ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’मुळे कामाठीपुऱ्याचे दर्शन मराठी जाणीवेला याअगोदरच झाले आहे, ‘कामाठीपुरा’ या कादंबरीनेे ही ‘परंपरा’ कथात्म रूपात पकडण्याचा प्रयत्न केला आहे
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
दीपक बोरगावे
  • मुंबईतल्या कामाठीपुऱ्याच्या एका गल्लीची पाटी आणि ‘कामाठीपुरा’ या कादंबरीचे मुखपृष्ठ
  • Tue , 26 April 2022
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो कामाठीपुरा Kamathipura सुधीर जाधव Sudheer Jadhav गोलपिठा Golpitha नामदेव ढसाळ Namdeo Dhasal

तरुण लेखक सुधीर जाधव यांची ‘कामाठीपुरा’ ही कादंबरी नुकतीच सृजन प्रकाशनातर्फे प्रकाशित झाली आहे. तिच्याविषयीचे हे एक टिपण...

..................................................................................................................................................................

सामाजिक न्याय, समता, बंधुभाव, सत्य, मानवी मूल्ये आणि अशा बऱ्याच गोष्टींची संभाषितं मध्यमवर्गीय मानसिकतेच्या अवकाशात सतत होत असताना आपण वाचतो/पाहतो. या आकलनाच्या आरोह-अवरोहांतून आपणही आळवून आळवून केलेली चर्चांची उपनिषदं सुधीर जाधव यांच्या ‘कामाठीपुरा’ (सृजन प्रकाशन, २०२२) या नव्या कादंबरीत कोसळून पडतात. हे असे वाटणे, या समाजचित्रणाचे बुर्झ्वा आकलन आहे.

कामाठीपुरा ही मुंबईत देहविक्री करण्यासाठी साऱ्या देशातून भडव्यांनी विक्रीसाठी वेचून आणलेल्या, फसलेल्या, फसवलेल्या, रेप झालेल्या बाया-पोरींची वसाहत. आपल्या देशातील अफाट दारिद्र्याचे आणि सामाजिक व राजकीय वास्तवाचे हे अपत्य. रांडगल्ल्या, नंबरवाले बंगले, तवायतखाना, दारूचे अड्डे, चरसचे अड्डे, मटका, पताडा, स्त्रीदेह विक्रीच्या दहा ते बारा गल्ल्या, गुप्तरोगांचा दवाखाना आणि सतत कुठला ना कुठला राडा, हा या कामाठीपुराचा सांस्कृतिक भौतिकवाद.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

औद्योगिक शहराची निर्मिती ही भांडवली व्यवस्थेची सुरुवातीची पायरी असते आणि या अनुषंगाने झोपडपट्टी, गुंडगिरी, हिंसा, दहशत अशा गोष्टींची निर्मिती होते. मोठ्या प्रमाणात गावाकडील आणि निमशहरी वसाहतीत अस्तित्वात असलेल्या दारिद्र्यामुळे स्वस्तात उपलब्ध होणारा कामगार वर्ग, हा अशा महानगरात स्थलांतरित होतो. या व्यवस्थेची ही गरजच असते. अधोलोक, अंडरवर्ल्ड, स्मगलिंग, चोरबाजार असे जग यातून निर्माण होत जाते.

महाराष्ट्रात या जगाच्या साहाय्याने राजकीय संघटना आणि पक्षदेखील उभे राहिले. हा इतिहास तसा फार जुना नाही. कामाठीपुरा या परिसराचा विकास आणि त्या विकासाचे स्त्रोत आपणाला या व्यवस्थेत शोधावे लागतील.

फ्रेंच मानसोपचारतज्ज्ञ फ्रॅन्झ फॅनन (१९२५-१९६१) यांच्या ‘The Wretched of the Earth’ (१९६१) या पुस्तकात ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ (lumpen proletariat) अशी एक मार्क्सवादी संकल्पना आहे. राजकीयदृष्ट्या असंघटित अशा कामगार वर्गासाठी वापरण्यात आलेली ही संज्ञा आहे. तात्पुरत्या रूपात काहीतरी काम करणारा हा श्रमिक या ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ वर्गाच्या केंद्रस्थानी असतो. ‘कामाठीपुरा’ या कादंबरीत चित्रित केल्या गेलेल्या विश्वाला आणि त्यातील सगळ्याच असंघटित पात्रांना ‘लुम्पेन प्रोलिटरेट’ असे म्हणता येऊ शकते.

मुंबईमधील कामाठीपुरा ही वसाहत बऱ्याच अर्थाने स्थलांतरित (migrated) वसाहत आहे. स्त्रीच्या देहाची विक्री हा केंद्रीय मुद्दा असला तरी, या अनुषंगाने निर्माण झालेले अनेक धंदे इथे सुरू झाले, ते पुढे ऑक्‍टोपसी हजार हातांसारखे पसरत गेले; विस्तारत गेले. गुन्हेगारी, हिंसा, राडा, रेप, दारूचे गुत्ते, हाफ-मर्डर, मर्डर, जुगार, मटका, फसवाफसवी, गुलामगिरी याचबरोबर एड्स आणि हजारो गुप्त रोग इथे पोसले गेले. त्यांच्या उपचारांसाठी अनेक छोटी-मोठी हॉस्पिटल्स आणि क्लिनिक्स उभी राहिली. ‘लाल चिमणी’ हे सरकारी हॉस्पिटल याचेच एक उदाहरण म्हणता येईल.

स्त्री देह विक्रीच्या तळाशी मूलतः असणारे कारण दारिद्र्यच आहे. कादंबरीच्या सुरुवातीला केरळमधून आलेल्या दुर्गाचे किंवा सोनमचे उपकथानक, हे या अफाट दारिद्र्याचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. चिनुच्या बापाची कथा ही पितृसत्तेच्या अक्राळविक्राळाचा अर्क आहे, आणि तोही प्रातिनिधिक समजायला हरकत नाही. ही विकृती काय एकट्या कामाठीपुऱ्यातील प्रातिनिधिक कथा नाही. ती आपणाला सगळीकडेच पाहायला मिळते; फरक फक्त कमी-जास्त दाहाचा. स्त्रीवर सरळ होणारा हल्ला किंवा तो हळूहळू पोटात सुरी खुपसल्यासारखा. शांता दादाची (शांताराम काशिराम कांबळे) अंगावर येणारी भयंकर कथा ही कामाठीपुऱ्यातील मानुष मूल्याचे दर्शन करणारी कथा आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

लक्ष्मीअक्का हे कामाठीपुऱ्यातील एका दहशतीचे नाव. पण शांतादादा आणि कामाठीपुऱ्यातील त्याच्या गॅंगने या भयंकर लक्ष्मीअक्काला नमवलेले असते. यातील दोन्ही बाजूनी होणाऱ्या भयंकर हिंसेचे शब्दचित्र या कादंबरीत कल्पनेच्या पलीकडचे आहे. ही कादंबरी वाचत असताना हिंदीतील ‘सत्या’ आणि मराठीतील ‘चक्र’ या सिनेमांची प्रकर्षाने आठवण झाली.

कामाठीपुरा म्हणजे केवळ गुन्हेगारी, हिंसा, दारूचे आणि पत्त्यांचे अड्डे, हत्यारे, चाकू-सुरे, तळपत्या तलवारी, चॉपर, लोखंडी सळ्या आणि हॉकी स्टिक्स नव्हे. शांतादादा आणि परमेश्वरीच्या कथानकात मानवी मूल्यांची जोपासना केली जाते, याची चिन्हे ठळकपणे उमटतात. नामचीन भाई, खानसाब, अमीरजादा अशा मुस्लीम मंडळींची कुठल्याही बायका-मुलींवर वाईट नजर नसते. कामाठीपुरासारख्या कुप्रसिद्ध इलाख्यात बायका-मुली सुरक्षित आहेत, असे उल्लेख या कादंबरीत येतात.

जातपात, धर्मभेद हे प्रश्न कामाठीपुऱ्यात नाहीत. हा इलाखा धर्मनिरपेक्ष आहे. मात्र, इथे राजरोस, उघडउघड स्त्रीदेहाची खरेदी-विक्री चालते. लाखो रुपयांचा रोकडा हिशोब इथे चालतो. दहशत आणि हिंसा इथे नांदते आणि त्याचा सरळ संबंध हा आर्थिक गणिताशी असतो; तो जगण्याच्या प्रत्यक्ष कोलाहलाशी आणि संघर्षाशी असतो. इथे मृत्यू स्वस्त आहे; रोगराई कल्पनेच्या पलीकडची आहे. अफाट देहाची, पिळदार शरीराची पोरं इथं काही वर्षांतच रोगग्रस्त होऊन नाहीशी होतात.

कामाठीपुऱ्याच्या बाहेर असणाऱ्या उपऱ्या माणसाला हे जग समजायला कठीण आहे. या जगाची क्लिष्टता ही केवळ तिथे राहणार्‍या माणसालाच कळते/समजते. या जगात ‘बाप’ नावाच्या प्राण्याला कुणी घाबरत नाही, पण आईला इथे ज्याम आदर आहे. ‘भाई’ नावाचे मिथक इथे कायम उपस्थित असते. प्रत्येक गल्लीत किंवा कामाठीपुऱ्यातल्या वेगवेगळ्या परिसरात एक एक भाई असतो. तो त्या परिसराचा/गल्लीचा स्वयंघोषित आणि अनभिषिक्त राजाच असतो. या सर्व भाईंचे एकमेकांशी दृढ नाते असते. एक भाई दुसऱ्या भाईच्या राज्यात किंवा गल्लीत कधीच ढवळाढवळ करत नाही. एकमेकांशी दुश्मनी तर कधीच नसते. उलट अगंतुकांच्या दंगलीत, राड्यात हे भाई एकमेकांना मदत करायला हजर राहतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

कामाठीपुऱ्यातील गोविंदा म्हणजे दहीहंडी उत्सव आणि गणपती विसर्जन मिरवणूक यांची खास दीर्घ चित्रणं या कादंबरीत विलक्षण अशीच आहेत. कारण यांना खास कामाठीपुऱ्याचा गंध आहे. इतरत्र होणारे आणि कामाठीपुऱ्यातील हे उत्सव अगदी वेगळे आहेत. इथे सरळ काही घडतच नाही, असा हा मामला आहे. यात सलग येणारी चिनूची दीर्घ आणि खळाळ, अशी एक प्रेमकथाही आहे. प्रेमकथा म्हणजे नायक (चिनू) आणि नायिका (राधा) यांचे दोन किंवा तीनच प्रसंग असावेत, पण ती कामाठीपुऱ्याच्या वेगाने सरकते आणि भेदक तपशिलांनी धक्के देते. ती वस्तुतः मुळातूनच वाचावी अशी आहे.

या कादंबरीतील एकेक शब्द आणि वाक्यरचना काही वाचकांना हादरवून टाकणाऱ्या आहेत. काही उदाहरणे पाहा : लुक्के, वटक, हातात नंगी घेऊन, गेम केला, गोयंदा, बचकानी पोरं, हेलपायला, झवाडी, लंबर (नंबर) इत्यादी. ‘खचप’ असा एक शॉर्ट फॉर्म आहे. त्याचा मूळ अर्थ वाचकांनी स्वतःच वाचावा. काही शब्द अंकात बोलले जातात. उदाहरणार्थ, ‘छब्बीस’ म्हणजे छावी, ‘तीर्री’ म्हणजे मयत, ‘सत्ता’ म्हणजे लंगडा, ‘दस्सा’ म्हणजे मेंढी. याला ‘कोड भाषा’ असेही म्हणता येईल.

या कादंबरीत कामाठीपुऱ्यामध्ये बोलली जाणारी टपोरी भाषा आली आहे. बरीच उदाहरणे देता येतील. ही काही पहा : क्या बात कर रैला है (क्या बात कर रहा है); भेंचो ये मेरा मॅटर है; चलो अभी एन्ट्री मारते है; पार इज्जतीचा भाजीपाला व्हायचा... या अशा अस्सल अभिव्यक्तीमुळे हा परिसर अधिक जिवंत आणि गडद होतो. यात येणाऱ्या पात्रांची नावे पहा- फेफ्टी, चौपाटी, चिनू, संत्या दादा, हनम्या, लुक्का, पावट्या, चंग्या, लट्या, हनीफ तेडा, बटल्या राजू, आऱ्या वगैरे.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

या कादंबरीत खुली आणि मोकळी वर्णने आली आहेत, मग ती हाणामारीची, राड्याची किंवा लैंगिक असोत. पण कुठल्याच अर्थाने ती अश्लील वाटत नाहीत. उलट ती कामाठीपुऱ्याचे गांभीर्याने आकलन करणारी वाटतात.

स्त्री व पुरुष दलित आत्मकथने आणि अस्सल ग्रामीण परिसरातून आलेल्या कथा-कादंबऱ्यांनी (उदा. रा. रं. बोराडे, आनंद यादव, उद्धव शेळके, राजन गवस इत्यादी) मराठीतील शब्दकळा आणि महाराष्ट्रीय समाजाच्या आकलनाचे विश्व अगोदरच विस्तारित आणि समृद्ध केले आहे. या आगळ्या साहित्यिक परंपरेला पुढे घेऊन जाणारी ही कादंबरी आहे. कवीश्रेष्ठ नामदेव ढसाळ यांच्या ‘गोलपिठा’मुळे कामाठीपुऱ्याचे दर्शन मराठी जाणीवेला याअगोदरच झाले आहे. या संहितेने ही ‘परंपरा’ कथात्म रूपात पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा हा गलिच्छ परिसर आज नामशेष झाला आहे. याच परिसरात जन्मलेल्या आणि वाढलेल्या सुधीर जाधवसारख्या लेखकांत (किंवा कामाठीपुरा जगलेल्या व्यक्तींमध्ये) मात्र तो अजूनही जिवंत आहे. या कादंबरीतील अनेक पात्रांच्या डायमेन्शन्सकडे पाहता आणि कामाठीपुरा अजून वेगवेगळ्या अर्थाने समजावून घेण्यासाठी/समजावून देण्यासाठी सुधीरने काही पात्रांवर दीर्घकथा किंवा स्वतंत्र कादंबऱ्या लिहाव्यात, असे या निमित्ताने सुचवावेसे वाटते.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......