…तसं झालं तर भविष्यकाळात मराठी कथा जागतिक पातळीवर जाणारी आणि काळाच्या ओघावर टिकून राहणारी होईल
पडघम - साहित्यिक
राजन खान
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 23 November 2022
  • पडघम साहित्यिक राजन खान Rajan Khan मराठी कथा Marathi Story मराठी कादंबरी Marathi Novel

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार राजन खान यांनी कालच्या १९ नोव्हेंबर २०२२ रोजी ६०व्या वर्षांत पदार्पण केलं. त्यानिमित्तानं त्यांचा हा मराठी कथेविषयीचा एक जुना लेख...

..................................................................................................................................................................

१.

एकूणच मराठी गद्य वाङ्मयाचा इतिहास फार दीर्घ नाही. त्यातही कथा-कादंबऱ्या या वाङ्मयप्रकारांचा तर मोजून शंभर-दीडशे वर्षांचाच इतिहास आहे. आज घडीला मराठी साहित्यसृष्टीचा पसारा ऐसपैस वाढलेला आहे आणि त्यात लिहिणारांची संख्याही अफाट वाढलेली आहे. मराठीत आज सर्वाधिक लिहिली जाते ती कविता. ती छापली किती जाते न् वाचली किती जाते, हा प्रश्नच असला तरी लिहिण्याची बाधा झालेली माणसं पहिल्यांदा लेखणी उचलून सरळ कविताच लिहायला सुरुवात करतात. कदाचित लिहायला तो छोटा आणि सोपा प्रकार वाटत असल्यामुळंही तसं घडत असावं. कवितेच्या खालोखाल दुसरा लिहिला जाणारा साहित्यप्रकार म्हणजे, कथा.

इतर कुठल्याही गद्य लेखनप्रकारापेक्षा मराठीत कथाच जास्त लिहिली जाते. दिवाळी अंक नावानं वार्षिकांक प्रकाशित करणारी मराठी ही जगातली एकमेव भाषा आहे. मराठीत दरवर्षी साधारणपणे पाचशेच्या आसपास दिवाळी अंक छापले जातात. त्यांचा मुख्य आधार कथा-साहित्य हाच असतो. माझ्या अंदाजानुसार एका दिवाळी अंकाच्या हंगामातच तीन-चार हजार कथा मराठीत लिहिल्या जातात. त्याशिवाय वर्षभर विविध नियतकालिकांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कथा आणि नुसत्या पुस्तकांसाठी लिहिल्या जाणाऱ्या कथा यांचा मिळून अंदाज केला तर मराठीत दर वर्षी आठ-दहा हजार कथा तरी लिहिल्या जात असाव्यात.

थोडक्यात कथांचं पीक मराठीत विपुल आहे, कथा लिहिणारांना तुटवडा नाही, ही गोष्ट निश्चितच चांगली आहे. ही झाली कथेची संख्यात्मक बाजू. पण गुणात्मक, दर्जात्मक, विषयात्मक आणि आशयात्मक बाजूनंही कथेकडं पाहणं आवश्यक आहे.

कोणत्याही साहित्यप्रकाराच्या दृष्टीनं शेदीडशे वर्षांचा काळ हा दीर्घच आहे आणि एवढ्या काळाच्या संस्कारात कोणत्याही साहित्यप्रकारानं निरनिराळ्या उंच्या गाठणं काहीच अवघड नाही. आणि गेल्या शे-दीडशे वर्षांत काळ एवढ्या झपाट्यानं आधुनिक झाला, बदलत गेला, समाजानं सुधारणेची एवढी स्थित्यंतरं अनुभवली, त्या तुलनेत मराठी कथा कुठं आहे, हे शोधणंही आवश्यक आहे.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

मराठी गद्य वाङ्मय खऱ्या अर्थानं उदयाला आलं आणि त्यानं आकार घेतला तो इंग्रजांच्या अमदानीत. इंग्रजांच्या काळात जगाची जेवढी दारं आपल्या मराठी मानसासाठी उघडली, त्यातलं एक दार आपल्यासाठी वाङ्मयाचंही उघडलं. त्यानं मराठी कवितेला नवी रचना दिली, तर कथा, कादंबरी हे नवे प्रकार मराठीत रुजवले, मराठी रंगमंचही त्यामुळं बदलला. जास्त करून इंग्रजी भाषेमुळंच आपल्याला जगभराच्या वाङ्मयाचा परिचय होऊ लागला. इंग्रजीच्या तंत्र, मंत्र, शैली आणि मांडणीसारख्याच कथा आपण मराठीत लिहू लागलो आणि त्यात आजही फारसा बदल नाहीच. कथांचे अनेक प्रकारही आपण इंग्रजांकडूनच उचलले आणि अजूनही आपला असा स्वतंत्र मराठी कथाप्रकार जन्माला घालण्याची ऐपत आपण दाखवू शकलेलो नाही.

