दुर्गा भागवत : स्वाधीन विदुषीचे मनोज्ञ चिंतन
ग्रंथनामा - झलक
विनय हर्डीकर
  • ‘व्यक्ती आणि व्याप्ती’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 05 July 2022
  • ग्रंथनामा व्यक्ती आणि व्याप्ती Vyakti aani Vyapti विनय हर्डीकर Vinay Hardikar दुर्गा भागवत Durga Bhagwat शासन साहित्यिक आणि बांधिलकी Shasan Sahityik Ani Bandhilaki

ज्येष्ठ पत्रकार, संपादक आणि अभ्यासक विनय हर्डीकर यांचं ‘व्यक्ती आणि व्याप्ती’ हे नवं पुस्तक नुकतंच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित झालं आहे. हा व्यक्तिचित्रसंग्रह असून यात दुर्गा भागवत, गोविंद तळवलकर, म.द. हातकणंगलेकर, स्वामी अग्निवेश, वि.म. दांडेकर, शरद जोशी, हमीद दलवाई आणि ए.बी. शहा अशा आठ व्यक्तींवरील लेखांचा समावेश आहे. या संग्रहातील दुर्गाबाई भागवत यांच्या लेखाचा हा संपादित अंश... (हा लेख भागवत यांच्या ‘शासन, साहित्यिक आणि बांधिलकी’ या पुस्तकाच्या दुसर्‍या आवृत्तीसाठी लिहिलेली प्रस्तावना आहे.)

.................................................................................................................................................................

शक्तिपीठासनस्थ दुर्गाबाई आणि पायाशी बसलेले रा.ज. देशमुख आणि नरहर कुरुंदकर या स्मृतिचित्रापासूनच या पुस्तकाचा ओनामा झाला, असे म्हटले पाहिजे. रा. ज., त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई आणि नरहर कुरुंदकर या तीन मनस्वी व्यक्ती ज्यांच्यासमोर नतमस्तक व्हायच्या, अशी माणसे फार थोडी होती; मात्र दुर्गाबाईंचे स्थान त्या यादीमध्ये फार वरचे आणि अढळ होते. देशमुख पती-पत्नींना लेखकमंडळींच्या पोटात शिरण्याचे व्यसनच होते; खरे तर हाताबाहेर गेलेले होते. रोज पंक्तीला मराठी लेखकांपैकी कुणी ना कुणी त्यांना तोंडी लावण्यापुरता हवाच असायचा. त्यामुळे साहित्यिकांची किंवदन्ती (गॉसिप) सतत त्यांच्याकडे ताजी असायची. पुलंच्या भाषेत सांगायचं तर ‘साहित्यिक आणि प्रामाणिक’ दोन्ही प्रकारच्या आठवणींचा खजिना रोजच्या रोज अपडेट करणे, हे त्यांना सहज जमायचे. मी देशमुखांच्या बैठकीत १९७९ पासून आलो आणि सहसा त्या गॉसिपमध्ये- विशेषत: लेखकांच्या खासगी आयुष्यामध्ये- फार गुंतलो तर बर्‍या-वाईटाचे खापर गुंतणार्‍याच्याच माथी फुटते, हे त्या दोघांकडे पाहूनच शिकलो. मात्र रा.ज. असेपर्यंत (१९८५), वहिनी असेपर्यंत (१९९७) दुर्गाबाईंबद्दल नितांत प्रेम, आदर, श्रद्धा याशिवाय काही बरे-वाईट ऐकायला मिळाले नाही. विश्‍वास पाटील (‘अस्तित्ववाद’चे लेखक) दुर्गाबाईंचे अत्यंत निकटवर्ती - ते पुण्याला आले की देशमुखांकडेच असत. जया दडकरांचेही तेच. देशमुख गेल्यानंतरही हे दोघे वहिनींना या ना त्या प्रकारे साथ देतच होते. या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीचे (१९८८) कॉपीराइट विश्‍वासकडेच होते. दुर्गाबाईंच्या अत्यंत जवळचे अशोक शहाणेही देशमुख कंपनीमध्ये एके काळी घरचेच होते.

कुरुंदकरांचे १९८२ मध्ये १० फेब्रुवारीला झालेले आकस्मिक निधन हा सगळ्या मराठी लेखक-वाचकांवर झालेला फार मोठा आघात होता. Life imitates Art अशा प्रकारचा एक योगायोग असा की, १० फेब्रुवारी हा दुर्गाबाईंचा वाढदिवस असे. त्यांचा जन्म १९१० मधला, म्हणजे कुरुंदकरांपेक्षा त्या दीड पिढीने वडील होत्या. तरीही ज्ञानव्यवहारात सर्वच समवयस्क असतात, हे ओळखून त्यांनी कुरुंदकरांबद्दल म्हटले आहे, ‘प्रा. नरहर कुरुंदकरांच्या मागे ‘कैलासवासी’ असे विशेषण अजूनही लावण्याचे धाडस मला होत नाही, इतके ते व्यक्तिमत्त्व जिवंत आणि धडपडे होते. घडणारे, पडणारे नि पुन्हा उठून धावणारे असे व्यक्तिमत्त्व सहसा विसरायला होत नाही. त्यांना महत्त्वाकांक्षा खूप-खूप होती. तिच्यामुळे त्यांच्या टप्प्यावरचे उत्कर्षबिंदू पुष्कळच होते आणि एक-एक उत्कर्षबिंदू ते आपल्या कवेत आणीतही चालले होते.’

कुरुंदकरांचे इतके नेमके आणि वास्तव पण सहृदय वर्णन फार क्वचित वाचायला मिळेल. त्यांच्या निधनानंतर एक वर्ष उलटल्यावर दुर्गाबाईंनी ही भाषणे नांदेड मुक्कामी दिली होती. कुरुंदकरांच्या निधनाच्या आघातामधून देशमुखद्वय सावरायला वेळ लागणारच होता; त्यातच १ जून १९८५ या दिवशी देशमुखांचे निधन झाले. त्यातून सावरून पुन्हा कंपनी मार्गी लावण्यात तीन वर्षे गेली. मात्र तो अवघड काळ संपताच सुलोचनाबाईंनी १९८८मध्ये या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्या म्हणतात, ‘‘...‘शासन, साहित्यिक आणि बांधिलकी’ म्हणजे दुर्गाबाईंच्या- रा. ज. देशमुख आणि त्यांच्यामुळे देशमुख आणि कंपनीवर असलेल्या प्रेमाची खूण. रा. ज. देशमुखांच्या मागे त्यांनी माझ्यावरती एवढा विश्‍वास टाकला यासाठी त्यांची मी कृतज्ञ आहे.’’

या पुस्तकाच्या पाठीमागचे वियोगाचे, वेदनेचे सूत्र इथेच संपायला हवे होते; पण नियती आमच्यामागे हात धुऊन लागली होती. सुलोचनाबाईंनी त्यांचा भाचा रवी गोडबोले याच्या ताब्यात देशमुख कंपनी दिली होती. १५-१६ वर्षे आम्ही कंपनी सांभाळली. अगदी रा.जं.इतक्या दिमाखात नाही तरी प्रतिभावान आणि सामाजिक जाण असलेल्या लेखकांचा (सुलोचनाबाईंचे शब्द) शोध घेत राहिलो. रवी गोडबोलेंचे अगदी कुरुंदकरांचा शेवट आठवावा इतके ११ जून २०१४ या दिवशी आकस्मिक निधन झाले. त्यातून सावरण्यात पुन्हा ३-४ वर्षे गेली आणि आज ही दुसर्‍या आवृत्तीची प्रस्तावना मी लिहितो आहे. देशमुखांची आणि माझी जवळीक लक्षात घेता तो माझा हक्कच आहे, जबाबदारीही आहे. वेदनेचा ठणका असला तरीही आपले काम निष्ठेने करायचे, हे ज्या व्यक्तींकडून मी शिकलो, त्यात दुर्गाबाई आहेतच.

अजून एक कारण आहे. प्रतिभावंत आणि सामाजिक (पुढे जाऊन राजकीय) बांधिलकी या संकल्पनेची मराठीमध्ये फारशी चर्चा झालेलीच नव्हती, म्हणून दुर्गा भागवतांच्या या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रयोजन आहे. मात्र पहिली आवृत्ती फार धडाक्याने खपली नव्हती आणि तिच्यावरही खोल चर्चा झाली नव्हती, हे वास्तव स्वीकारायला हवे. तीस वर्षांनंतर दुसरी आवृत्ती वाचकांना सादर करताना मधल्या काळात या विषयाचे भारतीय आणि जागतिक पातळीवर बदललेले संदर्भ ध्यानात ठेवायला हवेत; सविस्तर लिहिले तर ते एक वेगळे पुस्तकच होईल. तरीही प्रस्तावनेच्या मर्यादेत (माझ्या मते, पुस्तकाच्या एकूण पानांच्या एक-दशांश पानांत) या विषयाची काही फेरमांडणी करणे आवश्यक आहे. आणीबाणीच्या काळात दुर्गाबाई थेट सक्रिय झाल्या म्हणून या विषयाला काही (अल्पकाळ का होईना) प्रतिष्ठा लाभली होती. त्यानंतर या विषयाला बगल देऊनच मराठी लेखक आपली बरी-वाईट लेखनकामाठी करत राहिले, हे सत्य आहे. माझा पीएच.डी.चा विषयच हा होता; मात्र बांधिलकी स्वीकारून लिहिलेल्या साहित्याच्या अपुरेपणामुळे मी प्रबंध लिहायचा नाही, असे ठरवून पत्रकारितेमध्ये गेलो; पण विषयाचा ध्यास सोडला नाही.

दुर्गा भागवत या प्रौढ संशोधिकेने हे पुस्तक लिहिले आहे, त्यामुळे त्याचा गोषवारा द्यायची जरूर नाही. प्रत्येक प्रकरणाच्या सुरुवातीला त्यांनी त्या प्रकरणामधल्या मुख्य विषयांची यादी दिलेली आहेच. ‘शासन व लेखक’, ‘बांधिलकी आणि आम्ही म्हणजे लेखक नि वाचक’, ‘बांधिलकीबद्दलचा आणखी एक विचार’, ‘स्वाधीनता आणि आम्ही’, ‘राज्यसंस्था, शासनसंस्था आणि आम्ही’ (बहुधा हे प्रकरण पुस्तक तयार करताना जोडले असावे, कारण त्यांनी ‘लेख’ म्हटले आहे.) अशा पाच दीर्घ प्रकरणांमध्ये त्यांनी या विषयाची खूप व्यापक मांडणी केली आहे. मात्र ग्रांथिक भाषा, परिभाषा अगदी मोजक्या प्रमाणात वापरून लिखाण वाचकांच्या डोक्यावरून न जाण्याची डोळस काळजीही घेतली आहे. त्यामुळे पुस्तकाची धाटणी लघुप्रबंधाचीच असली, तरी त्याची वाचनीयता अबाधित राहते. एक अभ्यासू प्रतिभा आपल्याशी संवाद करते आहे, असेच वाटते.

दुर्गाबाईंनी व्याख्याने दिली, तेव्हा आणीबाणी रद्द झाल्याला सात वर्षे झाली होती. ते संदर्भ पुसट होत चालले होते, म्हणून सुरुवातीलाच त्यांनी या चर्चेचे प्रयोजन सांगितले आहे.

‘‘आणीबाणीनं मोठंच स्थित्यंतर माझ्यात घडवून आणलं. तेव्हापासून ज्याच्या सार्वजनिक नावामध्ये लोकशाही आहे, पण व्यवहारात सरंजामशाहीच केवळ आहे, अशा आमच्या शासनाशी आम्ही साहित्यिकांनी कसं वागावं, हाच माझ्या चिंतनाचा एकमेव विषय होऊन बसला आहे. आणीबाणीपूर्वी एवढ्या प्रखरतेनं हा विषय मला जाणवला नव्हता, असं आता दुर्दैवानं म्हणावं लागत आहे. खरं तर, आम्ही साहित्यिक किंवा बुद्धिमंत व आमचे शासन हा आमचा चिरंतन चिंतनाचा आणि चिंतेचाही विषय असायला हवा होता. पण खूप-खूप काळ वाट पाहिल्यानंतर, अगणितांच्या बलिदानानंतर स्वातंत्र्याची ती दिव्य पहाट उजाडली होती. पहाटेच्या त्या धूसर प्रकाशात भावी संकटे आमच्या नजरेला जवळपास दिसलीच नाहीत. ‘आम्ही एकदाचे स्वतंत्र झालो’ या एकाच कल्पनेनं आम्ही इतके काही बेहोश झालो होतो की, ते स्वातंत्र्य किती भुसभुशीत, किती तकलादू आहे; राज्यकर्त्यांची बुद्धी भ्रष्ट होताच आम्हा नागरिकांपासून किती सहजासहजी ते स्वातंत्र्य हिरावून घेतले जाणार आहे आणि प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्याची आमची स्वाभाविक सवय तोवर गमावून बसल्याने आमची अवस्था कशी दयनीय बनणार आहे, याची कसलीच आगाऊ कल्पना आम्हाला आली नाही. आणीबाणी हा माझ्या आयुष्यातला अशा प्रकारे एक दारुण प्रसंग होता. त्या एका क्षणाने मला जे शिकवले, त्याचाच विचार मी गेली सारी वर्षे करीत आहे नि त्या चिंतनातून मला जे उमगले, जे सुचले ते मी तुम्हाला- विशेषत: आमच्या तरुणांना सांगू पाहत आहे.’’

त्या काळातल्या चिंतनामधून जे उमगले ते मी विशेषत: आमच्या तरुणांना सांगू पाहत आहे- असे त्या म्हणतात. आज त्या तरुणांनीही साठी ओलांडली असेल; मात्र प्रतिकूल परिस्थितीशी मुकाबला करण्याची स्वाभाविक सवय असणार्‍यांच्या संख्येत काही वाढ झाली आहे का, हा संशोधनाचा विषय ठरावा.

पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात आणखी एक स्पष्टोक्ती सापडते. ‘‘आपली लोकशाही फारशी जुनी नाही. नव्हे, ती बाल्यावस्थेतच आहे. अशा वेळी या प्रकारच्या प्रामाणिक, निष्काम, नैतिक रखवालदारांची आवश्यकता तर आपल्या समाजाला अधिकच आहे. पण त्यासाठी लेखक-कलावंतांनी आपले सत्त्व जपले पाहिजे. ते करायचे म्हणजे शासनाचे मिंधेपण नाकारले पाहिजे, तरच ते शासनाला जरब दाखवू शकतील आणि प्रसंगी ओढवलेल्या सत्त्वपरीक्षेत पूर्णत्वाने उत्तीर्ण होतील. सत्त्वपरीक्षेची एक खेप एकदा येऊन गेली आहे. तो अनुभव या दृष्टीने फारसा कौतुकास्पद नाही. पण अजून सर्वस्व गेलेले नाही. अजूनही आम्ही सर्व साहित्यिक ताठ कण्याने जगू शकू. मात्र यासाठी शासनाच्या अटीवर शासनाशी सहकार्य करण्याचे तंत्र नि तसले उपदेशपर मंत्र दूर ठेवले पाहिजेत. शक्यतोवर स्वत:च्या हिमतीवर जगायचे ठरविले पाहिजे.’’

आज दुर्गाबाई असत्या तर काही वेगळे म्हणाल्या असत्या का, हा प्रश्‍न प्रत्येकाने स्वत:ला विचारण्यासारखा आहे. यावर ‘खरे प्रतिभावान कायम आणीबाणीतच जगत असतात’ अशी चापलुसी करणारे तेव्हाही होते आणि आताही आहेत. दुर्गाबाईंचा ध्यास लोकशाही संस्कृतीचा आहे, नुसत्या लोकशाही राज्यव्यवस्थेचा नाही. ‘मतदानाचा हक्क आणि लोकशाहीची प्रस्थापना यात कार्यकारणभावात्मक संबंध नाही की, एक उपस्थित होताच दुसरे आपोआप अस्तित्वात येईल’ असे त्यांनी पुढे नोंदविले आहे. दुर्गाबाईंचे साहित्यिकांना आवाहन आहे ते ‘खरी लोकशाही संस्कृती’ रुजविण्यासाठी राज्यकर्त्यांना जरब बसवू शकणारे नैतिक रखवालदार बनण्याचे. ‘बिरबल-बादशहा’ नातेसंबंधांची भलावण करणार्‍या आमच्या तथाकथित प्रतिभावंतांना ही जबाबदारी स्वत:च्या डोक्यावर तेव्हाही घ्यायची नव्हती आणि आताही घ्यायची नाही. पण दुर्गाबाईंचा तसा आग्रह तेव्हाही होता, आताही असता. असा आग्रह धरताना त्यांनी केलेली अभ्यासपूर्ण मांडणी या पुस्तकाची चेतना आहे.

आणीबाणीची पावणेदोन वर्षे आणि मधली ही व्याख्याने देण्यापर्यंतची पाच-सहा वर्षे या काळात दुर्गाबाईंना दोन प्रश्‍न वारंवार विचारले गेले. आणीबाणीविरुद्ध त्या झगडल्या ते नागरिक म्हणून की लेखिका म्हणून, हा पहिला प्रश्‍न आणि शासनाशी इतक्या कठोरपणे वागणार्‍या दुर्गाबाई निरनिराळ्या भांडवलदारांचा आर्थिक आधार असलेल्या (तथाकथित?) धर्मादाय सांस्कृतिक उपक्रमांच्या व्यासपीठांवर का जातात, हा दुसरा प्रश्‍न. या दोन्ही प्रश्‍नांमागची कुत्सित बौद्धिक हिकमत ओळखण्याइतक्या बुद्धिमान त्या स्वत: असल्यामुळे दुर्गाबाईंनी पहिल्या प्रश्‍नाकडे फारसे लक्ष दिले नव्हते.

दुसरा प्रश्‍न फॅशनेबल डाव्या मंडळींनी उपस्थित केला होता आणि आणीबाणीनंतरच्या लगेचच्या काळात दुर्गाबाईंभोवती संघ, जनसंघ, उजवे भांडवलदार यांनी गर्दी केली होती, म्हणूनही त्या प्रश्‍नाचे प्रयोजन होतेच. या दुसर्‍या प्रश्‍नाला त्यांनी पहिल्या प्रकरणात उत्तर दिले आहे. ते दिल्यानंतर पुन्हा एकदा लोकशाही, बुद्धिप्रामाण्य, स्वप्नाळू आदर्शवादाच्या मर्यादा, इतिहासाचे विपर्यास, मार्क्सने लावलेला इतिहासाचा वेगळा अर्थ, व्यक्ती एकाच वेळी स्वतंत्र असतेही आणि त्याच वेळी इतर अनेक घटकांवर अवलंबूनही असते, इत्यादी मुद्द्यांची चर्चा केली आहे.

दुसर्‍या प्रकरणात दुर्गाबाईंनी बांधिलकी या मुख्य विषयाला हात घातला आहे. मराठीत हा शब्द प्रथम वापरण्याचे श्रेय अर्थातच अशोक शहाणे (दुर्गाबाईंचे सहकारी, मित्र, आप्त) यांचे होते. ते त्यांनी मान्य केले आहे; मात्र शहाण्यांनीसुद्धा बांधिलकी शब्दाचा अर्थ अस्पष्ट ठेवल्यामुळे उडालेल्या गोंधळावर बोटही ठेवले आहे. साहित्यिकांच्या बांधिलकीच्या विचाराचा इतिहास त्या ज्याँ पॉल सार्त्र या फ्रेंच विचारवंत-लेखकापासून करतात. Commitment हा मूळ शब्द नव्हता. मूळ फ्रेंच शब्द ‘आंगाजमा’ (engage) असा होता. Commit या क्रियापदाचा मूळ अर्थ वाईट होता, हे नोंदवले आहे. सार्त्र जे Absurdityचे वास्तव मांडतो, मानवी जीवनाची निरर्थकता व निष्काम कर्मयोग यांची काही सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यानंतर दुर्गाबाईंनी व्यक्तिनिष्ठ व वस्तुनिष्ठ- म्हणजे व्यक्तीची बांधिलकी आणि विचाराची बांधिलकी असे दोन प्रवाह सांगितले आहेत.

लेनिन, चेरनायशेव्ह, इझ्दानोव्ह (दुर्गाबाईंनी झाडनोव्ह असा उच्चार केला आहे. मूळ उच्चार मला डॉ.अशोक केळकरांनी सांगितला होता. दुर्गाबाईंची चूक दुरुस्त करण्याइतका ‘अविनय’ मी दाखवू इच्छित नाही; तेव्हा त्यांचाच उच्चार कायम ठेवला आहे.) इतरही काही युरोपीय लेखक-नाटककारांची चर्चा केल्यावर सार्त्रच्या वाङ्मयीन बांधिलकीच्या मांडणीचा परामर्श त्या घेतात. तरुणांनी कोणत्या ना कोणत्या तत्त्वाशी बांधिलकी ठेवली पाहिजे, या भूमिकेतला धोका स्पष्ट करतात. ‘‘कमिटेड औरंगजेब, कमिटेड स्टालिन, त्याच जातीचे नाझी आणि अन्य देशी-विदेशी माथेफिरू यांच्या नादी लागण्याआधी सर्वंकष विचार करा,’’ असे युवकांना सांगून झाल्यावर ‘वाईटाची बांधिलकी टाळावी, पण चांगल्याची स्वीकारायला काय हरकत आहे?’ या भूमिकेचा परामर्श तिसर्‍या प्रकरणात घेऊ, असे सुचवितात.

डॅनिश तत्त्वज्ञ सोरेन किर्केगार्डच्या भूमिकेची फार खोल चर्चा या प्रकरणात आहे. बांधिलकीसाठी बुद्धीचा उपयोग नाही. श्रद्धाच बांधिलकी निर्माण करते आणि निभावण्याची शक्ती देते, ही त्याची भूमिका. या भूमिकेमुळे इतिहासात ओढवलेले अनर्थ तुम्हीच शोधून पाहा, असा गृहपाठ वाचकांना देऊन दुर्गाबाई ‘मानवी बुद्धीला मर्यादा असल्या तरी त्या ओलांडण्याची ताकद बुद्धीतच असते’, हे सत्य सांगतात. बांधिलकी मानून एखादी व्यक्ती, विचार, संघटना, पक्ष, पंथ यांच्यामध्ये राहिल्याने मिळणारी सुरक्षितता किती फसवी असते, याचे विवरण करतात. जाता-जाता तथाकथित अ‍ॅक्टिव्हिस्ट मंडळी बैठे काम करणार्‍या बुद्धिमंतांना कशी तुच्छ लेखतात, हे आठवून त्यांचाही समाचार बाईंनी घेतला आहे. प्रकरणाच्या शेवटी-शेवटी त्या म्हणतात, ‘‘सत्ययुगाच्या प्रवेशद्वाराची किल्ली फक्त आमच्याच हाती आहे- असा कंठशोष करणारे पवित्र ग्रंथ, पवित्र प्रेषित, पवित्र पंथ आणि पक्ष, साधू आणि सद्गुरू, योगी आणि जोगी तसेच ठार वेडे आजवर या जगात काय थोडे होऊन गेले, की ज्यांच्या तथाकथित अंतिम भाकितांचा अनुभव आम्ही घेतलेला नाही? स्वत:च्या भ्रामक मोठेपणाच्या कल्पनेने भरलेल्या भ्रमिष्टांची संख्या या जगात कमी नाही. परंतु खोट्या घोषणांवर भोळ्या-भाबड्यांना झुलवून त्यांच्या जीवावर स्वत:ची तुंबडी भरू पाहणार्‍यांची संख्याही या जगात काही कमी नाही.’’ हे शब्द आजही जसेच्या तसे लागू आहेत. सर्वंकष विचाराची सार्वकालिकता अशी असते.

चौथ्या प्रकरणात मात्र कृतिशील दुर्गाबाईंची जागा तत्त्वज्ञानाच्या भाष्यकार ललित लेखिका दुर्गा भागवतांनी घेतली आहे. हे प्रकरण अत्यंत वाचनीय आहे. ‘स्वत:ची स्वत:शी बांधिलकी’ हा अध्यात्म आणि अस्तित्ववाद या दोन्ही विचारांत समान असणारा धागा पकडून त्या गौतम बुद्धाकडे येतात. (हे विषयांतरासारखे वाटते, पण ते स्वाभाविकही होते. ‘मी कुठेही वक्ता म्हणून गेले तरी आणीबाणीवरच बोलणार’ असे त्या आणीबाणीच्या पावणेदोन वर्षांत म्हणत; पण बुद्ध हा तर त्यांचा जीवनभराचा ध्यास/अभ्यासविषय. त्यामुळे आणीबाणीमुळे द्याव्या लागलेल्या व्याख्यानांत तो डोकावला नसता, तरच नवल!) बुद्धाला सत्य सापडले होते तरीही इतरांवर त्याने ते लादले नाही, ‘तर तुमचे सत्य तुम्ही शोधा’ असा उपदेश केला, हा त्यातला कळीचा मुद्दा. परंपरावादी आणि चिकित्सक, परिवर्तनवादी भूमिकांचा संघर्ष चिरंतनच असतो; पण त्यात बुद्धाने एक नैतिक, प्रामाणिक भूमिका घेतली होती. बुद्धाने परंपरेच्या किचकट चर्चेच्या जंजाळात न अडकता, जीवनातले दु:ख-वेदना-ताप यांतून मुक्त होण्याचा मार्ग शोधला होता (मार्क्सचीही तीच धडपड होती), हे त्याचे वेगळेपण बाईंनी अधोरेखित केले आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ज्यू, ख्रिश्चॅनिटी, इस्लाम हे एकेश्‍वरवादी धर्म, अज्ञेयवादी हिंदू धर्म- पण मूर्तिपूजा मानणारा आणि ईश्‍वर न मानणारे जैन, बौद्ध धर्म यांची जीवनातल्या दु:खाकडे पाहण्याची पद्धती, कर्मविपाकाच्या कायद्याने त्यावर दिलेले उत्तर इ. मांडून बुद्धाने मनुष्याला ‘स्वाधीन’पणे जगण्याचा संदेश दिला, हे त्याचे मोठेपण दुर्गाबाई नोंदवितात. स्वातंत्र्य आणि स्वाधीनता यातला फरकही दाखवतात. निर्णयभय (सुंदर शब्द!) स्वाधीनतेच्या आड येते, त्यातून जबाबदारी टाळण्याची वृत्ती येते, हेही त्यांनी स्पष्टपणे बजावले आहे.

शेवटी महाकाव्यांच्या तोडीच्या साहित्यकृती आधुनिक काळात झाल्या नाहीत, ही खंतही त्यांनी व्यक्त केली आहे. एक वाक्य फार बोलके आहे. ‘‘खरे तर ललित वाङ्मयातून व्यक्त होणारी नैतिकता हेच त्या वाङ्मयाचे खरे समर्थन असू शकते; मात्र नैतिकता या शब्दाचा अर्थ नैतिक उपदेश असा घ्यायचा नाही.’’ यावर काही भाष्य करण्याची गरज नाही. शेवटी आगरकर, राजवाडे, सॉक्रेटिस, गांधी या (त्यांच्या मते) ‘स्वाधीन’ व्यक्तींची आठवण त्यांनी केली आहे. ‘‘अशी चार-दोन माणसे तरी प्रत्येक समाजात हवीत, तरच तो समाज जिवंत आहे असे म्हणता येते; तरच जगण्याची शान आणि जगण्यात खरी मजा.’’ असे म्हणून हे व्याख्यान (लेखन) त्यांनी संपवले.

पाचवे प्रकरण नंतर लिहिले असावे. दुर्गाबाईंनाही आपली मांडणी अतिव्याप्त झाली, हे जाणवले होते. कारण हे पाचवे प्रकरण पूर्णपणे राज्यसंस्था, शासनसंस्था आणि आम्ही या विषयाची व्यावहारिक बाजू दाखवणारे आहे. ‘समाजाची सांस्कृतिक उन्नती साधणे हे राज्यसंस्थेचे कार्य आहे’ हे त्यांचे वाक्य सगळ्या राज्यसंस्थांमध्ये ठळकपणे दिसेल असे लावायला हवे. राज्यसंस्था आवश्यक आहे म्हणून त्या-त्या काळातले शासनही आवश्यकच असते. या फसवणुकीच्या भूमिकेचे सडेतोड खंडन करून ‘‘तेव्हा शासनाचा प्रत्यक्ष व्यवहार पाहून व तपासून आणि खर्‍या हेतूचा कयास बांधूनच शासनाशी व पर्यायाने राज्यसंस्थेशी काय ते सहकार्य केले पाहिजे’’, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. राज्यसंस्था आणि संस्कृती व स्वातंत्र्याचे मूल्य, स्वातंत्र्य, समता व उदारमतवाद हेही विषय त्यांनी विचारात घेतले आणि उदारमतवाद हा शब्द गढूळ झाला असल्याची टिप्पणी केली आहे.

या विचारपरंपरेचे मुख्य आधार म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य आणि समानता यांच्या आचरणामध्ये येणारे प्रश्‍न त्यांनी विचारात घेऊन समाजातील रंजल्या-गांजलेल्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी एकेकट्या व्यक्तीचे स्वातंत्र्य जरा बाजूला ठेवले तर काय हरकत आहे, ही भूमिकाही खोडून काढली आहे. यानंतर समतावाद (इगॅलिटेरियानिझम), राजकीय हक्क, उदारमतवाद आणि साहित्यिक यांची अभिन्नता, सर्जनशील व्यक्तीची कल्पनाशक्ती मुक्त ठेवण्याची उदारमतवादाची शक्ती वगैरे मुद्दे मांडून ‘सर्जनशील व्यक्तीची प्रतिष्ठा व स्वातंत्र्य मानणारे शासन’ लोककल्याणकारी म्हणता येईल, अशा निष्कर्षापाशी दुर्गाबाई येतात. पुन्हा एकदा त्यांनी नेहरू-गांधी घराण्याची चर्चा करून हे शासन सरंजामशाही प्रवृत्तीचे आहे, त्यामुळे त्याच्याशी सहकार्य करू नये, असे ठामपणे म्हटले आहे.

समारोप असा- ‘‘लेखक-कलावंत मुक्त कल्पनाशक्तीवर जगतात. म्हणून जे शासन या कल्पनाशक्तीचा संकोच करू पाहते, ते शासन त्यांचा शत्रूच आहे. या भावी संकटातून लोकांना बाहेर काढणे, निदान तशा प्रकारचा प्रयत्न करीत राहणे- हे मग लेखक-कलावंत यांचे आद्यकर्तव्य ठरते. हे कर्तव्य राज्यकर्त्यांच्या मागून हिंडल्याने पार पडणार नाही किंवा लाल दिव्याच्या गाडीतून हिंडल्यानेही पार पडणार नाही. अनेक बड्यांच्या विरोधात एकट्याने ठाम उभे राहण्याचे धैर्य अंगी बाणवल्यानेच ते कर्तव्य पार पडेल.’’ हे प्रचीतीचे बोलणे!

दुर्गाबाईंच्या व्याख्यानांचे पुस्तक तयार करण्याचे काम सुरू असताना मी देशमुख कंपनीच्या दैनंदिन संपर्कात नव्हतो. त्यामुळे मूळ हस्तलिखितावर काम करण्याची संधी मला मिळाली नाही. माझ्या हातात पुस्तकाची छापील प्रतच आली. (या दुसर्‍या आवृत्तीसाठीही मी फक्त प्रूफरीडिंग केले आहे.) पुस्तक वाचून झाल्यावर तेव्हाही आणि आताही काही मुद्दे उपस्थित करणे उपयुक्त ठरेल.

व्यक्तिस्वातंत्र्य हे सर्वश्रेष्ठ मूल्य आहे. ते असेल, तरच तो समाज सुसंस्कृत मानता येईल, याबद्दल दुमत नाही; मात्र स्वातंत्र्य ही माणसाची मूळ प्रेरणा आहे का, की माणूस आणि इतर प्राणी, जीव-जंतू, कीटक हे सगळे मुळात जिवंत राहण्याची, टिकून राहण्याची जी पराकाष्ठा करतात, ती त्यांची मुख्य प्रेरणा आहे? हजारो वर्षांचा गुलामगिरीचा इतिहास हेच दर्शवितो की- व्यक्तिस्वातंत्र्य गमावूनही माणसे जिवंत राहतात, वंश वाढवतात, इंद्रियसुख मिळवतात आणि त्यातली काही सर्जनशीलही असतात. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य स्पृहणीय (desirable) आणि संपादनीय (attainable) या गटात मोडते; ते गृहीत धरता येत नाही. ‘आणीबाणीमुळे माझ्या दैनंदिन आयुष्यात जर काहीच फरक पडला नाही, तर मी तिचा निषेध का करावा?’ असा प्रश्‍न विचारणारी असंख्य माणसे दुर्गाबाईंनी पाहिली नव्हती, असे होणे शक्य नाही.

लेखक-कलावंत म्हणजे नेमके कोण आणि त्यातले सर्वच सर्जनशील असतात आणि स्वत:च्या स्वातंत्र्याचा (सुरक्षिततेमधून मिळणार्‍या मोकळ्या वेळाचा, पैशाचा) उपयोग ते मुक्त कल्पनाशक्तीमधून नवनवीन शोधण्यासाठी करतात, हे दुर्गाबाईंनी फारच अतिव्याप्त विधान केले आहे. शिवाय लेखन, अभिनय, गायन, चित्र काढणे, मूर्ती बनवणे, कापड विणणे, भांडी घडवणे, आराम देणार्‍या साधनांची उपलब्धता वाढवणे- या सर्व मुळात ‘कला’ असल्या तरी बहुसंख्यांसाठी हे सर्व व्यवसायही असतात आणि व्यवसायाची आर्थिक संरचना व ग्राहकाचे समाधान करून स्वत:ची उपजीविका चालवणे यासाठी किमान फायदा कमावणे, ही बंधने त्यांच्यावर असणारच. आणि समाज जितका बाजारव्यवस्थेकडे झुकत जातो, तितकी ही बंधने वाढत जातात. ‘लोकांना आवडते ते आम्हाला करावेच लागते’ ही तक्रार नसते; तो कबुलीजबाबच असतो. शिवाय एरवी यांनी काही वेगळे केले असते आणि ते संस्कृतीत भर घालणारे ठरले असते, अशी हमी देता येत नाही. पूर्णपणे ‘मुक्त’ लेखक, कवी, गायक, चित्रपटकार, नट, चित्र/शिल्पकार यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचे सुरस कमी आणि चमत्कारिक जास्त असे नमुने सर्वच समाजात भरपूर दिसतात.

भांडवलदार आणि शासन यांची तुलना करताना मानवी मूल्यांवर आक्रमण करण्याच्या या दोघांच्या शक्तीमध्ये फरक आहे; तुलनेने सरकारकडे ही शक्ती जास्त असते. सरकार दमन करू शकते, भांडवलदार तसे करू शकत नाहीत. हे प्रतिपादन ठोस वाटले, तरी त्याला अनुभवाचा आधार मिळत नाही. प्रगत बाजार अर्थव्यवस्थेमध्ये तर पूंजीपतीच शासनाची शैली आणि शासनामध्ये कोण व्यक्ती कुठल्या स्थानावर असतील, हे ठरवतात. म्हणून तर जागतिक शांततेसाठी धडपडणार्‍या केनेडींची त्यांच्या ‘व्यक्तिस्वातंत्र्याचा पाळणा’ म्हणावा अशा देशात दिवसाढवळ्या हत्या होते. भारतासारख्या अविकसित आणि सरंजामशाही समाजवादी अर्थव्यवस्थेत तर भांडवलदार आणि शासनाचे संगनमत असते. लायसेन्स परमिटराजचा दुर्गाबाईंना व्यक्तिश: फारसा अनुभव नसणारच. पण एकाच वेळी समाजाला लागणार्‍या सर्व गरजेच्या वस्तू आणि त्यांची उपलब्धता, विक्रीची किंमत या दोघांच्या संगनमतातून ठरत होती आणि समाजातल्या विचार करू शकणार्‍या मोजक्या व्यक्तींना पारितोषिक, पदे, शिष्यवृत्त्या, परदेशगमनाच्या संधी यांची खैरात करून त्यांना आपल्या कटात सामील करण्याचे किंवा निदान गप्प करण्याचे हे कारस्थान होते. आजही यात फरक पडलेला नाही; दोन्हीही बाजूंनी. देणारे आहेतच, पण घेणार्‍यांची संख्या कदाचित वाढतच चालली आहे.

‘निर्णयभय’ असा अप्रतिम शब्द दुर्गाबाईंनी योजला आहे. ‘प्रत्येक लेखकाने मराठी भाषेला निदान तीन नवे शब्द/वाक्प्रचार द्यावेत’ असा त्यांचा आग्रह असे. त्यांच्या नावावर हा शब्द नक्की जमा होईल. निर्णयभयावर मात केली पाहिजे आणि ती करता येते, हे तर त्यांच्या आयुष्याचे सूत्र होते; मात्र मराठी लेखक-कलावंतांना इथेही झुकते माप त्या देतात, असे वाटते. ‘मौनं सर्वार्थ साधनम्’, ‘बाका प्रसंग आला की मिठाची गुळणी धरून बसावं’, ‘नरो वा कुंजरो वा’ अशी चतुर, चापलुसी करावी हे तर महाभारतापासून चालू आहे.

‘निर्णयभया’वर मात करण्यासाठी मराठी लेखक निर्भय होण्यापेक्षा ‘अनिर्णय सोय’ हा मार्ग पत्करतात, हे खेदजनक वास्तव आणीबाणीनंतर दिसलेच. ‘अनिर्णय सोय’ वापरणार्‍यांचे दोन गट होते. पहिला गट प्रामाणिक वाटणारा- ‘आम्ही आणीबाणीसमोर झुकलो, याबद्दल वाचकांची क्षमा मागतो.’ एवढे एक वाक्य उच्चारून ही मंडळी जणू काही ‘काही घडलंच नव्हतं’ अशा अभिनिवेशाने पुन्हा एकदा लेखण्या पाजळू लागली. दुसर्‍या गटाने तर बाईंची निर्भयता ही व्यक्ती म्हणून होती, लेखिका म्हणून नव्हती- अशी निंद्य मखलाशी चालू ठेवली. ‘निर्णयभया’वर मात करून हाती तलवार घेण्यापेक्षा ‘निर्णयभया’चा उपयोग ढाल म्हणूनच झाला.

व्यक्तीची बांधिलकी मूलत: स्वत:शी असणार; मात्र ही व्यक्ती अनेक बंधनांचे ओझे घेऊन जन्माला येत असते. स्वत:चे शरीर, रूप, वंश, भाषा, धर्म, संस्कृती, कुटुंब, समाज; भारतामध्ये जात, विकासाच्या संधी, इतर व्यक्तींच्या आशा-आकांक्षा यांच्या ओझ्यामधून व्यक्तीचे निर्णयस्वातंत्र्य जन्मत:च धोक्यात आलेले असते. त्यामधून जीवनात दु:खे अनुभवावी लागतात. त्यातून सुटण्यासाठी व्यक्तीने एकीकडे स्वत: अंतिम सत्याचा शोध घेत राहावे आणि दुसरीकडे इतरांबद्दल निखळ करुणा बाळगावी; यातून व्यक्ती ‘स्वाधीन’ होईल. मग तिला कोणी बांधून ठेवू शकणार नाही, ती व्यवहारात असूनही व्यवहारापासून मुक्त असेल. अशा व्यक्तींच्या बाबतीत त्यांची कशाशी, कुणाशी बांधिलकी आहे की नाही, हा प्रश्‍नच विचारता येणार नाही. ही मांडणी उत्कट असली तरी इथे दुर्गाबाई स्वप्नाळू होऊन आदर्शवादाकडे झुकताहेत. त्या स्वत: तशाच जगल्या होत्या म्हणून तसे मांडण्याचा त्यांना अधिकारही आहे. मात्र त्यांनी उल्लेख केलेली आगरकर, राजवाडे, सॉक्रेटिस, गांधी ही माणसे पूर्णपणे ‘स्वाधीन’ होती का? आपापल्या विचाराशी-कार्यक्षेत्राशी पहिले तिघे बांधील होते, पण त्यांची मानवी वेदनेपासून सुटका झाली, त्यांच्यामुळे त्यांच्या निकटवतर्ीयांना वेदना सहन कराव्या लागल्या नाहीत, असे घडले नाही. गांधींनी स्वत: हिमालयाएवढ्या चुका केल्या याची कबुली दिली, म्हणून दुर्गाबाईंना ते ‘स्वाधीन’ वाटतात आणि नेहरूंनी कबुली दिली नाही, म्हणून दुर्गाबाई त्यांची परखड संभावना करतात. प्रश्‍न असा- ‘स्वाधीन’ मंडळींच्या चुकांची किंमत समाजाला मोजावी लागते; मग त्या स्वाधीनतेने कोणाचे भले झाले?

दुर्गाबाईंनीच तिथेच उत्तर दिले आहे. प्रत्येक समाजात अशी मोजकी माणसे तरी असायला हवीत, हे बरोबर आहे. सगळी माणसे निर्णयभयावर मात करून स्वाधीन झाली तर मोठा अनवस्था प्रसंग निर्माण होईल. दुर्गाबाई आदर्शवादाकडे झुकतात, पण अराजक त्यांना नको आहे. आणखी एक प्रश्‍न असा उभा राहतो की, अशा दोन-चार व्यक्ती समाजात असणे पुरेसे असेल तर इतरांच्या- लेखक-कलावंतांसकट- स्वातंत्र्याचे रक्षण करण्याला काय अर्थ उरतो? त्यासाठी इतका आटापिटा कशाला? आज ना उद्या आणीबाणी उठलीच असती; मग मूग गिळणार्‍यांचे काय चुकले? व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य स्वीकारले की बांधिलकी हे जोखड वाटू लागते आणि बांधिलकीचा विषय जीवनविषयक तत्त्वज्ञानाच्या जंगलात नेला की चर्चा अतिव्याप्त होऊन पार भरकटते. हा तिढा जुना आहे. सोय अशी की, या दोन्ही मार्गांनी गेल्यावर ‘बांधिलकी नकोच’ हे उत्तर सहज सापडते. बांधिलकी म्हणजे स्वातंत्र्य गमावणे, सेन्सॉरशिप स्वीकारणे, राजकीय पक्षाची हुकूमशाही ओढवून घेणे, एकच व्यक्ती- ग्रंथ-रणनीती यांना शरण जाणे असे अर्थ काढले की मुळात बांधिलकीचा मुद्दा निकालात काढता येतो.

या चर्चेचे खरे आयाम वेगळे आहेत. प्रतिभावंतांची इतरांवर प्रभाव पाडण्याची क्षमता ही सर्वांच्याच अनुभवाची गोष्ट आहे. त्यामुळे समाज-नियमनामध्ये त्यांचे स्थान महत्त्वाचेच असणार, हेही सर्वमान्य आहे. सर्जनशीलतेला ध्येयवादी आणि सत्ताधारी सतत बिचकूनच असतात. या संदर्भात स्पष्ट भूमिका प्रथम प्लेटोने त्याच्या ‘द रिपब्लिक’ या संवाद-ग्रंथामध्ये घेतली होती आणि रूढ सामाजिक संकेतांना धक्का देणार्‍यांना या रिपब्लिकमध्ये स्थान नसेल, अशी भूमिका मांडली होती. अशीच काहीशी भूमिका टॉलस्टॉयने शेक्सपिअरच्या बाबतीत घेतल्याचे उदाहरण आहे. सॉक्रेटिसच्या विद्वत्तेबद्दल वाद नव्हता; पण त्या विद्वत्तेच्या प्रभावाचा धाक वाटत होता, म्हणून त्याला विषाचा प्याला प्यावा लागला.

मधल्या काळात प्रेषित, धर्मसंस्था, धर्मग्रंथ, धर्मयुद्धे त्या-त्या धर्मातल्या रूढी, प्रथा, कर्मकांडे यांनी व्यक्तीचे स्वातंत्र्य नावाची संकल्पनाही पुसून टाकली होती. भारतात त्याला कर्मविपाक आणि जातिसंस्थेने हातभार लावला. भारताने निदान अध्यात्म आणि भक्ती हे दोन रस्ते सर्वांना मोकळे ठेवले होते. बुद्धाने त्यात ‘प्रत्येकाने स्वत:चे सत्य शोधावे’ अशी भर घातली होती. तरी रोजच्या जगण्यात व्यक्तीची गुलामी कायम होती; बहुसंख्य गुलामांनी ती स्वीकारलीही होती. मार्क्सने या चर्चेचे आयाम निर्णायकपणे बदलून टाकले. ईश्‍वर, प्रेषित, धर्मगुरू यांचे जग अन्याय, शोषण, वेदना यांनी भरले आहे; ते बदलले पाहिजे आणि बदलता येईल, असा स्पष्ट विचार मांडून त्याने दु:खमय जीवन स्वीकारून पारमार्थिक मुक्ती मिळवण्याचा संदेश देणार्‍या तत्त्वज्ञांच्या श्रीमुखातच भडकावली. मार्क्सकडे व्यक्तिस्वातंत्र्याच्या मूल्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणूनच पाहिले पाहिजे; कारण काही मोजक्या, स्वतंत्र विचाराच्या व्यक्तींना हे जग बदलता येईल आणि ते बदलले पाहिजे असे वाटले तर त्यांचा विरोध हा व्यक्तिस्वातंत्र्याचा विरोध ठरेल. तसे करणे तत्त्वाला सोडून होईल.

दुर्गाबाईंनी ज्या सार्त्रच्या विचारांचा सविस्तर ऊहापोह केला, त्या सार्त्रचे बांधिलकीविषयीचे विचार ही मार्क्सपासून सुरू झालेल्या प्रतिभावंतांच्या समाजातल्या स्थानाविषयीच्या चर्चेची प्रतिक्रिया होती. मार्क्सपासून प्रेरणा घेऊन जग बदलण्याची मोहीम रशियापासून सुरू करणार्‍या लेनिनच्या ‘Party Organisation and Party Literature’ या व्याख्यानामध्ये ती भूमिका सविस्तर आली आहे. ‘‘आपली क्रांती अद्याप पूर्ण झालेली नाही. झारशाहीची पाळेमुळे अजूनही तग धरून आहेत. ही क्रांती परिपूर्ण करण्यासाठी नव्या साहित्याची गरज आहे. नव्या जाणिवांचे लेखकच ते निर्माण करू शकतील. असेच लेखक पार्टीला हवे आहेत. वाङ्मय आणि उत्पादक श्रम करणार्‍यांच्या मुक्तीचे ध्येय यांची एकरूपता झाली पाहिजे. वाङ्मय हे या महान लोकशाही समाजवादी यंत्रामधल्या कॉग (खीळ) आणि स्क्रूप्रमाणे असायला हवे. सुसंघटित, नियोजित आणि सर्वंकष पक्षकार्याचाच तो भाग असायला हवा.’’

लेनिन चळवळीचा नेता होता, राजकारणी होता, उत्तम वक्ता तर होताच, हे लक्षात घेऊन या भाषणामधली आक्रमकता जरा बाजूला ठेवली; तर मुळात लेखकांनी कम्युनिस्ट विचार स्वीकारून, पक्षाची बांधिलकी स्वीकारून नवा रशिया उभा करण्याच्या प्रयत्नात सहभागी व्हावे, होणार नाहीत त्यांचा धिक्कार असो, हे आवाहन सकारात्मक होते- हाच निष्कर्ष काढावा लागतो. लेनिनने ‘पार्टी लिटरेचर’ असे म्हटले होते. एकूण लिटरेचर असे शब्द वापरले नव्हते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. लेनिनच्या या आवाहनाला रशियात आणि युरोपात प्रतिसादही मिळाला होता, हा इतिहास आहे. मात्र लेनिनच्या मृत्यूनंतर पक्ष, पक्ष संघटना, पक्षाचे तत्त्वज्ञान, पक्षाची रणनीती या सगळ्यांची बेरीज म्हणजे स्टालिन, अशी दुरवस्था झाली. स्टालिनविरोधक रशिया सोडून गेले, तरी काहींच्या हत्या झाल्या, इतरांना छळ-छावण्यांमध्ये धाडण्यात आले. त्यात बुद्धिवंत, विचारवंत, प्रतिभावंत सगळेच भरडून निघाले. या सगळ्यांमध्ये सशक्त परंपरा असलेले रशियन साहित्य कायमचे गुदमरले, हेही सत्य आहे. तरीही लेनिनचे मूळ आवाहन लेखकांना घाण्याला जुंपण्यासाठी होते, असे म्हणता येत नाही. तसे असते तर रशियाबाहेरच्या देशांत या आवाहनाला पाठिंबा मिळाला नसता; स्पेनमधल्या यादवी युद्धात युरोपीय देशातले लेखक, कवी, कलावंत यांची ‘इंटरनॅशनल बिग्रेड’ लढलीच नसती.

नव्या समाज घडवण्याच्या प्रयत्नामध्ये आपले योगदान देण्याची संधी अशा भावनेने प्रतिभावंत, कलावंत, साहित्यिक बांधिलकीच्या मागणीकडे (सक्तीकडे नव्हे) पाहतील का, हा मोठा यक्षप्रश्‍न आहे. आपल्याभोवतीचा समाज निर्दोष तर कधीच नसतो. त्यातले काही प्रमुख दोष-विसंगती ओळखून, त्यांचा अभ्यास करून ते दूर करण्यासाठी लेखणीचा वापर करणे खरेच भयंकर, अवघड आहे का- असा प्रश्‍न लेखकांना का पडत नाही?

भारतीय संदर्भात हा विषय जास्त गुंतागुंतीचा आहे; कारण पूर्वसंचिताप्रमाणेच या जन्मीचे कर्म ठरत असते, या भ्रमाचा पगडा अजूनही मोठ्या जनसंख्येवरती आहेच. त्यातच भाषा, जात, भौगोलिक परिस्थितीमधली जीवघेणी विविधता ही गुंतागुंत प्रश्‍नांची तीव्रता अधिकच वाढवते. त्यापेक्षा आपण बरे, आपले लेखन बरे, वाचकांची खुषीपत्रे (हल्ली फोन आणि एसएमएस) बरी, आपला जम बसला आहे, लिखाणाला मागणी आहे तर ‘ठेविले वाचके | तैसेचि राहावे’ अशी भूमिकाच लेखक घेतात. बांधिलकी स्वीकारली तर आपले लेखनस्वातंत्र्यच (गुद)मरेल, ही सबब पुढे करून आसपासच्या जीवनाकडे तटस्थपणे (निष्क्रियतेचे दुसरे नाव?) पाहून मग कल्पनाशक्ती (जी काय असेल ती) वापरून केलेले लिखाण साचेबंदच होणार. या साचेबंदपणाबद्दल अधूनमधून नक्राश्रू ढाळले जातात, मुरब्बी लेखक ‘आता तरुणमंडळींनी पुढे येऊन हे साचे मोडावेत’ असे संदेश देतात. ती तरुणमंडळी पुन्हा त्याच सापळ्यात अडकतात. असे मराठी साहित्याचे खेदजनक वास्तव आहे.

बांधिलकी न स्वीकारणारा लेखक व्यवहारात खरोखर स्वतंत्र असतो का? कुटुंब, व्यवसाय, माध्यमे, शासन यांची अप्रत्यक्ष-प्रत्यक्ष बंधने थोडी असतात का? नव-नवीन उत्पादने, तंत्रज्ञान, प्रसिद्धीची रॅकेट्स यातून सुटका करून घेण्याऐवजी हे स्वातंत्र्य जपणारे लेखक तिथेच अहमहमिकेने धडपडताना का सापडतात? न दिसणार्‍या प्रलोभनांना बळी न पडणारा लेखक-कलाकार विरळाच का असतो? यावर या लेखकांचे म्हणणे बहुधा असे असते की- इतरत्र मी असा अडकलो आहे, म्हणूनच माझ्या लिखाणात (निर्मिती/कलाविष्कार असे शब्द वापरण्याची फॅशन आहे.) मला स्वतंत्र राहू द्या. स्वतंत्र आणि एकटा यातला फरकही कुणी ओळखत नाही. एवढे स्वातंत्र्य घेऊनही त्यांचे लिखाण पाहिले तर तो स्वत:ची शैली आणि प्रतिमा यांचा गुलामच असतो. मग दुर्गाबाई नेमक्या कोणासाठी बांधिलकी नाकारून बुद्धिप्रामाण्य (मराठी लेखकांना हा शब्द माहीत असतो?) आणि व्यक्तिस्वातंत्र्य यांची बूज राखण्याची मागणी करत होत्या?

१९७५-७७ मधली आणीबाणी इंदिरा गांधींनी स्वत:ची सत्ता टिकविण्यासाठी लादली होती. तिचा सर्वांनी सक्रिय धिक्कार करावा, त्या पक्षाच्या सरकारशी असहकार पुकारावा, कोणत्याही शासनाचे वरवरचे स्वरूप आणि अंत:स्वरूप समजून घेतल्यावरच त्याबद्दलची भूमिका ठरवावी. शक्यतो निर्भयपणे स्वत:च्या पायावर उभे राहून शासनाला हटकण्याचा अधिकार मिळवावा. व्यक्ती-तत्त्वज्ञान यांची बांधिलकी न स्वीकारता, श्रद्धेच्या आहारी न जाता बुद्धीच्या आधारावर निवड करावी. पण याहीपेक्षा स्वत:च्या स्वातंत्र्याचे मार्ग स्वत: निश्‍चित करून ‘स्वाधीन व्हावे’- ही दुर्गाबाईंची भूमिका आणि या विषयाचे काही ऐतिहासिक संदर्भ यांची चर्चा करणे हा माझ्या कर्तव्याचा भाग तर होताच, पण आनंदाचाही होता.

‘व्यक्ती आणि व्याप्ती’ : विनय हर्डीकर

साधना प्रकाशन, पुणे

पाने – २८०

मूल्य ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......