‘निसर्गशाळा’ हा इयत्ता पाचवी ते सातवी (१०, ११ व १२ वर्षांच्या मुलांसाठी)पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपल्या आजूबाजूच्या पर्यावरणाची ओळख करून देणारा तीन पुस्तकांचा संच आहे. ऑयकॉस फॉर इकॉलॉजिकल सव्हिर्सेस व ग्राममंगल या संस्थांच्या पुढाकारातून तयार झालेला हा पुस्तक संच नुकताच डायमंड पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झाला आहे. या पुस्तकांचीमागची भूमिका, उद्दिष्टं आणि ही पुस्तकं कशी वापरायची, यांबाबत लेखकद्वयांनी मांडलेली ही भूमिका...
.................................................................................................................................................................
गेली काही वर्षे पर्यावरणविषयक काम करत असताना मुलांबरोबर पर्यावरणविषयक कार्यशाळा, शिबिर घेण्याची संधी मिळाली. बरोबरीने ‘ग्राममंगल’ संचालित एका शाळेकरता इयत्ता पाचवी ते नववीकरता पर्यावरण व परिसराला धरून एक अभ्यासक्रम बनवण्याची संधी मिळाली. वाई, गोवा, रणथंबोर इत्यादी ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर काम करण्याचा अनुभव मिळाला. ग्रामीण, निम-शहरी किंवा आदिवासी अशा विविध मुलांबरोबर काम करताना वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हे सगळं करत असताना, थोडा का होईना, अनुभव गाठीशी बांधला गेला. त्यातून एक लक्षात आलं की, पर्यावरणशिक्षण, परिसरशिक्षण हे निश्चित ‘आनंददायी’ आहे. हे वर्गाच्या बाहेर पडून म्हणजेच नेहमीच्या चाकोरीच्या बाहेर पडून घेण्याचं शिक्षण असल्याने, अर्थातच् यात वेगळी मजा आहे.
मजेबरोबरच यात एक समाधान आहे. साक्षात्कार आहे. अनुभूती आहे. अनुभूती कसली तर आपलाच परिसर जाणून घेण्याची. त्याबद्दल, स्वत:बद्दल, स्वत:च्या कृतीबद्दल जागरूक बनण्याची. एकूणातच शिक्षणाने एवढं साधलं तरी पुरेसं आहे असं वाटतं. गांधीजी म्हणायचे की, मी मुलांना शिकवत नाही, तर त्यांची विवेकबुद्धी जागृत करण्याचा प्रयत्न करतो. त्यावर आधारित काय शिकायचं, हे त्यांचं ते ठरवतील. हीच गोष्ट पर्यावरणशिक्षणाच्या बाबतीत सहजतेने साधता येते, असं जाणवलं. या पद्धतीच्या शिक्षणाने गावातच उदरनिर्वाहाची साधनं शोधावी, याकरता मुलांच्या मनात बीज पेरलं जाऊ शकेल.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
अर्थात् पर्यावरण शिक्षण कसं हे इथं फार महत्त्वाचं आहे. शिक्षकाने वर्गात ‘शिकवून’ मुलांपर्यंत पोहोचवणं इथं अपेक्षित नाही, तर विद्यार्थ्यांनी ते स्वत:हून शिकणं अपेक्षित आहे. अनुभवाधारित व रचनावादी शिक्षणपद्धतीतून हे सहज शक्य होतं. ग्राममंगलने रचनावादी उपक्रम कसे असावेत, याबाबत केलेल्या मार्गदर्शनानुसार, विद्यार्थी हा ज्ञाननिर्मिती करतच असतो. शिक्षकाने केवळ या प्रक्रियेत मदत करावी. परिसरातील घटकांनाच शैक्षणिक रूप देऊन त्यातून अनुभव देण्याची घेण्याची सोय केली, तर सहज शिक्षण होतं.
शिक्षकाने प्रत्यक्ष शिकवायचं नसलं तरी मुलांना हा अनुभव घेण्यासाठी उद्युक्त करणं, त्यांच्यातल्या स्वयंप्रेरणेला पुष्टी देणं, ही अत्यंत महत्त्वाची जबाबदारी शिक्षकावर असते. या शिक्षणपद्धतीत शिक्षक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणूनच शिक्षकांकरता पुस्तकं लिहिण्याचा विचार पुढे आला. उपक्रम मुलांकरता व ते आयोजित करण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन, असं या पुस्तकांचं स्वरूप ठेवावं असं ठरलं.
आधीच्या अनुभवावरून हा विषय समजून घेण्यासाठी मुलांचं १० ते १२ हे वय योग्य वाटलं. त्यामुळे साधारण पाचवी ते सातवी, अशा तीन इयत्तांकरता उपक्रम-पुस्तकं तयार करण्याचं ठरवलं.
पुस्तकं वापरावी कशी, शिक्षकाने काय व कशी पूर्वतयारी करावी, इत्यादी गोष्टी बघूया!
पुस्तके वापरण्याकरता सूचना
या पर्यावरणविषयक उपक्रमात संपूर्ण शाळेचाच म्हणजेच इतर शिक्षकांचा, मुख्याध्यापकांचा, कर्मचाऱ्यांचा, शक्य असल्यास स्वयंसेवक म्हणून पालकांचा, असा सर्वांचाच सहभाग गरजेचा व महत्त्वाचा आहे. वर्गाबाहेर घेण्याच्या उपक्रमांसाठी एकापेक्षा अधिक शिक्षक असणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्व उपक्रमांची आखणी, नियोजन सगळ्यांनी एकत्र करावे असा आग्रह आहे. उपक्रमांचे वेळापत्रक सर्वांना माहीत असणे आवश्यक आहे.
ही पुस्तके शिक्षकांकरता लिहिलेली आहेत. त्यामुळे यात शिक्षकांना समजेल अशी भाषा वापरण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांकरता हे उपक्रम घेताना त्यांना समजेल अशा भाषेत उपक्रम घेणे अपेक्षित आहे. प्रत्येक उपक्रमात याकरता काही सूचक प्रश्न, उदाहरणे दिली आहेत. याचा वापर करून स्वअनभूतीच्या आधारावर मुलांपर्यंत पोहचणे अपेक्षित आहे. शिक्षकांसाठीची माहिती, सूचना जशीच्या तशी वर्गात वाचून दाखवणे अपेक्षित नाही.
शिक्षकाने प्रत्येक उपक्रम, विशेषत: जो वर्गाबाहेर जाऊन घ्यावयाचा आहे, तो स्वतः अनुभवलेला असावा. याकरता शिक्षकाने जास्तीत जास्त वेळ उपक्रम कसा घ्यायचा, याचे नियोजन करण्यासाठी द्यावा. उपक्रम जरी एक किंवा दोन तासिकांचा असेल तरी नियोजनासाठी शिक्षकाने त्याच्या अनेक पटीत वेळ द्यावा. एखाद्या उपक्रमाची तयारी करायला शिक्षकाला आठवडा लागेल किंवा महिनाभर आधीपासून तयारी करावी लागेल.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
तीन पुस्तकांचा क्रम अतिशय महत्त्वाचा आहे. यातले उपक्रम एका विशिष्ट व चढत्या क्रमाने लावले आहेत. त्यामुळे ते याच क्रमाने घेतले जावेत. म्हणजेच ते पाचवीपासून घेण्यासच सुरुवात करावी. सहावी किंवा सातवी करता एकदम सुरू करायचे असल्यास पहिल्या भागातील उपक्रम आधी घेऊन मग दुसऱ्या व तिसऱ्या भागाकडे जावे.
उपक्रमांचा ऋतूंनुसार असलेला क्रम लक्षात घेणे गरजेचे. काही उपक्रम एका विशिष्ट ऋतूत घेणे आवश्यक आहे. उपक्रमांचा क्रम कोणत्याही कारणाने चुकवून चालणार नाही. अन्यथा, मुलांना तो विशिष्ट ऋतू अनुभवण्याची संधी थेट पुढच्या वर्षी मिळू शकेल. शिवाय असे झाल्यास शिक्षकाला या सगळ्याचा तपशील ठेवणेही अवघड होईल. काही उपक्रम एकापेक्षा जास्त ऋतूत, महिन्यात पुन:पुन्हा घ्यायचे आहेत. यामुळे मुलांची निरीक्षणक्षमता वाढण्यास मदत होणार आहे, तसेच त्यांना स्वयंअध्ययनाला व स्वयं-अध्ययनाला व स्वयं-संशोधनाला चालना मिळणार आहे, हे शिक्षकाने जरूर लक्षात घ्यावे. म्हणून शिक्षकाने ‘नियमितपणे नोंदी व निरीक्षणे’ करण्याचे उपक्रम मुलांकडून जाणीवपूर्वक वर्षभर करून घेणे अपेक्षित आहे.
ही पुस्तके महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या शाळांकरता अथवा ग्रामीण भागातल्या शाळाकरता बनवली आहेत. त्यामुळे ही पुस्तके बनवताना, त्यातले उपक्रम आखताना महाराष्ट्रातील सर्व जैवभौगोलिक प्रदेशाचा विचार केला आहे. उदाहरणार्थ – समुद्र, कोकण, सह्याद्रीसारखे डोंगराळ प्रदेश तर शुष्क काटेरी वनांचे निम्न वाळवंटी प्रदेश, त्यामुळे सगळेच उपक्रम प्रत्येक ठिकाणी घेणे शक्य नाही. ज्या प्रत्यक्ष उपक्रमांची प्रत्यक्ष अनुभूती शक्य नाही अथवा ती देणे खूप अवघड आहे, असे उपक्रम गाळून शिक्षकाने पुढील उपक्रम घ्यावा.
उपक्रम सुरू करण्यापूर्वी सर्व मुलांनी स्थिर भावनिक पातळीवर असणे महत्त्वाचे आहे. उपक्रम थेट घाईने सुरू करून त्याचा उद्देश सुरुवातीलाच मुलांना सांगणे, सर्वच उपक्रमांकरता योग्य ठरणार नाही. शिक्षकाने सुरुवातीला उपक्रमाच्या विषयाकडे मुलांना आकृष्ट करण्याकरता त्याविषयीच्या अवांतर गप्पा माराव्या. विषयात मुलांची गुंतवणूक झाली की, प्रत्यक्ष कृतीप्रमाणे उपक्रम घ्यायला सुरुवात करावी.
नवीन शब्द फळ्यावर मोठ्या अक्षरात लिहावे. अशा शब्दांचे थेट अर्थ मुलांना लगेच न सांगता, विविध प्रश्नोत्तरातून या शब्दांपर्यंत मुलांना घेऊन जावे. नवीन गोष्टी शिकण्याची ही ‘प्रक्रिया’च मुलांनी शिकायला हवी. त्याचा आनंद घ्यायला हवा. ही प्रक्रिया जितकी मुलांच्या कलाने होईल, तितके शिक्षण उत्तम होईल. याउलट नवीन गोष्टी नेहमीच्या व्याख्यांद्वारे थेट मुलांना सांगितल्या, तर मुले ती लगेचच विसरण्याची शक्यता जास्त.
उपक्रमाच्या वेळी वातावरणनिर्मितीदेखील तितकीच आवश्यक. याकरता सांगितलेले साहित्य योग्य वेळी वर्गात आणून ठेवून त्याविषयी मुलांशी सविस्तर चर्चा केली पाहिजे. हे साहित्य कुठून आणले, कसे मागवले - अशा गोष्टी मुलांना जरूर सांगाव्यात.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक
‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
उपक्रमविषयक पुस्तके वर्गात आणून ठेवावी व ती मुलांनी वाचावी म्हणूनदेखील वातावरणनिर्मिती करावी. उदाहरणार्थ - त्या पुस्तकाच्या नावाविषयी चर्चा करावी, लेखकाविषयी माहिती द्यावी. यामुळे मुले पुस्तक वाचण्यास उद्युक्त होतील.
पर्यावरण शिक्षणाकरता उत्कृष्ट वातावरणनिर्मिती शाळेच्या आवारातच करता येऊ शकेल. शाळेच्या इमारतीभोवती परिसरातलेच घटक वापरून शिक्षणाची साधने तयार करता येतील. यात शाळेच्या आवाराचे विविध भाग करता येतील. उदाहरणार्थ - शेतीकरता वाफे, दाट झाडीचा भाग, तळे व त्यातल्या पाणथळ वनस्पती, औषधी वनस्पतींची बाग, फुलपाखरांची बाग, जैविक कुंपण इत्यादी. शाळेच्या आवारात गवताळ प्रदेश, पाणथळी, खडकाळ भाग, जंगलासारखा काही भाग असे विविध आसरे (Habitats) निर्माण करणे फायद्याचे ठरेल. अशा पद्धतीने विकसित केलेली शाळेची आवारे, ही गावाकरता स्वाभिमानाची बाब ठरू शकेल.
चित्रकलेच्या शिक्षकाचा सहभाग या उपक्रमांत अत्यंत महत्त्वाचा आहे. याकरता शिक्षकाने चित्रकलेच्या शिक्षकांबरोबर सविस्तर चर्चा करून या उपक्रमांची माहिती देणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीलाच ही पुस्तके चित्रकलेच्या शिक्षकाला वाचायला देऊन वेगवेगळ्या उपक्रमाकरता लागणारी चित्रे काढायला पुरेसा वेळ द्यावा. जी चित्रे थेट फळ्यावर काढायची आहेत, ती कधी, कुठल्या तारखेला असे तपशीलदेखील ठरवून द्यावे. यामुळे चित्रकलेच्या शिक्षकाला ते चित्र काढण्याची तयारी वा नियोजन करण्यास उसंत मिळेल.
पालकांशी चर्चादेखील आवश्यक. या उपक्रमातल्या काही गोष्टी मुलांना, पालकांच्या मदतीने करायच्या आहेत. ही पुस्तके वापरून शाळेत पर्यावरणविषयक कार्यक्रम सुरू करायच्या आधी पालकांची सभा घेऊन त्यांना याविषयी पूर्वकल्पना द्यावी. याच पुस्तकात दिलेले पालकांसाठीचे पत्र या सभेत शिक्षकाने वाचून दाखवावे. हा कार्यक्रम मुलांकरता कसा गरजेचा आहे, याचे महत्त्व अधोरेखित करावे व मुले मदत मागतील तेव्हा त्यांना जरूर मदत करा, अशी पालकांना विनंती करावी. या सभेनंतरही वर्षातून अधूनमधून पालकांशी याविषयी चर्चा करत राहावी व मुले पालकांना या उपक्रमाविषयी काय तपशील, प्रतिसाद देतात याचा शिक्षकाने जरूर अभिप्राय घ्यावा.
या अभ्यासक्रमात फक्त शिक्षकावर ताण येत असेल, तर शिक्षकाने पालक अथवा इतर शिक्षकांना समाविष्ट करून घ्यावे. याकरता वर्षाच्या सुरुवातीला हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी पालक, शिक्षकांची एक सभा घेऊन स्वयंसेवकांची मागणी करावी. ज्यांना या कार्यक्रमात सहभागी व्हायची इच्छा आहे, त्यांची नावनोंदणी करून घ्यावी. नंतर स्वयंसेवकांबरोबर वेगळ्या बैठका घेऊन वर्षभराचे नियोजन करावे. पालकांचा सहभाग असेल तर मुलांनाही यात भाग घेण्यास वेगळा उत्साह असेल
या पुस्तकांमध्ये वर्षभरात घेण्यासाठी साधारण ५० ते ५५ उपक्रम दिले आहेत. शिक्षकाने वेळेच्या उपलब्धतेनुसार यातील किमान कोणतेही ४० ते ४५ उपक्रम घेणे आवश्यक आहे. यातील काही उपक्रम एकमेकांना जोडून घेता येतील, उदाहरणार्थ – ‘शेतीला भेट’ व ‘पक्षी निरीक्षण’ हे उपक्रम. तसेच काही उपक्रम सुचवलेल्या तासिकेपेक्षा कमी वेळात होऊ शकतील, काही उपक्रमांना गृहपाठाची जोड दिल्यास प्रत्यक्ष तासिकेला लागणारा वेळ कमी होऊ शकेल. याप्रमाणे शिक्षकाने उपलब्ध तासिका, मुलांची कुशलता, उपक्रमांची सांगड यानुसार उपक्रम घेण्याबाबतचे नियोजन करावे. या पस्तकातील काही उपक्रम क्रमिक पुस्तकांमधील घटकांशी संबंधित असल्याने शिक्षकाने त्यानुसार उपक्रम जोडून घ्यावेत.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
उपक्रमात नमूद केलेल्या तासिका हा प्रत्यक्ष उपक्रमासाठी लागणारा वेळ आहे. क्षेत्रभेटीला जाण्यासाठी, पूर्वतयारीसाठी त्यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो, हे शिक्षकाने नियोजन करताना लक्षात घ्यावे.
पुस्तकातील उपक्रमांदरम्यान मुलांना विविध घटकांविषयी घोषवाक्ये तयार करण्यास सांगावे. ही घोषवाक्ये १५ ऑगस्ट, २६ जानेवारीला प्रभात फेरी दरम्यान वापरता येतील.
वर्षाच्या शेवटी शाळेमध्ये प्रदर्शन भरवून त्यात विविध उपक्रमांमध्ये मुलांनी केलेले लिखाण, जमा केलेल्या, बनविलेल्या वस्तू मांडाव्यात. उदाहरणार्थ - घोषवाक्य, वनस्पतींच्या बिया, गवताचे नमुने, पानांचे हर्बेरीयम, कचऱ्यापासून बनवलेल्या गोष्टी, मलांनी तयार केलेले माती संवर्धन तंत्रांचे फोटो, वनशेती नियोजन आराखडा, वस्तीचा नकाशा, कविता, गोष्टी इत्यादी. या प्रदर्शनास पालकांनाही आवजून बोलवावे.
उपक्रमांच्या योग्यतेची चाचणी
येथे दिलेला प्रत्येक उपक्रम काही निकषांच्या आधारे तपासला आहे. एकूण उपक्रमांपैकी ९७ टक्के उपक्रम हे विद्यार्थी केंद्रित आहेत. ८८ टक्के उपक्रमांत विद्यार्थ्यांचे आकलन पुरेसे होईल यावर भर आहे. ७६ टक्के उपक्रम हे रचनावादावर आधारलेले आहेत. ७३ टक्के उपक्रमांत स्थानिक उदाहरणांचा समावेश आहे, तर ६६ टक्के उपक्रमात प्रत्यक्ष कृती व अनुभव यांद्वारे शिक्षण घेण्याची सोय आहे आणि ४० टक्के उपक्रम हे प्रत्यक्ष निसर्गाच्या सहवासातले आहेत. यातील उपक्रम अनुभव, निरीक्षण, नोंदी, निष्कर्ष, चर्चा, पडताळणी या पद्धतींवर आधारलेले आहेत. यातून मुलांमध्ये स्वयंअध्ययनाची सवय विकसित होते. हे उपक्रम दिलेल्या सूचनांनुसार राबविल्यास मुलांना निसर्गाची, परिसराची बऱ्यापैकी ओळख होऊ शकेल, असा आत्मविश्वास आम्हास वाटतो.
‘निसर्गशाळा : पर्यावरणविषयक उपक्रम - शिक्षक आणि पालकांकरता’
डायमंड पब्लिकेशन, पुणे
मूल्य - ९०० रुपये.
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/nisargshala
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment