सतत काम करत राहिल्यामुळे मला कधीच निवृत्तीचे वेध लागले नाहीत… त्यामुळे ‘सेकंड इनिंग्ज’ सुरू झाल्याचंही कधी जाणवलं नाही..
ग्रंथनामा - झलक
मृदुला प्रभुराम जोशी
  • ‘अभिजन प्रियजन - २’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Sat , 24 September 2022
  • ग्रंथनामा झलक अभिजन प्रियजन - २ Abhijan Priyajan-2 मृदुला जोशी Mrudula Joshi

ज्येष्ठ ग्रंथसंपादक मृदुला प्रभुराम जोशी यांचा ‘अभिजन प्रियजन - २’ हा नवा लेखसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्यांनी पॉप्युलर प्रकाशन या संस्थेत अनेक वर्षं मराठी पुस्तकांच्या संपादनाचं काम केलं. तसंच फ्री-लान्स पद्धतीनंही बरीच कामं केली. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ लेखकांशी परिचय झाला, जवळून संबंध आला, सहवास मिळाला. अशा काही ‘अभिजन’ व्यक्तींवरील लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. त्याचबरोबर काही वैयक्तिक अनुभवपर लेखही यात आहेत. या पुस्तकातील हा एक लेख...

.................................................................................................................................................................

‘सेकंड इनिंग्ज’ म्हणजे दुसरी खेळी. क्रिकेटसारख्या खेळात सेकंड इनिंग्जना खूप महत्त्व असतं. पहिल्या इनिंग्जमध्ये झालेल्या चुका सुधारण्याच्या दृष्टीने पावलं टाकता येतात, शांतपणे विचार करून वेगळे डावपेच रचता येतात, झालेल्या त्रुटींची भरपाई करता येते, खेळ सुधारता येतो आणि मग यशाची शिखरं सर करता येतात. एका दृष्टीने ही खेळाडूंना मिळालेली ‘सुधारण्याची संधी’ असते. तिचा फायदा घेणं हे आपल्याच हातात असतं.

आयुष्याच्या खेळीत आपल्याला ‘सेकंड इनिंग्ज’मध्ये असं करता येतं का? कुणी म्हणेल, ‘हो’. आपल्यापैकी काही थोडेच असे भाग्यवान असतात की, त्यांना त्यांच्या पूर्वायुष्यात केलेल्या चुका सुधारण्याची ‘सेकंड इनिंग्ज’मध्ये म्हणजे उत्तरायुष्यात संधी मिळते आणि नंतर यशाचा आनंद चाखण्याचीही संधी मिळते. मात्र त्यासाठी पूर्वअट असते, ती आपल्या पूर्वायुष्याचं सिंहावलोकन करून वेळेवर योग्य ते निर्णय घेण्याची आणि काही एका निश्चयाने ते अंमलात आणण्याची. ते जर आपण नीट करू शकलो, तर आयुष्याची ही दुसरी खेळी खूप सुखावह होऊ शकते, आनंददायक होऊ शकते.

आपल्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या आयुष्यात खूप वेगवेगळी वाटा-वळणं येतात, सत्त्वपरीक्षेचे प्रसंग येतात, आव्हानं-प्रतिआव्हानं येतात. निरनिराळ्या व्यक्तींबरोबर ओळखी होतात, तशाच काळाच्या ओघात अनेकांच्या ओळखी पुसूनही जातात. जोडलेली नाती घट्ट होतात, तशीच क्वचित तुटूनही जातात. अनेकांचे अनेक प्रकारचे संस्कार आपल्या मनावर होतात, त्यांतले काही चिरंतन टिकतात, तर काही नष्ट होतात. आयुष्याच्या या प्रवासाचा सजगपणे वेध घेता आला, तरच उत्तरायुष्यातला प्रवास सुखकर होऊ शकतो.

माझ्या आतापर्यंतच्या ७४ वर्षांच्या आयुष्याकडे मी पाहिलं तर काय दिसतं? मला जन्मामुळे मिळालेल्या दैवदत्त गुणांचा मी योग्य उपयोग केला का? त्यामुळे मी यशस्वी झाले का? माझ्या यशाला कुणाकुणाचा हातभार लागला आहे? त्यासाठी मी कुणाकुणाची ऋणी आहे?

माझा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात, अत्यंत उच्चशिक्षित आई-वडिलांच्या पोटी झाला. माझे वडील एक अतिशय बुद्धिमान, नावाजलेले सिव्हिल इंजिनियर होते आणि माझी आई एक सर्वगुणसंपन्न विदुषी होती. वडील आधी जीआयपी रेल्वेच्या सेवेत होते आणि नंतर निवृत्त होईपर्यंत मुंबई इलाख्याच्या पीडब्ल्यूडी (सिंचन आणि ऊर्जा विभाग) खात्यात उच्च पदांवर काम करत होते. रेल्वेत असताना त्यांच्या रतलाम, जबलपूर, भुसावळ अशा ठिकाणी बदल्या व्हायच्या, तर नंतर सरकारी खात्यांतून गुजरात ते कर्नाटकापर्यंत कुठेही बदल्या व्हायच्या. त्यामुळे सतत विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर. ते जिथे जातील तिथे आम्ही. जिथे जाऊ तिथली भाषा-म्हणजे गुजराती, कानडी, कोंकणी-शिकणं आलंच. प्रत्येक ठिकाणची भाषा वेगळी, शाळा वेगळी, अभ्यासक्रम वेगळा. असं करत करत माझ्या नववीपर्यंत नऊ शाळा बदलल्या. एकीकडे या बदलांचा ताण पडत असला तरी त्यांचा फायदा असा झाला की, अख्खा महाराष्ट्र उभा-आडवा पाहता आला, असंख्य माणसं भेटली, त्यांच्याकडून अनंत गोष्टी शिकता आल्या.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

थोडक्यात, ‘व्यक्तिमत्त्व विकास’ म्हणजे काय ते अजिबात माहीत नसताना आपोआप व्यक्तिमत्त्व विकास घडला. महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणच्या बोलीभाषा ऐकायला मिळाल्या. निरनिराळ्या लोककलांचा परिचय झाला, तिथली गाणी, नृत्यं शिकता आली, चित्रकला बोटांत खेळवता आली, स्पर्धांमध्ये भाग घेता आला आणि उच्च यश मिळवायचं तर खडतर तपश्चर्या करावी लागते, याचीही जाणीव झाली. सुदैवाने मला अनेक कलांचा वारसा माझ्या पूर्वजांकडूनच मिळालेला असल्यामुळे त्याला बुद्धिमत्तेची आणि परिश्रमांची जोड देऊन अभ्यास करून मी माझं व्यक्तिमत्त्व समृद्ध करू शकले.

आमच्या घरात शिक्षणाला पराकोटीचं महत्त्व होतं. ‘हाती घेऊ ते उत्तम(च) करू’ हा मंत्र होता. त्यामुळे औपचारिक शिक्षणातल्या पायऱ्या मी भराभर चढत गेले. शाळा-कॉलेजांत मला उत्तमोत्तम शिक्षकांचं मार्गदर्शन लाभलं, तसंच घरी आईचं. माझी आई ही संस्कृतची ‘यमुनाबाई दळवी स्कॉलर’ होती आणि संस्कृत विषय घेऊन ती बी.ए. आणि एम.ए. परीक्षांत मुंबई विद्यापीठात सर्वप्रथम आलेली होती. त्यामुळे घरात संस्कृत आणि मराठीचं अधिराज्य होतं, तितकंच इंग्रजीलाही महत्त्व होतं. या सगळ्याचा आपसूक परिणाम होत गेला आणि मी मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयातून संस्कृत आणि मराठी हे विषय घेऊन बी.ए. आणि एम.ए. झाले. या गोष्टीचा माझ्या पुढील आयुष्यावर किती परिणाम होणार होता, ते तेव्हा काही लक्षात आलं नव्हतं… पण त्या संस्कृत आणि मराठीनंच माझं आयुष्य घडवलं आणि इथपर्यंत आणून सोडलं.

सर्वसाधारणपणे पदवी परीक्षा पार केली की, कुठल्या तरी सरकारी ऑफिसात किंवा बँकेत अर्ज करायचे, मुलाखती आणि परीक्षा द्यायच्या आणि नोकरी मिळाली की, धन्य व्हायचं आणि तिथेच चिकटायचं, हा त्या काळातल्या मध्यमवर्गीय मुलामुलींचा प्रघात होता. शाळेत शिक्षक होणं किंवा दुसऱ्या वर्गात पदव्युत्तर पदवी असली, तर कॉलेजमध्ये लेक्चरर होणं हाही सर्वमान्य मार्ग होता. १९६०-७०च्या दशकात सगळीकडे हेच चित्र पाहायला मिळायचं.

अशा परिस्थितीत अपघाताने का होईना, मी एक वेगळाच मार्ग चोखाळला. पॉप्युलर प्रकाशनाचे संचालक श्री. रामदास भटकळ यांच्या आग्रहामुळे मी ‘प्रकाशकीय संपादक’ (पब्लिशर्स एडिटर) या तोपर्यंत मला ऐकूनही माहीत नसलेल्या एका आगळ्याच व्यवसायात शिरले आणि तिथेच स्थिरावले. काम करता करता शिकत गेले, अनेक थोरामोठ्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि स्वत:ची बुद्धी आणि अंगची चिकाटी पणाला लावून त्या कामात पारंगत झाले. हे लिहायला सोपं वाटतं, पण प्रत्यक्षात त्यासाठी अनेक वर्षं जावी लागली. संपादक म्हणून काय काम करते, हे जाणून घेतल्यास कदाचित मी असं का म्हणते ते लक्षात येईल.

आपण जेव्हा एखादं पुस्तक हातात धरतो, तेव्हा त्याचं जे रूप आपल्या डोळ्यांमध्ये ठसतं ते कसं असतं? अनेक छापील पानांचा एकत्र बांधलेला एक संच, त्याला आकर्षक करण्यासाठी चितारलेलं एक मुखपृष्ठ आणि मागील बाजूला मलपृष्ठ असं ते दिसतं. मधल्या पानांमध्ये असलेला मजकूर म्हणजे कधी कादंबरी, कधी कथासंग्रह, कधी कवितासंग्रह, तर कधी पाठ्यपुस्तकांचे अभ्यासाचे विषय, कधी विज्ञान तर कधी कला, असा निरनिराळा असू शकतो. आपण आपल्या आवडीनिवडीप्रमाणे किंवा गरजेप्रमाणे पुस्तकाची निवड करतो आणि ते वाचायला सुरुवात करतो, पण त्या एका पुस्तकामागे किती प्रक्रिया दडलेल्या आहेत, किती जणांचे परिश्रम उभे आहेत, याची आपल्याला यत्किंचित जाणीव नसते, कल्पना नसते.

कुठल्याही एका पुस्तकाची निर्मिती वेगवेगळ्या टप्प्यांतून होत असते. लेखक आपलं हस्तलिखित तयार झालं की, ते प्रकाशकाकडे सोपवतात आणि मग पुढचे सगळे सोपस्कार प्रकाशक आणि त्यांचे संपादक पार पाडतात. लेखकाच्या हस्तलिखिताचं प्राथमिक वाचन आणि चाचणी ही पहिली पायरी असते. जर ते हस्तलिखित प्रकाशनासाठी स्वीकारलं, तर मग पुढचं संस्करण चालू होतं. यामध्ये संपूर्ण हस्तलिखिताचं शुद्धलेखन तपासणं, पुस्तक किती पानांचं होईल, याचा अंदाज घेऊन पुस्तकाची मांडणी किंवा रचना करणं, मुद्रकाकडे पाठवण्यासाठी अंतिम मुद्रणप्रत तयार करणं, चित्रकाराला सूचना देऊन मुखपृष्ठ तयार करून घेणं, पुस्तकात चित्रं, तक्ते, छायाचित्रांचा योग्य ठिकाणी समावेश करणं, अशा अनेक बाबींकडे काटेकोर लक्ष द्यावं लागतं. पुस्तक छपाईसाठी मुद्रकाकडे दिलं की, त्याची मुद्रितं (प्रुफ) तपासावी लागतात. कागद कुठला घ्यावा, किंमत किती ठरवावी, जाहिरात कशी करावी, इत्यादी आनुषंगिक गोष्टींबाबतचे निर्णयही घ्यावे लागतात.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

याच दरम्यान लेखकाशीही उत्तम संपर्क ठेवावा लागतो आणि त्याचे आणि प्रकाशकाचे संबंध सांभाळावे लागतात. प्रकाशनाचे सभारंभ आयोजित करावे लागतात. थोडक्यात, पुस्तकाच्या हस्तलिखितापासून ते पुस्तक विक्रीसाठी तयार होण्यापर्यंतच्या सर्व टप्प्यांची जबाबदारी संपादकाला घ्यावी लागते. यासाठी संपादकाकडे अनेक प्रकारची कौशल्य असणं आवश्यक असतं. अशी कौशल्य शिकवणाऱ्या शाळा कुठेही नाहीत. त्यामुळे काम करता करता शिकणं हाच एकमेव मार्ग उपलब्ध असतो. मीदेखील अशीच तयार झाले.

अनेक व्यक्तिगत अडचणींमुळे आणि कारणांमुळे मी पॉप्युलर प्रकाशनात दीर्घ काळ नोकरी करू शकले नाही. परंतु गेली ४५ (किंवा त्याहून जास्त) वर्षं मी पॉप्युलर प्रकाशनाशी आणि एकूणच प्रकाशनव्यवसायाशी संपादक या नात्याने संबंधित आहे. या व्यवसायाचा माझ्या दृष्टीने मोठा फायदा म्हणजे मी कधीच निवृत्त झाले नाही. नोकरीच नसल्यामुळे मला सेवानिवृत्तीचे लाभ मिळणं शक्यच नव्हतं. पण माझं काम मात्र सतत चालू राहिलं. ते आजही चालू आहे आणि प्रकृतीने साथ दिल्यास यापुढेही चालू राहील.

माझ्या दृष्टीने या कामाचा सर्वांत मोठा लाभ जो मला झाला, तो म्हणजे मी अनेक थोर लेखकांच्या, विद्वानांच्या आणि दिग्गजांच्या सहवासात आले. फार मोठी माणसं मी जवळून पाहिली. त्यांच्याबरोबर काम करण्याचा भरपूर आनंद लुटला. त्यांतले अनेक जण माझे गुरू झाले. अनेक जण ज्येष्ठ स्नेही झाले आणि हळूहळू त्यांच्यामुळे माझ्या ज्ञानाची क्षितिजं विस्तारत गेली.

प्रामुख्याने मी जरी मराठी पुस्तकांची संपादक म्हणून काम केलं, तरी मी संस्कृत भाषेचीही विद्यार्थिनी असल्यामुळे काही संस्कृत-मराठी-इंग्लिश पुस्तकांचं काम करता करता मी एक विशिष्ट शास्त्र शिकून घेतलं. संस्कृतचं देवनागरी लिपीतून रोमन लिपीत यथातथ्य लिप्यंतर करण्याचं हे शास्त्र विशिष्ट खुणांवर आधारित असतं (Diacritical Marks). हे शास्त्र मी डॉ. ग. त्र्यं. देशपांडे, डॉ. शं. गो. तुळपुळे, डॉ. वा. म. कुलकर्णी अशा प्रकांडपंडितांकडून शिकले आणि अभ्यास करून हळूहळू त्या शास्त्रात पारंगत झाले. त्याचा फायदा असा झाला की, मुंबईच्या एशियाटिक सोसायटीचं जे विद्वन्मान्य वार्षिक (जर्नल) निघतं, त्याच्या संपादकांना मुद्रणप्रत तयार करण्याची तसंच मुद्रितशोधनासाठी साहाय्य करण्याची संधी मला मिळाली आणि मी ती १५ वर्षं इमानेइतबारे पार पाडली.

कित्येक वर्षं मी मुक्तसेवा (फ्री लान्स) पद्धतीने हे संपादनाचं करत आले आहे. पॉप्युलर प्रकाशनात मी नोकरी करत नसले तरी ‘रियासत’सारख्या त्यांच्या भव्य प्रकल्पांत साहाय्यक म्हणून सामील झाले आहे. एशियाटिक सोसायटीसाठी केलेल्या कामामुळे माझा अनेक जगन्मान्य विद्वानांशी संबंध आला. त्यामुळे मी निरनिराळ्या क्षेत्रांतल्या जागतिक पातळीवरील विद्वानांच्या इंग्रजी, संस्कृत ग्रंथांसाठीही काम करू लागले. यातून मला लक्षणीय आर्थिक लाभ जरी झाला नाही, तरी अशा विद्वानांबरोबर काम करण्याचा आनंद भरपूर मिळाला आणि तोच मला अधिक मोलाचा वाटतो.

सुमारे ५० वर्षं सतत हे काम करत राहिल्यामुळे मला कधीच निवृत्तीचे वेध लागले नाहीत आणि त्याचमुळे मला ‘सेकंड इनिंग्ज’ सुरू झाल्याचंही कधी जाणवलं नाही.

माझ्या कामाचा एक अपरिहार्य परिणाम मला दिसतो, तो म्हणजे मी हळूहळू लेखनाकडे वळले. मी जे लेखन करते, ते केवळ स्वानंदासाठी. त्यात मी कुठल्याही आर्थिक लाभाची किंवा प्रसिद्धीची अपेक्षा ठेवत नाही.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आतापर्यंत मी निरनिराळ्या निमित्तांनी लेखन करत आले आहे. कुठला तरी एक विशिष्ट विषय निवडून, त्याचा ध्यास घेऊन, संशोधन करून लेखन करावं, असं माझ्या बाबतीत घडलं नाही. संपादकपदाच्या दीर्घ कारकिर्दीत अनेक थोर लेखक-कवींशी, विद्वानांशी अगदी जवळून संबंध आला. जवळजवळ तीन पिढ्यांतले हे लेखक होते. त्यापैकी काही जणांच्या पंचाहत्तरी किंवा सहस्रचंद्रदर्शनाच्या निमित्ताने परिचयपर लेख लिहिले. काहींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानेसद्धा लिहिले. काहींवर मृत्युलख लिहिले. कुणाला जीवनगौरव पुरस्कार किंवा ज्ञानपीठासारखे पुरस्कार मिळाले तेव्हाही लिहिले. हळूहळू मला या प्रकारच्या लेखनाची गोडी लागली.

तेवढ्यात अचानक मला पुण्याच्या राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या संचालकांकडून बोलावणं आलं. त्यांना संग्रहालयाचे संस्थापक डॉ. दिनकर गंगाधर केळकर यांचं इंग्रजीतून चरित्र लिहून हवं होतं. त्यासाठी लागतील ती सर्व संशोधनसाधनं उपलब्ध करून देणार होते आणि ते पुस्तक संग्रहालयातर्फेच प्रकाशित करणार होते. मी मोठ्या आनंदाने ही जबाबदारी अंगावर घेतली आणि प्रदीर्घ परिश्रम करून ती पुरी पाडली. २०१२मध्ये मी लिहिलेलं हे चरित्र मोठ्या दिमाखात प्रसिद्ध झालं. त्याचं नाव आहे – ‘Pursuit and Rhetoric of Dinkar Kelkar : Preserving Heritage of India’. या पुस्तकाची निर्मिती एखाद्या कॉफीटेबल बुकसारखी करण्यात आली आहे आणि त्याचं स्वागतही चांगलं झालं आहे. हे पुस्तक जेव्हा महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्या पाहण्यात आलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, मंडळातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्राचे शिल्पकार’ या मालिकेत मी केळकरांचं चरित्र मराठीतून लिहावं. मी ते मान्य केलं आणि त्यासाठी थोडं अधिक संशोधन करून, बरेच कष्ट घेऊन एक नवीन पुस्तक लिहिलं. ‘संग्रहालय-महर्षी डॉ. दिनकर गंगाधर केळकर ऊर्फ कवी अज्ञातवासी’ या नावाने हे चरित्र नुकतंच महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलं आहे.

आतापर्यंत व्यक्तिचित्रणात्मक लेखनावर आधारित, संकलित, संपादित आणि स्वतंत्र अशी माझी आठ पुस्तकं इंग्रजी आणि मराठीत प्रकाशित झाली आहेत. ती लिहिताना मी कष्टांची तमा बाळगत नाही, कारण मला हे काम करताना एक वेगळाच आनंद मिळतो. अशा चरित्रलेखनातून हळूहळू आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासाचं दस्तावेजीकरण (डॉक्युमेंटेशन) होतं, अशी माझी भावना आहे. मी माझ्या आयुष्यात ज्यांच्या संपर्कात आले, अशा अनेक व्यक्तींविषयी मी लिहून ठेवलं आहे. आणि त्यातून सामाजिक इतिहासाच्या एका कालखंडाचं दर्शन होतं, अशी माझी श्रद्धा आहे. याच प्रकारे मी नवनवीन प्रकल्प हातात घेत असते आणि सतत वाचन, चिंतन, मनन, संशोधन आणि लेखन करत असते.

माझे मार्गदर्शक श्री. रामदास भटकळ यांच्या सहयोगाने मी एका वेगळ्याच ग्रंथाच्या निर्मितीला आणि लेखनाला हातभार लावलेला आहे. हे आहे ‘पॉप्युलर रीतिपुस्तक’ म्हणजे प्रकाशनक्षेत्रासाठी आधारभूत ठरावं असं ‘स्टाइलबुक’ किंवा ‘मॅन्युअल ऑफ स्टाइल’. मराठी प्रकाशनविश्वातल्या लेखक, संपादक, मुद्रक, मुद्रितशोधक आणि प्रकाशक या सर्व घटकांना उपयुक्त ठरेल आणि मार्गदर्शक होईल, यासाठी हे रीतिपुस्तक लिहिण्यात आलं आहे. मराठी प्रकाशनविश्वात अशा प्रकारचं पुस्तक या आधी कधीच प्रसिद्ध झालेलं नव्हतं. त्यामुळे या पुस्तकाचं ‘प्रकाशनविश्वातील मैलाचा दगड’ असं स्वागत आणि कौतुक झालं. रामदास भटकळ आणि मी यांनी आपला दीर्घ काळचा अनुभव ध्यानात घेऊन या पुस्तकाची रचना केलेली आहे. या ग्रंथाला महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि महाराष्ट्र राज्य वाङमय पुरस्कार असे प्रतिष्ठेच पुरस्कारही मिळालेले आहेत. आम्ही दोघे हे पुस्तक सुमारे ३० वर्षं लिहीत होतो आणि त्यात जुन्या जमान्यातल्या लेटरप्रेसपासून नवीन तंत्रज्ञानातल्या संगणकयुगापर्यंतची सर्व माहिती देण्यात आली आहे. हे एक प्रकारचं कोशकार्य आहे आणि त्यासाठी जी प्रचंड मेहनत करावी लागते, ती आम्ही केली आहे. अशा तऱ्हेचं काम वर्षानुवर्षं चालतं आणि त्यात मेंदूला चालना तर मिळतेच, पण बौद्धिक आणि शारीरिक श्रमही अफाट करावे लागतात. तसं काम सतत करत राहिल्यामुळे मला आतापर्यंत निवृत्तीची किंवा ‘सेकंड इनिंग्ज’ची जाणीवच झालेली नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझ्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार आले. मला निस्तेज करणारे आणि पायांतलं बळ खचवून टाकणारे प्रसंग आले. १९९२ साली माझ्या पतींचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं अकस्मात आणि अकाली निधन झालं. तीन वर्षांपूर्वी मला कर्करोगाचा तडाखा बसला आणि नंतर शल्यक्रिया, किमोथेरपी अशा दीर्घकालीन उपचारांचा आसरा घ्यावा लागला. ही माझी सत्त्वपरीक्षाच होती, पण पतिनिधनानंतर काय किंवा दुर्धर आजारातून पार होताना काय, मला माझ्या जिद्दी, चिवट आणि सकारात्मक प्रवृत्तींनी एक मोठं आंतरिक बळ मिळवून दिलं. इतकं की, आजारातून उठल्यावर मी आठ महिन्यांत एक नवीन पुस्तक लिहून पूर्ण केलं आणि ते प्रकाशित होतंय न होतंय, तोच दुसरं लिहायला घेतलं. हीच माझी इच्छाशक्ती मला अवघड प्रसंगांतूनही तारून नेते, असं माझ्या लक्षात आलं आहे आणि म्हणूनच मी निवृत्त होण्याचा विचारही करू शकत नाही.

जसा दारुण परिस्थितीचा सामना करता आला, तसा अनेक वेळा आनंदित होण्याचाही प्रसंग आला. आतापर्यंत मी केलेल्या लक्षणीय कार्याबद्दल मला अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळालेले आहेत. दिल्लीच्या ‘फेडरेशन ऑफ इंडियन पब्लिशर्स’ने मला २००० साली ‘डिस्टिग्विश्ड एडिटर अॅवॉर्ड’ देऊन सन्मानित केलं. मुंबईच्या ‘आयडियल बुक डेपो’तर्फे मला ‘संत नामदेव पुरस्कार’ देण्यात आला. परंतु या सर्वांहून अगदी आगळा असा सन्मान मला मिळाला तो मंगेशकर कुटंबीयांकडून. गानसम्राज्ञी लतादीदींनी गायलेल्या ‘सुमिरन’ या सीडीमध्ये २३ संस्कृत प्रार्थनेचे श्लोक आहेत. त्यांचं संस्कृतातून इंग्रजीत भाषांतर कराल का, असं हृदयनाथ मंगेशकरांनी मला विचारलं आणि मी ते त्यांना हवं होतं तसं करून दिल्यामुळे लतादीदींनी मला आशीर्वाद दिले. साक्षात गानसरस्वतीचा असा आशीर्वाद मिळाल्यामुळेच माझ्या हातून सरस्वतीची सेवा घडते आहे, असं मला वाटतं आणि त्यामुळेच माझी ‘सेकंड इनिंग्ज’सुद्धा आनंदाने चालू राहील असा मला विश्वास वाटतो.

‘अभिजन प्रियजन -२’ - मृदुला प्रभुराम जोशी

प्रकाशक - मृदुला प्रभुराम जोशी

पाने - १६६

मूल्य - खाजगी वितरणासाठी

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......