माझे हे पुस्तक म्हणजे राजकीय अर्थव्यवस्थेच्या चष्म्यातून केलेले जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राचे तटस्थ विश्लेषण आहे
ग्रंथनामा - झलक
हिरा सिंह
  • हिरा सिंह यांच्या पुस्तकाच्या इंग्रजी व मराठी आवृत्तीची मुखपृष्ठे
  • Thu , 24 November 2022
  • ग्रंथनामा झलक हिरा सिंह Hira Singh Recasting Caste: From the Sacred to the Profane जातिव्यवस्थेची नवी समीक्षा – पवित्रतेकडून अपवित्रतेकडे Jati Vyavasthechi navi Sameeksha - Pavitratekadun Apavitratekade

समाजशास्त्रज्ञ हिरा सिंह यांच्या ‘Recasting Caste – From the Sacred to the Profane’ या इंग्रजी पुस्तकाचा ‘जातिव्यवस्थेची नवी समीक्षा – पवित्रतेकडून अपवित्रतेकडे’ या नावाने सेज पब्लिकेशनतर्फे नुकताच प्रकाशित झाला आहे. सुधीर यशवंत राईकर यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकाला लेखकाने लिहिलेली ही प्रस्तावना…

..................................................................................................................................................................

माझा जन्म पूर्व उत्तर प्रदेशातील एका बहुजातीय गावात झाला. तेथील वातावरणात माझे बालपण गेले आणि माझ्या जातीबद्दलच्या समजासही तिथेच सुरुवात झाली. आमच्या गावातील सर्वच्या सर्व परस्परसंबंध जातीच्याच आधारे प्रमाणित केले गेले होते. जमीनदार असो, न्हावी असो की परीट, पुरोहित असो, कारागीर असो वा शेतकरी, प्रत्येक जण एका विशिष्ट जातीचा सदस्य होता: जात हीच गावातील लोकांची ओळख होती आणि त्या वातावरणात वाढत असताना मीसुद्धा जातीच्याच आधारे सर्वांना ओळखत असे. आम्हाला सांगितले जायचे की, आपल्याला असेच (देवाच्या कृपेने) घडवले गेले आहे आणि अर्थातच ते त्यांचे कर्म (मागील जन्मातील बऱ्या-वाईट कृत्यांचा परिणाम) आणि त्यांचा धर्म होता (प्रारब्धात लिहिलेली या जन्मातील कर्मे).

हाच जातीबद्दलचा प्रबळ दृष्टिकोन होता, माझे जातीचे आकलनही असेच होते. तेच ज्ञान मी आत्मसात केले होते. त्या वेळी मला पुसटसेदेखील कळले नाही की, हा जातीविषयक प्रबळ दृष्टीकोन खरं तर प्रभुत्वशाली जातींचा दृष्टिकोन होता. जातीच्या ओळखीमागे दडलेल्या ठोस भौतिक स्वार्थापासून मी तेव्हा पूर्णपणे अनभिज्ञ होतो, असा स्वार्थ जो प्रबळ आर्थिक-राजकीय संबंधांमध्ये कोरला गेला होता, यात मुख्यत्वे जमिनीशी निगडित परस्परसंबंध होते, जे प्रत्येक जातीचे समाजातील स्थान आणि भूमिका निर्धारित करत असत. आमच्या जातीविषयीच्या आंतरिक जाणिवा अशा तऱ्हेने रुजवल्या जात होत्या. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झाले, तर जातीविषयीची चेतना जातींच्या संरचनेतून निर्माण झाली होती आणि जातींच्या रचनेचा पाया रचला होता जमिनीशी निगडित संबंधांनी.

गावाचे अलगीकरण निवासी वसाहतींप्रमाणे केले गेले होते. केंद्रस्थानी तीन रजपूत परिवार होते. एक ब्राह्मण कुटुंबांचा समूह होता. मधोमध बनिया, सोनार, लोहार, न्हावी, कहर लोकांचे परिवार आणि एक कायस्थ कुटुंब होतं, त्या शिवाय अहीर (शेतकरी) आणि गडेरीया (मेंढपाळ) परिवार राहत असत. या साऱ्या समूहांपासून विलग अशा चर्मकारांच्या दोन वसाहती होत्या. त्यांना चामरौती म्हणत असत.

गावात आम्हाला जवळजवळ सगळीकडे मुक्त संचार करण्याची मुभा होती, चामरौतीचा भाग मात्र याला अपवाद होता. यात एक विशेष उघड बाब अशी होती की, आम्ही रजपूत आणि गैर-रजपूत मुलांबरोबर खेळायचो- बागडायचो, पण चर्मकार जमातीतील मुलांबरोबर कधीच नाही, जरी ते आम्हाला जवळजवळ रोज दिसत असत; कारण ते सहसा आमच्या घराभोवती आपल्या आईवडिलांबरोबर किंवा थोरल्या भावाबहिणींसोबत वावरायचे. आम्ही त्यांच्यासोबत खेळत नव्हतो, यामुळे आम्हाला कधीच अवघडल्यासारखं झालं नाही.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

श्वेतवर्णाच्या मक्तेदारीवरील आपल्या महत्त्वाच्या अभ्यासात फ्रँकेनबर्ग (१९९३) असे मत मांडते की, अमेरिकेतील काळ्या आणि गोऱ्या जमातींमधील भौतिक अंतर हेच त्यांच्यातील सामाजिक अंतराचे द्योतक आहे. भौतिक सीमाच प्रतीकात्मक सीमा होत्या. तिच्या अभ्यासात फ्रँकेनबर्गने असे दाखवून दिले आहे की, बालपणीचे सामाजिक चित्र बालमनाच्या आंतरिक जाणिवा घडवतं, ज्यात वंशाच्या सीमा- भौतिक तशाच प्रतीकात्मक-स्वाभाविकपणे आखल्या जातात. हेच जातीच्या बाबतीतही दिसून येतं. गावात लहानाचं मोठं होतानाच्या सामाजिक चित्राने माझी जातीविषयक चेतना रुजवली, ज्यात जातीच्या भौतिक आणि प्रतीकात्मक सीमारेषा स्वाभाविकपणे कोरल्या गेल्या.

गावात लहानाचा मोठा होत असताना मी असे पाहिले की, रजपूत आणि ब्राह्मण शारीरिक श्रम करत नसत, खासकरून गावचा प्रमुख आर्थिक व्यवसाय आणि उदरनिर्वाहाचे मुख्य स्रोत असलेले शेती उत्पादनातील घडणारे श्रम. ब्राह्मण आणि रजपूत दोघेही नांगराला हात लावत नसत. त्याउलट अहीर आणि चर्मकार सदैव नांगराचा वापर करत असत. अहीर मालकीच्या किंवा भाडेकरारावर असलेल्या जमिनीवर नांगर चालवत, तर चर्मकार रजपूत आणि ब्राह्मण यांच्या मालकीच्या जमिनीवर.

ही व्यवस्था अगदी ‘स्वाभाविक’ आहे असे दाखविले जाई आणि माझा समजदेखील तसाच झाला होता अंगमेहनत करणे हे ब्राह्मण आणि रजपूत जातीच्या प्रतिष्ठेच्या विरुद्ध होते; पण इतर जातींसाठी मात्र ते अंगवळणीचे मानले जाई. पुढे कालांतराने जेव्हा मी मॅक्स वेबरचा अभ्यास केला, तेव्हा कुठे मला उलगडले की, अंगमेहनत करणे किंवा ना करणे, हा जातीची योग्यता-अयोग्यता ठरवण्याचा निकष होता, ‘अप्रतिष्ठा’ वा ‘प्रतिष्ठा’ यांच्याशी अन्वित असलेला. त्या काळी मला हे कधीच जाणवले नाही की, रजपूत आणि ब्राह्मण यांचा, मुख्यत्वे रजपुतांचा, गावच्या बहुतांश जमिनीवर मालकी हक्क होता आणि यात सार्वजनिक जमिनीचा भागदेखील सामील होता. त्यामुळे त्यांना कुठलेही शारीरिक श्रम टाळणे सहज शक्य होते, याउलट चर्मकारांच्या मालकीची कुठलीच जमीन नव्हती. त्यामुळे त्यांना पोटापाण्यासाठी रजपूत आणि ब्राह्मणांच्या जमिनींवर काम करणे गरजेचे होते.

मी अतिशय धार्मिक अशा परिवारात वाढलो. आमच्या घरात तीन देवांची प्रतिष्ठापना केली गेली होती–पहिले होते घरातले ठाकूरजी. घरातली वयस्क मंडळी ठाकूरजींची पूजा झाल्याशिवाय अन्नाला हात लावत नसत. मग, विहिरीलगत असलेल्या विशाल पिंपळाखाली शंकराचे छोटे मंदिर होते. तिथून थोडे पुढे गेल्यावर मारुतीचे मंदिर होते. दसरा, दिवाळी आणि होळीच्या उत्सवांशी संबंधित अनेक आख्यायिका होत्या; तसेच धार्मिक विधी असायचे. घरातील पुस्तकांमध्ये केवळ धार्मिक ग्रंथांचा समावेश होता- ‘रामचरितमानस’ (रामायणाचा हिंदी अनुवाद), ‘महाभारत’, ‘प्रेम सागर’ आणि ‘भगवद्गीता’. वर्षातून एकदा आम्ही सारे दुर्गामातेच्या मंदिराची वारी करत असू. हे मंदिर आमच्या गावापासून २० किलोमीटर दूर जिल्ह्याच्या ठिकाणी होते. वर्षातून एकदा आमच्या घराण्याचे पुरोहित आठवडाभर मुक्कामाला असत. त्याशिवाय अनेक भटके साधू-संत घरी येत, आम्ही पुरवलेला शिधा वापरून स्वतः जेवण बनवत, देवी-देवता आणि स्वर्ग-नरक, पाप-पुण्य या विषयांवर बोलत असत.

या वातावरणात वाढताना मी जे जे म्हणून ऐकले, ते खरे मानले. मी वाचलेली पहिली पुस्तकं होती: ‘रामचरितमानस’ आणि ‘महाभारत’. त्यामुळे राम आणि कृष्ण हे देवाचे अवतार आहेत, असेच मी मानत आलो. इंद्रदेवाच्या कृपेने पाऊस पडतो आणि पवन देव (मारुतीचे आध्यात्मिक पिता) वारा निर्माण करतात, असे आम्हाला सांगितले गेले होते. पुढे शाळेत शिकताना, जेव्हा पावसाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण माझ्या कानी पडले, तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे मला खूप जड गेले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

धर्माची कथा आजच्या काळातही प्रस्तुत ठरते; कारण जातीला धर्माच्या परिभाषेत अंतःस्थापित केलं गेलं आहे. ब्राह्मणाचा मान राखणे, त्यांच्यापुढे नतमस्तक होणे, हेच आम्हाला शिकवले गेले होते. रजपुतांचा (क्षत्रिय) जन्म इतर जातींवर आधिपत्य गाजवण्यासाठी झाला आहे, असे आम्हाला सांगण्यात आले होते. जातींतर्गत असलेले हक्क आणि कर्तव्ये दैवी सत्तेने निर्धारित केल्या आहेत, असं आमच्यावर ठसवण्यात आलं होतं. या साऱ्या समजुतींवर अविश्वास दाखवण्याचे कारण नव्हते. धर्माने साऱ्या जातींना घट्ट एकवटून ठेवलं आहे, असं मला बालपणी वाटणं स्वाभाविकच होतं. कारण, वेगवेगळ्या जातींचे हक्क आणि परस्परांतील जबाबदाऱ्या धार्मिक परिभाषांच्या चौकटीत चपखल बसवण्यात आल्या होत्या आणि अर्थातच जमीन आणि त्यावरील हक्क जातीच्या कहाणीपासून वंचित नव्हतेच. जसे वेगवेगळ्या जातींचे हक्क आणि कर्तव्ये देवानं निर्धारित केली होती, तसे रजपुतांचे जमीन हक्क (बहुतांश जमिनींवर असलेला मालकी हक्क, सार्वजनिक भाग धरून) तसेच खालच्या जातींची भूमिहीनता परमेश्वराचीच योजना होती.

गाव सुटले तरी जात सुटत नसे. प्राथमिक शाळेतही मला जातीशी दोन हात करावे लागले. ही शाळा दुसऱ्या गावी असल्यामुळे आम्हाला (वेगवेगळ्या जातीच्या मुलांना) एक किलोमीटर पायपीट करावी लागे. एकाच गावचे रहिवासी अशा सामूहिक ओळखीचे भान जरी आमच्या ठायी असले, तरी आमच्यातील भिन्न भिन्न जातींच्या वेगवेगळ्या अस्मिताच आमच्यातील परस्परसंबंध निर्धारित करत असत. उच्च जातींच्या मुलांना एक प्रकारच्या अधिकाराची जाणीव असे. असं वाटण्याला कोणत्याच औपचारिक परिभाषेचा आधार नव्हता, पण तसे गृहीत धरले जाई. शाळेच्या वर्गात प्रांगणात आणि मधल्या सुट्टीत जातिभेदाचे अनुभव सर्रास दिसून येत. जातींची अनेक ज्ञापके होती. गुरुजनांना उद्देशून केलेल्या संबोधनांनादेखील जातीचे भेद लागू होते. ब्राह्मण शिक्षकांना ‘पंडितजी’ म्हटले जाई. रजपूत अध्यापकांना ‘बाबूसाहेब’ म्हणून पुकारले जाई आणि इतर साऱ्या शिक्षकांना ‘मुन्शीजी’ असे संबोधन जाई. मुस्लीम शिक्षकांना ‘मौलवीसाहेब’ म्हणत, तर ख्रिश्चन शिक्षकांना ‘मास्टरसाहेब’.

प्राथमिक शालेय जीवनातील जातीच्या अनुभवासंबंधी एका घटनेचा उल्लेख मला करावासा वाटतो, ज्याने माझ्या जाणिवेवर खोल ठसा उमटवला. एकदा शाळेतून घरी आल्यावर मी डोक्यावर पट्ट्या बांधलेली काही रजपूत जातीतील मंडळी घराबाहेर बसलेली पाहिली. (एक नियम म्हणून गावातील रजपूत पुरुष सामान्यतः घराबाहेर वावरत तर स्त्रिया घराच्या आत) त्या मंडळीभोवती रजपूत जातीच्याच इतर माणसांचा गराडा होता. वातावरण तणावग्रस्त होतं. काहीशा उत्सुकतेने मी भीतभीतच घरात प्रवेश केला. तिथले वातावरण तर अधिकच गंभीर होते आणि कोणीही मला काही सांगण्याच्या मनःस्थितीत दिसत नव्हते. काही वेळाने मला कळले की, त्या भांडणाचे मूळ कारण एक जमिनीविषयीचा विवाद होता, अशी जमीन ज्यावर एका रजपूत परिवाराने वडिलोपार्जित हक्क दाखवला होता. या परिवाराच्या विरोधात त्या जागेवरील एका खालच्या जातीच्या माजी खंडकरीनं स्वतंत्र मालकी हक्क मागितला होता. याला आधार होता ब्रिटिश राजवटीच्या अस्तानंतर उदयास आलेल्या नवीन सरकारचा जमीनदारी निर्मूलन कायदा. जेव्हा त्या रजपूत परिवारातील माणसे आपल्या जातीतील इतर बांधवांना सोबत घेऊन त्या विवादित जागेचा ताबा मिळवण्यास गेली, तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. त्यांना स्वाभाविकपणे अपेक्षित असलेला मानसन्मान तर दूरच राहिला, उलटपक्षी त्या खालच्या जातीच्या खंडकरीनं आपल्या बांधवाच्या मदतीनं रजपुतांना जबर मारहाण केली. अपमानित आणि घायाळ अवस्थेतल्या त्या रजपुतांनी दुसऱ्याच दिवशी सूड घेतला. त्या घटनेला दशकं उलटूनही त्याची स्मृती माझ्या मनात अजूनही ताजी आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

पुढे माध्यमिक शाळेत तसेच उच्च माध्यमिक शाळेत शिकत असतानादेखील जात एक प्रबळ घटक ठरली. ब्राह्मण आणि रजपूत जातीतील विद्यार्थ्यांमध्ये आधिपत्य गाजवण्यावरून अधूनमधून वाद होत असत, कधी छुपे, तर कधी उघड, ज्याची परिणती कधी कधी मारामारीत होत असे. पाच वर्षांच्या माझ्या शालेय जीवनात मी वसतिगृहातच राहत होतो. तिथे आम्ही सर्व विद्यार्थी एकाच खानावळीत जेवत असू. खानावळीचा आचारी नेहमीच ब्राह्मण जातीचा असे. आम्ही त्याला आदराने ‘पंडितजी’ म्हणत असू. वसतिगृहात खालच्या जातीचा विशेषतः मागासवर्गीय जातीचा एकही विद्यार्थी नव्हता. पण हे स्वाभाविकच असल्यामुळे आम्हाला त्यात काही वावगं वाटलं नाही.

पुढं विद्यापीठात शिकतानाही जातीनं माझा पाठलाग केला. माझ्या शैक्षणिक प्रवासात एक महत्त्वाचा घटक म्हणून जात कायम राहिली- अगदी लखनऊ, जयपूर, दिल्ली अशा वेगवेगळ्या विद्यापीठात शिकवायला लागल्यानंतरही, एवढेच नव्हे तर राजस्थानातील संस्थानांचा अभ्यास करताना आणि दक्षिण आफ्रिकेतील भारतीय वंशाच्या वेठबिगारी मजुरांचा अभ्यास करतानादेखील.

माझ्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आलेला जातीचा अनुभव जात हे भारतीय जीवनाचे वास्तव आहे, हे अधोरेखित करण्याच्या उद्देशाने थोडक्यात मांडला आहे. त्यामुळे माझा सवाल ‘जात वास्तवात आहे का?’ हा नसून, ‘जातीचे वास्तव काय?’ हा आहे; तसेच जात पुरातन काळापासून आजच्या काळापर्यंत समाजशास्त्राच्या मुख्य प्रवाहात कशी काय सामावण्यात आली, हादेखील आहे.

मी कळत नकळत समाजशास्त्रज्ञ झालो

माझे शालेय जीवन वासाहतिक सत्तेच्या नंतर आलेल्या स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळात घडले. तेव्हा वैद्यकीय आणि अभियांत्रिकी शाखांमध्ये प्रवेश मिळवण्याच्या उद्देशाने प्राकृतिक विज्ञानाला विशेष महत्त्व होते. माध्यमिक शाळेत असताना मी सामान्य विज्ञान आणि कृषिविज्ञान हे विषय निवडले होते आणि उच्च माध्यमिक शाळेत कृषिविज्ञानाच्या सोबत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे माझे जोडविषय होते. लवकरच माझ्या लक्षात आले की, मी कृषिविज्ञान, सामान्य विज्ञान आणि गणित यांच्या अभ्यासात बराच मागे पडत चाललो होतो; इतका की, मला एकंदर शाळेचाच कंटाळा येऊ लागला. विज्ञान आणि गणिताला डच्चू द्यायचा म्हणजे अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय क्षेत्रातल्या भवितव्यावर पाणी सोडण्यासारखे होते. मात्र माझ्यापुढे दोन पर्याय होते. एक- विज्ञान आणि गणिताला डच्चू देणे किंवा दोन- शाळेलाच राम राम ठोकणे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

विज्ञानाच्या वर्गात दररोज हरवल्यासारखे बसण्याची कल्पना दिवसेंदिवस असह्य होत चालली होती. माझ्या मनाला रुचेल असे काहीतरी शिकावे यासाठी भविष्याची चिंता न करता मी ‘लिबरल आर्टस’ची शाखा निवडली; अर्थातच घरच्या मंडळींच्या इच्छेविरुद्ध. हा निर्णय सोपा नव्हता, कारण माझा परिवार माझ्या सामाजिक, आर्थिक आणि भावनिक आधाराचा एकमेव स्रोत होता. पण मी कसातरी माझ्या निर्णयाप्रत पोहोचलो. माझ्या कुटुंबीयांच्या मदतीने हे शक्य झाले, हे वेगळे सांगणे नको. लखनऊ विद्यापीठातल्या निम्न पदवीधर अभ्यासक्रमासाठी मी मानवशास्त्र या विषयाची निवड केली. पण पुढे मास्टर्सला पोहोचेपर्यंत मी तो विषय सोडून दिला. त्या घटकेला विद्यापीठातील सामाजिकशास्त्राच्या संदर्भात एकच पर्याय उरला होता. तो म्हणजे समाजशास्त्र आणि अशा रीतीने मी कळत-नकळत समाजशास्त्रज्ञ झालो.

समाजशास्त्र ते राजकीय अर्थव्यवस्थाः एक संक्रमण

लखनऊ विद्यापीठात शिकवण्यात येणाऱ्या समाजशास्त्राचा भर पारंपरिक सिद्धान्तावर (मुख्यत्वे डर्खाईम आणि वेबर) आणि सामाजिक तत्त्वज्ञानावर होता. याला जोड होती हिंदू सामाजिक सिद्धान्ताच्या घटकांची. आम्हाला केनचे ‘धर्मशास्त्र’, राधाकृष्णांचे ‘हिंदुइजम’, ए. के. कुमारस्वामींचे ‘हिंदुइजम अँड बुद्धिजम’, यांच्याबरोबर ‘मनुस्मृती’वरील भाष्यांचा अभ्या करावा लागे. पुढे राजस्थान विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर मला विकासाच्या अभ्यासात रुची निर्माण झाली. राजस्थानातून मी मॅकगिल येथे विकासाच्या क्षेत्रात पदवीचा अभ्यास (Developmental studies) करावयास गेलो. पण वर्षभरातच मला तो अभ्यास थांबवावा लागला. माझ्या शैक्षणिक (आणि राजकीय) जाणिवा तयार होण्याच्या दृष्टीने हा एक कलाटणी देणारा बिंदू ठरला.

माझ्या एकंदर समाजशास्त्रीय अभिमुखतेवर माझी मलाच शंका येऊ लागल्याची ही सुरुवात होती. यानंतर बऱ्याच जाणिवांकडे, त्या जसजशा मूळ धरू लागल्या, मी शंका घेऊ लागलो. तोपर्यंत मला राजकीय अर्थव्यवस्थेची पुसटशीदेखील ओळख नव्हती, कारण माझा या विषयाशी कधीच संबंध आला नव्हता. मात्र दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे प्रथम नॅशनल फेलो आणि मग प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यावर मी समाजशास्त्र सोडून राजकीय अर्थव्यवस्थेकडे वळू लागलो. आणीबाणीच्या काळात आलेला अनुभव आणि त्याचे झालेले परिणाम, या दोहोंमुळे मी आपसूक राजकीय अर्थव्यवस्थेच्या प्रवासाला सज्ज झालो. असा प्रवास जेथून मागे फिरणे शक्य नव्हते. आणीबाणीने मला समाज, इतिहास आणि समाजशास्त्राच्या मुख्य प्रवाहाचे निरीक्षण करण्यासाठी उपयुक्त असा चिकित्सक दृष्टीकोन,, तसेच सैद्धान्तिक साधने पुरवली. माझे हे पुस्तक म्हणजे राजकीय अर्थव्यवस्थेच्या चष्म्यातून केलेले जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राचे तटस्थ विश्लेषण होय.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कॅनडास प्रयाण

समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या सुरुवातीसच जाती या विषयात मला रुची निर्माण झाली. लखनऊ विद्यापीठात समाजशास्त्राची पदवी मिळवण्याकरिता मला जातीचा अभ्यास करावा लागला. माझे जातीविषयीचे कुतूहल ‘संस्कृतीकरण आणि पाश्चात्त्यीकरण’ हा पदव्युत्तर पातळीवरील प्रबंध लिहिताना आणखीनच सखोल झाले. माझा पहिला प्रकाशित प्रबंध जाती या विषयावरच होता. त्यानंतर दुसऱ्या एका लेखकाच्या जातीवरील अभ्यासावर टिप्पणी केली. जसजसा काळ पुढे गेला, माझे जातीविषयक लिखाण सुरूच राहिले. असे असूनही मला जाती या विषयावर पुस्तक लिहावे असे वाटले नाही. भारतातून कॅनडा येथे पोहोचल्यावर आणि तिथे शैक्षणिक क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी कराव्या लागलेल्या संघर्षामुळे माझ्या जातीबद्दलच्या कुतूहलावर अपायकारक परिणाम झाला.

कॅनडातील विद्यापीठांत भारतीय जातींसकट समाजाच्या सर्वच पैलूंबाबत अनास्था दिसून आली. त्याच वेळी मला अतिशय पाश्चात्त्य स्वरूपाचा (कॅनडाशी निगडित) एक ज्वलंत प्रश्न आढळला. हा प्रश्न होता वांशिकता आणि वंश यांच्याशी संबंधित. मेरीटाईम येथील एका विद्यापीठातल्या माझ्या पहिल्याच नोकरीत मला वंश हा विषय शिकवण्याची संधी प्राप्त झाली. हा एक चित्तवेधक अनुभव ठरला. मेरीटाईमच्या दोन विद्यापीठांत मी सलग तीन वर्षे अध्यापन केलं आणि प्रत्येक वर्षी वंश/खंडकरी हे विषय शिकवले. पुढे व्हिक्टोरिया, विल्फ्रिड लॉरियर आणि सरतेशेवटी यॉर्क अशा तीन विद्यापीठांत शिकवताना मी प्रत्येक ठिकाणी तेथील पहिली पाच वर्षे वंश आणि वांशिकता या विषयांचा अभ्यासक्रम राबवला. तोवर मला वंश, वांशिकता आणि जात यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी लागणाऱ्या अनुभवाचे (आणि थोड्या स्थैर्याचे) पाठबळ लाभले होते. मात्र, मी जात हा विषय माझ्या अध्यापनात पहिल्यांदा (आणि थोडेसे कचरतच) तेव्हाच सामील केला, जेव्हा मी सामाजिक स्तरीकरण हा विषय शिकवण्यास सुरुवात केली आणि हाही एक रंजक अनुभव ठरला. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे माझी जातीविषयीची रुची पुन्हा जागी झाली.

संशोधनातील योगायोग

दक्षिण आफ्रिकेला प्रयाण करण्याच्या मुहूर्तावर टोरोंटो येथील दीपंकर गुप्ता यांच्याशी घडलेला संवाद आजही माझ्या स्मरणात आहे. त्यांनी त्या वेळी म्हटलं होतं की, वेळ आणि साधन यांच्याअभावी मला दक्षिण आफ्रिकेत भारतीयांविषयी फारशी माहिती मिळणार नाही; पण भारताविषयी मात्र अचंबित करणारे बरेच ज्ञान मिळण्याचा संभव आहे. हे विधान भविष्यसूचक ठरले. दक्षिण आफ्रिकेत मला भारतीय मजुरांची वेठबिगारी लागू असताना, तसेच रद्द झाल्यावर जात आणि जातसंरचनेवर झालेल्या परिणामांचे सखोल ज्ञान मिळाले. मी दक्षिण आफ्रिकेला जातीचा अभ्यास करायला गेलो नव्हतो; पण योगायोगाने नेमके तेच माझ्या हातून घडले.

माझ्या पुस्तकाचे प्रयोजन

काही काळापूर्वी माझे मित्र आणि माजी सहकारी अब्दुल कलाम (तेव्हाचे मद्रास विद्यापीठातील मानवशास्त्राचे मान्यवर प्राध्यापक आणि अध्यक्ष) मला एका परिषदेत भेटले आणि आम्ही जातीच्या समाजशास्त्राविषयी विचारांची देवाण-घेवाण केली, विशेषतः जातीच्या प्रादेशिक आणि ऐहिक वैविध्याविषयी, समाजशास्त्रीय वृत्तान्तातून ज्यांचा उल्लेख उघडपणे वगळण्यात येतो. याचे कारण असे की, त्या वृतान्तांचा कल काही विशिष्ट संकल्पनांचा आधार घेऊन जातीवर समानता प्रक्षेपित करण्याकडे असतो. या तसेच जातीच्या समाजशास्त्रीय अभ्यासाच्या इतर बाबींवर प्रकाश टाकण्यासाठी आम्ही एक लेख लिहायचा ठरवला.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

यासंबंधी जातीच्या जुन्या-नव्या अभ्यासांचे जेव्हा मी वाचन केले, तेव्हा त्यांच्यात मला गंभीर स्वरूपाच्या काही उणिवा प्रकर्षाने दिसून आल्या. एक बाबीवरून दुसऱ्या बाबीकडे माझे विचारचक्र फिरू लागताच इतर अभाव आढळले. लवकरच माझ्या लक्षात आले की, जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राच्या अभ्यासातील उणिवा एका लेखात सामावणे अशक्य आहे. जातीच्या मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये प्रत्येक बाबतीत एकमत आहे, कुठलाच वादविवाद नाही असे माझे म्हणणे नाही, पण त्यांच्या आंतरिक मतभेदांव्यतिरिक्त बरेच काही महत्त्वाचे त्यांच्या अभ्यासातून वगळले गेले आहे. या पुस्तकाचा हेतू त्या उणिवांवर बोट ठेवण्याचा आणि पर्याय सुचवण्याचा आहे.

विचारमंथनाचे आमंत्रण

गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जातीविषयक लिखाणात मी जातीच्या अभ्यासात असलेल्या दोन प्रकारच्या उणिवा दर्शवल्या आहेत, सैद्धान्तिक आणि पद्धतिशास्त्रीय. ज्यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे, असे सुचवले आहे. व्यष्टिअध्ययनांच्या संदर्भात दोन परस्परविरोधी टोकाचे प्रवाह आढळतात - १) मुख्य प्रवाहातले समाजशास्त्र आणि २) मार्क्सवाद. त्यापैकी पहिला प्रवाह इतिहासाकडे कानाडोळा करतो आणि भौतिक परिस्थितीच्या चौकटीबाहेर निव्वळ कल्पनेच्या स्तरावर जातीचा अभ्यास करतो. दुसरीकडे मार्क्सवादी जातीच्या अभ्यासालाच मुळी वर्ज्य मानतात. पहिल्या गटाच्या मते मार्क्सवादी जातीला पायाभूत रचनेनी आखलेली भव्य रचना मानतात आणि म्हणून ती त्यांच्या ठायी दुय्यम आणि गौण आहे. हा दृष्टीकोन म्हणजे बीभत्स मार्क्सवादाचा नमुना नसून मार्क्सवादाचेच बीभत्सीकरण आहे. जातीची रचना पायाभूत आहे की, भव्य हा प्रश्नच मुळी निरर्थक आहे. दोन्ही प्रकारच्या रचना जातीलाच छेद देतात. मात्र मार्क्सवाद्यांबरोबर असलेल्या त्यांच्या वैचारिक संग्रामात गाफील असलेले समाजशास्त्रज्ञ दुसऱ्या टोकाची चूक करतात- ती म्हणजे पायाभूत रचनेला डावलून भव्य रचनेवरच लक्ष केंद्रित करण्याची. ल्युईस ड्युमॉन्टवरील समीक्षेच्या बाबतीत हे ठळकपणे दिसून येतं. समाजशास्त्राच्या मुख्य प्रवाहातील ड्युमॉन्टचे समीक्षक या महत्त्वाच्या बाबीकडे पुरेसे लक्ष देताना दिसत नाहीत. जातीच्या समाजशास्त्रीय अभ्यासाची दुसरी समस्या म्हणजे त्यांनी केलेली इतिहासाची उपेक्षा. ते मार्क्सवादाला आदर्शवाद म्हणून हिणवतात, मात्र त्यांना स्वतःची वैचारिक अभिमुखता आणि त्याच्या अनुषंगाने तयार झालेला जातीविषयक दृष्टीकोन दिसत नाही.

माझे पुस्तक मुख्य प्रवाहातील समाजशास्त्राचा तिरस्कार नाही, तर ते जातीविषयी पर्याप्त विचारमंथन घडवून आणण्यासाठी केलेले अगत्याचे आमंत्रण आहे.

‘जातिव्यवस्थेची नवी समीक्षा : पवित्रतेकडून अपवित्रतेकडे’ - हिरा सिंह

मराठी अनुवाद - सुधीर यशवंत राईकर

सेज पब्लिकेशन, दिल्ली

पाने – ३०७, मूल्य – ४९५ रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......