जगातील सर्वाधिक फसव्या, विश्वासघातकी अशा संघर्ष-नाट्यमंचांपैकी एक ठरलेल्या ‘एलओसी’लगतचा दोन्ही बाजूंचा प्रवास मानवतेचे आगळे धडे शिकवणारा ठरला...
ग्रंथनामा - झलक
हॅपीमॉन जेकब
  • “द ‘एलओसी’’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्त्यांची मुखपृष्ठं
  • Sat , 24 September 2022
  • ग्रंथनामा झलक द लाईन ऑफ कंट्रोल The Line of Control हॅपीमॉन जेकब Happymon Jecob

‘एलओसी’ म्हणजे नियंत्रण रेषेच्या दोन्ही बाजूंनी भारतीय व पाकिस्तानी सैन्यासोबत केलेल्या सहप्रवासाची ही कहाणी आहे. हा प्रवास केला आहे हॅपीमॉन जेकब यांनी. साल २०१८. ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील ख्यातकीर्त अभ्यासक आहेत. त्यांनी मूळ इंग्रजीत लिहिलेल्या ‘द लाईन ऑफ कंट्रोल’ या इंग्रजी पुस्तकाचा “द ‘एलओसी’’ या नावाने ज्येष्ठ पत्रकार मिलिंद चंपानेरकर यांनी मराठी अनुवाद केला  आहे. रोहन प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला लेखकाने लिहिलेलं हे प्रास्ताविक...

.................................................................................................................................................................

डिसेंबर २०१७ हा महिना तसा फार काही विशेष अशा कारणाकरता लक्षणीय होता असं नाही. कदाचित तो केवळ माझ्यासाठीच लक्षणीय होता. भारत-पाकिस्तान सीमेवर नित्याचंच वातावरण होतं - परस्परांवर अविरत गोळीबार आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांमध्ये सुरू असलेल्या चर्चेमधील निवडक भाग दोन्हीकडून सोईस्कररित्या फोडला जाणं इत्यादी. अर्थात, या गोष्टीही तशा फारशा असामान्य ठरत नव्हत्या. दक्षिण आशियातील या दोन प्रतिस्पर्धी देशांमध्ये आणि त्या देशांतर्गतसुद्धा हिंसाचाराचं युग सुरू होतं. त्यात नेहमीपेक्षा निराळं वा विशेष चिंताजनक असं काहीच मानलं जात नव्हतं; दोन्ही देशांच्या ते अंगवळणी पडलेलं होतं. बहुतांश लोक अंगवळणी पडलेल्या उदासीनतेनेच अशा घटनांबाबत बोलत होते - अर्थात, विषय निघाला आणि उल्लेख करावासा वाटला तरच. बाकी जण सूड घेण्याच्या वल्गना करत होते, मात्र, तेदेखील अर्थातच, केवळ खासगी वाहिन्यांच्या स्टुडिओंच्या चार भिंतीआडच.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये राष्ट्रीय अहंकार कमालीचा फुगवून असलेले आणि नसलेले दोन्ही प्रकारचे लोक होते. परंतु दोन्हीकडचे लष्करी गणवेषधारी जवान आपापल्या देशातील अशा दोन्ही प्रकारच्या नागरिकांच्या रक्षणासाठी आपले प्राण गमावत होते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

नोव्हेंबर २००३मध्ये पाकिस्तानसोबत शस्त्रसंधी करार झाल्यापासूनच्या काळात सीमारेषेवर जो काही रक्तपात झाला तो लक्षात घेता, २०१७चं वर्ष हे सर्वाधिक रक्तरंजित ठरत होतं. त्या वर्षी, विशेष करून, ‘एलओसी’वर (‘लाइन ऑफ कंटोल’वर अर्थात ‘नियंत्रण रेषे’वर) अनेक डझन सैनिक व नागरिक मारले गेले आणि त्याहीपेक्षा अधिक जखमी झाले होते. ‘शस्त्रसंधी उल्लंघनां’च्या (‘सीझ फायर व्हायोलेशन’च्या - ‘सीएफव्ही'च्या) घटनांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली होती.

२०१४मध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत सत्तेवर आल्यापासून (२०१७च्या अखेरीपर्यंत) भारताने उल्लंघनांच्या एकूण २,४०८ घटना नोंदवल्या, तर पाकिस्तानने एकूण २,९१५ घटना नोंदवल्या. या संदर्भातील वृत्तांनुसार, २०१७मध्ये भारतीय लष्कराने पाकिस्तानचे १३८ जवान मारले आणि आपल्या देशाचे जवळपास २८ जवानांचे प्राण गमावले. दोन्ही बाजूंनी युवकांची लष्करभरती करण्यास सुरुवात केली- ‘एलओसी’वर पाठवून प्राण घेण्यासाठी आणि प्राण गमावण्यासाठी.

दोन्हीकडच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी, म्हणजे, पाकिस्तानचे नसीर खान जन्जुआ आणि भारताचे अजित कुमार डोवाल यांनी आपापल्या पंतप्रधानांचा सूचनेवरून २६ डिसेंबर २०१७ रोजी बँकॉक इथे गुप्त बैठक आयोजित केली आणि मग माध्यमांना नाट्यमय खुराक मिळाला. त्यांतील एक निवृत्त जनरल, तर दुसरे गुप्तहेर-कारवाया करण्यात उस्ताद मानले जाणारे. जेव्हा जेव्हा दोन देशांतील तणाव वाढून परिस्थिती बिघडते, तेव्हा तेव्हा बँकॉक इथे मसलतीसाठी भेट घेणं म्हणजे तसा दोघांच्याही सवयीचा भाग झालेला होता. अशा भेटीमुळे जी चमकदार आणि संदेहपटात शोभतील अशी दृश्यं मिळतात, ती माध्यमवाहिन्यांच्या मोठी आवडीची असतात. वास्तविक अशा भेटीतून फार काही निष्पन्न झालं नव्हतं, परंतु माध्यमांना निष्पन्न काय होतं, यापेक्षा त्यातल्या संभाव्य नाट्यमयतेत अधिक रस असतो. दिवसाचे २४ तास सतत वृत्तं प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्यांपैकी बहुतेक वाहिन्यांना मुळात, कठीण प्रश्न विचारायचे असतात, याच गोष्टीचा विसर पडलेला आहे. जर का राष्ट्रवादी भूमिका घेऊन निर्माण केलेल्या नाट्यमयतेमुळे त्यांच्या वाहिनीचे ‘टीआरपी’ (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स) वाढत असतील, तर ते कठीण प्रश्न विचारतीलच कशाला? खरं सांगायचं तर, दररोज रात्री राष्टहिताचं पालकत्व मिरवणाऱ्यांनी असाहाय्य विरोधकांना मात्र शोधक प्रश्न जरूर विचारले. परंतु उजव्या विचारांचं सरकार आणि मुख्य प्रवाहातील माध्यमांनी मिळून त्यांना धारेवर धरल्यावर बहुतांश विरोधक तोंड लपवण्यासाठी जागा शोधू लागले.

तोफगोळे डागणं, गोळीबार करणं आणि प्राण घेणं हे वेगाने सुरूच राहिलं. २०१८च्या सुरुवातीच्या तीन महिन्यांतच पाकिस्तानने उल्लंघनाची ९०० प्रकरणं नोंदवली, तर भारताने ६३३. म्हणजे, भारताने पाकिस्तानपेक्षा २६७वे ळा अधिक उल्लंघन केलं.

तुम्हाला वाटेल, ६३३ वेळा उल्लंघन झालं, तर त्यात काय मोठंसं? एक- उल्लंघनाचं प्रकरण म्हणजे, अवघ्या २४ तासांत सुमारे २० ते ५० चौरस फुटाच्या पट्ट्यात एके-४७ ते १३० एम.एम.च्या उखळी तोफांसारख्या लष्करी तोफा आदी शस्त्रास्त्रांचा तुफान मारा. खरं तर, अशा तुफान माऱ्यात किती फैरी प्रत्यक्षात झाडल्या गेल्या, हे निश्चित जाणून घेण्यासाठी संख्याशास्त्र कामी येऊ शकत नाही. कुणालाच ते निश्चितपणे सांगता येणार नाही. अर्थात, ते माहीत झाल्यानेही काही फरक पडत नाही, म्हणा. पावसाचा वर्षाव झाला की, तुम्ही पावसाचे थेंब थोडेच मोजता!

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

सीमारेषेवर हिंसाचार ही नित्याची गोष्ट झालेली होती. कुणासाठी ती उत्सवी गोष्ट ठरत होती, तर कुणी ‘दुय्यम’ गोष्ट समजून त्याकडे कानाडोळा करत होते; आणि काही त्याचा निवडणुकीच्या दृष्टीने फायदा करून घेत होते. सीमेवर जे मारले गेले, त्या मृतांच्या कुटुंबीयांनीदेखील आपल्याकडून झालेल्या हिंसाचाराचा निषेध करण्यास नकार दिला; आणि कुणी अगदी केलाच, तरी कुणी त्याबद्दलची बातमी दिली नाही. राष्ट्रीय स्तरावर सर्वत्र (हिंसाचाराद्वारे) भावनांचं विरेचन करण्याचं वातावरण असताना, अशा काळात हिंसाचाराविरोधात अगदी हलकासा ‘ब्र’ काढणं म्हणजे, कौतुकाच्या नजरा गमावणं आणि जाहिरातीही गमावणं. त्यामुळे अशा वेळी, हिंसक प्रत्युत्तर देण्याबाबत, शत्रूचा खात्मा करून टाकण्याबाबत सर्वांमध्ये सहमती होते आणि ती अस्वस्थ करणारी गोष्ट असते. सहमती निर्माण करण्याचा (मॅन्युफॅक्चरिंग कन्सेंटचा) हा एक अभिजात नमुना ठरावा.

२००३मध्ये ‘शस्त्रसंधी करार’ (सीझफायर अॅग्रीमेंट – ‘सीएफए’) झाला. तरीदेखील, तेव्हापासूनही सीमावर्ती भागात शेकडो लोक मारले गेले आहेत आणि जखमी झालेले आहेत; आणि नागरिकांची निवासस्थानं दिवसरात्र उद्ध्वस्त केली गेलेली आहेत. २०१३पासून, म्हणजे काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारच्या अंतिम वर्षापासून ते २०१८च्या पूर्वार्धापर्यंतच्या काळात झालेल्या परस्पर-भडिमाराच्या घटनांमध्ये भारत-पाकिस्तान दोघांचे मिळून जवळपास एकूण १४० नागरिक मारले गेले आहेत. जेव्हा जेव्हा भडिमाराच्या घटना घडू लागतात, तेव्हा तेव्हा देशभरातल्या प्रादेशिक वाहिन्या सीमारेषेवरील गोळीबारांची, तोफा डागण्याची दृश्यं दाखवू लागतात - ती देखील इतक्या भडक पद्धतीने आणि उच्च पट्टीतील कंठाळी पार्श्वसंगीतासह दाखवू लागतात की, तुमच्या छातीत धडधडू लागतं. आपलं तोफदळ तोफगोळ्यांचा तुफानी मारा करून शत्रूचे बंकर्स कसे उद्ध्वस्त करत आहे, त्याची दृश्यं विजयी थाटात दर्शवली जातात; एकीकडे, मृत सैनिकांच्या व सीमावर्ती नागरी वस्तीतील जनांची कुटुंबं रडून रडून आकांत करत असतात, परंतु त्यांबाबतची हृदयद्रावक दृश्यं अशा विजयोन्मादी प्रतिमांसमोर पूर्णतः झाकोळली जातात. एकंदरीत, या वेळीही पाकिस्तानींना मारल्याच्या विजयोन्मादी आनंदाने भारतीयांच्या मृत्यूच्या दुःखद घटनांवर सहजी मात साधली. अर्थात, ‘शत्रू’ भारतीय लष्कराच्या अग्रचौक्यांवर, अर्थात ‘फॉरवर्ड पोस्ट्स’वर मारा करून त्या कशा उदध्वस्त करत होता, त्याची दृश्यं मात्र आपल्या वाहिन्यांच्या ‘न्यूजरूम’पर्यंत पोहोचली नाहीत, हे वेगळ्याने सांगणे न लागे.

इतिहास आपल्याला हेच दर्शवून देतो की, जेव्हा हिंसाचार एक सामान्य गोष्ट बनते, तेव्हा समाज अघोरीपणे वागण्यास प्रवृत्त होतो; आणि आपण असं म्हणू शकतो की, सभ्यता संस्कृतीचा विकास, समाजात अस्तित्वात असलेल्या वैधताप्राप्त हिंसाचाराच्या प्रमाणावर थेट अवलंबून असतो.

व्यक्तिश: माझ्या दृष्टीने मात्र २०१७च्या डिसेंबर महिन्याचा पूर्वार्ध हा अनेक घटनांनी भरलेला होता. ‘एलओसी’वरील आभाळात हिंसाचाराचं आणि परस्पर भडिमाराच्या धुमश्चक्रीने साचलेल्या धुराचं मळभ आलेलं असतानाच, पाकिस्तानी लष्कराने त्यांच्या बाजूच्या ‘एलओसी’लगतच्या भागात माझी सैर घडवून आणण्यास मान्यता दिल्याची खबर माझ्यापर्यंत पोहोचली. खरं तर, ‘एलओसी’ ही एक, आद्याक्षरी संज्ञा - वस्तुत: मानल्या गेलेल्या सीमारेषेला (‘नियंत्रण रेषे’ला दिलं गेलेलं एक नाव. परंतु या रेषेच्या दोन्ही बाजूने ज्याप्रकारे अगदी नेमाने परस्परांवर तोफगोळ्यांचा मारा केला जातो, ते लक्षात घेता या रेषेला ‘लाइन ऑफ क्रॉसफायर’ असंच म्हणायला हवं.

मी पूर्वी पाकिस्तानमध्ये अनेक वेळा जाऊन आलेला होतो – ‘पाकिस्तानव्याप्त काश्मीर’ अर्थात, ‘पीओके’मध्येही, परंतु ‘एलओसी’वर कधीच गेलेलो नव्हतो. आता पाकिस्तानी लष्करासोबत ‘एलओसी’लगतच्या पलीकडच्या भागात- भारतीय लष्कराच्या माऱ्याच्या टप्प्यात असलेल्या भागात - प्रवास करणं म्हणजे, माझ्या आयुष्यातील सर्वांत धाडसी प्रवास ठरणार होता.

रावळपिंडीच्या प्राधिकाऱ्यांनी माझ्या या भेटीला हिरवा कंदील दर्शवण्याच्या जवळपास दीड वर्ष आधी मी भारत-पाकिस्तानच्या सीमारेषेलगतच्या भारतीय भागातसुद्धा सुमारे एक महिना व्यतीत केला होता. तेव्हा मी भारतीय लष्कर आणि ‘सीमा सुरक्षा दल’ (बॉर्डर सिक्युरिटी फोर्स - बीएसएफ)- जे पाकिस्तानसोबत असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवर (इंटरॅशनल बॉर्डर – ‘आयबी’) निगराणी ठेवण्यासाठी तैनात केलेलं अर्ध-सैनिक दल आहे - यांच्यासोबत या भागाचा प्रवास केला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘एलओसी’ची अशी सैर म्हणजे, बुद्धीला खाद्य पुरवणारी यात्रा होतीच, परंतु त्याहीपलीकडे अशा सहप्रवासाचं आणखी एक महत्त्व होतं. जगातील सर्वाधिक फसव्या, विश्वासघातकी अशा संघर्ष-नाट्यमंचांपैकी एक ठरलेल्या या भागातील लष्करी गणवेषातील व्यक्तींसोबतचा प्रवास व्यक्तिश: माझ्या दृष्टीने मानवतेचे आगळे धडे शिकवणारा ठरला. त्या अनुभवाने माझ्या मनाला खोलवर स्पर्श केला. दोन्ही बाजूंकडून ‘एलओसी’ पाहणं शक्य होणं, हीच गोष्ट मुळात लक्षणीय होती. आणि दोन्ही बाजूंनी जिवंत, रक्तरंजित संघर्ष अनुभवायला मिळाल्यास एखाद्याची संघर्षांबद्दलची, ‘कॉन्फ्लिक्ट्स’बाबतची समज अगदी कायमची बदलून जाते - तसं तर, एखाद्या अभ्यासकाचं काम केवळ संघर्षांबाबतचा अभ्यास करण्यापुरतं असतं, परंतु अशा अनुभवातून गेल्यावर अभ्यासकाचीही संघर्षांबाबतची समज, आकलन यात अवस्थांतर घडून येतं.

‘एलओसी’बाबत खात्रीपूर्वक समजावून सांगण्याच्या दृष्टीने कथन करण्यासाठी आणि लिहिण्यासाठी मला ही सैर करणं भाग होतं. ‘एलओसी’पलीकडच्या पाकिस्तानच्या भागात आपल्या पुढ्यात नक्की काय वाढून ठेवलंय, या विचाराने मनात हूरहूर लागून कमालीची अस्वस्थताही दाटून आली होती. हे पुस्तक म्हणजे, मनाची पकड घेणाऱ्या त्या प्रवासाचीच कहाणी आहे.

द ‘एलओसी’’ - हॅपीमॉन जेकब

मराठी अनुवाद - मिलिंद चंपानेरकर

रोहन प्रकाशन, पुणे

पाने - २४२

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘बहिष्कृतां’च्या घरचे अन्न ‘बहिष्कृतां’प्रमाणेच उपेक्षिले गेले. त्यामुळे ‘ब्राह्मणेतर खाद्यसंस्कृती चळवळी’ने आपली ‘देशी’ बाजू जगापुढे मांडायला सुरुवात केलीय...

स्वच्छता व शुद्धता या दोहोंना अस्पृश्यतेचा मोठा संदर्भ आहे. ज्यांना शिवायचे नाही ते अस्पृश्य. त्यांनी जवळ यायचे नाही की, शेजार करायचा नाही, हा ब्राह्मण व सवर्ण यांचा नियम. घाणीची कामं ज्यांना वर्णाश्रम धर्माप्रमाणे करायला लावली, त्यांना घाण समजून अस्पृश्य ठरवण्यात आले. साहजिकच ही माणसं कशी जगतात, काय खातात-पितात, काय विचार करतात, याची जाणीवच वरच्या तिन्ही वर्णांना म्हणजेच सवर्ण जातींना नव्हती.......

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

किणीकरांवर मानवेंद्रनाथ रॉय ह्यांच्या विचारसरणीचा मोठा प्रभाव होता. त्यांच्या नावावरूनच त्यांनी स्वतःला ‘रॉय’ हे नाव घेतले होते. रॉय यांनी 'रॅडिकल ह्यूमॅनिझम’चा पुरस्कार केला. त्या काळच्या महाराष्ट्रात अनेक नेत्यांवर, लेखकांवर आणि विचारवंतांवर रॉय ह्यांचा प्रभाव पडला होता. रॉय ह्यांनी क्रांतीचा मार्ग नाकारला असला, तरी त्या काळी तरुण असलेल्या किणीकरांना मनात कुठेतरी क्रांतीचे आकर्षण वाटले असणार.......

म्हटले तर हा ग्रामीण राजकारण उलगडून सांगण्याचा खटाटोप आहे अन् म्हटले तर शेतकऱ्यांना लुबाडणाऱ्या व्यवस्थेला पर्याय उभे करणाऱ्या पुढच्या पिढीतील शेतकरी तरुणांचा संघर्ष आहे

ही केवळ भानुदासराव पाटील, विक्रम शिंदेचीच कथा नाही, तर आबासाहेब जाधव, दिनकरराव पाटील यांच्यासारख्या लोकशाही प्रक्रियेने उदयास आलेल्या नव्या सरंजामदारांचीही गोष्ट आहे. आर्थिक संसाधनांच्या बळावर वाट्टेल तेवढा पैसा मोजून निवडणुका जिंकणारे, मतदारांचा कौल फिरवणारे आबासाहेब, दिनकरराव केवळ हैबतपुरातच नव्हे, महाराष्ट्रात सगळ्याच मतदारसंघांत दिसून येतात, पण.......

या पुस्तकातल्या ‘बिटविन द लाईन्स’ नीट वाचल्या, तर आजच्या मराठी पत्रकारितेची ‘अवनत’ अवस्था आणि तिची ‘ऱ्हासपरंपरा’ नेमकी कुठून सुरू झाली, हे लख्खपणे समजते!

आपल्या गुणी-अवगुणी सहकाऱ्यांकडून उत्तम ते काढून घेण्यापासून, समाजातल्या व्यक्ती-संस्था यांचं योगदान नेमकेपणानं अधोरेखित करण्यापर्यंत बर्दापूरकरांचा सर्वत्र संचार राहिला. त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेला सत्त्व, नैतिक बळ आणि गांभीर्याची झळाळती झालर लाभत राहिली. आजच्या मराठी पत्रकारितेच्या संदर्भात त्या झालरीचा ‘थर्मामीटर’ म्हणून वापर केला, तर जे ‘तापमान’ कळतं, ते काळजी करावं, असंच आहे.......

लोकशाहीबद्दल आस्था किंवा काळजी व्यक्त करणं, ही काही लोकांचीच जबाबदारी आहे, हा समज खोडून काढायचा तर कामच केलं पाहिजे. ‘लोकशाही गप्पा’ हे त्या व्यापक कामाच्या गरजेतून आलेलं छोटंसं काम आहे

पुरेशी मेहनत करून आणि संवादाच्या सर्व शक्यता खुल्या ठेवून लोकांशी बोललं गेलं, तर प्रत्येकाच्याच आकलनात वाढ होते. आणि हळूहळू भूजलाची पातळी उंचवावी, तसं लोकशाहीबद्दलचं भान सखोल होण्याची शक्यता निर्माण होते. आपल्या भोवतीच्या गदारोळातून एकमेकांचा हात धरून, एका सजग आणि जिवंत लोकशाहीच्या मुक्कामापर्यंत मैदान मारणं आपल्याला सहज शक्य आहे. त्यासाठी एकमेकांना शुभेच्छा देणं एवढं तरी आपण करूच शकतो. ते मनःपूर्वक करू या!.......