‘नागरमोथा’ : शेतकऱ्याला सर्व यंत्रणा सतत लुबाडत राहिल्या. हा अगतिक शेतकरी सदानंद देशमुख यांच्या कथांचा नायक आहे
ग्रंथनामा - झलक
अजय देशपांडे
  • ‘नागरमोथा’ या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Sat , 05 November 2022
  • ग्रंथनामा झलक नागरमोथा Nagarmotha सदानंद देशमुख Sadanand Deshmukh शेतकरी Farmer शेती Farming

प्रसिद्ध कथा-कादंबरीकार सदानंद देशमुख यांच्या सात कथासंग्रहांतील निवडक ११ कथांचा ‘नागरमोथा’ हा संग्रह लेखक, समीक्षक, संपादक व राजकीय विश्लेषक डॉ. अजय देशपांडे यांनी संपादित केला आहे. विजय प्रकाशन, नागपूर यांच्यातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या संग्रहाला देशपांडे यांनी प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

साहित्यकृतींचा विचार सौंदर्यशास्त्रीय पद्धतीने करण्यापेक्षा संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी बांधीलकी ठेवणाऱ्या सामाजिक जाणिवांच्या मानवतावादी तत्त्वविचारांनी होण्याची गरज असते. लेखकाचे प्रतिभावंत मन माणसांच्या जगण्याशीच सहकंप पावलेले असते. सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाशी लेखकाचे अतूट नाते असते आणि लेखकाच्या कलाकृतीतून ते अभिव्यक्त होत असते. खरे तर समाजसापेक्ष साहित्यकृतींचे सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणाशी जैविक नाते असते. माणसांच्या जगण्याचे ऐतिहासिक, मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय असे आणि आणखी कितीतरी पदर समाजसापेक्ष साहित्यकृतींमधूनच आविष्कृत होत असतात. अशा कलाकृती माणसांचे जगण्याचे भान जागृत करत असतात. ज्यांचे कोणी नाही आणि ज्यांच्या आयुष्यात अन्याय, वंचितता, दुःख यांचेच साम्राज्य आहे अशा वंचितांचे अश्रू पुसण्याचे, त्यांच्या अश्रूंना शब्द देण्याचे, त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्याचे, त्यांच्या जगण्याला नैतिक ऊर्जा देण्याचे, विचारांची लढाई विचारांनी लढण्याची उमेद देण्याचे, संविधानाच्या मूलभूत तत्त्वांशी बांधीलकी ठेवून नव्या क्रांतीचे समाजशास्त्र ठरवण्याचे महत्त्वाचे कार्य या समाजसापेक्ष कलाकृती करत असतात. या कलाकृती कणा मोडून पडणाऱ्या माणसांना पुन्हा ताठ कण्याने उभे राहून लढण्याची वैचारिक-नैतिक मानसिक ऊर्जा देत असतात. अशा कलाकृतींची संख्या कमी असली तरी त्यांचे सामाजिक परिणाम फार मोठे आणि मूल्याधिष्ठित म्हणून फार महत्त्वाचे असतात.

डॉ. सदानंद देशमुख यांच्या कादंबऱ्या, कथा आदि साहित्यकृती वरील भूमिकांचा अत्यंत सजगपणे स्वीकार करत असल्याने त्यांचे मोल ऐतिहासिक, समाजशास्त्रीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि भाषिकदृष्ट्या फार मोठे आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

संपूर्ण गावगाडाच कोलमडलेला असताना आणि या संकटाची बव्हंशी कारणे अस्मानी नसून केवळ सुलतानी व्यवस्थेशी निगडित असताना ‘जखम डोक्याला अन् पट्टी पायाला’ अशा उपाययोजनांचीच बरसात होताना दिसते. अशा स्थितीतील गावगाड्याच्या सामाजिक, आर्थिक परिस्थितीचे, कणा मोडून पडलेल्या माणसांच्या दुःखभोगी जगण्याचे यथार्थ आकलन मांडण्याचा प्रयत्न म्हणजे ‘तहान’, ‘बारोमास’ आणि ‘चारीमेरा’ या कादंबऱ्या होत. गावगाड्यातील माणसांचे जगणे नावाचे मरणे, त्यांच्या आत्महत्या, या माणसांचे आर्थिक शोषण, त्यांची होत असलेली अवहेलना, आर्थिक कुत्तरओढ कौटुंबिक पातळ्यांवरची आणि सामाजिक पातळ्यांवरची घुसमट, या आणि अशा कितीतरी सामाजिक विषयांना सदानंद देशमुख यांचे कथात्मक लेखन कवेत घेण्याचा प्रयत्न करते. तळपातळीवरचा शोषित पीडित कर्जबाजारी सामान्य माणूस सदानंद देशमुख यांच्या एकूणच लेखनाच्या केंद्रस्थानी आहे. गावगाड्यात जगणे नावाचे तीळतीळ मरण अनुभवणाऱ्या माणसांच्या दुःखाच्या, असंतोषाच्या, मुस्कटदाबीच्या महाकाय हिमनगाचे संपूर्ण दर्शन घडवण्याचा प्रयत्न म्हणजे या कादंबऱ्या होत.

त्यांच्या कथा व कादंबऱ्यांमध्ये विदर्भातील गावगाड्याचे चित्रण आहे म्हणून या केवळ विदर्भाच्या कलाकृती आहेत, असा संकुचित विचार सदानंद देशमुख यांच्यावर अन्याय करणारा ठरेल. झापडबंद आणि खोट्या प्रदेशाभिमानाच्या खुज्या समीक्षेने सदानंद देशमुखांच्या कथा आणि कादंबऱ्यांचा विचार विदर्भप्रदेश आणि मराठी भाषा या सीमारेषा आखूनच केला असल्याचे दिसते. समकालीन भारतीय कृषिजीवनाच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, पर्यावरणावर क्ष-किरण टाकणाऱ्या तीन कादंबऱ्या आणि त्यांच्या कथा एकूण भारतीय समाजवास्तवाच्या आणि साहित्यकृतींच्या परिप्रेक्ष्यातही फार मोलाच्या आणि महत्त्वाच्या आहेत, हे समजून घेतले पाहिजे.

सदानंद देशमुख यांच्या ‘लचांड’, ‘उठावण’, ‘महालूट’, ‘रगडा’, ‘खुंदळघास’, ‘गाभुळगाभा’ व ‘जमीनजुमला’ या सात कथासंग्रहांतील कथांचे लेखन साधारणपणे १९९० ते २०१८ या २८ वर्षांच्या काळात झालेले आहे. या सर्व कथांना बदलत्या ग्रामीण समाजवास्तवाची पार्श्वभूमी आहे. देशमुख यांच्या अकरा कथा या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.

सदानंद देशमुख यांच्या सर्वच कथांमध्ये गावगाडा आणि त्यातला माणूस केंद्रस्थानी आहे. मात्र या कथांचा आशय एकसूरी, एकरेषीय नाही. उलट प्रत्येक कथा सामाजिक वास्तवाचे वेगवेगळे स्तर दर्शवणारी आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

देशमुख यांची कथा १९९०नंतरच्या बदलत्या ग्रामीण वास्तवाची वेगवेगळी रूपे चित्रित करते. जागतिकीकरणाच्याच्या गतिमान प्रक्रियेत गावगाडा उदास, भकास आणि दयनीय झाला. ज्यांच्या जगण्याचे केंद्र शेती आहे, त्या माणसांचे अतोनात हाल झाले-होत आहेत. एकाबाजूने समग्र सांस्कृतिक पर्यावरणच झपाट्याने बदलले, तर दुसऱ्या बाजूने अर्थकारणात फसलेला, कंबरडे मोडलेला शेतकरी साऱ्या प्रगतीच्या, प्रवाहांपासून पार दूर दूरच राहिला. कुटुंब, भाषा, शिक्षण, पेहराव, खानपानाचे पदार्थ व पद्धती, मनोरंजनाची माध्यमे व साधने, संपर्काची माध्यमे व साधने, उपचाराच्या पद्धती व औषधे, जीवन व्यवहार सारे काही फार बदलले. पण या बदलाचे केंद्रस्थान असणारा पैसा कधीच पुरेसा हाती नसल्याने शेतकरी मात्र या बदलांच्या आवर्तांच्या बाहेरही राहू शकला नाही. आणि आतही आपले स्थान शोधू शकला नाही. परिणामी कायम गोंधळलेल्या स्थितीत शेतकरी बदलांच्या आवर्तनात फरफटत राहतो.

या बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणापासून शेतकरी वेगळा, अलिप्त राहू शकत नव्हता, आणि पैसाच नसल्याने बदलती जीवनशैली सहजपणे स्वीकारू शकत नव्हता. अशा कोंडीत सापडलेल्या मुस्कटदाबी झालेल्या शेतकऱ्याला व्यापारीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, बाजारीकरण आदी नावांच्या परिघात येणाऱ्या सर्व यंत्रणा सतत लुबाडत राहिल्या. हा अगतिक शेतकरी सदानंद देशमुख यांच्या कथांचा नायक आहे.

घर विकून शेतात विहीर खोदून, ओलीत करू पाहणारा आणि पुढे आयुष्यभर ‘कडकी’चा सामना करत अत्यंत लाचारीने जगणारा बबन पातपुते (‘कडकी’), दहा एकर जमिनीचा मालक असलेला पण दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करीत असणारा पंडितराव (‘अणक’), एम.ए. फर्स्टक्लासमध्ये असूनही प्राध्यापकाच्या नोकरीसाठी भटकत असणारा भानुदास चिवटे (‘कुरण’), शिक्षणाच्या खर्चासाठी शेती करणारा रम्शा (‘इळद’), थेंबथेंब पाणी वाचवून ठेवावे लागत असताना, पाणी पिणाऱ्या गाढवांवर हल्ला करणारा, पण अर्धवट झोपेत असल्याने चुकून बायकोवरच वार करणारा जयराम (‘लचांड’), कापूस विकण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक शोषणाविरुद्ध थेट संघर्ष उभा करणारा शिवा (‘उठावण’), शेतकरी शेतमजुरांवर अन्याय-अत्याचार करणाऱ्या धनदांडग्याला धडा शिकवण्याचा सुनियोजित कट रचणारा देवीदास (‘वाघरुळ’), दमनकारी अशा बाजारू अर्थसत्तेच्या चरकात आपले असहायपणे शोषण होऊ देणारा अगतिक तुकारामबुवा (‘महालूट’),

बायकोच्या बहिणीच्या नवऱ्याच्यातेरवीसाठी जाण्याकरिता कमी भावात शेतात 'बरास' खोदण्याचे काम करणारा, भुकेने व्याकुळ झालेल्या अवस्थेत नांग्या मोडून खेकडे खाणारा वामन आणि शेवटी तेरवीला जाण्याचा बेत रद्द करणारी त्याची पत्नी नर्मदा (‘बरास’), बायकोवर नजर असणाऱ्या मालकाचा काटा काढणारा जनार्दन (‘करंट’), मालकाच्या बलात्काराला बळी पडलेली सिंधू (‘करंट’) गावोगाव कपडे विकणारा दिनकर एका घराचे दोन घरे करतो, पण नंदू मगर या मित्राशी बायकोचे संबंध असल्याचे कळल्यावर पहारीने पर्टिशनची भिंत पाडून टाकतो (‘भगदाड’), लाकडाची मोळी विकणाऱ्या एका स्त्रीची व्यथा (‘हेळणा’), पोरी आणि जावयांना दिवाळीचा अहेर करण्यासाठी आठशे रुपये घेऊन नसबंदीचे ऑपरेशन करणारा नारायण (‘कचाटा’), शेतातल्या आंब्याच्या झाडासाठी तीळतीळ जीव लुटणारा आबाजी आणि झाडाच्या जिवावर उठलेला त्याचा मुलगा बळीराम अन् जमिनीत आंब्याच्या कोयी लावून नवी झाडे करू पाहणारा पक्क्या (‘अमृतफळ’), दारुड्या नवऱ्याचे तंगडे मोडणारी हिराबाई (‘उतारा’),

अंगारा भुशी लागून असल्याने ऐनवेळी सर्वांग खाजवणारा कंजुष नवरा अन् कजाग सासू आपल्याकडे आणि कृश असलेल्या तान्ह्या पोरीकडे दुर्लक्ष करतात या जाणिवेने त्रस्त असलेली अन् तान्ह्या पोरीच्या औषधाच्या रुपयांसाठी संतोष आडोकारशी अंगसंगाची मानसिक तयारी करणारी सुनंदा (रगडा) कधीकाळी मेलेले आपले आप्त भूत होऊन आपल्या समोर वावरत आहेत या भावनेने आत्यंतिक ग्रासलेली गोदाकाकू (‘लवकांड’), दुष्काळाने जीव मेटाकुटीला आल्याने अगतिक, होऊन गळ्यात फास टाकून आत्महत्या करणारा कैलास (‘बखाड’), नोकरीच्या आशेने राजकारणी नेत्याचा कार्यकर्ता होणारा अन् शेवटी उत्साहाच्या भरात नेत्याच्या तोंडावर गुलाल उधळण्याची चूक करून बेदम मार खाणारा राजू जकाते (लाल अंधार), लग्नाच्या खर्चाचा बोजा गरीब शेतकरी बापावर पडू नये म्हणून आत्महत्या करणारी ज्योती (‘मांडव’), बायकोच्या वागण्यामुळे घर कुटुंबावरून मन उडालेला, म्हशी भादरणारा शेतशिवारातल्या नागाला जीव लावणारा प्रेमसुख घेवंदे (‘सर्कती’), पत्रावळ्या करुन विकून उदरनिर्वाह करणारी आणि पैशासाठी तिला देहविक्रयाचा धंदा सुचविणाऱ्या जुगलशेटला चपलेने झोडणारी निर्मला (‘पळसपापडी’), तोडलेल्या चंदनाच्या झाडाजवळ आपल्या जिवलगाच्या प्रेताजवळ हताशपणे बसावे तसा दुःखी होऊन बसलेला मदनराव (‘गाभुळगाभा’),

या आणि अशा कितीतरी व्यक्तिरेखा सदानंद देशमुख यांच्या कथांमध्ये आहेत. गावगाड्यातले हे स्त्री-पुरुष त्यांच्या सभोवतीच्या साऱ्या सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरणासह कथेत येतात, समाजवास्तवाचा एखादा तुकडा त्याच्या अनुकूल प्रतिकूल कोनांसह प्रकाशमान करतात. हे स्त्री-पुरुष त्यांच्या वाट्याला आलेले व्यामिश्र पातळीवरचे जगणे जगत राहतात. अभावग्रस्त प्रतिकूल परिस्थितीत ही माणसे आपल्या भावना, वासना, वात्सल्य, वेदना, विचार, क्रौर्य, संयम, लोभ, मोह, प्रेम साऱ्या साऱ्या गोष्टींचा निचरा करत राहतात.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

ही माणसे गावाच्या, शेतीच्या,शिवाराच्या मातीने मळलेली आहेत गरिबी, उपेक्षा, दुःखे यांनी गाजलेली आहेत. रूपानेही ही माणसे चारचौघासारखी तर काही अगदी ओंगळवाणीच आहेत. तरीही ही माणसे माणूसपणाचे सारे पीळ आणि पैलू आपल्या व्यक्तिमत्त्वात जोपासणारी आहेत. नागरमोथा मातीत मळलेला असला तरी सुगंधी असतो. तशीच ही माणसे दुःख, दैन्य, दारिद्र्य, वेदना, उपेक्षा, क्रौर्य, वासना यांसह अनिवार प्रेम, संवेदनशीलता, सदाचार, असे मानवीय स्वभावाचे सारे पीळ आणि पैलू जोपासत माणूसपणाचा गंध देतच राहतात.

पशूंचे कष्ट उपसताना आणि आभाळभर दुःख झेलताना ही नीतिमान माणसे अमानुष होत नाहीत. या देशातील तळपातळीवरची गरीब कष्टकरी माणसे नीतिमत्ता जोपासणारी आहेत सदाचारी आहेत. ही असीम नीतिमत्ता, हा अभंग सदाचार या देशाचे सामर्थ्य आहे.

या कथांमधील या स्त्री-पुरुषांच्या भावविश्वाच्या माध्यमातून सदानंद देशमुख समग्र भारतीय पातळीवर ग्रामजीवनाचा पोत, पदर, पीळ आणि पैलू साकार करतात. ग्रामजीवनातले सारे ताणेबाणे मांडणारे अगदी वास्तव समाजजीवन हेच कथेचे विषय झाले आहेत. या कथाविषयांसारखे जीवन भारतातील ग्रामीण भागात असूच शकत नाही, असे म्हणता येत नाही. उलट थोड्या फार फरकाने अशी माणसे, असे जगणे असे समाजजीवन ग्रामीण भारतात आढळते, असे म्हणण्याला भरपूर वाव आहे. वास्तवदर्शन हे सदानंद देशमुख यांच्या कथेचे एक सामर्थ्य आहे.

दर दिवशी ढासळत जाणाऱ्या गावगाड्याचे चित्रण असणाऱ्या या कथांची भाषा साक्षात ग्रामजीवनाची जिवंत अशी भाषा आहे. अगदी कथांच्या शीर्षकांकडे नजर फिरवली तरी ग्रामजीवनातील भाषेतील जिवंत आणि आशयप्रधान शब्दांचा प्रत्यय येतो.

अर्थसघन हेल, आशयसमृद्ध म्हणी, वाक्प्रचार, शब्दांच्या पलीकडचा आशय मांडणारी काव्यात्मकता ही आणि अशी सारी सामर्थ्य एकवटलेली बोली सदानंद देशमुख यांच्या कथांमध्ये साऱ्या स्वरूप वैशिष्ट्यांसह प्रकटली आहे. बोलीभाषेतील शब्दश्रीमंतीचा प्रत्यय प्रत्येक कथा वाचताना येतो. बोलीतील आशयसघन शब्द देशमुखांच्या कथेचे वैभव आहे.

बोलीतील म्हणी आणि वाक्प्रचार सदानंद देशमुख यांच्या कथांमध्ये ठिकठिकाणी आढळतात. प्रत्यक्षसंवाद व्यवहारातील बोली जशीच्या तशी या कथांमध्ये अवतरल्यामुळे म्हणी व वाक्प्रचारांचे सौंदर्यही जसेच्या तसे या कथांच्या भाषेला लाभले आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

सदानंद देशमुख यांच्या कथा (आणि कादंबऱ्या) भारतीय ग्रामीण वास्तवाचे नुसते चित्रण करत नाहीत, तर या वास्तवाची गंभीर जाण वाचकाला करून देतात. सृजनशील आणि नैतिक विचारांशी बांधीलकी असणारा लेखक त्याचा परिवर्तनाचा कृतिशील विचार त्याच्या कलाकृतीतूनच मांडत असतो. समकालाची स्पंदने टिपणाऱ्या या कलाकृती काळाचा इतिहास मांडत भविष्यकाळाविषयीचे चिंतन करीत असतात. या दृष्टीने लेखक विचारवंतही असतो, इतिहासकारही असतो, आणि सामाजिक परिवर्तनाचा भाष्यकारही असतो. तो कलाकृतीतून भाष्य करतो किंवा त्याची कलाकृती भाष्य करत असते.

सदानंद देशमुख आपल्या कथालेखनातून कोसळणाऱ्या गावगाड्याचे असंख्य पैलू दाखवतानाच सामाजिक सांस्कृतिक, आर्थिक परिवर्तनाचा विचार प्रत्यक्षाप्रत्यक्षपणे अभिव्यक्त करतात. भाषेसकट सारा गावगाडाच मृत्युपंथाला लागल्याचे वास्तव साऱ्या देशात असताना सामाजिक मूल्यभावासह परिवर्तनाचा विचार रुजवणाऱ्या सदानंद देशमुख यांच्या कथा मोठा आशावाद देणाऱ्या आहेत; दिलासा देणाऱ्या आहेत.

‘नागरमोथा’ (सदानंद देशमुख यांच्या निवडक कथा) - संपादक डॉ. अजय देशपांडे

विजय प्रकाशन, नागपूर

पाने - २४४,

मूल्य - ४५० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......