एकदा राख झाल्यावर आपण कोण होतो, हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तोपर्यंत हिंदू म्हणून जगण्याची आणि ‘हिंदू’ कादंबरी वाचण्याची धडपड आपण करत रहायला हवी
ग्रंथनामा - झलक
महेश केळुसकर
  • ‘ठोका म्हणे आता’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Tue , 14 June 2022
  • ग्रंथनामा झलक ठोका म्हणे आता Thoka Mhane Aata महेश केळुसकर Mahesh Keluskar हिंदू Hindu भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemade

‘ठोका म्हणे आता’ हे कवी, विडंबनकार महेश केळुसकर यांचे नवे पुस्तक नुकतेच अनघा प्रकाशन, ठाणे यांनी प्रकाशित केले आहे. केळुसकर यांनी ‘इत्यादी’ या मनोविकास प्रकाशनाच्या मासिकामध्ये ‘आता कोठे धावे मन’ हे सदर ‘ठोकाराम’ या टोपणनावाने २००७ ते २०१८ दरम्यान लिहिले होते. अतिशय वाचकप्रिय ठरलेल्या आणि मराठी वाचकांना ठणठणपाळची आठवण करून देणाऱ्या या सदरातील ३२ काही लेखांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे. याचबरोबर केळुसकरांनी २०१९ साली ‘अक्षरधारा’ या मासिकात ‘घालीण लोटांगण’ हे सदर ‘घणघणटाळ’ या टोपणनावाने लिहिले होते. त्यातील ९ लेखांचा समावेशही या पुस्तकात आहे. या पुस्तकातील हा एक लेख...

..................................................................................................................................................................

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अनंतविश्वमाळेत पृथ्वी नावाचा एक ग्रह होता. त्या ग्रहावर आशिया नावाचं एक खंड होतं. त्या आशियात हिंसा नावाचा एक देश होता. त्या देशाला ‘भारत’ असंही एक लाडकं टोपणनाव होतं. ‘आपला देश परदेश, तर परदेश देश आपला’ या न्यायानं हिंदुस्थानातल्या देशी लोकांना परदेशी मादक द्रवपदार्थ आवडायचे, तर विदेशी प्रवासी ‘कंदी’ कुठे मिळते, याची चौकशी करायचे. तर अशा या उदाहरणार्थ हिंदुस्थानात महाराष्ट्र नावाचे एक नामांकित राज्य होते. या जय जय कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा राज्यात सांगवी-मोरगाव नावाचे एक जगप्रसिद्ध खेडे होते. त्या खेड्यात मॅक्झिमम अर्थात बहुत करून कुणबी लोक जन्माला यायचे. त्या गावात फार फार वर्षांनंतर पांडुरंग सांगवीकर नावाच्या एका २५ वर्षांच्या तरुण हिंदूचा जन्म १९६३ साली झाला. तो फारच बंडखोर वगैरे होता. तथापि, तो पुणे शहरात जन्मला, अशीही एक वदंता आहे.

पांडुरंग स्वभावाने फार रागीट होता. आपण लोकमान्य टिळकांएवढे तरी रागीट दिसले पाहिजे, तरच आपल्या बंडखोरीचा निभाव लागणार, हे लहानपणीच तरुण असताना ओळखलेले असल्याकारणाने पांडुरंगाने झुपकेदार मिश्याही वाढवल्या होत्या. त्यामुळे म्हंजे रागीटपणामुळेच तो कादंबरीला ‘कादंब्री’ आणि लायब्ररीला ‘लायब्री’ असे म्हणायचा. व्यवस्थितपणे अव्यवस्थित कसं बोलायचं आणि कसं लिहायचं, याची एक विलक्षण युक्ती पांडुरंगाने आपल्या प्रतिभाशक्तीने शोधून काढली होती. आणि ‘(प्रतिभा)शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ’ ही म्हण खरी ठरवून पुढे उत्तरायुष्यात त्याने एकापेक्षा एक सरस असे चमत्कार करून हजारो भक्त निर्माण केले.

१९६४ साली पांडुरंगाने मुंबई विद्यापीठाची एमे पदवी प्राप्त केली – इंग्रजी विषय घेऊन. पुढे आयुष्यभर त्याने इंग्रजी शिकवले, पण मराठीत लिहिले वगैरे. त्यामुळे त्याला पुढे ‘डिलीट’ नावाची मानाची पदवीही प्राप्त झाली. गुरुदेव टागोर दाढीवाले तर पांडुरंग मिशीवाला. त्यामुळे तो विद्यापीठीय राजकारणाची खिल्ली उडवत उडवत पुढे नोकरीच्या शेवटी शेवटी मुंबई विद्यापीठाच्या ‘गुरुदेव टागोर तुलनात्मक अभ्यास अध्यासना’वर जाऊन बसला व येणेप्रमाणे वयोमानानुसार यथावकाश निवृत्त झाला.

 पुणे व मुंबई येथे वास्तव केल्याने (म्हंजे राहिल्यामुळे) त्याला उडप्यांच्या हॉटेलातले डोसा, इडली वगैरे पदार्थ उदाहरणार्थ तंतोतंत आवडू लागले. तसेच शेरोशायरीचा नाद लागला. इतका की जवळ कागद नसला तर टिश्यूपेपरवरही तो पटकन शेर लिहायचा. दरम्यान एका हस्ताक्षरसंग्राहकाकडे पांडुरंगाने लिहिलेल्या फैजच्या शेराचा टिश्यूपेपर सापडला, तो पांडुरंगाच्या एका भक्ताने पर्वाच्या लिलावात तब्बल दोन लाख रुपयांना विकत घेतल्याची बातमी आलीय. तो शेर येणेप्रमाणे -

‘यह शहर भी शायद छीन लेंगी ये दुनिया

किसको याद रखना है किसको भूल जाना हैं’

(काही लोकांना वाटेल की, भूलतज्ज्ञाच्या करामतींवरचा हा शेर आहे, तर तसे नसून भारत-पाकिस्तान फाळणीवर लिहिलेला हा शेर आहे होय.) तर ते असो. असे शेर आठवून मधे मधे आपल्या कादंब्ऱ्य्रात पेरायचा, हा पांडुरंगाचा नाद पुढे कोणत्याही विषयावर शेरेबाजी करण्याच्या व्यसनात परावर्तित झाला. लघुकथा हा हिणकस वाङ्मयप्रकार आहे, वर्तमानपत्रे वाचणे म्हणजे वेळ वाया घालवणे, अशा प्रकारचे थोर थोर शेरे मारून सांगवीकरांनी आपले व्यसन चालू ठेवले. माणूस रिकामटेकडा असतो, तेव्हाच त्याच्या हातून काहीतरी चांगले लिहून किंवा पाहून/ऐकून होते, हे जागतिक सत्य असून आपल्या पहिल्या कादंब्रीत वेताळटेकड्यांचे प्रकरण घालून पांडुरंगरावांनी सिद्ध केले.

कालांतराने पहिली कादंबरी गाजल्यावर मग दुसरी, मग चौथी असे उदाहरणार्थ लेखन चमत्कार दाखविण्यात बिझी झाल्याने, पांडुरंगाच्या हातून आर्तता निसटली ती निसटलीच. उरले ते कसब आणि प्रचंड कष्टाळुपणे तावांमागून तावांवर ताव मारत राहणे. खांडेकर, कुसुमाग्रज, विंदा करंदीकर या ‘ज्ञानपीठ’प्राप्त लेखकांविषयी तुच्छतादर्शक बोलून बोलून दमल्यावर शेवटी पांडुरंगाने स्वत:च २०१४ साली ज्ञानपीठाच्या पायरीवर आपलेही बूड टेकले. त्याआधी उदाहरणार्थ २०११ साली ‘पद्मश्री’ व १९९१ साली ‘साहित्य अकादमी’चे पुरस्कार घेऊन झाले होते हे म्हणजे भलतेच. साधारण १९६५च्या दरम्यान आपण महाकाव्याच्या धर्तीवर हिंदू संस्कृतीवर महाकादंबरी लिहिणार, अशी पांडुरंगाने घोषणा केली होती. पण महाकादंबरी लिहायची तर महारिकामटेकडेपणा लागणार. तो त्याला मिळाला भारतीय उच्च अध्ययन संस्थान, शिमला या संस्थेची शिष्यवृत्ती मिळाल्यावर. या काळात सुमारे ३५ वर्षे लांबलेला कादंबरीचा खर्डा पक्का करण्यात आला. दरम्यान काळात पांडुरंगाचे लोकप्रिय प्रकाशक ३०१-महालक्षुमी चेंबर्स-भुलाभाई देसाई रोडकर यांनी ‘हिंदू’ची हवा पसरविण्यासाठी अपार कष्ट घेतले. असे कष्ट घेणे हेच त्यांचे डायेटिंग होते की, ज्यायोगे वजन कमी न होता ते वाढतच जाते. शेवटी २०१० साली ‘हिंदू’ ६०३ पानांचं कारवारी लुगडं नेसून अवतरलीच. लई कल्ला झाला राव. मराठी साहित्यविश्व की काय म्हणतात ते ढवळून निघालं. पांडुरंगाने रकानेच्यावर रकाने भरभरून वर्तमानपत्रांना मुलाखती दिल्या आणि ठरल्याप्रमाणे चॅनल्सवाल्यांच्या कॅमेऱ्यांसमोर जुनी तुच्छता विसरून, जुन्यांचाच कित्ता गिरवत आपला तात्त्विक मुलामा प्रदर्शित केला.

काही साहित्यमंबाजी जे की पांडुरंगाचे विरोधक आहेत, ते म्हणतात की, २०१४ साली हिंदुत्ववादी मंडळी सत्तेवर येणार, हे पांडुरंगाला १९६५ सालीच माहीत होतं. त्यामुळे ‘हिंदू’ लिहिण्यासाठी त्याने ३५ वर्षे घेतली. पण ठोकारामास तरी हे खरे वाटत नाही. फार तर ‘हिंदू’ लिहिल्याशिवाय आपल्याला ज्ञानपीठापर्यंत पोहोचता येणार नाही, हे ६५ साली पांडुरंगाने हेरलं होतं, असं आपण म्हणू शकतो. असो. ज्ञान महत्त्वाचं, पीठ काय गिरणीवर धान्य घेऊन गेलं की, तासाभरानं तरी मिळतंच!

‘ज्ञान महत्त्वाचे । नको मला पीठ।

आला देव वीट । पुरस्कारे।।

आपणही केले। जे जे धिक्कारीले।

थोर टुक्कारले। तिरस्कारे।।

बोलाचीच कढी। बोलाचाच भात।

ठोका म्हणे ऊत । सुरस्कारे।।’

‘हिंदू’ प्रसिद्ध झाल्यावर अनेक वाङ्मयीन, सामाजिक व राजकीय पारिणाम झाले. विरोधक असहिष्णू झाले आणि भक्त अधिक कट्टर झाले. काही जण अडगळीतून बाहेर आले, तर काही अडगळीत गेले. सगळ्यात भीषण अनुषंगिक परिणाम झाला तो ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस’वर. त्यांनी ऑक्टोबर २०१८च्या अंकात (‘हिंदू’ प्रसिद्ध झाल्यावर तब्बल ८ वर्षांनी – नशीब ३५ वर्षांनी नाही) ‘हिंदू : कादंबरीलेखन स्पर्धा’ जाहीर केलीय. स्पर्धेसाठी कादंबरी सादर करण्याचा अखेरचा दिनांक ३१ डिसेंबर २०१८ हा आहे. उत्कृष्ट ठरणाऱ्या २५, २० व १० हजार रु. ची अनुक्रमे पारितोषिके मिळणाऱ्या कादंबऱ्या ते स्वत: छापणार आहेत की, दुसरे कोण, ते त्यांनी स्पष्ट केलेले नसले तरी एखाद्या दुसऱ्या प्रकाशकाच्या पुस्तकाचे प्रमोशन तिसऱ्याच प्रकाशकाने करणे हे एकंदरीत थोर प्रकरण आहे.

ह्या थोरपणामुळे प्रभावित होऊन आणि बक्षिसाच्या आशेने सदर्हू ठोकारामाने या स्पर्धेत भाग घेण्याचे ठरविले आहे. स्पर्धेच्या नियमावलीप्रमाणे प्रस्तुत निवेदनाद्वारे ठोकाराम जाहीर करत आहे की, ‘‘माझी संकल्पित कादंबरी पूर्णपणे स्वतंत्र असणार असून ती लिहावयास मला किमान २२ वर्षे तरी लागतील. तस्मात् पहिल्या भागाचा खर्डा स्पर्धेसाठी पाठवीत असून, परीक्षकांना तो पसंत पडल्यास त्यास किमान २५ हजाराचे पहिले बक्षीस देऊन फेलोशिपसाठी त्याचा हुरूप वाढवावा. सदर्हू संकल्पित कादंबरीस ‘हिंदू’मधील कथाबीजाचा आधार असून परंतु आपल्या स्वत:च्या कल्पनाशक्तीच्याच बळावर संपूर्ण लेखन करण्याचा मानस आहे. तथापि मधेच प्रतिभाशक्तीने उसळी मारल्यास कादंबरी साडेअकरा वर्षांत आपल्या पब्लिशिंग हाऊसकडेच सादर करण्यात येईल. सदर्हू खर्डा लेखन ‘हिंदू’चा सिक्वेल नसून, तसे आढळल्यास ते आयोजकांनी अडगळीत टाकण्याची घाई न करता, आपल्या गोडाऊनमध्ये पेस्ट कन्ट्रोल करून संपूर्ण कादंबरी हाती येईपर्यंत सुरक्षित ठेवावे. कादंबरीच्या पृष्ठसंख्येला कोणतेही बंधन नाही, असे जरी आपण म्हटलेले असले तरी २५ हजारात किती पृष्ठे उदाहरणार्थ लिहायची वगैरे याचा थोर पूर्वानुभव प्रस्तुत लेखकास आहे.”

‘अनुभवावीण मान। डोलवावी काय ।

कामाला अडगळीवीण छान हालवावे पाय ।।

हातपाय हलविल्या। विना कीर्ती नाही।

वरातीमागून घोडे । गाढवच होई।।

ठोका म्हणे स्पर्धा ।हेचि लेखका जीवन ।

राहिले का गळू कधी ठणकल्याविणा ।।’

ठोकारामाच्या संकल्पित स्पर्धेच्छु कादंबरीचे शीर्षक असेल – ‘हिंदू : जगण्याची समृद्ध मरगळ’. परीक्षकांना आणि वाचकांना नम्र विनंती करण्यात येत आहे की, सदर्हू खर्डा वाचता वाचता मरगळ आल्यास दीड कप चहा किंवा सव्वा कप साधी कॉफी (कॉपी नव्हे) पिऊन शेवटच्या ओळीपर्यंत उत्साह टिकवून ठेवावा. वाचून झाल्यावरही मरगळ कायम राहिल्यास किंवा मरगळीच्या प्रमाणात वाढ झालेली आढळल्यास स्वत:च्या खिशाला जीएसटी धरून पर्वडेल अशा बेताने उत्तेजक पेय माफक प्रमाणात पिणे आरोग्यास उपायकारक ठरेल. तर पहिल्यांदा टायटल आधीची तर्पणपत्रिका सुचलीय ती येणेप्रमाणे :

‘ह्या विश्वप्रसिद्धीच्या घोंगावत्या साबणफेसात

निरर्थक न ठरो

आपल्या प्रतिभेचा सुरम्य सप्तरंगी बुडबुडा

न ढळो हे फुफाटी पांघरलेले

पापुलरी झाडातून डोकावणारे फॅशनसूर्य

ह्या उष्ण धनाशतत्त्वाच्या झपाट्यात दरवळो

अकाली मीडियानं उठवलेली स्क्रीनगंधी धूळ

साचो कर भरून वाचण्याची समृद्ध अडगळ’

आणि मग खर्डा कच्चा सुरू-

कोण आहे?

मी मी आहे, पांडुरंग सांगवीकर.

ह्यावर अंमळ चुळबुळत्साता खंडेराव विठ्ठल मोरगावकर म्हणतो, ‘म्हणजे?’

‘अरे, मीच. मला वळीखलं न्हाई की काय! पांडुरंगा, अरे, का असा हात धुवून माझ्या मागे लागला आहेस?’

ह्यावर सामसूम.

‘किती वर्षांची? तब्बल ३५ वर्षांची आणि पांडुरंगा, फक्त एकच गोष्ट पुन्हा पुन्हा किती काळ सांगत राहणार आहेस? नाव बदललं, गाव बदललं तरी मूळ स्वभाव बदलला नाही राव.’

रामकृष्ण. ही तर मोठी आफतच आली आपल्यासारख्या जगप्रसिद्ध तरुणावर.

हल्ली सांगायला पुष्कळ लोकांकडे पुष्कळ गोष्टी असतात. पण एक गोष्ट पुन्हा पुन्हा नवीन भासावी, अशी सांगण्याची कला फक्त आपल्याकडेच आहे, हे खंडेरावानं ओळखलं वाटतं. ओळखीना का. आपण त्याचंच नाव धारण करून इतक्या वर्षांत कष्टाने जमवलेली टिपणं एकेक करीत त्यालाच गोष्ट म्हणून ऐकविण्यात काही गैर किंवा वगैर आहे असं वाटत नाही.

अशा रीतीनं पांडुरंग सांगवीकर अडगळीतून बाहेर येऊन मोकळ्या हवेत गोष्ट ऐकवू लागला ती येणेप्रमाणे-

मी मी आहे, खंडेराव. होय खंडेराव सांगवीकर अर्थात पांडुरंग मोरगावकर. दंडातली बेडकुळी दाखवत तमाम रिकामटेकड्या साहित्यिकांना आणि वाचकांना खिजवत साहित्यसंमेलनाच्या व्यासपीठावर मी उद्या उभा राहणार आहे. संमेलनाच्या भिकारी निवडणुकांची पद्धत घटना दुरुस्ती करून महामंडळानं रद्द आणि माझी सन्मानानं निवड केली, नव्हे त्यांना ती करावीच लागली. हे मी स्वीकारणार नव्हतो, पण ते स्वीकारल्याने प्राचीन हिंदू संस्कृतीचे काही फारसे बिघडणार नाही, हे मनोमन पटल्याने, शिवाय ‘हिंदू चतुष्ट्या’तील पुढील तीन कादंबऱ्यांच्या प्रमोशनला याचा फायदा होण्याची शक्यता असल्याचं आमच्या प्रकाशकांनी पटवून दिल्यानं या नैसर्गिक आपत्तीचा मी धीरानं सामना करीत आहे.

मग मोठा गलबला करत आमच्या साहित्यउत्खनन प्रकल्पाचे आम्ही दीडदोनशे स्टाफ भक्त आर्यांच्या झुंडीसारखे वर्षे ओलांडत साहित्यनगरीकडे झपाझप चालू लागतो. तेव्हा एक विद्वान म्हणतो, ‘सर ह्या मराठीसाहित्य नदीकाठच्या संमेलन अरण्यात भीतीदायक माईकधारी पत्रकार किंवा साक्षेपी वाचक कुठे दिसतील, त्यांना टाळा.’

‘का?’

‘ते असे काही रहस्यमय प्रश्न विचारतात की नंतर आपल्याला आयुष्यभर झोप येत नाही.’

‘म्हणजे कसे?’

‘तर तू कोण आहेस? पांडुरंग की खंडेराव? तू कुठून आलास? सांगवीहून की मोरगावहून? ‘हिंदू’ ही जगण्याची समृद्ध अडगळ आहे कि गोंधळ? वयोमानाप्रमाणे शेरेबाजीचं व्यसन कमी होण्यासाठी काय काय प्रयत्न करता? लघुकथा हा क्षुद्र वाङ्मयप्रकार आहे, हे आपले मत अजूनही कायम आहे का? मग कादंबरी हा पाल्हाळिक उच्चवर्गीय वाङ्मयप्रकार मानावा का? ‘हिंदू’नंतर पुढच्या तीन कादंबऱ्या येण्यासाठी आणखी किती वर्षे लागणार? की त्यासाठी आणखी एखादी फेलोशिप मिळण्याची वाट पहावी लागणार?’

‘ही प्रश्नांची झंजट कोण फुकटची मागं लावून घेणार? कोऽहं आणि तत्त्वमसि च्यायची.’

ह्यावर सामसूम. कित्येक वर्षांची नि:शब्द.

मराठी साहित्यनदीच्या दोन्ही तीरांवरच्या घनदाट अरण्यामधल्या लेखकांची, कवींची, समीक्षकांची, प्रकाशकांची, मुद्रितशोधकांची, वाचकांची, विक्रेत्यांची, वर्तमानपत्रांची, नियतकालिकांची, मीडियाची हे शब्दयात्री तुला भीती वाटत नाही का, की इथे आणखी पाच-दहा वर्षांनी आपलं वाळवंट होऊन जाईल? ऐक, कान देऊन ऐक. ह्या साहित्यप्राण्यांच्या कळपांचे अनुष्टुभ छंदासारखे आवाज येत आहेत याच दिशेनं. मग कोणीतरी (बहुतेक ठोकाराम असेल) थट्टेनं मला विचारता झाला की, काहो खंडेराव हिंदू संशोधक, तुमच्या कादंबरीमधे वारंवार हिंदी सिनेमातली गाणी तुकड्या-तुकड्यांनी येतात, ती काय म्हणून? तुम्हाला लेखक व्हायचे होते की सिनेसिंगर?

तेव्हा मी खंडेराव विठ्ठल उदाहरणार्थ म्हणालो की, खरे तर मला सिगिंग अक्टर व्हायचे होते. पण अक्षय इंडीकर नावाच्या एका तरुणाने माझ्यावर जी डाक्युमेन्टरी केली आहे, त्यात त्याने फक्त मला अॅक्टिंगची संधी दिली. आणि परंतु हिंदू संस्कृतीचे, गाणे हे अविभाज्य अंग असल्याने, तसेच हिंदू म्हणन पुनर्जन्मावर विश्वास ठेवणे भाग असल्याने, मी पुढील जन्मी रायटर न बनता क्लासिकल सिंगर बनून दोनच ओळींच्या बोलांचा ख्याल साडेतीन तास ऐकत राहण्याचा रियाज श्रोत्यांना घडवणार आहे. कारण भावगीत काय किंवा सिनेमा गाणी काय हे क्षुद्र गायनप्रकार आहेत.

‘मग हिंदी सिनेमातली गाणी तुमच्या कादंबरीत कशी?’ असा अवतरणात्मक प्रश्न विचारण्यासाठी ठोकाराम पुन्हा तोंड उघडणार तोच मी खंडेराव त्याला म्हणालो की, ‘अशा रीतीनं श्रमाला केंद्रस्थानी ठेवून नैसर्गिक पिकांनी पृथ्वीची शान वाढवणारी आत्ममग्न स्वायत्त कृषीसंस्कृती परावलंबी होत गेली, याउलट भाषेला केंद्रस्थानी ठेवून शोषण करणाऱ्या नागरी, ऐतखाऊ औद्योगिक व्यापारी संस्थेची भरभराट झाली…’

हे ऐकल्यावर मात्र ठोकारामाचे तोंड ‘मी-टू’च्या अडचणीत सापडलेल्या मंत्री महोदयांप्रमाणे बंद झाले ते झालेच.

तर वाचकहो, तुम्हाला अंदाजही येऊ नये की, पांडुरंग कोण, खंडेराव कोण आणि ठोकाराम कोण, अशा वेगवेगळ्या आयडेंटिज मिक्स करून स्पर्धेसाठी कादंबरी पाठवण्याचा माझा विचार आहे. पहिला खर्डा (खर्डाही संपूर्ण नव्हे. ये तो केवळ झांकी हैं- समृद्ध गोंधळ बाकी हैं) मी आपणापुढे सादर केला आहे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

ह्यात अधूनमधून काही चमकदार शेर व सुभाषिते घुसवण्याचाही माझा विचार आहे की, जेणेकरून परीक्षकांवर आणि समस्त हिंदू संस्कृतीवर इम्प्रेशन मारू शकेन. उदाहरणार्थ –

- गेले द्यायचे राहून...तुझे रॉयल्टीचे देणे

- मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी समृद्ध अडगळ म्हणून मरेन

- प्रेमभंगाचा शॉक नाही असा जबर्दस्त शॉक नोटा बंदीमुळे तिला बसला

- विवाहबाह्य संबंधांपेक्षा वाङ्मयबाह्य संबंध हे अधिक भीषण असतात.

- लेखक-प्रकाशकांचे नातेसंबंध हे युती किंवा आघाडी सरकारांमधील पक्षांसारखेच असतात.

‘मैं नावेल लिख रहा हूँ टाईमपास करने का, आंखो पे चष्मा डालके तुम सोऽऽ जाने का...’ अशी ‘अफसाना लिख रही हूँ’ धर्तीची काही गाणीही टाकण्याचा माझा विचार आहे. वाचकहो, तुम्ही थोर आणि पोचलेले आहात, हे मी कधीच मान्य केलेले आहे. त्यामुळे हा येडगळ खर्डा वाचून झाल्यावर आपल्या शंका, कुशंका, सूचना बिनधास्तपणे रोखठोक मजकडे पाठविणे, हे आपले कर्तव्यच आहे. त्यात कसूर नको. ‘जया अंगी थोरपण। तया यातना कठीण।।’ असे म्हटलेलेच आहे. आपण सर्व माझे धर्मबांधव आहात. ‘गर्व से कहो हम समृद्ध अडगळ हैं’ ही आपली एकमेव घोषणा आहे. आपण जन्माला यायच्या आधी हिंदू नव्हतो की, मुसलमान की, ख्रिश्चन. आपण जन्मलो आणि हिंदू झालो. त्यामुळे अडगळ म्हणजे काय ह्याचे धर्मज्ञान आपणास झाले. आपण हिंदू असल्यामुळे मेल्यावर आपले दहन होणे हे नशिबात आहेच. आणि एकदा राख झाल्यावर आपण कोण होतो, हा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तोपर्यंत हिंदू म्हणून जगण्याची आणि ‘हिंदू’ कादंबरी वाचण्याची धडपड आपण करत रहायला हवी.

‘ठोका म्हणे आता’ - महेश केळुसकर

अनघा प्रकाशन, ठाणे

पाने - २०८

मूल्य - ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

..................................................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......