अन्य कुठल्याही रोगापेक्षा ‘कॅन्सर’ म्हटले की, मनात भीती दाटते. कारण त्याचे प्रकार आणि त्याचे कूळ व मूळ यावर अजून संशोधन सुरू आहे. या आजाराबद्दल सामान्य माणसाला पडणाऱ्या प्रश्नांची सरळसोप्या भाषेत उत्तरे देणारे हे पुस्तक - ‘कॅन्सर म्हणजे... डोकं फिरलेल्या पेशी’. डॉ. सतीश नाईक व डॉ. दुर्गा गाडगीळ यांनी लिहिलेलं हे पुस्तक नुकतंच ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालंय. या पुस्तकाला लेखकद्वयांनी लिहिलेलं हे प्रास्ताविकपर मनोगत...
.................................................................................................................................................................
पहिलं पान उलटण्यापूर्वी काही गोष्टींचा नीट उलगडा करून घेतला पाहिजे. पहिली बाब म्हणजे संपूर्ण पुस्तकभर आपण ‘कॅन्सर’ हाच शब्द वापरणार आहोत. याला ‘कर्करोग’ हा उत्तम मराठी प्रतिशब्द उपलब्ध आहे, पण बहुतांश वेळेला बोलताना आपण ‘कॅन्सर’ असं म्हणतो. म्हणून मराठी शब्दापेक्षा प्रचलित इंग्रजी शब्द तसाच ठेवला आहे.
दुसरं म्हणजे कॅन्सरबद्दल आपल्या शास्त्रीय संकल्पना आणि त्यानुसार केले जाणारे उपचार आता आता कुठे प्रगल्भ व्हायला लागले आहेत. या विषयातली बहुतेक प्रगती गेल्या काही दशकांतली आहे. किंबहुना गेलं दशकभर या विषयात सर्वांत अधिक हालचाली होताना दिसताहेत. रोज नवनवीन घटना घडताहेत. हा वेग प्रचंड आहे. अशा वेळी दोन अडचणी असतात. एक म्हणजे ज्ञान रोज बदलत असतं. कालची गोष्ट आज कालबाह्य झालेली असते. रोज नव्याची भर पडत असते. त्यामुळं इथं लिहिलेलं छापून येईपर्यंत त्यात बदल झालेला नसेलच, याची शाश्वती देता येत नाही. तेव्हा आपल्या डॉक्टरांशी याबद्दल संवाद असणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरं, एखादी गोष्ट जलद बदलते, तेव्हा सर्वसामान्य माणूस या बदलांविषयी अनभिज्ञ असायची शक्यता वाढते. हे सगळं सामान्य माणसांपर्यंत पोचताना दिसत नाही. आजही ‘कॅन्सर’ हा शब्दच मनात धडकी भरवतो. एखाद्याला त्याने ग्रासलं की, त्याच्या आयुष्याची दोरी जणू कमकुवत झाली, असंच आपल्याला वाटायला लागतं.
पण प्रत्येक प्रकारच्या कॅन्सरमध्ये हे खरं नसतं. मुळात कॅन्सर हा एक आजार नाही. रक्तदाब, न्यूमोनिया किंवा संधिवात अशा आजारांमध्ये एकप्रकारचा सारखेपणा असतो. त्यांची विशिष्ट आणि समान सूत्रं असतात. या आजारांची उत्पत्ती, इतिहास, शरीरात घडणारे बदल आणि होणारी परिणती याबद्दल ठासून भाकीत करता येतं. न्यूमोनियाचंच घ्या. ज्यांच्यामुळे न्यूमोनिया झालाय ते रोगजंतू कुठले हे ठरवलं आणि त्यावर रामबाण लागू पडणारं औषध दिलं की, न्यूमोनिया बरा होतो. एका इंद्रियाशी, एका इंद्रिय-समूहाशी जोडले गेलेले हे आजार. त्याविषयी इतकी भीती नाही. आताशा यकृत, मूत्रपिंड किंवा हृदयरोग यामुळे दगावणाऱ्यांची संख्या कितीतरी अधिक आहे. परंतु त्या आजारांबद्दल ऐकल्यावर आपण तितके निराश होत नाही, विचलित होत नाही. परंतु एखाद्याला कॅन्सर झाल्याचं ऐकल्यावर चुकचुकायला लागतो.
असं का, हा विचार मनात येणं साहजिक आहे. मुळात कॅन्सरविषयी लोकांना पुरेसं ज्ञान नाही. याबद्दल हवी तेवढी जनजागृती झालेली नाही. या घडीला लोकांना त्याविषयी अधिक माहिती देणं आवश्यक आहे. हे पुस्तक त्या दिशेनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे.
त्यामुळे कॅन्सरबद्दल जाणून घेताना या आजाराचे वेगवेगळे पैलू, या आजाराची व्याप्ती नीट लक्षात घेणं आवश्यक ठरतं. इतर आजारांमध्ये आणि कॅन्सरमध्ये असलेले मूलभूत फरक समजून घेऊन याची सुरुवात करता येईल.
आपण न्यूमोनियाचं उदाहरण घेतलं आहे. तेच पुढे नेऊया. न्यूमोनिया हा विशिष्ट जंतूमुळे फुप्फुसांमध्ये उद्भवलेला प्रश्न असं आपण ठामपणे सांगू शकतो. त्यावरचे उपायदेखील पक्के ठाऊक असतात. कॅन्सरचं असं नाही, तो होण्याचं एक असं कारण नाही. इतर आजारांप्रमाणे त्याला विशिष्ट लक्षणं असतातच असं नाही. न्यूमोनियात ताप, खोकला असणारच. कॅन्सरच्या बाबतीत तो पसरेपर्यंत कुठलं लक्षण दिसलं तर ती व्यक्ती सुदैवी म्हणायला हवी. कधी निदानानंतर माणसं केवळ काही महिन्यामध्ये दगावतात, तर कधी वर्षानुवर्षं झकास राहतात. म्हणजे लक्षणं, निदान, उपचार, भविष्याच्या अटकळी कशातच नेमकेपणा नाही. बऱ्याच बाबतींतली अनिश्चितता हा कॅन्सरचा मूलभूत स्वभाव झाला. पुढे ‘कॅन्सर का होतो’ या प्रकरणात आपण अधिक खोलात शिरून हे समजून घेणार आहोत. इथं वरवरची उजळणी करूया.
निदानाचंच घ्या, कॅन्सरचं नक्की निदान होतं ते त्या पेशी सूक्ष्मदर्शकाखाली नीट तपासल्यावर. म्हणजे शरीराला काहीतरी इजा करून त्या पेशी बाहेर काढणं - बायोप्सी - करणं आलं. अनुभवी डॉक्टर एखादी गाठ पाहून तो कॅन्सर असल्याचा अंदाज व्यक्त करू शकतात. परंतु निदान पक्कं करण्यासाठी सुई तरी का होईना, शरीरात घुसवणं आलं. एकंदरीत शरीराला थोडीतरी इजा करण्यावाचून गत्यंतर नसतं. न्यूमोनियासारखं बाहेरून एक्स रे काढून हे काम होणं शक्य नसतं...
आताशा कॅन्सरच्या निदानाच्या विषयात आणखी भर पडली आहे ती सूक्ष्म किंवा ‘मॉलेक्युलर’ निदानाची. शरीराच्या नॉर्मल पेशी कॅन्सरमध्ये बदलत असताना त्यांच्यात जे अतिसूक्ष्म फरक होत असतात, त्या फरकांचा वेध घेणं म्हणजे मॉलेक्युलर निदान. हे आता गरजेचं ठरू लागलं आहे. त्याशिवाय कॅन्सरचं निदान पूर्ण झालं असं म्हणता येत नाही. कारण जसजसं कॅन्सर होण्यामागचं सूक्ष्मतम कोडं उलगडत आहे, तसतसे उपचार करताना घ्यायचे काही निर्णय या सूक्ष्म अभ्यासावर अवलंबून राहायला लागले आहेत. कुठल्याही आजाराचं निदान जितकं अचूक, तितकी उपचारांची दिशादेखील नेमकी असते. अचूक निदानावरच नेमकी कुठली औषधं, कुठले उपचार लागू पडणार आहेत, याचा अंदाज बांधता येतो..
कॅन्सर या बाबतीत दुर्दैव असं की, केवळ कुठला, कुठल्या इंद्रियापासून झालेला कॅन्सर आहे, हे जाणून घेणं इतक्यावर निदानाचं काम भागत नाही. तो किती प्रगत आहे, शरीरात इतर कुठं पसरलाय का, यावर उपचारांचा बराच भाग अवलंबून असतो. यासाठी सी.टी., एम.आर.आय., पेट स्कॅन अशा चाचण्यांची कास धरावी लागते. त्यामुळे निदानच मुळात क्लिष्ट, अनेक प्रकारच्या वर्गीकरणाशिवाय पूर्ण होत नाही. न्यूमोनियाच्या बाबतीत अशा प्रकारची व्यवधानं बाळगण्याची गरज नसते. तिथं निदान बरंचसं सरळसोट असतं.
शिवाय कॅन्सरचे उपचार करताना आपण शरीरावर एकप्रकारे आक्रमणच करत असतो. चुकार, रोगी पेशी असल्या तरी त्या शरीराचा भाग असतात. त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे हल्ला करून त्या नष्ट करायच्या म्हणजे उपचार थोडे आक्रमक आले. असे एक प्रकारचे विनाश करणारे, थोडेसे अघोरी उपचार करताना ते सहन करण्याइतकी त्या पेशंटच्या शरीराची क्षमता आहे का, हे बघणं आवश्यक झालं. त्यासाठी पेशंटचं वय, कार्नोफस्की इंडेक्स वगैरे लक्षात घेतले जातात. थोडक्यात, इतर अनेक आजारांसारखं कॅन्सरचं निदान सरळसोट नाही. बरीच व्यवधानं पाळल्यावाचून तिथं निदान पूर्ण झालं असं म्हणता येत नाही.
निदानाच्या वाटेतला सगळ्यात मोठा अडसर म्हणजे कॅन्सर हा वैविध्य जपणारा प्रश्न आहे. एकाच इंद्रियापासून निर्माण झालेले कॅन्सर, व्यक्तिगणिक थोडा थोडा फरक असलेले असू शकतात. इतकंच कशाला एकाच गाठी किंवा ट्युमरमध्ये वेगवेगळ्या अवस्थेतला कॅन्सर दिसू शकतो. ट्युमरमधल्या काही पेशी नुकत्याच कॅन्सरकडे झुकलेल्या पण अजून कॅन्सरमध्ये पूर्णतः परावर्तित न झालेल्या असतील, तर काही पेशींनी कॅन्सरच्या दिशेनं मोठी मजल मारलेली असेल. एकाच ट्युमरमध्येदेखील दिसणारी पेशीपेशींमधली ही विविधता कॅन्सरला पूर्णपणे व्यक्तिसापेक्ष बनवते. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगळा विचार करायला, वेगळे उपचार करायला भाग पाडते. त्यामुळे कॅन्सरकडे पाहण्याचा एकंदर दृष्टीकोन व्यक्तिगणिक, प्रत्येक ट्युमरगणिक वेगळा हवा, ही गोष्ट अधोरेखित होते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
न्यूमोनियाचे जंतू बाहेरचे आक्रमणकर्ते असतात. पण कॅन्सरमध्ये आपल्याच पेशींनी आपल्या विरुद्ध बंड पुकारलेलं असतं. बाहेरच्या शत्रूमध्ये आणि आपल्याच मातीशी नातं सांगणाऱ्या नक्षलींमध्ये जो फरक आहे, तसंच हे. नक्षली आपल्याच देशाचे नागरिक असतात, तरीही त्यांना फोफावू देणं आपल्याला परवडत नाही. हेच कॅन्सरच्या बाबतीत खरं आहे. बिथरलेल्या नक्षलींइतकाच कॅन्सरच्या वाट चुकलेल्या, डोकं फिरलल्या पेशींचा नायनाट आपल्याला करावा लागतो.
आपल्याच पेशींचा विध्वंस करायचा म्हणजे चुकार पेशींसोबत थोड्या, चांगल्या उपयुक्त पेशीदेखील गमवाव्या लागणार हेही आलंच. चागल्या पेशींचं कमीत कमी नुकसान आणि कॅन्सरग्रस्त पेशींचं पूर्ण उच्चाटन, संपूर्ण जमलं नाही तरी जास्तीत जास्त पेशींचा विनाश करणं ही तारेवरची कसरत आहे. शिवाय विध्वंसाची आयुधंदेखील एकसारखी नाहीत. थोडक्या वेळात कॅन्सर शरीरातून काढून टाकायचा तर अनेक अंगांनी, अनेक दिशांनी त्याच्या पेशींवर हल्ला करावा लागणार हे निश्चित, म्हणजे उपचार करायच्या पद्धती आणि त्यांचे कमीअधिक परिणाम, वेगवेगळ्या तज्ज्ञांची गरज, त्यांच्यातला समन्वय हेदेखील आलंच!
हे साध्य करायचं तर उपचारांची रूपरेषा तो सुरू करण्याआधीच ठरवावी लागते, उपचारांची काटेकोर आखणी करावी लागते. याला ‘ट्रीटमेंट प्लॅन’ म्हणता येईल. पुन्हा प्रश्न आला तो हा, की आजार आणि त्याचं स्वरूप सतत बदलणारं असेल तर मग उपचार तरी सर्व पेशंटमध्ये एकसारखे कसे असतील? मग चुका होऊ नयेत यासाठी आधीच रेखून दिलेल्या विशिष्ट वाटेनं जाणं आलं. म्हणूनच कुठल्या वेळी कसं वागायचं याचे नेमके ठोकताळे नक्की करण्यात आले. याला प्रोटोकॉल म्हणतात. हे ठोकताळे जागतिक पातळीवर निश्चित करण्यात येतात. नित्य नेमाने येणाऱ्या नव्या माहितीचा आणि संशोधनाचा अंतर्भाव करूनच हे प्रोटोकॉल ठरवले जातात, नव्या संशोधनातून उपलब्ध झालेल्या माहितीप्रमाणे त्यात नित्यनियमाने बदल केले जातात. त्यामुळं जगभरच्या उपचारांमध्ये एकवाक्यता येण्यास खूपच मदत झाली आहे. कॅन्सरवर उपचार करणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचा कल सर्वांत अलीकडची आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वं पाळण्याकडे असतो.
शत्रूशी लढताना जसं अनेकांगी लढण्याची पाळी येते, एकाच वेळी जमीन, पाणी, आकाश तिन्ही मार्गांनी हल्लाबोल करावा लागतो, तसा कॅन्सरच्या पेशींवर शस्त्रक्रिया, औषधं म्हणजे किमोथेरपी आणि एक्स रे किंवा रेडिओथेरॅपी अशा अनेक बाजूंनी मारा करण्याची गरज भासते. युद्धात लागणारी सुसूत्रता इथेही तितकीच महत्त्वाची. म्हणजे वेगवेगळ्या अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना एकत्र येऊन पेशंटचे उपचार करावे लागणार, त्यासाठी एकमेकांशी सुसंवाद राखावा लागणार ही अत्यंत आवश्यक बाब झाली. पेशंटच्या स्वतःच्याच शरीराच्या काही पेशींवर हल्लाबोल करायचा असल्यानं निरोगी पेशींचं कमीत कमी नुकसान करायचं आणि तरीही कॅन्सरच्या सर्व पेशी काढून टाकायच्या ही तारेवरची मोठी कसरत असते. हे अवघड काम करायचं म्हटल्यावर सगळं सुसंवादानं व्हायला हवं.
त्यातही केवळ या तीनच तज्ज्ञांच्या सहभागावर काम आटोपत नाही. फॅमिली डॉक्टर, नर्स, औषध देणारे फार्मासिस्ट, सामाजिक कार्यकर्ते, पेशंट पुन्हा आपल्या पायावर उभा राहावा, यासाठी लागेल ती मदत करणारे फिजिओ आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट, दुर्दैवानं आजार दुर्धर झालाच तर वेदना कमी व्हावी, जिणं सुकर व्हावं म्हणून लागणारी मदत, पेशंटचं कुटुंब अशा अनेक व्यक्तींचा समावेश उपचारांच्या काळात महत्त्वाचा ठरतो. एक प्रकारे हे सांघिक काम झालं. ते सामायिक पद्धतीतच व्हायला हवं. इतर कुठल्याही आजारामध्ये इतक्या लोकांचा एकत्र सहभाग असत नाही. त्याची गरज पडत नाही.
कॅन्सर हा शरीराचा अंतर्गत शत्रू. त्यामुळं बाहेरच्या कुठल्याही गोष्टीवर उपका ठेवता येत नाही. धूम्रपान, तंबाखूचा वापर, लठ्ठपणा, घरातलं आणि बाहेरचं प्रदूषण अशा कॅन्सरला खतपाणी घालणाऱ्या बाबीदेखील आपल्याच चुकांची परिणती असते. नाही म्हणायला ह्युमन पॅपिलोमा व्हायरस यासारखे काही विषाणू आपला घात करतात. तरीही जास्त दोष स्वतःकडेच जातो. तीच गोष्ट पेशंटला खात असते. त्यामुळे कॅन्सर बरा होऊन जगणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे, हे स्पष्ट दिसूनही आपण दडपणाखाली येतो. कॅन्सर माणसाचे विचार बदलून टाकतो. पेशंटचा स्वतःकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जातो. आपलं शरीर आपला घात करत आहे, ही जाणीव पोखरून टाकणारी असते. सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे हा मानसिक कसोटी पाहणारा आजार आहे. ‘मलाच हे का झालं?’ इथपासून ‘आता शेवट अटळ आहे’ इथपर्यंत विचारांची उलघाल सुरू होते. कॅन्सर बरा झाल्यावरही पुढची कित्येक वर्षं ‘पुन्हा तर होणार नाही ना?’ या दडपणाखाली कित्येक जण जगतात. उपचार करताना या सगळ्या बाबींची दखल घ्यावी लागते. शरीराबरोबर मनालाही बरं करणं आवश्यक बनतं. थोडक्यात सांगायचं तर कॅन्सरच्या बाबतीत अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा उलगडा करणं हेदेखील या पुस्तकाचं उद्दिष्ट आहे.
सुदैवानं आज या आजाराच्या निदानात आणि उपचारात खूप प्रगती झालेली आहे. आधुनिक उपचारांनी तीनपैकी दोन रुग्ण पूर्ण बरे होतात, ही आजची वस्तुस्थिती आहे. भविष्यात प्रगतीचा वेग खूपच वाढेल अशी जोरदार चिन्हं आहेत. परंतु समाजमनाला याची कल्पना असल्याच दिसत नाही. या क्षणी सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरवर शंभर टक्के विजय मिळवता आल्याचा दावा खोटा ठरेल. परंतु बरंच काही चांगलं घडलं आहे, घडत आहे. या पुस्तकाच्या निमित्तानं ती प्रगती लोकांपर्यंत पोचावी, लोकांचं प्रबोधन व्हावं ही इच्छा हृदयात आहे.
कॅन्सर हा एक आजार नाही असं म्हटल्यानं थोडा मानसिक गोंधळ होणार हे नक्की होतं. अनेक प्रकार असलेला हा प्रश्न, मग अशा वेगवेगळ्या आजारांच्या कडबोळ्याला एकच नाव कसं? कॅन्सर नेमका आहे तरी काय? सिगारेट ओढणं हे कॅन्सरला जाणूनबुजून निमंत्रण देण्यासारखं हे आपण वाचतो. मग धूम्रपान करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर का होत नाही? आणि ज्याने आयुष्यात कधी कुठलंच व्यसन केलं नाही त्याच्या नशिबी ही बला कशी येते? मला झाला म्हणजे माझ्या मुलांनाही तो होईल का? असे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची खरी आणि प्रामाणिक उत्तरं देण्याचा प्रयत्न पुस्तकात केला आहे.
परंतू केवळ इतकंच सांगितलं तर त्याचा सामान्य माणसांना उपयोग काय? एका आजाराची थोडी माहिती इतकीच याची मर्यादा राहील. आजार असो की आणखी काही, त्याविषयी मिळालेल्या, मिळवलेल्या माहितीचा उपयोग तुम्हाआम्हाला व्हायला हवा. वाचकांना त्या माहितीचा योग्य फायदा व्हायला हवा. स्वतःला आणि इतरांना कॅन्सर होऊ नये म्हणून काय करता येईल, हे त्यांना कळायला हवं. तरीही ओळखीतल्या कोणाला हा आजार झालाच, तर त्याचं निदान लवकर होण्यापासून उपचारांमध्ये मदत करण्यापर्यंत माहिती असायला हवी, तरच हे पुस्तक खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरेल असं वाटलं. शिवाय, निदान झाल्यावर एकदम गोंधळून जाणाऱ्या माणसांना कुठं जायचं, कोणाशी संपर्क करायचा, हे समजत नाही. त्यांना मार्गदर्शक ठरतील, अशा कॅन्सरशी निगडित संघटना, व्यक्ती इत्यादींचे पत्ते वा फोन नंबर इथपर्यंत सगळं या पुस्तकात अंतर्भूत असणं गरजेचं होतं.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पुस्तकाची एकंदर रचना तीन भागांत करण्यात आलेली आहे. पहिल्या भागात कॅन्सर या विषयाचा एकंदर आढावा आहे. कॅन्सर म्हणजे काय, तो कसा होतो इथपासून सुरुवात करून त्याचं निदान, त्याबद्दलची आकडेवारी, तो न व्हावा यासाठी काय काळजी घेता येऊ शकते, ज्यांना तो होण्याची अधिक संभावना आहे असे लोक कोण, त्यांनी काय करायला हवं, निदान आणि उपचार यामध्ये कुठल्या तपासण्या महत्त्वाची भूमिका बजावतात, कुठल्या प्रकारचे उपचार उपलब्ध आहेत, ते घेताना काय अडचणी येऊ शकतात, त्या अडचणींवर मात कशी करायची, कॅन्सर बरा झाल्यावर पुढे किती आणि कुठला ‘फॉलो अप’ करायचा, याबाबत कुठं कुठं आणि कुठल्या प्रकारची मदत उपलब्ध आहे, शरीराचा एखादा भाग कापला तर लागणाऱ्या मदतीची म्हणजे फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी कुठं मिळू शकेल. याबरोबर आजाराचा मानसिक आघात कसा पचवायचा हेदेखील समजून घेणं आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. भविष्यात या आजाराच्या पेशंटच्या आयुष्यात काय काय वाढून ठेवलं आहे, याबाबत सगळं पहिल्या भागात आलेलं आहे.
दुसरा भाग थोडा विस्तृत विवेचनाकडे वळतो. प्रत्येक इंद्रियाचा आढावा घेताना त्यातले कॅन्सर, त्या त्या भागातल्या कॅन्सरची वैशिष्ट्यं याची अधिक खोलवर माहिती देण्यात आली आहे. स्तन, फुप्फुस, यकृत, आतडी, जठर, गर्भाशय, स्वादुपिंडासारखे पोटातले इतर अवयव, मेंदू, थायरॉईड आणि अन्य एंडोक्राइन संस्था, मूत्रपिंड आणि त्याच यंत्रणेशी संबंधित इतर गोष्टी, रक्त, रक्तद्रव, हाडं व स्नायू, कान-नाक-गळा अशा जवळपास प्रत्येक इंद्रियात उद्भवणाऱ्या कॅन्सरबद्दल पेशंटला आवश्यक, अशी मूलभूत माहिती देण्यात आलेली आहे. प्रत्येक ठिकाणी उद्भवणाऱ्या कॅन्सरची वैशिष्ट्यं निरनिराळी असल्यानं अशी वेगळी चूल मांडणं गरजेचं वाटलं. तेच पुस्तकाच्या दुसऱ्या भागात करण्यात आलेलं आहे. अर्थात खूप दुर्मीळ, जगात क्वचितच आढळणारे कॅन्सरचे प्रकार यात अंतर्भूत नाहीत. अशा प्रकारच्या पुस्तकाला ती मर्यादा असणार हे ओघानं आलंच.
तिसरा भाग परिशिष्टांचा. यात कॅन्सरच्या रुग्णाला उपयुक्त पत्ते, संपर्कक्रमांक वगैरे दिले गेलेत. गरज पडल्यावर उपयोगी पडेल, इथेतिथे शोधत बसावी लागणार नाही, अशी माहिती संकलित स्वरूपात देणं हा यामागचा उद्देश आहे. परिशिष्ट हा पुस्तकाचा तितकाच महत्त्वाचा भाग. पेशंटला आवश्यक परंतु पुस्तकाच्या एकंदर बाजेशी फटकून वागणाऱ्या अशा बऱ्याच बाबी आहेत. कॅन्सर झालेल्या व्यक्तीला अथवा त्यांच्या नातेवाईकाना त्या माहीत असल्याच पाहिजेत म्हणून त्या सोडून जमायचं नाही. मग त्यांना परिशिष्टाशिवाय दुसरी जागाच नव्हती. बऱ्याचदा कठल्याही पुस्तकाचा हा भाग वाचायचा राहून जातो. निदान या पस्तकाच्या बाबतीत असं होऊ नये म्हणून आधीच त्याबद्दल नमूद करावंसं वाटलं.
वैद्यकीय विषय तसा किचकट. भाषा बरीच अगम्य. सामान्य माणसाला नकळणारी. ती जशीच्या तशी मांडली गेली तर पुस्तक वाचनीय होणं अवघड होतं. साहजिकच काहीतरी वेगळं करणं, भाषा ओघवती ठेवणं ही पुस्तकाची गरज होती. मग स्वाती नावाची काल्पनिक व्यक्ती डॉक्टरांना प्रश्न विचारतेय आणि डॉक्टर तिला समजेल अशा पद्धतीत उत्तर देताहेत, हे स्वरूप वापरायचं ठरलं. प्रत्येक वेळी विषय क्लिष्ट होणार नाही हे पाहायचं, खूप खोलात शिरायचं नाही, तरीही पेशंटला आवश्यक ते सर्व त्यात यायला हवं, अशी दक्षता घ्यायची यासाठी हे आवश्यक होतं. संवादाची शैली याला समर्पक वाटली. पुस्तक त्यात किती यशस्वी झालंय, हे वाचकांनीच ठरवायचं आहे.
अर्थात या शैलीचं एक आव्हान असतं. ज्या गोष्टी माहिती म्हणून द्यायच्या असतात, त्या प्रत्येक वेळी संवादातून मांडता येतील असं नाही. काही मुद्दे संवादाच्या बाहेरचे असतात. गोष्टी महत्त्वाच्या असल्या किंवा त्यांच्याकडे वाचकांचं विशेष लक्ष वेधायचं असलं की, प्रश्न निर्माण होतो. महत्त्वाचे मुद्दे राहून जायची भीती असते. अशा वेळी चौकटी मदतीला धावून येतात. म्हणूनच पुस्तकात भरपूर चौकटी घातलेल्या आहेत.
पुस्तकात अनेक ठिकाणी योग्य त्या इंटरनेट स्थळांचा आणि उपयुक्त पत्त्यांचा समावेश आहे.
सगळ्यात शेवटी ज्या संदर्भग्रंथांचा, व्यक्तींचा आणि संस्थांचा पुस्तकातील माहिती मिळवण्यासाठी उपयोग झाला, त्यांची सूची देणं आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं गरजेचं होतं. या मंडळींचे आभार मानायचे तेवढे थोडे आहेत. त्यांच्या हातभाराशिवाय पुस्तक पूर्ण होऊच शकलं नसतं.
‘कॅन्सर म्हणजे... डोकं फिरलेल्या पेशी’ - डॉ. सतीश नाईक, डॉ. दुर्गा गाडगीळ,
ग्रंथाली, मुंबई
पाने - १८८,
मूल्य - २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment