अजूनकाही
‘महात्मा जोतीराव फुले यांच्या ‘‘शेतकऱ्याचा असूड’ या पुस्तकाचा शैलीदृष्ट्या विचार’ हे शैलजा शिवाजी औटी यांचे पुस्तक काही महिन्यांपूर्वी युरो वर्ल्ड पब्लिकेशन, नागपूरतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकाला लेखिकेने लिहिलेले हे मनोगत..
..................................................................................................................................................................
जोतीरावांशी ओळख लहानपणीच झाली. भायखळ्याला शेजारीच राहणाऱ्या डोके कुटुंबाच्या घरात जोतीरावांचा भलामोठा फोटो होता. खुर्चीत बसलेले जोतीराव आणि शेजारीच टेबलवर ‘दीनबंधू’चे अंक असा तो फोटो होता. नंतर शाळेत जायला लागल्यावर इतिहासातून ‘समाजसुधारक’, ‘स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते’ अशी ओळख झाली. जसजसं वय वाढत गेलं, समज येऊ लागली, तसतशी ही ओळख अधिक विस्तारू लागली. भायखळ्याला फुले जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमांतूनही बरीच माहिती मिळत गेली.
घरात नेहमी पुस्तके असत. त्यामुळे वाचनाची आवड निर्माण झाली. जिथे पुस्तके असत, तिथे मन आपोआपच ओढ येई. उन्हाळ्याच्या सुटीत गावी जात असू. ओतूर हे आजोळ. ओतूरच्या घरात माडीवर आडबाजूला एक छोटी खोली होती. तिथे सहसा कुणी जात नसे. एकदा त्या खोलीत गेले आणि मला खजिनाच सापडला. अनेक जुनी पुस्तके तिथे होती. मग साऱ्यांचा डोळा चुकवून माडीवर जाऊन ती पुस्तकं वाचायचा नादच लागला. काय होती ती पुस्तके? जोतीरावांनी लिहिलेल्या छोट्या पुस्तिका, सत्यशोधक समाजाचे वृत्तांत, वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे आणि हो, नवसाक्षरांसाठी लिहिलेली सोपी वाचन पुस्तके असा पुस्तकसंभार होता.
..................................................................................................................................................................
..................................................................................................................................................................
माझे आजोबा श्री. रामचंद्र लक्ष्मण पा. डुंबरे यांनी जमवलेला तो खजिना होता. जोतीरावांशी अधिक दृढ ओळख ही छोटीछोटी पुस्तके वाचून झाली. आजोबा सत्यशोधक समाजाचे क्रियाशील कार्यकर्ते असल्यामुळे त्यांनी ही सर्व कागदपत्रे प्रेमाने जपून ठेवली होती. आजोबांचे चुलते श्री.भिकाजी डुंबरे यांचेही कार्य विस्तृत होते. यातून निर्माण झालेल्या उत्सुकतेतून जोतीरावांबद्दल अधिक वाचन केले गेले.
ओतूर हे सत्यशोधक समाजाच्या कार्याचे महत्त्वाचे केंद्र होते. पुण्यापासून शंभर-सव्वाशे किलोमीटर दूर असले तरी जोतीरावांचा ओतूरशी सातत्याने संपर्क असे. सत्यशोधक चळवळीची तत्त्वे ओतूरच्या भूमीत खोल रुजली. घट्ट झाली. यामुळे ओतूरचे वातावरण पुरोगामी राहिले. इतर गावांत आढळणारी स्पृश्यास्पृश्यता ओतूरला फारशी नव्हती.
‘शेतकऱ्याचा असूड’मध्ये वर्णन केलेली शेतकऱ्याची दुरवस्था महाराष्ट्रातील तत्कालीन साऱ्याच शेतकऱ्यांची होती. जोतीरावांच्या विचारांनी प्रेरित झालेल्या जुन्नर, ओतूर भागातील शेतकऱ्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. मुलांना शिक्षण देणे महत्त्वाचे मानले. शालेय शिक्षण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी शहरात पाठवले. पोटाला चिमटा घेऊन, काटकसर करून प्रसंगी शेत गहाण ठेवून मुलांना शिकवले. त्यामुळे या भागात शिक्षणाचे प्रमाण चांगले आढळते. शेतकऱ्यांच्या दुरवस्थेचे मूळ कारण त्यांच्या अज्ञानात आहे, हे जोतीरावांनी ओळखले.
‘शेतकऱ्याच्या असूड’ची सुरुवातच
‘विद्येविना मति गेली,
मती विना नीती गेली,
नीती विना गति गेली,
गतिविना वित्त गेले,
वित्ता विना शूद्र खचले,
इतके अनर्थ अविद्येने केले’
या त्यांच्या सुप्रसिद्ध वाक्याने होते. मुलेच नव्हे तर मुलींनाही शिक्षण देण्याबाबत आग्रह धरला. समाजातील विषमता, जातिभेद यामुळे समाजात एकोपा नांदत नाही, हे लक्षात आल्यावर जोतीरावांनी जातीव्यवस्थेवर प्रहार केला. समाजातील भेदभाव मिटवायचे असतील, तर शिक्षणासारखे प्रभावी साधन नाही, हे त्यांनी ओळखले. समाजात बहुसंख्येने असलेला शेतकरीवर्गच यासाठी जागृत केला पाहिजे, महार-मांग वगैरे अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजासही या प्रवाहात सामील करून घेतले पाहिजे, असे ठरवले आणि त्यासाठी आपले जीवित वेचले.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
जोतीरावांचा विचार करताना तत्कालीन समाजाचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते. ज्या काळात जोतीराव कार्यरत होते, ते एकोणिसावे शतक ही महाराष्ट्राची संक्रमणावस्था होती. पेशवाई जाऊन इंग्रजांची सत्ता महाराष्ट्रात दृढमूल झाली, ती याच काळात. पेशवाईत धर्माच्या नावाखाली अनेक दांभिक आचारपद्धती आल्या. समाजात धार्मिक, सामाजिक व राजकीय तिन्ही बाबतीत आचार व विचारदृष्ट्याही तमोयुग निर्माण झाले. इंग्रजी सत्तेबरोबरच एक नवी आचार व विचार पद्धतीही समाजासमोर आली. या आचार विचार पद्धतीचे काही विचारवंतांनी अंधानुकरण केले, तर काहींनी या नव्या प्रकाशात समाजाचे पुनर्मूल्यांकन केले.
जोतीराव या दुसऱ्या प्रकारच्या विचारवंतांपैकी आहेत. इंग्रजी ग्रंथांच्या परिशीलनाने त्यांना नवी वैचारिक जाणीव लाभली होती. आणि स्वतः बहुजन समाजातून आल्यामुळे त्या वर्गाच्या अवस्थेचा त्यांना जिवंत अनुभव होता. समाजाची ही अवस्था बदलण्यासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी ओळखले. शिक्षणाच्या किल्ल्या एका विशिष्ट वर्गाने- ब्राह्मणांनी आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत. इतरांना त्या दालनात प्रवेश नाही. इतकेच नव्हे तर इतरांनी शिक्षण घेतले, तर तो गुन्हा ठरवला जाई. ब्राह्मणांचा हा कावेबाजपणा लक्षात आल्यावर जोतीरावांनी त्याविरूद्ध बंड पुकारले. शिक्षणाचा हक्क नाकारणे म्हणजे प्रगतीच्या वाटा रोखणे, हा डाव लक्षात आल्याने जोतीरावांनी ब्राह्मणी धर्माच्या स्वार्थी तत्त्वांवर हल्ला चढवला.
हा हल्ला अचूक आणि अजोड होता. ब्राह्मणधर्माची परिणती सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक विषमतेत होऊन समाजव्यवस्थेत ब्राह्मणांना प्रतिष्ठा, सत्ता आणि देवपण प्राप्त झाले होते. त्यांच्या सत्तेचे मूळ त्यांच्या स्मृती, श्रुती आणि पुराणे यांत होते, हे जाणून त्यांच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गांची मुक्तता करण्यासाठी त्यांवर जोतीरावांनी हल्ला चढवला आणि सामाजिक न्याय, बुद्धिप्रामाण्य व मानवी समानता या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्यासाठी लढा दिला.
जोतीरावांचे तत्त्वज्ञान मानवाची प्रतिष्ठा, धार्मिक सहिष्णुता, मानवी हक्क, मानवी समानता यांचा संदेश देत राहिले आहे. त्यांचे लेखन हा त्यांच्या जीवितकार्यातील एक महत्त्वाचा भाग. विद्वत्ता दाखवण्यासाठी, तत्त्वचर्चा करण्यासाठी अथवा कीर्ती मिळवण्यासाठी त्यांनी लेखन केले नाही. समाजप्रबोधनाचे एक साधन म्हणून लेखनाकडे पाहिले. लेखनाला कृतीची भरभक्कम जोड होतीच.
..................................................................................................................................................................
अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...
या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -
https://www.booksnama.com/book/5312/Checkmate
..................................................................................................................................................................
त्यांच्या लेखनात ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक अनेक दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. यात शेतकऱ्याच्या स्थितीचा अनेक अंगांची विचार केला आहे. हा विचार केवळ पुस्तके वाचून केलेला नव्हता. प्रत्यक्ष शेतकऱ्याचे जीवनानुभव ऐकून, पाहून व त्यांची वारंवार खात्री करून घेतल्यानंतर हा विचार त्यांनी मांडला आहे. त्यासाठी जी लेखनशैली वापरायची, तीसुद्धा शेतकऱ्यांच्या अनुभव विश्वाशी जवळीक साधणारी आहे.
या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी समाजाबद्दल हा विचार एकूण त्याच्या जीवनपद्धती संदर्भात व संपूर्ण समाजव्यवस्थेच्या संदर्भात, असा दुहेरी रीतीने त्यात केलेला आहे. किंबहुना असेही म्हणावेसे वाटते की, शेतकऱ्याच्या निमित्ताने त्यांनी एकूण तत्कालीन ग्रामीण महाराष्ट्राचेच वास्तव चित्र रेखाटले आहे.
या पुस्तकाबाबत सुप्रसिद्ध विचारवंत व समाजशास्त्रज्ञ दुर्गा भागवत म्हणतात, “महात्मा फुल्यांनी येथल्या शेतकऱ्याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतकऱ्यांच्या हालअपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये, यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी, अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या, बालहत्याप्रतिबंधक गृहाची स्थापना केली आणि इतरही अनेक परोपकाराची आणि आणि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘शेतकऱ्याचा असूड’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.” (महाराष्ट्र टाइम्स, २ एप्रिल १९८९)
जोतीरावांच्या या अक्षरलेण्याचा आपण प्रस्तुत पुस्तकात शैलीच्या अंगाने विचार करणार आहोत. शैलीदृष्ट्या विचार करण्याची जरूर का भासली, असा प्रश्न साहजिकच मनात उभा राहील. त्याबद्दलची माझी भूमिका मांडावीशी वाटते.
मराठी पद्याला फार मोठी परंपरा आहे. मुकुंदराजाने लिहिलेला ‘विवेकसिंधु’ पहिला लिखित ग्रंथ. त्यानंतर ज्ञानेश्वरीचे अमोल लेणे मराठी भाषेला प्राप्त झाले. ज्ञानेश्वरांची प्रभावळ म्हणजे त्यांची भावंडे, संत नामदेव, संत जनाबाई आदि मंडळींनीही पद्यच रचले. तीच परंपरा संत एकनाथ, संत तुकाराम, संत रामदास आणि पुढच्या दासोपंत, मोरोपंत, रामनपंडित या पंडित कवींनी, तसेच शाहीरांनीही चालवली. गद्यात लेखन झाले ते वृत्तांत, बखरी आणि प्रवासवर्णने यांच्या अनुषंगाने, ऐतिहासिक पत्रलेखनाचाही त्यात समावेश आहे. आज्ञापत्रेही आहेत.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
अव्वल इंग्रजीच्या काळात भारतात मुद्रणकला आली. वर्तमानपत्रे सुरू झाली. बाळशास्त्री जांभेकरांनी ‘दर्पण’ वृत्तपत्र ६ जानेवारी १९३२ रोजी सुरू केले. या काळात समाजात बरीच उलथापालथ होत होती. इंग्रजी शिक्षणामुळे समाजातील काही व्यक्तींच्या जाणीवांच्या कक्षा विस्तारल्या होत्या. ब्रिटिशांनी जरी राज्यकारभार करणे सुकर व्हावे, याकरता एतद्देशीय लोकांना इंग्रजी शिक्षण दिले असले तरी इंग्रजी शिक्षणामुळे नवशिक्षितांना नव्या जगाचे भान आले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ही माणसाला माणूसपणा देणारी तत्त्वे कळली. नव्या ज्ञानाच्या प्रकाशात त्यांनी आपल्या समाजाचे निरीक्षण केले असता समाजातील अनेक उणीवा लक्षात आल्या. लोकांना जागृत करण्यासाठी वृत्तपत्र माध्यमाचा चांगला उपयोग होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी वृत्तपत्रांतून लोकांशी संवाद सुरू केला. यात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, विष्णुशास्त्री चिपळूणकर, आगरकर, लोकमान्य टिळक इत्यादींचा समावेश आहे.
जोतीरावांनीही समाजाला जागृत करण्यासाठीच लेखणी हातात घेतली. या लेखकांपैकी प्रत्येकाच्या लेखनामागील उद्देश वेगळा होता, त्यांचा सभोवताल वेगळा होता. इतर लेखक मध्यम अथवा उच्च मध्यमवर्गातील होते. जोतीराव एकटेच असे होते की, त्यांची पाळंमुळं बहुजन समाजात रुजली होती. ते बहुजन समाजासाठीच कार्य करत होते. त्यांच्या लेखणीला मातीचा गंध होता. बहुजन समाजाच्या बोलीभाषेतील शब्द, वाक्यप्रचार, म्हणी त्यांनी उपयोगात आणल्या. कारण त्यांना बहुजन समाजापर्यंत आपले विचार पोहोचवायचे होते. पुस्तकी, विद्वत्ताप्रचुर, संस्कृत प्रचुर शब्द वापरून त्यांचा उद्देश सफल झाला नसता. म्हणून त्यांनी सहेतुकपणे आपली शैली निवडली. तसे पाहिले तर जोतीराव बहुजन समाजाच्या पत्रकारितेचे उद्गाते होते. केवळ समाजसुधारक म्हणून विचार करताना आपले त्यांच्या लेखनातील वाङ्मय गुणांकडे दुर्लक्ष होते. म्हणून जोतीरावांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैलीचा विचार करणे क्रमप्राप्त ठरते.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment