या माणसाशी लग्न करण्याच्या आधीपासून एक मनस्वी कलाकार म्हणून त्यानं माझ्या आयुष्यात स्थान मिळवलेलं होतं. मी या कलाकाराची जबरदस्त फॅन होते आणि आजही आहे
ग्रंथनामा - झलक
निवेदिता सराफ
  • मराठीतील एव्हरग्रीन सुपरस्टार अशोक सराफ आणि त्यांच्या ‘मी बहुरूपी’ या आत्मकथनाचे मुखपृष्ठ
  • Fri , 17 June 2022
  • ग्रंथनामा झलक मी बहुरूपी Mee Bahurupi अशोक सराफ Ashok Saraf निवेदिता सराफ Nivedita Saraf मीना कर्णिक Meena Karnik

मराठीतील एव्हरग्रीन सुपरस्टार अशोक सराफ यांनी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्तानं त्यांचं ‘मी बहुरूपी’ हे आत्मकथन ग्रंथालीतर्फे प्रकाशित झालंय. या पुस्तकाचे शब्दांकन प्रसिद्ध पत्रकार मीना कर्णिक यांनी केलंय. मोठ्या आकार, आर्टपेपरवर संपूर्ण रंगीत छपाई यांमुळे हे आत्मकथन अतिशय देखणं आणि प्रेक्षनीय झालंय. या आत्मकथनाच्या शेवटी अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांचा लेख आहे. तो ‘अक्षरनामा’च्या वाचकांसाठी...

..................................................................................................................................................................

अशोक सराफ नावाच्या कलावंताचं आत्मचरित्र प्रकाशित केल्याखेरीज मी मरणार नाही, असं मी अगदी ठामपणे ठरवलं होतं. एक प्रकारे मी त्याचा ध्यासच घेतला होता. आज माझं हे स्वप्न पूर्ण झालंय.

अशोक सराफ माझा नवरा आहे, म्हणून त्यानं स्वत:विषयी लिहावं इतका संकुचित विचार माझा कधीच नव्हता. या माणसाशी लग्न करण्याच्या आधीपासून एक मनस्वी कलाकार म्हणून त्यानं माझ्या आयुष्यात स्थान मिळवलेलं होतं. मी या कलाकाराची जबरदस्त फॅन होते आणि आजही आहे. इतकं प्रचंड मोठं यश मिळवताना तो घेत असलेली मेहनत, त्याचा अभ्यास, त्याचे कष्ट, त्याची पॅशन हे मी अनुभवलं ते बायको म्हणून. आणि वाटायला लागलं, हे सगळं लोकांसमोर यायला हवं. यश मिळणं कसं आणि कधी शक्य होतं, हे आजच्या पिढीला कळायला हवं. कामाची इतकी प्रचंड व्याप्ती असलेल्या या कलावंताचं आयुष्य तरुण कलाकारांना समजायला हवं.

संगीत नाटकामध्ये सुरुवात करून आजच्या घडीलाही नाट्य-चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या अशोकच्या कामाचा पट खूप मोठा आहे. संगीत रंगभूमीपासून नाटक कसं बदललं, सिनेमासृष्टीत कोणते बदल घडले, या सगळ्याचा अशोक एक साक्षीदार आहे. नुसताच बाहेरून बघणारा नाही, तर त्या बदलांचा एक भाग असणारा साक्षीदार. त्यामुळे त्याच्या दृष्टीकोनातून तो आपल्यासमोर हे जग आणतो, तेव्हा एका मोठ्या कालखंडाचा इतिहास उलगडत जातो. हा प्रवास जितका रंजक आहे, तितकाच खूप काही शिकवणाराही आहे.

तसं बघायला गेलं तर अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीला उशिराच बहर आला. १९७४मध्ये त्याला ‘पांडू हवालदार’ हा सिनेमा मिळाला, तेव्हा त्याचं वय काही सतरा-अठरा वर्षाचं नव्हतं. किंबहुना, त्यानं बालरंगभूमीवर काम केलेलं नव्हतं, इंटरकॉलेजिएट गाजवलंय, असं त्याच्या बाबतीत घडलं नव्हतं. होय, आंतरबँक स्पर्धांमधल्या नाटकांमध्ये तो आपला ठसा उमटवू लागला होता. सिनेमात काम मिळालं, तेव्हा तर अशोक चक्क नोकरी करत हाता. त्यामुळे एक प्रगल्भ अॅक्टर म्हणूनच तो लोकांसमोर आला.

त्याला विनोदी अभिनेत्याच्या भूमिका जास्त मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे, ती नाकारण्यात अर्थच नाही, म्हणून अशोक काही केवळ विनोदी नट म्हणून आपल्या डोळ्यांसमोर येत नाही. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘मी एक चरित्र अभिनेता आहे. कॉमेडी हा त्यातला एक भाग आहे जो लोकांना तुलनेनं जास्त आवडतो.’ म्हणजे एखाद्या शेफच्या हातचे सगळे पदार्थ आपल्याला आवडतात, पण त्याची पुरणपोळी जरा जास्त आवडते, तसंच, तरीही आपल्या कारकिर्दीच्या अगदी सुरुवातीपासून अशोकनं आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडून धोके पत्करलेले आहेत.

 

नाटक, सिनेमा आणि टीव्ही अशा तीनही माध्यमांमधून अशोकनं काम केलंय. नुसतं काम केलंय, असं नाही, तर त्या त्या माध्यमांमध्ये तो ‘गेमचेंजर’ बनलाय. ‘डार्लिंग डार्लिंग’सारख्या नाटकाचंच उदाहरण पाहा. या नाटकानं विनोदी रंगभूमीचा बाज बदलला. तोवर प्रेक्षकांसमोर शाब्दिक विनोद येत होता, ‘डार्लिंग डालिंग’नं स्लॅपस्टिक कॉमेडीची सुरुवात झाली. राजा गोसावी आणि अशोक सराफ, अशा तुल्यबळ अभिनेत्यांची जुगलबंदी स्टेजवर पाहताना विनोदासाठी शरीराचा वापर कसा करायचा, याचा वस्तुपाठच या नाटकानं जणू घालून दिला. महत्त्वाचं म्हणजे, नाटकातल्या व्यक्तिरेखेला पकडून केलेली ही शारीरिक कॉमेडी होती. या नाटकानं त्या वेळी सगळे उच्चांक मोडले. पुढच्या पिढ्यांसाठी हे नाटक म्हणजे एक मैलाचा दगड ठरलं.

तीच गोष्ट सिनेमाची. ‘गोंधळात गोंधळ’नं तोवरचा मराठी सिनेमाला असलेला ग्रामीण बाज मोडला. शहरी आणि सामाजिक सिनेमांची सुरुवात ‘गोंधळात गोंधळ’नं करून दिली.

‘हम पाँच’ या हिंदी मालिकेविषयी तर बोलायलाच नको. लोकप्रियतेचं शिखर गाठणारी सुरुवातीच्या काळातल्या काही मालिकांपैकी ‘हम पाँच’ एक होती. बालाजीसारखं एक मोठं प्रॉडक्शन हाऊस त्यातून उभं राहिलं. या मालिकेमधली अशोकची भूमिका ही अॅक्टरची नाही, रिअॅक्टरची आहे. त्याच्या आजुबाजूचे सगळे अॅक्टिंग करतात, मग ती त्याची फोटोतली बायको असू दे किंवा खरी बायको किंवा त्याच्या पाच मुली. त्या घटना घडवतात आणि अशोक त्याला प्रतिसाद देतो, त्यावर रिअॅक्ट होतो. हे खूप कठीण आहे. एरवी आपला सीन आपण करतो, पण कोणाच्या तरी उत्तम अभिनयाला प्रतिसाद देणं सोपं नसतं. अशोकनं ते यशस्वीपणे करून दाखवलं. तोवर विनोदी अभिनयात एक प्रकारची बफुनरी दिसायची. टीव्हीवरच्या मालिका एक तर क्लासेससाठी असत किंवा मासेससाठी. अशोकनं त्याचा सुवर्णमध्य गाठला. म्हणूनच सर्व स्तरांत त्याची ही व्यक्तिरेखा लोकप्रिय झाली. उच्च दर्जाच्या त्याच्या अभिनयामुळे सगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांना त्यानं भारावून टाकलं.

अशोककडून शिकण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. तो कधीही कुठलीही गोष्ट आपल्या व्यक्तिरेखेला सोडून करत नाही. ती त्यानं अत्यंत घट्ट पकडून ठेवलेली असते. आपले स्नायू कसे हाडांना पकडून असतात, तशी.

 

अशोकच्या सिनेमांची यादी पाहिली की, लक्षात येतं की, खरं तर बऱ्याच सिनेमांमध्ये त्याची मुख्य भूमिकाही नाहीये. तरीही ती उठून येते, सिनेमा संपल्यानंतरही मुख्य व्यक्तिरेखांइतकीच ती आपल्या मनात रेंगाळत राहते. भूमिका कितीही छोटी असो, अशोक सराफ नावाचा नट पडद्यावर आला की, आपण त्याच्यावरची नजर हटवूच शकत नाही. त्याला परमेश्वरानं रूप दिलेलं नाही, देखणं शरीर नाही, ताकद आहे ती त्याच्या अभिनयाची. ती त्याच्यापाशी भरभरून आहे. त्या टॅलेंटला झळाळी आणण्यासाठी लागणारा विचारही आहे. कॉमेडी ही अत्यंत गंभीरपणे करायची गोष्ट आहे, असं अशोक नेहमी म्हणतो, ते काही उगीच नाही.

हे काही फक्त कॉमेडीबाबतच आहे असं नाही. ‘वझीर’सारख्या सिनेमाचं उदाहरण पाहा. यातला टायटल रोल विक्रम गोखले यांचा आहे. त्यांनी तो अप्रतिम केलाय, तरी अशोकची व्यक्तिरेखाही आपण मनातून पुसून टाकू शकत नाही. त्या राजकारण्याचा कोडगेपणा, निर्लज्जपणा त्यानं अंगावर शहारा येईल असा उभा केलाय. ‘प्रतिघात’मध्येही तो क्रूर आहे, पण तिथे तो नुसताच क्रूर आहे. इथल्या दुष्टपणाला विचारांची जोड आहे. त्यामुळे की अधिक भयानक आहे.

याच्या अगदी टोकाचा अशोक आपल्याला दिसतो ‘आपली माणसं’मध्ये. इथे या बापाची अगतिकता त्याच्या डोळ्यांतून सिनेमाभर आपल्याला जाणवत राहते. मध्यमवर्गीय, पैसा न बघितलेला हा बाप आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावून जातो. अशा अनेक व्यक्तिरेखांना आकार देताना मी अशोकला बघितलंय. प्रत्येक वेळी नट म्हणून त्याच्याविषयीचा माझा आदर आणखीच वाढलाय. त्यानं साकार केलेल्या व्यक्तिरेखांची रेंज पाहन मी भारावून गेलेय.

 

नायक ते चरित्र अभिनेता हा प्रवास प्रत्येक अॅक्टरच्या आयुष्यात येतो. मग तो दिलीपकुमार असो की अमिताभ बच्चन की आणखी कुणी. नायक करत असताना वाढत्या वयाच्या भूमिकांमध्ये शिरकाव करणं सगळ्यांना सहजी जमतंच असं नाही. अशोकच्या बाबतीत हा प्रश्नच कधी उपस्थित झाला नाही. कारण नायकाच्या भूमिका करत असतानाही त्यानं ‘माझं घर माझा संसार’ या सिनेमात रिक्षावाल्याची छोटी भूमिका केलेली होती. किंवा ‘अरे संसार संसार’मधला खलनायक केला होता. (‘मदर इंडिया’वर मराठीमध्ये तीन सिनेमे आले. वेगवेगळ्या दिग्दर्शकांनी केलेल्या या तीनही सिनेमांमध्ये खलनायकाची भूमिका अशोकनंच केली होती.)

अशोकचं कौतुक वाटणारी ही आणखी एक गोष्ट. नायकाच्या भूमिका करत असतानाच कॅरेक्टर रोल करण्याचा आत्मविश्वास त्याच्यात होता. कोणत्याही प्रकारची असुरक्षितता त्याच्या मनात कधी डोकावली नाही. मग समोर जगातला कितीही मोठा अभिनेता किंवा अभिनेत्री असो. स्वत:च्या अभिनयक्षमतेवर त्याचा पूर्ण विश्वास होता आणि आहे.

मला आणखी एक जाणवलेली बाब आवर्जून सांगायला हवी. अशोक कधीच फक्त स्वत:च्या भूमिकेचा विचार करत नाही. त्याच्या दृष्टीनं ती संपूर्ण कलाकृती महत्त्वाची असते. बरेच स्टार असं मानतात की, सिनेमा केवळ त्यांच्याभोवती फिरायला हवा. अशोक हा असा एक स्टार आहे, जो सिनेमा म्हणजे टीम वर्क आहे असं मानतो. आपलं एकट्याचं काम चांगलं होऊन उपयोग नाही, बरोबरच्यांची कामंही चांगली झाली, तरच सिनेमा चांगला होईल असं त्याचं ठाम मत आहे.

‘व्हॅक्यूम क्लीनर’ या आमच्या नाटकात निर्मिती सावंतचे सीन हे तिचेच राहतील, याची तो आवर्जून काळजी घेतो. मध्येच स्वतःसाठी लाफ्टर घेण्याचा प्रयत्न करत नाही. प्रेक्षकांवर नाटकाचा परिणाम साधायचा, तर सगळ्या कलाकारांची कामं उत्तम होणं गरजेचं आहे, हे त्याला मनापासून पटलंय. त्यामुळे माझी सेंच्युरी कशी होईल, यापेक्षा आपला संघ मॅच कशी जिंकेल, हे त्याचं उद्दिष्ट राहिलेलं आहे. अगदी नवखा नट असतानाही आणि आज प्रथितयश अभिनेता बनल्यानंतरही.

 

अशोकचा दुसरा गुण म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा. एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल तर तो तसं मोकळेपणानं सांगून टाकतो. प्रत्येक वेळी आपणच आकर्षणाचा केंद्रबिंदू असायला हवं, असा त्याचा अट्टहास कधीच नसतो. समोरची व्यक्ती काही समजावून सांगत असेल तर शांतपणे तो ऐकून घेतो. एखादा नवखा कलाकार असेल तर आपल्या मोठेपणाचं ओझं त्याच्यावर येणार नाही, याची काळजी तो आवर्जून घेतो. त्यामुळे अशोककडे पाहताना हा माणूस इतका मोठा स्टार आहे, अशी भावना समोरच्याच्या मनात कधी येत नाही.

अनेक स्टार भूमिका कोणतीही असली तरी स्वत:सारखेच दिसतात. अशोकच्या बाबतीत ते घडत नाही. तो ती व्यक्तिरेखा दिसतो. भाषेच्या लहेजाचं वरदान त्याला आहे. मग ती भाषा त्याला येत नसली तर तिचा लहेजा तो थोड्या प्रयत्नांनी नेमका पकडू शकतो. ती भाषा येत असल्याचा परफेक्ट अभिनय करू शकतो. मग तो ‘करण-अर्जुन’मधला ‘ठाकूर तो गयो’ म्हणणारा मारवाडी असू दे किंवा ‘राम राम गंगाराम’मधला बागवानी मुसलमान असू दे.

अशोक सराफ स्टार झालाय त्यामागे ही मेहनत आहे. विचार आहे. पर्स्पेक्टिव्ह आहे. म्हणूनच सिनेमाचं शूटिंग सुरू करण्याआधी अशोकला संपूर्ण संवादांसकट स्क्रिप्ट लागतं. अशोक कुठलीही भूमिका कॅज्युअली घेत नाही. मग तो एखाद्या नावाजलेल्या दिग्दर्शकाबरोबर काम करत असो की नवख्या. त्याचे प्रयत्न हे नेहमी शंभर टक्केच असतात. अभिनयाच्या बाबतीत त्याचा दृष्टीकोन इतका फोकस्ड राहिलाय की, ते सोडून दिग्दर्शन किंवा इतर काहीही करण्याचा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नसेल. त्यामुळेच आज वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षीही त्याचा आपल्या कामामधला रस जराही कमी झालेला नाही. अजूनही नवीन गोष्टी करून बघण्याची त्याची इच्छा तेवढीच जबर आहे. चांगली भूमिका आली की, एखाद्या लहान मुलासारखा तो आजही हरखून जातो. त्यामुळे बनचुकेपणा त्याच्यामध्ये येऊच शकत नाही.

आपण प्रेक्षकांचं देणं लागतो, हे त्याच्या डोक्यात इतकं पक्कं बसलंय की, त्याची सगळी धडपड ही त्यासाठी असते. अशा वेळी पैसे त्याला महत्त्वाचे वाटत नाहीत. अनेक निर्मात्यांनी त्यांच्याकडे पैसे नाहीत म्हणून अशोकला पेमेंट केलेलं नाही, पण यानं एका अक्षरानंही कधी त्याचा उच्चार केलेला नाही. आपल्या कर्तव्यात कसूर होऊ नये यासाठी धडपडणारा, वेळप्रसंगी मदतीला धावून जाणारा असा हा कलाकार आणि माणूस आहे.

एक वेळ अशी होती, अशोक आणि लक्ष्मीकांतनं मराठी सिनेमासृष्टी जगवली असं म्हणता येईल. बदलत्या काळानुसार पुण्या-मुंबईच्या स्पॉटबॉईजनी स्वतःला अपग्रेड केलं; पण कोल्हापूरच्या अनेक मुलांना ते जमलं नाही. त्यामुळे तिथं शूटिंग होणं कमी व्हायला लागलं. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. त्या वेळी अशोकन खूप जणांना मदत केली. हे त्यानं कधी कोणाला सांगितलं नाही. एखाद्याला रिक्षा घ्यायची असेल तर बँकेच्या कर्जाचा पहिला हप्ता त्यानं दिलाय. ‘रिक्षा चालू लागली की, पुढचे हप्ते तुला देता येतील रे’, असं म्हणून. कुणाला दुकान लावायला पैसे दिलेत, भेळपुरीचं दुकान टाकायला पैसे दिले आहेत. अशोकपाशी असलेला कमिटमेंटचा सेन्स जबरदस्त आहे.

 

आपल्या व्यावसायिक आयुष्यात हा माणूस जितका कमिटेड आणि प्रामाणिक आणि पॅशनेट आहे, तितकाच तो वैयक्तिक आयुष्यातही आहे. स्वतःशी प्रामाणिक असणं आणि निर्मळ स्वभाव, हे त्याचे दोन गुण मला फार भावतात. तो जितका चांगला नवरा आहे, त्यापेक्षा खूप जास्त चांगला बाप आहे.

प्रत्येक लग्नात उतार-चढाव असतात. त्याप्रमाणे ते आमच्याही आयुष्यात आले. आमचीही भांडणं झाली, वादविवाद झाले. आमच्या वयात खूप जास्त अंतर आहे. आमचे स्वभाव निरनिराळे, विचारसरणीत फरक आणि आम्ही ज्या सामाजिक स्तरातून आलो तोही वेगळा. त्यामुळे अनेकदा भांड्याला भांड लागण्याचे प्रसंग आले. आम्ही सगळ्या भोज्यांना शिवून आलो. परंतु आज लग्नाला तेहतीस वर्षं झाल्यानंतरही आम्ही एकमेकांच्या बाजूला ठामपणे उभे आहोत, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आम्हा दोघांना एकमेकांविषयी वाटत असलेला आदर.

अशोकचे आणि माझे विचार अनेक बाबतींत वेगळे आहेत. एकमेकांना स्पेस देण्याची त्याची आणि माझी कल्पना निरनिराळी आहे. आम्ही दोघं ज्या वातावरणात वाढलो, ते त्यासाठी कारणीभूत आहे.

माझे वडील खूप लवकर गेले. त्यामुळे घरात आई, मोठी बहीण मीनल आणि मी, अशा तीन बायकाच. पुरुषांचा इन्फ्लुएन्स जवळपास नाहीच. आईनं आम्हा दोघी बहिणींना भरपूर स्वातंत्र्य दिलं. आम्ही दोघी आमचे निर्णय स्वत:च घ्यायचो. अशोकशी लग्न करायचं मी ठरवलं, तेव्हा माझ्या निवडीवर आई आणि मीनल तशा खुश नव्हत्या, पण त्यांचा विरोधही नव्हता. पुढे मात्र माझी आई आणि मीनलशी अशोकची गट्टीच जमली. इतकी की, कितीतरी वेळा मला तिला आठवण करून द्यावी लागायची की, ‘अग आई, तू माझी आई आहेस.’

खूप लवकर स्वतःच्या पायावर उभं राहिल्यामुळे असेल, आपण कोणाला उत्तर द्यायला बांधील आहोत, हा विचारच माझ्या मनात नसायचा. लग्नानंतर मला या गोष्टींची सवय करून घ्यावी लागली. सातच्या आत घरी पोचायला हवं, किंवा उशीर होणार असेल तर तसं कळवायला हवं, हे हळूहळू माझ्या अंगवळणी पडत गेलं.

मुळात मी प्रेमात पडेन असंच मला कधी वाटलं नव्हतं. कारण मी टिपिकल रोमँटिक नाही. त्यामुळे अशोक सराफ आपल्याला आवडतोय, याची जाणीव झाली, तेव्हा माझं मलाच नवल वाटलं होतं. त्या वेळी अशोकला माझ्याविषयी नेमकं काय वाटतंय, हे मला कळत नव्हतं. माझी घालमेल लक्ष्याच्या मात्र लक्षात आली होती. तो आणि मी बालमित्र. त्याच्याच शब्दांत सांगायचं तर, ‘अशोकला भेटायला कोणी मुलगी आली की, तू तिच्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेनं बघतेस.’

एक दिवस मी अशोकला सरळ सांगून टाकलं, ‘मला तुझ्याशी लग्न करायचंय.’

आणि त्यानं थेट नकार दिला.

‘मला नुकताच अपघात झालाय. उद्या काही कॉम्प्लिकेशन झाली, तर तुला त्रास सहन करावा लागेल. तू माझ्यापेक्षा वयानं खूप लहान आहेस. तुला अधिक तरुण आणि चांगला मुलगा मिळू शकतो.’

मी अर्थातच त्याचं म्हणणं मनावर घेतलं नाही. लक्ष्मीकांत, सचिन, किरणदादा (किरण शांताराम) यांनीही अशोकचं मन वळवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्याच्या स्वभावानुसार तो माझा विचार करून लग्नाला नकार देत होता, हे मला कळत होतं. त्यामुळे माझा त्याच्याविषयीचा आदर अधिकच वाढला. अशोकचं त्याच्या कुटुबावरचं प्रेम पाहून मला जाणवलं होतं की, हा आपल्या माणसांसाठी कोणतीही गोष्ट करायला मागेपुढे पाहणार नाही. तो करतो ती प्रत्येक गोष्ट अगदी आतून, हृदयातून आलेली असते. हा माझ्यावर प्रेम करेल तर जीव तोडून करेल असा विश्वास तेव्हा मला वाटला होता आणि तो खरा ठरला.

 

अशोक त्यांच्या घरातला मोठा मुलगा. शिवाय त्यांचं कुटुंबही मोठं. एकमेकांशी अगदी घट्ट बांधलं गेलेलं. त्यामुळे अशोक आपल्या आईवडिलांबाबत, भावंडांबाबत खूप ओव्हर प्रोटेक्टिव्ह असायचा. लग्न झाल्यानंतर या यादीत मीसुद्धा सामील झाले. त्याचं हे पझेसिव्ह असणं काही वेळा माझ्या मोकळेपणावर येणारं बंधन वाटायचं. मला माझी स्वत:ची स्पेस हवी असं वाटायचं. मी कुठे आहे, काय करतेय हे त्याला माहीत असावंच लागतं. आजही ते कायम आहे. यात माझ्यावरचा अविश्वास नाही, तर काळजी आहे, याची जाणीव मला आहे. परंतु कधी कधी अती प्रेमाचाही जाच होतो ना?

अशोकचं कौतुक हे की, त्यानंही मला खूप समजून घेतलं. अतिशय रूढीप्रिय माणूस असूनसुद्धा त्यानं कधीही आपले विचार माझ्यावर लादले नाहीत. मी तुलनेनं आधुनिक विचारांची आहे. त्यानं मला माझ्या पद्धतीनं जगू दिलं. कधी भांडून असेल, कधी माझ्यावरच्या प्रेमामुळे असेल, पण माझ्या स्वातंत्र्यावर त्यानं कधी बंधन घातलं नाही. काही वेळा त्याला पटलंही नसेल, पण त्यानं त्याचं अवडंबर माजवलं नाही.

काम करण्याच्या बाबतीतही अशोकनं मला थांबवलं नाही. लग्नानंतर एकदाही, अक्षरश: एकदाही त्यानं मला तसं दुरूनही सुचवलं नाही. कारण त्याला ते मान्यच नव्हतं. काम करायचं की नाही, हा निर्णय त्यानं माझ्यावर सोपवला होता. हां, मी कोणत्या प्रकारचं काम करतेय, कोणत्या गुणवत्तेचं काम करतेय, याविषयी त्यानं माझ्याशी असंख्य वेळा वाद घातलेला आहे.

अशोक परफेक्शनिस्ट आहे. बायको म्हणून मला त्याचा त्रास होतो. त्याला सगळं नीटनेटकं लागतं. मात्र ते स्वत: करायचं नसतं, दुसऱ्यांनी करायचं असतं! जेवण समोर ठेवलेलं असलं तरी तो ते वाढून घेत नाही, पानात ते वाढून द्यावं लागतं. माझ्या पानातला पदार्थ संपलेला आहे, हे तुझ्या लक्षात यायला हवं आणि तू आपणहून मला वाढायला हवं असं त्याचं म्हणणं असतं. आमचं लग्न ठरल्यानंतर मी पहिल्यांदा अशोकच्या घरी गेले, तेव्हा त्याची बहीण कणसाचे दाणे काढून अशोकला देत होती. याचं कसं कौतुक होतंय, हे मला तेव्हाच कळायला हवं होतं खरं म्हणजे!

अशोक प्रचंड आळशी आहे. त्याला शिस्त हवी असते, पण स्वत: उठून त्याला काही करायचं नसतं. माझ्या वक्तशीर नसण्याबद्दल तो मला बोलतो आणि ते बरोबरही असतं. मात्र, मी घरातली सगळी कामं करून बाहेर जात असते आणि अशोकला घरातली इकडची काडी तिकडे करावी लागत नाही, हेही तेवढंच खरं आहे. तीन बहिणींनी लाडावलेला भाऊ आहे तो. हे बदलणं आजवर मला जमलेलं नाही.

शिस्तीच्या बाबतीतही अशोक काही वेळा अतिरेक करतो. त्याला सगळीकडे अगदी वेळेतच जायचं असतं. वेळेचं महत्त्व मलाही आहे, पण मला ते जमत नाही. त्यामुळे संध्याकाळी सात वाजता आम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं असलं की, सकाळी दहा वाजल्यापासून अशोकची भुणभुण सुरू होते. तसा त्याचा स्वभावच आहे. विशेषतः माझ्यामागे कटकट करणं, हा त्याचा अत्यंत आवडता छंट आहे, असं माझं म्हणणंच आहे. इतकं करूनही मी वेळेत तयार होणं शिकलेले नाहीच!

मात्र एकमेकांबरोबर असणं म्हणजे काय हे मी या नात्यात शिकले. अशोककडून मी कमिटमेंट शिकले. आम्ही म्हणजे आई, मीनल आणि मी, एकमेकींच्या अतिशय जवळ होतो. मीनल आणि मी आजही आहोत. मात्र सराफ कुटुंबामध्ये असलेली नात्याची घट्ट वीण मी आजतागायत कुठल्याही घरात बघितलेली नाही. सगळ्या भावंडांचं एकमेकांवर निरतिशय प्रेम. दे आर व्हेरी स्ट्राँग टुगेदर. त्यासाठी त्यांना माझा सलाम आहे. एकदा अशोकला बरं नव्हतं. त्याच वेळी अमेरिकेहून माझ्या नणंदेचा फोन आला. मला म्हणाली, ‘अग, मला आज खूप अस्वस्थ वाटतंय. अशोकची तब्येत ठीक आहे ना?’

अशोक तर अजूनही काही वेळा आमच्या मुलाला, अनिकेतला, माझ्या धाकट्या दिराच्या, सुभाषच्या नावानं हाक मारतो! सुभाष दहावीला जाईपर्यंत अशोक त्याचे लहान मुलासारखे लाड करायचा. मी या घरात येण्याआधी अशोकची आई गेली, पण त्याच्या बाबांबरोबरचं नातं मी बघितलंय. दौऱ्यावरून आला की, कितीही दमला असला तरी तो बाबांबरोबर थोडा का होईना वेळ घालवायचाच. त्यांची नखं कापून देणं, दाढी करणं हे सगळं तो जातीनं करायचा. ते करताना त्याला बरं वाटतंय, हे मला जाणवायचं. अशोक त्याच्या बाबांशी खूप अटॅच्ड होता.

 

अनिकेत अगदी लहान होता, तेव्हा तोही त्याच्या पपांशी अटॅच्ड होता. अशोक त्या काळात खूप बिझी असायचा. त्यातूनही वेळ काढून त्यानं अनिकेतला सायकल चालवायला शिकवलं. अनिकेतबरोबर वेळ घालवता यावा, यासाठी तो आवर्जून प्रयत्न करायचा. काही वेळा ते दोघंही आइसक्रीम खायला बाहेर जात.

अनिकेत मोठा व्हायला लागला, तसतशी त्यांच्यात एक दरी निर्माण झाली. इतकी की, मला मध्यस्थाची भूमिका निभावावी लागायची. अनिकेतविषयी काही बोलायचं असेल किंवा त्याला काही सांगायचं असेल, तर अशोक माझ्याशी बोलायचा आणि अनिकेतला पपांबद्दल बोलायचं असेल, तर तोही माझ्याकडे यायचा. ती दोघं एकमेकांबरोबर संवादच साधू शकत नव्हते. मोकळेपणानं बोलणं तर दूरच. दोघांच्या वयामध्ये असलेलं अंतर त्यासाठी कारणीभूत असावं. त्यांचे स्वभावही एकमेकांच्या अगदी विरुद्ध, त्यातूनही हे फ्रिक्शन निर्माण झालं असावं.

अनिकेत आणखी थोडा मोठा झाला आणि ही दरी हळूहळू बजली. मात्र याचं श्रेय मी अनिकेतला जास्त देईन. एक दिवस तो अशोकच्या जवळ जाऊन बसला. दोघं गप्पा मारू लागले. नात्यातला गुंता सुटला आणि एकमेकांच्या खूप जवळ आले. अशोकच्या कोणत्याही सिनेमाचं नाव घ्या, अनिकेतनं तो बघितलेला आहे. त्याच्या सिनेमांमधल्या बारीकसारीक गोष्टी अनिकेतच्या लक्षात आहेत. वडिलांच्या सिनेमांवर तो अधिकारवाणीनं बोलू शकतो, इतका त्याचा अभ्यास आहे. २०१७मध्ये शनिवारवाड्यावर अशोकचा सत्कार झाला होता. तेव्हा अनिकेत माझ्या बाजूलाच बसलेला होता. स्टेजवर बसलेल्या अशोककडे पाहत माझ्या कानात कुजबुजला, ‘ममा, आय कॅन नेव्हर अचिव्ह वॉट ही हॅज.’

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अनिकेतमळे अशोकही खूप बदलला. तरुण पिढी कसा विचार करते. आपल्यापेक्षी ती किती वेगळी आहे, आपण त्यांना कसं समजून घ्यायला हवं, याची जाणीव त्याला झाली. त्याचा एक परिणाम असाही झाला की, अशोकन कोणत्याही गोष्टीसाठी अनिकेतला नकार देणंच बंद करून टाकलं. अनिकेतला घरी कुत्रा आणायचा होता. अशोकला ते बिलकूल मान्य नव्हतं. केवळ मुलाचा हट्ट पुरवायचा म्हणून सनी आमच्या घरी आला. आता अनिकेत कॅनडाला गेल्यानंतर आम्ही दोघंच सनीची आमच्या बाळासारखी काळजी घ्यायला लागलोय. सनीच्या येण्यानं मी पहिल्यापासूनच खुश होते, आता अशोकलाही त्याचा खूप लळा लागलाय. मी घरी नसेन तर सनीला जेवण देणं, त्याच्याबरोबर खेळणं सगळं अशोक करतो. कोविडचा काळ अशोक घरात बसून शांतपणे आणि आनंदात घालवू शकला, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण सनीचं असणं हे आहे.

अनिकेतचं कॅनडाला जाणंही अशोकला फारसं पसंत नव्हतं. परंतु आपली मतं आपण आपल्या मुलांवर लादता कामा नये, त्यानं घेतलेल्या निर्णयामुळे तो सुखी होणार असेल, तर त्यात आपणही आनंद मानायला हवा, हे आम्हा दोघांनाही समजलंय.

आज तेहतीस वर्षं झाली आमच्या लग्नाला. हे लग्न टिकणार नाही, असं त्या वेळी अनेकांना वाटलं होतं. अनेकांनी मला तसं बोलूनही दाखवलं होतं. लग्न करायचं तर ते टिकवण्यासाठीच, असं मी पक्कं ठरवलं होतं. त्यासाठी लागतील ते आणि तेवढे प्रयत्न करण्याची माझी तयारी होती. कारण कोणतंही लग्न आपोआप टिकत नाही, त्यासाठी मेहनत करावीच लागते, असं मला वाटतं. तशी मी केलीये. त्यासाठी प्रसंगी माझ्या करिअरशी तडजोड केलीये. स्वत:ला बदललंय. अर्थात हे मी एकटीनंच केलंय असं नाही. अशोकनंही त्याच्या बाजूनं तेच केलंय. या नात्याशी शंभर टक्के बांधीलकी मानणारा नवरा मला मिळाला, म्हणून मी स्वत:ला अतिशय नशीबवान मानते. माझं सुखाचं आणि समाधानाचं पारडं खूप जास्त जड आहे.

‘मी बहुरूपी’ - अशोक सराफ

शब्दांकन - मीना कर्णिक

ग्रंथाली, मुंबई

पाने - २०८ (मोठा आकार)

मूल्य - ६०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......