‘अस्वस्थ नोंदी’ : ही माळ आहे, माणुसकीवर श्रद्धा असलेल्या माणसाने जपली पाहिजे अशी, सलग वाचावी अशी आणि पुन्हा पुन्हा वाचावी अशी
ग्रंथनामा - झलक
अरविंद जगताप
  • ‘अस्वस्थ नोंदी’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Thu , 02 June 2022
  • ग्रंथनामा झलक अस्वस्थ नोंदी Aswastha Nondi गिरीश अवघडे Girish Avaghade

पत्रकार गिरीश अवघडे यांचं ‘अस्वस्थ नोंदी’ हे पुस्तक अलीकडेच जंगली बुक्स पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालंय. या पुस्तकाला सुप्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी लिहिलेली ही प्रस्तावना...

..................................................................................................................................................................

गिरीश अवघडे यांच्या ‘अस्वस्थ नोंदी’ वाचल्यावर आपण नोंद न केलेल्या कित्येक गोष्टी आठवत राहतात. आपण खूप गोष्टींची नोंदच ठेवलेली नाही, याची खंत वाटू लागते, आणि या माणसाने हे सगळं एवढ्या आत्मीयतेने नोंदवून ठेवलंय याचा हवा वाटू लागतो. खरं तर अशा नोंदी हे माणसाच्या चांगुलपणाचं लक्षण असतात. एरव्ही सहजासहजी एकमेकांना विसरणारी माणसं खूप असतात भवताली. महानगरात तर आता माणसांना सुखद किंवा दुखद धक्का बसतच नाही सहसा. त्यांना फक्त गर्दीत लागलेला माणसाचा धक्काच जास्त लक्षात राहतो. अशा काळात महानगरातल्या धकाधकीत राहूनही सहज प्रवासात किंवा अनोळखी ठिकाणी भेटलेल्या माणसांची ही व्यक्तीचित्रं आपल्यालाही गुंतवून ठेवतात. माणुसकी या एकाच धाग्यात ओवलेले मणी आहेत हे. ही माळ आहे, माणुसकीवर श्रद्धा असलेल्या माणसाने जपली पाहिजे अशी, सलग वाचावी अशी आणि पुन्हा पुन्हा वाचावी अशी.

लेखक दिल्लीत पत्रकार असल्याने गोष्टी तिकडच्याच आहेत. पण ही दिल्ली आपण वाचलेली किंवा फारशी पाहिलेली दिल्ली नाही. दिल्लीबद्दल खूप लोक सांगतात ती दंतकथा आठवली. दिल्लीतल्या कुठल्यातरी बादशहाकडे म्हणे एक कुत्रा होता. त्याचा खूप लाडका कुत्रा. आपण संस्थानिकांच्या गोष्टी वाचल्या तर लक्षात येईल की, जुने संस्थानिक आपल्या कुत्र्यांचं लग्न लावायचे. त्यासाठी लाखो रुपये खर्च करायचे. तर असाच एक बादशहा. ज्याने पराक्रमाने राज्यविस्तार केला. मोठमोठ्या वल्गना करून, थापा मारून तो मोठ्या साम्राज्याचा बादशहा झाला. युद्ध करायची त्याच्यावर वेळच आली नाही. कारण विरोधी लोकांना विकत घेणे किंवा त्यांच्यात फूट पाडणे हाच त्याचा उद्योग.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

तर थोड्याच काळात तो खूप मोठ्या मुलुखाचा बादशहा झाला. त्याचा एक लाडका कुत्रा होता. अर्थात अशा बादशहाच्या आसपास कुत्र्यासारखी वागणारी माणसंही खूप असतात. पण त्या बादशहाला तो कुत्राच जास्त आवडायचा. तर त्या बादशहाच्या लाडक्या कुत्र्याचं काही कारणाने निधन झालं. अक्षरशः लाखो लोक त्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेला आले. सगळी माणसं आवाक होऊन बघत राहिली. कुणाच्याच खानदानात कधीही एखाद्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेत एवढी माणसं आली नव्हती. एवढंच काय कधी कुठल्या बादशहाच्या अंत्ययात्रेत एवढी माणसं आली नव्हती. कारण आधीच्या बादशहांनी कधी एवढा साम्राज्यविस्तार केला नव्हता. ते बिचारे आहे त्या प्रजेचं भलं कसं होईल या चिंतेत असायचे.

तर त्या बादशहाच्या कुत्र्याची अंत्ययात्रा कितीतरी वर्ष चर्चेत होती. पण हळूहळू बादशहाचा लढाईत पराभव व्हायला लागला. लोक त्याच्यावर रागवायला लागले. लोकांना बादशहाच्या पोकळ गप्पा लक्षात यायला लागल्या. बादशहा कंगाल होत गेला. अशाच एका मोठ्या पराभवाने खचला आणि कंगाल अवस्थेत वारला. पण हैराण करणारी गोष्ट म्हणजे बादशहा जेव्हा मोठ्या साम्राज्याचा धनी होता, तेव्हा त्याच्या कुत्र्याच्या अंत्ययात्रेत लाखो लोक जमले होते. पण आता बादशहाच्या अंत्ययात्रेत मात्र पंधरा-वीस लोकसुद्धा नव्हते.

हा काळाचा महिमा असतो. लोक असेच वागतात. दिल्लीच्या बाबतीत ही गोष्ट नेहमी सांगितली जाते.

‘अस्वस्थ नोंदी’ वाचताना मात्र आपण एक वेगळीच दिल्ली बघू लागतो. मराठी माणसाला दिल्ली स्पर्धा परीक्षा, राजकारण या दृष्टीने जास्त माहिती असते. देशाच्या राजधानीबद्दल लोक जाहीर बोलत नाहीत. पण वैयक्तिक एकमेकांना सांगताना मात्र सांगितलं जातं की, दिल्लीत जरा जपून. दिल्लीत रात्री-बेरात्री फिरू नका. दिल्लीत प्रवास करताना जरा जपून. त्यात बातम्याही आपल्या भीतीला पुष्टी देणाऱ्या.

मुंबईत आणि दिल्लीतला हा फरक वैयक्तिक बोलण्यात खूप असतो आपल्याकडे. या पलीकडे दिल्ली फारशी माहिती नसते. खरं तर दिल्ली आणि मराठी माणूस हे खूप जवळचे नाते आहे. अगदी पुण्यातल्या शनिवारवाड्यालासुद्धा दिल्ली दरवाजा आहे. मराठी माणूस पंतप्रधान होऊ शकला नाही, म्हणून आपल्याला दिल्ली जास्त महत्त्वाची वाटते.

खरं तर देशाची घटना लिहायची होती तेव्हा गांधी, नेहरू, पटेलांनी बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवून घेतलं महाराष्ट्रातून. त्यानंतर अशा फार मोठ्या घटना नाहीत, ज्यात मराठी माणसाला दिल्लीत बोलवून घेतलं गेलं. खरं तर मराठी माणसाने त्यानंतरही दिल्लीला मनापासून साथ दिली, पण स्वाभिमान हरवला होता. त्यामुळे चिंतामणराव देशमुख आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी थेट राजीनामा दिलेली गोष्ट हाच स्वाभिमानाचा इतिहास आहे. नंतर फार काही नाही.

मग आपण दिल्लीकडे चाचपडत बघत आलो. दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात आपण परक्यासारखे ठेचा मिळेल का विचारतो. मिळत नसतो. कर्नाटक किंवा इतर दाक्षिणात्य राज्यांच्या भवनात उत्तम दाक्षिणात्य पद्धतीचे जेवण मिळते. आपण फार आग्रही नसतो हा मुद्दाही आहे. ‘दिल्ली दूर नहीं हैं’, हे म्हणायला सोपं, पण आपल्यासाठी दिल्ली खूप दूर आहे. दिल्लीच्या सीमेवर होणाऱ्या शेतकरी आंदोलनात मराठी माणूस दुर्मीळ असतो. पंजाब, राजस्थान, हरयाणा दिल्लीची कोंडी करू शकतात आपल्या मागण्यांसाठी. महाराष्ट्र नाही.

आपण दिल्लीकडे दुसऱ्याच्या नजरेतून बघतो. राजधानी आपल्याला फार जवळ नसते. छोले भटुरे, पराठे आपल्याला सिनेमात ठीक वाटतात. आपल्या रोजच्या जगण्याचा भाग नसतात. अशा वेळी आपल्यासारखी संवेदना असणारा माणूस दिल्लीतल्या गोष्टी सांगतो ही भन्नाट गोष्ट आहे. एक तर मराठीत गोष्टींचा भूगोल बदलला तरी भावना फार बदलत नाही. भाषा बदलते पण समस्या सारख्या वाटतात. अशा वेळी एका पूर्ण वेगळ्याच प्रदेशात घेऊन जातात या नोंदी.

आपण आजवर वर्तमानपत्र आणि वृत्तवाहिन्यांवर बघितलेल्या दिल्लीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिल्ली. आपल्याला अतिशय कंटाळा आलेल्या राजकारण्यापेक्षा वेगळी दिल्ली. आणि कुठलीही भूमिका न घेता आपल्या जवळच्या माणसाने सांगितलेली गोष्ट वाटतात या अस्वस्थ नोंदी. एरव्ही आपल्याला आता कुठल्याही माध्यमातल्या गोष्टीवर चटकन विश्वास बसत नाही. कुणीतरी आपला अजेंडा रेटतोय अशीच शंका येते. पण अस्वस्थ नोंदी अगदी निस्वार्थ आहेत. जगात चांगली माणसं आहेत अजूनही या गोष्टीवर विश्वास ठेवायला बळ देतात या गोष्टी. एवढ्या अस्वस्थतेतही या नोंदी आपला आशावाद सोडत नाहीत. या गोष्टी टिपणारा माणूस आशावादी असल्याशिवाय हे शक्य नसतं. त्यामुळे हे श्रेय निश्चितच लेखकाचं आहे. ग्लास अर्धा रिकामा आहे हे दाखवताना ग्लास अर्धा भरलेला आहे हे दाखवायला लेखक विसरत नाही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

................................................................................................................................................................

अस्वस्थ नोंदी वाचताना गिरीश अवघडे यांच्या निरीक्षणशक्तीची कमाल वाटत राहते. खुपदा आपण जी गोष्ट टिपण्याचा विचारही करत नाही, अशा गोष्टी हा माणूस मांडत असतो. त्यांच्या नोंदी अस्वस्थ करतात. विचार करायला लावतात. ‘आत्मदहन’, ‘दिल्लीची छाया’ या काही अतिशय साधेपणाने लिहिलेल्या नोंदी हादरवून टाकतात. बातमी लिहिणारा पत्रकार माणूस असा अजिबात मसाला न टाकता लिहितो, हे कमालीचं आवडून जातं.

खरं तर पत्रकाराची एक स्वतंत्र नजर तयार झालेली असते. पण त्या नजरेत खुपदा बिनचुकेपणा जास्त आढळतो. माणुसकीपेक्षा त्याची विचारसरणी जास्त डोकावत असते. पण हा संग्रह सगळ्या स्तरातल्या माणसांचं चित्र रंगवतो. खरं तर गोष्ट तुम्ही जेवढी प्रामाणिकपणे सांगाल तेवढी थेट भिडते. काही लोक म्हणतात तुमच्या शरीरात उष्णता जास्त असेल तर तुम्ही खाल्लेलं पान जास्त रंगतं. अशा गोष्टींच्या बाबतीत एक होऊ शकतं. तुम्ही भवतालच्या गोष्टींनी अस्वस्थ होणारे असाल तर या गोष्टी तुमच्या स्वतःच्या वाटतील. काही लेखक टोकाचे वाटतात. काही लेखक समविचारी वाटतात. पण चांगले लेखक नेहमीच आपले वाटतात. हक्काचे वाटतात. गिरीश अवघडे त्यापैकी एक आहेत. त्यांना मनापासून शुभेच्छा!

‘अस्वस्थ नोंदी’ : गिरीश अवघडे

जंगली बुक्स पब्लिकेशन

मूल्य : १२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Vishnu Date

Wed , 08 June 2022

अवघडेंच्या ह्या नोंदी "स्वस्थ" पणे वाचायलाच हव्यात...!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......