रिक्षावालेकाका, मर्सिडीजच्या मागे घ्या, ती डाव्या बाजूने बरोबर चाललीय…
पडघम - राज्यकारण
जयदेव डोळे
  • माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
  • Fri , 08 July 2022
  • पडघम राज्यकारण उद्धव ठाकरे Uddhav Thackeray शिवसेना Shivsena एकनाथ शिंदे Eknath Shinde भाजप BJP संघ RSS

शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून एकनाथ शिंदे तीमधून बाहेर पडले, असे ते स्वत: सांगत आहेत. म्हणजे त्यांना अन् त्यांच्यासारख्यांना काँग्रेससह काँग्रेससारख्या पक्षांची सोबत करावी लागत होती, हे त्यांना आवडत नव्हते. ज्यांचा राजकीय पिंड मुसलमान, दलित, महिला यांचा तिरस्कार करत घडला; दहशत, हाणामाऱ्या आणि दबाव यांच्याद्वारे ज्यांनी आपले बस्तान सार्वजनिक जीवनात बसवले आणि तरीही सर्वसामान्यांच्या मदतीला हाकेसरशी धावून जाणारी संघटना, अशी प्रतिमाही तयार केली, अशा कार्यकर्त्यांची अडचण झाली होती. ती शिंदे यांच्या उठावामुळे दूर झाली. यांसारख्या असंख्य कारणांनी शिवसेना दुभंगली. त्याहून काही वेगळी कारणे असू शकतात काय? २०१४पासूनचे राष्ट्रीय राजकारण त्यामागे असू शकते काय? शिवसेनेत होणारे बदल त्याला कारणीभूत असतील का?

व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण अगदी स्वाभाविकपणे ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’चे असणार. आधी भाषा, ते बोलणारे राज्य, मग ती बोलणारा माणूस यांचे प्रश्न हाताळत ठाकरे यांनी त्यांचे राजकारण राष्ट्र व धर्म या मुद्द्यांवर एकवटले. तरीही ते सांस्कृतिकच राहिले. सण, वार, उत्सव, यात्रा, जत्रा, प्रथा, परंपरा आदींचा पुरस्कार करत ते रस्त्यावर आले. समाजवादी व साम्यवादी आणि गांधीवादी सर्वोदयी यांना संपवण्यासाठी काँग्रेसने भांडवलदारांसोबत शिवसेनेला वापरले. त्यानंतर मुसलमान, पाकिस्तान, इस्लामी उपासना पद्धती यांविरुद्ध ठाकरे यांनी संघटना उभी केली. त्यामागे काँग्रेसमधले जातीयवादी पुढारी, असंतुष्ट, संधीसाधू आणि अर्थातच उद्योगपती होते.

वर्ग, विषमता, शोषण, गरिबी, हक्क, अन्याय आदी डाव्यांचे मुद्दे शिवेसेनेच्या धार्मिक म्हणजे सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या राजकारणाखाली कायमचे दबले गेले. आदित्य ठाकरे यांच्या राजकीय उदयालाही रोहिंटन मिस्त्रीलिखित ‘सच अ लाँग जर्नी’ ही इंग्रजी कादंबरी कामी आली. म्हणजे पुन्हा सांस्कृतिकच मुद्दा. या कादंबरीतले एक पात्र शिवसेनेला फॅसिस्ट संबोधते व अल्पसंख्याकांचे जगणे ती कठीण करील, असेही म्हणते. आणखीही काही तीत आहे. आदित्य यांनी ही कादंबरी मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामधून काढायला लावली.

पण यानंतर हेच आदित्य ठाकरे ‘व्हॅलेंटाईन डे’, ‘फ्रेंडशिप डे’ आदी सांस्कृतिक कार्यक्रम उधळण्यापासून शिवसैनिकांना रोखू लागले. शिक्षणाचे इंग्रजी माध्यम, महानगरी जाणीवा आणि उच्चभ्रू राहणीमान, यांमुळे आदित्यचे सांस्कृतिक राजकारण वेगळे ठरू लागले. ते धर्मद्वेष, दंगली, हिंसाचार, दहशत यांपासून दूर जात पर्यावरण, प्रदूषण, शिक्षण, उद्योग, कला आदींत रमू लागले. उद्धव यांचीही वाढ रस्त्यावरच्या राजकारणात न होता छायाचित्रण, पर्यटन या सांस्कृतिक क्षेत्रांत झाली.

साहजिकच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांसारख्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे राजकारण करणाऱ्या संघटनेला शिवसेना किती काळ आपली सोबती, सहकारी व वाटेकरी म्हणून ठेवायची, याचा विचार करायची वेळ आली. हिंदुत्व हा मुद्दा हिंदू महासभा राजकारणात वापरू शकली नाही. कारण ती पक्ष म्हणूनच अपयशी ठरली. संघाने जनसंघ-भाजप हे स्वतंत्र संघटन उभे केले व त्यातून यश मिळवले. मुसलमान, दलित, आदिवासी व महिला यांचा लोकशाही प्रजासत्ताकातला वाढता वावर ब्राह्मणी सत्तेच्या पुनरुज्जीवनाचे स्वप्न पाहणाऱ्या संघाला रुचणे शक्य नव्हते. त्यासाठी त्याने शिवसेनेला पुढे केले. मात्र २०१४पासून दोन गोष्टी घडल्या. आपण स्वबळावर राज्य करू शकतो, हे समजल्यापासून भाजप-संघ यांनी शिवसेनेला प्रतिस्पर्धक म्हणून संपवायचे ठरवले. दुसरे, शिवसेनेला हे कळले की, एक प्रादेशिक पक्ष म्हणून अस्मितेचे राजकारण करायचे तर अन्य प्रादेशिक पक्षांसारखी निधर्मी, सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागेल. अकाली दल, नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी हे पक्षही धर्मवादी राजकारण करत नाहीत, तर आपण का करा?

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

भाजपला एका म्यानात दोन तलवारी नकोत, हे उद्धव यांना उमजल्यापासून ते निधर्मी, प्रजासत्ताक, सर्वस्पर्शी सांस्कृतिक राजकारण करू लागले. त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी आघाडी करताच आपल्या हिंदुत्ववादी स्थानाचे महत्त्व ओसरणार, हे ओळखून भाजपने शिवसेनेमधल्या जुन्या राजकीय आधाराला प्रोत्साहन द्यायला सुरुवात केली. म्हणूनच बाळासाहेबांचे हिंदुत्व व तेव्हाची सेना आणि आताची बदललेली सेना, अशी फाळणी घडवली गेली.

शिवसेनेने संख्यात्मक राजकारण नाकारले. शिक्षण, सहकार, बँकिंग, शेती यांत काँग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादी यांच्याप्रमाणे काही तिने उभे केले नाही. तिचा आंदोलन, लढवय्या व सदातत्पर लौकिकही वयाप्रमाणे थकला. केवळ सत्ता आणि सत्तेमधल्या लाभांपुरते तिचे अस्तित्व राहिले. अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान यांतही सेना कच्ची राहिली. ‘भावनिक राजकारण’ हा तिचा अधिकार संघपरिवाराला जाचक ठरू लागला. आधुनिकता व जीर्णमतवाद यांतला त्याचा दुटप्पी वावर महाराष्ट्रात अडचणीचा झाला. कारण शिवसेनेने आधुनिकता, प्रगती, पुरोगामी दृष्टीकोन व म्हणून सर्वसमावेशकता स्वीकारली. तिला एकाएकी प्राप्त झालेले राज्याचे नेतृत्व संघाला असहाय्य होणारच होते. सर्व जातींतला सेनेचा स्वीकारदेखील या परिवाराला नकोसा झाला होता. सबब, भाजपने शिवसेनेचे तुकडे केले.

शिंदे सांगतात ते हिंदुत्व म्हणजे नेमके काय, हे त्यांनाही स्पष्ट करता येणार नाही. सावरकरांविषयी काही बोलता येत नव्हते, हा त्यांचा दावा अगदीच फुसका आहे. गाय, जाती व विज्ञान याबद्दलची सावरकरांची मते काँग्रेस व राष्ट्रवादी यांनी नक्कीच रुचली असती. उद्धव यांनी सौम्य, सहिष्णू व विधायक राजकारण करणे शिंदे यांना म्हणजे भाजपला नकोसे झाले होते, असा शिंदे यांच्या हिंदुत्वाचा अर्थ निघतो. उद्धव आगीच लावत नव्हते, ही शिंदे यांची अडचण!

गेली आठ वर्षे सलग शिंदे सत्तेत आहेत. शिवसेनाही आहेच. तेव्हा राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी निधी ढापला, असे म्हणण्यात काही दम नाही. या पक्षांचे संस्थात्मक राजकारण त्यांना निधीवर विसंबायला लावते. तसे शिवसेनेचे काय? म्हणजे आठ वर्षे सेना व तिचे मंत्री निव्वळ पैशावर सत्ता करत राहिले. ना आंदोलने, ना चळवळी, ना विधायक संस्थात्मक कार्य. म्हणून शिंदे उद्धव यांच्याकडे मर्सिडीज मोटार असल्याचे सांगतात, त्या वेळी स्वत:कडे सहा मोटारी असल्याचे विसरतात. भले त्या आलिशान नसोत. अजूनही रिक्षावाल्याच्या इतिहासावर जगणे, शिंदे यांना शोभत नाही. रिक्षा हे आता कष्टकऱ्याचे प्रतीक राहिलेले नाही. मीटर काढल्यापासून ती बेगुमानतेचे चिन्ह बनली आहे.

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा :

महाराष्ट्रातल्या सत्ताधारी महाविकास आघाडीत बिघाडी, पण कटकारस्थान भाजपचेच!

कोणत्या वळणावर उभा आहे महाराष्ट्र माझा? 

फडणवीस यांना खाली खेचण्यासाठी ‘उपमुख्यमंत्रीपद’ घ्यायला लावले, या तर्काला फार थोडा अर्थ आहे. भाजपच्या व्यापक रणनीतीचा हा भाग आहे!

महाराष्ट्रातल्या ‘सत्तांतरा’च्या ‘नाट्यमय घडामोडीं’च्या गदारोळात काही संवैधानिक प्रश्न उपस्थित झाले आहेत…

भाजपकडे सरकार आणि मुख्यमंत्री बनवण्याची अनेक ‘मॉडेल्स’ आहेत. फडणवीस यांना उप-मुख्यमंत्री करण्यासोबतच भाजपने ‘उप-मुख्यमंत्रीकरणा’चंही मॉडेल लाँच केलं आहे…

.................................................................................................................................................................

शिवसेनेने काँग्रेस संस्कृतीशी जोडून घेणे सत्तेपुरतेच पाहिले गेले. आतून व बाहेरून बदलून घ्यायचा शिवसेनेचा म्हणजे उद्धव यांचा यत्न चालला होता. ‘सामना’च्या अग्रलेखांची भाषा अमूलाग्र बदलली. या अडीच वर्षांत महानगरी नेत्यांची पिढी शेती आणि शेतकरी यांच्याजवळ गेली. शिक्षण, आरोग्य, दळणवळण, तंत्रज्ञान आदी विषयांत शिवसेनेला गोडी वाटू लागली. अल्पसंख्याक, महिला, विद्यार्थी, शिक्षक, उद्योजक आदी घटकांचा अभ्यास तिला करता आला.

संजय राऊत यांना महत्त्व प्राप्त होणे, याचा अर्थ लेखन-वाचन करणाऱ्यांना, तसेच दिल्लीची समज असलेल्यांना या पक्षात मान दिला जातो, हे सांगितले गेले. भाजपच्या प्रत्येक आरोपाला, अफवेला आणि गाऱ्हाण्याला सडेतोड, सतर्क व स्पष्ट उत्तर प्रथमच शिवसेना देत असल्याचे जगाला दिसले. संदर्भ, इतिहास, पुरावे आणि तर्कशुद्धता हा अग्रलेखांचा प्राण असतो. राऊत यांच्या प्रवक्तेपणाला बिनतोड स्वरूप येऊ लागले ते त्यामुळे.

वावड्या आणि टिंगल यांद्वारे भाजप सेनेची छी-थू करत असताना राऊत यांनी एकहाती सेना सावरून धरली. त्या तोडीचे किती नेते शिवसेनेत आहेत? खरे तर भरपूर असायला हवे होते. पण लेखन-वाचनाला कधीही उत्तेजन न देण्याचा परिणाम फक्त संजय राऊत एकमेवाद्वितीय होण्यात झाला. इतकी प्रसिद्धी इतरांना मत्सरी बनवल्याशिवाय राहत नाही. आता राऊतांवर जी शिंतोडबाजी चालली आहे, ती केवळ असूयेमुळे आहे. राऊतांना निशाणा करण्याचा दुसरा अर्थ संपादक, पत्रकारिता यांना आमच्या राज्यात काही किंमत नसते, हे दाखवून द्यायचे होते. सबंध भारतातले संपादक गुमान झालेले असताना एकमेव राऊत भाजपची जागा दाखवून देत होते.

उरला मुद्दा घराणेशाहीचा. भाजपचा प्रचार असा आहे की, तमाम प्रादेशिक पक्ष एकेका घराण्यात एकवटले आहेत. तिथे लोकशाही नाही. त्यामुळे ते पक्ष मोडून टाकाला हवेत! भाजपने मोदी-शहा यांच्या राज्यात लोकशाहीविषयी कळवला बाळगून प्रादेशिक पक्षांचा काटा काढणे म्हणजे आत्मपरीक्षण थांबवणे होय. कर्नाटकात १६ घराणी भाजपात असल्याचे माजी मुख्यमंत्री देवेगौडा यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात तर फडणवीस, शिंदे, गोयल, महाजन, दानवे, खडसे, विखे, मोहिते, मुंडे, निलंगेकर, राणे, गावित असे कैक आहेत. त्यामुळे आपले ठेवायचे झाकून, दुसऱ्याचे पाहायचे वाकून, असा भाजपचा कावा आहे. संघामध्ये तर परिवारच परिवार! फक्त ती घराणेशाही नाही म्हणे!

शिवसेना भांडवलदारांविरुद्ध बोलत नाही. अंबानी असोत की अदानी, टाटा असोत की बिर्ला… त्यांना सेना कधीही शत्रू मानत नव्हती. मुंबईत स्थैर्य, शांतता व सुरक्षितता यांना महत्त्व असते. ती जबाबदारी सेनेने स्वत:कडे घेतली होती. तरीही उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व भांडवलदारधार्जिणे म्हणून उघडपणे कधी व्यक्त झाले नाही. ते कदाचित दोघांचेही कौशल्य असेल. महाराष्ट्र व मराठी माणूस यांचा कैवारी म्हणून ठाकरे यांच्याकडे बघितले जायचे, तसे उद्धवकडेही. भाजपला असा प्रादेशिक पक्षपात करता येत नाही. त्यामुळे शिवसेना आणि मराठी माणूस यात जोवर फूट पडत नाही, तोवर शिवसेनेत कितीही तुकडे पडले तरी बिघडणार नाही, अशी भावना कट्टर सैनिक व्यक्त करतात. म्हणून ठाकरे यांची मर्सिडीज रस्त्याच्या डाव्या बाजूने बरोबर गेली, तर तिला अपघात होणार नाही. शिंदे यांनी उजवा मार्ग पत्करला आहे… काय होईल?

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख