ज्यांच्या आयुष्यात दत्त आपटे यांच्यासारखा शिक्षक आला असेल, त्यांच्या त्या काळातील आनंदाला तोड नाही!
ग्रंथनामा - झलक
श्रीनिवास विनायक कुलकर्णी
  • ‘दत्त आपटे : व्यक्ती आणि वाङमय (खंड १ व २)’ची मुखपृष्ठे
  • Thu , 05 May 2022
  • ग्रंथनामा झलक दत्त आपटे : व्यक्ती आणि वाङमय (खंड १ व २) दत्त आपटे Datta Apte मॉडेल हायस्कुल Model High School आरवाडे हायस्कूल Aarvade High School औदुंबर साहित्य संमेलन Audunbar Sahitya Sanmelan

सांगलीच्या सार्वजनिक क्षेत्रात अढळ स्थान मिळवलेले गेल्या पिढीतील थोर शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक आणि साहित्यिक दत्त आपटे यांच्याविषयी ‘दत्त आपटे : व्यक्ती आणि वाङमय (खंड १ व २)’ हा ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला. पहिल्या खंडात आपटे यांच्याविषयी मान्यवरांच्या, त्यांच्या सहकाऱ्यांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि कुटुंबीयांच्या आठवणी आहेत; तर दुसऱ्या खंडात आपटे यांच्या लिखित व अनुवादित पुस्तकांचा समावेश आहे. या खंडांना प्रसिद्ध ललितलेखक श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी लिहिलेले हे प्रास्ताविक…

..................................................................................................................................................................

लुटुनि नेसि काय काळा सौख्य माझे मागले

भोगले ते भोगले।

कोणत्याही पिढीतील ज्या माणसांनी अनेक अनुभव घेतले, काहीतरी करून दाखवलं, आयुष्याचा आस्वाद मनोभावे घेतला, अशा मनुष्यजातांस ग. दि. माडगूळकरांच्या या ओळी आपल्याच वाटतील. माडगूळकरांनी स्वतःच म्हटलं आहे की, त्यापुढची कविता कधी पुरी झाली नाही. परंतु या दोन ओळी म्हणजे परिपूर्ण कविताच वाटते. विशेषतः स्वातंत्र्याचा उंबरठ्यावरचा काळ ज्यांनी आपल्या उमलत्या वयात पाहिला, त्या माझ्या पिढीला तरी ते बोल स्वतःचेच वाटतील, आणि ज्यांच्या आयुष्यात दत्त आपटे यांच्यासारखा शिक्षक आला असेल, त्यांच्या त्या काळातील आनंदाला तर तोड नाही, असं मी म्हणतो.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

कृष्णा नदीकाठच्या औदुंबर क्षेत्री मी जन्मलो, बालपणानंतर काही शिक्षण तर घेतलं पाहिजे म्हणून निवारा आणि शाळेचा शोध घेत सांगलीला पोचलो. तिथल्या विष्णू घाटाशी माझ्यासारख्या गरीब मुलांसाठी कुण्या कनवाळूनं आश्रम स्थापन केला होता, तिथं मी माझा गबाळा टाकला. भल्या घरात वार लावून जेवणं किंवा माधुकरी मागणं हा त्या काळातला सोपा तरीही प्रतिष्ठित मार्ग होता; कारण तशा घरांमध्ये होतकरू विद्यार्थ्यांसाठी, कर्तव्यभावनेतून मिळणारी सन्मानाची एक जागा होती. शिवाय प्रत्येक इच्छुक मुला-मुलीला शिकवलंच पाहिजे, अशी तळमळ असणारी गुरुजनांची रीत होती. सांगली हे अशा सुसंस्कृत विद्याचरणी विचारांचं छोटं शहर होतं. दत्तोपंत आपटे हे त्या गावातलं सळसळतं चैतन्य होतं. त्यांच्या क्रांतिकार्याशी, तारुण्यसुलभ विधायक विचारांशी, रगेलपणाशी माझा दूरान्वयानंही संबंध आला नाही; तरीही मी त्यांच्याच ‘तालमी’त वाढलो, ही गोष्ट निर्विवाद आहे.

मी प्रताप मॉडेल हायस्कुलात दाखल झालो, तेव्हा शाळा पांजरपोळाच्या आवारातच होती. माझ्या शाळेच्या दिवसांतच ती शाळा ‘आरवाडे हायस्कूल’ होऊन नव्या इमारतीत आली. शाळेतले ते माझे दिवस मला आजही स्पष्ट दिसू लागतात. आपटे सर इतिहास शिकवत. ‘सगळं जग समजून घ्यायचं असेल तर त्याचा इतिहासच तुम्हाला माहीत हवा’ असं म्हणत, आणि बहुधा जगासंबंधीच बोलत राहत. कितीतरी नवं कळे. सरांचं बोलणं असंच चालू राहावं वाटे. पण ज्यांना मार्कांची काळजी असे, त्यांची चुळबूळ चाले. एका तासाला वर्गमित्र धम्मू उभा राहिला. म्हणाला, “सर, तुम्ही सांगताय ते ऐकावं वाटतंय, आवडतंय, पण आम्ही इतिहासाच्या पेपरला काय लिहायचं ते सांगा.”

विषयांतर सरांच्या लक्षात येई. म्हणत, “असं होतंय का? बरं, लिहून घ्या. तुम्ही ‘हं’ म्हणालात की पुढचं सांगेन.” सरांचा तास संपला तरी त्यांच्या आवाजाचा घोष मनात ऐक येई. दत्त आपटे म्हणजे डी.एन.सर. त्यांचे बंधू आम्हाला इंग्रजी शिकवत. दोघेही भाऊ बलभीम व्यायामशाळेत नेहमी असत. दोघेही बलदंड, देखणे, तांबूस गोरे, स्वच्छ, नितळ सतेज दिसत. व्हीएन सर सुंदर शिकवत. आम्हांला इंग्रजी अभ्यासाला ‘Gleanings from English Literature’ हे अवघड टेक्स्ट बुक होतं. त्यांनी पहिल्याच तासाला ‘द ईगल’ ही कविता शिकवली. ‘He clasps the crags with hooked hands’, असे अनेक अनोळखी शब्द. भीतीच वाटली. सर म्हणाले, “इंग्रजीला घाबरू नका. ती शिकाल तशी ओळखीची होत जाईल. ती जगभर चालणारी सुंदर भाषा आहे.” मला त्या भाषेचं महत्त्व एकाएकी जाणवलं.

व्हीएन सरांनी माझी इंग्रजी भाषेची वाढती आवड बघून मला अभ्यासाच्या पुस्तकातल्या इंग्रजी कवितांचं व अन्य साहित्याचं मराठीत भाषांतर करायला सांगितलं. ‘कुठं अडलं तर भेट’ म्हणाले. माझं भाषांतर काचपेटीत लावत. ‘भाषांतर हा एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शिरण्याचा सुंदर मार्ग आहे’ म्हणत. आजअखेर व्हीएन सरांनी लावलेल्या भाषांतराच्या सवयीचा मला उपयोग होतो. आनंद होतो.

डीएन आणि व्हीएन सर म्हणजे दोन वाघच वाटत. डीएन सर गब्रूसारखे दिसत, ते केवढंही मोठं काम करू शकतील असं वाटे. त्यांना सगळ्या गोष्टीत उत्साह असे. १९४८च्या जाळपोळीत आमचा अनाथ विद्यार्थी आश्रम जाळायला दंगेखोरांचा जत्था आला. ‘ही गरीब मुलं आहेत. त्यांचा आधार काढून घेऊ नका’ असं म्हणत आपटे सर त्या समूहाला सामोरे गेले होते. त्यांना काठीचे तडाखे खावे लागले होते. रक्तबंबाळ झाले होते. समूहाला धाडसानं सामोरं जायची, जनसमुदायात मिसळण्याची त्यांना ऊर्मी असे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

कृष्णेला पूर आला की, आपटे सर पोहण्याच्या स्पर्धा भरवत. दहावी-अकरावीतल्या मुलांना घेऊन स्वत; मुलांबरोबर पोहायला पडत. आयर्विन पुलाच्या कमानीतून सांगलवाडीला निघायचं. तिथून जी मुलं दमलेली असत, त्यांना ते थांबवून पुलावरून पलीकडे पोचवत आणि सांगलवाडीहून उरलेल्या मुलांना घेऊन पुराच्या पाण्यातून पोहत काही मैलांवर असलेल्या हरीपूरला पोहोचत. आणि तिथून नुसत्या भिजलेल्या लंगोटावर मुलांबरोबर चालत सांगलीला येत.

सरांना गांधी, नेहरू, दादाभाई, मौलाना आझाद यांच्याविषयी मोठं प्रेम. सर काँग्रेसच्या सभा-संमेलनांत असत. खादीची पांढरी टोपी, खादीचा शर्ट, धोतर वापरत. खादीचाच भरड पोताचा तपकिरी कोट घालत आणि जंगी दिसत. ते कुठल्या तरी अज्ञात प्रदेशातून आल्यासारखे भासत. शाळेच्या ‘विकास’ या त्रैमासिकात त्यांचं लेखन वाचायला मिळे. एकदा त्यांनी अनुवाद केलेली ‘ओडेसा’ नावाची रशियन वातावरणातील सुंदर कथा वाचली. क्षणभर सर त्याच वातावरणातून आले आहेत असं वाटलं. ते रशियन असल्यासारखे वाटले. ‘गोठवून टाकणारी थंडी... धुकं...धुकं…रणगाड्यांचे आवाज...’ सर लेखक आहेत हे त्या क्षणी तीव्रतेनं जाणवलं आणि मला विलक्षण आनंद झाला. मला ते इतक्या प्रेमानं का वागवताहेत, याचं रहस्य कळल्यासारखं वाटलं.

सांगलीला मी अनाथ विद्यार्थी आश्रमात राहून, कोरडी भिक्षा-माधुकरी मागून शिकत होतो. आश्रमाचं एक हस्तलिखित षण्मासिक निघायचं. आश्रमातले विद्यार्थी त्यात लिहायचे, चित्रं काढायचे. माझं अक्षर चांगलं असल्यामुळे ते हस्तलिखित लिहिण्याचं काम माझ्याकडं आलं. आमच्या आश्रमी प्रकाशनाला दुसऱ्या प्रतिष्ठित हायस्कूलमधल्या मराठीच्या एका सरांना अध्यक्ष म्हणून बोलावलं. हे सर त्यांच्या शाळेतल्या मासिकात सुमार कविता लिहीत, पण आपण फार मोठे कवी आहोत, अशा थाटात वावरत. त्यांनी भाषण केलं. त्या हस्तलिखितात माझी –

‘वटराज शोभते नांव तुला

आवडसी रे तू सकलां’

अशी ‘वटराज' नावाची कविता समाविष्ट होती. या कवितेवर या पाहुण्या सरांनी भाषणात झोड उठवली. ‘ही चोरलेली कविता आहे. ग.ह.पाटील म्हणून प्रसिद्ध कवी आहेत. त्यांची ही कविता आहे. या मुलानं ती चोरली आहे. ही वाङ्मयचौर्याची सवय वाईट-’ असं कायबाय बोलले. मी आपटे सरांना ही गोष्ट सांगितली. त्यांनी माझी कविता पूर्ण वाचली. म्हणाले, “ही ग.ह.पाटलांची कविता नाही. ही वेगळी कविता आहे. तुझ्या गावाकडल्या वडाविषयीच्या भावना या कवितेत आल्या आहेत. आपण ती आपल्या शाळेच्या ‘विकास’मध्ये छापू.” तशी त्यांनी ती छापली.

वर्डसवर्थच्या ‘द सॉलिटरी रीपर’ या कवितेचं मी केलेलं मराठी छंदोबद्ध भाषांतर सरांनी काचपेटीत लावलं होतं. लिहायला मला ते सतत प्रोत्साहन देत. ‘विकास’ त्रैमासिक सरांच्या आग्रहामुळेच नियमितपणे निघत होतं. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या माझ्या लेखनासंबंधी सर बोलत. ‘विकास’मध्ये माझी एक गोष्ट प्रसिद्ध झाली होती. दिवाळीच्या दिवसांत आमच्या गावी - औदुंबरला सुसरीनं नदीकडच्या भागात एका माणसाला ओढून नेलं होतं. त्याच्या बायकोच्या शोकाची ती गोष्ट. आपटे सर म्हणाले, “तुझी गोष्ट वेधक आहे, पण दिवाळीच्या दिवसांत नदीवर चांदणं कुठून पडलं आहे?” मी सरांना म्हटलं, “ते चांदणं कुलकर्णी सरांनी गोष्टीत घातलं आहे.” आपटे सर ते ऐकून हसले आणि म्हणाले, “सगळेच शिक्षक काही शहाणे नसतात, हे लक्षात ठेव. आपण त्यांचा अनादर करू नये, पण त्याची विद्वत्ता मनात जाणून ठेवावी.”

आमच्या विद्यालयात प्रतिवर्षी हस्ताक्षर स्पर्धा असत. आठवीपासून अकरावीपर्यंतची मुलं स्पर्धेत भाग घेत. एका सुंदर, गोऱ्या, उंच मुलीला नेहमी पहिलं बक्षीस मिळे. आपटे सर म्हणाले, “तुझ्या अक्षराला इथं तोड नाही, पण तुला पहिलं बक्षीस मिळणार नाही.” मी विचारलं, “का?” तर हसून म्हणाले, “का म्हणजे, तू मुलगी नाहीस. दोन वर्षांनी ती अकरावी होईल.” तसंच झालं.

सहस्रबुद्धे मुख्याध्यापक म्हणून आले. ते सायन्सचे पदवीधर. त्यांना गणिती विद्यार्थी आवडत. ते फिजिक्स, केमिस्ट्री शिकवत. एका तासाला केमिस्ट्रीची इक्वेशन्स विचारत होते. मला त्या दिवशी मुंबईच्या ‘खेळगडी’ मासिकाचं पत्र आलं होतं. ‘जीवनकलह’ नावाची मी लिहिलेली कथा स्वीकारल्याचं त्यांनी कळवलं होतं. मी ते पत्र टेबलाच्या खणात ठेवून वारंवार आनंदानं वाचत होतो. माझी पाळी आली. सहस्रबुद्धे सरांनी मला इक्वेशन विचारलं. मी टेबलाच्या खणातून वरती मान काढून तत्काळ उत्तर दिलं. सरांनी मला म्हटलं, “यू हॅव सीन इन द बुक.” मी म्हटलं, “नो सर, आय हॅवन्ट सीन इन द बुक.” त्यांनी मला बेंचवर उभं केलं. मी तेच उत्तर दिलं. त्यांनी मला त्यांच्या जवळच्या टेबलावर उभं केलं. सर संतापले. म्हणाले, “गेट आऊट. माझ्या तासाला पुन्हा बसायचं नाही.”

मी सैरभैर झालो. खरं तर केमिस्ट्री हा माझा आवडता विषय होता. तास संपल्यावर माझा मित्र धम्मू आरवाडे (नंतर सांगलीतला प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ.डी.जे.आरवाडे) माझ्याजवळ येऊन म्हणाला, “काळजी करू नको. आपल्याला ५० मार्कांचीच केमिस्ट्री आहे. ती तू पुस्तकातून पाठ करून टाक. तासाला बसायची गरज नाही.” नंतर आपटे सरांना मी ही हकिगत सांगितली. मला ‘खेळगडी’ मासिकाचं आलेलं पत्र दाखवलं. सर म्हणाले, “या पत्राची किंमत थोड्या माणसांनाच कळेल.”

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

एकदा दुपारी चार वाजता शाळेचा शिपाई ‘आपटे सरांनी बोलावलंय’ असं सांगत वर्गात आला. मला धडकीच भरला. दबकत त्यांच्या केबिनमध्ये गेलो. “बस” सर म्हणाले, “असं कर, आश्रमात जा. तुझे रोजचे कपडे घे. अंथरूण-पांघरूण नको. आणि माझ्या घरी मुक्कामाला दोन दिवस ये. घर माहीत आहे ना? मी आश्रमाच्या व्यवस्थापकांना सांगितलं आहे.” घर मला माहीत होतं. मग सर म्हणाले, “माझ्या बायकोनं एक पुस्तक लिहिलं आहे- ‘तीन शिलेदार’ या नावाचं. मुंबईचे केशव भिकाजी ढवळे हे प्रकाशक आहेत. ते छापायला द्यायचं आहे. त्याच्या हस्तलिखिताची शुद्ध, स्वच्छ अक्षरातली प्रत करावी लागते. तुझं अक्षर उत्तम आहे आणि शुद्धलेखनही उत्तम आहे. तेव्हा ती प्रत तू कर. आमच्या घरीच राहायचं, जेवायच-खायचं-पुस्तकाचं काम करायचं.” मी जीव मुठीत धरून सरांच्या घरी राहायला गेलो. माझे अंगावरले कपडे त्यांच्या घरात शोभण्यासारखे नव्हते. सरांनी घरातल्यांच्या ओळखी करून दिल्या. “या लेखिका उषा आपटे! या इकडे आहेत त्या विनायकरावांच्या पत्नी- आमच्या वहिनी. त्यांची मुलगी गंगू तुझ्याच वर्गात आहे.” घर सुंदर, दुमजली, चकचकीत. प्रचंड पुस्तकांचा संभार. ‘वेळ मिळेल तेव्हा पुस्तकं बघ.” सर म्हणाले. वाटलं, ‘आपण इतकं सगळं वाचलं पाहिजे. कधी वाचणार?’ हस्तलिखित लिहून झालं. ‘छान झालंय’ उषाबाई म्हणाल्या. सरांनी माझ्या हातावर एक पाकीट ठेवलं. म्हणाले, “तुझ्या श्रमाचे आहेत. तूच वापर. मी आश्रमाच्या व्यवस्थापकांना बोललोय.” मला रडायला आलं. माझ्या पाठीवरून हात फिरवत सर म्हणाले, “तू आता लवकरच हायस्कूल सोडशील. पुढं काय करायचं ते तुला ठरवावं लागेल, पण घरी येत जा. वाचत जा. इथली पुस्तकं नेत जा, आणि लिहायचं सोडू नको...”.

शाळा संपवून आम्ही सारे पुढच्या प्रवासाला बाहेर पडलो. मुंबईच्या ख्यातनाम अशा मौज प्रकाशन संस्थेत मला काम करता आलं. काही लेखनही केलं. औदुंबरला दर संक्रांतीला साहित्य संमेलन भरतं, त्यात मला कायमच सक्रिय राहता आलं. या साऱ्या कारकिर्दीत माझ्या परीनं काही चांगलं करता आलं असेल, तर त्याचं श्रेय माझ्या गुरुपदी असलेल्या दत्तोपंतांना दिलं पाहिजे. ‘विद्यार्थी घडवणं’ म्हणजे काय, यावर आजच्या काळातील अनेक शिक्षणतज्ज्ञ चर्चा करत असतात. ज्यांनी दत्तोपंत अनुभवले त्यांना त्या चर्चेचा मथितार्थ कधीच गवसला असेल.

तथापि त्या किंवा त्यानंतरच्या काळातही दत्त आपटे यांनी अनेकविध क्षेत्रांत अफाट काम केलं, त्याविषयी मला तरी तितकीशी अचूक माहिती नव्हती. विद्यार्थिदशेतील आपल्या गुरुजनांबद्दलच्या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या भावना मनात असणं, आणि दत्तोपंतांच्या जीवनकार्याचं यथार्थ दर्शन होणं, यात फार फरक आहे.

प्रस्तुतचा ग्रंथ पाहिल्यानंतर मला ते प्रकर्षानं जाणवलं. त्यांच्या आठवणी संग्रहित करण्याच्या निमित्तानं या प्रकल्पाचा प्रारंभ झाला, आणि ‘दत्त आपटे : व्यक्ती-कार्य-वाङ्मय’ अशा नावानं तो समग्रपणे परिपूर्ण होत आहे, ही मला विशेष अर्थपूर्ण घटना वाटते. या समग्र ग्रंथास प्रास्ताविक लिहिण्याची संधी आणि बहुमान मिळणं हे तर परमभाग्य. वास्तविक हा ग्रंथ पूर्णतेच्या टप्प्यावर असताना माझी प्रकृती फारच क्षीण झाली आहे. तरीही ‘लिहायचं सोडू नको...’ हा डीएन सरांचा आदेश मला मोडताच आला नाही. तथापि हे लिहिण्यासाठी मला या ग्रंथाच्या संपादकांचीही मदत झाली आहे.

त्यांच्याविषयी आठवणी, आणि त्यांनीच नमूद केलेला त्यांच्या यंगमेन्स मॉडेल एज्युकेशन संस्थेचा इतिहास कोणालाही प्रेरक वाटेल. दत्त आपटे या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेण्याचं मोलाचं कार्य या प्रकल्पाच्या पहिल्या खंडातून साधलं आहे. मी आयुष्यभर ग्रंथप्रकाशनाच्या क्षेत्रात वावरलेला असल्यामुळे, या प्रकल्पाच्या दुसऱ्या खंडाचंही महत्त्व माझ्या लक्षात येतं आहे. दत्तोपंतांनी इतकं वाङ्मय प्रसवलं, हे माझ्यासारख्या ‘त्यातल्या’ माणसालाही आश्चर्यच होतं. त्याव्यतिरिक्त विषयांचं वैविध्य, भाषेतील साधेपणा, निवेदनशैली, लेखनप्रकार, आणि त्यासाठी वाचनादी अभ्यास या सगळ्यांचा प्रत्यय त्यांच्या साहित्यातून आल्याशिवाय राहत नाही. डॅन ब्रीन या आयरिश क्रांतिकारकाच्या आत्मवृत्तातील आपटे यांनी केलेलं समारोपाचं लेखन, त्यांच्या क्रियाशील जीवनाचं सार आहे, हेही सांगायला हवं!

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

संयोजकांनी म्हटल्याप्रमाणे हा वाङ्मयीन ठेवा म्हणून जतन करणं अत्यंत गरजेचं होतं, ते या प्रकल्पानं साध्य झालं आहे. प्रकल्पासाठी काम करणाऱ्या समिती सदस्यांची मान्यवर नावंच त्याची यशस्विता निश्चित करणारी आहेत. त्या सर्वांनी घेतलेले परिश्रम दाद देण्याजोगेच आहेत. विद्यापीठं, ग्रंथालयं, सामाजिक संस्था, आणि अभ्यासक अशा साऱ्या घटकांसाठी हा अमोल ठेवा या समितीनं अपलब्ध करून दिला आहे.

अर्थातच दत्त आपटे यांचा एक विद्यार्थी म्हणून त्याचा मला होणारा आनंद सांगता येणार नाही. माझ्यासारख्यांच्या अंतःकरणात वसलेले दत्त आपटे, या ग्रंथामुळे मानवतेच्याच भविष्यकालात चिरंजीवित्व पावतील, अशी माझी श्रद्धा आहे.

‘दत्त आपटे : व्यक्ती आणि वाङमय (खंड १ व २)’ – संपादन – वसंत आपटे,

दत्त आपटे समग्र ग्रंथ प्रकल्प समिती, सांगली

मूल्य – २००० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सोळाव्या शतकापासून युरोप आणि आशियामधल्या दळणवळणाने नवे जग आकाराला येत होते. त्या जगाची ओळख व्हावी, म्हणून हा ग्रंथप्रपंच...

पहिल्या खंडात मॅगेस्थेनिसपासून सुरुवात करून वास्को द गामापर्यंतची प्रवासवर्णने घेतली आहेत. वास्को द गामाचे युरोपातून समुद्रमार्गे भारतात येणे ही जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारी एक महत्त्वपूर्ण घटना होती. या घटनेपाशी येऊन पहिला खंड संपतो. हा मुघलपूर्व भारत आहे. दुसऱ्या खंडात पोर्तुगीजांनी भारताच्या किनाऱ्यावर सत्ता स्थापन करण्याच्या काळापासून सुरुवात करून इंग्रजांच्या भारतातल्या प्रवेशापर्यंतचा काळ आहे.......

जेलमध्ये आल्यावर कैद्याच्या आयुष्याचे ‘तीन-तेरा’ वाजतात ही एक छोटी समस्या आहे; मोठी समस्या तर ही आहे की, अवघ्या फौजदारी न्यायव्यवस्थेचेच तीन-तेरा वाजले आहेत!

एकेकाळी मी आयपीएस अधिकारी होतो, काही काळ मी खाजगी क्षेत्रात सायबर तज्ज्ञ म्हणून कार्यरत होतो, मध्यंतरी साडेतेरा महिने मी येरवडा जेलमध्ये चक्क ‘अंडरट्रायल’ अथवा ‘कच्चा कैदी’ म्हणून स्थानबद्ध होतो नि आता मी हायकोर्टात वकिली करण्यासाठी सिद्ध झालो आहे, अशा माझ्या भरकटलेल्या आयुष्याकडे पाहताना त्यांच्यातल्या प्रकाशकाला कुठला चमचमीत मजकूर गवसला कुणास ठाऊक! आणि हे आयुष्यातलं पहिलंवहिलं पुस्तक.......