‘आयास’ : खडतर, संघर्षशील जीवनप्रवासाचा प्रेरणादायी आविष्कार
ग्रंथनामा - झलक
कमलाकर चव्हाण
  • ‘आयास’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Fri , 26 August 2022
  • ग्रंथनामा झलक आयास शंकर विभुते

‘आयास’ ही शंकर विभुते यांची नवी कादंबरी नुकतीच स्वरूप प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. तिच्याविषयीचा हा लेख...

.................................................................................................................................................................

‘आयास’ ही शंकर विभुते यांची नवी कादंबरी. नायक संग्राम पोशेट्टी बोईनवाडचा मनाला थक्क करणारा संघर्षशील जीवनप्रवास या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. एखाद्या घटनेने उद्ध्वस्त झालेला माणूस कष्ट आणि परिश्रमाच्या जोरावर आपले जीवन कसे यशस्वी करतो, याची ही हृदयस्पर्शी कहाणी आहे. ‘आयास’ म्हणजे काबाडकष्ट, परिश्रम. संग्रामच्याच नव्हे तर जगाच्या पाठीवरील कोणत्याही व्यक्तीसाठी आयास महत्त्वाचा ठरतो. कथानक, वातावरणनिर्मिती, निवेदन, संवाद, घटना-प्रसंग, बोली इत्यादींच्या एकात्म परिणामातून ही कादंबरी मनाची पकड घेते.

देगलूरजवळच्या महादेववाडी गावातील प्रतापराव देसाई हा शंभर एकर जमिनीचा मालक दुष्ट, अन्यायी व स्त्रीलंपट स्वभावाचा असतो. त्याची नजर संग्रामचा भाऊ लालूची पत्नी – रकमावर पडते. ती अत्यंत देखणी असते. प्रतापराव संपत्ती व दंडेलशाहीच्या जोरावर गावसंस्कृतीची मूल्ये पायदळी तुडवत रकमाला आपल्या जाळ्यात ओढतो. याची चर्चा गावासह लालूच्याही कानावर येते; परंतु धनाढ्य प्रतापरावासमोर तो हतबल होतो. आपल्या प्रेमसंबंधात अडसर नको म्हणून प्रतापराव लालूचा खून करून त्याचे प्रेत मांजरा नदीच्या पात्रात फेकून देतो.

आपल्या भावाला अत्यंत क्रूरपणे संपवल्यामुळे, त्याचा संसार उद्ध्वस्त केल्यामुळे संग्राम अस्वस्थ होतो. भावाच्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय करतो. मानसिकदृष्ट्या भंगलेल्या संग्रामचे मन कशातच लागत नाही, तो स्वत:मध्येच हरवून जातो. या मानसिकतेतून बाहेर काढण्यासाठी त्याची आई – हानमाबाई गावातीलच आपल्या भावाला गळ घालते आणि संग्रामचा विवाह मामाची मुलगी – सुशीलासोबत होतो. पण तो संसारात रमत नाही. भावाच्या निर्दयी व दुर्दैवी खुनाचा घाव त्याच्या काळजावर बसतो. एखादी महाकाय लाट यावी आणि क्षणार्धात किनाऱ्यावरील सामान्य माणसाचे घर नाहीसे व्हावे, तसे काहीसे लालूचे होते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

शरीरयष्टीने अत्यंत किरकोळ असणारा संग्राम अन्यायी प्रतापरावाला संपवण्याची खूणगाठ मनाशी बांधतो. प्रतापराव नदीवरून स्नान करून परतत असताना संग्राम त्याच्या मानेवर कुऱ्हाडीचे घाव घालून त्याला संपवतो आणि कुऱ्हाड नदीपात्रात फेकून पोलीस ठाण्यात जातो. गावातील अन्यायाची प्रचंड गढी उद्ध्वस्त केल्याचे समाधान त्याच्या मनात असते. प्रतापराव अनैतिकतेचे प्रतीक असल्याने गावातील लोक काही प्रतिक्रिया देत नसले तरी ते मनातून आनंदित होतात. पुढे कोर्टात खटला चालतो; परंतु साक्ष-पुराव्याअभावी व नाबालक म्हणून संग्रामची सुटका होते.

या खटल्यातून सुटका झाल्यानंतर संग्राम गावाकडे येतो. तेव्हा गावातील लोक त्याच्याशी बोलत नाहीत. केवळ पत्नी सुशीलाच्या मनात विरहाची भावना असते. नवऱ्याने आपल्यासोबत राहावे, अशी तिची इच्छा असते. गावातील वातावरण सुरळीत राहावे, लोकांच्या मनातील आपल्यासंबंधीचा संभ्रम दूर व्हावा, यासाठी संग्राम बहिणीच्या गावी जातो. त्याला वाटते बहिणीच्या गावी राहून काम करावे, चार पैसे कमावून आपला संसार उभा करावा.

तो सुरुवातीला बिदरजवळील ‘वांगी’ या बहिणीच्या गावी जातो. तेथे काम नाही – पैसा नाही, हे लक्षात आल्यास दुसऱ्या बहिणीच्या ‘देव्हाडा’ (आंध्र प्रदेश) या गावी जातो. दुसरीकडे काम मिळेपर्यंत बहिणीच्या शेतात काम करतो, पण त्याच्या मेव्हण्याला ते आवडत नाही. ते प्रत्येक वेळी संग्रामला टोचून बोलतात, त्याचा अपमान करतात. तो ज्या पार्श्वभूमीवर आपल्या घरी आला आहे, हे त्यांना आवडलेले नसते.

एके दिवशी डब्यातील दोन रुपये गायब होतात, तेव्हा बहीणच संग्रामवर चोरीचा आळ घेते. वास्तविक ते पैसे मेव्हण्यानेच बाजारासाठी नेलेले असतात. परिस्थिती प्रतिकूल असल्यास रक्तानात्याची माणसेही भावबंध तोडून टाकतात. कादंबरीतील हा प्रसंग माणसांच्या वर्तनव्यवहारावर जळजळीत भाष्य करणारा आहे.

मग संग्राम प्रभास या मित्राच्या सांगण्यावरून मोगडपल्ली येथील नागारेड्डी यांच्याकडे कामाला जातो. त्यांचा जमीनजुमला मोठा असतो. त्यांच्याकडे शेतात अनेक नोकर असतात, कामही भरपूर असते. संग्राम नागारेड्डी यांच्या शेतात उत्तम काम करतो आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरतो. तेथे संग्राम तीन महिने काम करतो. त्याचा मोबदला चार पोती साळी देव्हाड्याची बहीणच घेऊन जाते. संग्रामला श्रमाचा पैसा हवा असतो. त्यामधून त्याला आपला संसार सजवायचा असतो. पत्नीचा विरह त्याला व्याकूळ करतो, परंतु स्वार्थी व आपमतलबी माणसांच्या दुनियेत सामान्य माणसांच्या भावनेला किंमत नसते. त्यांची स्वप्ने तुटतात, फुटतात, चक्काचूर होतात, त्याचा विचारही कोणाच्या मनाला स्पर्श करत नाही, हे अस्वस्थ करणारे जीवनवास्तव या कादंबरीमधून अधोरेखित होते. आपले स्वप्न सत्यात उतरणार नाही, असे वाटून संग्राम मोगडपल्ली सोडून मुंबईला जातो.

तिथं एका हॉटेलात भांडी धुण्याचे काम स्वीकारतो. कष्टाची प्रचंड तयारी व इमानदारीच्या बळावर तो हॉटेल मालक व तेथील सर्व सहकाऱ्यांचे मन जिंकतो. हॉटेलमध्ये काम करताना त्या अनुषंगाने तेथील कामगार, त्यांचे भावविश्व, संवाद, आवडी-निवडी, तेथे येणारे ग्राहक - त्यांची चर्चा इत्यादींचे भावविश्व लेखकाने उत्कटपणे उभे केले आहे.

संग्रामचा प्रामाणिकपणा व कष्टाची तयारी पाहून हॉटेल मालक आपल्या बिल्डर भावाकडे त्याला पाठवतो. तेव्हा हॉटेलमधील संग्रामचे सहकारी मिथून, सलमान, रवी हे मित्र त्याला नवीन ड्रेस भेट देऊन निरोप देतात. त्या दिवशी संग्रामला अर्धा दिवस काम करू देत नाहीत. हा कादंबरीतील प्रसंग अत्यंत हृदयस्पर्शी झाला आहे. सामान्य माणसे परिस्थितीने गरीब असतात; परंतु मनाने खूपच श्रीमंत व आपुलकीने वागणारी असतात, याचे दर्शन घडते.

संग्राम आता बिल्डरकडे मॅनेजर होतो. त्याच्या कामाचे, जीवनप्रवासाचे स्वरूप बदलते. कष्टाच्या जोरावर त्याचा प्रवास उत्कर्षाच्या दिशेने होतो. तेथेही तो प्रामाणिकपणे कष्ट करतो, दिलेले काम चोखपणे बजावतो. बांधकाम व्यवसाय, तेथे येणारे ग्राहक, कामगार यांच्या मानसिकतेचे मार्मिक चित्रण येते. हा भाग वाचनीय झाला आहे. मुंबईत पैसा मिळतो; परंतु संग्रामला समाधान वाटत नाही. गावाच्या मातीची ओढ लागते. शेवटी नऊ हजार रुपये घेऊन तो गावाकडे येतो.

गावातील महादूचे बैल चारशे रुपयांना विकत घेतो. आपले घर डागडुजी करून नव्याने उभे करतो. गावातील नारायण देसाईचे दहा एकर शेत बटईने करतो. गावपरिसरातील लोक त्याला वचकून राहतात. आपण कुणाचं वाईट केलं नाही. आपल्या भावाचा बदला म्हणून खून केला, यात आपले काही चूक नाही, असे त्याला मनोमन वाटत राहते.

संग्राम प्रचंड मेहनतीने शेती करतो. गावातील विविध कारणांनी अडलेल्या माणसांना आपल्या क्षमतेप्रमाणे आर्थिक मदत करतो. त्यामुळे माणसे पुन्हा जोडली जातात. एवढेच नव्हे तर ती कृतज्ञता म्हणून संग्रामच्या बाजूने उभी राहतात. त्यामुळे हळूहळू गावात त्याची प्रतिष्ठा वाढत जाते. ‘आयास’च्या बळावर संग्राम गावात मूळ धरू लागतो. गावातल्या प्रकाश देसाईच्या मुलीचा विवाह ठरतो. त्याला पैशाची गरज भासते. तो शेती विकायला काढतो. किसन पाटलाच्या मध्यस्थीने संग्राम ती दोन एकर शेती विकत घेतो. संग्राम कष्टाळू, दयाळू, मेहनती व इमानदार असल्यामुळे त्याला यश मिळत जाते. यशाची मूळे ही ‘आयास’मध्ये असतात, याचे महत्त्वपूर्ण सूचन या कादंबरीतून अभिव्यक्त होत जाते.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

माणूस जीवनाची नेमकी दिशा पकडून स्वार्थापेक्षा सत्य महत्त्वाचे मानतो, तेव्हा संघर्षमय, अभावग्रस्त जीवनप्रवासाचा मार्ग उत्थानाच्या दिशेने सरकत जातो. कलाकृतीतून अशा स्वरूपाचे जीवनभाष्य करण्यासाठी लेखकाला समाजजीवनाच्या अंतरंगात उतरावे लागते. ती खोली या कादंबरीत दिसते. शेवटी संग्राम शेतकरी आंदोलन, आरळी बंधारा आंदोलनात सहभागी होतो. शेतकऱ्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही त्याची अपेक्षा असते.

या कादंबरीत संग्रामच्या खडतर, पण प्रेरणादायी जीवनाचा प्रवास शब्दबद्ध झाला आहे. कष्ट, परिश्रम करणारी व्यक्तीच काळावर आपली नाममुद्रा उमटवत असते, हा संदेशही यातून प्रतीत झाला आहे. या कादंबरीतील संवादाची भाषा मराठी, कानडी, तेलगू, हिंदी आहे. तेलगू, कानडीच्या प्रभावातून आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण मराठवाडा बोलीचेही दर्शन घडते. त्याचबरोबर लेखकाच्या बहुभाषिकतेचा प्रत्ययही लक्ष वेधून घेणारा आहे.

माणसाच्या वाळवंटी आयुष्याचे प्रचंड मेहनतीने व इमादारीने नंदनवन करता येते, हा विचार या कादंबरीतून प्रकट झाला आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......