अजूनकाही
प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांची ‘शेवटची लाओग्राफिया’ ही नवी कादंबरी रविवारी, २८ ऑगस्ट २०२२ रोजी प्रकाशित होत आहे. या कादंबरीला साहित्यिक साईनाथ पाचारणे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
‘पिपिलिका मुक्तिधाम’ या आपल्या पहिल्याच प्रयोगशील कादंबरीने चर्चेत आलेले प्रा.डॉ. बाळासाहेब लबडे यांची ‘शेवटची लाओग्राफिया’ ही नवी कादंबरी. या कादंबरीतून भूत- प्रेत- योनी यांचा समाजमनावर असलेल्या प्रभावाच्या आधारे एक गूढ तत्त्वज्ञान मांडणारे आत्मनिवेदन रेखाटले आहे. त्यासाठी त्यांनी लोककथेचा आधार घेतला आहे. ग्रीक लोककथेतील पंख आणि खूर असलेला घोडा नायकाच्या स्वप्नात येतो, अशी या कादंबरीची सुरुवात आहे, तर परोपकारी राक्षसाच्या दंतकथेने कादंबरीचा शेवट होतो.
लाओग्राफिया म्हणजे लोककथा. ही लोककथासुद्धा अपूर्ण आणि शेवटची आहे, असे लेखकाचे मत आहे. कादंबरीमध्ये नाव नसलेल्या एका आगंतुक पात्राच्या तोंडून एक आत्मकथन सांगितले आहे. हे पात्र सर्व काळात फिरणारे आहे. ते कधी चातुर्यकथा होऊन येते, कधी वीरकथा, कधी गूढ कथा होते, तर कधी लोककथा. सांस्कृतिक आशय असलेले आणि मौखिक परंपरेने जतन केलेले हे पात्र जगभर कथन करत फिरते. भुतातून राक्षसात आणि राक्षसातून भुतात परावर्तित होणारे हे पात्र लोककथा रचत जाते. या आगंतुक पात्राच्या तोंडून सांगितल्या जाणाऱ्या लोककथेचा आधार घेतला आहे. कारण लोकसाहित्याची छाती इतकी मजबूत आणि परंपरागत असते की, समोर आलेल्या परिवर्तनाची पर्वा न करता ती पुढे चालत राहते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
खरं म्हणजे भाषा, संस्कृती, समाज यांची गतिशीलता पहायची असेल, तर लोकजीवनाला शरण गेले पाहिजे. लोककथेच्या प्रवाहाबरोबर वाहत राहिले पाहिजे. कोणत्याही समाजाचा संवेदनात्मक अनुभूतीचा विकास लोकसंस्कृतीशिवाय होऊ शकत नाही, याची जाणीव असल्यामुळेही लेखकाने लोककथेचा आधार घेतला असावा.
‘पिंगळ्याच्या डोळ्यात सजूनी
रात कधीची रडते आहे
स्वप्नांची दुनिया
घोडा होऊन पळते आहे’
असे म्हणत शिक्षणासाठी विद्येच्या माहेर घरात प्रवेश करणारा नायक वसतिगृहात राहू लागतो. तिथं त्याला अनेक मित्र भेटतात. ते महिन्यात एक संमेलन घेतात. या वेळी प्रत्येक जण आपल्याला आलेल्या भूत- प्रेत- योनी यांचे अनुभव कथन करतो. ते वाचताना असे जाणवते की, समाजमनावर लोकसंस्कृतीचा फार मोठा प्रभाव अजूनही जिवंत आहे आणि समाज मोठ्या प्रमाणावर भय-भीतीच्या नीतीखाली दडपून आहे. आपल्या काळात निर्माण होणारी मिथके, कथानके, रूढी आणि अतिधारणांना आत्मसात करून त्या पसरवण्याचे आणि संरक्षित करण्याचे काम लोकसंस्कृतीत अजूनही टिकून आहे.
मानवी नेणीव आणि सामूहिक मनोव्यापाराचे चित्रण असलेल्या या कादंबरीत कल्पकतापूर्ण अमानवी जीवनाचा अनुभवार्थ वास्तवाच्या अंगाने फॅन्टसीरूप आणि अतिंद्रिय वाटणाऱ्या लोकसंस्कृतीचे बहुरंगी पदर उलगडत नेण्याचाही प्रयत्न केला आहे.
वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या नायकाला जे मित्र भेटतात, तेही अतिंद्रिय शक्ती असलेले असतात. कॅन्टीन पुढच्या वडाच्या झाडावर असलेले भूत असो किंवा कुत्रा खाणारा तोमंग्या असो, अशा गूढ वास्तवाच्या चित्रणाने लेखक थरार निर्माण केला आहे.
या कादंबरीत लोकसंस्कृतीचा शोध घेऊ पाहत असलेले प्रा. बाळासाहेब लबडे सामाजिक पर्यावरण, सामाजिक स्थिती, सामाजिकता, राजकारण आणि भूत- प्रेत- योनी यावर तत्त्वचिंतनात्मक भाष्य करतात.
प्रसिद्ध गूढ कथाकार रत्नाकर मतकरी यांनी म्हटले आहे- “गूढकथा म्हणजे घाबरवणारी किंवा संभ्रमात टाकणारी गोष्ट नसून जीवनावर भाष्य करणारी एक वेगळी शैली आहे. ही शैली व्यक्तीपुरती मर्यादित असत नाही, तर प्रत्येक समाजाची स्वतःची एक जीवनशैली असते.”
या कादंबरीतून दिसणारा सामाजिक दृष्टिकोन याच प्रकारातला आहे. ही कादंबरी निव्वळ गूढ सामाजिक वातावरण तयार करत नाही, तर भूत- प्रेत- योनी यांचा समाजमनावर असलेला पगडा, समाजातील अंधश्रद्धा, अतिंद्रिय शक्ती आणि पर्यावरण, या चार अपरिहार्य विभागातून प्रेरणा घेऊन लिहिलेली आणि गूढतेला दुय्यम स्थान देऊन मानवतेचा तत्वचिंतनातमक आशय उभा करणारी आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”
हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
या कादंबरीत लेखकाने आपल्या कल्पनाशक्तीला मुक्तपणे संचार करू दिला आहे. लेखकाला अद्भुत वाटणाऱ्या शक्ती, बेलगाम आणि प्रतिबंधित कल्पनांमुळे आल्या आहेत. त्यांनी जादुई आणि शानदार शक्तीच्या कल्पना पाहिल्या आहेत. लेखक कपोलकल्पित रचनेकडे आणि त्यातून मिळणाऱ्या मनोरंजनाकडे आणि चमत्काराकडे आकर्षित झाला आहे. त्यातून साहसी आणि असाधारण वाटणाऱ्या भावभावनांची उत्पत्ती केली आहे. त्याचा पाया वास्तवाचा आहे.
अलौकिक रहस्य आणि रोमांचित करणारी कादंबरी सगळ्याच वयोगटातील लोकांना आवडते. परंतु ही कादंबरी आपल्या कथाशैलीने वाचकांच्या रुची आणि कल्पनाशैलीला बांधून टाकेल, असे वाटते. एक म्हणजे ही कादंबरी वास्तवाला धरून आहे. यातील सर्व शक्यताकुणाहीसोबत घडू शकतात. आणि दुसरं म्हणजे यातील कुतूहल वाचकांना शेवटपर्यंत रहस्य उलगडण्यासाठी अनुमान आणि उत्तरे शोधायला मजबूर करतात.
पृथक आणि सामूहिक अशा दोन स्वरूपात प्रकट झालेली या कलाकृतीची भाषाशैली वाचकांच्या मनावर आशयाचे उत्कृष्टपणे संस्करण करते. त्यामुळे मनोसंस्कारानुसार प्रत्येक वाचक या साहित्यकृतीवर वेगवेगळी प्रतिक्रिया देतील.
कोणत्याही कलाकृतीची ताकद आणि लोकप्रियतेचे प्रतिमान हेच असते की, ती किती लोकांकडून किती वेळा आणि किती काळ ऐकवली जाते. त्यादृष्टीने ही लाओग्राआफिया शेवटची ठरू शकत नाही.
सर्जनशीलता, कलात्मकता, वास्तवता, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, जीवनाचे वेगळे पैलू रेखाटण्यात ही कादंबरी यशस्वी झाली आहे. अशा या आगळ्यावेगळ्या सर्जनशील कादंबरीचे जाणकार वाचक स्वागत करतील, अशी खात्री वाटते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment