बस गावाबाहेर आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला, महानगरातून या छोट्या गावात आपण पोहोचलो. आपल्या वाट्याला हेच गाव होतं
ग्रंथनामा - झलक
गणेश आवटे
  • ‘कुरंगीपाडस’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Sat , 13 August 2022
  • ग्रंथनामा झलक कुरंगीपाडस Kurangi Padas गणेश आवटे Ganesh Awate प्राध्यापक Professor महाविद्यालय College व्यंकटेश माडगूळकर Vyankatesh Madgulkar जी. ए. कुलकर्णी G.A. Kulkarni

मराठवा्ड्यातील प्रसिद्ध कादंबरीकार गणेश आवटे यांची ‘कुरंगीपाडस’ ही नवी कादंबरी नुकतीच मैत्री पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाली आहे.

या कादंबरीविषयी प्रसिद्ध कथाकार आसाराम लोमटे ब्लर्बमध्ये म्हणतात -

“भवतालाचे सूक्ष्म निरीक्षण करण्याचे कसब आणि बोलीचा उपजत जिव्हाळा घेऊन आलेली शैली हे गणेश आवटे यांच्या कथा-कादंबऱ्यांचे विशेष आहेत. ‘चुकार’, ‘गणगोत’, ‘पानसळ’, ‘भिरूड’ या कादंबऱ्यांच्या माध्यमातून आवटे यांनी समाजवास्तवाचे असंख्य पैलू बारीकसारीक तपशिलांसह उजागर केले आहेत. सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे ओढग्रस्त जीवन, गावपातळीवरील भिन्न जात-समूहांचे परस्परसंबंध, सामाजिक ताण-तणाव, शोषित स्त्रीचे भावविश्व, माणूस आणि निसर्ग यांच्यातील नाते, अशा पापुद्रयांची उकल विलक्षण कलात्मकतेने आणि कमालीच्या तटस्थपणे आवटे यांनी त्यांच्या आजवरच्या कादंबरी लेखनातून केली आहे. ‘कुरंगीपाडस’ ही त्यांची नवी कादंबरी एका पिढीचे प्रतिनिधित्व करते.

महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर स्वतःच्या वाटा शोधणाऱ्या तरुणांची उमेदीच्या आणि उमेदवारीच्या दिवसातली धडपड या कादंबरीत अस्तित्वशोधाच्या दिशेने जाते. छोट्या खेड्यातल्या शेतकरी कुटुंबातून विद्यापीठीय वर्तुळात अध्ययनासाठी आलेला या कादंबरीचा नायक अंतर्मुख वृत्तीचा आहे. लिहिण्या-वाचण्याचे वृत्तीगांभीर्य त्याच्याकडे आहे. तत्कालीन वाङ्मयीन व्यवहाराकडे तो सजगपणे पाहतो, या व्यवस्थेतल्या अनेक विसंगती हेरतो. साधारणपणे जागतिकीकरणाने प्रवेश करण्याआधीचा हा कालखंड आहे. नव्याने लिहू लागलेल्या पिढीच्या आस्थेचे विषय, वाङ्मयीन व्यक्तिमत्त्वाची जडणघडण या बरोबरच तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक स्थिती-गतीचे दर्शनही या कादंबरीतून घडते. आवटे यांच्या आधीच्या कादंबऱ्यांप्रमाणेच ‘कुरंगीपाडस’ ही कादंबरीसुद्धा वाचकांना नक्की आवडेल.”

तर या कादंबरीतील हा एक संपादित अंश…

.................................................................................................................................................................

मुलाखत एक दिवसावर येऊन ठेपली होती. मधू पैसे जमवण्यासाठी आटापिटा करत होता. वडलांबरोबर जाऊन बराशी खोदण्याचं काम करत होता. पण बराशी खोदकामाचे आलेले पैसे रोजच्या घरखर्चात जात होते.

वडील अंगणात डोक्याला हात लावून बसले होते. काय करावं काही समजत नव्हतं.

माय म्हणाली, “कितीक पैसे लागतेन मधू?”

मधू म्हणाला, “लय लांब हे गाव. पंचवीस रुपये तरी लागतेन कमीत कमी.”

“मी मंते तसं केलं तं जमन का?”'

“काय मंतीस?”

“मह्या कानातले सोन्याचे कुडकं घाला मोडीत आन पैसे आना.”

दुसरा काही पर्याय नव्हता. वडील तयार झाले. लगेच दोघं माय-बाप मानवतला सोनाराकडं आले. सत्तर रुपयांची मोड भरली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मधू भाकर खाऊन निघाला. बसमध्ये बरीच गर्दी होती. उभं राहायलासुद्धा मोकळी जागा नव्हती.

पुढच्या स्टॉपवर एक तरुण मजूर जोडपं पोतं ढकलत आत आलं. पोत्यात भांडीकुंडी वाजत होती. मधूनं अंदाज केला, कामासाठी ते कुठं तरी बाहेर गावी निघाले असावेत. माणसाला पोटासाठी कामाचा शोध आवश्यक असतो. भाकरीसाठी भटकायचं. आपणही काम शोधायला निघालो आहोत. काम मिळेल का नाही, हे कसं सांगता येईल आताच.

पांढऱ्या पाटीची बस होती. प्रत्येक पाटीवर थांबत होती. माणसं उतरत-चढत होते. एकानं तर कोकरू आणलं होतं बगलेत. कंदूरी आहे म्हणाला तो माणूस. कंडक्टर धकवून घेतात खेड्यातल्या लोकांचे असे व्यवहार.

पुढे हळूहळू गर्दी कमी होत गेली. मधूला बसायला जागा मिळाली.

गाव जवळ आल्यावर त्यानं कॉलेजविषयी एकाला विचारलं. त्यानं गावाच्या अलीकडच्या स्टॉपवर उतरायला सांगितलं. तो उतरला. एकानं सविस्तर मार्ग सांगितला. उजव्या बाजूला चालत आल्यावर रेल्वे पटरी ओलांडून तो एका शाळेच्या आवारात आला. पुढं डांबरी रोडवरून चालत उजवीकडं वळालं की, त्याला कॉलेजची इमारत दिसली. काही इमारती डोंगराच्या कपारीला, तर काही टेकडीवर. दोन मजली दगडी बांधकाम.

आत जाऊन मधूनं चौकशी केली. समाजशास्त्राच्या मुलाखती सुरू होत्या. त्यानंतर इंग्रजी आणि नंतर इतिहास. म्हणजे बराच वेळ होता. त्यानं नळाचं पाणी पिलं. चेहऱ्यावर पाणी मारल्यावर त्याला बरं वाटलं. बेंचवर काही जण बसलेले होते. तिथं तो जाऊन बसला.

इतिहासाच्या मुलाखती सुरू झाल्या. मधूचा पाचवा नंबर होता. कागदपत्र सावरत तो आत आला. एकानं नाव-गाव-गुण विचारले.

दुसरा म्हणाला, “समजा तुम्ही विद्यार्थ्यांसमोर उभे आहात. राक्षसभुवनच्या लढाईचं वर्णन तुम्ही कसं कराल?”

मधूनं उभं राहन त्याच्या पद्धतीनं राक्षसभुवनच्या लढाईचं वर्णन केलं.

एकानं मिशीला पीळ देत विचारलं, “आसं मंतेत नुरजहां ही एवढी गोरीपान आन सकवार व्हती की, पान खाताना तिच्या गळ्यातून तांबूळ दिसायचं. ही गोष्ट खरी की खोटी?”

“हे कुणीतरी नुरजहांच्या सौंदर्याचं अतिशयोक्तीपूर्ण वर्णन केलेलं आहे.”

प्राचार्य म्हणाले, “ठीक आहे. या तुम्ही.”

मधू बस स्थानकावर आला, तेव्हा त्याला कळालं की, गावाकडं जायला गाडी सकाळी सात वाजता होती. आता काय करायचं? इथंच मुक्काम करून सकाळी सातच्या गाडीनं निघण्याशिवाय पर्याय नव्हता.

त्यानं स्वस्तातल्या स्वस्त लॉजवर विचारपूस केली. राहणं, जेवण आणि परतीचं तिकीट या खर्चाचा मेळ बसत नव्हता. पैसे कमी पडत होते.

त्याच्या मनात अंधुकसा विचार आला. आणि तो चालत गावाच्या टोकाला आला. सिद्धार्थनगर नावाची पाटी त्याला दिसली. दबकी पत्राची घरं. काही निव्वळ झोपड्या. पत्र्याच्या एका घरासमोर एक बाई उभी होती.

मधू तिला म्हणाला, “जय भीम ताई.”

“जय भीम. कसं काय येणं केलं?”

“ह्या आपल्या वस्तीत एखादी खानावळ आहे का?”

“खानावळ तं नाही या वस्तीत.”

“आपल्या मुलांचं हॉस्टेल?”

“आपल्या पोरांसाठी काही सोयी नाहीत या गावात.”

“माझ्याकडं लॉजवर राहण्यापुरते पैसे नाहीत. तुम्ही मला जेवायला दिलं तर मी तुम्हाला पैसे देईन. आणि इथंच झोपेन अंगणात.”

“कुंकडचे तुम्ही? आन इथं कशाला आलात?”

मधूनं सविस्तर माहिती सांगितली.

बाई म्हणाली, “ठीक हे. बसा या बाजावर.”

बाईनं पिठलं भाकरी करून त्याला वाढलं. मधूनं भुकेपोटी ते चवीनं खाल्लं. मधूनं मुलीच्या हातावर पाच रुपये ठेवले.

बाई म्हणाली, “आता कुठं रातचं वनवन फिरता. झोपा या बाजावर सकाळी निघा गावाकडं.”

मधू लगेच तयार झाला. खूप चालल्यामुळं त्याचे पाय दुखत होते. पटकन त्याला झोप लागली.

सकाळी बाईचा निरोप घेऊन तो निघाला.

पाचव्या दिवशी नोकरीवर रुजू होण्यासंबंधीचं पत्र त्याला मिळालं. त्याच्या घरच्यांना खूप आनंद झाला होता. आई-वडलांच्या परिश्रमाला चांगलं फळ मिळालं असं मधूला वाटलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

मुलाखतीला जायच्या आधी मराठीच्या एका प्राध्यापकांनी नामदेवला शिफारस पत्र दिलं होतं – “नामदेव पवार हे एम.ए. आणि एम.फिल.चे विद्यार्थी म्हणून मराठी विभागात होते. ते विभागातील अभ्यासू, नियमित, सद्गुणी विद्यार्थी होते. ते एक सर्जनशील कलावंत असून त्यांचे काही ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. या लेखनावरून त्यांचे समाजजीवनाचे आकलन दिसून येते. एक अभ्यासमग्न, लेखनमग्न अशा विद्यार्थ्याच्या रूपाने मला त्यांचा जो परिचय झाला, त्यावरून अध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रात ते चांगले काम करू शकतील, असा विश्वास वाटतो. त्यांच्या भावी आयुष्यात मी सुयश चिंतीतो.”

निघताना खूप घाई झाली. हे शिफारसपत्र रूमवर राहिलं. लक्षात आल्यावर त्याला खूप वाईट वाटलं.

प्राचार्य सोपान नरहरी साखरे हे मराठीतील सुप्रसिद्ध ग्रामीण लेखक. ग्रामीण साहित्य चळवळीत त्यांचा फार मोठा सहभाग होता. एकीकडं ते ग्रामीण लोकांविषयी सहानुभूतीनं लिहायचे आणि दुसरीकडं ग्रामीण लोकांची टर उडवून शहरी लोकांचं मनोरंजन करण्यात ते पटाईत होते. इतर समवयस्क लेखकांची किंवा नव्या लेखकांची ते थोडी स्तुती करायचे. पण या सगळ्यांनी आपला भरपूर स्तुती करावी, अशी त्यांची अपेक्षा असायची.

नामदेवची साखरे सरांशी ओळख होतीच. दहा वाजता तो गावात पोहोचला. कॉलेज गावाबाहेर. तो पायी तिकडं निघाला. पुलाच्या चढावर काही पोरी जोरानं पायडल दाबीत नेटानं सायकली दामटत होत्या, ओढ्याच्या दोन्ही काठावर तांबूस पिवळसर फुलांनी डवरलेली घाणेरीची दाट झार्ड होती, कॉलेजची इमारत शेतात मोकळ्या जागेवर होती, हवेशीर स्वच्छ वातावरण.

या कॉलेजात सहायक ग्रंथपाल म्हणून त्याचा मित्र दांगट होता. दादाराव होगाट कथा लिहायचा. त्याला ग्रंथालयात तो भेटला. कॅन्टीनमध्ये दांगटबरोबर चहा पिताना अजून दुसरे उमेदवार भेटले. त्यात वाघ नावाचा त्याचा मित्र होता. तो सतत मोकळा भडंग बोलायचा. आताही तो त्याच्या मित्राबरोबर या कॉलेजविषयी टिंगलटवाळी करत बसला होता.

मुलाखतीत आठवा क्रमांक नामदेवचा होता. तो आत आला. प्राचार्य सो. न. साखरे फिरत्या खुर्चीत बसलेले होते. त्यांच्या बाजूला डोक्याला कोसला पटका घातलेले अध्यक्ष आणि अजून तीन-चार जण.

नाव गाव विचारल्यावर साखरे सरांनी अध्यक्षांना माहिती दिली, “हे, मराठीतील नवोदित लेखक आहेत.” अध्यक्षांनी मान डोलावली.

साखरे नामदेवला म्हणाले, “तुमचा आवडता लेखक कोण?”

“व्यंकटेश माडगूळकर.”

“आवडत्या लेखकाविषयी काय सांगता येईल तुम्हाला?”

“लेखनाची जन्मजात देणगी मिळालेले व्यंकटेश माडगूळकर हे थोर लेखक होते. माणदेशातलं लोकमानस, निसर्गातील पशू-पक्षी, नद्या, वारा, आकाश, ध्वनी, झाडं-वेली, गंध, रंग यांना त्यांनी अस्सल बोलीभाषेतून सहजपणे प्रतिबिंबित केलं. अस्सलपणा आणि सहजता ही त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहेत.”

“ग्रामीण साहित्य आणि ग्रामीण साहित्य चळवळ यासंबंधी तुमचं मत काय? ही चळवळ कितपत यशस्वी झालेली वाटते?”

नामदेव म्हणाला, “ग्रामीण साहित्य, ग्रामीण साहित्य चळवळ असं मुळात काही नसतंच. समीक्षकांनी स्वतःच्या सोयीसाठी तयार केलेले हे शब्द आहेत. ग्रामीण साहित्य चळवळीच्या नावाखाली स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी काही लेखकांनी साहित्यात वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. ग्रामीण साहित्यिक म्हणवून घेणारा एखादा लेखक मराठी साहित्यात पहिल्या दोन क्रमांकात जाऊन बसला आहे असं कुठं दिसत नाही. ग्रामीण लेखक म्हणून शहरी लेखक तुम्हाला कुठं तरी कोपऱ्यात छोट्या जागेत रेटत दुय्यम दर्जाचं ठरवणार. ग्रामीण साहित्य हे वैशिष्ट्य दाखवण्यापुरतं ठीक आहे. पण तो हा प्रकार म्हणता येणार नाही. कुठलंही साहित्य हे आधी साहित्य असतं, असं मला वाटतं. मराठीतल्या प्रत्येक लेखकानं मराठी लेखक म्हणूनच वावरलं पाहिजे. ग्रामीण, दलित, आदिवासी अशी लेबलं लावण्याची काही गरज नाही असं मला वाटतं.”

साखरे म्हणाले, “कोणत्या समीक्षकाच्या प्रभावाखाली येऊन ही मतं तुम्ही मांडली आहेत?”

नामदेव म्हणाला, “ही माझी स्वतंत्र मतं आहेत. श्रेष्ठ साहित्य निर्मितीचा आणि चळवळीचा तसा काही संबंध नसतो. तुमची कादंबरी, शेळकेंची ‘धग’, यादवांची ‘गोतावळा’ या श्रेष्ठ कादंबऱ्या लिहिल्या गेल्या तेव्हा कुठं सुरू झाली होती ग्रामीण साहित्य चळवळ? ग्रामीण साहित्य चळवळ सुरू होण्याआधीच तुम्ही या श्रेष्ठ कादंबऱ्या लिहिल्या आहेत.”

साखरे सर म्हणाले, “ठीक आहे. या तुम्ही.”

लगेच तो बस स्थानकावर आला. बस पळत होती आणि विचारचक्र थांबत नव्हतं.

काही दिवस वाट पाहिल्यावर कळालं, वाघची तिथं निवड झाली आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

खिडकीतून सपाट प्रदेश झरझर मागे पळत जाणारा. एक-दोन पाऊस पडून गेले होते. शेतात पेरणीची कामं चाललेली होती.

एक तास झाला. बस गतिमान एका लयीत चाललेली. अचानक डावीकडून मागच्या चाकाचा खडाल खडाल आवाज येऊ लागला. एक टायरचा थोडं चिरल्यामुळे बाहेर आलेला भाग मडगार्डला घासून वाजत होता. चालकानं खाली उतरून निरीक्षण केल्यावर लगेच त्याच्या लक्षात आलं. चार-पाच किमीवर गाव होतं. तिथपर्यंत कशीतरी गाडी नेणं भाग होतं. गावात येईपर्यंत चाकाचा आवाज येतच राहिला. रस्त्यावरच चांभाराचं दुकान होतं. त्याच्यासमोर गाडी उभी करून त्याला विनंती करण्यात आली. पन्नास रुपये देतो म्हटल्यावर तो राजी झाला आणि चिरून बाहेर आलेला टायराचा भाग त्यानं रापीनं कापून काढला.

गाडी लयीत गतीनं सुरू झाली. पुढं एका स्थानकावर ते चिरलेलं टायर बदलण्यात आलं.

सकाळी दहा वाजता तो गावात पोहोचला. जिथं मुलाखती घेणार होते त्या गेस्ट हाऊसला आला.

मंत्री महोदयांची संस्था. संस्थेची दोन कॉलेजं. एक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि दुसरं तालुक्याच्या ठिकाणी. मराठी विषयाची पोस्ट तालुक्याच्या ठिकाणी होती.

काही विषयाच्या मुलाखती सुरू झाल्या होत्या. गेस्ट हाऊसच्या आवारात उमेदवारांची गर्दी झाली होती.

एक जण म्हणाला, “अध्यक्ष सध्या मंत्री आहेत. सज्जन माणूस. राजकारणात अशी माणसं दुर्मीळ असतात. कर्मचाऱ्यांना बिलकूल त्रास नाही असं म्हणतात.”

दुसरा म्हणाला, “बरं आहे की आपल्यासाठी.”

मराठीच्या मुलाखती सुरू झाल्या होत्या. बेंचावर तो बसून राहिला. नामदेवला आत बोलावलं.

आत आठेक माणसं मुलाखती घ्यायला बसलेले होते. सोफ्यावर मंत्री महोदय बसलेले होते. शांत वृत्तीचे, उंच, गोरे, बदामी रंगाच्या सफारी कपड्यात. सगळे जण त्यांचा बापूसाहेब असा उल्लेख करत होते.

चेहऱ्यावर शांत आणि उदास भाव असलेल्या एका प्राध्यापकानं प्रश्न विचारला, “तुमचा आवडता लेखक कोण?”

“व्यंकटेश माडगूळकर.”

“अजून कोणता लेखक आवडतो?”

“भालचंद नेमाडे, आनंद यादव.”

“तुम्हाला कवितेत कोण आवडतं?”

“तुकाराम, लघुपत्रिका चळवळीतले कवी.”

“जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेविषयी तुम्ही काय सांगाल?”

"जीए मराठीतील श्रेष्ठ कथाकार. नियतीशरण मानवाचं चित्र जीएंनी आपल्या कथेत मांडलं. माणूस कृती करतो, प्रयत्न करतो, त्यात त्याला यश मिळेलच असं सांगता येत नाही. तुमचं आयुष्य तुम्हाला घडवता येत नाही. तुमच आयुष्य घडवण्यात नियतीचाच हात असतो. गळ्यात साखळी बांधलेल्या कुत्र्याला जायचं असतं डावीकडं, पण मालक त्याला उजवीकडं फरफटत ओढीत नेतो. माणसाच्या आयुष्याची दोरीसुद्धा नियतीच्या हातात असते. तो जिकडं ओढीत नेईल तिकडं आपल्याला जावं लागतं. अशाच प्रकारची नियतीशरणता जीएंच्या कथेत आपल्याला पहायला मिळते.”

गुलाबरावांनी विचारलं, “सध्या काय लिहिता?”

“सध्या लेखन बंद. नोकरी शोधणं सुरू आहे.”

प्राचार्य म्हणाले, “ठीकय. कळवू तुम्हाला.”

बाहेर पडून तो थेट बस स्थानकावर आला.

पाचेक दिवस त्यानं उत्तराची वाट पाहिली.

काल प्रसाद भेटला होता. तो एका स्थानिक महाविद्यालयात रूजू झाला होता. सागरनं एका वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून काम सुरू केलं होतं. ककडे गाजरे, मुरकुटे विद्यापीठातच पुढील कोर्स करणार होते.

एके दिवशी एम.फिल.च्या प्रबंधिकेचं शेवटचं प्रकरण डिपार्टमेंटच्या कारकुनाजवळ टाईप करायला देऊन नामदेव ग्रंथालयात निघाला होता. त्याला असं कळालं होतं की, जैनपूरचे प्राचार्य नव्याने मराठी विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झालेत. एकदा मनात विचार आला, त्यांना भेटावं. मुलाखतीच्या वेळी भेटलोच होतो, आता कशाला भेटायचं? पण तिकडं त्याचे पाय वळलेच.

“नमस्कार सर.”

“अरे नामदेव, तुम्ही इथं काय करता? जैनपूरला तुमची निवड झालीय. लवकर जाऊन प्रभावतीच्या प्राचार्यांना भेटा.”

“धन्यवाद सर. लगेच निघतो मी.”

बस स्थानकावर आला तेव्हा त्याला कळालं की, दहा मिनिटांत प्रभावती बस लागणार. प्रभावतीला पोहचल्यावर प्राचार्य म्हणाले, “तुम्ही गुलाबरावांना भेटा.”

नामदेव गुलाबरावच्या गावाकडं. तिथं मुक्काम. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघं प्राचार्यांना भेटले. टाईप केलेली ऑर्डर हातात देऊन गुलाबरावांनी जैनपूरला कसं जायचं आणि कोणाला भेटायचं यासंबंधी सविस्तर सांगितलं. .

जैनपूरच्या बस स्थानकावर उतरल्यावर तो सरळ चौकात आला. खड्डे आणि धुळीनं भरलेला रस्ता. चौकातून तो डावीकडं वळाला. उजव्या बाजूला किराणाची काही दुकानं होती. धान्यांनी भरलेली टोपली. एका दुकानदाराला त्यानं विचारलं, “संदीप घाडगे कुठं राहतात ते माहीत आहे का तुम्हाला?”

“कोंच्या खात्यात हेत ते?”

“कॉलेजमध्ये प्राचार्य आहेत.”

“ह्या बाजूच्या माडीवर कॉलेजचे काही गुरूजी राहतात. त्यांना विचारा तुम्ही. ते सांगतील तुम्हाला.”

बाजूच्या माडीचा अरुंद जिना चढून नामदेव वर आला. रूममध्ये कोपऱ्यात सतरंजीवर किरकोळ देहयष्टीचे रजनीकांत मावळे बसलेले होत. विद्यापीठात त्यांच्याशी ओळख झालेली होती. त्यांनी आश्चर्यानं विचारल, “नामदेव इकडं कुंकड?”

"कॉलेजमध्ये रूजू व्हायला आलोय. प्राचार्यांचं घर कुठं आहे ते दाखवा मला.”

ते दोघं खाली उतरून एका बोळीत घुसले. प्रभारी प्राचार्य घाटगेंच्या घरी आले.

नामदेव म्हणाला, “मी नामदेव पवार. मला गुलाबरावांनी इथल्या कॉलेजमध्ये रूजू व्हायला सांगितलंय."

"आम्ही आताच आलोत कॉलेज बंद करून. तुम्ही उद्या या.”

“आजच रूजू करून घेतलं तर माझ्या सोयीचं होईल.”

शेजारच्या घरातून आवाज आला, “कोण, नामदेव का?”

“हो. मीच.”

हंबीररावांचे बंधू शेजारच्या घरात राहत होते. त्यांची नामदेवशी ओळख होती. ते या कॉलेजचे हेडक्लार्क होते. ते आले आणि घाटगेंना म्हणाले, “चला कॉलेजला जाऊ आपण.”

सगळे जण चालत कॉलेजमध्ये आले. कॉलेज सुरू होऊन दोन वर्षे झाली होती. कॉलेज मार्केट कमिटीच्या गोदामात भरवलं जात होतं.

नामदेवनं जॉइनिंग रिपोर्ट दिला. दोन दिवसांची रजा देऊन टाकली. हॉस्टेल, विद्यापीठातलं सगळं आटोपून तो येणार होता. तो सगळ्यांचा निरोप घेऊन निघाला. धुळीनं भरलेल्या रस्त्यावरून बस स्थानकाकडं. या गावातले खड्डे आणि धुळीनं भरलेले रस्ते आता त्याचे होणार होते.

काही वेळातच बस लागली. बस गावाबाहेर आल्यावर त्याच्या डोक्यात विचार आला, महानगरातून या छोट्या गावात आपण पोहोचलो. आपल्या वाट्याला हेच गाव होतं. खिडकीतून अंजिठ्याचे डोंगर सरकताना दिसत होते. गावाबरोबर गावाबाहेरचे अजिंठ्याचे डोंगरही आपल्याला नक्कीच आवडतील, असं त्याला वाटायला लागलं.

‘कुरंगी पाडस’ – गणेश आवटे

मैत्री पब्लिकेशन, पुणे

पाने – १४३

मूल्य – २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......