बिबट्याला काय, अंधारातच वावरायची सवय असते. या बिबट्याला तर अंधारात माणसांना मारायची सवय होती...
ग्रंथनामा - झलक
जिम कॉर्बेट
  • ​​​​​​​‘देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 29 June 2022
  • ग्रंथनामा झलक जिम कॉर्बेट Jim Corbett देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon

प्रसिद्ध शिकारकथा लेखक जिम कॉर्बेट यांच्या ‘The Temple Tiger and More Man-eaters of Kumaon’ या प्रसिद्ध पुस्तकाचा पत्रकार वैशाली चिटणीस यांनी ‘देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक’ या नावाने मराठी अनुवाद केला आहे. तो नुकताच डायमंड पब्लिकेशन्सने प्रकाशित केला आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

झुडपी रानाजवळ दोन दिवसांपूर्वी जिथे बिबट्याने त्या बकर्‍याला मारलं होतं, तिथून १०० यार्डांवर एक ओकचं झाड होतं. डोंगरउतारावरच्या दोन शेतांच्या मध्ये असलेल्या सहा फूट उंचीच्या बांधावर हे झाड होतं. झाड बुंध्यापासून डोंगराच्या बाजूला अशा पद्धतीने वाकलं होतं की, मी रबराचे सोल असलेले बूट घालून बांधावरून सरळ झाडाच्या खोडावर चालत जाऊ शकत होतो. जमिनीपासून १५ फूट अंतरावर आणि बुंध्याच्या खालच्या बाजूला एक फांदी फुटली होती. ती डोंगरउतारावरच्या शेतांवर लोंबकळत होती. साधारण एक फूट जाडीची, काहीशी पोकळ आणि कुजलेली अशी ही फांदी रात्रभर पहार्‍याला बसण्यासाठी गैरसोयीची आणि धोकादायक होती. अर्थात, असं सगळं असलं, तरीही त्या परिसरात, शेकडो यार्डांच्या परिघात दुसरं कोणतंही झाडं नव्हतं आणि दुसरं म्हणजे, त्या झाडावर बसता येण्याजोगी त्यातल्या त्यात ती एकच फांदी होती. त्यामुळे मी त्या फांदीवर बसायचा धोका पत्करायचं ठरवलं.

या झुडपी जंगलात आढळलेल्या बिबट्याच्या पावलांच्या ठशांमध्ये आणि एप्रिल महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावलेल्या त्या दुदैवी मुलीच्या घराजवळ सापडलेल्या बिबट्याच्या पावलांच्या ठशांमध्ये साम्य असल्याचं मला जाणवत होतं. त्यामुळे आता मी ज्या बिबट्याच्या शिकारीसाठी प्रयत्न करत होतो, तो पनारचा नरभक्षकच असल्याबद्दल मला कोणतीच शंका नव्हती. त्यामुळे मग मी माझ्या माणसांना त्या झुडपी जंगलामधली भरपूर काटेरी झुडपं तोडून आणायला सांगितलं; झाडावर चढून नीट बैठक जमवली आणि बुंध्याला पाठ टेकून आणि फांद्यांना माझे पाय समांतर ठेवून फांदीवर बसलो. मग माझ्या माणसांनी आणलेली काटेरी झुडपं एकत्र करून त्यांचे भारे तयार करून घेतले आणि दणकट दोरीचा वापर करून माझ्या माणसांकडून झाडाच्या बुंध्यांना बांधून घेतले. मी सांगितलेल्या सगळ्या लहानसहान सूचना त्यांनी अत्यंत नीट पाळल्या, म्हणूनच माझा जीव वाचला.

माझ्या माणसांनी आणलेल्या आणि झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या करवंदाच्या डहाळ्या दहा ते वीस फूट लांब होत्या. झाडाला बांधल्यानंतरही त्यांच्या डहाळ्या दोन्ही बाजूंनी बाहेर आलेल्या होत्या. आधारासाठी झाडावर माझ्याकडे काहीच नसल्यामुळे मी त्या बाहेर आलेल्या डहाळ्या एकत्र केल्या आणि माझ्या काखांमध्ये धरून ठेवल्या. पाच वाजेपर्यंत माझी सगळी तयारी झाली. आता मी नीट बसलो होतो. मी माझ्या कोटाची कॉलर उंच केली होती आणि माझा गळा झाकून घेतला होता. माझ्या मानेच्या मागच्या बाजूचं रक्षण करण्यासाठी हॅट मागच्या बाजूने खेचून घेतली होती. माझ्यासमोर ३० यार्डांवर जमिनीत खुंट ठोकून त्याला बकरा बांधला गेला आणि माझी माणसं शेतात मोठमोठ्याने गप्पा मारत आणि सिगरेट ओढत बसली.

एवढा वेळ त्या झुडपी जंगलात एकदम शांतता होती, पण आता सातभाईने कर्कश आवाजात हाकारा दिला. त्याच्या पाठोपाठ रंगीत चिमण्यांनीही इशारा दिला. त्यानंतर आणखी एक-दोन मिनटांनी पांढर्‍या गळ्याच्या चिमण्यांनी कलकलाट केला. हे दोन पक्षी म्हणजे जंगलातले उत्तम खबरे असतात. त्यांचा हाकारा ऐकून मी माझ्या माणसांना गावात निघून जाण्याची खूण केली. गावात परत जाण्याच्या कल्पनेने त्यांना चांगलाच आनंद झालेला दिसला. मोठमोठ्याने बोलत ते निघून गेले, तसा तो बकरा जोरजोरात बें बें करायला लागला. पुढचा अर्धा-एक तास काहीच झालं नाही. गावाच्या वरच्या अंगाला असलेल्या डोंगरावरून सूर्य मावळायला लागला, तसे झाडावर, माझ्या वरच्या बाजूला बसलेले दोन कोतवाल पक्षी उडून गेले... माझ्या आणि त्या झुडपी रानाच्या मधल्या मोकळ्या मैदानात असलेल्या कुणातरी प्राण्याला पाहून ओरडू लागले. काही वेळापूर्वी बें बें असं ओरडताना गावाकडे तोंड करून उभा असलेला बकरा आता वळून, माझ्याकडे तोंड करून उभा होता. त्याचं ओरडणंही थांबलं होतं. बकर्‍याचं निरीक्षण करताना मला बिबट्याच्या हालचालींचा अंदाज बांधता येत होता. बकरा जिकडे बघून गप्प झाला होता आणि कोतवाल पक्ष्याची जोडी ज्याला बघून ओरडली होती, तो प्राणी फक्त बिबट्याच असू शकत होता, यात कोणतीच शंका नव्हती. तो दिवस म्हणजे वद्य पक्षाची चतुर्थी किंवा पंचमी होती. त्यामुळे सूर्यास्त आणि चंद्र उगवण्याचा काळ यांमध्ये अंधार असण्याचीच शक्यता होती. अशा अंधारातच बिबट्या येण्याचा मी अंदाज बांधला होता. त्यामुळे मी माझी बारा बोअरची, दुहेरी नळ्यांची शॉटगन भरून आणली होती. रायफल आणली असती, तर तिच्यामधून एका वेळी एकच गोळी सुटली असती. त्याउलट या शॉटगनमधून एकामागोमाग एक आठ गोळ्या सुटल्या असत्या आणि त्यामुळे तो बिबट्या सहज जायबंदी तरी झाला असता. त्या काळात भारतात रात्री केल्या जाणार्‍या शिकारींमध्ये वापरता येण्याजोगते विजेचे दिवे किंवा टॉर्च नव्हते. अंधारात शिकार करताना अचूक नेम धरण्यासाठी त्या काळात बंदुकीच्या नळीच्या तोंडाशी पांढर्‍या रंगाची पट्टी बांधत असत.

पुन्हा पुढची बरीच मिनटं काहीच घडलं नाही. मग मी धरलेल्या बाभळीच्या डहाळ्या ओढल्या जायला लागल्या असल्याचं मला जाणवलं. काटेरी फांद्या झाडाच्या बुंध्याला बांधून घेण्याच्या माझ्या शहाणपणाच्या निर्णयाचं मलाच कौतुक वाटायला लागलं. माझ्या कॉलरमुळे आणि हॅटमुळे मला मिळू शकणारं संरक्षण अगदीच अपुरं होतं. शिवाय मी फांदीवर बसल्या बसल्या मागे वळून त्या बिबट्यावर नेम धरू शकत नव्हतो. झाडाच्या बुंध्याला काटेरी डहाळ्या बांधल्यामुळे आता बिबट्याही वर चढून येऊ शकत नव्हता. माझी आता अगदी हट्टाला पेटलेल्या नरभक्षकाशी गाठ होती. त्या काटेरी फांद्यांवर पाय ठेवून झाडावर चढता येत नसल्याचं लक्षात आल्यावर त्याने त्या फांद्या ओढायचा प्रयत्न केला. त्यांची टोकं तोंडात धरून त्याने जोरजोरात ओढून बघितली. त्यांची दुसरी टोकं मी वरच्या बाजूला धरलेली असल्यामुळे मी बुंध्याकडे ओढला जायला लागलो. एव्हाना उरलासुरला सूर्यप्रकाश संपला होता आणि पूर्ण अंधार पडला होता. बिबट्याला काय, अंधारातच वावरायची सवय असते. या बिबट्याला तर अंधारात माणसांना मारायची सवय होती. त्यामुळे परिस्थिती अगदी त्याच्या मनाजोगती होती आणि माझ्या अगदी विरुद्ध! इतर सगळ्या प्राण्यांच्या तुलनेत माणूस अंधारात अगदीच दुबळा, हतबल ठरतो. त्याचा धीरच खचतो. निदान माझा तरी त्या वेळी खचला होता. अंधारातच ४०० माणसांचा जीव घेतलेला असल्यामुळे त्या बिबट्याला माझी अजिबातच भीती वाटत नव्हती. त्यामुळे त्या फांद्या ओढताना तो इतक्या जोरजोरात गुरगुरत होता की, माझ्या दिशेने कान लावून, चिंताक्रांत होऊन गावात बसलेल्या माझ्या माणसांनादेखील त्याचं ते गुरगुरणं ऐकायला जात होतं.

‘‘त्याच्या त्या गुरगुरण्याची आम्हाला खूप भीती वाटत होती’’, असं मला माझ्या माणसांनी नंतर सांगितलं, पण माझ्यावर त्याचा नेमका उलटा परिणाम झाला होता. बिबट्याच्या त्या गुरगुरण्यामुळे मला त्याची नेमकी जागा आणि त्याच्या हालचाली असं सगळं समजत होतं, आणि उलट ‘हा कसलाही आवाज न करता शांत बसला, तर त्याचं पुढचं पाऊल आपल्याला कळणार नाही’ म्हणून मला जास्त भीती वाटत होती. खाली, झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या फांद्या तो मध्येच ओढत होता आणि मग सोडून देत होता. त्याने त्या सोडून दिल्या की, ‘आता मी पडतो की काय’ असं मला वाटायचं. सगळीकडे चांगलंच अंधारलं होतं. मला आधाराला काहीच नव्हतं. आता त्याने जर उसळून उडी मारली असती आणि त्याचा धक्का जरी लागला असता, तरी मी अगदी सहज खाली पडलो असतो.

काही मिनटं अशीच शांततेत गेल्यानंतर बिबट्याने त्या उंच बांधावरून उडी मारली आणि तो त्या बकर्‍याच्या दिशेने निघाला. पुरेसा उजेड असताना बिबट्या येण्याच्या अपेक्षेने बकर्‍याला मी बसलेल्या झाडापासून ३० यार्ड अंतरावर बांधलं होतं. ‘बिबट्या बकर्‍यापर्यंत पोहोचेपर्यंत मला नेम धरून गोळी मारला येईल’ असा माझा अंदाज होता, पण आता या अंधारात मला बिबट्या नीट दिसत नव्हता. त्यामुळे मी बकर्‍याला वाचवू शकणार नव्हतो. या अंधारात त्याचा पांढराशुभ्र रंगदेखील मला अगदी अस्पष्ट दिसत होता. त्यामुळे मग मी त्याचा जगण्यासाठीचा संघर्ष संपेपर्यंत थांबलो, त्यानुसार बिबट्याच्या स्थानाचा अंदाज बांधला आणि त्या दिशेने नेम धरून गोळी झाडली. बिबट्याने अत्यंत रागीट गुरगुर केल्याचं मला ऐकायला आलं आणि त्या मिट्ट अंधारात दुसर्‍या एका बांधावरून उडी मारून तो पलीकडच्या शेतात गेला असावा, असं मला त्याच्या अगदी अस्पष्ट दिसलेल्या हालचालींवरून वाटलं.

पुढची १० ते १५ मिनटं मी सावधगिरीने बिबट्याची चाहूल घेत होतो. त्यानंतर माझ्या माणसांनी मला हाक मारून ‘‘आम्ही आता तिकडे येऊ का’’ असं विचारलं. तसे ते वरच्या भागात होते. त्यामुळे त्यांनी यायला काहीच हरकत नव्हती. ‘‘पाईनच्या झाडाच्या लाकडापासून केलेल्या मशाली पेटवा आणि त्यानंतर मी सांगतो तसं करा’’ असं मी त्यांना सांगितलं. कुमाऊँ भागातले लोक पाईनच्या झाडापासून तयार केलेल्या १२ ते १८ इंच लांबीच्या मशाली वापरतात. त्या अतिशय उत्तम प्रकाश देतात. या भागामधल्या लोकांना काळोखात वावरण्यासाठी पाईन वृक्षाच्या डहाळ्यांपासून केलेल्या मशालींव्यतिरिक्त दुसरं साधन माहीत नाही.

भरपूर धावाधाव आणि गदारोळ केल्यानंतर गावातून साधारण वीसेक माणसं बाहेर पडली. त्यांच्या प्रत्येकाच्या हातात पाईन वृक्षापासून केलेल्या मशाली होत्या. मी त्यांना सूचना करत होतो आणि त्याप्रमाणे ती येत होती. मी ज्या झाडावर बसलो होतो, त्याच्या वरच्या बाजूला असलेल्या शेतांमधून गोल फिरून माझ्या मागच्या बाजूने ती माझ्यापाशी आली. आल्या आल्या आधी त्यांनी झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या काटेरी फांद्या काढायला सुरुवात केली, पण बिबट्याने त्या फांद्या ओढल्यामुळे त्यांना बांधलेल्या दोर्‍यांच्या गाठी आणखीनच पक्क्या झाल्या होत्या. त्यांना त्या फांद्या कापूनच काढाव्या लागल्या. त्या सगळ्या फांद्या बाजूला केल्यानंतर एक माणूस झाडावर चढला आणि त्याने मला उतरायला मदत केली. मी बसलो होतो ती जागा खरं तर अतिशय अडचणीची होती. तिथे खूप वेळ बसून माझ्या पायांना गोळे आले होते.

तो बकरा जिथे मरून पडला होता, त्या शेतात सगळ्यांच्या हातातल्या मशालींमुळे उजेड पसरला होता, पण त्या शेताच्या पलीकडे असलेल्या डोंगरउतारवरच्या शेतात मात्र अंधार होता. आम्ही सगळ्यांनी धूम्रपान करता करता बोलायला सुरुवात केली. मी त्यांना सांगितलं की, ‘‘माझ्या गोळीमुळे बिबट्या जखमी झाला आहे, पण त्याच्या जखमा किती गंभीर आहेत, ते मला नेमकं माहीत नाही. त्यामुळे आता आपण सगळे जण गावात परत जाऊ या आणि उद्या सकाळी परत येऊन मी त्या जखमी बिबट्याचा शोध घेईन’’. माझी ही कल्पना कुणालाच पसंत पडली नाही. त्या सगळ्यांचं म्हणणं होतं की, ‘तुम्ही बिबट्याला जखमी केलं आहे, तर आत्तापर्यंत तो मेलाच असणार. तुमच्याकडे आत्ताही बंदूक आहे आणि आम्ही सगळे जण तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे आत्ता त्याचा शोध घेण्यात कसला आलाय धोका! आपण सगळे मिळून आत्ताच त्याचा शोध घेऊ या. काही नाही तर शेताच्या त्या बांधापर्यंत जाऊ या आणि बिबट्याच्या रक्ताचा माग दिसतो का, ते तरी पाहू या’.

थोडक्यात सांगायचं तर ‘बिबट्याचा शोध घ्यायला उद्या सकाळी जावं’ असं माझं म्हणणं होतं आणि ‘आत्ता लगेच जावं’ असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं होतं. त्यावर बरीच चर्चा झाल्यानंतर मी थोड्याशा नाराजीनेच शेताच्या बांधापर्यंत जाऊन पाहणी करायला तयार झालो. ती शेतं डोंगरउतारावर असल्यामुळे त्या शेतांच्या बांधांपर्यंत गेल्यावर आम्हाला खालच्या बाजूच्या शेतात वाकून बघता येणार होतं.

दुसर्‍या दिवशी सकाळी न जाता, तत्क्षणीच जाऊन जखमी बिबट्याचा अदमास घेण्याची त्या लोकांची विनंती मान्य केल्यानंतर मी सगळ्यांना काही सूचना दिल्या. एक तर त्यांनी हातामधल्या मशाली उंच धरून माझ्यामागून रांगेने चालत यायचं होतं आणि चुकूनमाकून बिबट्याने हल्ला केलाच असता, तर अंधारात मला एकट्याला त्याच्या तावडीत सोडून कुणीही पळून जायचं नव्हतं. सगळ्यांनी माझं हे म्हणणं कबूल केलं. मग मी पुढे आणि माझ्यामागे पाच यार्डांचं अंतर राखून, हातात पेटत्या मशाली घेऊन ते सगळे असे आम्ही निघालो.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

त्या बकर्‍यापर्यंतचं ३० यार्ड अंतर आणि त्यानंतर बांधापर्यंत २० यार्ड अंतर आम्ही सगळ्यांनी अतिशय सावधपणे, जराही आवाज न करता पार केलं. आता रक्ताचा माग वगैरे बघायला वेळ नव्हता. आम्ही बकर्‍यापर्यंतचं अंतर पार केलं, तेव्हा आमच्याकडच्या मशालींचा खालच्या बाजूच्या शेतांमध्ये उजेड पडला. आम्ही त्या बांधाच्या आणखी जवळ जायला लागलो, तसतसं पुढचं शेत आणखी स्पष्ट दिसायला लागलं. खालच्या शेताचा एक अरूंद पट्टा अंधारात राहिलेला असताना अचानक बिबट्याची गुरगुर ऐकू आली आणि पुढच्याच क्षणी तो झेप घेत बांधावर आला आणि माझ्यासमोर उभा राहिला.

उसळून हल्ला करणार्‍या बिबट्याचं गुरगुरणं अतिशय भीतिदायक असतं. वाघाला बेडरपणे सामोरा जाणारा हत्तींचा कळप चिडलेल्या बिबट्याला बघून सैरावैरा धावताना मी बघितला आहे. त्यामुळे अशा पद्धतीने झेप घेत समोर उभा ठाकलेला बिबट्या बघितल्यावर हातात काहीच शस्त्र नसलेल्या माझ्या मागच्या त्या सगळ्या लोकांनी मागच्या मागे धूम ठोकल्याचं मला काहीच आश्चर्य वाटलं नाही. पळता पळता त्यांच्यामध्ये जो काही गोंधळ माजला, त्यातून ते एकमेकांवर धडकले आणि माझ्या सुदैवाने त्यांच्या हातामध्ये असलेल्या मशाली तिथेच, जमिनीवर पडल्या. त्यामुळे त्या मशालींच्या उजेडात मला बिबट्यावर गोळी झाडता आली.

सैरावैरा धावत सुटलेली ती माणसं माझ्या गोळीचा आवाज ऐकल्यावर थांबली आणि त्यांच्यामधल्या एकाचा आवाज माझ्या कानांवर आला. तो म्हणत होता, ‘‘नाही, नाही, आपण पळत सुटलो म्हणून काही ते रागावणार नाहीत आपल्यावर. त्या बिबट्याला बघितल्यावर आपण किती घाबरून गेलो होतो, हे त्यांना समजू शकेल’’ त्याचं हे म्हणणं अगदी खरं होतं.

थोड्या वेळापूर्वी झाडावर बसलेलो असताना मला जो अनुभव आला होता, त्यावरून तर नरभक्षकाच्या भीतीमुळे माणसाची किती दाणादाण उडत असेल, ते मला कळलंच होतं. मी त्या मशाल धरणार्‍यांपैकी एक असतो, तर बिबट्याला बघितल्यावर पळून जाण्यार्‍यांत मी सगळ्यांच्या पुढे असलो असतो, हेही मला माहीत होतं. त्यामुळे मी त्यांच्यावर रागवावं, असं त्यात काहीच नव्हतं. तरीपण ‘आपण ऐन वेळी पळत सुटलो’ याचं त्यांना वैषम्य वाटू नये, म्हणून त्यांना सामोरं न जाता किंवा त्यांच्या नजरेला नजर न देता मी खाली वाकून बिबट्याच्या मृतदेहाचं निरीक्षण करत असल्यासारखं दाखवलं. हळूहळू दोन-दोन, तीन-तीनच्या संख्येने ते सगळे जण माझ्याजवळ आले. ते सगळे जमल्यावर मान वर न करताच मी त्यांना विचारलं, ‘‘मग बिबट्याला बांधून घेऊन जाण्यासाठी बांबू, दोर्‍या हे सगळं साहित्य आणलं आहे ना?’’

‘हो तर!’ ते सगळे उत्साहाने म्हणाले, ‘मगाशीच आणलं आहे आणि तुम्ही चढला होतात, त्या झाडाच्या खालीच ते सगळं साहित्य ठेवलं आहे’

‘‘चला, मग आणा ते पटकन! मला हे सगळं आटोपून गावात जाऊन कधी एकदा गरमगरम चहा घेतोय, असं झालं आहे’’ उत्तरेकडून येणार्‍या थंडगार, बोचर्‍या वार्‍याने मला पुन्हा थंडी भरून आली होती आणि त्या सगळ्या प्रसंगामधला उत्साह आता संपल्यामुळे मला एकेक पाऊल टाकणंदेखील कठीण जात होतं.

कित्येक वर्षांनंतर त्या रात्री सानौली गावामधली माणसं निर्धास्तपणे झोपली होती.

‘देवळाचा वाघ आणि कुमाऊँचे आणखी काही नरभक्षक’ - जिम कॉर्बेट

अनुवाद – वैशाली चिटणीस

डायमंड पब्लिकेशन्स, पुणे

पाने – २००

मूल्य –२५० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5409/Devalacha-Wagh-ani-Kumaonche-anakhi-kahi-narbhakshak

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......