‘क्वेस्ट’ (क्वॉलिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट) या संस्थेचे संचालक नीलेश निमकर यांनी लिहिलेलं ‘शिकता शिकविता’ हे पुस्तक नुकतंच समकालीन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालंय. या पुस्तकाला शिक्षणक्षेत्रातील अभ्यासक किशोर दरक यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश…
.................................................................................................................................................................
१.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला सुपरिचित असणाऱ्या नीलेश निमकर यांच्या लेखांचं ‘शिकता शिकविता’ हे पुस्तक बाल व शालेय शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक, प्रशासक आणि पालकांसाठी अनुभवांचं आणि अनुभवाधारित चिंतनाचं नवं दालन उघडणारं आहे. अडीच दशकांहून अधिक काळ शिक्षण क्षेत्राशी असणाऱ्या संवेदनशील सलगीतून निर्माण झालेल्या नीलेशच्या निवडक अनुभवांचं हे सार कधी आत्मचरित्रात्मक, कधी चिंतनात्मक, कधी शैक्षणिक ललित, तर कधी व्यक्तीचित्रण करणारं आहे. त्यात आपल्याला कधी भाषा आणि गणित शिक्षणातल्या अनुभवांची चिकित्सा संबंधित अध्यापनशास्त्रातील (पेडॅगॉगी) सिद्धांतनांच्या चौकटीत केल्याचं दिसतं, तर कधी त्या सिद्धांतांविषयी न बोलता त्यांना अभिप्रेत असलेलं काम जमिनीवर सशक्तपणे घडताना दिसतं. कधी व्यामिश्र अडचणींमधून सोपे, पण बिनमहत्त्वाचे किंवा कमअस्सल मार्ग काढण्याच्या व्यवस्थात्मक सवयींविषयीची खंत दिसते, तर कधी शिक्षणाच्या सद्य:स्थितीविषयीची चिंता आणि त्यातून बाहेर पडण्याचे धूसर मार्ग दिसतात.
आतापर्यंतच्या आपल्या २५-२७ वर्षांच्या कारकिर्दीत नीलेशने मुख्यत: महाराष्ट्रातील जनजातीबहुल (आदिवासीबहुल) क्षेत्रात मुलं, शिक्षक, पालक, अधिकारी अशा विविध घटकांसोबत काम केलंय. साहजिकच त्याच्या लेखनात जनजातीय समुदायांच्या संस्कृती आणि ‘मुख्य प्रवाहातील शिक्षण’ यांच्यातील सत्तासंबंधाचा, तफावतीचा उल्लेख होत राहतो.
नीलेशच्या दीर्घकालीन अनुभवांचा हा लेखाजोखा आपल्यासमोर ज्या वेळी येतोय, त्या वेळेच्या संदर्भात हे पुस्तक अधिक महत्त्वाचं ठरतं. ‘समग्र शिक्षण मोहिमे’च्या (पूर्वीची ‘सर्व शिक्षण मोहीम’ किंवा एसएसए) दोन दशकांनंतर समाज म्हणून आपण आता शिक्षणाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर आहोत. इथे बाल व शालेय शिक्षणाला ‘सामाजिक संचिताचा धांडोळा घेत प्रौढांच्या व सहाध्यायींच्या सहकार्याने मुलांनी करायची सृजनशील ज्ञाननिर्मितीची सांस्कृतिक व सामाजिक प्रक्रिया’ असं आता जवळपास तत्त्वत:देखील मानलं जात नाही. उलट, लेखन-वाचन-गणिती क्रियांशी मुलांचा परिचय करून देणारी एक केंद्रीकृत, संस्कृतिनिरपेक्ष प्रक्रिया म्हणजे शिक्षण, असा शिक्षणाच्या इतिहासातला एक पुरातन विचार आज अधिकाधिक मुळं धरतोय. ‘शिक्षण म्हणजे लेखनवाचन-अंकगणित’ या समीकरणाचं गारुड असण्याचा इतिहासही आधुनिक शिक्षण व्यवस्थेइतकाच जुना आणि रंजक आहे.
१८६२मधील ब्रिटनच्या संसदेतील एक सदस्य रॉबर्ट लोवे यांनी एक प्रस्ताव मांडून लेखन-वाचन- अंकगणितातील मुलांच्या कौशल्यांशी म्हणजेच शाळेच्या निकालाशी दिला जाणारा निधी जोडण्याची सूचना केली होती (संदर्भ : द टिरनी ऑफ मेट्रिक्स, जेरी झेड. म्युलर, प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी प्रेस, प्रिन्स्टन अँड ऑक्सफर्ड, पृष्ठे २९-३०). शाळातपासनिसांनी शाळेत जाऊन लेखन, वाचन किंवा पाठ्यपुस्तकाधारित इतर माहिती तपासणं, हे काही जगाला नवीन नाही. या तपासण्या आणि शाळांना मिळणारी अनुदानं, शिक्षकांच्या बढत्या, व्यवस्थात्मक कार्यक्षमता व शिक्षकांचं उत्तरदायित्व, असे अनेक मुद्दे लेखन- वाचन- अंकगणित व त्यातून ‘वस्तुनिष्ठ’पणे दिसणारी ‘गुणवत्ता’ यांच्याशी जोडलेले आहेत. समकालीन संदर्भात ही गुणवत्ता मोजण्याचं एकमेव तंत्र लेखी परीक्षा आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
गेल्या दशकभरात या परीक्षा अधिकाधिक केंद्रीकृत होतायत. पूर्वी अशा परीक्षा केवळ इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या असत; पण आता गुणवत्तामापनाच्या जागतिक व कॉर्पोरेट रेट्यापुढे नमून राज्या-राज्यांमध्ये केंद्रीकृत परीक्षा अगदी इयत्ता पहिलीपासून सुरू होतायत, त्याच्याही पुढे जाऊन आता अंगणवाड्यांतही हे लोण पसरेल, यात शंका नाही.
महाराष्ट्रानेदेखील २०१६ साली ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ या कार्यक्रमांतर्गत इयत्ता दुसरीपासून अशा परीक्षा घेतल्याचं अलीकडचं उदाहरण आहेच. ‘गुणांच्या स्वरूपात जे मोजता येतं, ते अस्तित्वात असतं आणि जे तसं मोजता येत नाही ते अस्तित्वात, महत्त्वाचं नसतं’ अशा समकालीन संस्कृतिनिरपेक्ष धारणेला नीलेशच्या पुस्तकातली उदाहरणं अनेकदा छेद देतात.
‘भट्टीवरची शाळा’ नावाची दोन प्रकरणं वीटभट्टीवर काम करणाऱ्या पालकांच्या स्थलांतरामुळे शाळेपासून, औपचारिक शिक्षणापासून तुटणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची चर्चा करतात. शाळेची रचना, अभ्यासक्रम, वेळापत्रक यातलं काहीही या वंचित मुलांच्या सोयीचं नाही, हे लक्षात आल्यानंतर किशोर काठोलेसारख्या संवेदनशील शिक्षकाने आणि नीलेशने मुलांसोबत जे काम करण्याचा प्रयत्न वीटभट्टीवर जाऊन केला, तो ‘प्रत्येक मूल शिकू शकतं आणि प्रत्येक मुलाने शिकायला हवं’ या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा २००५मधील तत्त्वावरचा विश्वास दृढ करणारा आहे.
नीलेश म्हणतो तसं ‘मतीसारख्या मुलांना अपयशच येईल अशी शाळेची रचना आपण करून ठेवली आहे. शाळेची भाषा, तिथल्या पुस्तकांचा आशय, त्यातली चित्रं, तिथलं वातावरण, तिथले प्रगती मापण्याचे निकष, सारं काही मतीसारख्या मुलींना परकं वाटतं. प्रयत्न करूनही आपल्याला यातलं काही जमत नाही, ही भावना मनात घट्ट रुजते आणि मग या मुलांचं मागे पडणं सुरू होतं. या मुलांच्या गरजा लक्षात घेऊन शिक्षणाचं नियोजन करायचं म्हटलं तर शाळेतला सारा शिक्षणव्यवहार लवचिक करायला लागणार’ (पृष्ठ ५९).
मुलांच्या अनुभवाला, परिस्थितीला, परिवेशाला, शिक्षणाचं माध्यम बनवलं की, मुलं कशी शिकायला तयार होतात, शिकतात आणि त्यांना प्रा. यश पाल म्हणतात त्यानुसार ‘यशाची चव चाखायला’ कशी मिळते, याचं प्रात्यक्षिक वीटभट्टीवरच्या अनुभवातून आपल्याला पाहायला मिळतं.
मुलांचं शिक्षण म्हणजे त्यांना ‘शिकवून काढण्याची’ घाई, किंबहुना शिकवलेलं असेल-नसेल ते ‘अध्ययन निष्पत्तीं’च्या स्वरूपात मोजण्याची घाई झालेल्या आजच्या शिक्षणविश्वाला विद्यार्थी आणि शिक्षकांना उसंत देण्याची गरज वाटत नाही.
२.
अगदी संवेदनशीलपणे चोख आखणी करूनही फसगत होऊ शकते, हे ज्यांना समजतं, ते ‘शिकवून काढण्याची घाई’ शिक्षणात करत नाहीत. नीलेशच्या पुस्तकातले अनेक प्रसंग या फसगतीची आणि पूर्वरचित अभ्यासक्रम आणि मुलांची संस्कृती यात उपस्थित नसलेल्या मेळाची उदाहरणं म्हणून आपल्यासमोर येतात. कधी कधी शिकणारी मुलं कोण आहेत आणि त्यांचे अनुभव काय असतील, याविषयीची शिक्षकांची, अभ्यासक्रमकर्त्यांची धारणा इतकी सरधोपट आणि साचेबद्ध असते, की त्यानुसार केलेले अध्ययन अनुभवदेखील फसवे असू शकतात.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
‘शिकता शिकविता’ या पहिल्याच अनुभवात नीलेश म्हणतो, ‘नदीवरची कविता नदीकाठी बसून शिकवली म्हणजे ती मुलांना चांगली समजेल, ही माझी कल्पना किती बालिश होती, याचं मला आता हसू आलं. सूर्येच्या खळाळत्या प्रवाहावर स्वार होऊन पैलतीर लीलया गाठणाऱ्या या मुलांना मी तिथे नेऊन कोणता नवा अनुभव देणार होतो? नदी हा शब्द अनुभूतीतून शिकायची गरज खरं तर मुलांपेक्षा मलाच अधिक नव्हती का? मूल म्हणजे कोरी पाटी नसतं, ते पूर्वानुभवाचा साठा घेऊन शाळेत येतं. मुलांच्या पूर्वानुभवाचा शिकवताना वापर करायला हवा...’ (पृष्ठ २१)
शिकायचा कंटाळा आला म्हणून शाळेतून किंवा वर्गातून उठून जाणारी मुलं, शाळेत असताना आपलं खाद्य असलेला एखादा पक्षी किंवा प्राणी आला म्हणून मधूनच जाऊन त्याची शिकार करून, खाऊन झाल्यावर शिकायला तयार होणारी मुलं ही जिथे एखाद्या शिक्षकाची वस्तुस्थिती असते, तिथे ‘अमुक विषयाचे तमुक इतके पाठ ढमुक महिन्यांपर्यंत पूर्ण झाले पाहिजेत’ अशा आदेशांना प्रतिसाद म्हणून कागदी घोडे नाचवणं आणि खोटे आकडे ‘वरती’ पाठवणं हा नित्यक्रम होऊन बसला, तर त्यात आश्चर्य वाटायला नको. अशा वेळी निकड भासते ती मुलांच्या प्रत्येक अनुभवाला, आवडीला शिक्षणाचं माध्यम, शैक्षणिक अनुभव म्हणून वापरू शकणाऱ्या सिंधुताई आंबिकेंसारख्या विद्यार्थ्यांना सतत स्वतःच्या विचारप्रक्रियेच्या केंद्रस्थानी ठेवणाऱ्या संवेदनशील शिक्षकाची!
मुलं ज्या परिस्थितीतून येतात, ज्या संस्कृतीत वाढतात, ज्या भाषेत न्हाऊन निघत मोठी होतात, ते सगळं बाजूला सारून शिक्षण घडू शकत नाही, हे सिंधुताईंनी नेमकं जाणलं होतं, आणि म्हणूनच ‘८७ वर्षांची तरुण शिक्षिका’ या लेखात नीलेश म्हणतो, ‘मुलांची नावं अभ्यासाच्या उदाहरणात घातली म्हणजे त्यांचा उत्साह वाढे. सुंदरच्या बांगड्या, वनशीच्या बकऱ्या, हरजीच्या चिंचा, नवश्याचं भाताचं खाचर, इसवतीचे गजरे अशा विषयांवर वाचनपाठ, गणिताची उदाहरणं बेतली म्हणजे मुली खूष होतात, हे सिंधुताईंनी नेमकं हेरलं आणि पुस्तकं जरा बाजूला सारून ‘शिक्षण’ या मुलांच्या आयुष्याला नेऊन थेट भिडवलं.’ (पृष्ठ १०२).
जनजातीय समुदायांसोबत जवळून काम करत घालवलेल्या आयुष्यातल्या मोठ्या कालखंडामुळे नीलेशच्या लेखनात या समुदायांच्या संस्कृती, सामाजिक व सांस्कृतिक सवयी, त्यांची भिन्नता आणि साम्यस्थळं, सवयीने असंवेदनशील असणाऱ्या शिक्षणव्यवस्थेत या समुदायांतील मुलांच्या वाट्याला येणारं अपयश, अवहेलना याविषयीचे अनुभव, उदाहरणे विपुल प्रमाणात आहेत. मात्र, त्याविषयी निर्णयात्मक (जजमेंटल) होण्याचा मोह शक्यतो टाळलेला असणं, ही लेखक आणि ‘मुलांचा सहाध्यायी’ म्हणून असलेली जमेची बाजू म्हणावी लागेल. जनजातींची अनाग्रही संस्कृती, असंग्रहाची वृत्ती नीलेशला एका बाजूला अनुकरणीय वाटते; मात्र, अनाग्रहाच्या, असंग्रहाच्या अगदी विरुद्ध संस्कृती मानणाऱ्या प्रबळ वर्गाकडून या समुदायांवर अन्याय होत राहिला असावा? हेदेखील नीलेश दुर्लक्षित करत नाही.
३.
‘शिक्षक’ हा नीलेशच्या कामाचा एक अविभाज्य घटक आहे. शिक्षकांचा सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास साधण्याच्या प्रयत्नांमध्ये शिक्षकांची बाजू समजावून घेऊन, त्यांना विश्वासात घेऊन केलेलं काम दीर्घकालीन टिकणारं असतं. या पुस्तकात आपल्याला भेटणारे शिक्षक मानवी स्वभावाचे विविध कंगोरे दाखवणारे आहेत. प्रल्हाद काठोले आणि किशोर काठोलेसारखे ‘परक्या’ शाळेत जाऊन मुलांसाठी, मुलांसोबत निश्चित ध्येय घेऊन राबणारे शिक्षक जसे आहेत; नानाजींसारखे निवृत्तीच्या जवळ आलेले, पण निवृत्तीनंतरही स्वतःमधला शिक्षक जिवंत ठेवू पाहणारे शिक्षक जसे आहेत, तसे शरीराने कार्यशाळेत बसून अलिप्तपणे मनाने बाहेर असणारे, ३१ डिसेंबरच्या पार्टीला कार्यशाळा आडवी आली म्हणून नाराजीने बसलेले, पण कार्यशाळेच्या गुणवत्तेमुळे पार्टी बुडवणं सत्कारणी लागल्याचं कबूल करणारे शिक्षकदेखील आहेत.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
मुंबईतल्या इंटरनॅशनल स्कूल्सपासून खेड्यापाड्यांतल्या जिल्हा परिषदांच्या शाळांमधले आणि आदिवासी आश्रमशाळांमधले शिक्षकही आहेत. सेवापूर्व आणि सेवांतर्गत प्रशिक्षणात सघन आशयाला मुकलेले शिक्षक प्रशिक्षणातील आशयाची गुणवत्ता बदलली की, कसे मनापासून सहभागी होतात, याची उदाहरणं आपल्याला पुस्तकात विखुरलेली आढळतात. मात्र, गुणवत्तापूर्ण आशयाधारित सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षणातून बाहेर पडणारे शिक्षक तरी किती सक्षमपणे, अर्थपूर्ण पद्धतीने काम करू शकतील, अशी परिस्थिती कमी-अधिक फरकाने देशभरातल्या शाळांची, विशेषतः सरकारी शाळांची आहे.
४.
मुलांच्या स्वयंप्रेरणेने शिकण्याविषयी, एकाच समस्येचा विचार वेगवेगळ्या दृष्टीकोनांतून करण्याने काय किमया साधली जाते, त्याचं तपशीलवार चित्रण ‘शाळेबाहेरचं शिक्षण’ या अनुभवात केलंय. प्रल्हाद काठोले आणि किशोर काठोले या शिक्षकांकडून मिळालेली मदत, प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातल्या दाढरे या छोट्या गावातल्या उच्च, प्राथमिक व माध्यमिक शालेय वयोगटातल्या मुलांनी साधलेली किमया प्रशंसनीय आहे. सलग तीन वर्षं ‘राष्ट्रीय बालविज्ञान परिषदे’त सहभागी होताना जनजातीय समुदायातील मुलांनी निवडलेल्या स्थानिक समस्या, त्यांचा केलेला बहुविद्याशाखीय अभ्यास हा कसा जीवनाशी जोडलेला उपयुक्त प्रकल्प होता, हे सांगताना बहुसंख्य शाळांमध्ये प्रकल्प कसे होतात, याविषयीचं निरीक्षण बारकाईने मांडलं आहे -
‘आजकाल अनेक शाळांमधून मुलांना प्रकल्प करायला देणं हा उपचार सुरू झाला आहे... बहुधा हे प्रकल्प म्हणजे इंटरनेटवरून शोधलेल्या माहितीचं पुनर्लेखन असतं. प्रकल्पांचे विषयही मुलांच्या आयुष्यातील खऱ्या समस्यांना हात घालणारे नसतात. माहिती गोळा करणं व तिची सुटसुटीत मांडणी करून विश्लेषण करणं, प्रयोग करून पाहणं, निष्कर्षापर्यंत पोहोचणं आणि स्वतः समस्या सोडवणं, यासाठी त्यात फारसा वावच नसतो. सारा भर प्रकल्प अहवालाची सजावट व सादरीकरण यावरच असतो. प्रकल्पातून शिकण्याची जी प्रक्रिया आहे तिच्याकडे दुर्लक्षच केलं जातं...’ (पृष्ठ १३०).
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
नीलेशचं हे पुस्तक शिक्षण क्षेत्रातल्या महत्त्वाच्या अशा भाषाशिक्षण, गणितशिक्षण, शिक्षणातील मूल्यं, भाषा आणि सत्ता, लोकशाहीचं शिक्षण परीक्षांचं ‘व्यसन’, ज्ञानरचनावाद, बालसाहित्य आणि त्याचं शिक्षणातलं स्थान, संस्कृतीसापेक्ष संवेदनशील शिक्षण, ऑनलाइन शिक्षण, मध्यमवर्गीय मुलांसाठीची शाळानिवड, शिक्षणाचं माध्यम अशा अनेक विषयांचा ऊहापोह करतं. ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांच्या विचारधारेतल्या ‘निगुतीच्या बालककेंद्री शिक्षणा’चं महत्त्व या पुस्तकाच्या निमित्ताने आजच्या अतिघाईच्या काळात पुन्हा एकदा अधोरेखित होईल अशी अपेक्षा आहे.
शिक्षण म्हणजे मुलांना ‘शिकवून काढणं’ नसून स्थानिक संस्कृतीविषयी संवेदनशील राहून, मुलांचं ‘सांस्कृतिक भांडवल’ आदरपूर्वक वापरत ‘शिकायचं कसं’ यासाठी मुलांना तयार करणं, हा विचार या पुस्तकातून पुन्हा पुन्हा आपल्यासमोर येतो. विविध जागतिक शक्तींच्या व्यामिश्र दबावाला बळी पडत सार्वभौम देशातील शिक्षणविषयक निर्णय वरून खाली रेटले जाण्याच्या आजच्या काळात खऱ्याखुऱ्या शाळांमध्ये, खऱ्याखुऱ्या मुलांसोबत शिक्षणशास्त्रीय सिद्धांतांच्या मदतीने केलेल्या अस्सल कामाच्या अनुभवांची ही पुंजी मराठी वाचकांचं विचारविश्व, चर्चाविश्व विस्तारायला मदत करेल, असा विश्वास वाटतो.
‘शिकता शिकविता’ - नीलेश निमकर
समकालीन प्रकाशन, पुणे
पाने – २२३
मूल्य – ३०० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment