‘लातूर : परिघावरील आवाज’ हे अनिल जायभाये यांनी संपादित केलेलं पुस्तक नुकंतच हरिती पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झालंय. या पुस्तकात लातूर शहराविषयीच्या ४५ लेखांचा समावेश असून त्यातून या शहराचे सामाजिक व सांस्कृतिक दस्तवेजीकरण करण्यात आले आहे. ‘लातूरची सांस्कृतिक-सामाजिक जडणघडण’, ‘राजकारण आणि शहर’, ‘लिंगभाव आणि शहर’, ‘शहराच्या विकासातील अंतर्विरोध’ आणि ‘जात, जमाती आणि शहर’ अशा पाच विभागात या पुस्तकाची मांडणी केली आहे. मोठ्या आकारातील तब्बल साडेतीनशे पानांचा हा ग्रंथ केवळ लातूर शहरातील तरुण अभ्यासक, संशोधक व विद्यार्थी यांच्यासाठीच महत्त्वाचा नसून, समाजशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थी व अभ्यासकांसाठीही तितकाच महत्त्वाचा आणि संग्रहणीय आहे. या ग्रंथाला जायभाये यांनी लिहिलेल्या सविस्तर प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
लातूर शहराचा हा अभ्यास करण्याची मूळ प्रेरणा मला पुणे विद्यापीठातील डॉ. शर्मिला रेगे यांनी शिकण्या-शिकवण्याच्या संदर्भातील केलेल्या प्रयोगातून आणि ‘येवला तालुका विशेषांक’ (परदेशी, १९९१) यातून मिळाली. पुणे विद्यापीठातील २००५ ते २०१० पर्यंतच्या असंख्य अभ्यासवर्गांनी सैद्धांतिक-वैचारिक समज दिली. यामध्ये राम बापट, अनिकेत जावरे, शर्मिला रेगे, विद्युत भागवत, यशवंत सुमंत, विलास सोनावणे यांनी घेतलेल्या सातत्यपूर्ण अभ्यासवर्गामुळे त्या कालावधीतील विद्यार्थ्यांची एक वैचारिक बैठक तयार झाली. अभ्यास, मूलभूत विचार करणे याबद्दचा दृष्टीकोन तयार झाला. त्यातूनच व्यापक समज आणि भरपूर प्रेरणा मिळाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिकत असताना बहुसंख्य विद्यार्थी ‘ग्रामीण’ भागातील, ज्यांची पहिलीच पिढी उच्च शिक्षणात येत होती असे होते आणि त्याच काळात जागतिकीकरण-खाजगीकरणाची प्रकिया सुरू होऊन स्थिरावली होती. त्यामुळे त्याचे दृश्य परिणाम हळूहळू अनुभवास येत होते. सामाजिक शास्त्रांना उतरती कळा लागलेली दिसत होती. दुसऱ्या बाजूने जी सामाजिक शास्त्रे वर्गात शिकवली जात होती, ती आणि दैनंदिन जगण्यातील प्रश्न, यामध्ये प्रचंड तफावत जाणवत होती. त्याची अनेक कारणं होती. त्यातील एक कारण म्हणजे शिकवण्याची भाषा मुख्यतः इंग्रजी होती. शिवाय वर्गातील ६० टक्के विद्यार्थी हे मराठी माध्यमातून आलेले होते. त्यांना वर्गाशी कनेक्टच होता येत नसे. दुसरं कारण म्हणजे विद्यार्थी-शिक्षक यांच्यामधील शिकण्या-शिकवण्याचे व्यवहार अतिशय पारंपरिक होते. बदललेली क्लासरूम लक्षात न घेतल्यामुळेही तो कनेक्ट विद्यार्थ्यांशी निर्माण होऊ शकला नाही. अर्थात नंतरच्या काळात त्याला अपवाद नक्कीच होते.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या परिस्थितीमधून जात असताना सिद्धान्त आपल्यालाही समजले पाहिजेत असे वाटत होते आणि विविध राजकीय चळवळी, संघटनांचे फक्त सदस्य होण्यापेक्षा त्यांच्या वैचारिक भूमिका गंभीरपणे समजून घेणे गरजेचे वाटले. सर्वच संघटनांमधील विद्यार्थ्यांचा परस्परांशी अभ्यासपूर्ण संवाद घडला पाहिजे, या गरजेतून अभ्यासवर्ग सुरू करणे गरजेचे वाटले. असा हा अभ्यासवर्ग पुणे विद्यापीठात जवळजवळ तीन ते चार वर्षे सुरू राहिला. त्या अभ्यासवर्गातील व्याख्यानांचे काही खंड प्रसिद्ध होण्याच्या मार्गावर आहेत.
थोडक्यात, शिक्षण म्हणजे ज्ञाननिर्मितीच्या प्रक्रियेत आपणासही सहभाग घेता आला पाहिजे, आपणही संशोधन करून आपला भवताल मूलगामी पद्धतीने समजून घेतला पाहिजे आणि सामाजिक बदलाच्या प्रक्रियेत हातभार लावला पाहिजे, त्यासाठी संशोधन हे एक महत्त्वाचे साधन आहे; ज्यामध्ये आपल्याला आपल्या समाजातील प्रश्न समजून घेत आपल्याला विविध प्रस्थापित ज्ञाननिर्मितीच्या चौकटी, पद्धती, दृष्टीकोनाच्या (वसाहतिक, ब्राह्मणी, राष्ट्रवादी, सामान्य ज्ञानाच्या) पलीकडे जाऊन विश्लेषणात्मक-चिकित्सक ज्ञाननिर्मिती करून त्यावर आधारीत व्यवहाराकडे वाटचाल करावी लागेल, असे प्रकर्षाने जाणवू लागले. त्यासाठी आपल्या शिकण्या-शिकवण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल आणि असंख्य प्रयोग करण्याची गरज आमच्या शिक्षकांना व आम्हाला वाटत होती. या पुस्तक प्रकल्पामागील अनेक प्रेरणांपैकी ही एक प्रेरणा नक्कीच होती.
वाचन-लिखाण : मूलभूत शैक्षणिक कौशल्यांचा अभाव
मी लातूर विद्यापीठ उपकेंद्रात २०१२ या वर्षी रुजू झाल्यानंतर अनेक बाबतींत मला आव्हाने वाटत होती. मात्र काही बाबतीत नव्या आशाही वाटल्या. या भागातील अनेक विद्यार्थी शिकण्यास आणि संशोधन करण्यास उत्सुक आहेत. मात्र विद्यापीठात हे विद्यार्थी आल्यानंतर जाणवत असे की, त्यांचे ज्या प्रकारे पदवी पातळीवर शैक्षणिक भरण-पोषण झाले आहे, तेच खूप कामचलाऊ आहे. ते सामान्य ज्ञानाच्या पलीकडे न जाणारे होते त्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना मराठीमध्ये एक पानही व्यवस्थित लिहिता येत नाही, अशी परिस्थिती होती आणि आहे. अर्थात त्याला फक्त विद्यार्थी जबाबदार नसून आपले अभ्यासक्रम, कृतिशील शिकवण्याच्या पद्धतींचा अभाव, मूलभूत वाचनाचा अभाव, किमान पुस्तके हाताळण्याचं-वाचण्याचं, ग्रंथालय वापरण्याचे कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये आपण तयार करू शकलो नाही, या बाबी देखील आहेत.
एकूण प्रचंड गारठलेले, पारंपरिक, आंतरविद्याशाखीय नसलेले, सामान्य ज्ञानावर आधारलेले व संशोधनात्मक अभाव असलेले शैक्षणिक व्यवहार दिसून येतात. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत शैक्षणिक कौशल्ये आत्मसात केलेली दिसून येत नाहीत. मात्र याही परिस्थितीतून आलेले विद्यार्थी नवे शिकण्यास, वाचनास आणि संशोधन करण्यास उत्सुक दिसून आले, हीच काय ती आशा होती.
सर्वप्रथम मी माझ्यासमोरील वर्गात बसलेला विद्यार्थी समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि लक्षात आले की, वाचन-लिखाण, मूलभूत शैक्षणिक कौशल्यांचा अभाव मोठ्या प्रमाणावर आहे. यावर मात कशी करता येईल, याचा विचार सुरू केला. ज्यामध्ये साधं वाचन- लिखाण करणे, वर्गात नोट्स काढणे, चांगली इ-मेल करता येणे, पीपीटी तयार करता येणे, एखाद्या लेखाचा सारांश करणे, पुस्तक परीक्षण करणे, मराठीतील विविध कोश वाचणे, इंटरनेटवर विविध माहितीचे स्त्रोत शोधणे, साधा अर्ज लिहिता येणे, संदर्भसूची लिहिणे, टीपा लिहिणे, परीक्षेतील प्रश्न- उदा. चिकित्सा करा, वर्णन करा, आढावा घ्या, विश्लेषण करा, चर्चा करा यामध्ये नेमके फरक काय आहेत?, स्वतःची ओळख थोडक्यात सांगता येणे, आपला सीव्ही बनवता येणे, स्वतःच्या शैक्षणिक कागदपत्रांची फाईल, कृतिकार्यक्रमाची फाईल कशी तयार करावी, संशोधन साहित्याचे दस्तऐवजीकरण, स्वतःची डिजिटल अर्काइव्ह बनवणे इत्यादी कौशल्यांचा अभाव लक्षात घेऊन त्यावर आधारित अभ्यासक्रम बनवण्यात आला. त्यानंतर तो शैक्षणिक व्यवहारांचा भाग बनवण्यात आला.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
असाईनमेन्ट ते संशोधन प्रकल्प (डेझर्टेशन)
विद्यापीठात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी एक होम असाईनमेंट आणि शेवटच्या सत्रामध्ये संशोधन किंवा डेझरटेशन करायचे असते. खरं तर त्याची सुरुवात ही पहिल्या सत्रापासूनच करायला हवी. एक तर विद्यार्थ्यांची आवड, वाचन, अनुभव लक्षात घेऊन त्यांना त्या-त्या विषयातील असाईनमेंट देणे गरजेचे असते/दिली जाते. मी या संधीचा पुरेपूर फायदा उचलायचे ठरवले. खरं तर विद्यार्थी ज्या असाईनमेंट लिहितात, त्यांना त्यांचे गुण मिळतात. नंतर त्या असाईनमेंट गठ्यात बांधून, गोडाऊनमध्ये पडून राहतात, पण त्याऐवजी, तो विषय विकसित करून, त्याला संशोधनाचा विषय बनवल्यास आणि प्रकाशित केल्यास त्या संशोधनाचा विद्यार्थी व समाजास नक्कीच फायदा होईल. या हेतूने मी ती असाईनमेंट जास्त गंभीरपणे करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात संशोधन करण्यासाठी आवाहन केले. सर्वप्रथम संशोधनाची निवड करताना असाईनमेंट आणि त्यानंतर संशोधनासाठी विद्यार्थ्यांची आवड, साधने, कालसुसंगत वाचन त्या विषयाचं सद्यकालीन महत्त्व, असे लक्षात घेऊन विषय निवड करण्यास सुरुवात केली.
विषय निवडताना तुमच्या आजूबाजूला तुम्हाला कोणते प्रश्न पडतात? का पडतात? घरात पडतात की घराबाहेर पडतात? तुम्हाला कशामुळे वाईट वाटते? अस्वस्थ वाटते? त्याची यादी करा. नंतर त्या पैकीच एक संशोधन विषय निवडायला दिल्याने विद्यार्थी जो विषय निवडत, त्यावर त्यांना काम करणे उत्साहवर्धक वाटत असे. त्यानंतर विद्यार्थी संदर्भित विषयाचे, मनापासून वाचन करत असत. त्यामुळे आम्ही हळूहळू विविध विषय निश्चित केले. त्यातून अनेक विषय निघाले. ज्यावर संशोधन करून विद्यार्थ्यांनी या शहरातील प्रश्नांचा वेध घेतला. त्यामुळे विद्याथ्यांना संशोधन विषय शिकवताना आणि शिकताना प्रत्यक्ष आपल्याच अवतीभोवतीचे प्रश्न/विषय घेऊन त्याचे योग्य विश्लेषण करण्यास शिकवल्यामुळे विद्यार्थी संशोधन करण्यास तर शिकलाच, पण त्या शिकण्यातून आपल्याच शहरातील एका प्रश्नाचं स्वरूप, गुंतागुंत ही बहुपदरी असल्याचे त्याला समजले. त्याबद्दल सरकार, राजकीय नेते, प्रशासक, नागरिक कसा विचार करतात, हेही लक्षात आले.
उदा. लातूर शहरातील फूटपाथ, घरकाम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न, लातूर शहरातील पानसंस्कृती व पानपट्टीची आर्थिक उलाढाल, लातूरच्या राजकीय आलेखाचे विश्लेषण, मुलींवरील वाढती हिंसा, महिला सुरक्षारक्षकांचे प्रश्न, देहविक्री करणाऱ्या महिलांची स्थिती, गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप, लातूरच्या शौचालयाचा प्रश्न, ‘लातूर पॅटर्न’मधील शिकवणींची आर्थिक उलाढाल, शहरातली सावकारी इत्यादी विषय समोर आले. यातून आम्ही हे सर्व विषय पुस्तकरूपाने प्रकाशित करण्याचे ठरवले. एका शहराबद्दलचा हा दस्तावेज महत्त्वाचा असून आजपर्यंतच्या विकासाचा आलेख आणि परिघावरील विविध आवाज यात नोंदवण्यात आले आहे.
क्लासरूम विस्तारताना
आपल्या उच्च शिक्षणाची चार महत्त्वाची ध्येये (यादव, २०२०) आहेत. त्या पैकी एक म्हणजे आपल्या उच्च शिक्षणातून आपण समाजासोबत/लोकांसोबत जगणं, एकमेकांना समजून घेणं हे आहे. जर हे साध्य करायचं असेल तर आपणांस आपल्या क्लासरूमला समाजातील विविध प्रश्न, प्रक्रिया आणि संघर्ष यांना समजून घेण्यासाठी जोडणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आम्ही या शहरातील विविध प्रयोगशील, विचार करणारे स्त्री-पुरुष यांच्याशी जोडून घेतले. लातूर शहरातील असंख्य स्त्री-पुरुष, चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक यांच्याकडे भरपूर माहिती, नोंदी, साहित्य आणि अनुभव आहेत. त्यांचा वापर आपणास या शहरातील प्रश्न समजून घेण्यासाठी केला पाहिजे आणि अशा विविध विषयांवर काम करणाऱ्या व्यक्तींचा परिचय विद्यार्थ्यांना झाला पाहिजे, या हेतूने आम्ही सर्वप्रथम अशा वैचारिक संघटना, विविध चळवळीतील, समाजोपयोगी काम करणाऱ्या स्त्री-पुरुषांची यादीच तयार केली. त्यामध्ये त्यांचे अभ्यासाचे आणि अनुभवाचे जे क्षेत्र होते, त्यानुसार त्यांच्याशी चर्चा सुरू केली. त्यामधूनच विषयही आकाराला आले. उदा. सुभाष भिंगे यांनी आपल्या लेखातून लातूर शहराचा मागील ४० वर्षांचा राजकीय, सामाजिक चळवळीचा पट उलगडून दाखवला, तसेच अशोक नारनवरेसरांनी लातूर शहरातील दलित चळवळ आणि तिचा इतिहास समोर आणला.
असे अनेक लेख तयार झाले. लातूर शहराला समजून घेण्यासाठी प्रत्यक्ष परिघावरील स्त्री-पुरुषांशी जोडून घेत होतोच, परंतु परिघावरील समाजासाठी लढणाऱ्या संघटना, चळवळी आणि संस्था यांनी विविध विषयांवर तयार केलेली भितीपत्रके, छोटी हातातील पत्रके, मागण्या-निवेदने, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या कार्यक्रम पत्रिका यांचेही एकत्रीकरण केले. ज्यामधून शहर आणि त्यातील प्रश्न समजून घेण्यास मदत झाली.
या शहरातील अनेक वर्षांपासून राहणारे नागरिक, अधिकारी, प्राध्यापक यांचाही अभ्यास व ज्ञानाचा उपयोग करून या शहरात परिघावरील लोकांचा व विषमतांचा, येथील सामाजिक, सांस्कृतिक, बौद्धिक इतिहास रेखाटला, तर नक्कीच विद्यार्थ्यांनाही त्याचा उपयोग होईल. त्यामुळे विद्यार्थी-नागरिक-शिक्षक असा आम्ही धागा जोडत या शहरातील निवडक जागरूक, अभ्यासू नागरिक, शिक्षक यांनाही या अभ्यासाच्या प्रकल्पात जोडून घेतले. त्याआधारे लातूर शहराचा अपरिचित, सामाजिक, सांस्कृतिक इतिहास या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच परिघावरील प्रश्नांचा वेध घेत शहराच्या जडण-घडणीतील सामान्य कामगारांचा सहभाग उघड करत त्यांचे प्रश्न, शहराच्या विकासातील त्यांचे योगदान अधोरेखित केले आहे.
आपल्यासाठी शहर म्हणजे काय असते? सामान्यांच्या किंवा परिघावरील स्त्री-पुरुषांच्या दृष्टीकोनातूनही शहर जेव्हा आपण बघतो, तेव्हा शहराचा विकास आणि प्रगती याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. सार्वजनिक व्यवस्थेवरील वाढता भार, नियोजनाचं राजकारण, यामुळे शहर आणि त्याचा विकास एका विशिष्ट पद्धतीनेच होत जातो. शिक्षक, विद्यार्थी व संशोधक, नागरिक यांचा एकत्रित लेखनप्रपंच लातूर शहरासाठी नवीन आहे.
आपल्या अवतीभोवतीच्या प्रश्नांची उकल होण्यासाठी, विकासातील विरोधाभास टिपणाऱ्या नोंदी यात दिसतील. समाजशास्त्रज्ञ सतीश देशपांडे असे मांडतात, ‘आधुनिक समाजात विद्यापीठाची आवश्यकता यासाठी असते की, आपल्या सर्वांसाठी केवळ वैयक्तिक नव्हे तर एका वैश्विक दृष्टीची (World view) आवश्यकता असते. ती वैश्विक दृष्टी म्हणजे एक अशी व्यापक दृष्टी, जी व्यक्तीला अशा प्रकारे सक्षम बनवते की, व्यक्ती आपले वैयक्तिक अनुभव, स्वतःच्या अवस्था आणि विविध परिस्थिती, आपल्या आसपास घडणाऱ्या व्यापक सामाजिक मुद्द्यांशी जोडून पाहू शकेल.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
‘सुप्रसिद्ध अमेरिकन समाजशास्त्रज्ञ सी. राईट मिल्स म्हणतात की, समाजशास्त्राचे ऐतिहासिक महत्त्व हेच आहे की, ते आपल्या वैयक्तिक समस्यांकडे व्यापक सामाजिक मुद्द्यांशी जोडून पाहू शकेल. त्यामुळे विद्यापीठांचे महत्त्वाचे काम हे आहे की, ते आपणास अशा वैश्विक दृष्टीपर्यंत पोहोचवेल. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की, आपणास एक तयार वैश्विक दृष्टीकोन देणे हे विद्यापीठाचे काम नसून विद्यापीठाने प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विवेक निर्माण करावा, जो अनेक वैश्विक दृष्टींना पारखू शकेल, आकलन करू शकेल. याच विवेकाने आपण आपल्या पसंतीची वैश्विक दृष्टी स्वीकारण्यायोग्य होऊ आणि आपल्या निर्णयाला तार्किक व विचारांचा आधार देऊ शकू.’ (देशपाडे, २०१६)
याच भूमिकेतून आम्ही स्थानिक प्रश्न व्यापक दृष्टीकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच दिलीप चव्हाण (चव्हाण, २०१५) यांनी म्हटल्याप्रमाण प्रतिप्रभुत्वाचे अवकाश उभं करण्याचं काम शाळा बदलण्याची कास न सोडता, त्या बाहेरही नेणे आवश्यक आहे. त्यालाच अनुसरून क्लास रूम विस्तारणे हा प्रतिप्रभुत्वाचा अवकाश उभं करण्याचा एक छोटा प्रयत्न वाटतो. पारंपरिक शिकवण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचे आवाज पुढेच आले नसते.
त्याचप्रमाणे शहरातील विविध विषयांवरील मांडणी जी शहरातील विविध व्यक्तींना बोलतं-लिहितं करते, तो सामाजिक इतिहास आणि आवाज पुढे आणावे लागले. अन्यथा हे आवाज पुढे आले नसते. म्हणून या अर्थाने या प्रकल्पास ‘लातूर : परिघावरील आवाज’ असे म्हटले आहे. असा दस्तऐवज की, जो आजच्या काळात परिघावरील प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी, संघर्षासाठी हरतऱ्हेच्या हस्तक्षेपासाठी गरजेचा आहे.
‘लातूर : परिघातील आवाज’ - संपादक प्रा. अनिल जायभाये
हरिती पब्लिकेशन्स, पुणे
पाने - ४५२
मूल्य - ४५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment