ज्येष्ठ लेखक आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद विद्याविभागाचे पहिले पूर्णवेळ विभाग प्रमुख डॉ.श्रीपाद भालचंद्र जोशी यांचे आजच्या सर्व काही माध्यम-नियंत्रित असणाऱ्या युगात ‘माध्यमांचा अन्वयार्थ’ समजावून सांगणारे हे पुस्तक आपल्या जीवनावर होणाऱ्या माध्यमांच्या सर्वांगीण परिणामांचे दर्शन घडवते. माध्यमांचा प्रभाव आणि माध्यम शिक्षणाची गरज, सहमती ‘घडवण्याचा’ अमेरिकन उद्योग, माध्यमातील हिंसादर्शन, समकालीन सामाजिकता आणि पत्रकारिता, वेबकारिता : वेबपत्रकारिता, बातम्या : मनोरुग्ण करणाऱ्या, माध्यमांच्या विश्वातले ग्राहकांचे शोषण, प्रसारमाध्यमांची स्वायत्तता : किती खरी, किती खोटी?, माध्यम साम्राज्याचे भवितव्य, अशा एकूण २० लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. अथर्व पब्लिकेशन्स, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील हा एक लेख संपादित स्वरूपात…
.................................................................................................................................................................
‘पत्रकारिता’ ही विशिष्ट संज्ञा ज्या व्यवहार, वर्तन व कार्याचा बोध करून देते, त्या अर्थाचा व्यवहार मानवी संस्कृतीत फार अलीकडचा म्हणजे गेल्या दोन-अडीच शतकांतील आहे. त्यातही त्याचे आधुनिक विकसित व्यावसायिक रूप गेल्या शे-सव्वाशे वर्षांचेच आहे. हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासात शे-सव्वाशे वर्षांतील या व्यवहाराने व हा व्यवहार ज्या साधनांनिशी, ज्या माध्यमांद्वारे घडतो, त्यातल्या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानविषयक क्रांतीने मात्र फार अचाट कामगिरी बजावली आहे. या प्रकारच्या व्यवहाराने संपूर्ण मानवी जीवन, वर्तन, परस्परसंबंध, संस्थात्मक जीवन, खाजगी जीवन, राज्यसंस्था, तत्त्वज्ञाने, संस्कृती प्रभावित करण्याचे जे वास्तव, या शे-दीडशे वर्षांत उदयाला आले, त्याने सारे जग हे एकसारखे करून परस्परांच्या अगदी शेजारी आणून उभे केले.
मानवी संस्कृतीच्या इतिहासात यापूर्वी असे अभूतपूर्व काही घडले नव्हते. संवादसाधनांमधील माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने परंपरागत पत्रकारिताही या प्रचंड मोठ्या माहिती व मनोरंजन उद्योगातील अनेक बाबींपैकी एक बाब तेवढी करून सोडली आहे. विविध प्रकारच्या विशेषीकृत पत्रकारिता आज निर्माण केल्या गेल्या आहेत.
माहिती, शिक्षण आणि मनोरंजन हे एकीकृत कार्य असलेल्या जनसंवाद, वृत्तपत्रे, नियतकालिकांच्या विश्वाचे छपाई तंत्रज्ञानाच्या उदयानंतर वाढलेले अगाध असे महत्त्व लोकशिक्षण करण्याचे आणि इष्ट अशा जीवनाकडे लोकांना वळवण्याची बांधीलकी व व्रत स्वीकारलेल्या आणि ते आपले उत्तरदायित्व मानणाऱ्या पत्रकारितेमुळे होते. त्याचे स्वरूप इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या, दृश्य माध्यमांच्या, इंटरनेट, मल्टीमीडियाच्या व माहिती महामार्गाच्या उपलब्धतेबरोबरच अंतर्बाह्य बदलत गेले. जनमत घडवण्याचे, इष्ट दिशेने ते वळवण्याचे व प्रभावीरित्या ते व्यक्त करवण्याचे सर्वाधिक महत्त्वाचे साधन म्हणून जगभर स्थान मिळवलेली पत्रकारितादेखील अंतर्बाह्य बदलत गेली.
मनोरंजन आणि शिक्षण एकत्रच करण्याचे माध्यमांचे, पत्रकारितेचे, जनसंवादाचे जे उत्तरदायित्व होते, त्यातही तंत्रज्ञानातील क्रांतीनंतर व संवादसाधनांच्या विविधतेनंतर फार मोठे बदल झाले. मनोरंजन, शिक्षण, माहिती यांचे स्वतंत्र अशा वेगवेगळ्या उद्योगांमध्ये रूपांतर झाले. मनोरंजनावर लोकशिक्षणाची जबाबदारी उरली नाही; मात्र माहिती देताना, लोकशिक्षण करताना ते अधिकाधिक मनोरंजकरित्या करण्याचा दबाव मात्र वाढला. मनोरंजन उद्योगाचे त्यामुळे माहिती उद्योगावर, लोकशिक्षणावर व एकूणच जीवनावर वर्चस्व स्थापन झाले. परिणामी वस्तुनिष्ठ स्वभावाच्या पत्रकारितेचे रूपांतर व्यक्तिनिष्ठ, गटनिष्ठ, व्यापारी, मनोरंजक, चटकदार, सुलभरित्या ग्राह्य, अतिरंजित, इच्छाचिंतक, चटपटीत, सणसणीत, अशा प्रकारचे वृत्ताचे निरनिराळे चविष्ट पदार्थ करून माध्यमांच्या ग्राहकांना वाढणाऱ्या कौशल्यामध्ये होत गेले. अशा प्रकारच्या कौशल्यधारकांमधील स्पर्धा वाढवणाऱ्या उद्योगात या व्यवसायाचे रूपांतर होत गेले. पत्रकारितेचे, व्यवसायाचेदेखील व्होकेशन अथवा प्रोफेशनचे स्वरूप संपुष्टात येत जाऊन त्यास विविध स्वरूपाच्या माहितीच्या कच्च्या मालाच्या, विविध आकारातील, विविध चवीच्या, सहज स्वीकारार्ह व बाजाराच्या सोयीच्या अशा वस्तू, प्रॉडक्ट बनवणाऱ्या मोठ्या प्रमाणावरील कारखान्याचे, उद्योगाचे स्वरूप प्राप्त होत गेले.
माहितीच्या उद्योगात मालाचे रूपांतर वृत्त व तत्सम आनुषंगिक, वस्तू, पदार्थात करण्यासाठी लागणारी तंत्र व कौशल्ये आत्मसात करण्या-करवण्याच्या उद्दिष्टांच्या शाळा-महाविद्यालये, अभ्यासक्रम यांना त्यामुळे महत्त्व प्राप्त झाले. माध्यमे व संवादाची ज्ञानशाखाच स्वतंत्र होत गेली. या ज्ञानशाखेची व्याप्ती आज एवढी आहे की, जिथे पत्रकारितेस लागणारे शिक्षण, प्रशिक्षण प्राप्त करण्यासाठी आवश्यक ती साधनसामग्री, तंत्रज्ञान तसेच शिक्षण-प्रशिक्षणाच्या कोणत्याही सोयी अथवा तज्ज्ञ शिक्षक नाहीत, अशा ठिकाणीदेखील या शिक्षण-प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवले जातात. या ज्ञानशाखेची परिपूर्ण तर सोडाच, परंतु किमान आवश्यक ज्ञान व कौशल्येदेखील पुरेशी आत्मसात केलेल्यांनाही या ज्ञान शाखेतील पदवी, पदविका व पदव्युत्तर पदवीदेखील लाभण्याची सोय झालेली आहे. माध्यमांचा, पत्रकारितेचा दर्जा घसरण्यास ज्या विविध बाबी कारणीभूत आहेत, त्यात या देशातील अशा अपुऱ्या व अर्धवट शिक्षण, प्रशिक्षण, अभ्यासक्रमांचा वाटा सर्वाधिक मोठा आहे.
पत्रकारितेबाबतची कर्तव्ये, उत्तरदायित्व आणि वास्तवाची जी सखोल व व्यापक जाण पत्रकारितेचे रीतसर, व्यावसायिक शिक्षण नसतानादेखील अगोदरच्या पत्रकारांच्या पिढ्यांना होती; किंबहुना त्यांनीच पत्रकारितेला दिलेल्या वळणामुळेच पत्रकारितेची कर्तव्ये व उत्तरदायित्व काय असतात, त्याचा वस्तुपाठ घालून दिला गेला होता; ती जाण आज संवादमाध्यमांचे (तटपुंजे) शिक्षण घेऊन आलेल्या पुढच्या पिढ्यांमधून अजिबात दिसत नाही.
एकीकडे लोकशाही व्यवस्था ही ज्या कार्यपालिका, न्यायपालिका व कायदेमंडळ या तीन स्तंभांवर आधारलेले असते, तिचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला जगभरच स्थान प्राप्त झालेले असले तरी दुसरीकडे हा आधारस्तंभ अमेरिकन विचारवंत, तत्त्वज्ञ नॉम चॉम्स्कीने म्हटल्याप्रमाने ज्याच्याजवळ किमान ६ लक्ष डालर्स (म्हणजे सुमारे तीन कोटी रुपये) आहे, तो वृत्तपत्र चालवायला स्वतंत्र आहे, अशा स्वरूपाचा झालेला आहे. ही या स्तंभाची आजची वस्तुस्थिती आहे. संवादाच्या व माहितीच्या, माध्यमांच्या नव-तंत्रज्ञानावर आधारित असा हा आजचा उद्योग झालेला असल्याने प्रचंड मोठी गुंतवणूक, मोठा दैनंदिन खर्च भागवण्याकरता लागणारा पैशाचा पुरवठा यामुळे छोटी, लघु व मध्यम वृत्तपत्रे आज जवळजवळ संपुष्टात आलेली आहेत. त्यांची जागा आज साखळी वृत्तपत्रे, साखळी माध्यमे व त्यातून उदयाला आलेल्या माध्यमसम्राटांनी घेतली आहे. पर्यायाने, माध्यमांचाच साम्राज्यवाद आज उदयाला आलेला आहे.
लघु व मध्यम वृत्तपत्रे जगवण्याच्या शासकीय उपाययोजनादेखील कल्याणकारी संस्थांनी, विशिष्ट उद्दिष्टांनी, ध्येयांनी चालवलेली वृत्तपत्रे व त्यांनी जोपासलेली ध्येयनिष्ठ, मूल्यांचा पाठपुरावा करणारी, आदर्श समाजरचनेचा विचार पुरस्कृत करणारे, लोककल्याणाला प्राधान्याने बांधलेली, शोषणाविरुद्धचे प्रभावी साधन म्हणून जिची प्रतिमा एकेकाळी जगभर निर्माण झाली होती, ती पत्रकारितादेखील अपरिहार्यपणे आज निकालात निघते आहे.
कोणत्याही प्रकारच्या सत्तेला, राज्यकर्त्यांना, व्यवस्थेला दुखापत होणार नाही, याची काळजी घेणारी, विवेक व विचारांऐवजी भावनेलाच तेवढे आवाहन करणारी ओतीव पत्रकारिता हे आजचे वास्तव आहे. उद्योगपती, व्यावसायिक हा जाहिरातदार वर्ग असल्याने व त्यांच्या आधारानेच मोठ्या वृत्तपत्रांचे मोठे अर्थकारण आज उभे असल्याने, या वर्गाच्या हितसंबंधाला बाधा पोहचणार नाही, याची दक्षता बाळगते. ती जाहिराती व जाहिरातदार उत्पादक वर्गाच्या हितासाठी चंगळवादाला प्रोत्साहन देणाऱ्या बाजाराच्या अर्थव्यवस्थेची साधनसामग्री होऊन बसलेली आहे. क्रयशक्ती असणाऱ्या वर्गापुरताच संबंध राखणारी आणि क्रयशक्ती नसलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या समस्या, प्रश्नांकडे केवळ काठाकाठाने बघणारी अथवा फारसे वळूनही न बघणारी अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या पत्रकारितेने तथाकथित व्यावसायिक पत्रकारितेचा पोशाख आज धारण केला आहे.
पत्रकारितेकडून परंपरागत आदर्श, कर्तव्य आणि उत्तरदायित्वाची अपेक्षा करताना हे वास्तव दुर्लक्षून चालणार नाही. आपल्या शक्तीचे भय निर्माण करून ‘खंडणी’ वसूल करणारी पत्रकारितादेखील, पत्रकाराच्या संघटनांना त्याबद्दल जाहीर निवेदने द्यावी लागतील, अशा प्रकारचे वास्तव म्हणून वावरते आहे. जिल्हा व तालुका पातळीवरील, पत्रकारितेचा दर्जाही नसणारी, केवळ कायद्याच्या परिभाषेत वृत्तपत्र असणाऱ्यांपैकी अनेकांनी वर्षानुवर्षं ज्या ‘खंडणी’ स्वभावाच्या कार्यासाठी ती वापरली, तो स्वभाव नागरी पातळीवरील एखाद्या प्रतिष्ठित व्यावसायिक वृत्तपत्रामधील वरिष्ठ जागेपर्यंतच्या पत्रकाराने धारण करावा, एवढ्या खालच्या पातळीपर्यंत आजचे वास्तव आलेले आहे.
‘खंडणी’ पत्रकारितेप्रमाणेच आर्थिकदृष्ट्या ब्लॅकमेल न करता राज्यकर्ते, राज्यसंस्था, प्रतिष्ठित व्यक्ती व संस्था यांच्या बाजूने, तसेच आपल्या अथवा आपल्याला ज्यांच्यात रस आहे, त्यांच्या हितसंबंधांसाठी कुणालाही वेठीस धरून त्यांच्या प्रतिमेस सार्वजनिकरित्या इजा पोहचवणारी, ‘सुपारी’ घेणारी पत्रकारिता हेदेखील आजचे अजून एक वास्तव आहे.
हे वास्तव जगभरात सारखेच आहे. त्याशिवाय विशिष्टच सत्ताधारी व ज्यांच्यात विशेष रुची आहे, अशा व्यक्तींना वेळोवेळी अथवा वारंवार प्रसिद्धी देत राहण्याची व विशिष्ट व्यक्तींना ती देणे टाळण्याची सवय लागलेली, किंबहुना अशा व्यक्तींपैकी काहींनी तसे पत्रकार आपल्या पदरीच बाळगलेले असावेत, या धर्तीची पत्रकारिता हेदेखील आजचे अजून एक वास्तव आहे. लोकांच्या खाजगी जीवनात कसलाही विधिनिषेध न बाळगता शिरणारी, व्यक्तींच्या व्यक्तिगत, भावनिक, दुःखांचा, संकटांचादेखील बाजार मांडणारी, घटनेच्या, प्रसंगाच्या साऱ्या बाजूंची तपासणी करून वृत्त सिद्ध करायचे, या आपल्या मूळ पवित्र स्वभावाचा त्याग केलेली, आपल्याला हवी तीच बाजू ठळकपणे, प्रकर्षाने ठासून जाणवून देण्याचा, प्रसंगी वकिली पद्धतीचा प्रयत्न करणारी व आपल्याला नको ती बाजू पूर्णत: दडपणारी अथवा नगण्य रितीने, लक्षातही येऊ नये, अशा रितीने कुठेतरी दडपून मोकळी होणारी पत्रकारिता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागली आहे. पर्यायाने घटना, प्रसंग, घडामोडींच्या सर्व बाजूंचा तपास करून, पुरेसा शोध घेऊन कोणतीही बाजू आपल्यामुळे अकारण कलंकित होणार नाही, याची काळजी करण्याचे सोडून आपली स्वत:चीच म्हणून एक बाजू ठरवून तीच पुढे रेटणारी, लोकजीवनात, व्यक्तिजीवनात, संस्थाजीवनात, खाजगी जीवनात जिथे जिथे म्हणून शक्य आहे, त्या त्या जीवनाच्या साऱ्याच क्षेत्रांत हस्तक्षेप करणाऱ्या स्वभावाची, विधानबाजीने भरलेली नवीच पत्रकारिता आज उदयाला आलेली आहे.
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
माध्यमांच्या या शक्तीचे मात्र भयदेखील लोकमानसात आहे. त्यामुळे तटस्थता, वस्तुनिष्ठता ही पत्रकारितेची ग्रांथिक वैशिष्ट्ये तेवढी उरतील असे भय वाटू लागले आहे. डॉक्टरकडून वैद्यकीय सेवादेखील मोफत मिळण्याची, मोठ्या पत्रपरिषदेत मोठ्या भेटींची अपेक्षा बाळगण्याची, सिनेमा हॉलमधील चित्रपट, नाट्यगृहातील नाटक, मनोरंजनाचे इतर कार्यक्रम मोफतच बघायला मिळणे, हे जणू संबंधित पत्रकारितेत असणाऱ्याचा हक्क व अधिकारच आहे. कारण त्या बदल्यात ते प्रसिद्धी देत असतात, असा व्यवहार बाळगणारी पत्रकारिता हेदेखील वास्तवच आहे.
पत्रकार आणि पत्रकारिता यांचे हे बदलते स्वभाव हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमत्तेसंबंधांत दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे.
प्रस्तुत लेखकानेच केलेल्या माध्यमाच्या नीतिमत्तेसंबंधांतील एका संशोधनपर पाहणीत पत्रकारितेच्या, माध्यमांच्या व या व्यवसायात असणाऱ्यांच्या संबंधाने जे प्रश्न उपस्थित केले गेले, हे त्या मागील तत्त्व आहे. त्याच्या प्राप्त झालेल्या उत्तराच्या विश्लेषणातून हाती आलेले निष्कर्ष हे पत्रकारितेच्या, माध्यमांच्या कर्तव्ये आणि उत्तरदायित्वासंबंधांत काय व कशा अपेक्षा कराव्या, या दृष्टीने विचार करायला लावणारे आहेत. लोकशाही ज्या पद्धतीने पोखरली गेली आहे, त्याच वास्तवाचा पत्रकारिता हा भाग असल्याने लोकशाहीचा हा आधारस्तंभदेखील तसाच पोखरला गेला आहे, हे वास्तव नीट लक्षात घेतले पाहिजे.
तशीही ही शक्ती आपले व्यावसायिक हित, व्यापारी हित व अन्य सोयी-सवलती इत्यादीसाठी राजकारणी, राज्यकर्ते व शासनसत्ता यांच्याकडूनही स्वत:ला अपरिहार्यपणे उपकृत करून घेत असतेच. मात्र अशाही परिस्थितीत पत्रकारितेचे आदर्श, कर्तव्ये आणि उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी पत्रकारिता व पत्रकार अधिकाधिक वस्तुनिष्ठ असलाच पाहिजे, याचा आग्रह कायम असतो. प्रत्यक्ष कार्य करणारा श्रमिक पत्रकार व व्यवसाय, उद्योगाचा संचालक, मालक असे दोन भिन्न वर्ग या व्यवसायात आहेत.
वृत्तपत्राचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे यापैकी कोणत्या वर्गाचे? पत्रकारांचे की मालक-संचालकांचे? असे प्रश्न नेहमीच पत्रकारितेच्या संदर्भात उपस्थित केले जात असतात, मात्र याची तिसरी बाजू अधिक महत्त्वाची आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य व त्यांचे अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, हे या दोन्ही वर्गांचे स्वातंत्र्य नसून ज्या लोकशाही प्रक्रियेचा एक आधारस्तंभ म्हणून पत्रकारिता, वृत्तपत्रे मानली जातात, त्या लोकशाहीच्या सुविहित संचालनासाठी लोकांना या माध्यमांद्वारे माहिती करून घेण्याचा, जाणून घेण्याचा जो अधिकार आहे, त्यासाठीचे हे स्वातंत्र्य आहे. पत्रकार वा संचालक, मालकाने त्या स्वातंत्र्याचा उपभोग हा जनतेसाठी घ्यायचा आहे, हे त्या मागील तत्त्व आहे. वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे माध्यमाचे स्वातंत्र्य असून हे माध्यम जनतेचे, जन-संवादाचे माध्यम आहे.
माहितीचा अधिकार हा वाचकांचा, जनतेचा अधिकार आहे, न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सत्यापर्यंत पोहचता येऊन न्याय देता-घेता यावा, यासाठी अशिलाच्या वतीने जसे वकीलपत्र धारण करून न्यायालयीन प्रक्रियेत वकील अशिलाची बाजू मांडत असतो, त्याचप्रमाणे वृत्तपत्रे, पत्रकार हे जनतेने, वाचकाने वा संभाव्य वाचकाने त्याला जाणून घेण्याचा असलेला अधिकार वृत्तपत्रे, पत्रकार यांच्यामार्फत वापरून घेतलेला असा सामाजिक अधिकार आहे. वृत्तपत्रे, पत्रकार ही जनतेची माध्यमे असून वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य हे त्यामुळे मुळात त्या विशिष्ट वृत्तपत्राचे, उद्योग-व्यवसायाचे व त्यातील व्यक्तीचे केवळ व्यक्तिगत स्वातंत्र्य नाही, ते अधिकांच्या अधिक कल्याणाचे, शोषण-अन्यायापासून मुक्तीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी असलेले सामूहिक लोकशाही स्वातंत्र्य आहे.
ज्या अमेरिकन पत्रकारितेला आदर्श पत्रकारिता समजून जगभर त्याच स्वरूपाच्या पत्रकारितेचा पुरस्कार आज चाललेला आहे. अमेरिकेत जेव्हा कोणताही कायदा संमत होण्याच्या प्रक्रियेतून जात असतो, तेव्हा हितसंबंधी गट विशेषतः ते, ज्यांच्या व्यापारी व मोठा नफा कमावण्याच्या हितसंबंधांवर अधिक परिणाम पडणार असतो, ते आपल्या सोयीची कलमे त्या कायद्यात समाविष्ट करण्याचा जीवतोड प्रयत्न करतात. आपल्याच तेवढ्या हिताचे राजकारण, अर्थकारण करणारा, नफेखोरी हेच उद्दिष्ट असणारा वर्ग यात अग्रेसर असतो. या अमेरिकन आदर्शाचे अनुसरण आज जगभर होऊ लागले आहे. भारतासारख्या राष्ट्रात ‘राडिया टेप्स’सारखी प्रकरणे ही त्याच धर्तीची आहेत. त्याला भारतातही कायदेशीर वैधता लाभावी, असे प्रयत्न होऊ लागले आहेत. अशा वर्गाची बाजू घेणारी पत्रकारिता ही लोकशाहीची रक्तवाहिनी व आधारस्तंभ कशी काय राहू शकते? वृत्तपत्र जेवढे मोठे होत जाईल, तेवढे ते अशा वर्गाच्याच अर्थकारणात हितसंबंध गुंतलेले होत जाईल, त्या तुलनेत छोटी वृत्तपत्रे आपले स्वातंत्र्य आज अधिक सुरक्षित राखू शकतात.
पत्रकारिता हे एक दर्शन आहे, पवित्र कर्तव्य, धर्म आहे, असे म्हणणे आज हास्यास्पद ठरले आहे. मानवी संस्कृतीचे संचित असलेले सारे आदर्श, ज्ञान, जनमाध्यमांच्या आजच्या प्रभावाच्या युगात दूर लोटले गेले असून जनमाध्यमांनी निर्माण केलेले भ्रामक प्रतिमांचे जग हेच आपले जग समजणारी त्रिशंकू अवस्था आज समाजाची झालेली आहे.
मानवी संस्कृतीमधील आजवरची सारी चिंतने, तत्त्वज्ञाने, आदर्श हे माणसाला साधन, संसाधन मानत नाहीत; तर मानवता, माणुसकी हे साध्य मानणारी आहेत. आजचे युग नेमके याउलट माणसाला साधन, संसाधन मानणारे व माणसाला नव्हे तर त्यांच्यातील साधनाला, संसाधन स्वरूपाला प्रतिष्ठा देणारे झालेले आहे. एकीकडे अधिकारी, व्यक्ती, संस्था याचे नियमभंग करणारे, कायदा मोडणारे वर्तन, भ्रष्टाचार इत्यादीच्या बातम्या देणारी पत्रकारिता, दुसरीकडे गैरमार्गानेदेखील आपल्या नफाप्राप्तीच्या शोधकार्यासाठी लागणारी सामग्री प्राप्त करण्याला व्यापक जनहिताच्या नावावर नैतिक ठरवते व त्या वर्तनाचे समर्थन करते, अशा दुहेरी निष्ठा स्वीकारल्या गेल्या आहेत.
अमेरिकेत तर जनमाध्यमांच्या संचालकानीच सरकारसमर्थक मेळाव्यांचे आयोजन करवून देणे व त्याचे वृत्तदेखील जणू आपण विशेष वेगळे काहीतरी देत असल्याच्या आविर्भावात देणे सुरू केलेले आहे. भारतीय वृत्तपत्रांनीही ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ कार्य सुरू केलेलेच आहे. त्यांना पत्रकारांऐवजी घटना घडवणाऱ्या ‘इव्हेंट मॅनेजर्स’ची गरज आज अधिक आहे.
मोठ्या प्रमाणावर भांडवल गुंतवणाऱ्या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी प्रभावित केलेल्या जनमाध्यम विश्वातील वाहिन्यांवरील इलेक्ट्रॉनिक पत्रकारिता, ‘ऑनलाईन’ पत्रकारिता, ‘इन्स्टंट’ पत्रकारितेने पत्रकारांना साहित्य, समाज, संस्कृती, भाषा, इतिहास, कला, आदर्श, तत्त्वज्ञाने, मूल्य इत्यादींची किमान आवश्यक जाण बाळगण्याच्या गरजेतूनदेखील आज पूर्णपणे मुक्त केलेले आहे. विविध प्रसंगी विविध ठिकाणच्या लोकांच्या व तज्ज्ञांच्या त्रोटक व तत्काळ उमटणाऱ्या प्रतिक्रिया व त्यांची नंतर केवळ जंत्रीवजा एकत्र माहिती इकडून-तिकडे पाठवत राहणे म्हणजे पत्रकारिता असेदेखील एक वेगळेच पत्रकारितेचे विश्व आज उदयाला आणले गेले आहे. लेखणीच्या जागी या, ‘वाहिनी पत्रकारिते’ने लोकांसमोर धरलेल्या माईकची स्थापना केली असून त्यामुळे अभ्यासू, चिंतनपर, विचारपूर्वक केलेल्या भाष्याची जागा अतिसामान्य व तत्काळ उमटणाच्या उथळ आणि दर्जाविहीन अशा ‘भाविक’ प्रतिक्रियांनी घेतलेली आहे.
जीवनाची खोली, उंची आणि दर्जा त्यामुळे बाधित झालेला असून एकूणच सखोल, विवेकी, आदर्श, सहिष्णू, सहनशील अशा व्यक्तींच्या व समाजाच्या जागी उथळ, अविवेकी, असहिष्णू, चंचल व आदर्शविहीन, अशा व्यक्ती व समाजाची निर्मिती करण्याची साधनसामग्री असे स्वरूप आज जनमाध्यमे व त्यातील पत्रकारितेला मोठ्या प्रमाणावर लाभते आहे.
केवळ विविध प्रकारच्या माहितीचे उकिरडे फुंकणे म्हणजे पत्रकारिता असा भ्रम नवप्रशिक्षित पत्रकारांच्या येऊ घातलेल्या पिढ्यांमध्ये त्यामुळे पसरू पाहत आहे. तो नाहीसा करून त्या जागी पुन्हा एकदा पत्रकारितेच्या जीवनाभिमुखतेचा आग्रह धरला जाण्याची गरज आज निर्माण झाली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा विकासाच्या, जीवनाच्या व्याख्या नव्याने कराव्या लागतील, विकासाच्या केवळ एकांगी अशा युरो-अमेरिकन व्याख्या सोडून विकासाच्या संकल्पनेचीच नव्याने विचारपूर्वक मांडणी करावी लागेल आणि पत्रकारितेची लोकजीवनाशी तुटत चाललेली बांधीलकी पुन:स्थापित करावी लागेल, पण हे करायचे कोणी? तर त्याचे उत्तर जनतेच्याच विवेकी दबावाने हेच आहे!
‘माध्यमांचा अन्वयार्थ’ - डॉ श्रीपाद भालचंद्र जोशी
अथर्व पब्लिकेशन्स, धुळे
पाने - १८४
मूल्य - ३२५ रुपये.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
..................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment