अजूनकाही
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या जीवन आणि कार्याचा बहुआयामी वेध घेणारा ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य’ हा डॉ. अंजली सोमण यांनी संपादित केलेला ग्रंथ कॉन्टिनेन्टल प्रकाशनातर्फे प्रकाशित होतोय. येत्या २१ ऑगस्ट २०२२ रोजी गांधीभवन कोथरुड, पुणे येथे समारंभपूर्वक प्रकाशित होत असलेल्या या ग्रंथामागची संपादक सोमण यांची ही भूमिका...
.................................................................................................................................................................
ग्रंथाच्या शीर्षकात डॉ. कुमार सप्तर्षी यांचा उल्लेख ‘बहुआयामी परिवर्तन प्रेरणा’ या विशेषणाने केला आहे. डॉ. सतर्षी यांचे व्यक्तिमत्त्व आहेच बहुआयामी आणि समाजाच्या समग्र परिवर्तनाच्या ध्यासाने भारलेले. मा. जयप्रकाश नारायण हे त्यांचे सामाजिक कार्यातील गुरू. त्यांनी तरुणाईसमोर ‘संपूर्ण क्रांती’ची संकल्पना मांडली. डॉक्टरांचा जीवनप्रवास आणि कार्य याच वाटेवरून चालू आहे..
२१ ऑगस्ट २०२१ला डॉक्टरांनी ८१व्या वर्षात पदार्पण केले. यानंतर ‘गांधी भवन’चे सचिव अन्वर राजन, युक्रांदचा कार्यवाह संदीप बर्वे आणि ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाची प्रतिनिधी म्हणून मी एकत्र भेटलो, तेव्हा तिघांनी एकच विचार बोलून दाखवला. ‘डॉ.कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य' या नावाने एक ग्रंथ काढण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांनी आजवर जे जे काम केले, ते नेमकेपणाने अद्याप नोंदवले गेले नाही. त्यांनी आपल्या लेखांतून, पुस्तकांतून त्याविषयी लिहिले असेल, इतकेच. त्यांच्या कामाचे तपशीलवार दस्तऐवजीकरण व्हावे, असे आम्हाला वाटले. डॉक्टरांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा आहे. अनेक महत्त्वाच्या व्यक्ती त्यांना ओळखतात. काही त्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यांनी दिशा दिली, घडवले अशा कार्यकर्त्यांची संख्या तर खूपच मोठी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हे सारे जण राहतात. 'व्यक्ती' म्हणून त्यांना डॉक्टरांविषयी काय वाटते, हेही या ग्रंथात आले पाहिजे. अशी आमची एक भूमिका होती. संघर्षात्मक कार्यापासून रचनात्मक कामापर्यंत विविध क्षेत्रांत डॉक्टरांचे महत्त्वाचे योगदान आहे. ते या ग्रंथाद्वारे मांडावे, अशी दुसरी भूमिका होती. बिंदूंमध्ये सिंधू साठवण्याचा हा खटाटोप आहे, याची आम्हाला जाणीव आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
सप्टेंबर २०२१मध्ये पुस्तकाची पूर्वतयारी सुरू झाली. डॉक्टर जेव्हा ७५ वर्ष झाले, तेव्हा 'सत्याग्रही’च्या टीमने त्यांच्यावर एक गौरवांक काढला होता. या अमृत महोत्सव अंकात व्यक्ती म्हणून डॉक्टरांविषयी काही जणांनी लिहिले होते. पुस्तकासाठी या सर्वांशी पुन्हा एका संपर्क केला गेला. त्यांना मूळ लेखात आवश्यक ती भर घालण्यास सांगितले. या प्रमाणे काही सुधारित लेख आमच्या हाती आले. काही लेख डॉक्टरांच्या परिचयातील व्यक्तींकडून आणि काही कार्यकर्त्यांकडून पुस्तकासाठी मुद्दाम लिहून घेतले. या लेखात डॉक्टरांचे व्यक्तिविशेष, त्यांचा स्वभाव आणि धारणा शब्दांकित झालेल्या आहेत.
डॉक्टरांच्या कार्याविषयी त्यांच्या परिवारातील व्यक्तीकडूनही आम्ही लेख लिहून घेतले. डॉ. उर्मिला सप्तर्षी या डॉक्टरांच्या पत्नी. त्यांच्या साहसामागे आणि त्यांच्या विविध उपक्रमांमागे त्या ठामपणे उभ्या असतात. याबरोबर युक्रांदच्या आरंभकाळापासून त्या डॉक्टरांच्या सहकारीसुद्धा आहेत. कार्यकर्त्यांच्या परिवाराला त्या दीदी बनून सांभाळून घेतात. युक्रांदच्या पहिल्या पर्वाविषयी त्यांनी या पुस्तकात विस्तृत लेख लिहिला आहे. डॉक्टरांचे धाकटे बंधू आणि ‘भारतीय समाज विकास संशोधन संस्थे’तील त्यांचे सहकारी प्रा. प्रवीण सप्तर्षी यांनी त्यांच्या लेखात खेड (नगर) येथील डॉक्टरांच्या विधायक कार्याचा सर्वांगीण आढावा घेतला आहे.
युक्रांदची पुर्नस्थापना २००१ साली झाली. विशी-पंचविशीच्या तरुण कार्यकर्त्यांना सोबत घेऊन डॉक्टर समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी पुन्हा उभे ठाकले. आता काळ बदल होता. जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण सुरू झाले होते. भांडवलशाहीचा विस्तार होऊन राजसत्ता तिच्या विळख्यात सापडू लागली होती. सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण होत होते. समाजमानसही बदलू लागले होते. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणारा भाजप २०१४ सालापासून केंद्रात सत्तेवर आल्यामुळे आता धर्माचे गारुड प्रयत्नपूर्वक समाजावर पसरवले जात आहे. मध्यमवर्ग आता ४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तो सुखलोलुप, व्यक्तिकेंद्री. खरेदीचे व्यसन लागलेला झाला आहे. संघर्ष करून हक्क मिळवण्याऐवजी पैसे देऊन मार्ग काढण्याची मध्यमवर्गीय तरुणांची आणि प्रौढांची मनोवृत्ती झाली आहे. हा वर्ग साचलेल्या डबक्यासारखा उन्मेष हरवून बसला आहे. या काळात पहिल्या युक्रांदसारखी आंदोलने उभी राहणे कठीण होते. तरीही न्याय हक्कासाठी लढा देणे नव्या युक्रांदने सुरू ठेवले आहे. न्यू कोपरे गावातील विकसकाविरुद्धचा संघर्ष हे या पद्धतीचे उदाहरण आहे. डॉ. सप्तर्षी यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षात्मक आणि रचनात्मक कार्य युक्रांदचे तरुण कार्यकर्ते करत आहेत. नव्या युक्रांदचे सचिव संदीप बर्वे यांनी आपल्या लेखात याची तपशीलवार मांडणी केली आहे.
महात्मा गांधींच्या नावाने पुनीत झालेली 'गांधी भवन' ही पुण्यातील एक वास्तू. डॉ. सप्तर्षी २००६ साली ‘महाराष्ट्र गांधी स्मारक निधी’चे अध्यक्ष झाले. १९४८ मध्ये महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद हे त्यांचे सहकारी विलक्षण अस्वस्थ झाले. गांधी विचार टिकून राहावा म्हणून त्यांनी 'गांधी स्मारक निधी' या संस्थेची दिल्ली येथे स्थापना केली. नंतर विविध राज्यातील संस्था स्वायत्त झाल्या. मामासाहेब देवगिरीकर हे महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे पहिले अध्यक्ष. त्यांच्यानतर बाळासाहेब भारदे निधीचे अध्यक्ष झाले. आपल्या कार्यकाळात दोघांनीही अनेक गांधीवादी कार्यक्रम राज्यात राबवले. बाळासाहेब शेवटची पाच वर्षे आजारी होते. या काळात ही संस्था आर्थिकदृष्टया डबघाईला आली. मृत्यूपूर्वी बाळासाहेबांनी डॉक्टरांना संस्थेचे सचिव केले. पुढे डॉक्टर संस्थेचे अध्यक्ष झाले. डॉक्टरांनी संस्थेचा डोलारा अतिशय कुशलतेनं साभाळला. अनेक उपक्रम सुरू करून संस्थेला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले. या साऱ्याचा सचिव म्हणून लेखाजोखा अन्वर राजन यांनी गांधी भवनवरील लेखात घेतला आहे.
डॉक्टर १९७८ साली अहमदनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. या काळात नगर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पुलोद सरकारच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग होता. जनता पक्षाचे नगर जिल्हा पक्षाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम तेसे. राजकीय जाणीव देऊन कार्यकर्त्यांना घडवणे आणि समाजाला दिशा देणे हा राजकारणाचाच एक व्यापक भाग आहे. डॉक्टराचे हे कार्य तर सतत चालू असते. त्यांच्या राजकीय प्रवासाचा मागोवा युक्रांदमधील त्यांचे साथी रविंद्र धनक यांनी घेतला आहे,
‘सत्याग्रही विचारधारा’ या मासिकाची सुरुवात डॉ. सप्तषींनी १९९२ साली २६ जानेवारी रोजी केली. 'सत्याग्रही'ने नियतकालिकांच्या इतिहासात स्वतःचे असे स्थान निर्माण केले आहे. जातिधर्म-निरपेक्ष भूमिका आणि शोषितांना, अन्यायपीडितांना न्याय मिळवून देणे, ही डॉक्टरांची जीवनधारणा आहे. 'सत्याग्रही'ची निर्मिती याच धारणेतून झाली. गेल्या ३० वर्षात राजकीय, सामाजिक, आर्थिक प्रश्नांवर असंख्य लेख 'सत्याग्रहीत' प्रसिद्ध झाले, तेही याच धारणेतून. राजकीय-सामाजिक घटनांवर भाष्य करणारे डॉक्टरांचे अग्रलेख हे 'सत्याग्रही'तील मानाचे पान. ‘सत्याग्रही’त साहित्याचाही समावेश आहे. या साऱ्याचे समालोचन 'सत्याग्रही'वरील एका लेखात समाविष्ट करणे शक्यच नव्हते. त्यामुळे डॉक्टरांची संपादक म्हणून असलेली भूमिका सहसंपादकांनी मांडावी असे ठरले. 'सत्याग्रही'वरील लेख एवढयापुरताच मर्यादित केला आहे.
.................................................................................................................................................................
ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत” हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...
पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
'येरवडा विद्यापीठातील दिवस','व्यक्तिरंग (मी पाहिलेले)' अशा दर्जेदार साहित्यकृतींची निर्मिती डॉक्टरांनी केली आहे. त्यांच्या लेखनातही त्यांची भूमिका वर उल्लेखिल्याप्रमाणेच आहे. डॉक्टरांची विचारसरणी त्यांच्या सर्वच लेखनातून झळझळीतपणे स्पष्ट होते. त्यांचे साहित्यगुण विस्ताराने मांडणारा एक लेख साहित्य व्यवहाराशी माझा निकटचा संबंध असल्यामुळे मी लिहिला आहे.
डॉक्टरांना ओळखणाऱ्या आणि मानणाऱ्या अनेक व्यक्ती आणि कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. त्यापैकी कित्येकांना डॉक्टरांबद्दल काही सांगावे किंवा लिहावे असे निश्चित वाटत असणार. या सर्वापर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही, ही आमची मर्यादा आहे.
समाजपरिवर्तन हे डॉक्टरांच्या जीवनातील एकमात्र ध्येय होते. त्यासाठी ते अथक प्रयत्न करत राहिले आणि आजही करत आहेत. हा ग्रंथ म्हणजे त्यांना आम्ही केलेला सलाम आहे. आपल्या भूमिकेशी डॉक्टरांनी कधीच तडजोड केली नाही. मिंधेपणा स्वीकारला नाही. त्यांनी केलेल्या सामाजिक-राजकीय कामाचा पट खूप विस्तीर्ण आहे. या पुस्तकातून तो उभा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. संघर्ष केव्हा करायचा, निर्भय कसे बनायचे, समन्वय केव्हा साधायचा आणि अडचणींना तोंड कसे द्यायचे, हे सारे यातून नव्या कार्यकर्त्यांच्या नजरेसमोर येईल. 'बिंदू होतो... अथांग झालो' या लेखात डॉक्टरांनी हे सारे सूत्रबद्ध पण काव्यात्म-चिंतनशील पद्धतीने मांडले आहे.
'डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य' या ग्रंथाला वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, याची आम्हाला खात्री वाटते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment