मल्लिकार्जुन खरगे : सक्षम अध्यक्ष की, ताटाखालचं मांजर?
पडघम - देशकारण
प्रवीण बर्दापूरकर
  • सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे
  • Tue , 01 November 2022
  • पडघम देशकारण काँग्रेस Congress राहुल गांधी Rahul Gandhi सोनिया गांधी Soniya Gandhi मल्लिकार्जुन खरगे Mallikarjun Kharge

एकीकडे राहुल गांधी यांची देशव्यापी पदयात्रा सुरू असतानाच दुसरीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची लुटूपुटूची लढाई मल्लिकार्जुन खरगे यांनी अपेक्षेप्रमाणे जिंकली आहे. लुटूपुटूची लढाई म्हणण्याचं कारण की, खरगे यांच्या उमेदवारीला गांधी कुटुंबियाचा अघोषित आणि पक्षांतंर्गत जी-२१ गटाचा जाहीर पाठिंबा होता. अशा परिस्थितीत शशी थरुर यांची उमेदवारी नाममात्र आहे आणि त्यांचा पराभव अटळ आहे, हे उघडच होतं. शिवाय, काँग्रेस पक्षात लोकशाही नांदते आहे, हे दाखवण्यासाठी शशी थरुर (किंवा अन्य कुणाचीही) यांची उमेदवारी काँग्रेससाठी तशीही आवश्यकच होती. मात्र याचा अर्थ शशी थरुर यांचं निवडून येणं कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला परवडणारं नव्हतं.

थरुर विद्वान आहेत. स्वतंत्र प्रज्ञेचे आहेत आणि एक राजकारणी म्हणून असा स्वतंत्र प्रज्ञेचा माणूस कोणत्याच पक्षाला पेलणारा नसतो. राजकीय पक्षांसाठी अशी माणसं बुजगावणं म्हणून वापरून घेण्यासाठीच समाविष्ट करून घेतलेली असतात. आणखी एक मुद्दा म्हणजे थरुर यांची व्यक्तिगत प्रतिमा स्वच्छ नाही, असे आरोप करण्याची संधी भाजपला आपसूकच मिळाली असती. त्यामुळे थरुर यांची उमेदवारी जिंकणारी नाही, हे स्पष्टच होतं.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

खरगे यांनी एक सुकाणू समिती स्थापन करून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कामकाजाला सुरुवातही केलेली आहे. ते काँग्रेस ‘संस्कृती आणि संस्कारा’त मोठे झालेले कर्नाटकी नेते आहेत. ते काँग्रेसच्या अध्यक्षपदी आले, याचा अर्थ या आधी पक्ष किंवा सरकारात त्यांना राष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या गेल्या होत्या असं नाही. ते केंद्रात मंत्री होते, परंतु एक देश म्हणून केंद्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या अर्थ, संरक्षण, अर्थ, गृह किंवा परराष्ट्र अशा पैकी कोणतंही महत्त्वाचं खातं त्यांच्या वाट्याला आलेलं नव्हतं. पक्ष पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर पदाधिकारी म्हणून काम करण्याचा तसा त्यांना अनुभव नाहीच आणि ते तसे मवाळ म्हणूनच परिचित आहेत.

कर्नाटक राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष अशी काही पदं त्यांनी भूषवलेली आहेत, हे खरं आहे; मात्र काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेल्या आणि गाव, तांडा, पाडा, वाडीपर्यंत पोहोचलेल्या देशातील सर्वांत मोठ्या काँग्रेस पक्षाची अफाट पसरलेली मुळं त्यांना पूर्णपणे ठाऊक आहेतच, असं नाही. मंत्रीच नव्हे तर पदाधिकारी म्हणूनही त्यांचा जनसंपर्क व्यापक असल्याचं कधी त्यांची संसदेतील कामगिरी आणि वावर पाहून जाणवलेलं नाही.

थोडक्यात, पक्ष व देशाकडे राष्ट्रीय नजरेतून पाहण्यासाठीची अजून नजरेत न भरलेली क्षमता त्यांच्यात आहे का नाही, हे सिद्ध झालेलं नाही. त्यामुळेच अध्यक्ष म्हणून कामकाज करत असताना खरगे यांच्या नेतृत्व गुणांचा खऱ्या अर्थानं कस लागणार आहे.

खरगे यांच्या समोरची आव्हानं दोन प्रकारची आहेत. १९९८नंतर काँग्रेस पक्षाला लाभलेले ते गांधी घराण्याबाहेरचे पहिले अध्यक्ष आहेत. १९९८ सारी श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रं सीताराम केसरी यांच्याकडून स्वीकारली. त्यांच्या आधी असलेल्या अध्यक्षांना फार काही चांगली वागणूक तेव्हा गांधी कुटुंबाकडून मिळालेली नव्हती. केसरींना तर एका खोलीत डांबून त्यांच्याकडून अध्यक्षपद कसं हिसकावून घेण्यात आलं, याच्या कथा सत्य आणि फिक्शनच्या सीमारेषेवरच्या आहेत. त्या संदर्भातल्या तेव्हा प्रकाशित झालेल्या बातम्या, राजकारणात सक्रिय असणाऱ्या बुजुर्ग काँग्रेसजन तसंच राजकीय विश्लेषक व काँग्रेस बीट सांभाळणाऱ्या पत्रकारांच्या चांगल्याच स्मरणात आहेत. सोनिया गांधी यांना अध्यक्ष केलं जाणार आहे, हे तेव्हा अध्यक्ष असणाऱ्या सीताराम केसरी यांना मुळात ठाऊक नव्हतं.

अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केसरी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडावं आणि गांधी यांनी ते स्वीकारावं, असे दोन ठराव मांडले गेले आणि त्यांची कोणतीही कल्पना तत्कालीन अध्यक्ष केसरी यांना नव्हती (कारण ते तोपर्यंत बैठकीसाठी पोहोचलेले नव्हते). अशा बातम्या प्रकाशित झाल्या होत्या की, केसरी बैठकीत पोहोचले, तेव्हा त्यांनी अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाबद्दल आभार व्यक्त करणारा ठराव (माझ्या स्मरणाप्रमाणे प्रणव मुखर्जी यांच्याकडून) वाचून दाखवला जात होता. ते लक्षात येताच केसरी यांनी बैठक अध्यक्ष या नात्यानं स्थगित केली, पण त्यांना एका खोलीत कोंडून सोनिया गांधी यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्षपदी करण्यात आली. नंतर अध्यक्ष म्हणून गांधी कुटुंबियानं केसरी आणि पी. व्ही. नरसिंहराव या दोन्ही माजी आणि तेव्हा हयात असलेल्या अध्यक्षांची केलेली उपेक्षा दिल्लीच्या दरबारी राजकारणात आजही चर्चेत असते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

यापैकी नरसिंहराव हे तर केवळ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षच नव्हते, तर देशाचे पंतप्रधानही होते. नुसते पंतप्रधान नव्हते तर, या देशात खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या महत्त्वाकांक्षी, जगाच्या व्यापक पटावर भारताला नेणाऱ्या सुधारणांचे जनकही होते. मृत्यूनंतर त्यांचं पार्थिव पक्षाच्या राष्ट्रीय कार्यालयात नेऊ देण्यात आलं नाही, ना दिल्लीत त्यांची समाधी होऊ देण्यात आली.

हे सर्व कटू असलं तरी सांगण्याचा उद्देश हा की, खुद्द गांधी कुटुंबीय आणि त्यांचा प्रभाव असणारे नेते, कार्यकर्ते हेही खरगे यांच्यासमोरील एक आव्हान असेल. यातही जी-२१ म्हणून जो असंतुष्टांचा गट काँग्रेसमध्ये आहे, त्या नेत्यांना पक्षाध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांचं नेतृत्व मान्य आणि राहुल गांधी यांचं नेतृत्व अमान्य आहे. अशा या विचित्र परिस्थितीत सर्वांना सोबत घेऊन चालणं, ही फार मोठी तारेवरची कसरत खरगे यांच्यासाठी ठरणार आहे.

सध्याचा काँग्रेस पक्ष १४० वर्षांचा नाही. इंदिरा गांधी यांनी स्थापन केलेल्या ‘काँग्रेस (आय)’ या पक्षाची नाळ तत्कालीन अध्यक्ष नरसिंहराव यांनी पुन्हा एकदा १९८८मध्ये स्थापन झालेल्या काँग्रेस पक्षाशी जोडून देण्याची चतुराई दाखवलेली आहे. थोडक्यात, काँग्रेस हा विचार मात्र १४० वर्षं जुना आहे. काँग्रेस हा शिस्तबद्ध राजकीय पक्ष कधीच नव्हता, तर देशाच्या स्वातंत्र आंदोलनाला संघटित रूप देणारी ती एक राष्ट्रव्यापी चळवळ होती. तीच पुढे पक्ष म्हणून ओळखली जाऊ लागली. देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारा आणि सर्वाधिक काळ केंद्र व राज्यात सत्तेत राहिलेला, देशाला ठोस प्रगतीचा मार्ग दाखवणारा काँग्रेस हा पक्ष देशातील विविध धर्म तसंच जाती, उपजाती, पोटजाती, पंथ, भाषा यांची एक पोतडी बनलेला होता.

हळूहळू या पोतडीतल्या ऐवजावर भाजपनं यशस्वीपणे डल्ला मारला आणि अलीकडच्या अडीच-तीन दशकांत राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसला सत्तेपासून वंचित ठेवण्यात यश मिळवलं. अनेक राज्यातही असंच घडलं. २०१४ नंतर निवडणुकांतले सलग पराभव काँग्रेसला केवळ निष्प्रभच करणारे ठरले नाहीत, तर पराभूत मानसिकतेच्या खाईत लोटणारे ठरले.

अलीकडच्या दोन-अडीच दशकांत तर दिल्लीपासून अगदी खेड्यापाड्यांपर्यंत तरुण चेहरे अपवादानंच दिसले आहेत. विशिष्ट नेत्यांच्या मक्तेदारीची देशभर पसरलेली छोटी छोटी बेटं असं काँग्रेस पक्षाचं स्वरूप झालेलं आहे. ही एक प्रकारची सरंजामशाहीच आहे. हे सरंजामदार स्वत: विजयी होऊ शकतात, पण राष्ट्रीय किंवा राज्य पातळीवर सत्ता प्राप्तीइतकं बळ निवडणुकांत प्राप्त करू शकत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त २ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

गोम इथेच आहे, असं राज्य आणि राष्टीय पातळीवरील यश निवडणुकांत मिळवून देण्याचा करिष्मा केवळ गांधी कुटुंबाकडेच आहे. शिवाय पक्षात आता कार्यकर्ते कमी आणि नेते जास्त अशी अवस्था आहे. हे असं दुष्टचक्र भेदण्याचं अत्यंत कठीण आव्हान खरगे यांच्यासमोर आहे.

काँग्रेसचा संकोच होत गेला म्हणून भाजपचा विस्तार झाला. (किंवा काँग्रेस पक्ष जिंकू शकला नाही, म्हणून भाजपला निवडणुकीत विजय मिळाला.) ही मांडणी अत्यंत भाबडेपणाचीच नाही, तर राजकीय दुधखुळेपणाची आहे. दोन खासदारांवरून मुख्य प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्ष पंचवीस-तीस वर्षांत स्वबळावर सरकार स्थापनेइतकं बहुमत मिळवण्याइतका बलवान कसा झाला, संघटनात्मक मांडणीचं नेमकं कोणतं मॉडेल भाजप (आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघा)नं राबवलं, त्याचं कठोर विश्लेषण (Swot Analysis) करून पक्ष विस्ताराचं स्वतंत्र आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसी परंपरेला सांजेसं सेक्युलर नवं मॉडेल निर्माण करण्याचं कौशल्य खरगे यांना दाखवावं लागणार आहे.

असं मॉडेल निर्माण करून, ते राबवून काँग्रेस पक्षाला स्वबळावर केंद्र आणि राज्यात सत्ता प्राप्त करून देण्यात यश मिळवून दिलं तर खरगे यांचा काँग्रेस पक्ष कायमचा ऋणी राहील आणि गांधी-नेहरू कुटुंबाच्या ‘तथाकथित जोखडा’तून मुक्त होईल. अन्यथा गांधी कुटुंबीयांच्या ताटाखालचं मांजर झालेला आणखी एक अध्यक्ष म्हणून खरगे यांची नोंद होईल.  

..................................................................................................................................................................

लेखक प्रवीण बर्दापूरकर दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......