आमचे अनुभव सीमेवर सैनिकांनी गाजवलेल्या शौर्यकथांसारखे; आमच्यासाठी मात्र हे गिर्यारोहण धाडसाच्या पलीकडे, एक जीवनशैली आहे…
ग्रंथनामा - झलक
उमेश झिरपे, भूषण हर्षे
  • ‘शिखररत्न कांचनजुंगा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 14 October 2022
  • ग्रंथनामा झलक शिखररत्न कांचनजुंगा Shikharatna Kanchanjunga उमेश झिरपे Umesh Zirpe भूषण हर्षे Bhushan Harshe गिरिप्रेमी Giripremi

कांचनजुंगा हे जगभरातल्या गिर्यारोहकांना खुणावणारं शिखर... त्याचं दर्शन विलोभनीय खरं, पण ते सर करणं तितकंच खडतर, आव्हानात्मक. ‘गिरिप्रेमी’च्या दहा गिर्यारोहकांनी हे आव्हान स्वीकारलं आणि मोहीम फत्ते करून दाखवली. ‘शिखररत्न कांचनजुंगा’ या उमेश झिरपे आणि भूषण हर्षे यांच्या या पुस्तकात या थरारक मोहिमेचं रोचक वर्णन आहे. रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

१७ मे २०१९. अखेर तो क्षण अगदी जवळ आला होता. सुमारे एक महिना ज्या कांचनजुंगा पर्वताच्या अंगाखांद्यावर बागडण्यात घालवले, त्या कांचनजुंगाला आज अखेरचा निरोप द्यायचा होता. पहाटे नेहमीप्रमाणे लवकर जाग आली. आज फिंजूच्या चहा देण्यातही उत्साह कमी आणि औपचारिकता अधिक जाणवली. अजूनही आम्ही १८,५०० फुटांवरच्या त्या टेकडीवरच होतो, परंतु आपल्या घरीच असल्यासारखं वावरत होतो. आता जरी आजूबाजूला कोणतीही जाग नसली, गिर्यारोहकांची वर्दळ नसली तरी कसलीही भीती वाटत नव्हती, बाहेर तापमान उणे असलं तरी त्याची भेदकता मुळीच जाणवत नव्हती. वारं नेहमीप्रमाणेच वाहत होतं, पण त्याचा त्रास न होता उलट ते आल्हाददायक वाटत होतं. हा बेस कॅम्प सोडून जाणं म्हणजे घर सोडून कुठेतरी दुसरीकडे चाललो असल्याची भावना मनात दाटत होती. बाहेरचा बुद्धाचा चौथरा, आमच्या तंबूतल्या मंदिरातील देव यांचं आज शेवटचं दर्शन घेऊन निघायचं होतं. उजाडल्यावर बराच वेळ कांचनजुंगाकडे नुसतं बघत राहावं असं वाटत होतं. गेल्या एक महिन्यात या शिखराने आम्हाला अगदी आपलंसं करून घेतलं. इथल्या बर्फाच्या बेलाग कड्यांनी आणि उत्तुंग शिखरांनी मात्यापित्यांप्रमाणे आमच्या सर्वांची काळजी घेतली होती. आम्हाला मार्गदर्शन केलं होतं, आमच्या संघाला चढाईसाठी प्रेरणा आणि बळ दिलं होतं. मात्र, हे सारं सोडून आता आम्ही पुन्हा एकदा शहरी जीवनाच्या रहाटगाडग्यात फिरण्यासाठी परत चाललो होतो. हे सुवर्णक्षण कधीच संपू नयेत, असं वाटत होतं. परंतु ते शक्य नव्हतं. बुद्धापुढे जुनिपरचा धूप लावून आमच्या देवांची आरती करून कांचनजुंगा मातेचे मन:पूर्वक आभार मानले.

सकाळी ठरल्याप्रमाणे बेस कॅम्पला हेलिकॉप्टर आलं. त्यात दोन शेर्पा चढले, जे काल मृतदेह कॅम्प-२वर सुरक्षितरित्या ठेवून आले होते. काही वेळात हेलिकॉप्टर मृतदेह घेऊन खाली आलं आणि तसंच पुढे छेरामला रवाना झालं. त्या दिवशी हवा स्वच्छ असल्याने आमचा संपूर्ण कॅम्प आवरून सामान छेरामला हलवण्यासाठी आणखी एक हेलिकॉप्टर छेराममध्ये कालच येऊन थांबलं होतं. त्या हेलीच्या आजच्या पहिल्या फेरीत मी आणि भूषण बेस कॅम्पवरून छेरामला पोचलो. छेरामच्या हेलिपॅडवर बेस कॅम्पवरून गेल्या दोन दिवसांत इतर संघांचं खाली आणलेलं सामान वेगवेगळ्या गठ्यांमध्ये ठेवलेलं होतं. त्यातच थोडीशी रिकामी जागा बघून बिप्लब आणि कुंतल दोघांचे मृतदेह जमिनीवर ठेवलेले होते. ते दृश्य पाहून मन अक्षरश: हळहळलं. गेले महिनाभर आमच्या डोळ्यांसमोर वावरणारे दोन गिर्यारोहक आज असे निपचित पडलेले बघवत नव्हते. इथून काठमांडूला नेण्यापूर्वी सरकारी पद्धतीने त्या मृतदेहांचा पंचनामा करण्यासाठी पर्यटन विभागातील एक अधिकारी हेलिकॉप्टरने सकाळी छेरामला दाखल झाला होता. मी या सगळ्या रेस्क्यूमध्ये पुढाकार घेतला असल्याने त्याने मला मृतदेह ज्या हेलिकॉप्टरने काठमांडूला जाणार होते, त्याच हेलीने जाण्याची विनंती केली.

खरं तर मला आता या सगळ्यातून कधी एकदा बाहेर पडतोय आणि आमच्या संघातील सर्व सदस्यांना भेटून आमच्या यशाचा आनंदोत्सव साजरा करतोय असं झालं होतं, परंतु हातात घेतलेली जबाबदारी अर्धवट सोडणं शक्य नव्हतं. भूषणला छेराममध्येच थांबायला सांगून त्याची दुसऱ्या हेलीने काठमांडूपर्यंत येण्याची व्यवस्था करून अखेर मी हेलिकॉप्टरमध्ये बसलो. दोन्ही मृतदेह, त्यांच्या अंगावरचे चढाईचे कपडे, त्यांच्या बॅगा आणि त्यांना ज्या स्लिपिंग बॅगांमध्ये खाली आणण्यात आलं होतं, ते सर्व तसंच होतं. त्या सर्वांसकट ते मृतदेहदेखील आमच्याच हेलीमध्ये ठेवले गेले. खूप कसनुसं वाटत होतं; पण त्याला इलाज नव्हता. हेलीने छेराम सोडलं. हवेत उडाल्या उडाल्या समोर कांचनजुंगाचं अखेरचं ओझरतं दर्शन झालं. कांचनजुंगा शिखर मातेचे पुन्हा एकदा मनोमन आभार मानत आणि शिखरापुढे नतमस्तक होत, अखेर मी कांचनजुंगा मातेचा निरोप घेतला. हेलिकॉप्टर काठमांडूला पोचताच विमानतळावरच अ‍ॅम्ब्युलन्स तयार होती. तडक आम्ही रुग्णालयात पोचलो, तिथे सगळ्या औपचारिकता पूर्ण करता करता दिवस गेला. बिप्लब आणि कुंतल यांचे दिवसभर डोळ्यासमोर असलेले मृतदेह आणि चिलीच्या रॉड्रिगोचा कांचनजुंगाच्या माथ्याजवळ झालेला अंत, हे कांचनजुंगा शिखराच्या भेदकतेचं प्रतीक होतं. दोघांच्या कुटुंबीयांचे थिजलेले आणि रडवेले चेहरे पाहून माझ्या अंगावर काटा येत होता. त्याही परिस्थितीत आपल्या कुटुंबियांचे मृतदेह पाहायला मिळाल्याने त्यांनी न बोलता ‘गिरिप्रेमी’चे मानलेले धन्यवाद स्वीकारताना मला आणखीनच गहिवरायला झालं. दोघांच्या कुटुंबियांकडे पुढची सूत्रं सोपवून अखेर मी या सगळ्या रेस्क्यू नाट्यावर पडदा टाकला.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्याच दिवशी रात्री भूषण काठमांडूला पोचला आणि इतर सर्व मंडळी दोन दिवसांनी काठमांडूत दाखल झाली. नेपाळच्या तत्कालीन उप-पंतप्रधानांच्या हस्ते ‘गिरिप्रेमी’च्या संपूर्ण संघाचं कौतुक झालं. तसंच भारतीय राजदूतांकडूनही कौतुकाची थाप सर्वांच्या पाठीवर पडली. संपूर्ण संघासह पशुपतिनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन झालं. सलग तीन वर्षं अपयश पत्करायला लागल्यानंतर या वर्षी ‘गिरिप्रेमी’च्या संघाबरोबर शिखरमाथा गाठण्यात यशस्वी झालेल्या माया शेर्पाने संपूर्ण संघाला विशेष जेवणाचं आमंत्रण दिलं, त्याचबरोबर सर्व शेर्पा सहकाऱ्यांबरोबर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एका जंगी पार्टीचं आयोजन पीक प्रमोशनतर्फे करण्यात आलं. पुण्यातदेखील सर्व वर्तमानपत्रांनी आणि इतर प्रसारमाध्यमांनी मोहिमेबद्दल भरभरून लिहिलं. सर्व ‘गिरिप्रेमी’ आणि गिर्यारोहकांचे कुटुंबीय आता आमच्या परतण्याची आतुरतेने वाट पाहत होते. आमच्या स्वागतासाठी एका मोठ्या कौतुकसोहळ्याचं आयोजनदेखील करण्यात आलं. त्या कार्यक्रमामध्ये दाखवण्यासाठी भूषणने तीन दिवसांच्या काठमांडूच्या मुक्कामात एक सुंदर ध्वनिचित्रफीत बनवली. नेहमीप्रमाणे आमचे मित्र आणि आणि व्हॉइसओव्हर आर्टिस्ट डॉ. अमित त्रिभुवन यांनी रातोरात या चित्रफितीसाठीचं स्क्रिप्ट आपल्या भारदस्त आवाजात रेकॉर्ड करून पाठवलं. यात ‘गिरिप्रेमी’चे हितचिंतक हर्षवर्धन केतकर आणि त्यांच्या ‘फ्रेंड्स डिजिटल रेकॉर्डिंग स्टुडिओ’चा अर्थातच सहभाग होता. दरम्यान मी विवेकला बरोबर घेऊन काठमांडूतील हिशोब वगैरे कामं संपवून घेतली, आणि २५ मे रोजी आम्ही मायदेशी परतण्यास सज्ज झालो..

या मोहिमेच्या यशाचे मानकरी आमचे सारे शिलेदार तर होतेच, परंतु आमच्या सर्व शेर्पा बांधवांच्या मदतीशिवाय हे कदापि शक्य नव्हतं. आमच्या मोहिमेच्या संपूर्ण बांधणीमध्ये आमच्याबरोबर असलेले पीक प्रमोशन संस्थेचे केशव पौडीयल, आंगबाबू शेर्पा, पासांग शेर्पा यांचाही मोहिमेच्या यशात मोलाचा वाटा होता. रूट ओपनिंग संघातील सदस्यांनी तर कमाल केली. पहिल्याच प्रयत्नात उत्तम नियोजन करत त्यांनी शिखरापर्यंतचा मार्ग खुला केला. त्या संघातील लाक्या, आंगदोरजी, दावा फिंजोक, फुर्बा या चौघांनी ऊन, वारा, थंडी कशाचीही तमा न बाळगता चढाई केली. तसंच आमच्या इतर शेर्पांनीदेखील आमच्या सर्व गिर्यारोहकांची अगदी मोठ्या भावाच्या नात्याने काळजी घेतली आणि मार्गदर्शन केलं.

१९५३ सालच्या एव्हरेस्ट मोहिमेपासून ते अगदी आजच्या घडीपर्यंत शेर्पांचं गिर्यारोहणातील योगदान हे वादातीतच आहे. आज गिर्यारोहणातील बहुतेक महत्त्वाचे विक्रम हे शेर्पा मंडळींच्या नावावर आहेत. तरीदेखील त्यांची गिर्यारोहकांना मदत करण्याची, चढाईमधील मार्गदर्शक होण्याची आणि वेळ पडली तर गिर्यारोहकांच्या सुरक्षेची सर्व धुरा वाहण्याची वृत्ती आणि आवड जराही कमी झालेली नाही. त्यामुळे जो जो या पर्वतांवर येतो, त्याला शेर्पाबद्दल अपार आदर आणि आस्था असते.

‘गिरिप्रेमी’ आणि शेर्पांचा तर कित्येक वर्षांचा अनोखा ऋणानुबंध आहे. त्याचंच प्रतीक म्हणून या सर्व शेर्पा मंडळींचं कौतुक आणि यथोचित आदर करण्यासाठी गेली अनेक वर्ष आम्ही आमच्या मोहिमेतील सर्व शेर्पांना पुण्यामध्ये निमंत्रित करून इथे त्यांचा चार दिवस पाहुणचार करून त्यांना एक छान अनुभव देण्याचा प्रयत्न करतो. येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या वेळी चढाईचा मोसम नसतो, त्या वेळी आमच्या संघातील सर्व शेर्पा, आमचा कुक फिंजू आणि पीक प्रमोशनचे अध्यक्ष केशव पौडीयल, संचालक बाबू शेर्पा आणि पासांग शेर्पा अशा सुमारे वीस जणांच्या चमूला पुण्यात बोलवून त्यांच्यासह कांचनजुंगा मोहिमेचं यश साजरं करण्याचा कार्यक्रम ठरवून त्याप्रमाणे सर्व शेर्पा मंडळींना सांगून आम्ही अखेर काठमांडूचा निरोप घेत होतो...

त्रिभुवन इंटरनॅशनल विमानतळावरून दिल्लीच्या विमानात बसलो. विमान आकाशात झेपावलं आणि मी मनोमन एका समाधानाने या मोहिमेच्या यशाचं माझ्या स्वत:शी मूल्यमापन करू लागलो. खरंच किती काय काय दिलं या ‘कांचनजंगा इको मोहीम २०१९’ मोहिमेने. आम्हाला म्हणजे ‘गिरीप्रेमी’ला, आमच्या सर्व गिर्यारोहकांना आणि वैयक्तिक मला स्वत:ला. ‘गिरीप्रेमीच्या बाबतीत म्हणायचं झालं तर, १९८२ साली श्री. आनंद पाळंदे, कै. नंगू पागे, श्री. दिलाप निंबाळकर, श्रीमती उष:प्रभा पागे आणि श्री. व हिरेमठ या गिर्यारोहक मित्रांनी लावलेलं गिरिप्रेमीचं रोपटं २०१२च्या व मोहिमेच्या वेळी एखाद्या वटवृक्षाप्रमाणे बहरलं.

२०१२ साली सुरू झालेल्या एका विलक्षण प्रवासामध्ये एव्हरेस्ट, ल्होत्से, मकालू, चो ओयू, धौलागिरी, मनास्लू या सहा अष्टहजारी शिखरांनंतर आता कांचनजुंगाच्या रूपाने आणखी एक सोनेरी पान ‘गिरिप्रेमी’च्या यशोगाथेत लिहिलं गेलं होतं. भारतातच नव्हे तर जगात कोठेही अशी एखादी गिर्यारोहण संस्था नाही, ज्या संस्थेने अशा प्रकारची कामगिरी केली. त्यात ही सारी शिखरं भारताबाहेर असल्याने ‘गिरिप्रेमी’ची कामगिरी ही खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाची झाली, यात वादच नाही. ‘गिरिप्रेमी’ या वर्षीच्या संपूर्ण कांचनजुंगा मोहिमेचं अघोषित नेतत्व करत असल्याने बेस कॅम्पवर आलेल्या देशविदेशातील गिर्यारोहकांची मदार ‘गिरिप्रेमी’च्या संघावर होती. शिखर चढाई यशस्वी झाल्यावर बेस कॅम्प सोडताना सर्व जण आम्हाला भेटून गेले. यात सिंगापूरचे खू स्वी चाऊ, नेपाळची माया शेर्पा, जर्मनीचा फ्रैंक, बल्गेरियाचा अटानस, चिलीचा हर्नन इत्यादींचा समावेश होता. यातील हर्नन तर निरोप घेताना अक्षरश: गळ्यात पडून रडला. सर्वच जण भावूक झाले होते. या आधी खू स्वी यांना दोन वेळा कांचनजुंगा शिखराने हुलकावणी दिली होती, मात्र या वेळी शिखर चढाई यशस्वी झाल्याने तेदेखील भावूक होते. सर्वच गिर्यारोहकांनी गिरिप्रेमीच्या संघाचे, गिरिप्रेमीच्या प्लॅनिंगचे, पूर्वतयारीचे व प्रत्यक्ष चढाईचे तोंडभरून कौतुक केले. त्यांच्या चढाईच्या यशामध्ये ‘गिरिप्रेमी’चादेखील वाटा आहे, असं सगळ्यांकडून ऐकल्यावर मन धन्य झालं. ‘गिरिप्रेमी’चा नावलौकिक गिर्यारोहण इतिहासामध्ये जगभर पसरला आहेच, या मोहिमेमुळे तो आणखी सर्वदूर पसरून दृढ झाला. हे या मोहिमेचं एक खूप मोठं फलित आहे.

कांचनजुंगा हे बर्फाच्या पाच खजिन्यांचं शिखर म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच की काय ‘गिरिप्रेमी’लादेखील या शिखरावर विविध विक्रमांच्या रूपाने नवा खजिनाच गवसला. एकाच संघातील दहा गिर्यारोहकांनी एकाच वेळी कांचनजुंगाचा माथा गाठण्याची घटना कांचनजुंगाच्या इतिहासात प्रथमच घडली. चार सख्ख्या शेर्पा भावांनी एकाच वेळी कांचनजुंगा शिखर चढाई यशस्वी केल्याची घटनाही या मोहिमेत घडली. ‘गिरिप्रेमी’चा पासांग शेर्पा सहा वेळा कांचनजुंगा शिखर चढणारा जगातील पहिला व्यक्ती ठरला. इको-मोहिमेमध्ये जमा केलेल्या नमुन्यांवर संशोधन होऊन त्या भागाच्या माहितीत आणि विज्ञानात भर घालणारी ही पहिलीच मोहीम ठरली.

सर्व ‘गिरिप्रेमी’च्या साथीने मला पुन्हा एकदा आणि तेही सलग सातव्यांदा एका यशस्वी अष्टहजारी मोहिमेचा नेता होण्याचं भाग्य लाभलं. रत्नांच्या या शिखरावर आम्हाला या साऱ्या विक्रमाच्या रूपाने अनेक रत्नं गवसली. परंतु या सगळ्या विक्रमांपेक्षादेखील महत्त्वाची गोष्ट ठरली, ती म्हणजे ‘गिरिप्रेमी’चे सर्व सदस्य जगातील तिसऱ्या उंच आणि भारतातील सर्वांत उंच शिखरावर माथा टेकून सुखरूप घरी परतत होते. अमेरिकेचे प्रसिद्ध गिर्यारोहक, जगातील चौदा अष्टहजारी शिखर चढाई करणारे पहिले अमेरिकी नागरिक व ८,००० मीटरपेक्षा उंच असलेली शिखरे एकवीस वेळा चढणारे एड व्हिस्टरस म्हणतात, ‘Getting to the top is optional, getting down is mandatory’. थोडक्यात काय, शिखर चढाई करण्याला पर्याय असू शकतो, मात्र सुखरूप खाली परत येण्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे या मोहिमेचं यश आमच्यासाठी खचितच अतिशय महत्त्वाचं होतं. धाडस जरूर करावं, पण आपल्या मर्यादा ओळखून कुठे थांबायचं हे ठरवता आलं, तरच तुम्ही एक चांगले गिर्यारोहक होऊ शकता. गिर्यारोहणात हे नियम पाळले तरच त्याचा आनंद गिर्यारोहक व त्यांचे आप्तेष्ट घेऊ शकतात, याचा अनुभव ‘गिरिप्रेमी’ गेली अनेक वर्षं घेत आहे आणि याही मोहिमेत आम्ही तो प्रकर्षाने घेतला.

मोहीम यशस्वी झाली की, नेता म्हणून मला दर वेळी साहजिकच आनंद होतो, पण तरीदेखील आजवरच्या, मनास्लू सोडता सर्व मोहिमांमध्ये हातातोंडाशी आलेला घास जातो की काय अशा वळणावरून मोहिमेला जावं लागलं होतं. काही वेळा मला स्वत:ला, तर काही वेळा आमच्या कोण्या सदस्याला यशाने हुलकावणी दिली. मात्र या मोहिमेत दहाच्या दहा सदस्यांनी माथा गाठल्याने माझी छाती अभिमानाने फुलली होती. तसंच इतकी वर्षं मी माझ्या सगळ्या गिर्यारोहकांना ओळखतो, परंतु या मोहिमेत सगळ्यांशी पुन्हा एकदा नव्याने भेट झाल्यासारखं वाटलं. या मोहिमेसाठी सर्वांनी केलेली शारीरिक तयारी, त्यासाठी केलेला कात्रज-सिंहगड-राजगड-तोरणा सलग सतरा तासांचा ट्रेक, मानसिक बळ वाढवण्यासाठी आपापल्या स्तरावर प्रत्येकाने केलेली तयारी, ज्यामध्ये ब्रह्मविद्येसारख्या अनेक विविध व्यायामप्रकारांचा समावेश होता. मोहिमेसाठी सर्वांनी केलेलं वाचन, श्री. धवल शृंगारपुतळे यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला ‘न्यूट्रिशन डायट’ या सर्वांचा मी साक्षीदार होतो.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

यापूर्वीच्या मोहिमांपेक्षा हे सारं खूप वेगळं होतं. कांचनजुंगाच्या या यशाने मला आमच्या सर्व गिर्यारोहकांमध्ये काही सकारात्मक बदल झाल्याचं प्रकर्षाने दिसत होतं.

भूषण, जो गेली कित्येक वर्षे माझ्या खांद्याला खांदा लावून ‘गिरिप्रेमी’च्या या अष्टहजारी व्रताचा मानकरी झाला आहे, त्याची ही बऱ्याच वर्षांनी मोठी मोहीम होती. सुमारे सहा वर्षांच्या अंतरानंतरदेखील त्याच्या कामगिरीवर माझा विश्वास होता आणि तो त्याने सार्थ ठरवला. या मोहिमेत भूषण आमच्या गेल्या बारा वर्षांच्या सहवासात प्रथमच इतका भावूक जाणवला. कदाचित एका मुलीचा बाप झाल्यानंतर प्रथमच इतके दिवस दूर आल्यामुळे तसं झालं असावं. परंतु त्याचा मोहिमेतील कामगिरीवर कदापि परिणाम झाला नाही. त्याने नेहमीप्रमाणे सर्व शेर्पांशी अगदी छान सूत जुळवलं. त्यामुळे वर चढाई करत असताना त्या सर्वांची मोट बांधणं आणि संघाला त्याची सर्वाधिक मदत होईल, हे पाहणं भूषणने अगदी जबाबदारीने केलं. कांचनजुंगा मोहिमेनंतर त्याच्यातला गिर्यारोहक आणखी परिपक्व झाला, असं मला जाणवलं. पुढच्या मोहिमेसाठी मी मनातल्या मनात त्याचं नाव नक्की करून ठेवलं.

आशिषचं हे पाचवं शिखर आणि सहावी मोहीम, ‘गिरिप्रेमी’ची अष्टहजारी मोहीम आणि आशिष माने हे जण समीकरण झालंय. नेहमीप्रमाणे या मोहिमेतही आशिष अपेक्षांवर अगदी शतप्रतिशत खरा उतरला. या मोहिमेत मी त्याच्या अनुभवाचा वापर आमच्या संघातील नवीन सदस्य विवेक, किरण, जितेंद्र यांना होताना पाहिलं. अपेक्षेप्रमाणे शिखर गाठणाऱ्या आमच्या पहिल्या गटात आशिष होताच. मोहिमेची तांत्रिक बाजू जसं संपर्क यंत्रणा, सोलर चार्जिंग अशा आघाड्यांवरही आशिषचा अनुभव वाढत चालल्याचं या मोहिमेत मला जाणवलं. साहजिकच तो पुढच्याही अष्टहजारी शिखराचा भाग असावा, अशी माझी इच्छा होती.

आनंदनेदेखील या मोहिमेत २०१४च्या मकालू नंतर म्हणजे तब्बल पाच वर्षांनी भाग घेतला होता. त्याच्या स्वभावामुळे तो नेहमीच संघात एक ऊर्जा, एक चैतन्य घेऊन येतो, ते त्याने कांचनजुंगा मोहिमेतही केलंच. शिवाय त्याच्या इतक्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आमच्या संघाला अनेकदा झाला. आनंद जिथे गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देतो, त्या विद्या व्हॅली शाळेमध्ये आनंदच्या या कामगिरीने आणखी उत्साह संचारला. त्याच्या शाळेच्या मुख्याध्यापिका आणि सर्व संचालक मंडळी विद्या व्हॅली शाळेतील वाढत्या ‘अ‍ॅडव्हेंचर कल्चर’चं श्रेय नेहमीच आनंदच्या कामगिरीला आणि ‘गिरिप्रेमी’च्या सर्व मोहिमांना देतात. त्यात आता आणखी भर पडणार होती.

रूपेशदेखील एव्हरेस्ट २०१२ नंतर थेट ७ वर्षांनी अष्टहजारी शिखरमोहिमेत सहभागी झाला होता. त्याने त्याच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी काटेकोरपणे व्यायाम आणि आहाराचं नियोजन केलं होतं. या मोहिमेत तर तो कॅम्प-४पर्यंत कृत्रिम प्राणवायूच्या वापराशिवाय पोचला होता. पुढची चढाईदेखील त्याला तशीच करणं शक्य होतं, पण संघाच्या यशाच्या आड आपली महत्त्वाकांक्षा येता कामा नये, यासाठी त्याने तिथून संघाबरोबर चढाई केली. पण तो आज ना उद्या एक तरी अष्टहजारी शिखर कृत्रिम प्राणवायू शिवाय चढेल आणि ‘गिरिप्रेमी’चं नाव आणखी उंचावेल, असा आत्मविश्वास मला रूपेशच्या कांचनजुंगाच्या कामगिरीतून आला.

प्रसादच्या कांचनजुंगाच्या यशाने तो भारतातील एकमेव कॉस्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल ठरला, ज्याने एक तीन अष्टहजारी शिखर गाठण्याची कामगिरी केली. प्रसाद सहभागी असलेली ‘गिरिप्रेमी’ची आजवरची कोणतीही मोहीम अयशस्वी झालेली नव्हती आणि तीच परंपरा इथेही कायम राहिली. तसंच प्रसादची शिखर गाठण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती या वेळीही मला जवळून बघायला मिळाली.

कृष्णाने त्याच्या हृदयविकाराच्या आजारावर मात करत कांचनजुंगासारख्या शिखरावर यशस्वी चढाई केली. त्यामुळे त्याच्या जिद्दीबद्दल आणि चिकाटीबद्दल कौतुक करावं तितकं कमीच होतं. आपल्या शरीराचा आणि तयारीचा व्यवस्थित अंदाज घेत एखादा अनुभवी गिर्यारोहक कसा चढाई करू शकतो, याचं गमक कृष्णाला सापडलं असं म्हणावं लागेल. या यशामुळे त्याच्या गिर्यारोहणाच्या प्रचार कार्याला आणखी गती मिळणार होती.

सुमितला संघात घेतल्यापासूनच त्याचं स्थान किती महत्त्वाचं आणि संघाच्या दृष्टीने उपयोगाचं आहे, हे मी जाणून होतो, परंतु कांचनजुंगासारख्या शिखरावर त्याची कामगिरी कशी असेल, याचा मला आधी अंदाज नव्हता. बेस कॅम्पला आल्यापासून सुमितन जो दवाखाना उघडला होता, तो पार ७,४०० मीटरवर. दोन गिर्यारोहकांचे प्राण वाचवण्यापर्यंत त्याने पराकाष्ठा केली. बेस कॅम्पला असणाऱ्या सर्व शेर्पा आणि देशोदेशीच्या गिर्यारोहकांना ‘गिरिप्रेमी’च्या तळवारचा डॉक्टर सुमित परिचयाचा झाला होता. इतर कोणताही डॉक्टर असो अगदी एव्हरेस्टच्या बेस कॅम्पसारख्या ठिकाणी आलेले डॉक्टरदेखील, केवळ तपासण्याचे १०० ते २०० अमेरिकन डॉलर्स घेतात; मात्र इथे सुमित तपासणं काय तर उपचारदेखील विनामूल्य करत होता. त्यामुळे सुमितच्या कामाचा मला प्रचंड अभिमान आणि कौतुक वाटतं. तसंच आता इथून पुढे सुमितची अंगकाठी पाहून चो ओयू आणि कांचनजुंगाला विचारला गेलेला प्रश्न ‘हा नक्की चढाई करू शकणार का?’ कोणी परत विचारला तर, अगदी हुकमी उत्तर माझ्याकडे होतं.

आमच्या सर्व शेर्षांकडून मला जे काही ऐकायला मिळालं, त्यानुसार विवेक आमच्या सर्व दहा जणांमध्ये शेवटपर्यंत सगळ्यात तंदुरुस्त आणि तयारीचा गिर्यारोहक ठरला होता. आयआयटी पवईमध्ये एमटेकच्या शेवटच्या वर्षाला असताना, मला पहिल्यांदा भेटलेला विवेक ते आज कांचनजुंगाच्या माथ्यावर पोचणारा विवेक हा प्रवास मी अगदी जवळून बघितला असल्याने विवेकच्या या कामगिरीवर मी मनापासून खूश होतो. त्याने गेल्या काही वर्षात जी मेहनत घेऊन आणि व्यायाम करून स्वत:ला या पद्धतीने घडवलं होतं, ते खरंच सर्व नवीन गिर्यारोहकांसाठी आदर्श आहे. त्याच्या गिर्यारोहण वाटचालीमध्ये कांचनजुंगा ही एक खूप मोठी उपलब्धी होती.

जितेंद्रच्या बाबतीत थोडं वेगळं होतं. त्याने स्वत: वयाच्या चाळिशीनंतर गिर्यारोहण सुरू केलं. तरीही या प्रवासात त्याने इतकं उत्तुंग शिखर गाठलं. जीजीआयएमच्या प्रस्तरारोहण प्रशिक्षण शिबिरात भाग घेऊन गिर्यारोहणाबद्दल माहिती करून घेत त्याने आज इथवर मजल मारली होती. इतक्या कमी कालावधीत थेट अष्टहजारी शिखर चढण्याची संधी मिळालेला हा ‘गिरिप्रेमी’तील पहिलाच गिर्यारोहक असावा. स्वत:च्या काटेकोर व्यायाम आणि आहाराच्या जोरावर जितेंद्र यापुढेही अनेक मोहिमांमध्ये भाग घेईल, अशी मला खात्री होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सरतेशेवटी ‘हे सारं कशासाठी?’, ‘का येतो आम्ही पुनःपुन्हा इथे जीव धोक्यात घालायला?’, ‘आमच्या इथल्या कामगिरीने समाजाला, देशाला काय मिळतं?’ आता मी या प्रश्नांची उत्तरं ठामपणे देऊ शकत होतो. आम्ही ज्या वेळी एखाद्या शिखरावर भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकावतो, त्या वेळी आमच्या मनात ‘ऑलिम्पिक’मधलं पदक- तेही सुवर्णपदक जिंकल्यावर आपला तिरंगा सर्वांत वर पाहताना आणि आपलं राष्ट्रगीत म्हणताना जो आनंद त्या खेळाडूला होईल, तशी काहीशी भावना असते. आपल्या देशाचं नाव मोठं करण्यात आपला काहीतरी खारीचा वाटा असल्याचं एक समाधान असतं. एका कार्यक्रमात भेटलेल्या उतारवयातल्या आजींनी आम्हाला सांगितलेली गोष्ट माझ्या मनावर कायमची कोरली गेली. त्यांच्या मते, आमच्या एव्हरेस्ट आणि इतर मोहिमांच्या कथा ऐकून त्यांना त्यांच्या पायाचं दुखणं कमी वाटायला लागलं आणि त्या दुखण्यामुळे त्यांनी गेल्या काही वर्षांत खंड पडलेली त्यांची कुलदेवीची यात्रा पुन्हा सुरू केली. आमच्या एका ज्येष्ठ प्रयोजकांच्या मते, आमचे अनभव म्हणजे सीमेवर सैनिकांनी गाजवलेल्या शौर्यकथांसारखे असतात, जे ऐकून अनेक तरुण मुलं-मुली प्रेरणा घेतात.

आमच्यासाठी मात्र हे गिर्यारोहण म्हणजे धाडसाच्या पलीकडेदेखील एक जीवनशैलीच आहे. इथे असताना आमची एक वेगळ्या प्रकारची साधना सुरू असते. आमचा आमच्या स्वत:शीच संवाद सुरू असतो, अनेकदा त्यातून स्वतःची नव्याने ओळख होत असते. साऱ्या अडचणींना, आव्हानांना सामोरं जात गाठलेलं शिखर आणि केलेली चढाई जीवनाचं सूत्र शिकवून जाते. सर्वत्र खराब हवामानाची नकारात्मकता असतानाही कधीतरी चांगलं हवामान मिळेल आणि त्या वेळी चढाई करू हा स्वत:वर ठेवलेला विश्वास दैनंदिन आयुष्यातल्या सर्व नकारात्मकतेवर मात करायचं बळ देतो. व्यवस्थापन कौशल्याच्या कोणत्याही कोर्समध्ये शिकवता येणार नाही, असे व्यवस्थापनाचे धडे या गिर्यारोहण मोहिमांमध्ये आम्हाला गिरवायला मिळतात. आपला संघ, आपले सदस्य, आपले शेर्पा सहकारी यांच्याबरोबर संघ म्हणून काम करताना परमोच्च सांघिक भावनेची प्रचिती येते. निसर्गाच्या रौद्र रूपापुढे पदोपदी आपण किती खुजे आहोत, याची जाणीव प्रकर्षाने होते. त्यामुळे आपल्यातील क्षुल्लक गोष्टींबद्दलचा अहंकार दूर ठेवण्याची शिकवण मिळते. अनेक अडचणीच्या प्रसंगी जीवन-मृत्यूच्या रेषेवरून जात असताना आप्तांच्या शुभेच्छा, वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद आणि परमेश्वरावरची श्रद्धा, यांची किंमत समजते. या सर्वांतून तावून-सुलाखून जेव्हा एक गिर्यारोहक समाजामध्ये वावरतो, त्या वेळी तो समाजासाठी एक ताकद बनतो. नैसर्गिक आपत्तीच्या, अपघातांच्या वेळी सर्वप्रथम धावून जाणारा जीवनरक्षक बनतो. आपल्या वागण्या-बोलण्यातून पर्यावरणाचं महत्त्व इतरांना पटवून देणारा एक पर्यावरणप्रेमी बनतो. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या जीवनशैलीचा भाग झालेले सर्व जण एक आरोग्यपूर्ण आणि सुदृढ जीवन जगू शकतात.

‘we will be landing shortly to Pune Airport’, ही कॅप्टनची घोषणा ऐकली आणि अंगावर अक्षरश: रोमांच उभे राहिले. इतक्या दिवसांनंतर मायदेशी आणि त्यात घरी परतण्याचा आनंद, आपल्या आप्तांना पाहण्याची, भेटण्याची ओढ, चेहऱ्यावरून ओसंडणारं कांचनजुंगाचं यश, कांचनजुंगावरील कामगिरीबद्दल प्रचंड अभिमान अशा सर्व भावनांसह आम्ही सर्व जण अखेर पुणे विमानतळावर उतरलो. या सर्व भावनांबरोबर माझ्या मनात मात्र आणखा एक गोष्ट आकार घेत होती आणि ती म्हणजे पुढचं अष्टहजारी शिखर – ‘माउंट अन्नपूर्णा’!

‘शिखररत्न कांचनजुंगा’ - उमेश झिरपे, भूषण हर्षे

रोहन प्रकाशन, पुणे

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......