माझी इस्लामवरची श्रद्धा आणि माझ्या देशावरचं माझं प्रेम, यांत कुठेही कधीही विसंवाद नव्हता. खरं सांगायचं, तर माझ्या या दोन्ही निष्ठा एकमेकांशी अगदी जवळून गुंफलेल्या होत्या
ग्रंथनामा - झलक
जमीर उद्दिन शाह
  • ‘सरकारी मुसलमान’ या पुस्तकाच्या मराठी व इंग्रजी आवृत्त्यांची मुखपृष्ठं
  • Sat , 24 September 2022
  • ग्रंथनामा झलक सरकारी मुसलमान Sarkari Musalman जमीर उद्दिन शाह Jamir Uddin Shah

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) जमीर उद्दिन शाह यांच्या ‘सरकारी मुसलमान’ या मूळ इंग्रजी पुस्तकाचा त्याच नावाने शिरीष सहस्त्रबुद्धे यांनी मराठी अनुवाद केला आहे. मुस्लीम नागरिक सरकारी अधिकारी बनतात आणि नियमानुसार कामगिरी बजावतात. त्या वेळी त्यांना बऱ्याचदा ‘सरकारी मुसलमान’ असं काहीशा हेटाळणीच्या सुरात म्हटलं जातं. या पुस्तकात त्याचा सविस्तर खुलासा आहेच, पण इतरही अनेक गोष्टी आहेत...

राजहंस प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

मि. रिचर्ड वर्मा यांनी अमेरिकेचे भारतातले राजदूत म्हणून नुकतीच सूत्रं हाती घेतली होती. त्या वेळी त्यांना भेटायचा योग मला आला. त्यांनी विचारलं, “एक आर्मी जनरल विद्यापीठात काय करताहेत?” मी उत्तर दिलं, “जनरल आयसेनहॉवर यांनी त्यांचा लष्करी गणवेश उतरवून ठेवला आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. जे काम त्यांनी केलं, तेच मी करतो आहे!” (अमेरिकेत विद्यापीठाचा अध्यक्ष आपल्याकडच्या कुलगुरूला समकक्ष असतो.) मी त्यांना आणखी एक आठवण करून दिली. जनरल जॉर्ज वॉशिंग्टनपासून सुरुवात करून आजपर्यंत तब्बल १२ लष्करी अधिकाऱ्यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. अर्थात त्यांचा गैरसमज होऊ नये, म्हणून मी ताबडतोब खुलासा करून टाकला की, मला कोणत्याही प्रकारची राजकीय महत्त्वाकांक्षा बिलकूल नाही. त्यांनी शेरा मारला, “तुमचं अमेरिकेच्या इतिहासाचं ज्ञान चांगलंच भक्कम दिसतंय.”

आज एक ज्येष्ठ अधिकारी म्हणून मी मागे वळून पाहतो, तेव्हा मला असं दिसतं की, तब्बल ४० वर्षं मी सन्मान, आदर आणि इभ्रत राखून ज्या भारतीय सेनेची सेवा बजावली, तिथलं वातावरण प्रामुख्यानं मुस्लिमेतर होतं. मी कधीही माझी मुसलमान म्हणून ओळख लपवली नाही किंवा ती फार कुठं मिरवलीही नाही. मी माझ्या धर्माशी प्रामाणिक राहून लष्करी सेवा बजावली, या गोष्टीचं माझे सहकारी अधिकारी किंवा कनिष्ठ सैनिक यांना कधीही वावडं नव्हतं. माझी इस्लामवरची श्रद्धा आणि माझ्या देशावरचं माझं प्रेम, यांत कुठेही कधीही विसंवाद किंवा संघर्ष नव्हता. खरं सांगायचं, तर माझ्या या दोन्ही निष्ठा एकमेकांशी अगदी जवळून गुंफलेल्या होत्या.

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे आपण एक लोकशाही गणतंत्र आहोत. संपूर्ण लोकसंख्येनं लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभागी व्हावं, क्वचित मोठ्या आवाजात वादविवादही करावेत, अशी अपेक्षा असते. अर्थात ते आटोक्यात राहावे, यासाठी राज्यघटनेमध्ये आवश्यक ते नियंत्रक घटकसुद्धा नेमून दिलेले आहेत. गणतंत्र या संकल्पनेमध्ये एकमेकांशी संलग्न असलेल्या संस्थांचा समावेश होतो. त्यामध्ये एक आघाडीवरची संस्था म्हणजे भारतीय सेनादल. त्यांना महत्त्व मिळतं आणि समाजात आदर मिळतो, तो या सेनेच्या सदस्यांनी वेळोवेळी केलेल्या विलक्षण त्यागामुळे. त्यांची काही तत्त्वं ते अतिशय अभिमानानं हृदयाशी घट्ट बाळगतात. आणि त्याद्वारे सामान्य जनतेसाठी आदर्श ठरतात. यातलं पहिलं तत्त्व असं की, जे सैन्यात दाखल होतात, ते अमर्याद जबाबदारी स्वीकारतात, आणि नागरिक म्हणून इतरांना असलेल्या अनेक हक्कांवर स्वेच्छेनं पाणी सोडतात.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

दुसरी गोष्ट सैन्यामध्ये उपविजेत्याला कोणतंही बक्षीस मिळत नाही! तिसरं म्हणजे विविधतेत एकता या तत्त्वाचं प्रत्यक्ष जितंजागतं उदाहरण ते सादर करतात. त्यांच्याकडे एकदा एखादी जबाबदारी सोपवली की जात, धर्म, पंथ, वर्ण यांतला कुठलाही भेदभाव, ते त्यांच्या कामाच्या आड येऊ देत नाहीत.

आजपर्यंत हे असंच होत आलेलं आहे. प्रत्यक्ष रणभूमीवरचं युद्ध असो, नैसर्गिक आपत्ती असोत, नागरी प्रशासनाला मदत करणं असो, बंद-संप-दंगलखोरी अशा विविध परिस्थितीत तातडीनं कृती करण्याची आवश्यकता असो; त्या प्रत्येक प्रसंगी सैनिक पुढे सरसावतात, आणि अत्यंत न्याय्य पद्धतीनं देशसेवा बजावतात. कर्तव्याच्या मार्गाआड ते दुसरी कोणतीही गोष्ट येऊ देत नाहीत. ही वर्तनपद्धती सदैव जतन करून ठेवलेली असणं, हा सैन्यदलांच्या अभिमानाचा विषय आहे. दुर्दैवानं सैन्यदलांचं महत्त्व हे व्यापक समाजाला प्रकर्षानं जाणवतं, ते मात्र फक्त युद्धाच्या काळात किंवा युद्धसदृश परिस्थितीतच!

माझ्या सैनिकांबरोबर त्यांचा नेता म्हणून मी मंदिर-संचलनात सामील झालो. त्यात मी काही पूजा करण्याचा भाग नव्हता, तर माझ्या सैनिकांना मी त्यांच्या भावना आणि विश्वासाची कदर करतो, हे दाखवून देणं, हे माझं परमकर्तव्य होतं. अशाच प्रकारे त्यांनीही माझ्या श्रद्धांची कदर केली. रमजानमध्ये मी उपवास करत असे, तेव्हा पहाटे तीन त्यांनी वाजता मला नाश्ता तयार करून दिला.

अनेक वाचकांना हे वाचून खूप विशेष वाटेल : अलिगढ मुस्लीम विद्यापीठाचे संस्थापक सर सय्यद अहमद खान यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस गोमांसभक्षणाला बंदी घातली. आपल्या देशबांधवांच्या धार्मिक श्रद्धा दुखवायच्या नाहीत. हा उद्देश त्यामागे होता. आज मुस्लीम समाजानं हे ठरवायचं आहे की, आपण अशा काही प्रकारे ताज्या संदर्भाशी आणि वस्तुस्थितीशी जोडलेले राहणार आहोत का? माझ्या धर्मबांधवांना माझा सल्ला असा राहील की, तुमच्या देशबांधवांच्या सामाजिक चालीरीतीबाबत संवेदनशील रहा. तुम्ही एखाद्या प्रकारचं अन्न खाल्ल्यामुळे तुमच्या देशबांधवांना अपमानित वाटणार असेल, तर ते खाद्य सोडून द्यायला काय हरकत आहे?

भारतातल्या अलीकडच्या काही घडामोडींनी मला माझ्या स्वप्नातून धक्का मारून जागं केलं आहे. देशामध्ये मुस्लीमविरोधी भावना उफाळून येताना दिसतेय, ती प्रामुख्यानं समाजमाध्यमांमुळे, असं मी मानतो. सैन्याशी निगरित अशा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप्समध्ये जशा पाकिस्तानविरोधी पोस्ट दिसतात, (याला अर्थात काहीच हरकत नाही.) तशाच थेट मुसलमानांविरोधी गरळ ओकणाऱ्या पोस्टही दिसतात, याची मला अतिशय काळजी वाटते. कारण अशा तऱ्हेच्या पोस्ट तुम्ही थेट तुमच्या देशबांधवांच्या विरोधात प्रसृत करत असता. माझे शाळेतले मित्र आणि लष्करी शिक्षणातले माझे सहाध्यायी यांच्या पोस्ट मी पाहत असतो. ते माझ्याबरोबरच वाढले, शिकले. आणि अनेकदा इस्लामबद्दलचा हा जो भयगंड किंवा तिरस्कार बहुसंख्याकांमध्ये निर्माण होताना दिसतो, त्याच्यामुळे त्यांना खूप अस्वस्थ वाटतं.

अलीकडेच माझ्याबरोबरच ज्यांना सैन्यात प्रवेश मिळाला, अशा माझ्या दोघा मित्रांनी माझ्याच कुटुंबाच्या विरोधात एक भाष्य केलं आणि त्यात मला उद्देशून ‘पाकिस्तानात जा’ असं फर्मावलं. हा हल्ला मला सहन झाला नाही. मी ग्रुपच्या नियंत्रकाला हे खपवून घ्यायचं का, असा प्रश्न विचारला. कारण मुळात आमचा हा गटच मुळी दोस्ती वाढवण्यासाठी गंमतजंमत करावी, या उद्देशानं स्थापन झाला होता. या दोघा लेखकांपैकी एक प्रख्यात इतिहासतज्ज्ञ होते. त्यांनी ताबडतोब माफी मागितली. दुसऱ्याला ग्रुपमधून काढून टाकण्यात आलं. त्यानंतर मात्र अशा तऱ्हेच्या फूट पाडणाऱ्या संदेशात घट झाल्याचं माझ्या निदर्शनाला आलं. सैन्यदलामध्ये आम्हाला ताकद मिळते ती अशाच गोष्टींमुळे. माझ्यापुरतं बोलायचं तर अशा तऱ्हेच्या अन्यायाविरुद्ध बोलण्यात मी कधीही मागे नसतो. एकदा तर याच विषयावर मी पंतप्रधानांनाही पत्र लिहिलं होतं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या मार्च २०१८मधल्या एका लेखात असं लिहिलं होतं की, भारतातले मुस्लीम जसे वागतात आणि जी वेषभूषा करतात, ती त्यांच्या समाजाचं जे सुवर्णयुग होतं त्याच्याशी सुसंगत असते. त्यांचं हे मत पूर्णपणे चुकीचं आहे, असं मला वाटतं. मुसलमानी पेहराव धर्मापेक्षा गरिबीतून आलेला आहे. माझा सल्ला असा आहे का, जसा वेळ-प्रसंग असेल, त्याला शोभेल असा पोशाख करा. काहीतरी वेगळेपण उठून दिसण्यासाठी नको. इस्लामनं एवढंच सांगितलं आहे की, पुरुषांनी पोशाखाच्या बाबतीत उगीच उधळपट्टी करू नये. मी सैन्यात काम करताना विशेष समारंभप्रसंगी अनेकदा पाश्चात्त्य सुटाऐवजी शेरवानी घालत असे. शेरवानी जास्त रुबाबदार दिसते, असं मला वाटतं आणि शिवाय तिची फॅशन कधीच नाहीशी होत नाही. त्यामुळे प्रत्येक वेळी ट्राउझरचे कट्स किंवा रुंदीची फॅशन बदलली की, आपल्याला खिशाला भरपूर चाट द्यावी लागत नाही!

अमविचा कुलगुरू म्हणून काम करताना माझ्या लक्षात आलं की, महिलांमध्ये डोक्याला हिजाब किंवा स्कार्फ बांधण्याची पद्धत वाढत चालली आहे. इस्लामनंही तशी शिकवण दिली आहे. अर्थात संपूर्ण चेहऱ्यावरून बुरखा घेण्याची प्रथाही वाढत चाललेली दिसली. हे मात्र इस्लामनं सक्तीचं केलेलं नाही. डोक्याला बांधायचे रुमाल किंवा स्कार्फ हे आता जगभर एक ‘फॅशन स्टेटमेंट’ म्हणून प्रसिद्ध झाले आहेत! संपूर्ण चेहरा किंवा अंग बुरख्यानं झाकणं हे मात्र विशेषत: आपल्याकडच्या गरम आणि दमट हवामानात अगदी निश्चितपणे अनारोग्यकारक आहे. विद्यार्थिनींच्या हे निदर्शनाला आणून दिलं, तेव्हा त्याला चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. अगदी पारंपरिक विचारांच्या कुटुंबांतून येणाऱ्या मुलींनीही बदलाची तयारी दाखवली.

अमुविच्या विद्यार्थ्यांकडून भेदभाव आणि पक्षपाताची तक्रार सतत चर्चेत येत असे. मी त्यांना हे स्पष्ट करून सांगितलं की, काही अंशी सगळ्याच माणसांमध्ये आपपरभाव ही प्रवृत्ती असतेच. पण त्याचबरोबर हेही समजावलं की, पक्षपात हा प्रामुख्यानं अशिक्षितांच्या विरोधात होतो. भारतातले दलित आणि मुस्लीम हे दोघेही कमी शिकलेले या श्रेणीत मोडतात. आणि त्यामुळे त्यांच्या विरोधात भेदभाव होतो, असं म्हटलं जातं. माझ्या कुटुंबातल्या कुणाच्याही वाट्याला आणि माझ्याही वाट्याला कधीही पक्षपात आला नाही, ही गोष्ट मी आवर्जून सांगत असे. मी सावकाश पण निश्चितपणे बढतीच्या पायऱ्या चढत गेलो. ‘तीनतारांकित जनरल’ झालो आणि ‘डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ म्हणून सेवानिवृत्त झालो. सेनादलाच्या आधुनिकीकरणाची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर सोपवली गेली, तेव्हा त्या विभागाची आर्थिक तरतूद हजारो कोटी रुपयांची होती. यासंबंधीचं कामकाज मी हाताळलं, तेव्हा माझ्या वागण्याकडे किंवा कामांकडे संशयानं बघितलं जातंय, असा अनुभव मला कधीच आला नाही.

इस्लामी जगतातल्या फार मोठ्या लोकसंख्येला ‘आपण चहूबाजूंनी घेरले गेलो आहोत’, अशा मानसिकतेनं ग्रासलेलं आढळून येतं. इराक आणि अफगाणिस्तानवरची आक्रमणं आणि उत्तर आफ्रिका व आखाती यांना आलेली उद्ध्वस्त कळा यांच्यामुळे निश्चितच काही गैरसमज पसरायला वाव आहे. परंतु त्याहीपेक्षा भयंकर परिणाम होतात ते आपल्या देशातले लोक जेव्हा कर्कश आवाजात ‘पाकिस्तानात चालते व्हा’, अशा घोषणा देतात तेव्हा. भारतीय चित्रपटांचं उदाहरण घ्या. १९५० व १९६०च्या दशकात मुसलमानांचं चित्रण सत्कार्य करणारी मैत्रीपूर्ण माणसं, असं होत असे. आपला सिनेमा हा आपल्या संमिश्र संस्कृतीचं उत्कृष्ट प्रतिनिधित्व करात आलला आहे. पण आता त्यानंही रंग बदललेले दिसतात. आता चित्रपटात मुसलमानांची प्रतिमा खलनायकासारखी रंगवली जाते. चित्रपट पाहणाऱ्यांची संख्या प्रचंड असल्याने त्यांच्यावर याचा सखोल व गंभीर परिणाम होतो. मुद्रित माध्यमांच्या बाबतीत पाहिलं, तर त्यांना सातत्याने वाद-विवाद आणि संघर्ष यांची ठोकळेबाज उदाहरणं हवी असतात किंवा निर्माण करायची असतात! हा सगळा मानसिक ऱ्हास थांबवण्यासाठी काहीतरी ताबडतोब करायला हवं. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा तोडगा आहे, तो म्हणजे आधुनिक विज्ञानावर आधारलेलं उदारमतवादी आणि असंकुचित शिक्षण सगळ्यांना उपलब्ध करून देणं,

आपला समाज हा एखाद्या सलाड बाउलसारखा आहे. मी अलीकडे याच अर्थाची आणखी एक उपमा वाचली : जमून आलेला वाद्यवृंद! संगीत विविध वाद्यांचं बनतं; पण त्या वाद्यांचे सूर एकमेकांशी जुळले नाहीत, तर केवळ कर्णकर्कश आवाज निर्माण होईल. ती सगळी वाद्यं एकमेकांशी मिळत्याजुळत्या सुरावटी वाजवतील, तेव्हाच कर्णमधुर संगीत निर्माण होईल. भारत देशात अनेक धर्म आहेत. अनेक संस्कृती, अनेक भाषा असा हा आपला समाज आहे. या सगळ्यांनी एकमेळानं एकत्र नांदलं पाहिजे. पण याचा अर्थ असा नाही की, सगळ्यांचे विचार, वागणूक आणि कृती अगदी एकसारखेच हवेत. वाद्यवृंदात वेगवेगळी वाद्यं एकाच वेळी वाजतात आणि त्यांचे आवाज वेगवेगळे असतात; पण सुरावट एकच असते. एखादा समाज अशा तऱ्हेनं सुसंवादी राहिला नाही, तर तो दिशाहीन होतो, संघर्षाच्या मार्गानं जातो. सर्वत्र गोंधळ माजतो आणि प्रगती खुंटते. विकास आणि आधुनिकीकरण यांना खीळ बसते. प्रगतीसाठी सुसंवाद हवा आणि एक कुशल वाद्यवृंदसंचालक हवा. त्याला वेगवेगळ्या वाद्यांच्या आवाजांची जाण असायला हवी. ज्या व्यक्तीला फक्त ड्रम्सचा दणदणाटच माहीत आहे, त्याला बॅगपाइपची गोडी कळणार नाही. एखादं राष्ट्र आपल्या नागरिकांना समानतेनं वागवत नसेल किंवा समान संधी उपलब्ध करून देत नसेल तर निराशा, तक्रारी आणि संताप उफाळून येतात. अशी परिस्थिती यादवी युद्धाला अनुकूल असते.

परस्परसमजूत आणि सहिष्णुता ही मूल्यं बालवयातच अंगी बाणवायला हवीत. शिक्षण ही आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे, हे मला मान्य आहे. परंतू तरीही व्यक्तीला बालवयात जे शिक्षण मिळतं, ते त्याच्या पुढच्या आयुष्यातल्या संपूर्ण विचारसरणीचा पाया होऊन राहतं. अगदी लहानपणीच मुलांचं मन वैचारिक प्रदूषणानं भरून गेलं, तर त्याचं विष आयुष्यभर त्यांच्या मनात राहील. एवढंच नव्हे, तर ते विष ते पुढच्या पिढ्यांनाही देतील. भारतीय तत्त्वज्ञानाचा गाभा असा आहे की, मूल्यांचे संस्कार करता येतात आणि ते बालवयात केले तर अधिक टिकाऊ असतात. योग्य ज्ञान व्यक्तीला निश्चितपणे योग्य कृतीकडे घेऊन जातं.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

भारतीय मुसलमानांनी दोन तातडीच्या विषयांकडे लक्ष द्यायला हवं आहे. त्यांनी त्यांच्या लहान मुलांना योग्य शिक्षण द्यायला हवं आणि मदरशांमध्ये सधारणा घडवून आणायला हवी. मदरशांमध्ये, विशेषत: अभ्यासक्रमात बदल करायचा आग्रह मुस्लीम समाजानंच धरायला हवा. त्यातूनच मुस्लीम तरुण रोजगारक्षम बनतील.

माझ्या कारकिर्दीत सेनादल, राजनय, न्यायव्यवस्था आणि शिक्षणव्यवस्था अशा चार यंत्रणांमधली वेगवेगळी पदं धारण करून घेतलेल्या अनुभवाचं सार मी अखेरीस खालीलप्रमाणे मांडू इच्छितो :

अ) कोणत्याही शत्रूचा मुकाबला करण्याची क्षमता सैन्यामध्ये आहे; परंतु त्याला आवश्यक ती साधनसामग्री देण्याची गरज आहे. दुर्दैवानं ही गरज फार दीर्घकाळ दुर्लक्षित राहिली आहे. याबाबत सैनिक व अधिकारी यांची मतं संरक्षणखात्यानं गांभीर्यानं घ्यायला हवीत. चीन हाच आपला खरा शत्रू आहे, ही गोष्ट आम्ही अनेक वर्षं ठासून सांगत आलो. परंतु तरीही चिनी आक्रमणाच्या धोक्यापासून देशाचा बचाव कसा करायचा, या विषयाची पूर्वतयारी उपेक्षितच राहिली. यासंबंधात ताबडतोब दुरुस्ती करायला हवी.

ब) लष्करी सेवेत जे अभिमानानं उत्तम कामगिरी बजावतात, ते निवृत्तीनंतर जवळजवळ गंजून निकामी होतात. त्यांचा उपयोग कसा करून घेता येईल, याकडे योग्य लक्ष द्यायला हवं. समर्थ भारताची पायाभरणी करण्यात असे निवृत्त अधिकारी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावू शकतील. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी उत्कृष्ट मूल्यं अंगात बाणवली, विकसित केली आणि प्रत्यक्ष कार्यवाहीत आणली. त्यांचे संस्कार आता ते इतरांना देऊ शकतात. मला सैन्यातून निवृत्त झाल्यानंतरही पुढे आठ वर्षं सेवा करण्याची संधी मिळाली. अनेक लष्करी यापेक्षा लवकर निवृत्त होतात. परंतु त्यांच्याकडे उत्कृष्ट अनुभवांची खाण असते. त्यांचा उपयोग करून घेण्यात मनाचा कोतेपणा आड येता कामा नये. कर्तृत्ववान निवत्त लष्करी अधिकाऱ्यांना निमलष्करी दलात आणि पोलिसांत बजावण्याची संधी दिली, तर या दोन दलांची एकूण प्रभावक्षमता किती वाढेल, याचा विचार करायला हवा.

क) विविध देशात आपले जे राजनैतिक अधिकारी दूतावासात काम करतात, त्यांनी त्या त्या देशांची भाषा शिकून घेतली, तरच राजनयाची कामगिरी यशस्वी होऊ शकेल. दुभाषांवर अवलंबून राहणं थांबवायला हवं. चिनी आणि रशियन राजनैतिक अधिकारी दुभाषांचा वापर करतात, यावर जायला नको. त्यांना आपल्या भाषा शिकवलेल्या असतात. केवळ प्रतिसाद देण्यापूर्वी पुरेसा विचार करायला वेळ मिळावा म्हणूनच ते दुभाषांचा वापर करतात. अशा चर्चेत आपले अधिकारी अनवधानानं हिंदीत परस्परांशी काही बोलले, तर ते या परकीय अधिकाऱ्यांना समजतं.

ड) शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांमध्येही शिस्तीचे संस्कार, प्रसंगी सक्तीनं बाणवले नाहीत, तर आपली विद्यापीठं जगभरातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या यादीत कधीही दिसणार नाहीत. शिस्त हवी याचा अर्थ विचारस्वातंत्र्य अथवा भाषणस्वातंत्र्य नष्ट करावं, असं मी म्हणत नाही. परंतु गुंडगिरीला कठोरपणे आळा घालायला हवा. शिक्षकांच्या व्यवसायाला जबाबदारीचं तत्त्व लागू करायला हवं. गोपनीय अहवालांची प्रथा सुरू करायला हवी. आपण आपल्या कामगिरीसाठी योग्य अधिकाऱ्यांना जबाब देऊ लागतो, याची जाणीव त्यांना असायला हवी.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ई) मी आशावादी माणूस आहे. मला दिसतं की, मुसलमानांमध्ये शिक्षणाबद्दलची तहान-भूक वाढत चालली आहे. आज देशात मुस्लिमांविरोधात तिरस्कार, जमावाची झुंडशाही आणि ‘लव जिहाद’सारखे आरोप यांची लाट उसळली असली, तरी मुस्लीम समाज ज्ञान आणि क्षमता यांच्या आधार त्यावर मात करेल, असा मला विश्वास वाटतो. जखमा भरून येण्यासाठी काही वेळ द्यायला हवा. भारतीय नागरिक मुळात सहिष्णू आणि एकत्र नांदण्याच्या विचाराचे आहेत. सध्या बिघडलेला समतोल लवकरच पर्वपदावर येईल, असा मला विश्वास वाटतो. बहुसंख्य लोक आता शांत बसलेले दिसले, तरीसुद्धा त्यातले अनेक जण एकात्मता आणि देशाचं व्यापक हित यांबद्दल बोलायला लागले आहेत.

आपल्या लोकसंख्येत तरुणांचं प्रमाण फार मोठं आहे. देशाचं भवितव्य त्यांच्या हातात आहे. भविष्यातली आव्हानं पेलण्यासाठी जे नैतिक व बौद्धिक दृष्टीनं सक्षम आहेत, त्यांनी देशाच्या निष्ठावंत सैनिकांप्रमाणे स्वत:ला वाहून घेतलं आणि तरुणांपैकी जे सगळ्यात अधिक बुद्धिमान आहेत, त्यांना हे काम मनापासून समाधान देणारं वाटलं, तरच देशाचं भविष्य उज्ज्वल राहील. एरवी ते संकटात येईल. बेताच्या वकुबाच्या लोकांच्या किंवा नैतिक उंची नसलेल्या लोकांच्या हातात देश गेला, तर हातात शस्त्र घेण्याचा उद्देश विकृत किंवा विफल होण्याची शक्यता आहे. अशा वेळी त्याचे विपरीत परिणाम सामान्य माणसावर होतील. आज सच्च्या सैनिकाला हवं आहे ते अखेरीस देशाच्या सामान्य माणसाचं समाधान आणि त्याची सुरक्षितता.

अशा तऱ्हेनं सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी सुरू होतात आणि संपतात. ती गोष्ट म्हणजे आपण :

देशाचे सगळे नागरिक...!

‘सरकारी मुसलमान’ - जमीर उद्दिन शाह

अनुवाद - शिरीष सहस्त्रबुद्धे

राजहंस प्रकाशन, पुणे

पाने - २१२

मूल्य - २६० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......