२.

कथा किंवा कोणताही साहित्यप्रकार लिहिण्याचे दोन प्रकार आहेत, असं मला वाटतं. जेवढं स्वत:च्या जगण्यात येतं, तेवढंच लिहायचं, हा एक प्रकार आणि आपल्या जगण्याबाहेर उतरून, मुद्दाम लेखक म्हणून दुसऱ्या, परक्या जगण्याचा अनुभव घ्यायचा आणि मग लिहायचं, हा दुसरा प्रकार. बहुतेक सर्व मराठी लेखक पहिल्या प्रकारात बसून लिहिणारे असतात. दुसऱ्या प्रकारात मराठी लेखक अपवादानंही सापडत नाहीत. त्या दुसऱ्या प्रकारात स्वत:चं जगणं सोडून, तात्कालिक कारणांसाठी आणि काळासाठी दुसऱ्या जगण्यात शिरण्याची तयारी लागते, त्यासाठी संशोधक वृत्ती व अभ्यासक वृत्ती लागते, ती मराठी लेखकांनी आजवर दाखवलेली नाही आणि त्यामुळंही एकूणच मराठी वाङ्मयात किंवा कथावाङ्मयात जगावेगळं किंवा जगावर प्रभाव टाकणारं काही घडलेलं नसावं असं वाटतं.

जे जगभरातून मराठी माणसांपर्यंत येऊन पोहोचलेलं वाङ्मय आहे त्याचा स्वत:चाही इतिहास काही दीर्घ नाही. तोही मोजून शेदीडशे वर्षांचाच आहे. आपल्याइतकाच आहे. तरीही ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचलं, पण आपण त्याच्यापर्यंत अजूनही पोहोचू शकत नाही, याची कारणं आपण शोधायला हवीत.

स्वत:च्या जगण्यात जेवढं येतं, तेवढंच लिहायचं, हा जो वाङ्मय किंवा कथा लिहिण्याचा प्रकार आहे, तो मराठी लेखकांनी सतत आणि जोरकसपणे हाताळला. पण त्या लेखनप्रकारातही मराठी लेखकांचा एकांगीपणा, संकुचितपणा, आत्ममग्नता आणि आत्मतुष्टपणा, कप्पेबंदपणाच जास्त राहिला, असं दिसून येतं.

लिहिता येणारा लेखक असणं आणि खरा लेखक असणं, यात फरक आहे. खरा लेखक असण्याची पहिली अट ही आहे की, माणूस म्हणून तो कसाही जगत असो, काहीही जगत असो, जेव्हा तोच माणूस लेखक म्हणून कागदावर लिहायला बसतो, तेव्हा तो स्वत:तून पूर्ण बाहेर यायला हवा. स्वत:पासून पूर्ण सुटा, खुला आणि तटस्थ व्हायला हवा. लिहिण्याच्या आशयविषयाशी तो पूर्ण तादात्म्य पावायला हवा आणि त्याच वेळी त्या आशयविषयापासून स्वत: आणि त्याचा स्व पूर्णपणे परका असायला हवा. स्वत:च्या जगण्यात जेवढं येतं, तेवढंच लिहिण्याच्या प्रकाराबाबतही ही अट लागू होते. अगदी आत्मकथन लिहायचं असलं तरी तेवढं ताटस्थ्य लिहिण्याच्या बाबतीत त्या लेखकात असायला हवं. तसं ताटस्थ्यपूर्ण लिहू शकणारा लेखकच खरा श्रेष्ठ लेखक आणि त्याचं साहित्य खरं, श्रेष्ठ साहित्य. असं लिहू शकणारा लेखकच काळ आणि समाजाच्या मर्यादा ओलांडून सर्वदूर पोहोचतो आणि जागतिक पातळीचा होतो, असं मला वाटतं.

या ताटस्थ्याच्या व्याख्येत मराठी लेखक फारसे बसतात असं दिसत नाही. स्वत:च्या जगण्यात येतं तेवढंच लिहायचं असं असलं तरी, ते स्वत:बाहेर येऊनच लिहावं लागेल, ही श्रेष्ठ आणि कालातीत साहित्याची अट मराठी लेखकांनी पाळलेली दिसत नाही आणि त्यामुळंच त्यांची कथा किंवा इतर साहित्य काळावर आणि जगावर राज्य करत नाही. बाहेरच्या जगावर जाऊ द्या, फक्त आपल्या देशावरसुद्धा राज्य करताना दिसत नाही. बंगाली, कानडी, पंजाबी, उर्दू साहित्य जेवढा प्रभाव देशावर गाजवतं, तेवढाही मराठी साहित्याचा आणि विशेषत: कथावाङ्मयाचा प्रभाव देशावर नाही. दोन नावं इथं मला आठवतात. चेकॉव्ह आणि सआदत हसन मंटो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मराठी कथेच्या मागासलेपणाला अनेक कारणं आहेत. त्यातली काही कारणं मी इथं नमूद करतो. मुख्य कारण आहे ते खरा आणि श्रेष्ठ लेखक कसा असावा, याची जी व्याख्या आपण इथं करतो आहोत, त्या व्याख्येत बहुतेक मराठी लेखक बसतच नाहीत. लेखक माणूस म्हणून कसाही असला तरी त्याच्या लिहिण्याच्या आशयविषयापासून लिहिताना तो पूर्ण अलिप्त, तटस्थ असला पाहिजे. त्याच्या व्यक्तिगत आचारविचारांचा आणि जगण्याचा प्रभाव लेखनविषयावर पडता कामा नये आणि त्यानं स्वत:शी प्रामाणिक राहून नव्हे, तर विषयाशी प्रामाणिक राहून लिहिलं पाहिजे ही ती व्याख्या आहे. यालाच मी स्वत:च्या जगण्यातून बाहेर येऊन लिहिणं म्हणतो.

कोणत्याही विषयाला आपल्याला वाटणारी, दिसणारी एक बाजू असते, पण त्याही पल्याड जाऊन आपल्याला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते, तर आधी आपण ती दुसरी बाजू शोधून, दोन्ही बाजूंचा सारासार विचार करून, त्यांचा मध्य काढून, सम्यक बुद्धीनं लिहिलं पाहिजे, तसं लिहिताना आपलं हृदय विशाल असलं पाहिजे, कुणा एका बाजूची तळी उचलून धरतोय आणि दुसऱ्या कुणा बाजूवर अन्याय करतोय असं घडलं नाही पाहिजे, तरच ते लिखाण कसदार आणि काळाच्या ओघात कायम टिकून राहणारं होईल, याचं भान मराठी लेखकांकडं फारसं दिसत नाही. मराठी लिखाण त्या त्या काळापुरतं, काही काही हेतू घेऊन गाजतं, गाजवलं जातं, पण ते आपल्या देशप्रदेशाच्या सीमा ओलांडून आणि काळाच्या मर्यादा ओलांडून लांबवर पोहोचत राहतं असं होत नाही. मराठी लेखक आणि त्यांचं गाजणं तात्कालिक ठरतं आणि पिढी दर पिढीचा चालत राहणारा सलग वाचक त्यांना मिळत नाही. पन्नास-पंच्याहत्तर वर्षांपूर्वीच्या कथालेखकांची नावंसुद्धा आज आपल्याला आठवत नाहीत, अशी अवस्था होते.

ज्या समाजात भेदांचा तुफान बुजबुजाट असतो, तो समाज कमालीचा अस्वस्थ, अशांत, बेचैन, गोंधळलेला, भरकटलेला, विविध अनाचार आणि अत्याचारांना ऊत आलेला, भोंदू, ढोंगी, हरामी आणि बेनवाड असतो. अशा समाजातली माणसामाणसांतली सर्वच पातळ्यांवरची स्पर्धा, ईर्ष्या, असूया तीव्र वाढते. सर्वच स्तरांवर माणसं एकमेकांशी टकरत, लढत, संघर्ष करत असतात. एकमेकांच्या उरांवर बसत असतात. खरं तर समाजाची ही बिकट आणि बेकार स्थिती म्हणजे त्या समाजातल्या तमाम लेखकांना लिहायचं भांडवल किंवा मालमसाला म्हणून अतिशय पूरक आणि फायदेशीर. समाज जेवढा अनागोंदीचा, तेवढा लेखकांसाठी विषयांचा, आशयांचा पुरवठा मुबलक. जगात नुसत्या सुखाच्या गोष्टी लिहिता येत नाहीत. रोचक, वाचनीय, दर्जेदार गोष्टी होतात त्या नेहमी दु:ख, दारिद्र्य, दैन्य, समस्या, संकटं, अडचणी यांच्याच. त्या अर्थानं मराठी समाज आजच्या मराठी लेखकांना विषय पुरवण्याच्या दृष्टीनं अत्त्युच्च टोकावर आहे. मराठी समाज सर्वच बाबींत एवढ्या प्रमाणात भंगलेला आहे की, मराठी लेखकांना लिहिण्याच्या दृष्टीनं हा काळ अतिशय आव्हानात्मक आणि आवाहनात्मक आहे. त्यांच्यासाठी विषयांचा तुटवडा नाही. इतके विषय सभोवताली आहेत की, लेखक म्हणून जगायला त्यांना दहा-बारा लाख वर्षांचं आयुष्यही कमी पडेल.

मराठी लेखक माहीत करून घेऊन लिहीत नाहीत, तर फक्त माहीत असलेलं तेवढंच लिहितात, ही गोष्ट खरीच असली तरी माहीत असलेलं तरी लिहिताना खऱ्या अर्थानं दिसतात का?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

असा एक आरोप मराठी साहित्यावर सातत्यानं केला जातो की, एवढी मोठी भारत-पाक फाळणी झाली, तिचं साधं दर्शनसुद्धा मराठीत होताना दिसत नाही. त्या एवढ्या मोठ्या फाळणीचं जाऊ द्या हो, ती फार दूर घडली, पण जे काही मराठी प्रांतात घडत असतं, त्याचं तरी खरं दर्शन मराठी साहित्यात कुठं घडतं? उदाहरणार्थ, मराठी प्रांतभर सतत धार्मिक, जातीय, सांप्रदायिक दंगली होतात, त्यावर तरी कुठं लिहिलं जातं? मराठवाड्यात एवढं मोठं विद्यापीठ नामांतर आंदोलन झालं, त्यावर तरी दलित सोडून इतर जातिधर्मांच्या लेखकांनी कुठं लिहिलंय? गुजर-मारवाड्यांची एवढी मोठी स्थलांतरं झाली, त्यावर मराठी साहित्यात काय आहे? आदिवासी आणि भटक्याविमुक्तांची एवढी परवड झाली, तिच्यावर त्यांच्यातल्या सोडून इतरांनी काय लिहिलंय? ब्राह्मण सोडून ब्राह्मणांच्या हालअपेष्टांचं कुणी काय लिहिलंय? पक्षीय राजकारणांनी मराठी प्रांतात जी वाताहतखोर उलथापालथ चालवलीय तिच्यावर कुणी काय लिहिलंय?

असे कित्येक विषय आहेत जे भोवती दिसत असूनही, अनुभवत असूनही मराठी लेखक त्यावर लिहीत नाहीत. मराठी लेखकांची संख्या आजमितीला भरपूर आहे, पण त्याचबरोबर त्यांच्याकडून मुद्दाम किंवा नकळत दुर्लक्षित राहणाऱ्या विषयांची संख्याही अफाट आहे. ते लिहिले जात नाहीत हे मराठी साहित्याचं मोठं वैगुण्य आहे.

३.

मराठी लेखकांना भेद असतात, हे एक वेळ आपण मान्य करू, पण त्यांनी लिहिलेल्या कथेचेसुद्धा भेद पाडण्याची प्रथा आजकाल जोरात प्रचलित आहे, ती मात्र माझ्या स्वत:च्या पचनी पडत नाही.

मी असं मानतो की, कथा ही फक्त कथाच असते. कथा म्हणजे सांगण्याची गोष्ट. किंवा ‘सांगणं’ म्हणजेही कथा. सांगणं हे नुसतं सांगणं असतं, त्याची वर्गवारी होऊ शकत नाही. आदिम काळात माणसात जेव्हा संवेदना निर्माण झाल्या, तेव्हापासून माणूस सांगणं सांगतो आहे. माणसांचा समूह टिकवून धरणं, माणसाच्या काळाची नोंद पुढच्या पिढ्यांना धडा मिळावा म्हणून नोंदवून ठेवणं, एकमेकांशी व्यवहार सुरळीत होणं आणि त्यातून जगणं सुसह्य, सुरक्षित, शांत, सुखी होणं, असे माणसाच्या सांगण्यामागं हेतू असतात.

या सांगण्याच्याच आदिम परंपरेचा एक आविष्कार म्हणजे गोष्टी किंवा कथा. त्या आविष्कारात आता आता, कालपरवा माणसांनी आपल्या भेदनीतीनुसार वर्गवारी सुरू केली आहे. जगभर लिहिल्या जाणाऱ्या कथांमध्ये फारसे भेदप्रकार असल्याचं आढळत नाही, मराठी कथेमध्ये मात्र बेसुमार भेद आहेत. ग्रामीण, दलित, ललित, ब्राह्मणी, अब्राह्मणी, शहरी, महानगरी, स्त्रीवादी, सामाजिक, कौंटुंबिक, कलात्मक, मुस्लीम, जैन, इत्यादी, इत्यादी. अशी कथांची विभागणी म्हणे अभ्यासकांना उपयुक्त असते. कथांचा अभ्यास करताना त्यांना ती वर्गवारी उपयुक्त ठरते. मुळात समाजात अभ्यासक असतात किती? मूठभरसुद्धा नसतात. मुळात अभ्यासक नावाची तरी वेगळी जात कशाला करायची? बाकीचे वाचक काय अभ्यासक नसतात? तमाम बिनचेहऱ्याचे वाचक मिळूनच कुठली कथा वाचायची, काळाच्या ओघात टिकवून धरायची, कुठल्या कथेपासून काय धडा घ्यायचा हे ठरवतात.

कथेची उपयुक्तता, निरुपयोग हे वाचकच ठरवतात. (या वाचकांमधल्याच काही वाचकांना स्वत:ला चेहरा मिळावा असं वाटतं न् ते अभ्यासक होतात.) अभ्यासकांना समजा कथेबद्दल बोलायचं असेल तर ते अमक्या कथेत तमका विषय आणि ढमका आशय मांडलेला आहे, असं बोलू शकतात की! त्यासाठी कथेला कुठल्या तरी एका वर्गवारीच्या कप्प्यात कशाला घालायचं? त्यामुळं, मला वाटतं, त्या कथेचा, त्या कथेतल्या सांगण्याचा संकोच होतो. त्या कथेला समाजाचा, जगाचा विस्तृत आणि असीम अवकाश मिळू दिला जात नाही, तर ती कथा एका तात्कालिक कोंडवाड्यात कोंडली जाते. ती कथा प्रचारकी पत्रकाप्रमाणे होते न् तिच्यातला ‘सांगणं’ या आदिम परंपरेचा दिलखुलासपणा निघून जातो. समजा, अजून हजार वर्षांनी मराठी समाजात एकही जात नसेल, किंवा काही जाती नष्ट झालेल्या असतील, तेव्हा आजच्या जातीय वर्गवारीनं पाहिल्या किंवा लिहिल्या गेलेल्या कथांचं मोल कसं आणि काय असेल? तेव्हा त्या कथा कुठल्या अर्थानं अर्थपूर्ण ठरतील?

पुन्हा आज या वर्गवाऱ्या असतात त्याही विकृतच असतात. दलितांशिवाय ज्यांनी कुणी दलितांबद्दल कथा लिहिल्या आहेत, त्यांना दलित कथाकार आणि त्यांच्या कथेला दलित कथा म्हटलं जात नाही. ब्राह्मणांशिवाय ज्यांनी ब्राह्मणविषयक कथा लिहिल्यात त्यांना ब्राह्मण कथाकार आणि त्यांच्या कथेला ब्राह्मणी कथा म्हटलं जात नाही. ग्रामीण कथा म्हणजे पुन्हा शेतकऱ्यांभोवती घुटमळणाऱ्या कथा. (त्यांचा आता कृषिजन साहित्य म्हणून वेगळा भेद निर्माण केला जातोय.) ग्रामीण भागात काय फक्त शेतकरीच राहतात काय?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

इतर जाती, धर्म, व्यवसायाचे लोक राहत नाहीत काय? भटके-विमुक्त, आदिवासी, दलित हेही ग्रामीण भागात राहतात. मग त्यांनी लिहिलेलं साहित्य ग्रामीण का नाही? खेड्यातल्या मुसलमानांवर लिहिलेल्या साहित्याला ‘ग्रामीण साहित्य’ म्हटलं जात नाही. एवढंच कशाला, कोकणातल्या असंख्य लेखकांनी कोकणी जगण्याबद्दलच्या असंख्य कथा-कादंबऱ्या लिहिल्या, कोकण हा ग्रामीणच भाग आहे, हे आपल्या सगळ्यांना उघडपणे ठाऊक आहे, पण आपण कोकणी साहित्याला ग्रामीण साहित्य आणि त्या लेखकांना ग्रामीण साहित्यिक म्हणत नाही.

स्त्रीवादी साहित्य नावाचा एक प्रकार सध्या मराठीत प्रचलनात आहे. त्याच्या विरोधात भेदनीतीनुसार अजून पुरुषवादी साहित्य हा प्रकार का अस्तित्वात आला नाही, याचं आश्चर्य वाटतं. जगण्याबद्दल आणि जगण्यातून व्यथित झालेल्या आणि स्त्रीच्या माणूस म्हणून जगण्याच्या हक्काच्या स्त्रियांच्या गोष्टी म्हणजे स्त्रीवादी साहित्य. माणसांसंबंधी जगात जे जे साहित्य लिहिलं जातं, त्यात अपरिहार्यपणे स्त्री आणि पुरुष या दोन्हींसंदर्भात लिहिलं जातं. त्यात काही थोडं प्रमाण सोडलं तर स्त्रियांविषयी काही विकृत, विचित्र लिहिलं जात नाही.

असं दिसतं की जगातले बहुतेक गंभीर लेखक स्त्रियांविषयी कळवळ्यानंच लिहितात. मराठी साहित्याचंही ते थोर वैशिष्ट्य आहे की, इथल्या पुरुष लेखकांनीसुद्धा स्त्रीविषयी ममतेनं आणि मायेनंच लिहिलेलं आहे. स्त्रियांवर होणारे अन्याय, स्त्रियांचे हक्क यावर लिहिलेलं आहे. तसंच लिहिण्याची मराठी परंपरा आहे. पण त्या तमाम लेखकांच्या साहित्याला कधीही स्त्रीवादी साहित्य म्हटलं गेलेलं नाही.

थोडक्यात, कथांच्या प्रकाराचे भेद पाडून कथा लिहिली जाणं हे मला गैर वाटतं न् साहित्यसृष्टीच्या एकूण विकासाला आणि संभावित विशालतेला हानिकारक आहे असं वाटतं. अभ्यासकांचा अभ्यास होतो, पण मराठी साहित्यसृष्टीचं वाटोळं होतं. अभ्यासकांच्या या ‘भेदिक’ वर्गवारीच्या निकषांनी मराठी साहित्य खुरटलेलं आणि संकुचितच राहतं, हे आपण लक्षात घ्यावं लागेल.

४.

कथांची मापं ठरवण्याची एक चुकीची प्रथा आपल्याकडं अस्तित्वात आली आहे. पुन्हा सांगायचं तर, कथा ही कथाच असते, तिला मापाचा आधार घेण्याची गरज नसते. कथा म्हणजे सांगणं, त्या सांगण्यात सांगायचा एक विषय पूर्ण करणं किंवा आणलेले सर्व विषय पूर्ण करणं म्हणजे कथा. ते सांगणं किती मापाचं असावं हे कसं सांगणार? अमुक शब्दमर्यादा, अमुक पानमर्यादा आणि त्या मर्यादेवर अवलंबून कथा लघुकथा, दीर्घकथा अशी विभागली जाणं हा खेळ मला वाटतं, फार पुसट आहे.

मला वाटतं, गोष्ट ही सविस्तरच सांगितली पाहिजे. ती संक्षिप्त आणि सांकेतिक असता कामा नये. त्या संक्षिप्ततेमागं आणि सांकेतिकतेमागं जे दडून राहणारं आहे ते का नाही सांगायचं? लेखकाची संक्षिप्तता सगळ्याच्या सगळ्या समाजाला एकाच वेळी कळू शकेल असं नाही. त्या संक्षिप्ततेत आणि सांकेतिकतेत दडलेले जे संदर्भ आहेत, ते सर्वच्या सर्व समाजाला माहीत असतात, असं गृहीत धरणंही चूक आहे.

आणि समजा एका काळातल्या एका समाजाला सगळे संदर्भ माहीत आहेत, असं आपण मान्य केलं तरी भावी काळातल्या, भावी पिढ्यांना ते संदर्भ जसेच्या तसे माहीत होतील, याची शक्यता काय? काळ, समाज, भाषा यांचे संदर्भ सतत बदलते राहू शकतात, तर मग आज संक्षिप्त आणि सांकेतिक कथेचं तेव्हाच्या काळात मोल काय?

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

कथा ही सविस्तर, तिचे सर्व संदर्भ नीट मांडलेली, लोकांच्या प्रचलित भाषेत आणि एकाही शब्दाची दडवादडवी न करता आणि लोकांना सगळंच माहीत असतं असं गृहीत न धरता लिहिली जायला हवी. तरच ती कथा लोकांमध्ये वाचली जाईल, तिचे किंवा तिनं दिलेले संदर्भ लोकांमध्ये नांदत राहतील, लोक ते संदर्भ पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवत राहतील आणि भावी पिढ्यांनाही ती कथा वाचायला अवघड जाणार नाही, त्या अनुषंगानं मग ती कथा भावी पिढ्यांपर्यंत टिकून राहील असं मला वाटतं.

मध्यंतरी मराठीतले काही महाभाग म्हणाले की, कथा हा मुळात साहित्यप्रकारच नाही. त्यांनी हे मत कुठनं उचललं कळत नाही. कथा हा साहित्यप्रकार नाही असं म्हणारांपैकी काही जण कविता आणि कादंबरी हा प्रकार मात्र हाताळत राहिले. त्यांच्या अनुषंगानं इथं एक गोष्ट सांगायची आहे ती अशी की, कथा काय, कविता काय किंवा कादंबरी काय, (किंवा नाटक, चित्रपट, नृत्य, चित्र, इत्यादी कला काय,) यातून माणसाला अंतिमत: कथाच सांगायची असते. कवितेतही कथाच मांडावी लागते, मांडणीचा प्रकार फक्त वेगळा, कथेतही कथाच मांडायची असते न् कादंबरीतही कथाच मांडायची असते. हे सगळे कथा सांगण्याचेच प्रकार आहेत. सांगणं मांडण्याचेच प्रकार आहेत. त्यामुळं कादंबरी न् कविता चांगली न् कथा वाईट असं काही म्हणता येत नाही. थोडक्यात, लयबध्द सांगितलेली कथा म्हणजे कविता, तर अधिक विस्तारानं मांडलेली कथा म्हणजे कादंबरी. त्यात हा प्रकार नको न् तो प्रकार हवा असा भेद करून चालणार नाही.

५.

आपल्या मराठी परिप्रेक्ष्यापुरतं बोलायचं ठरलं तर गेल्या शेदीडशे वर्षांत मराठीत भरपूर कथा लिहिली गेली आहे. १९५०च्या आसपास आणि त्यानंतर मराठी कथेला खऱ्या अर्थानं बहर आलेला दिसतो. नुसते कथाकार म्हणून या काळात असंख्य नावं गाजली, पण इतर साहित्यप्रकारात नावं झालेल्या लेखकांनीही आपापल्या परीनं मराठी कथेत भर घालायचं काम केलेलं आहे. प्रयोगशीलता आणि जीवनानुभवांची वैविध्यपूर्ण मांडणी याबाबतीत आकलनाच्या मर्यादा असल्या तरी आणि आकलनांचा, कथांच्या मांडण्यांचा मुख्य आधार पाश्चात्य साहित्य असला तरी मराठी कथेनं आपल्या मगदुरात समृद्ध होण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे. कथेची नवी मांडणी, स्वत:ची मांडणी, एखादा नवा प्रयोग मराठी कथेनं अजून जगाला दिलेला नसला तरी गेल्या शेदीडशे वर्षांतल्या पेरणीवर भविष्यातली मराठी कथा तशी दिशा घेईल अशी आशा वाटते.

गेल्या पन्नास-साठ वर्षांत मराठी कथेत असंख्य नावं दांडगी झाली. गाजली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडं कथा संक्रमित होत लेखकांची फळी उभी राहत राहिली.

माझ्या पिढीनं या न त्या निमित्तानं गेल्या शंभर वर्षांतली मराठी कथा वाचलेली आहे. या पिढीतले नुसतं मराठी वाचन करणारे जे आजचे कथाकार आहेत, ते गेल्या शंभर वर्षांतल्या आणि विशेषत: १९५० नंतरच्या कथेवरच परिपुष्ट झालेले आहेत. या काळातले लेखक कुठं अनुभव विकत घ्यायला गेले नसले किंवा धुंडाळायला गेले नसले तरी त्यांनी आपल्याच सभोवतालातून आपली मराठी माती कथेत मांडली आहे. त्या कथेच्या विषय-आशयांना मर्यादा राहिली न् त्या कथेत फार वैविध्य नसलं, वैचित्र्य नसलं तरी मराठीपुरता तरी प्रत्येक कथाकारानं मराठी मातीचा आणि मराठी संस्कृतीचा स्वत:ला जाणवलेला कंगोरा कथेत आणण्याचा प्रयत्न निश्चितच केलेला आहे आणि त्यातून प्रत्येक कथाकार स्वतंत्रपणे ओळखू येण्याइतपत नावाजला गेलेला आहे. आपण नुसती नावं घेत गेलो तरी त्या नावाजलेल्या नावांची कथावैशिष्ट्यं आपल्या मनासमोर उभी राहतात.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, चिं. वि. जोशी, व्यंकटेश माडगूळकर, श्री. दा. पानवलकर, गंगाधर गाडगीळ, पु. भा. भावे, श्री. ज. जोशी, अण्णाभाऊ साठे, शंकर पाटील, र. वा. दिघे, जयवंत दळवी, चिं. त्र्यं. खानोलकर, वामन चोरघडे, अरविंद गोखले, द. मा. मिरासदार, शं.ना. नवरे, व. पु. काळे, भाऊ पाध्ये, रघू दंडवते, उद्धव ज. शेळके, बी. रघुनाथ, के. ज. पुरोहित, अनिल रघुनाथ कुलकर्णी, शरदचंद्र वासुदेव चिरमुले, रत्नाकर मतकरी, राजेंद्र बनहट्टी, ह. मो. मराठे, ज्योत्स्ना देवधर, गौरी देशपांडे, आशा बगे, आनंद यादव, सानिया, भारत सासणे, रंगनाथ पठारे, वामन होवाळ, विद्याधर पुंडलिक, द. पां. खांबेटे, लक्ष्मण लोंढे, राजन गवस, सुबोध जावडेकर, चारुता सागर, सदानंद देशमुख, महादेव मोरे, अरुण साधू अशा असंख्य नावांनी गेल्या पन्नास-साठ वर्षांतल्या मराठी कथेला आकार-उकार दिला. या आकारउकाराच्या आधारावरच येत्या काळातली मराठी कथा आपली उभारणी करणार आहे.

(पण इथं हे लक्षात येतं की, नाव झालेला कुठला कथाकार आठवला की, त्यानं कुठल्या प्रकारची कथा लिहिलेली आहे, हे आपल्याला आठवतं. जणू त्या कथा-प्रकाराची त्या कथाकारानं आयुष्यभर नोकरी केली असावी, असं वाटतं. लेखकाचं नाव आठवलं की, त्याच्या लिहिण्याचा छाप आठवतो, हे मराठी लेखकांचं वैशिष्ट्य आहे. वाईट म्हणजे त्या कथाकारांची जात पण ओळखू येते. त्याला थोडाफार अपवाद व्यंकटेश माडगूळकर, अरविंद गोखले, महादेव मोरे अशा मोजक्या नावांचा.)

सध्या जागतिकीकरणाचा काळ आहे. खरं तर आदिम काळात माणसं टोळ्या करून राहू लागली तेव्हापासून जागतिकीकरण चालू आहे. पण सध्याचं जागतिकीकरण हे आधुनिक सुविधा आणि वेगवान संपर्कसाधनं यामुळं अधिकच वेगवान ठरणारं आहे. यातून जग वेगानंच जवळ येतंय. त्यातून जग आणि मानवी समाजाचे संदर्भही झटाझटा बदलत चाललेत. एकूण काळच बदलतोय.

मानवी समाज हा माणूस आणि निसर्ग यांच्या बाबतीत क्रूरच होता. पण आताच्या जागतिकीकरणामुळं तो अधिक क्रूर, सहानुभूतिशून्य आणि संवेदनाशून्य होत चालला आहे. माणसाच्या आधीच्या क्रौर्यात अल्पसंतुष्टता होती, हे इतिहास वाचताना जाणवतं. पण आताच्या माणसाच्या क्रौर्यात अधिक हव्यासीपणा आणि अधिक स्पर्धात्मकता आलेली आहे. अशा या काळात मानवी समाजाकडून लेखकांना अधिकाधिक आणि नवनवे विषय मिळण्याची शक्यता जास्त वाढणार आहे. तर लेखकांनी सजग आणि संवेदनशील राहून या काळाचा आपल्या लिहिण्यासाठी लाभ करून घ्यायला हवा.

त्यातही मराठी लेखकांसाठी तर जास्त संधी आहे, असं मला वाटतं. एक तर मराठी प्रांत आणि मराठी समाज हा स्वत:ची धडकी संस्कृती नसलेला किंवा अनेक संस्कृतीची मिळून खिचडी संस्कृती असलेला प्रांत किंवा समाज आहे. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर अशा चारही दिशांनी मराठी प्रांतावर भाषेपासून ते पेहेरावापर्यंत अशा जगण्या-वागण्याच्या प्रत्येक घटकाबाबतीत असंख्य दबाव सतत येत राहिलेले आहेत आणि आजही येत आहेत.

.................................................................................................................................................................

“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्यामुळं मराठी संस्कृतीत कायम एक अनिश्चितता, अस्थैर्य आणि विविधता आढळत आलेली आहे. ती गोष्ट लेखनाला नवनवे विषय-आशय मिळायला नेहमीच पूरक राहिलेली आहे. (त्या गोष्टीचा फायदा मराठी लेखकांनी अजून नेमका उचलेला नाही.) त्यात आता येणारा आधुनिक जागतिकीकरणाचा दबाव. त्यानं तर आधीच्याच अनिश्चित संस्कृतीत आणखीनच उलथापालथी होणार आहेत. समाजाच्या जगण्याच्या सर्वच पातळ्यांवर अनेक बदलत्या घडामोडी होणार आहेत आणि त्यातून असंख्य नवे विषय उद्भवणार आहेत.

तर मराठी लेखकांनी आयत्या चालून येणाऱ्या या विषयांचा तटस्थ आणि खुल्या दिलानं, नीट आणि नेमका वेध घेणं आवश्यक आहे. माणूस म्हणून ते जे काही जगतात, त्यातून लेखक म्हणून बाहेर येऊन त्यांनी येत्या आव्हानात्मक काळाला सामोरं जाणं आणि आपली लेखणी कुणा एका बाजूसाठी न झिजवता, संपूर्ण मानवी समाजासाठी, दोन्ही बाजूंचा सम्यक विचार करून झिजवणं आवश्यक आहे. तसं झालं तर भविष्यकाळात मराठी कथा ही आपोआप जागतिक पातळीवर जाणारी आणि काळाच्या ओघावर टिकून राहणारी होईल, हे निश्चित.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

राजन खान : ‘गू ते गुलाब लेखकाला काही परकं असू नये’

…बाकी सगळा दुःखाचा अखंड राजकीय बाजार! - राजन खान

म्हणे धर्मनिरपेक्ष राष्ट्र. अरे ह्या! - राजन खान 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा