स्वाभिमानी मुलाचं आत्मचरित्र
ग्रंथनामा - झलक
भालचंद्र नेमाडे
  • तुकाराम गणू चौधरी यांच्या ‘जर्मन रहिवास’चं मुखपृष्ठ
  • Sat , 22 October 2016
  • भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemdae तुकाराम गणू चौधरी जर्मन रहिवास Tukaram Ganu Chowdhary

१९२२ ते १९२५ या काळातील जर्मनीतील एका महाराष्ट्रीय विद्यार्थ्याचा अनुभव सांगणाऱ्या ‘जर्मन रहिवास’ या पुस्तकाचं संपादन प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी केलं आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला नेमाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा संपादित अंश…

सुमारे त्र्याण्णव वर्षांपूर्वी १९२२ साली तीन गरीब शेतकऱ्यांची होतकरू मुलं जर्मनीला तंत्रज्ञानातले उच्च शिक्षण मिळवण्याकरता पराकाष्ठेची धडपड करून पोहोचतात. त्यांच्यातला एक तुकाराम गणू चौधरी हा १९२५ मध्ये तिकडून हिंदुस्थानात परत आल्यावर त्यानं लिहून काढलेलं हे आठवणींवजा आत्मकथन वाचून आजच्या तरुणांची मोठीच करमणूक होईल.

हे तिन्ही गावठी विद्यार्थी अनेक अडचणींना तोंड देत दोन्ही महायुद्धांमधल्या बिकट परिस्थितीतही उभारीनं जगणाऱ्या जर्मन समाजाचं ज्या भाबड्या मनोवृत्तीनं निरीक्षण करताना दिसतात, ती फार लोभस आहेत. इंग्रजांच्या प्रदीर्घ शोषणामुळे त्या वेळच्या विशेषत: खालच्या स्तरातल्या कष्टकरी वर्गातील बुद्धिमान तरुणांना विद्यार्जनासाठी खडतर प्रसंगांना तोंड द्यावं लागे. त्या काळी जगातल्या एका मागासलेल्या गुलामी राष्ट्राचे नागरिक म्हणून ओळख असताना या स्वाभिमानी मुलांना केवळ त्यांच्या देशी परंपरा आणि नैतिक संस्कार यांच्या बळावर जर्मन लोकांशी बरोबरीच्या नात्यानं वागता येई. याची अनेक मजेदार उदाहरणं या पुस्तकात वाचून भरपूर माहिती मिळते.

प्रस्तुत आत्मकथनाचा लेखक तुकाराम (रा. भालोद, जि. जळगाव) या विद्यार्थ्यानं सवलतीनं धर्मादाय बोर्डिंगात राहून हायस्कूलचं शिक्षण वरच्या श्रेणीत पूर्ण केलं. कारकुनाची नोकरी मिळत असता उच्च शिक्षणासाठी पुण्याच्या डेक्कन कॉलेजात स्कॉलरशिप मिळवली आणि तिथंही पहिल्या क्रमांकानं पास होऊन तो सरकारी शेतकी महाविद्यालयात बॅचलर ऑफ अ‍ॅग्रीकल्चर शिकत असतो. राष्ट्रीय चळवळीत पडून त्यानं कॉलेज सोडण्याचाही पुसट उल्लेख आहे, परंतु हे आत्मकथन सुरू होतं तेव्हा तो पदवी परीक्षेत बसतो आहे. त्यानं आपल्या कॉलेजच्या ऑफिसातली बारीकसारीक कामं करून शिकण्याचा खर्च भागवलेला असतो. जगाकडे पाहण्याची त्याची विनोदी वृत्ती सर्वत्र मनोरंजक निरीक्षणं नोंदवताना दिसते. उदाहरणार्थ, मुंबईहून सुएझमार्गे पॅरिसकडे बोटीनं जात असताना त्यानं डेकवर पाहिलेला डान्स वर्णिलेला आहे (पृ. ७०), तो पाहा :

“शेवटी... म्युझिकला सुरुवात होताच काही युरोपियन उठून त्यांच्या स्त्रीसह (अर्थात ती त्याचीच पत्नी हे जाणण्यात मला कोणताही मार्ग नव्हता) गोलाकार मोकळ्या जागेवर आले. पुरुष व त्याच्या दोन्ही हातात तिचे दोन्ही हात म्हणजे जवळजवळ कुस्ती खेळण्याचे वेळी जसे खेळाडू परस्परांशी अगदीच लगट करतात तसे. जो तो स्त्रीला अंगाशी ओढून त्या वर्तुळाकार जागेवर नाचू लागला. तेव्हा हा नाच असावा व कादंबरीत आपण आतापर्यंत ‘डान्स’ म्हणून वाचीत आलोत तो हाच, असे त्या वेळेस वाटू लागले... परंतु हा डान्स एक स्त्री व पुरुष इतक्या शरीरसान्निध्याने करीत असतील, याची कल्पनाही नव्हती.’’

“चहा कपातून बशीत ओतून तिला बऱ्याच वेळा फुकी घालत’’ पिणाऱ्या या विद्यार्थ्यांची काहीही नवं जाणून घेण्याची गावठी सवय अतिशय लोभस प्रसंग निर्माण करते. तिथल्या मुलींशी येणाऱ्या संबंधांमध्ये ती विशेष उठावदार ठरते. एका हॉटेलचे हे वर्णन-

“आम्ही तसल्या हॉटेलात प्रथमच शिरलो... जिकडे-तिकडे धुराचा लोट उठलेला होता. ज्याच्या तोंडात सिगारेट नाही, असा दिसणे तेथे शक्य नव्हते ... आमच्या अंगात ओव्हरकोट होते. आमचे तिघांचे ओव्हरकोट एकाच रंगाचे, गावठी शिवलेले व अतिशय लांब असे. त्यात आम्ही काळसर व हिंदुस्थानातून त्यातल्या त्यात खानदेशातून येणारे. ... आम्ही आत शिरताच आमच्याकडे सर्वांचे लक्ष लागले, हे सांगावयास नकोच. कोणी आमच्याकडे पाहून हसत होते.’’

आपल्या वागणुकीचं सतत आत्मपरीक्षण करणारे असे अनेक प्रसंग इथं दिसतात. आपली मातृभाषा अत्यंत शुद्ध राखण्याचा जर्मन लोकांचा ध्यास, तिथल्या स्त्री-पुरुषसंबंधांमधील मोकळेपणा, संघटनांचं वेड वगैरे संबंधीचे सांस्कृतिक प्रतिसाद सर्व काही अगदी ताजे अनुभवल्यासारखे प्रसंगोपात्त सर्वत्र आढळतात. यावरून चौधरीने जर्मनीतल्या संपूर्ण रहिवासात रोजनिशीसारख्या नोंदी करून ठेवल्या असाव्या व हिंदुस्थानात आल्यावर बेकारीच्या काळात हे आत्मवृत्त लिहिताना त्या सतत वापरल्या असाव्या.

खानदेशात कडक उन्हाळ्याची सवय असलेली ही मुलं जर्मनीतल्या कडक थंडीत थंड पाण्यानं आंघोळ करतात. वारकरी, महानुभाव घरांमधली ही शाकाहारी मुलं अंड्यालासुद्धा शिवत नाहीत, बाकीच्या गोष्टी, दारू वगैरे तर दूरच. यामुळे त्यांच्यातला एक बाळ नावाचा मित्र त्या हवामानात टिकाव न लागल्याने फुप्फुसाच्या आजारानं तिकडेच मरण पावतो. त्याचं हिंदू पद्धतीनं दहन करण्यासंबंधीचं एक प्रकरण (पृ. २४३-५१) सांस्कृतिक अभ्यासासाठी उत्तम ठरेल. देशी परंपरांचा रास्त अभिमान बाळगत अतिभावुक न होत घरापासून दूर परक्या ठिकाणी मेलेल्या सवंगड्याचं हे चित्र लेखकाच्या तटस्थ शैलीमुळे अधिकच शोकात्म झालं आहे.

आपल्या देशात औद्योगिकी तंत्रज्ञानाची सर्वाधिक गरज असल्याचं तरुणपणीच तुकारामच्या मनात पक्कं ठसलं. त्यावेळीच जर्मनीत दारुण युद्धोत्तर परिस्थितीमुळे घसरलेलं जर्मन नाणं खूप स्वस्त झाल्यानं (१ पौंड = १० हजार मार्क सुमारे) गावातल्या लोकांकडून आणि नातेवाइकांकडून वर्गण्या जमवून पासपोर्ट आणि व्हिसा काढण्यासाठी हे तिघे धडपड करतात. घरच्या गरिबीमुळे कर्ज मिळण्याची शक्यता नसते. पुढे केव्हातरी घरून थोडेफार पैसे पाठवण्याची व्यवस्था होते, पण यांच्या दुर्दैवानं अचानक जर्मनीचे परराष्ट्रांशी संबंध बिघडून बँकांमध्येही पैसे नसतात. अशा विचित्र परिस्थितीत पाच-सहा महिने एक वृद्ध निवृत्त दांपत्य, त्यांचे यजमान-यजमानीण, त्यांचं राहणं-खाणं फुकट करतात.

तुकाराम त्या वेळी बर्लिनजवळच्या कोटबूस शहरात मशिनरीच्या कारखान्यात कष्टाची कामं करून संध्याकाळी टेक्स्टाइलचा कोर्स पुरा करत असतो. या आर्थिक कोंडीच्या भयानक राष्ट्रीय परिस्थितीतही जर्मन लोक या हिंदू विद्यार्थ्यांना पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळतात. ‘लाभाविण प्रीती’ करण्याची ही जर्मन मनाची दानत लक्षात राहाते. हा जर्मन-हिंदू लोकांमधला मूळचाच अनुबंध आश्चर्यकारक वाटतो. असा भावनिक गोडाव्याचा अनुभव इंग्लंडमध्ये राहणाऱ्या कोण्या हिंदूला आल्याचं आमच्या वाचण्यात नाही. तुकाराम ज्या ज्या घरांमध्ये पेइंग गेस्ट म्हणून राहात होता, तिथं तिथं आपल्या संयुक्त कुटुंबी संस्कारांनी ‘आई’, ‘मावशी’ असं नातं लावत सर्वांशी माया लावून आला. इतका की, हा हिंदुस्थानात परत यायला निघाला त्या घराची यजमानीणबाई फ्राऊला वेसेली त्याच्याजवळ निरोप देते की, “तुझ्या आईला माझा निरोप सांग की असा मुलगा मला असता तर मी किती सुखी असती?’’

एकूण साधे, खेडवळ विद्यार्थी तिकडे कसे प्रेमाने राहिले, हे समजून घेण्यासाठी जर्मनीत जाणाऱ्या हिंदुस्थानी विद्यार्थ्यांनाही हे पुस्तक मनोरंजक ठरेल. विशेषत: हिंदू-जर्मन-इंग्रज अशा त्रिकोणी स्वरूपाच्या त्या काळातल्या संबंधांचे अनुभव चौधरीने अतिशय प्रांजळ मनानं मांडले आहेत.

या उलट त्या वेळच्या ब्रिटिश साम्राज्याचा हक्कदार ‘ब्रिटिश सब्जेक्ट’ असलेला नागरिक म्हणून तुकाराम परतताना इंग्लंडकडून येतो, तेव्हाचे तिथले प्रसंग पाहा. तीन वर्षे मोठ्या हिमतीनं उच्च तंत्रज्ञान यशस्वीरीत्या संपादन करून १९२५च्या ऑगस्टमध्ये लंडनहून आगबोट घेणारा हा पंचविशीतला तरुण त्या वेळच्या दरिद्री हिंदूंचं शोषण करत असलेल्या एका सल्लागार संस्थेत कुतूहल म्हणून जातो. ‘स्टुडंट्स इंजिनिअरिंग अ‍ॅडव्हायझर टु द हाय कमिशनर फॉर इंडिया’ अशा छद्म-परोपकारी संस्थेतल्या एका गोऱ्या इंग्रज अधिकाऱ्याला तुकाराम मुद्दाम भेटायला जातो, हे प्रकरण मनन करण्यासारखं आहे. एका सल्लागाराला तर भेटायला वेळ नसतो. हा दुसरा सल्लागार गोरा इंग्रज गृहस्थ दीड तास वाट पाहूनही ऑफिसात फिरकला नाही. मग दुसऱ्या दिवशी तुकाराम त्याच्या घरी जाऊन भेटला. त्याचा तुकारामला सल्ला काय की- इंग्लंडात टेक्स्टाइलचं एवढं ज्ञान असताना तू त्या जर्मनीत का म्हणून गेलास?

एरवी संयमी आणि सौम्य वागणूक ठेवणारा तुकाराम त्याला उत्तर देतो की, “इथं आम्हा हिंदी विद्यार्थ्यांना तुमच्या मिलांची पायरीही चढायला मिळत नाही... माझ्या कित्येक देशबंधूंनी तसा सर्व प्रयत्न केला... पाहिजे असल्यास त्यांची नावं सांगतो...’’

हा संवाद इंग्रजांच्या कर्तव्यदक्ष प्रतिमेबद्दल अजून हृदय भरून अग्रलेख लिहिणाऱ्या वर्तमानपत्रांच्या आपल्या देशात निदान आता वाचायला मिळेल, ही आनंदाची गोष्ट आहे. स्वदेशी परत आल्यावर आणि तत्पूर्वीही अनेक लहानमोठ्या व्यक्तींनी त्याला मार्गदर्शन केल्याचे उल्लेख आहेत : जाण्याआधी पुण्यात मिस कोहन यांच्याकडे हे तिघे मित्र जर्मन भाषा शिकले. या बहुदा हिंदू झाल्यानंतरच्या शीलवतीबाई केतकर किंवा त्यांची बहीण असाव्यात. त्यांनी या मुलांना इतरही बरंच मार्गदर्शन केल्याचं दिसतं. असंच साहाय्य सरोजिनी नायडूंकडून झालेलं दिसतं. तिकडे जर्मनीत बरीच निश्चित ओळख नसलेली हिंदुस्थानी माणसं - उदा. महाराजा ऑफ कूच वगैरे भेटल्याचे उल्लेख येतात.

मुंबईला आल्यावर तुकारामच्या दुर्दैवानं सर्व कापडगिरण्या बंद असतात. त्यामुळे मोठ्या उमेदीनं टेक्स्टाईल मॅनेजरची उच्च विद्या धारण करणाऱ्या या तरुणाला बेकार राहावं लागलं. त्या वेळी त्याला मदत करणाऱ्यांमध्ये शिवचरित्रकार केळुसकर, आमदार ना.म.जोशी आणि मजुरांचे पुढारी श्री. बोले यांचे उल्लेख येतात. हे उल्लेख काही संशोधन करू इच्छिणाऱ्यांना उपयोगी पडतील. ही गोष्ट ऑगस्ट १९२५ नंतरची. वर्षभराच्या बेकारीनंतर रा. चौधरी हे ठाण्याच्या रेमंड मिलमध्ये ‘स्पिनिंग अप्रेंटिस’ म्हणून १ मार्च १९२६ रोजी रुजू झाले. पुढे अंबालाल साराभाई (अहमदाबाद), माधवजी धरमसी, व्हिक्टोरिया, ज्युबिली, शापूरजी भरूचा, इंडिया युनायटेड (मुंबई) अशा वेगवेगळ्या गिरण्यांतून काम करून ते वरच्या पदांकडे प्रगती करत गेले. अमळनेर येथील प्रताप मिलची परिस्थिती १९६२ पासून जेव्हा हलाखीची होऊ लागली आणि कामगारांवर उपासमारीची पाळी आली, तेव्हा महाराष्ट्र सरकारने तुकाराम गणू चौधरी यांच्या हातात तिची सूत्रं दिली. रा. चौधरी यांनी ही जबाबदारी उत्तम रीतीनं पार पाडून ती मिल चार-पाच वर्षांत नफ्यात आणली. 

नंतरच्या आयुष्यात तुकाराम गणू उर्फ भाऊसाहेब टी.जी.चौधरी हे टेक्स्टाइल उद्योगात फार मोठं नाव होऊन बसलं. टेक्स्टाइल असोसिएशन ऑफ इंडियाचे ते संस्थापक सदस्य होते. कामगारांचे हितसंवर्धक म्हणून ते मोठे निस्पृह व कर्तबगार अधिकारी म्हणून अहमदाबाद, अंबाला, कानपूर, मुंबई, अमळनेर इ. ठिकाणी त्यांनी मिला उभारण्याची कामं केली आहेत.

प्रस्तुत आत्मकथन वाचल्यावर तीव्रतेनं जाणवतं हे की, सर्व मराठी व्यावसायिकांची प्रथम भाषा म्हणून मराठीचा वापर होणं अत्यंत तातडीनं झालं पाहिजे. कोणत्याही काळाचा प्रत्यक्ष दस्तऐवज म्हणून तर अशा कथनांना महत्त्व असतंच. १९२५पासून हे हस्तलिखित पडून राहण्यामागे मराठीतली त्या काळातली अलंकारिक, शुद्ध, उच्चभ्रू, रोमँटिक अभिरुची तर नसावी? कोणत्याही क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनी आपल्याला पटेल तसं आपल्या मातृभाषेत आत्मविश्वासानं लिहिता येण्यासारखी परिस्थिती त्या वेळी नसावी. घरातली पूर्वजांची एक आठवण म्हणून सांभाळून ठेवलेलं हे बाड आज तिसऱ्या पिढीनंतर प्रकाशात येत आहे. या आत्मचरित्राचं संपादन हा मोठा सुखद अनुभव होता. लोकवाङ्मय गृहाच्या पर्यायी इतिहास प्रस्थापित करण्याच्या शिरस्त्यामुळे आपल्याला एका मराठी मुलानं पंचविशीत अनुभवलेलं वास्तव वाचायला मिळतं आहे, ही उत्साहवर्धक बाब आहे.

जर्मन रहिवास – तुकाराम गणू चौधरी, संपा. भालचंद्र नेमाडे, लोकवाङ्मय गृह, मुंबई, पाने ३३६, मूल्य – ३९५ रुपये.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......