माधव कृष्ण सावरगावकरांनी स्वत:साठी ‘अलोन’ ही नाममुद्रा निवडली आणि ती सार्थ ठरवली. या इंग्रजी शब्दाचे एकटा, एकाकी, सुटलेला, दुरावलेला, तुटलेला अशा अनेक अर्थछटा एकवटून कवी पुन्हा दशांगुळे उरतोच
ग्रंथनामा - झलक
नारायण कुळकर्णी कवठेकर
  • ‘मर्मबंध’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 29 July 2022
  • ग्रंथनामा झलक मर्मबंध Marmbandh अलोन Alone माधव कृष्ण सावरगावकर Madhav Krushna Savargaonkar

अलोन उर्फ माधवकृष्ण सावरगावकर यांचे गेल्या वर्षी निधन झाले. त्यांच्या हयातीत त्यांचा एकही कवितासंग्रह प्रकाशित होऊ शकला नाही. ते उत्तम कवी होते. श्री.पु. भागवत यांनीही त्यांची कविता प्रकाशित करण्याची तयारी दर्शवली होती. जी.ए. कुलकर्णी यांचे अलोन यांच्याशी खूप हृद्य संबंध होते. अलोन यांचे सहकारी, स्नेही प्रा. श्रीनिवास पांडे आणि मधुकर धर्मपुरीकर यांनी पुढाकार घेऊन ‘मर्मबंध’ या कवितासंग्रहाचे नुकतेच प्रकाशन केले आहे. ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालेल्या या कवितासंग्रहाला ज्येष्ठ कवी नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

‘व्यथा वेदनांची

फुले व्हावी सुकुमार

जखमांचे ल्यावे

अंगभर अलंकार

 

नाचावे... नाचावे...

सख्या दुःखामध्ये चूर

निखळ पावेतो

वेड्या मनाचे घुंगूर’

अलोन यांची कविता अशी चकवा देते आपल्याला. ‘घुंगरू टूट गये’, ‘घुंगरू तुटले रे’ या कानावर सतत पडलेल्या गाण्यांच्या लोकप्रिय ओळी आठवतात आणि आपण सवयीने पुढे जातो. कुणासाठी नाचणे, श्रमामुळे धुंगरू तुटणे-विवशता आहे - इच्छा-अनिच्छा आहे कुठे कुठे. पण इथे ‘निखळणे’ ही क्रिया आहे. निखळणे म्हणजे निसर्गक्रमानुसार पान गळून पडणे, जी दु:खामध्ये चूर असल्यामुळे जाणवतही नाही. मग आयुष्याचा नाच नादरहित होतो. तेच जणू भागधेय आहे. ही विवशता अलोन यांच्या कवितेत आहे. या विवशतेविषयी तक्रार नाही, गाऱ्हाणे नाही, त्रागा नाही ही विशेषता आहे या कवितेची. खुद्द कवी याची काळजी घेतो की, अश्रू तर तरळूच नयेत, हुंदकाही फुटू नये- कुणाला खबरबात होऊ नये; क्षितिजावर मावळणाऱ्या बिंबाने हळूहळू डोळ्यांत मावळावे, अंधाराच्या पावलांचा आवाजही होऊ नये आणि-

‘हळू... हळू... दिशातून घेरतो काळोख

उगमाशी प्रवाहाची जडते ओळख’

यापेक्षा वेगळी काय असते तात्त्विकता आणि चिंतनशीलता. अनेक कवी त्यासाठी चिरंतन, सनातन, आदिम अशा शब्दांनाच कवितेत पेरतात. त्यामुळे बरेचदा कविता वजनदार होत नाही. जड होते.

संध्याकाळ कवींना अस्वस्थ करते, काहींना संध्याछाया भिववितात, काहींना कांचनसंध्या भुलविते; पण अलोन यांचे काय करावे? वणवण आणि रणरण देणारा सूर्य मावळेल याचाच जणू कवीला आनंद होतो. आणि कुठल्या साक्षात्काराने जीव निवेल?

‘आणि कातरवेळेला निवे सैरभैर जीव

जन्मोजन्मीचा सोयरा भेटे अंधार राजीव’

काही थोरामोठ्यांचा प्रश्न खराखुरा अस्वस्थ करणारा असतो. त्यांना आणि वाचकांनाही, बालकवी म्हणाले – ‘कोठुनि येते काही कळेना उदासीनता ही हृदयाला?’ ग्रेस स्वत:मध्ये डोकावून विचारतात- ‘माझ्या मना तुला रे दुखते कुठे कळू दे’. अलोन यांच्या कविता वाचताना असे वाटले की, कवीच्या दु:खाची कारणे लौकिकामध्येसुद्धा आहेत. घटना आहेत, प्रसंग आहेत, व्यक्ती आहेत, दुरावे आहेत, विविध अनुभव आहेत, जे तुम्हाआम्हालाही अनुभवाला आलेत. पण कवी त्याच्या स्वभावधर्मानुसार तपशील सांगत नाही. त्याने सांगूही नये. तो कविधर्मानुसार सूचित करतो. ‘सूचना’ या विशेषाचा उपयोग करतो. दृष्टान्त, रूपक, प्रतिमा यांचा आश्रय घेतो. निसर्गप्रतिमांमधून आशयाचे पळणारे ढग पकडण्याचा त्याचा प्रयत्न वाचकास स्तब्ध करतो. मी चित्र काढतो, तुम्ही पाहा. काही जाणवले तर ठीक, पण मी काही सांगणार नाही. मुळात कवितेशिवाय काही सांगावे, अशी मुळातच कवीची इच्छा नाही. नाहीतर ‘मी आणि माझी कविता’ असा एक आत्मप्रौढी दर्शवणारा एखादा लेख एखाद्या दिवाळी अंकासाठी अलोन यांनी त्यांच्या हयातीतच नसता लिहिला?

‘सैरभैर वेडापिसा, जीव रानोमाळ फिरे

त्याचे गाठोडे चिंध्यांचे धर्मशाळेत विसरे

कुणी येणारा जाणारा, काढी अफवांचे पीक

परागंदा इसमाला, मिळे प्रसिद्धीची भीक

 

ओळखीचे जीव सारे । घाईघाई पाठमोरे

जसा अंगणात शिरे । महारोगी

 

अचुक असा हा हरलो अंती... निरोप माझा एक कळावा

जे तसले हसले त्यांनाही बघण्या हा सोहळा मिळावा

 

मुखी वाळूचा तोबरा चाकी वाळूचेच तेल

भाळी लिहिलेला शाप चाक भूमाता गिळेल

 

जिथे पोटच्या गोळ्याला माय होय पाठमोरी

सखी भावकीला गळा दाबण्याची काय चोरी?

बेलाशक कर मित्रा तुही अवसानघात

जिवाभावाची राहुटी दुश्मनांच्या शिबिरात’

यापेक्षा अधिक स्पष्ट अलोन होऊ शकत नाहीत.

‘अलोन’ ही नाममुद्रा माधव कृष्ण सावरगावकरांनी स्वत:साठी निवडली आणि ती सार्थ ठरवली. या इंग्रजी शब्दाचे एकटा, एकाकी, सुटलेला, दुरावलेला, तुटलेला अशा अनेक अर्थछटा एकवटून कवी पुन्हा दशांगुळे उरतोच.

अलोन यांच्या कवितेत दोघे जण अधिकाराने वावरताना दिसतात. हस्तक्षेप करतात. एक ‘तो’ आहे आणि एक ‘ती’ आहे. तो म्हणजे तो, जो आभाळात किंवा सर्वत्र असतो असे म्हणतात ‘तो’. कवी त्याचा नामोल्लेख करत नाही; पण तो न्यायी, प्रेमळ आहे असेही कवीला वाटत नाही. त्यामुळे त्याच्याविषयी प्रेमभाव, भक्तिभाव, आस्था नाही आणि भीतीही नाही; पण तक्रार आहे सौम्यशी,

‘काय हाती येई तुझ्या

असे उगीच छळून?

तुझा होई खेळ

जाती –

माझ्या पाकळ्या

गळून...’

यापेक्षा जास्त संवाद 'त्या'च्याशी होत नाही. पण ‘ती’ आहे – ‘ती’ म्हणजे नियती - तिचा हस्तक्षेप, तिची अरेरावी, तिची बेपर्वाई, तिचे मानवी जीवनावरील वर्चस्व कवीला अस्वस्थ करते. याबाबतीत अलोन हे जी.ए. कुलकर्णी यांचे लेखनबंधू ठरतात. पण कथेचा विस्तार आणि व्याप मदतीला घेऊन नियतीची सर्वव्यापी निष्ठता जीएंनी चितारली, तशी कवितेचा छोटा जीव लक्षात घेऊन अलोन चितारू शकत नव्हते; पण वृत्ती तीच, हतबलताही तशीच...

‘सहज सजल त्या स्वप्नाची की होते माती अंती

निर्विकार नियतीला त्याचा हर्ष नसे वा खंती

 

मांड खुराड्यात तुझा टिचका संसार

वाघूळाला कशाला रे प्रकाशाचे घर?

मुळे कमजोर झाली, खाली कले जीर्ण वृक्ष

नियतीचा पाणलोट, नजरे समक्ष...

 

मुळव्यात मुरे पाणी खचू लागे घर

हाकेसवे देव यावा परी ये छप्पर’

एकदा ‘तो’ आणि ‘ती’ला असे स्वीकारले आणि शरण गेले की, मग संघर्ष, लढणे, आक्रोश हे शब्ददेखील हद्दपार होतात. मनाला मग निमूटपणाचे वळण लागते. मग अशी मनसमजावणी -

‘अगम्य आकाशी । कोठवर जाशी

दोरी धन्या हाती । नाचवी जो

गळ्यातले दावे । मोजोनी ठेवावे

चित्ती असो द्यावे । खुंट ध्यान

रिंगणात घेई । माफक कोलांट्या

अवघ्या वेलांट्या । अधोगामी’

कवीची मुळातच वृत्ती संकोची, स्वभाव अबोल, गर्दीमध्येही आत्ममग्न - तिथे कविताही मितभाषी असावी यात नवल नाही. काही जण असे बोलतात की, शेजारी बसलेल्या माणसालाही ऐकू येऊ नये. आणि कानात प्राण आणून ऐकण्याएवढी जगात फुरसत कोणाला आहे? आणि अलोन यांना तरी कुठे काही ऐकण्याची असोशी आहे किंवा उरली आहे?

‘शिकाऱ्यांच्या हाकाऱ्यांनी उठविले उभे रान

भेदरल्या सशापरी प्राण झाले टक्क कान’

मधुकर केचे, म. म. देशपांडे, ग्रेस, आरती प्रभु हे अलोन यांचे सहोदर... समकालीन कवी. काही वर्षे मागेपुढे. अलोन यांना आवडतही असावेत, या कवींचा प्रभाव म्हणावा असा परिणाम अलोन यांच्या कवितेवर जाणवत नाही; पण वृत्तीशी जवळीक काही कवितांमधून कूस बदलते. मधुकर केचे यांची एक छोटीशी, ‘मोठी’ कविता आहे -

‘हेलावून थोडे

स्थिर व्हावे पाणी

ही माझी कहाणी’

अलोन यांच्या ‘ओळख’ या कवितेतील एक ओळ अशी -

'हेलावूनी हेलावूनी व्याकुळले पाणी.'

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ग्रेस यांनी अनेक ‘पाऊसगाणी’ लिहिली. ते म्हणतात – ‘झाडीच्या मागुन येतो- हा पाऊस माझा राणा’. अलोन यांनीही अनेक पाऊस कविता लिहिलेल्या या संग्रहात आहेत. पण ग्रेस यांना पाऊस जसा सखा, जिवलग, राणा वाटतो, तसा अलोन यांना वाटत नाही. तसा तर अलोन यांच्या कवितेत निसर्गप्रतिमांनी आशय अधिक घट्ट आणि टोकदार केला आहे. त्यात पाऊसही! पण अलोन यांना कोणी सखा, सोबती, बालमित्र, प्रौढ सोबती आयुष्यात उरलेला दिसत नाही, तर कवितेत कुठून येणार? मग अलोन यांचा पाऊस सुरू होतो- जरासा जगाला सुखावतो; पण शेवटी धुमाकूळ घालतो आणि विणलेले घरटे उद्ध्वस्त करतो. ग्रेसच्या अनेक कवितांमधून ‘की’मुळे जी संदिग्धता किंवा अनमान जाणवते-जो त्यांच्या शैलीचा भाग बनून गेला आहे- तसे अलोन यांच्या कवितेत एखादे वेळी जाणवते – ‘सांज’ कवितेचा शेवट असा होतो -

‘देह गिळणारा / अंधार दिशातून झरे ...

हा प्राण : वाट चुकलेले की वत्स कुणी बांवरे’

संदिग्धता, दुर्बोधता हा कवितेचा दुर्गुण नसतो, स्वभाव असू शकतो. अलोन यांची कविता अबोल आहे; घुमी म्हणता येईल. ती थोडेसे बोलते आणि एवढे बोलले तेच खूप झाले असे म्हणून ओठ मिटून घेते.

कधी कवी अनिल यांच्या ‘दशपदी’मधील कवितांची आठवण यावी, अशा आकारातील कविता आढळतात आणि ती कविवृत्तीही काही ओळींमधून दिसून येते. उदाहरणार्थ -

‘संथ संथ या जळापरी मी उगा असावे पडून....’

या संग्रहात प्रेमकविता म्हणावी अशी एक कविता सापडली. या कवितेत एक ती आहे. ‘तिची भेट झाली । जशी सहज पडावी झाडाची सावली.’ पण ती येते आणिक जाते...! पण लगेच उन्हे वाढतात आणि छाया पायतळी येतात. ती काही बोलत नाही. कवी तर अबोलच आहे. शब्दही नाही तर स्पर्श असंभवच!

कधी कधी नवल वाटते; पण त्या त्या कवीला त्याचा त्याचा अवकाश आणि त्याचे जग आखण्याचा आणि पावलापरता प्रवास निवडण्याचा अधिकार आहे.

ही कविता लोक, काळ, घटना-दुर्घटना, धक्काबुक्की, मैदानी जगात उतरलीच नाही. तेही बरेच झाले. ती आवाजी झाली नाही. तिने आपला आवाका आणि सूर निवडला. एकांतातील मंद, सौम्य सनईचा आत्ममग्न सूर; कोलाहलापासून दूर!

बरेचदा असे होते - घडामोडीलाच कालस्वर समजतात काही कवी! काळ ओसरला की, ती कविताही गडप होते. संवेदना, सुखदुःखांचे उद्रेक, मानवी भावभावनांची ओहोटी आणि भरती यांना अचूक शब्दांनी प्रामाणिक अभिव्यक्ती देणारी कविता शिळी होत नाही. अलोन यांची कविता अशी आहे. साध्या सुंदर प्रत्ययकारी प्रतिमा ‘आणभाक’ या कवितेत अशा येतात -

‘पानगळीच्या रानात

नये उभे राहू

तेज तुटल्या ताऱ्याचे

नये कधी पाहू - १

बुडणारी डोलकाठी

नये देखू डोळा

नये ऐकू झाडतोड

काळीज वेळेला – २’

मनासारखे काही होतच नाही, विपरीतच घडत राहते... हा नेहमीचा अनुभव असतानाही ‘स्वप्न’सारखी एखादीच कविता कवी लिहितो - आडरानातील गोड्या पाण्याच्या विहिरीसारखी. केवळ आठ ओळींची ही कविता आल्हाद, आनंद आणि आशा यांनी ओतप्रोत भरलेली आहे. मनाला पटवून द्यावे लागते की, ही कविता अलोन यांचीच आहे. जे कवीला लाभले नाही ते सर्व कवीने आपणा सर्वांसाठी मागितले आहे -

‘तोडी तयाला गोडी लाभो चिरे तयाला झरे

दुशा मारिता तान्हा, पान्हा अधिकचि की पाझरे...’

‘एकाकी वाटांचा सहवास’ मला लाभू दे आणि आता ‘परतीच्या वाटा’ मला खुणावताहेत असे कवी का म्हणत असेल?

‘माझ्यामधूनही / काहीतरी हळू

सरत जातेय...

निघालेय कुणी / फेकलेले जाळे

गोळा करून...’

कोण निघालेय? मागे ज्यांचा उल्लेख केला ते – ‘तो’ किंवा ‘ती’? ‘तो’ खेळिया आहे, असे कवीने काही कवितांमध्ये म्हटले आहे. इथे तो कोळी होऊन आलेला आहे. दिवसभराचे काम संपले. पसारा आवरून तो नेहमीच्या सरावाने परत निघाला आहे. कुठे काही सरते आहे. कुठे काही ओसरते आहे.

अलोन यांच्या छोट्या कवितांमध्ये छोट्या-छोट्या परिचित-अपरिचित प्रतिमा असतात, कधी कधी परस्परपूरक-एकधर्मी-संलग्न प्रतिमांचा मनोरम व्यूह असतो आणि या सर्वांतून एक परिपूर्ण अनुभव साक्षात होतो.

अनुभवांचा मर्यादित पसारा अलोन यांच्या वाट्याला आला; पण त्यानेही कवीला कासावीस केले, हतबलतेची जाणीव करून दिली; परक्यांनीच नाही तर आप्तस्वकीयांनीही कातडी सोलणारे ओरखडे काढले. सुखाचा चुकून एखादा हळुवार शिडकावा आला; पण लगेच त्या सुखाच्या जाणिवेला निपटून काढणारी मुसळ-धार आली. कवी म्हणतो, बैलाला जशी गोठ्याची वाट पक्की पाठ असते, तसा मी माझ्या हृदयातील खुराड्यात परततो. कविता नावाच्या मनातील दुसऱ्या कोपऱ्यातील गुहेत कवीला आश्रय मिळाला. तिथे कवीने शब्दांची निगुतीने मांडामांड केली. हेळसांड केली नाही. जुने, नवे, सोपे छंद निवडले. स्वाभाविक वाटावी अशी यमके निवडली. प्रास्ताविक वाटावा असा पहिल्या ओळीतील आशय नेटाने आणि अभ्यासाने आणि निर्मितीच्या ध्यासाने शेवटच्या ओळीपर्यंत उसळणाऱ्या लाटेसारखा उंच नेला! आजचा वाचक या कवितेला कसा प्रतिसाद देईल याची चिंता नको. निखळ कवितेचा रसिक नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतो - आणि अशी कविता त्याच्या मर्मबंधातली ठेव असते.

मितभाषी कविता लिहिणाऱ्या कवीला सर्व विश्व आणि अंतर्विश्व यांच्या परस्पर नात्याची जाणीव होती. तेवढे ‘अलोन’ तुम्ही समंजस आणि परिपक्व होतात. हे दर्शवणाऱ्या तुमच्याच सुंदर रूपके असलेल्या दोन ओळी ठेवतो आणि थांबतो -

‘हळूहळू बुडू लागे अस्तित्वाची डोलकाठी

चार कवितांचा फेस काळसागराच्या काठी’

‘मर्मबंध’- अलोन

ग्रंथाली, मुंबई

मूल्य - १५० ₹

.................................................................................................................................................................

नारायण कुळकर्णी कवठेकर

narayankulkarnik@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......