अजूनकाही
समाजवादी नेते मधू लिमये यांचं ‘Religious bigotry - A Threat To Ordered State’ या मधू लिमये यांच्या पुस्तकाचा प्रा. वासंती दामले यांनी ‘धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. तो साधना प्रकाशनातर्फे १५ ऑगस्ट रोजी पुण्यात समारंभपूर्वक प्रकाशित होत आहे. या पुस्तकातली मधू लिमये यांची ही प्रस्तावना...
.................................................................................................................................................................
अलीकडच्या काळात मी लिहिलेल्या या लेखांचा रोख वाढता धार्मिक विद्वेष आणि त्यातून उद्भवणाऱ्या संघर्षावर आहे. जागेअभावी वृत्तपत्रे आणि नियतकालिके या माध्यमांनी केलेली लेखांच्या मजकुराची काटछाट आणि संदर्भ व तळटीपा गाळून टाकल्याने मी हे लेख पुस्तकरूपाने प्रकाशित करवण्याचे ठरवले. या सर्व लेखांच्या केंद्रस्थानी असलेला विषय हा गेल्या काही वर्षांत देशात जी धर्मांधतेची आणि असहिष्णुतेची भावना फोफावली आहे, जी लाट उसळली आहे, तो आहे. अशा फोफावलेल्या धर्मांधतेने स्वातंत्र्यानंतर बनवलेल्या आपल्या देशाच्या संविधानावर उभ्या असलेल्या भारताच्या सुनियोजित राज्यसंस्थेसमोर एक घोर संकट उभे केले आहे.
लेखसंग्रहातील पहिला विस्तृत लेख हा भारतातील हिंदू आणि मुसलमान या दोन विशाल समुदायांमधील वाढत्या धार्मिक सांप्रदायिकतेची आणि असहिष्णुतेची कारणमीमांसा करतो. या लेखाची रूपरेखा मी इंग्लंडमध्ये १९९०मध्ये झालेल्या विल्टन पार्क कॉन्फरन्समध्ये भाषण करण्यासाठी तयार केली होती. एक-दोन वर्षांनंतर तो लेख मी अधिक विस्तृत केला. त्याचे पुनर्लेखन केले. ऐतिहासिक काळापासून जगात होणाऱ्या घडामोडींचा, विशेषतः आज होणाऱ्या घडामोडींचा गैर पाश्चिमात्त्य देशांवर आणि समाजांवर (ऑर्थोडॉक्स रशियन, हिंदू आणि इस्लामी) फार मोठा परिणाम होत आहे. या घडामोडीत जागतिकीकरण, जगभर होत असलेला पाश्चिमात्त्य संस्कृतीचा रेटा, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अति वेगाने होणारे बदल, एकीकडे भोगवाद-चंगळवादाचा सुळसुळाट तर दुसरीकडे आर्थिक विषमता, बेरोजगारी व गरिबी, स्वार्थी वृत्ती, समाजापासून दुरावल्याची भावना, इत्यादींचा समावेश आहे.
अशा विविध आव्हानांना समर्थपणे पेलण्यात येणाऱ्या अडचणींमुळे या समाजामधील अनेक घटक हे धर्म, वंश, भाषा, जात, प्रदेश यांमधून व्यक्त होणाऱ्या पारंपरिक अस्मितांचा आणि ओळखीचा आसरा घेऊन आपल्या कोशात जात आहेत. यामुळे रूढीवादी आणि मूलतत्त्ववादी सांप्रदायिक मतप्रणालीच्या ते कसे आहारी जात आहेत, याचे विश्लेषण मी केले आहे.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
एका लेखात धर्माचा राजकारणाकरता दुरुपयोग करण्याविरुद्ध कायदेकानून किती उपयुक्त आहेत, याची चर्चा केली आहे. एका लेखात गोळवलकर गुरुजी आणि संघपरिवाराच्या मूलभूत श्रद्धांचे आणि गृहीतकांचे विस्तृत विश्लेषण गोळवलकरांच्या लिखाणाचा आणि मुलाखतींचा आधार घेऊन केले आहे, आणि १९८४नंतरच्या संघपरिवाराच्या धर्माधिष्ठित आक्रमक हिंदुत्वाच्या राजकारणाचा आढावा घेतला आहे. भारताचे संविधान आणि त्याच्या आधारावर उभारलेल्या देशाच्या राज्यव्यवस्थेची धर्मनिरपेक्षता/सर्वधर्मसमभाव, संसदीय लोकशाही आणि संघराज्याची संरचना ही मूलभूत तत्त्वे आहेत. भारताच्या संविधानाची ही मूलतत्त्वे संघपरिवाराला कधीही मनापासून मान्य नव्हती. त्यामुळे त्यांचे धर्माधिष्ठित विद्वेषाचे राजकारण देशाच्या राजव्यवस्थेला फार मोठा धोका निर्माण करते.
शेवटच्या प्रदीर्घ ‘तथाकथित धर्मयुद्धे’ या लेखात इतिहासकाळात शतकानुशतके युरोप, आशिया आणि भारतीय उपखंडात धर्माच्या नावावर केल्या गेलेल्या लढायांचा, हिंसेचा, रक्तपाताचा, छळवणुकीचा, भेदभावाचा, विध्वंसाचा आलेख दिला आहे. हा सर्व इतिहास आपल्याला हे शिकवतो की, धर्मांधतेच्या उन्मादाने इतर धर्मियांविरुद्ध सुरू केलेली धर्मयुद्धे शेवटी आपल्या धर्मातीलच इतर पंथीयांवर किंवा आपल्या धर्मातील इतर वंशांच्या लोकांवर उलटली आहेत. या कथित धर्मयुद्धांमुळे सामान्य जनतेला अतोनात हालअपेष्टा, हिंसा आणि विद्ध्वंसाला सामोरे जायला लागले आहे आणि यात कोणाचाही निर्णायक आणि दीर्घ काळ टिकणारा विजय झालेला नाही. धार्मिक उन्मादाने प्रेरित होऊन जीवित आणि मालमत्तेच्या हानीबरोबर एकमेकांच्या प्रार्थनास्थळांचीही बुद्धिपुरस्सर केलेली नासधूस आणि मौल्यवान सांस्कृतिक वारशाला केलेल्या अपायांनी संपूर्ण मानवसमाजाचे अपरिमित नुकसानच झाले आहे.
संघपरिवाराच्या अनुयायांनी आणि समर्थकांनी चार राज्यातील भाजप सरकारच्या मदतीने केलेला अयोध्येतील बाबरी मशिदीचा विनाश, ही भारताच्या आधुनिक इतिहासातली एक अत्यंत धक्कादायक आणि क्लेशकारक घटना होती. प्रार्थनास्थळांना अपवित्र व भ्रष्ट करणे, त्यांचा विध्वंस-विनाश करणे, ही काही भारतात पहिल्यांदा घडलेली घटना नाही. मुस्लीम आक्रमक आणि शासक भारतात येण्याच्या अगोदरही असे गैरप्रकार एतद्देशीय राजांच्या धनलोभाने आणि धार्मिक-पांथिक असहिष्णुतेच्या आणि विद्वेषाच्या भावनेमुळे घडून आले होते.
गझनीचा महमूद, सिकंदर बुतशिकन, सिकंदर लोदी, औरंगजेब इत्यादींनी मांडलेला मूर्तीभंजनाचा आणि प्रार्थनास्थळांच्या विद्ध्वंसाचा कार्यक्रम हा जुडेईक (अब्राहमिक) एकेश्वरवादी धर्मांत म्हणजे ख्रिस्ती, मुसलमान आणि यहुदी धर्मांत असलेल्या आत्यंतिक धार्मिक असहिष्णुतेचा परिपाक आहे, असा निष्कर्ष काढण्यात येतो. या प्रकारची असहिष्णुता भारतीय संस्कृती आणि परंपरेला धरून नाही. उलट अशोक, अकबर, शिवाजी, विवेकानंद आणि गांधी यांच्या सहिष्णू आणि सर्वसमावेशक विचारांत आणि आचरणांत भारतीय परंपरेचा अंतरात्मा प्रतिबिंबित होतो, असे मानले जाते.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
................................................................................................................................................................
स्वतंत्र भारताच्या संदर्भात असहिष्णू विध्वंसक वृत्तीचा उद्रेक ही इतिहासजमा झालेली बाब आहे, असे गृहीत धरले जात होते. याचे कारण आपल्या संविधानाने सर्वांना आपापल्या सद्सदविवेकबुद्धीनुसार धर्मपालनाचे स्वातंत्र्य आणि कायद्याने चालणाऱ्या राज्यव्यवस्थेची हमी दिलेली आहे. पण संघपरिवाराने कोणताही विधिनिषेध न पाळता गुप्ततेने रचलेला बाबरी मशीद जमीनदोस्त करण्याचा घाट आधी ठरवल्याप्रमाणे ६ डिसेंबर १९९२ रोजी अमलात आणल्यावर देशातील सर्व सभ्य आणि विचारी नागरिक हादरून गेले. हा धक्का अधिकच तीव्रतेने जाणवायचे कारण, संघपरिवाराने सार्वजनिकरीत्या मशिदीच्या इमारतीला अपाय करण्यात येणार नाही, अशी हमी दिली होती आणि तसे शपथपत्रही सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केले होते.
नोव्हेंबर १९९३मध्ये होऊ घातलेल्या चार राज्यांतील (उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश) विसर्जित विधानसभांच्या आणि दिल्लीतील सार्वत्रिक निवडणुकांत एक महत्त्वाचा प्रश्न मतदारांसमोर धसास लागणार होता. धार्मिक बाबींबद्दल गेल्या दहा-बारा वर्षांत काँग्रेसचे धोरण अतिशय संदिग्ध, संधिसाधू आणि बोटचेपे होते. तर धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) गणले जाणारे बिगर-काँग्रेस विरोधी पक्ष विभाजित आणि विखुरलेल्या अवस्थेत होते. अशा परिस्थितीत मतदारांना हा निर्णय घ्यायचा होता की, आपण सर्वसमावेशक आणि सहिष्णू असलेल्या भारतीय संस्कृतीच्या शाश्वत आत्म्यावर आपली श्रद्धा कायम ठेवायची की, आक्रमक सांप्रदायिकतेच्या शक्तींबरोबर उभे राहायचे?
सांप्रदायिक सलोखा व सहिष्णुता यावर विश्वास असलेल्या शक्ती आणि धर्मांधतेनी चेतलेल्या सांप्रदायिक शक्ती यांमधील पुढे होऊ घातलेल्या संघर्षाची स्पष्ट चाहूल, ही १९७७-७९ या कालखंडात, जनता पक्षांमधील अंतर्गत घडामोडींनी लागली होती. संघपरिवाराने ‘भारतीय राष्ट्रा’ची संकल्पना नाकारून आपली हिंदुत्वाची आणि ‘हिंदू राष्ट्रा’ची कास धरून ठेवली. नंतर जनता पक्षातून बाहेर पडून भारतीय जनता पक्ष स्थापून विश्व हिंदू परिषदेचे पुनरुज्जीवन करून देशाच्या संवैधानिक राज्यव्यवस्थेला सरळ सरळ आव्हान देण्याचा आणि हिंदू मतपेढी उभारण्याचा आपला अपायकारक मानस अमलात आणायला सुरुवात केली.
संघपरिवाराच्या या उपक्रमात त्यांना मीनाक्षीपुरम येथील धर्मांतरे, शाहबानो प्रकरणात काँग्रेसची धरसोड, कोलांट्या उड्या व सरतेशेवटी सनातनी, मूलतत्त्ववादी मुसलमानांसमोर स्वीकारलेली सपशेल शरणागती, तसेच १९८६ ते १९८९ या काळात काँग्रेसने विश्व हिंदू परिषदेबरोबर केलेली घसट यांची मोठी मदत झाली. काँग्रेसचे संधिसाधू धोरण आणि विश्वनाथ प्रताप सिंहांनी परिस्थितीची केलेली अयोग्य हाताळणी, यामुळे १९९१मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपचा विजय होणे जवळपास अपरिहार्य होते.
.................................................................................................................................................................
“निखिल वागळे यांचे ‘मोदी महाभारत’ हे पुस्तक वाचून झाले. खूप वेगळ्या नोंदी आणि बारकावे या पुस्तकात आहेत. या दोन वर्षांत इतके दर्जेदार पुस्तक वाचले नव्हते... मी ‘मोदी महाभारत’ वाचले, तुम्हीही वाचा.” - संदीप काळे, पत्रकार
ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -
https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat
.................................................................................................................................................................
६ डिसेंबर १९९२ ते डिसेंबर १९९३ हा काळ स्वतंत्र भारतातील सर्वांत अशांततेचा काळ म्हणता येईल. या काळात आक्रमक सांप्रदायिकतेने देशातील संवैधानिक राज्यव्यवस्थेला सर्वांत मोठे आव्हान दिले, हे सर्वांच्या निदर्शनास आले.
१९९३च्या या निवडणुकीच्या रिंगणात धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विचारसरणी मानणारे पक्ष हतोत्साही अवस्थेत आणि मोठ्या अनिच्छेनेच उतरले होते. धर्मनिरपेक्ष (सेक्युलर) विरोधी पक्षांच्या दबावामुळे धर्मांध शक्तींवर रोख लावण्याचे पहिले पाऊल, हे भाजपच्या ज्या चार राज्य सरकारांनी बाबरी मशीद जमीनदोस्त करायला आणि हिंसकरित्या संवैधानिक राज्यव्यवस्थेवर हल्ला करायला मदत केली होती, त्यांना बडतर्फ करणे हे होते. भाजपच्या या चार राज्य सरकारांनी विश्व हिंदू परिषदेने (संघपरिवाराने) सार्वजनिकरीत्या बाबरी मशिदीच्या इमारतीला अपाय करण्यात येणार नाही, अशा दिलेल्या हमीची आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केलेल्या शपथपत्राची पायमल्ली केली होती.
समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांच्या युतीने अतिशय मोक्याच्या उत्तर प्रदेश राज्यात खंबीर पावले टाकली व विजय मिळवला. आणि काँग्रेस पक्षानेही मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेशात नेट लावून भाजपला पराभूत केले.
बडतर्फ झालेल्या चारही राज्यात विधानसभेच्या निवडणुका जिंकून त्यानंतर लगेचच लोकसभा मुदतपूर्व बरखास्त करायला लावून लोकसभेची निवडणूक जिंकून केंद्रात सत्ताग्रहण करायचा भाजपाचा मनसुबा होता. त्यांचा हा महत्त्वाकांक्षी बेत सध्यापुरता तरी उधळला गेला आहे. संवैधानिक राज्यसंस्थेला थोडासा श्वास घेण्यापुरती फुरसत मिळाली आहे. पण हे लक्षात ठेवले पाहिजे की, ही किंचितशी फुरसत आहे. खरा धोका टळलेला नाही. माझ्या मते, संवैधानिक सुनियोजित राज्यव्यवस्था शाबूत ठेवायची असेल, तिच्यावर घातला जाणारा हा सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर ही जबाबदारी सर्व समंजस, समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी सामुदायिकरीत्या पार पाडली पाहिजे.
‘धर्मांधता : राज्यसंस्थेवरील घोर संकट’ - मधू लिमये
साधना प्रकाशन, पुणे | मूल्य – २५० रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Vivek Date
Thu , 11 August 2022
So pleased to see this great book by Madhu Limaye is translated in to Marathi and your carrying review of the translated version. So timely published by Sadhana. I recall Madhu Limaye challenging then Jan Sangh in Janata Party for its dual loyalty - secular nation against Hindu Rashtra and how important this challenge always has been.