‘जय हिंद प्रकाशना’चे संस्थापक ग. का. रायकर यांनी ‘झेंडावंदन’ ही पुस्तिका ऑगस्ट १९६२मध्ये प्रकाशित केली होती. तिचे नुकतेच स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा(१५ ऑगस्ट २०२२)च्या निमित्ताने पुनर्प्रकाशन करण्यात आले आहे. या पुस्तिकेत राष्ट्रध्वजाचा इतिहास, राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतची आचारसंहिता, झेंडा गीत, राष्ट्रगीत, झेंडा वंदनाच्या पद्धती-नियम यांची माहिती दिलेली आहे. या पुस्तकातला राष्ट्रध्वज - तिंरगा याबाबतचा हा संपादित अंश...
.................................................................................................................................................................
इतिहास
फार प्राचीन काळी आजच्याप्रमाणे आपला भारत देश स्वतंत्र होता, त्या वेळी देशातील स्वतंत्र राष्ट्रांचे ध्वज डौलाने फडकत होते. रामराज्याच्या वेळी किंवा पांडवांच्या काळी त्यांचे विजयध्वज फडकत असले पाहिजेत. मराठ्यांचा भगवा झेंडा एकेकाळी अटकेपार गेला होता. परंतु हिंदुस्थानांत ब्रिटिशांचे साम्राज्य सुरू झाल्यापासून स्वतंत्र भारतीय ध्वजाची कल्पनाच समूळ नष्ट झाली. निरनिराळ्या साम्राज्यनाशाबरोबर त्यांचे ध्वजही नाहीसे होऊन, त्यांची जागा ‘युनियन जॅक’ने पटकाविली. युनियन जॅकने देशात एकतंत्री राज्य प्रस्थापित केले, पण त्याबरोबरच परकीय राजसत्तेची म्हणजेच स्वकीयांच्या गुलामगिरीची ती निशाणी आहे, याची हिंदी जनतेला अत्यंत प्रखरपणे त्याच युनियन जॅकने जाणीव करून दिली. ही जाणीव म्हणजेच बंडखोरीच्या भावनेच्या बीजाला फुटलेला पहिला अंकुर होय!
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय सभेचा जन्म झाला. या राष्ट्रीय सभेच्या पहिल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत प्रागतिक पक्षाचे प्राबल्य असल्यामुळे, त्या वेळच्या राष्ट्रीय सभेच्या आकांक्षादेखील राज्य कारभारातील किरकोळ सुधारणांच्या मागणीपलीकडे नव्हत्या. राष्ट्रीय सभेच्या या अवस्थेत ‘राष्ट्रध्वज’ ही कल्पनाच कुणाला सुचली नाही. इतकेच नव्हे, तर जहाल पक्षाने राष्ट्रीय सभा काबीज केल्यावरही, काही काळ म्हणजे सुमारे १९२० सालपर्यंत राष्ट्रीय सभेचा मंडपदेखील युनियन जॅकनेच सुशोभित केला जाई.
राष्ट्रीय सभेने ‘स्वराज्य’ शब्दाची घोषणा केल्याबरोबर आपणाला स्वराज्य पाहिजे, तर स्वराज्याचे निशाणही असले पाहिजे, ही कल्पना आपल्या देशवासीयांच्या मनात रुजू लागली. ‘युनियन जॅक’ हे निशाण ब्रिटिशांचे होते. त्यांनी त्यात, आपल्या भावनेप्रमाणे व कल्पनेप्रमाणे रंगाच्या पट्टया बसवलेल्या होत्या. भारतीयांच्या ‘ध्वजा’संबंधींच्या राष्ट्रीय आकांक्षा पूर्ण करण्याजोगे त्या ध्वजात काही नव्हते. युनियन जॅकला राज्यकर्त्यांच्या दृष्टीने कितीही महत्त्व असले तरी जागृत झालेल्या भारतीयांच्या दृष्टीने त्यास स्वतंत्र राष्ट्रीय ध्वजाचे महत्त्व येणे शक्य नव्हते.
राष्ट्रध्वजाची पहिली कल्पना
इंग्लंडमध्ये असलेले काही क्रांतिकारक हिंदी तरुण लंडनमधील ‘इंडिया हाऊस’मध्ये रात्रीच्या वेळी एकत्र जमत असत. तेथे ते एका खोलीमध्ये शेगडीभोवती बसून अफीमाप्रमाणे मनात स्वराज्याचे मनोरे बांधत असत. भावी स्वराज्याचे निशाण कसे असावे, यावरही त्यांची चर्चा होत असे.
पाश्चात्त्य लोक ‘हिंदी राष्ट्राचा ध्वज कसा आहे?’ असा प्रश्न त्यांना वारंवार विचारत. त्या वेळी या तरुणांना लज्जेने मान खाली घालण्याचा प्रसंग येई! या मानसिक टोचणीमुळे या तरुणांनी हिंदी राष्ट्राचाही एक स्वतंत्र ध्वज असणे आवश्यक आहे, असे ठरविले व आपल्या कल्पनेप्रमाणे एक ‘हिंदी राष्ट्रध्वज’ तयारही केला.
हा राष्ट्रध्वज १९०६मध्ये तयार करण्यात आला. तो आजच्या राष्ट्रध्वजासारखाच तिरंगी होता. खालची पट्टी हिरवी, मधली पांढरी व वरची भगव्या रंगाची होती. हिरवा रंग यश व बलसामर्थ्य यांचा निदर्शक म्हणून समजला जाई. यावच्चंद्रदिवाकरौ आमचा हिंदुस्थान स्वतंत्र राहील हे दर्शवणारी सूर्य-चंद्र यांची चिन्हे, हिरव्या पट्टीवर डाव्या बाजूस सूर्य व उजव्या बाजूस चंद्र याप्रमाणे काढलेली होती. ज्याकरता शेकडो तरुणांनी आपली डोकी फोडून घेतली व फासावर लटकतानाही ज्याचा नामोच्चार केला, तो ‘वंदे मातरम’ हा राष्ट्रमंत्र मधल्या पांढऱ्या पट्टीवर लिहिलेला होता. वरच्या पट्टीवर आठ कमळांची चित्रे काढलेली असत. अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ताऱ्यांच्या रूपाने अमेरिकेच्या निशाणावर असतात. तेव्हा त्याप्रमाणे अखंड हिंदुस्थान तयार करणारे हिंदुस्थानांतल्या त्या वेळच्या परिस्थितीप्रमाणे भाषावार असे जे आठ प्रांत कल्पिले होते, त्या आठ प्रांतांची ही आठ कमळे निदर्शक होती. अमेरिकन ताऱ्यांऐवजी कमल-पुष्प हे हिंदुस्थानचे वैशिष्ट्य निदर्शक असल्यामुळे त्याची योजना योग्य होती.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
त्या वेळी जर्मनीमध्ये आंतरराष्ट्रीय समाजवाद्यांचे एक संमेलन भरावयाचे होते. प्रत्येकाने आपल्या राष्ट्राचे निशाण आणावे, असे सर्वांना कळवण्यात आले होते. श्री. हेमचंद्र दास यांनी रात्रभर जागून हे निशाण शिवून तयार केले व फ्रान्समधील क्रांतिकारकांमध्ये समाविष्ट झालेल्या मादाम कामा या पारशी स्त्रीने ते पोलक्यात लपवून जर्मनीत या संमेलनाला नेले व बर्लिनमधील प्रचंड समुदायापुढे भाषण करून, ‘वंदे मातरम’च्या गर्जनेत हा तिरंगी ध्वज फडकावला. त्या वेळी त्या म्हणाल्या – ‘स्वतंत्र हिंदुस्थानचा हा ध्वज आत्ताच जन्माला येत आहे. त्याला वंदन करा!’
त्याप्रमाणे तेथील जर्मनांनी ‘वंदे मातरम’ असे म्हणून त्या ध्वजाला अभिवादन केले आणि जर्मन राष्ट्राच्या बँडनेही त्याला सलामी दिली. हाच भारतीय राष्ट्रध्वज बनवण्याचा पहिला प्रयत्न होय!
