‘चला आपणच बदलू या राजकारण’ हे पुस्तक एका जागरूक आणि सक्रिय नागरिकानं लिहिलं आहे. मतदार नागरिक मतदानाच्या दिवशी ‘राजा’ आणि इतर वेळी राजकीय धोरणकर्त्यांच्या धोरणांचा निव्वळ ‘साक्षीदार’ असतो. पाच वर्षांतून एकदा मतदान करण्याचं कर्तव्य यापलीकडे त्याचं एक मोठं काम म्हणजे, आपल्या भवतालच्या परिस्थितीविषयी जागरूक राहणं. जागरूक राहायचं म्हणजे नक्की काय करायचं, याचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात करण्यात आला आहे. सुनीता ज्ञानगंगातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातलं लेखकाचं हे मनोगत…
..................................................................................................................................................................
सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारे क्षेत्र म्हणून प्रस्तुत मनोगत राजकीय क्षेत्र आणि निवडणूक पद्धत यांचे सविस्तर कथन करणारे आहे. मात्र सामाजिक आणि वैयक्तिक जीवनात आपला संबंध नागरी प्रशासन, पोलीस व सार्वजनिक सुविधा, अशा अनेक क्षेत्रांशी येत असतो. या सर्व क्षेत्रांमध्ये सुधारणांना वाव आहे आणि त्या घडवून आणण्यासाठी या देशाचे नागरिक म्हणून आपली प्रत्येकाची काही निश्चित भूमिका आहे. ही भूमिका पार पाडण्यासाठी आपल्यासमोर असलेल्या आव्हानांची, त्यांना सामोरे जाण्यासाठीच्या उपायांची जाणीव करून देणे आवश्यक आहे. ‘नवभारता’च्या उभारणीसाठी प्रत्येकाला विचार आणि कृती करण्यास उद्युक्त करणे, हा या लेखनाचा उद्देश आहे. अर्थातच, हे कार्य संघटित स्वरूपाचे आहे. त्यात वेगवेगळ्या विचारांना मुक्त वाव आहे. अशा विचारांच्या मंथनातूनच प्रभावी कृतीकार्यक्रम साकारला जाऊ शकतो, यावर लेखकाचा दृढ विश्वास आहे.
आपल्या दैनंदिन जीवनावर राजकारणाचा प्रभाव असतोच, असे काही नागरिकांना वाटते, तर राजकारणाचा नेमका कसा परिणाम आपल्या दैनंदिन आयुष्यावर होतो, हे अनेक नागरिकांच्या लक्षात येत नाही. उदाहरण घ्यायचे तर, काही देशांत सार्वजनिक जागी स्वच्छतेचे नियम काटेकोर पाळत असल्याचे आपण पाहतो किंवा ऐकतो, तर आपल्या देशात असे स्वच्छतेचे वातावरण सरसकट प्रत्येक ठिकाणी निदर्शनास येतेच असे नाही. ते केवळ अति महत्त्वाच्या व्यक्ती राहत असतील किंवा जिथे या व्यक्तींचा वावर आहे, त्या सार्वजनिक ठिकाणीच स्वच्छतेचे वातावरण निदर्शनास येते.
काही देशांत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वेगवान, वक्तशीर आणि नागरिकांच्या सोयीने उपलब्ध असते. मात्र आपल्या देशात तीच वाहतूक व्यवस्था धिम्या गतीने, रामभरोसे असते आणि नागरिकांना किंवा प्रवाशांना प्राधान्य देऊन तिचे नियोजन बहुतांश प्रमाणात नसतेच, असे दिसून आले आहे. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना आसनव्यवस्थेच्या क्षमतेच्या दुप्पट तिप्पट गर्दीतून प्रवास करावा लागतो. भरमसाठ करवाढ सहन करूनही टोलचा भुर्दंड तर पडतोच, पण त्यानंतरही खड्डेमुक्त प्रवासाचा आनंद क्वचितच मिळतो.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
माफक दरात सार्वजनिक आरोग्यविषयक सुविधा तर उपलब्ध नाहीतच; परंतु आरोग्यविम्याचा हप्ता वेळेवर भरूनही आवश्यकता असेल तेव्हा योग्य दरात आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध होण्याची खात्री देता येत नाही. प्रवाशांच्या जीवाची काळजी म्हणून हेल्मेटसक्ती आणि सीट बेल्टसक्ती करूनही नियम न पाळणाऱ्या नागरिकांकडून दंडवसुली करण्याची व्यवस्था आहे. मात्र टोलवसुली करणाऱ्या तरीही नागरिकांना खड्डेयुक्त रस्त्यावरून प्रवास करण्यास भाग पाडणाऱ्या ठेकेदाराकडून दंडवसुलीची कार्यवाही नियमितपणे होत नाही.
रेल्वेप्रवासात स्वच्छ आणि शुद्ध पाण्याची खात्री प्रशासन देत नसल्याने प्रवाशांना पाणी विकत घ्यावे लागते अन् कुणाचीही मागणी नसताना शेकडो कोटी रुपये खर्च करून वायफाय सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाते.
रोख रकमेच्या स्वरूपात देणगी दिल्याशिवाय विद्यार्थ्यांचे शाळा, महाविद्यालये किंवा उच्चशिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश होऊ शकत नाहीत, हा अनुभव तर सामान्य झालेला आहे. व्यावसायिकांना प्रामाणिकपणे नियम पाळून व्यवसाय करताच येऊ नये, इतकी कडक नियमावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेशिवाय परवाने मिळणे अशक्य, पण दुर्घटना घडल्यास ‘बळीचा बकरा’ सामान्य कर्मचारीच, हे तर नित्याचेच!
करचुकवेगिरीकडेच कल वाढण्यासारखे कराचे दर का आहेत? नियमितपणे आणि वेळेवर कर भरणे, हा मूर्खपणा ठरावा इतक्या वेळा कर कसूरदार करदात्यांसाठी अभय योजना का जाहीर होत असतात?
हे जाणून घ्यावयाचे असल्यास आपणास व्यवस्थेतील आपली नेमकी जबाबदारी आणि अधिकार समजून घेणे आवश्यक आहे. तेच आपण प्रस्तुत पुस्तकातून समजून घेणार आहोत.
जो दुसऱ्यावरी विसंबला.....
जो दुसऱ्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. ‘इसापनीती’मध्ये शेतकरी आणि शेतातील पक्ष्यांची एक कथा आहे. कथेतील शेतकरी आपल्या शेतातील उभ्या पिकाची कापणी करण्याचे काम दुसऱ्यांवर सोपवून स्वतः देखरेख करत नसे. त्यामुळे पिकाच्या कापणीचे काम होणार नसल्याचे पक्षी त्याच्या पिल्लांना सांगत असे अन् शेतकऱ्याच्या शेतातील घरट्यात निर्धास्तपणे राहावयास सांगत असे. एके दिवशी मात्र त्या शेतकऱ्याने स्वत:च कापणी करायची ठरवली. ज्या दिवशी त्याने स्वतःचे काम दुसऱ्यांना न सांगता, स्वतः करायचे ठरवले, त्या दिवशी पक्ष्याने त्याचे घरटे दुसरीकडे हलवायचे ठरवले.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
जसे पक्षाचे आहे, तसेच माणसाचे आहे आणि जसे शेताचे आहे, तसे राष्ट्राचे! आपणही आपल्या देशाची राखण आपल्या राजकीय पुढाऱ्यांच्या हातात दिलीच आहे, नाही का? स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी टिळक, गांधीजी यांसारख्या काही नेत्यांमध्ये आपण आपला तारणहार पाहिला. ब्रिटिश गेले, स्वातंत्र्य मिळाले आणि आपण आपले सरकार स्थापन केले. तत्पूर्वी गांधीजींनी काँग्रेस चळवळीचे कार्य संपले आहे, असे सांगून काँग्रेसचे विसर्जन करण्याची सूचना केली. परंतु अनेक काँग्रेस नेत्यांना ते मान्य नव्हते. स्वातंत्र्यलढ्यात प्रसंगी प्राणाचेही बलिदान करणाऱ्या, हालअपेष्टा सहन केलेल्या स्वातंत्र्यसेनानींच्या जीवावर काही संधिसाधू पुढाऱ्यांना काँग्रेस पक्षामध्ये मानाचे स्थान मिळाले. ही वृत्ती जसजशी बळावत गेली, तशी संधिसाधू पुढाऱ्यांची संख्या वाढत गेली आणि त्यांनी पद्धतशीरपणे सत्तेचा उपभोग घेत सेवाभावी पुढाऱ्यांना अडगळीत टाकायला सुरुवात केली. त्यांचे योगदान विस्मरणात जाण्याइतपत सत्तेचा असा काही खेळ सुरू झाला की, काँग्रेस नावाची स्वातंत्र्यचळवळ इतिहासाच्या पुस्तकांमध्ये बंद होत गेली.
काँग्रेसला चळवळ म्हणून जनमानसात जी मान्यता आणि जनाधार मिळाला, तोच ‘काँग्रेस’ या नावामुळे आणि साहजिकच तिच्या नेत्यांची जनतेच्या मनात जी प्रतिमा निर्माण झाली होती, त्यामुळे पक्षालाही मिळाला. परिणामी, आपण स्वातंत्र्याची किमान पहिली पन्नास वर्षे तरी काँग्रेसची तीच प्रतिमा उराशी बाळगत, अशा संधिसाधू पुढाऱ्यांना सत्ता उपभोगू दिली आणि आपण भारतीय ‘व्यक्तिपूजक’ आहोत यावर आपणच शिक्कामोर्तब केले.
गेली सत्तर वर्षे कधी नेहरू, कधी इंदिरा गांधी, कधी राजीव गांधींना, तर कधी जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयी, कधी सोनिया गांधी, कधी मनमोहन सिंग यांना, कधी मोदींना, आपण आपले तारणहार समजत आलो आहोत. देशाला भेडसावणारे गरिबी, बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि महागाई यांसारखे प्रश्न ही नेतेमंडळी दूर करतीलच असे मानत आलो आहोत. त्यांच्याकडे आशेने पाहत आलो आहोत.
आज राजकीय पुढारी आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यात मोठी दरी निर्माण झाल्याचे दिसते आहे. बहुसंख्य सर्वसामान्य जनता आपल्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी शासनावर अवलंबून आहे. ग्रामीण भारतात आणि दुर्गम भागात वर्षानुवर्षे पिण्याचे पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, पक्के रस्ते, वीज, शाळा, आरोग्यविषयक सुविधा अशा साध्यासाध्या समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत. आपली लहानसहान कामे करून घेण्यासाठी लोक सरकारी दरबारी हेलपाटे मारत आहे, त्यांचे श्रम, वेळ आणि पैशाचा अपव्यय होत आहे. ८० टक्के जनतेला अन्नसुरक्षा कायद्याद्वारे स्वस्त धान्य पुरवावे लागत आहे, याहून दुसरा पुरावा काय द्यावा. कारण त्यांना कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आवश्यक इतका रोजगार उपलब्ध नाही. वेळ पडली तर उदरनिर्वाहासाठी गाव सोडावे लागत आहे. हे सर्व कशामुळे घडते आहे?
क्रोनी कॅपिटिलिझम
जनतेची धावपळ निव्वळ प्राथमिक गरजा भागवण्यापर्यंत थांबत नाही. माणूस स्वभावत: असमाधानी असल्याने त्याची जगण्यातली चुरस अविरत सुरू आहे. तरीही काहीच जण या स्पर्धेत टिकतात, असे का होत असेल? कष्ट करण्यामध्ये, बुद्धिमत्तेमध्ये मूठभर उद्योगपतींशिवाय इतर कोणीही सक्षम नाही का? काही व्यक्तींमध्ये उद्योजकता असूनही ते अपयशी का ठरतात? अनेकांना त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी दर्जाचे काम का करावे लागते? पात्रतेपेक्षा कमी उत्पन्नावर का राबावे लागते? आपल्या अशा दुरावस्थेस आपण स्वतः किती जबाबदार आहोत? तसेच अन्य कोणती परिस्थिती कारणीभूत आहे, असे आपणास वाटते? आपण यावर काही विचार केला आहे का?
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अनेक व्यक्तींकडे क्षमता असूनही मोजक्याच व्यक्ती यशस्वी होण्यामागे काय कारण असेल असे तुम्हाला वाटते. प्रत्येक क्षेत्रातील मूठभर यशस्वी व्यक्तींपेक्षा अनेक कष्टाळू, बुद्धिमान आणि सेवाभावी लोक भारतात आहेत, तर मग मूठभरांना मिळणारा समान अशा प्रत्येकाला मिळण्यामध्ये नेमक्या काय अडचणी आहेत, अशा लोकांमध्ये काय कमतरता आहे, असे तुम्हाला वाटते?
समान क्षमता, समान काम, समान मोबदला, त्यानुसार समान आर्थिक स्तर हे ध्येय साध्य करावयाचे असेल तर आधी या विषमतेचे मूळ शोधणे आवश्यक आहे? समानता म्हणजे विषमतेची दरी कमी करणे अपेक्षित आहे. उदाहरणार्थ, एखाद्या वाहनचालकाला ४०,००० रुपये पगार असेल, तर इतर वाहनचालकांना किमान ३०,००० पगार असावा. त्याचप्रमाणे ही तफावत कमी करताना अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न कमी होऊ नये, तर किमान उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींचे उत्पन्न वाढावे.
आर्थिक उत्पन्नातील तफावतीच्या कारणांचा विचार करता एक कारण असे लक्षात येते की, काही व्यवसाय हे मक्तेदारी स्वरूपाचेच असतात; तर काही व्यवसायांमध्ये मूठभर उद्योगपतींची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. अशा व्यवसायांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना अधिक वेतन देणे मालकांना शक्य होते. असे अधिक वेतन मिळाल्यामुळे ज्यांचे राहणीमान सुधारले, त्यांच्या भाग्याचा हेवा करण्याचे कारण नाही. पण सत्ताधाऱ्यांशी जवळीक असल्यामुळे ज्यांची व्यवसायात मक्तेदारी निर्माण होते अन् आर्थिक विषमता वाढते, अशा वेळी लोकशाही राज्यव्यवस्थेत अशी मक्तेदारी निर्माण न होण्यासाठी शक्य त्या उपाययोजना करणे, अशा उपाययोजनांना पाठिंबा देणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
हे काम मक्तेदार असलेले व्यावसायिक करणार नाहीत, अशा व्यावसायिकांच्या कृपेने सत्तेवर असणारे सत्ताधीश करणार नाहीत; तर ज्यांना या मक्तेदारीचे परिणाम भोगावे लागतात, अशा व्यावसायिकांनीच करायला हवे आणि या कार्यास इतर बेरोजगार व अर्धबेरोजगारांनी पाठिंबा द्यायला हवा. कारण त्यामुळे मक्तेदारी व्यवसायात स्पर्धा निर्माण होईलच, शिवाय रोजगाराची निर्मिती होईल आणि रोजगाराची मागणीही वाढेल. मक्तेदारी निर्माण होण्याची कारणे समजली की, स्पर्धा निर्माण करण्याकरता काय करायला हवे, या दिशेने विचार करता येईल.
सत्ताधाऱ्यांशी जवळीक असली की, स्वतःच्या व्यवसायाची मक्तेदारी निर्माण करता येते, हे व्यावसायिकांना तर माहीत आहेच, परंतु आता सर्वच जागरूक नागरिकांच्याही लक्षात येत आहे. पण ‘तळे राखील तो पाणी चाखील’, या म्हणीनुसार आपण ही बाब मान्यच करतो आणि यावर काहीच उपाय नाही असे समजून शांत बसतो आणि निष्क्रिय राहतो. पण जेव्हा संपूर्ण तळेच साफ होऊ लागले असेल, तेव्हा आपण निष्क्रिय राहणे अयोग्य आहे. याबाबत अनेक वर्षांपासूनचे वाचन आणि विचारमंथन यातून काही उपाय सुचले, ते या पुस्तकाद्वारे आपणापुढे मांडण्याचा प्रयत्न करत आहे.
‘चला आपणच बदलू या राजकारण’ : सुरेश ओसवाल
सुनीता ज्ञानगंगा, पुणे
पाने – १०६, मूल्य – १६५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment