्टरपंथीयांनी प्रसारित केल्याचे आपण पाहिले आहे.

उत्तर प्रदेशातील दादरी येथे अखलाक या मुस्लीम इसमाच्या घरी गोमांस असल्याच्या संशयावरून त्याच्या घराची तोडफोड करून त्याची हत्या करण्यात आली. पुण्यात मोहसीन या आयटीत नोकरी करणाऱ्या शिक्षित युवकावर हिंदूंच्या अवमानाचा आळ घेऊन खून करण्यात आला. या खुन्याचा नंतर काहींनी शौर्य पुरस्कार देऊन सत्कारही केला.

उना, दादरी आणि पुणे या तिन्ही ठिकाणचे आरोप खोटे निघाले. केवळ संशयावरून मुसलमान वा दलित यांच्याविषयीच्या द्वेषापायी हे खून झाले. ही मालिका आजही चालू आहे. या घटनांमधून काही प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. राहायला हवेत.

उदयपूरमध्ये ज्याचा खून झाला, त्याने इस्लामच्या पूज्य प्रेषितांचा अवमान केला. उना, दादरी येथे गोहत्येचे पातक केल्याचा आरोप होता; तर पुण्यात हिंदूंच्या पूज्य व्यक्तीचा अवमान केल्याचा आरोप होता. हे आरोप खरे असोत वा संशय असो. त्यांच्या निराकरणासाठीचा कायद्याने घालून दिलेला मार्ग आहे, तो म्हणजे पोलिसांत तक्रार पोलीस चौकशी व गरज पडल्यास अटक करतील. न्यायालयात खटला भरेल. सुनावणी, साक्षी-पुरावे होतील. न्यायालय निकाल देईल. खालच्या कोर्टाचा निकाल मान्य नसेल, तर वरच्या कोर्टात जाता येते. न्यायालयाचा निकाल मनासारखा वा बरोबर असेलच असे नाही. साक्षीपुराव्याअभावी अथवा कायद्याचा वेगळा अर्थ लावल्याने आरोपी सुटू शकतो वा त्याला नाहक शिक्षाही होऊ शकते. कायद्याच्या राज्यात कायद्याने करावयाची ही प्रक्रिया आपण संविधानाद्वारे स्वीकारली आहे. संविधानाच्या उद्देशिकेत म्हटल्याप्रमाणे हे संविधान आपण अंगीकृत, अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले आहे. म्हणजे त्याच्या पालनाला आपण स्वतःहून बांधील आहोत.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अशा वेळी आरोपीला स्वतः शिक्षा करण्याचा, कायदा हातात घेण्याचा अधिकार या खुन्यांना, हिंसा करणाऱ्यांना दिला कोणी? आरोप खरा, खोटा, संशय काहीही असो. कायद्याच्या मार्फतच त्याची तड लागली पाहिजे, हे यांना का मान्य नाही?

याचे एक कारण धर्माबद्दलचा या लोकांनी लावलेला अर्थ आणि दुसऱ्या धर्म-जातीबद्दलचा द्वेष हे आहे. माझ्या धर्मातील आराध्याबद्दल कोणी काही अवमानकारक बोलले, तर त्याला शिक्षा करणे हे माझे धर्मकर्तव्य आहे, हा समज यांच्या मनात खोल रुजलेला असतो. पैगंबरांच्या अवमानाबद्दल काही देशांत असेल देहान्ताची शिक्षा, आपल्याकडे ती नाही. आपल्याकडे या अवमानासाठी वेगळ्या कायदेशीर तरतुदी आहेत, पण जिथे मृत्युदंडाची शिक्षा ईशनिंदेला आहे, तेथेही ती शासनच देते. भली-बुरी न्यायालयीन प्रक्रिया करून देते. पाकिस्तानातही हा कायदा आहे, पण अजून तरी तिथे कोणाला मृत्युदंड दिलेला नाही. जे काही असेल ते शासन करेल.

कोणी व्यक्ती तिला वाटले म्हणून पाकिस्तानात किंवा त्यासारख्या ईशनिंदेला मृत्युदंडाची शिक्षा असलेल्या देशात आपणहून आरोपीचा खून शिक्षा म्हणून करू शकत नाही. भारतात तर नाहीच नाही. आपल्या घटनेने हा अधिकार व्यक्तीला दिलेला नाही. उलट आरोपीच्या माणूस म्हणून असलेल्या अधिकाराला जपण्याची आपली भूमिका आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एक निरपराध चुकीने अपराधी सिद्ध होऊ नये, ही दक्षता आपल्या न्यायप्रक्रियेत घेतली जाते. अशा वेळी आपल्याकडच्या या स्वयंघोषित दंड देणाऱ्यांना शासनाने चाप बसवलाच पाहिजे, पण समाजानेही ठामपणे हे आम्हाला चालणार नाही, असे बजावले पाहिजे.

तथापि, समाजाच्या मनातच आमच्या भावना दुखावणाऱ्याला, कठोर गुन्हा करणाऱ्याला जागेवर न्याय देण्याची धारणा रुजू लागली असेल, तर त्याहून घातक काही नाही. हैद्राबादला बलात्काराच्या आरोपींना एनकाऊंटरमध्ये मारून चटदिशी न्याय करणाऱ्या पोलिसांवर लोकांनी याच भावनेतून फुले उधळली होती. पुढे हे एनकाऊंटर जाणूनबुजून करण्यात आले होते, हे सिद्ध झाल्याने आता ते करणाऱ्या पोलिसांवरच कारवाई सुरू झाली आहे. जे मारले गेले ते खरोखरच गुन्हेगार होते की, लोकांच्या मनातील रोष शमवायला सापडेल त्यांना पकडून ठार करण्याचा शॉर्टकट पोलिसांनी अवलंबला होता, हे आता कळणे कठीण आहे. पोलीस आणि त्या मागे असलेले चटदिशी न्यायाचे समाजमन यांनी निरपराधांचा हा हकनाक बळी घेतलेला असू शकतो.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

उदयपूरच्या घटनेनंतर नुपुर शर्माना सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तंबी गरजेची होती. तुम्ही ज्या रीतीने टीव्हीवर पैगंबरांविषयी बोलत होता, ते अवमानकारकच होते. आता देशात जे घडत आहे, त्याला तुम्हीच जबाबदार आहात. देशाची तुम्ही माफी मागितली पाहिजे, असे खरमरीतपणे न्यायालयाने त्यांना बजावले आहे.

आज आधुनिक काळात, जगातील देश संविधानाने, कायद्याने चालत असताना प्राचीन काळातले धर्म किती प्रचंड प्रभाव गाजवत आहेत, हे आपल्याला इथे दिसते. हा धर्म काय प्रकार आहे? त्याचे माणसाच्या आयुष्यातले प्रयोजन काय? त्याच्या नावाने वा त्याचा अर्थ लावून आज जे चालले आहे, त्याला या धर्माची मान्यता आहे का? त्याच्याशी ते सुसंगत आहे का? आणि ते काहीही असले तरी आजच्या कायद्याच्या राज्यात त्याचे स्थान काय असायला हवे?... याची स्पष्टता आपल्याला असणे गरजेचे आहे. अन्यथा आपला सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनव्यवहारच कुंठित होऊ शकतो.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी तसेच समाजात सुधारणा व्हाव्यात म्हणून जे लढले, त्यांनी जी आधुनिक मूल्ये पुरस्कृत केली आणि पुढे ती घटनेत संकलित करून आपल्या पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक दीपस्तंभ उभारला ते सर्व मातीमोल होऊ शकते. एका भयाण अराजकाला आपण आमंत्रण देऊ. जे आपल्या पूर्वसुरींनी कमावले त्याला खिंडार तर आता पडले आहेच. ते लवकरात लवकर बुजवण्याची गरज आहे.

या प्रश्नांच्या विविध पैलूंची थोडी तपशिलात, पण खूप सैद्धांतिक वा शोधप्रबंधाच्या रीतीने नव्हे, आपण या पुस्तिकेत चर्चा करणार आहोत.

धर्म आणि त्याचे माणसाच्या जीवनातले प्रयोजन, संविधान आल्यावर त्याचे धर्माशी ठरलेले नाते, त्याचे विविध घटक, संविधानाशी असलेल्या धर्माच्या या नात्यात येत गेलेले पेच, आजची आव्हाने आणि पुढील दिशा शोधण्याचा प्रयत्न आपल्याला इथे करायचा आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

हा प्रयत्न आहे. त्यातील मते अर्थातच निर्णायक नाहीत. नव्या संदर्भात, नव्या आकलनात त्यांची फेरमांडणी होऊ शकते. आपले भोवताल सजगपणे पाहण्याचा आणि त्यात सम्यक बदलासाठी आपल्या परीने खटपट करणाऱ्या, अशा खटपटींना पूरक वा त्यांचे हितचिंतक राहणाऱ्या कार्यकर्त्याच्या भूमिकेतून या पुस्तिकेतील हे विवेचन आहे.

‘धर्म आणि संविधान’ – सुरेश सावंत

दादा पुरव रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट, पुणे

पाने – ८०, मूल्य – ६० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......