परदेशस्थ हिंदी तरुणांनी हा राष्ट्रध्वज म्हणून तयार केला असला, तरी त्या काळच्या परिस्थितीच्या मानामुळे हिंदुस्थानात त्याचा प्रसार झाला नाही. युनियन जॅकची सवय झालेल्या हिंदी डोळ्यांना व मनाला वेगळा भारतीय ध्वज बनवणे किंवा बनलेला पाहणे, हे तत्कालीन राजनिष्ठेच्या कल्पनेला खपलेही नसेल! त्या वेळी देशाची परिस्थितीच अशी होती की, ‘वंदे मातरम’चा उच्चार करणेदेखील राजद्रोहात्मक गणले जात असे. मग अशा प्रकारचा ध्वज आपल्या देशात राजरोसपणे वावरलेला पाहावयास मिळणे कसे शक्य होणार? त्यामुळे हा ध्वज राष्ट्रध्वज म्हणून तयार झाला असला, तरी तो प्रयत्न ‘क्रांतिकारक’ या सदराखालीच गणला गेला व फसला!
राष्ट्रध्वजाचा दुसरा प्रयत्न
१९१६ सालच्या ‘इंडियन होमरूल’च्या चळवळीच्या काळात भारतीय राष्ट्रध्वज बनवण्याचा दुसरा प्रयत्न झाला. या वेळच्या काही देशभक्तांनी तांबड्या व हिरव्या रंगांच्या नऊ पट्ट्यांचे एक निशाण तयार केले. या निशाणात तांबड्या पाच व हिरव्या चार पट्ट्या सम-विषम पद्धतीने बसवल्या असून या नऊ पट्ट्यांपैकी पहिल्या पाच पट्ट्यांवर सप्तर्षिदर्शक सात तारे व वरील चार पट्ट्यांवर डाव्या बाजूस ‘युनियन जॅक’ची आकृती व उजव्या बाजूला चंद्रकोर व त्यावर तारा काढलेला असे. या नऊ पट्ट्या, देशातील प्रमुख असे नऊ राजकीय विभाग दर्शवणाऱ्या होत्या असे म्हणत. हे निशाण राष्ट्रध्वज म्हणून तयार झाले असले, तरी त्या वेळच्या चळवळीत ‘राष्ट्रध्वज’ या वस्तूस प्राधान्य देण्याचे कोणा राष्ट्रीय पुढाऱ्याच्या मनाने फारसे घेतले नाही. लोकमान्य टिळकांनी या नऊ पट्ट्यांच्या राष्ट्रध्वजाची प्रशंसा केली होती. पण इतर चळवळींच्या प्रश्नांपुढे हा राष्ट्रध्वजाचा विषय त्या वेळी कोणी फारसा धसास लावला नाही. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा हा दुसरा प्रयत्न तितकासा सफल झाला नाही.
तिरंगी राष्ट्रध्वजाची उत्पत्ती
स्वदेशीच्या चळवळीत भारताचा स्वतंत्र राष्ट्रध्वज असावा, हा विचार अनेकांचे मनात घोळावयास लागला व काहींनी त्या दृष्टीने प्रयत्न करण्यास सुरुवात केली. काही लोक निशाणांचे अनेक नमुने तयार करून, ते राष्ट्रीय सभेची पर्वणी साधून, तेथे जमलेल्या पुढाऱ्यांच्या पुढे ठेवत. पण त्यापासून निष्पत्ती अशी काहीच झाली नाही.
१९२१ साली देशात असहकाराची मोठी लाट उसळली होती. पदव्यांचा त्याग, शाळा-कॉलेज सोडणे, वकिली व कोर्ट यावर बहिष्कार, अशी प्रचंड चळवळ देशभर सुरू झाली होती. या चळवळीबरोबरच स्वतःचा ध्वज हवासा वाटणे क्रमप्राप्तच होते. अशा परिस्थितीत राष्ट्रध्वजासंबंधींच्या तिसऱ्या प्रयत्नास सुरुवात झाली. हा प्रयत्न अधिक नेटाचा होऊन तो यशस्वी झाला.
१९२१च्या मार्च महिन्यात बेजवाडा येथे भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सभेत राष्ट्रध्वज तयार करण्यासंबंधी विचार करण्यात आला. काही मंडळींनी महात्मा गांधींकडे राष्ट्रध्वजाकरता आग्रहाचे प्रयत्न सुरू केले. या वेळी खादीची चळवळ प्रामुख्याने पुढे आली होती व हातसुताच्या महत्त्वामुळे ‘चरखा’ जनतेच्या डोळ्यांसमोर उभा राहिला होता. त्यामुळे ध्वजावर चरख्याचे चित्र असावे, अशी एक कल्पना, एकाने गांधीजींना सुचवली.
देशभर फडकत राहणाऱ्या राष्ट्रध्वजावर चरखा रेखाटल्यास तो लोकांच्या डोळ्यासमोर अखंड राहणार, ही कल्पना महात्माजींना ताबडतोब पटून त्यांनी चरखांकित चिन्हाचा एक तिरंगी ध्वज तयार करवला. प्रथम हिंदू व मुसलमान यांच्या ऐक्याच्या दृष्टीने तांबडा व हिरवा असे दोनच रंग ध्वजात ठेवण्यात आले होते, पण पुढे इतर धर्मांच्या दृष्टीने पांढऱ्या रंगाची पट्टी त्यात घालण्यात आली व भारतवासीयांचा प्रमुख असा सूत काढणे हाच प्राचीन घरगुती धंदा होय, याचे दर्शक म्हणून ‘चरखा’ या चिन्हास त्यावर स्थान देण्यात आले. या ध्वजाची खालची पट्टी लाल रंगाची असून, मधली हिरव्या रंगाची व वरची पांढऱ्या रंगाची होती आणि या तीनही पट्ट्यांवर चरख्याचे चित्र पसरलेले होते. १९२१ साली अहमदाबाद येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या मंडपावर हा तिरंगी झेंडा प्रथमच फडकू लागला आणि या वेळेपासून राष्ट्रीय कार्यक्रमामधून त्याचा शिरकाव झाला.
नवा तिरंगी राष्ट्रध्वज...
१९३१ साली काँग्रेस वर्किंग कमिटीने राष्ट्रध्वजाचा प्रश्न प्रत्यक्षपणे हाती घेऊन, सात सभासदांची एक कमिटी नेमली व सर्वसंमत असा एक राष्ट्रध्वज तयार करण्याची कामगिरी या कमिटीकडे सोपवली. या कमिटीने प्रांतिक कमिट्या व अनेक राष्ट्रीय पुढारी यांचा सल्ला घेऊन एक ध्वज तयार केला. ध्वज-कमिटीने तयार केलेला हा ध्वज सबंध केशरी रंगाचा असून, त्यावर वरील डाव्या कोपऱ्यात चरख्याचे चित्र होते. परंतु कमिटीने तयार केलेला हा एकरंगी ध्वज वर्किंग कमिटीसच मूलतः पसंत पडला नाही. त्यानंतर वर्किंग कमिटीने स्वतःच हे काम हाती घेतले व विचारपूर्वक पूर्वीच्या तिरंगी ध्वजात काहीसा बदल करून नवीन राष्ट्रध्वज तयार केला. या ध्वजात वरून खाली क्रमाने केशरी, पांढरा व हिरवा असे तीन रंग असावे व मधल्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगात चरख्याचे चित्र असावे असे ठरले. पूर्वीच्या लाल रंगाच्या जागी केशरी रंग आला व रंगांच्या स्थानांची अदलाबदल करण्यात आली, एवढाच त्यात फरक करण्यात आला. ऑल इंडिया काँग्रेस कामिटीने १९३१च्या ८ ऑगस्टला मुंबई येथील बैठकीत रीतसर ठराव पास करून, वर्किंग कमिटीने तयार केलेल्या या ध्वजास मान्यता दिली. तेव्हापासून १५ ऑगस्ट १९४७पर्यंत ‘राष्ट्रध्वज’ म्हणून हा तिरंगी ध्वज फडकत होता.
राष्ट्रध्वजातील रंग
१९२१ साली महात्मा गांधींनी तिरंगी राष्ट्रध्वज बनवला होता, त्या वेळी ध्वजातील रंगाच्या पट्ट्यांच्या मुळाशी जातिविशिष्टतेची कल्पना होती. त्या वेळी देशभर उद्भवलेल्या असहकार चळवळीच्या भावनेच्या भरात ही जातिविशिष्ट कल्पना दबून राहिली असली, तरी चळवळीची लाट ओसरताच राष्ट्रध्वजातील रंग जातिविशिष्ट असल्याचा वाद उपस्थित झाला. ध्वजातील तीन रंगांनी सर्व जातींच्या लोकांचे समाधान होणे शक्य नव्हते व जातीपरत्वे रंगाच्या पट्ट्. बसवून ध्वज तयार करणे हे केवळ विचित्रच नव्हे, तर अशक्यही होते. त्यामुळे ध्वजाच्या रंगातील मूळ जातिविशिष्ट कल्पनाच नष्ट करून त्या जागी गुणविशिष्ट कल्पना बनवण्याचे कार्य हाती घेणे भाग पडले. ध्वजातील जातिविशिष्ट रंगाबद्दल पुष्कळांनी काँग्रेसकडे तक्रारी नेल्या, पण काँग्रेसने त्या वेळी रीतसर राष्ट्रध्वजाचा प्रश्नच हाती घेतलेला नसल्यामुळे त्यांचा काही उपयोग झाला नाही. परंतु १९३१ साली काँग्रसने तिरंगी राष्ट्रध्वजाला मान्यता दिली. त्याच वेळी राष्ट्रध्वजातील हे तीन रंग पुढीलप्रमाणे गुणविशिष्ट आहेत, असे जाहीर करण्यात आले-
केशरी - धैर्य व त्याग
पांढरा - सत्य आणि शांती
हिरवा - विश्वास व प्रताप
‘चरखा’ ही खूण श्रीमंत व गरीब भारतीयांना एके ठिकाणी करणारी शक्ती आहे.
नवा राष्ट्रध्वज
स्वतंत्र भारताची राज्यघटना ठरवण्यासाठी घटना समिती नेमण्यात आली होती. या घटना समितीने अशोक चक्रांकित राष्ट्रध्वजाला मान्यता दिली आहे. या नव्या राष्ट्रध्वजातील तीन रंग हे स्वातंत्र्याचे सत्य, शांतीची शुचिता व समृद्धीचे सौंदर्य व्यक्त करणारे असून, त्यावरील अशोक चक्र हा प्रगतिपर सद्धर्मपालनाचा निदर्शक आहे. प्रखर भूतकाळ आणि उज्ज्वल भविष्यकाळ, या दोन्हीकडे एकाच वेळी सर्व हिंदी जनतेचे लक्ष वेधून घेणाऱ्या या ध्वजाला वंदन करताना, स्वतंत्र हिंदी राष्ट्राचे पहिले मुख्यप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी घटना परिषदेपुढे या ध्वजाला मान्यता देणारा ठराव मांडतेवेळी जे भाषण केले, त्यात राष्ट्राच्या भावना एकनिष्ठ झालेल्या आढळतात. पं. नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, “आज मी आपल्या मान्यतेसाठी सादर केलेल्या या ध्वजामध्ये राष्ट्राच्या इतिहासातील एका लहानशा कालखंडाचा इतिहास साठवलेला आहे. पण या अल्पकालावधीतच आपण अनेक शतकांचा अनुभव घेतलेला आहे. जीवन जगण्याला महत्त्व नसून त्या जीवनातील कर्तबगारीला महत्त्व आहे. त्याचप्रमाणे राष्ट्राच्या अस्तित्वाला महत्त्व नसून, त्या राष्ट्राने कर्तबगारी काय केली याला महत्त्व आहे. आणि मी अभिमानाने सांगू शकतो की, या पंचवीस वर्षांतील हिंदुस्थानचे जीवन आणि त्याने जनतेमध्ये निर्माण केलेल्या भावना या अमर्याद महत्त्वाच्या आहेत. या कर्तबगारीने राष्ट्राचा इतिहास उज्ज्वल झाला असून परंपरेची कीर्ती वाढवली आहे. या विशाल राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या लढ्यांतील जयापजयाच्या प्रसंगाची या वेळी आठवण झाल्याखेरीज राहत नाही. विजयाच्या वेळी आम्ही याच ध्वजाकडे अभिमानाने पाहिले आहे आणि पराजयाच्या वेळीही याच ध्वजाकडे पाहून आम्ही पुन्हा स्फूर्ती मिळवली आहे. आमच्यापैकी जे अनेक सहकारी आज येथे नाहीत, त्यांनी या ध्वजाचे रक्षण केले आणि त्यांपैकी कित्येकांनी ध्वजासाठी धारातीर्थी देह ठेवतेवेळी हा ध्वज रक्षणासाठी आपल्या सहकाऱ्यांच्या हवाली केला. अखेर आज हा विजयाचा दिवस उगवला आहे. या देशावर सत्ता गाजवणाऱ्या प्रबळ साम्राज्यशाहीने आपल्या सत्तेचा शेवट करण्याचे ठरवले आहे. हा काही लहानसहान विजय नव्हे. तो आमचा उद्देश होता आणि तो आम्हाला ज्या स्वरूपात पाहिजे होता, तसा नसला तरी सफल झाला आहे. अनेक आपत्ती आपल्या सभोवती असतानासुद्धा राष्ट्राने जी सफलता मिळवली आहे, तिचे गुणगान करताना मला खेद वाटत नाही. या सफलतेने त्या स्वातंत्र्याचे निदर्शक म्हणून या ध्वजाला आज आपण मान्यता देणे योग्य आहे. खरे पाहता या ध्वजाचा स्वीकार करण्यासाठी औपचारिक ठरावाची आवश्यकता नाही. कारण जनतेने आपल्या स्वार्थत्यागाने यापूर्वीच मान्यता देऊन त्याचा स्वीकार केला आहे. हा ध्वज कोणा साम्राज्याचा, साम्राज्यशाहीचा किंवा दुसऱ्यावर वर्चस्व गाजवणाऱ्यांचा निदर्शक नाही. हा ध्वज आपल्या स्वातंत्र्याचा, त्याचप्रमाणे जे जे तो पाहतील त्या सर्वांच्या स्वातंत्र्याचा प्रतीक आहे.”
हिंदुस्थानची भावी राज्यघटना तयार करत असलेल्या घटना परिषदेने या ध्वजाला सर्व राष्ट्राच्या वतीने एकमुखाने आणि महात्मा गांधींच्या जयजयकाराने मान्यता दिली. या घटना परिषदेत सर्व जातींचे, दर्जाचे, वर्गाचे आणि संस्थानांचेही प्रतिनिधी होते. हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, शीख, वगैरे सर्व समाजांच्या प्रतिनिधींनी हा ध्वज आपल्या राष्ट्राचा, आपल्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे प्रतीक असून, त्याचे रक्षण करणे, त्याची इभ्रत राखणे व त्याची कीर्ती दिगंत पसरेल असे वर्तन करणे हे प्रत्येक हिंदी नागरिकाचे कर्तव्य आहे, असे जाहीर केले. ब्रिटिश साम्राज्यशाहीचे प्रतीक असलेला युनियन जॅक १५ ऑगस्ट रोजी खाली उतरला. तो या देशात पुन्हा कधीही अधिकाराच्या जागेवर दिसणार नाही. त्याची जागा घेणारा आपला नीलचक्रांकित तिरंगी राष्ट्रध्वज हा आपल्या भूतकाळातील सर्व राष्ट्रीय भावना आणि भविष्यकाळाबद्दलच्या सर्व आशा-आकांक्षा पूर्णपणे व्यक्त करणारा आहे.
‘झेंडावंदन’ - ग. का. रायकर
जय हिंद प्रकाशन, मुंबई
पाने - ३६
मूल्य - ६० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment