अमुक अमुक माणसाला बस ‘लागते’ किंवा आगबोट ‘लागते’, असं आपण म्हणतो, प्रकाश अकोलकरला माणसं ‘लागतात’...
ग्रंथनामा - झलक
अंबरीश मिश्र
  • ‘मित्रमयजगत’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 27 July 2022
  • ग्रंथनामा झलक मित्रमयजगत Mitramayjagat प्रकाश अकोलकर Prakasha Akolkar गोविंद तळवलकर Govind Talwalkar महाराष्ट्र टाईम्स Maharashtra Times

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांचं ‘मित्रमयजगत’ हे व्यक्तिचित्रांचं पुस्तक नुकतंच विश्वकर्मा पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाला त्यांचे मित्र, ज्येष्ठ पत्रकार आणि मराठीतील शैलीदार ललितलेखक अंबरीश मिश्र यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

.................................................................................................................................................................

‘मित्रमयजगत’ वाचकांच्या हाती सोपवताना पुस्तकाचे लेखक आणि माझे स्नेही नि ज्येष्ठ पत्रकार श्री. प्रकाश अकोलकर (खरं तर नुस्तं अकोलकर) यांना समाधान वाटत असणारच; परंतु मला विशेष आनंद होतोय. अकोलकरच्या पुस्तकाला प्रस्तावनेचे चार शब्द लिहायला मिळाले. आमच्या पस्तीस वर्षांच्या मैत्रीवर छापखान्याची मोहर उमटली.

खरं तर अकोलकरचं हे पुस्तक फार पूर्वीच निघायला हवं होतं. खूप अगोदरच त्याने सर्जनशील लिखाणाकडे वळायला हवं होतं; पण तसं झालं नाही. अकोलकर बातमीदारीच्या जगात रुळला हे खरं; पण म्हणून आपल्याला ‘म.टा.’त त्याचं लिखाण वाचायला मिळालं हेही खरं.

अकोलकरच्या चित्तवेधक नि ताज्या बातम्यांची नशा अद्याप माझ्यावर आहे. अन् माझ्याप्रमाणे कित्येकांवर. ‘बातम्या म्हणजे घाईघाईत लिहिलेली साहित्यकृतीच,’ ही म्हण बातमीदार अकोलकर रोज खरी करून दाखवत होता. थोडीथोडकी नाही, तर घसघशीत पस्तीस वर्षं.

माझी अकोलकरशी गाठ पडली, ती अंदाजे १९८३-८४च्या आसपास. वृत्तसृष्टीत नवे वारे वाहू लागले होते. अनेक तरुण पदवीधर छाप्याच्या जगात दाखल झाले होते. महिला पत्रकारांचा टक्काही वाढत होता. नवं, लुसलुशीत गवत उगवलं की, जुन्याजीर्ण भिंतींना बाळसं येतं असं म्हणतात. तसं समस्त वृत्तपत्रांचं तेव्हा झालं होतं. अकोलकर या नव्या पिढीतला. सत्तरच्या दशकातला. आजही तो गवतपात्यासारखा आहे; हिरवाकंच, बराचसा निरागस, खूपसा बेरका. वैतागणारा, इतरांना वैताग आणणारा. सदैव वाऱ्यावर फडफडणारा. अकोलकर मनाने तरुण, तसेच त्याचे मित्र. ‘मित्रमयजगत’च्या प्रत्येक पानाला रानफुलांचा उग्र वास आहे.

अमुक अमुक माणसाला बस ‘लागते’ किंवा आगबोट ‘लागते’, असं आपण म्हणतो; अकोलकरला माणसं ‘लागतात’. लहान मुलाच्या कुतूहलाने नि निरागसपणे तो माणसांत वावरत असतो, माणसं वाचत असतो. हा निरागसपणा कृत्रिम असता तर अकोलकर केव्हातरी थकला असता आणि माणसांचा नाद सोडून घरी स्वस्थ बसला असता; परंतु तो थक म्हटल्या थकत नाहीए. He hasn't given up. ‘सितारों के आगे जहाँ और भी हैं / अब इश्क़ के इम्तिहाँ और भी हैं’ या उर्दू ओळींतलं भावसत्य तो कोळून प्यायलाय.

ज्युईश लोकांचा प्रेषित मोझेस रोज एका दुर्दम्य इच्छेनं देवांना भेटायला सिनाईच्या पर्वतावर जायचा म्हणतात. अकोलकर माणसांना भेटतो. उत्साह तोच, तीच ऊर्जा. मोझेस लेकाचा देवांशी वाद घालायचा. अकोलकर माणसांशी हुज्जत घालतो, त्यांना समजून घेतो. त्यांचं भलं व्हावं, ही इच्छा बाळगतो. माणसांमुळे (आणि गोविंद तळवलकरांमुळे) अकोलकर माणसाळला. म्हणून ‘मित्रमयजगत’ हे माणसांचं पुस्तक आहे, असं मला वाटतं. एका संवेदनशील, बुद्धिमान, हट्टी, लहरी, इमानी माणसाने लावलेलं हे माणसांचं आख्यान वाचकांना आवडेल असा विश्वास वाटतो.

अकोलकरकडे उत्तम निरीक्षणशक्ती आहे. राजकारणाच्या बीहड जंगलात फिरस्तेगिरी करताना ही Orwellian निरीक्षणशक्ती त्याच्या कामी आली असणार. त्याची नजर सूक्ष्म आहे; अन् सद्यसुद्धा. इंटरनेट-मोबाईलचा जमाना लागण्यापूर्वी जनजीवन कसं सुशेगात होतं, हे सांगताना अकोलकर ‘एक पेपर, तीन संपादक!’ या लेखात सहजपणे लिहून जातो, ‘थोडक्यात काय तर अवघं जीवन हे सुनीताबाई देशपांडे यांच्या धामापूरच्या तलावासारखं शांत आणि हो, नितळही होतं.’ याच लेखात अकोलकरने गोविंद तळवलकरांच्या काळातल्या ‘म.टा.’चा सुरेख नि रसिला वृत्तांत लिहिलाय. नंतर वृत्तसृष्टीची झालेली पडझडही मनोज्ञपणे कथन केलीए.

वि. वा. शिरवाडकर आणि नाशिक या अकोलकरच्या दोन सुगंधी जखमा. नाशिक हे त्याचं गाव आणि शिरवाडकर हे नाशिकचे इष्टदेव. तात्यासाहेबांवर लिहिताना अकोलकर हळवा होतो. मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार आणि ‘नटसम्राट’च्या अभूतपूर्व यशामुळे तात्यासाहेब लीजंड झाले आणि नाशिक जणू दुसरं स्ट्रॅटफर्ड अपॉन अ‍ॅवन झालं. अकोलकर हे सगळं पाहत होता, आत्मसात करत होता. रक्तातली सम गाठत होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

अकोलकर तात्यासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाचा दिलदारपणे धांडोळा घेतो; परंतु जाता जाता एक मार्मिक भाष्यही करतो- ‘‘ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यानंतर तात्यासाहेबांच्या भोवतालची वर्तुळं लक्षपटींनी वाढली होती. वलयांच्या त्या सोनेरी-चंदेरी वर्तुळात जमा होऊ पाहणाऱ्या भक्तगणांच्या मांदियाळीत आपलाही समावेश व्हावा म्हणून ‘धडपडणाऱ्या मुलांची’ गर्दी वाढत चालली होती. नैतिकतेचा मानदंड असणाऱ्या तात्यासाहेबांची मानसिकताही त्याच काळात बदलू लागली होती. लेखनावरील त्यांचं लक्ष वयोमानानुसार कमी कमी होत जाणं, स्वाभाविक होतं... स्वत: तात्यासाहेबांचं रूपांतर तर आता ‘उरलो आशीर्वादापुरता!’ अशा एका महनीय व्यक्तिमत्त्वात होऊन गेलं होतं. त्यांच्या याच रूपाचा फायदा जास्तीत जास्त उठवण्याचा प्रयत्न मग अनेकांनी केला, यात नवल ते काहीच नव्हतं. त्यातूनच त्यांचं रूपांतर हे ‘ग्रामदैवता’त कधी होऊन गेलं, ते कोणाला कळलंही नाही. महाराष्ट्रातल्या अन्य कोणत्याही लेखक-साहित्यिकाभोवती ही अशी वर्तुळं निर्माण झाली नव्हती. या महात्म्याचं आणि भोवतालच्या वर्तुळाचं त्यांना स्वत:लाही आकर्षण वाटू लागलं आहे की काय, अशी शंकाही मग कधीतरी मनात येऊन जाई.’’

‘वडलांची गोष्ट’ हा लेख म्हणजे या पुस्तकातला सगळ्यांत जडावदार दागिना. अकोलकरचे वडील ग.वि. अकोलकर हे थोर शिक्षणशास्त्री, प्रयोगशील शिक्षक आणि संस्कृत-मराठीचे रसिक व्यासंगी. अकोलकरच्या शब्दांत सांगायचं तर ‘कडक शिस्त, सचोटी, ध्येयवाद हे शब्द घासून बुळबुळीत झालेल्या आजच्या काळात हे सारे शब्द त्यांच्या बाबतीत (वडिलांच्या बाबतीत) १०० टक्के लागू होते.’ नाशकाच्या घडणीतही अकोलकर सरांचा सक्रिय सहभाग होता. नाशिक घडत होतं नि मुलगासुद्धा.

हा लेख वाचत असताना मला राहून राहून वाटत होतं, नामांकित शिक्षणतज्ज्ञ गणेश विनायक अकोलकर सरांचं बोट धरून प्रकाश आपल्या वडिलांना शोधायला बाहेर पडलाय. लेखाच्या शेवटी प्रकाश म्हणतो, ‘गोष्ट वडलांची सांगायची होती, पण प्रत्यक्षात लिहून झाली ती अकोलकर सरांची गोष्ट...’ लेखाचा तोल तोळाभरदेखील ढळलेला नाहीए हे श्रेय प्रकाशचं... म्हणजेच अकोलकर सरांचं.

प्रकाश अकोलकरची लेखनशैली रसाळ नि ओघवती आहे. तो बोलल्याप्रमाणे लिहितो. हे मला थोर वाटतं. तो बातम्यादेखील याच शैलीत लिहायचा. त्याच्या पोतडीत असंख्य किस्से आहेत नि त्याची कथनशैली मनमोहक आहे. डावा-लिबरल असूनही तो सुदैवानं झापडबंद झाला नाही. याचं कारण तो मूळचा मौखिक परंपरेतला आहे.

बातमीदारी म्हणजे ओरल ट्रेडिशनच. माणूस लिहू लागला की, आवेश, आविर्भाव हे त्याच्यातले दुर्गुण लिखाणाचा ताबा घेतात. अकोलकरचं मराठी साधं, मऊसूत आहे. त्याचे punches करकरीत असतात. ‘टाइम्स’च्या बोरीबंदर परिसरातल्या बुलंद मुख्यालयाचं वर्णन तो ‘दगडी चाळ’ असं करून बेमालूम पुढे जातो.

हल्ली पेपरांतलं परिसंवादीय, विद्यापीठीय नि रुक्ष मराठी वाचून सकाळी सकाळीच मला नैराश्याचा झटका येतो. अकादमीय जर्नल्समध्ये छापण्यायोग्य लेख रोजच्या पेपरात छापून मराठी पेपरवाले कोणावर सूड उगवताहेत?

मी अनेकदा ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये जायचो. मी इंग्रजी ‘टाइम्स’ला होतो. माझं ऑफिस तिसऱ्या मजल्यावर अन् ‘म.टा.’ दुसऱ्या मजल्यावर. लिहिणारा अकोलकर पाहताना मला फार मौज वाटायची. हातात शाईचं पेन. मोठी मोठी अक्षरं. बहुतेक सगळा मजकूर एकटाकी. तो ‘लिहीत’ नाहीए, तर पुढ्यात असलेल्या कागदाला काहीतरी खास ‘सांगतोय’ असं वाटायचं. हे ‘सांगणं’ म्हणजे रिपोर्टिंग, असं मला वाटतं. वाचक बातमी वाचत' असतो, असं आपण मानतो. खरं तर तो वाचता वाचता बातमी ‘ऐकत’ असतो. हे जेव्हा घडतं, तेव्हा पेपर आणि वाचक यांचा टाका जुळतो. इंग्रजीत बातमीला ‘स्टोरी’ म्हणतात, हे इथे लक्षात ठेवलं पाहिजे. कथा. कंथा. सगळे धागे-दोरे घट्ट जुळवलेली भरड, उबदार गोधडी. ती अंगाभोवती लपेटून गोष्ट ऐकायला बसायचं

‘मित्रमयजगत’मध्ये अकोलकरने आपल्या काही निवडक नि जिवलग मित्रांच्या सुरस नि सरस गोष्टी सांगितल्याहेत. त्या ‘ऐकण्या’सारख्या आहेत. कडू-गोड, कषाय-मधुर. मैत्रीला वय, लिंग, धर्म, जात हे भेद मान्य नसतात. अकोलकरने आपल्या नाशिकच्या वाड्यावरही लिहिलंय.

‘म.टा.’त मुख्य वार्ताहर या पदावर काम करणारे दिनू रणदिवे अकोलकरचे ज्येष्ठ स्नेही झाले. रणदिवे, अरुण साधू, जतीन देसाई, नीला सत्यनारायण ही व्यक्तिचित्रं लोभस आहेत. तसेच अभिजात सिनेमाच्या तडाख्यात सापडलेल्या रफिक बगदादी, रशीद इराणी आणि दरायुस कुपर या तीन नादिष्ट मित्रांची दास्तान तर अप्रतिम आहे. पुस्तकात काही सुंदर रिपोर्ताजवजा लेख आहेत.

अकोलकर दीर्घ काळ वृत्तसृष्टीत आहे. वृत्तपत्रीय लिखाण बव्हंशी चुरचुरीत असतं; शिवाय, शब्दसंख्येचं बंधन असतं. या पुढच्या काळात अकोलकरने या मर्यादा ओलांडून मोठ्या पल्ल्याचं लिखाण करावं. तेवढा दम त्याच्या लेखणीत आहे.

‘मित्रमयजगत’ - प्रकाश अकोलकर

विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे

पाने - १६८

मूल्य - २५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......