सध्याच्या महाराष्ट्रातील वाचाळ लोकप्रतिनिधींचे गचाळ, बेपर्वा आणि बेजबाबदार वर्तन सामाजिक पर्यावरण कलुषित करणारे आहे
पडघम - राज्यकारण
अजय देशपांडे
  • महाराष्ट्राचा नकाशा आणि राज ठाकरे पुण्यातील एका कार्यक्रमात, किरीट सोमय्या आणि संजय राऊत
  • Wed , 04 May 2022
  • पडघम राज्यकारण भोंगे Loudspeaker हनुमान चालिसा Hanuman Chalisa राज ठाकरे Raj Thackeray अजित पवार Ajit Pawar संजय राऊत Sanjay Raut किरीट सोमय्या Kirit Somaiya

१ मे २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य ६२ वर्षांचे झाले. समाजकारण, राजकारण, अर्थकारण, साहित्य, संस्कृती, धर्मविचार, कला, संगीत, स्थापत्य, नाट्य, शिक्षण, विज्ञानविचार, प्रबोधन, सामाजिक चळवळी आदी अनेक क्षेत्रांत वैभवशाली इतिहासाची श्रीमंती महाराष्ट्राकडे आहे. स्वातंत्र्य-चळवळीचा आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा देदीप्यमान इतिहास आहे. या राज्याच्या निर्मितीसाठी सर्व क्षेत्रांतील स्त्री-पुरुषांनी प्रचंड संघर्ष केला आहे. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन खऱ्या अर्थाने जनआंदोलन होते. मात्र ते प्राणपणाने यशस्वी करणाऱ्या सामान्य माणसांच्या आशा-अपेक्षा, महत्त्वाकांक्षांची राखरांगोळी होत आहे. कारण सत्तेसाठी हपापलेले लोकप्रतिनिधी जनतेशी बेईमान झाले आहेत.

‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या शब्दांतील ऐतिहासिक वारसा महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींना आता स्मरतही नाही का? छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, सुधारककर्ते गो.ग. आगरकर, राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या आणि अनेक महनीय व्यक्तींनी महाराष्ट्राच्या राजकारणाला नीतिमान विचारांचा आणि कृतिशीलतेचा संस्कार दिला आहे. या राज्याला लोकप्रतिनिधींच्या राजकीय प्रगल्भतेचाही मोठा इतिहास आहे. मात्र दुर्दैवाने आजच्या लोकप्रतिनिधींना त्याचे विस्मरण झाले आहे.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

खरे तर महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या पण महाराष्ट्रात येऊ पाहणाऱ्या मराठी भाषक प्रदेशांचे प्रश्न गेल्या सहा दशकांत सोडवणे अपेक्षित होते. मात्र ते न सोडवल्याचे खापर दुसऱ्याच्या माथी मारून आपण किती कर्तबगार आहोत, हे सिद्ध करण्याची राजकीय स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे.

प्रगतिशील, पुरोगामी ही महाराष्ट्राची भूषणावह वैशिष्ट्ये होती, पण या दोन्ही वैशिष्ट्यांसह विज्ञाननिष्ठाही गमावण्याची वेळ आजच्या महाराष्ट्रावर आली आहे. निदान डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निर्घृण हत्यांच्या घटनांनंतर हे राज्य अधिक पुरोगामी, विज्ञाननिष्ठ आणि लोकशाही विचारांचे निर्भयपणे पालन करण्याच्या दिशेने जाण्यासाठी सज्ज होणे आवश्यक होते. महात्मा गांधींच्या अहिंसेच्या आणि डॉ.आंबेडकरांच्या लोकशाही विचारांच्या दिशेने समतावादी, विवेकवादी आणि विज्ञानवादी समाज-निर्मितीसाठी पुन्हा एकदा या राज्यातील लोकप्रतिनिधींनी सर्वंकष चळवळ उभारण्याची गरज होती. पण समकालीन लोकप्रतिनिधी स्टंटबाजी, आरडाओरडा करण्यात, भूलथापा मारण्यात, विधानसभा-विधानपरिषदेमध्ये बेताल-बेजबाबदार वक्तव्ये करण्यात आणि एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक करण्यातच धन्यता मानत असल्याचे दिसत आहे.

कुरघोडी आणि फसवेगिरीच्या राजकारणाने देशभरातच नीचांकी पातळी गाठली आहे. त्याचाच पडताळा महाराष्ट्रातही गेल्या काही दिवसांत येतो आहे. करोना महामारीच्या आत्यंतिक तीव्रतेच्या काळात माणसे मरत असताना या राज्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत लोकसेवेचा आणि प्रशासनाच्या पातळीवरील संघटनकौशल्याचा आदर्श निर्माण केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांत एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडून या राज्याच्या प्रगल्भ राजकीय इतिहासाशी आणि महामारीने त्रस्त जनतेशी बेईमानी केली जात आहे.

भूक, बेरोजगारी, हवामान बदलांच्या परिणामांनी होणारी हानी, शेती आणि शिक्षणाचे प्रश्न, यापेक्षा प्रार्थनास्थळांवरील भोंगे आणि ‘हनुमान चालिसा’चा उच्चार, राज्यातील पुढाऱ्यांना महत्त्वाचा वाटू लागला आहे. करोनाच्या काळात प्रार्थनागृहे बंद होती, पण मरणाच्या दारात असणाऱ्या माणसांच्या मदतीसाठी धर्म, जात, पंथ, भाषा, राजकीय मतभेद भेदाभेद विसरून सत्तेवर असणाऱ्यांसह सर्वांनीच इतरांचे जीव वाचवण्यासाठी प्राणपणाने प्रयत्न केले. त्याचा १०-१२ महिन्यांतच राजकारण्यांना विसर पडू शकतो, एवढी अमानुषता, असंवेदनशीलता केवळ सत्तेच्या लालसेपोटीच आली आहे?

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

गेल्या तीन वर्षांत या राज्यात १५ हजार बालविवाह झाले. त्याची कारणमीमांसा आपण करणार की नाही? याच काळात कुपोषणामुळे तीन हजार अल्पवयीन मातांसह ६,५८२ मृत्यू झाले, पण त्याबद्दल दुःख नाही, प्रतिक्रियादेखील नाही. शक्ती विधेयकासह वेगवेगळ्या उपाययोजना करूनही राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. २०२०मध्ये महिला अत्याचाराच्या बाबतीत ३१,९५४ गुन्ह्यांची नोंद झाली. गेल्या दशकभरातील स्त्रियांवरील अत्याचारांच्या घटनांची संख्या चिंताजनक आहे. मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआयई)ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२२मध्ये भारतातील बेरोजगारीचा दर ७.८३ टक्के झाला असून तो मागच्या महिन्यापेक्षा वाढला आहे. नजीकच्या भविष्यकाळात महाराष्ट्रासह देशाला वाढत्या बेरोजगारीच्या संकटाचाही सामना करावा लागणार आहे.

आजघडीला महाराष्ट्रावर पाच लाख बहात्तर हजार कोटींचे कर्ज आहे. पुढील आर्थिक वर्षात ते  सहा लाख एकोणपन्नास हजार कोटी रुपये होण्याची शक्यता आहे. २०१४मध्ये ते दोन लाख सहा हजार कोटी रुपये होते. २०१९पर्यंत त्यात भर पडून हा आकडा आता सहा लाख एकाहत्तर हजार कोटी रुपयांवर पोहोचलाय. थोडक्यात, गेल्या अनेक वर्षांपासून हे राज्य कर्जबाजारी आहे.

मार्च १९८६ रोजी महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येची नोंदवली गेलेली पहिली घटना घडली असे सांगितले जाते. २०२०मध्ये म्हणजे राज्याच्या हीरकमहोत्सवी वर्षात २,५४७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. देशातील एकूण शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपैकी ४३ टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या. २०२१च्या नोव्हेंबर महिन्यापर्यंत महाराष्ट्रात २,९४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ऑक्‍टोबर २०१४ ते ऑक्‍टोबर २०१९ या काळातही १४,९६१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे, तर गेल्या सव्वादोन वर्षांत (डिसेंबर २०१९ ते फेब्रुवारी २०२२) ५,८७८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जाते.

जगातील २० प्रमुख भाषांमध्ये १०व्या क्रमांकाच्या आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या या राज्यातल्या साडेबारा कोटी लोकांच्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मराठी शाळांच्या समस्या दर दिवशी वाढतच आहेत.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

महाराष्ट्रासह या देशातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, हमाल, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या निराधार बायका व मुले, फुटपाथवरील लोक, झोपडपट्टीतील माणसे, प्रकल्पग्रस्त यांच्यासह ‘सामान्य’ या शब्दात येणाऱ्या सर्वच माणसांच्या मनात समकालीन राजकारण, समाजकारण आणि वास्तव याबद्दल एक अनाम भीती निर्माण झाली आहे. ही व्यवस्था, हे राजकारण, हे समाजकारण, ही संस्कृती हे सामाजिक वास्तव केव्हाही आपल्याला उद्ध्वस्त करू शकते. शोकांतिका अशी आहे की, ही भीती नाहीशी करण्याचे सोडून या राज्यातले राजकीय नेते आणि त्यांचे परस्परांवर कुरघोडी करण्यातच मग्न आहेत.

‘२०२४च्या निवडणुकीच्या पूर्वी या देशात सर्वत्र धार्मिक विद्वेषाची पेरणी केली जाईल, त्यातून दंगली घडवून आणल्या जातील’, हे सुमारे दोन वर्षांपूर्वी राज ठाकरे यांनी वर्तवलेले भाकीत खरे ठरते की काय, असे वाटू लागले आहे. काल लोकशाही विचारांचा पुरस्कार करणारे आज धार्मिक विद्वेषाची पेरणी करणाऱ्यांच्या खेळातील प्यादी होताना दिसत आहेत.

महात्मा जोतीराव फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, या आणि अशा अनेक माणसांविषयी काहीही न वाचता, वाट्टेल तसे बोलले आणि लिहिले जाणे, हे आपल्याला शोभणारे आहे का? महात्मा गांधींचे विचार पटत नाही म्हणून नथुराम गोडसेंचे समर्थन करणे आपल्या वैचारिक दिवाळखोरीचे दर्शन घडवणारे नव्हे काय? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याने आपण देशभक्त आहोत, हे सिद्ध होते असे समजणे किती मूर्खपणाचे आहे, हे ज्यांना कळत नाही, त्यांच्याकडून योग्य उमेदवाराला मतदान करण्याची अपेक्षा कशी करावी? देशभक्ती म्हणजे एकमेकांना चुकीची माहिती फॉरवर्ड करणे, असे समजणेदेखील सामूहिक मूर्खपणाचे लक्षण नव्हे काय?

आपण नेमक्या कोणत्या वाटेने जात आहोत? येणाऱ्या पिढ्यांना केवळ इतरांच्या चारित्र्यहननाचाच वारसा आपण देणार आहोत का? आपल्या देशातील कर्तृत्ववान माणसांचे चारित्र्यहनन करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण चारित्र्यसंपन्न असल्याचे सिद्ध होत नसते, एवढे कळण्याचीही वैचारिक कुवत नसेल तर आपण वैचारिक गुलामगिरीच्या अंधाराकडे वेगाने धावत सुटलो आहोत, असेच म्हणावे लागेल.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

खोटा आणि रेटून सांगितलेला, सतत फॉरवर्ड केलेला, समूहमाध्यमांमध्ये पोस्ट करून लाईक्स मिळवलेला तद्दन तथ्यहीन हिंसक इतिहास खरा सिद्ध करण्याच्या नादात आपण खऱ्या इतिहासाचेही मारेकरी होत आहोत. आपल्याला खऱ्या गोष्टी, विचार, विज्ञान नकोच आहे, हेच आपण सिद्ध करत आहोत.

राजकीय सत्तेच्या लालसेपोटी आपण आपल्या वर्तमानाचा आणि भविष्यकाळाचा बळी देत आहोत का? प्रबोधनाचा आणि प्रबोधनकारी विचारांचा अंत झाला आहे का? सत्य आणि सत्यान्वेशी वृत्ती संपली आहे काय? निर्भय विचारमंथन करणे, निर्भयपणे सत्य सांगणे गुन्हा ठरतो आहे?

पुढारी, नेते आणि लोकप्रतिनिधी जर बेपर्वा आणि बेजबाबदार झाले असतील, तर जनतेने अधिक गंभीरपणे, कृतिशीलतेने लोकशाही विचारांच्या दिशेने समतावादी, विवेकवादी, विज्ञानवादी वाटचाल करावयाची हवी. पुरोगामी आणि प्रगतिशील ही बिरुदे पुसली जाण्याआधी महाराष्ट्राने सावध होऊन विचारशील, कृतिशील होण्याची गरज आहे.

..................................................................................................................................................................

हेही पहा\वाचा :

…अन्यथा लबाड जातीयवादी लोक, जातिधर्माच्या नावे लोकांना आपापसात लढवून, आपल्यावर पुन्हा एकदा गुलामगिरी लादल्याशिवाय राहणार नाहीत

मुखवटा जरी राज ठाकरेंचा असला तरी त्यामागचा चेहरा भाजपचा आहे, हे आता लपून राहिलेले नाही

..................................................................................................................................................................

लेखक प्रा.डॉ. अजय देशपांडे समीक्षक व राजकीय विश्लेषक असून यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील लोकमान्य टिळक महाविद्यालयात भाषा आणि साहित्य विभागाचे प्रमुख आहेत.

deshpandeajay15@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा