मेलुहा सभ्यतेचा भारतीय इतिहास एखाद्या ‘ट्रिजर हंट’सारखा आहे. यात नकाशे, कोडे, जिगसॉ पझल, गुप्त लिपी असं सगळं आहे...
ग्रंथनामा - आगामी
नितिन भरत वाघ
  • ‘मेलुहा सभ्यतेचा शोध’
  • Wed , 06 April 2022
  • ग्रंथनामा आगामी मेलुहा सभ्यतेचा शोध Meluha Sabhyatecha Shodh नितिन भरत वाघ Nitin Bharat Wagh प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत Pratityasamutpada Sidhhant गौतम बुद्ध Gautam Buddha बौद्ध धम्म Buddha Dhamma

संशोधक-अभ्यासक, समीक्षक नितिन भरत वाघ यांचं ‘प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांत’ या संशोधनपर वैचारिक पुस्तकानंतर ‘मेलुहा सभ्यतेचा शोध’ हे नवं संशोधनपर वैचारिक पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. या पुस्तकाला वाघ यांनी लिहिलेल्या सविस्तर मनोगताचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

१.

शाळेत असताना ‘मेलुहा सभ्यता’ (तेव्हा ती ‘सिंधू संस्कृती’ म्हणून शिकवली जायची) एक अत्यंत गूढ, कल्पित वास्तवाचं आणि अद्भुतरम्य जग वाटायचं. तो तथाकथित ‘प्रिस्ट किंग’ ती एका हात कमरेवर ठेवून शून्यात नजर लावून असलेली नग्न नर्तकी, त्या बैलांच्या चिन्ह मुद्रा, तो ध्यानाला बसलेला योगी. जणू या जगाच्या नसलेल्या गोष्टी होत्या त्या. सगळ्या परिचयाच्या वाटणाऱ्या गोष्टी स्वत:हून ओळख देत नव्हत्या. त्या ओळख लपवत होत्या असं नाही, पण लपंडाव मात्र खेळत होत्या. शाळेचं जग मागे सुटलं, तसं हा लपंडावसुद्धा मागे पडला. जातवास्तवाचं स्वरूप वाढत्या वयानुसार जाणवायला आणि कळायला लागलं. ते जाचायला लागलं, तसं लोकांमध्ये मिसळणं हळूहळू कमी होत अत्यंत मर्यादित झालं. कॉलेजच्या बाहेर एक-दोन मित्र होते, जे आजही मित्र आहेत. कॉलेजची पूर्ण पाच वर्षं (सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवीची तीन आणि पदव्युत्तर दोन) जवळपास एकट्यानेच काढली. कॉलेजमध्ये मित्र म्हणावं असं कोणी झालं नाही, जात नावाची एक अदृश्य भिंत कायम उभी होती. प्रत्यक्ष कॉलेजमध्ये, वर्गात खूप कमी गेलो. आणि बाहेर एकटाच भटकत राहायचो. पण हे एकटेपण कधीही जाणवलं नाही. कारण जन्मतःच एक विलग, तुटलेपण आपल्या आत भरून राहिलं आहे, ते लक्षात आलं होतं. ते कायम सोबत असतं आणि त्यामुळे कुठेही तुटेपर्यंत जोडून घेण्याची गरज निर्माण होत नाही. ते स्वत:च्या आत असलेलं तुटलेपण हे एक स्वतंत्र जग आहे. ज्यात कधी कधी मलासुद्धा प्रवेश नसतो. या एकटेपणाचा खूप फायदा झाला. कारण माझा पूर्ण वेळ फक्त पुस्तकांसाठीच देता येत होता. ‘ग्रंथ माणसाचे खरे मित्र असतात’, हे सुभाषित मी आजवर कायम अनुभवलं आहे. पुस्तकं केवळ अवतीभवती असली तरी आधार वाटतो आणि सुरक्षित वाटतं. वाचनातून, अभ्यासातून काही प्रश्नांची उत्तरे मिळत होती, तर काही प्रश्न नव्याने उभे राहत होते.

पदवीच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा देऊन औरंगाबादला दोन दिवसांच्या विपश्यनेसाठी गेलो. त्यानंतर बुद्धधम्माच्या आणि एकूणच तत्त्वज्ञानाकडे कुतूहलाने आणि गंभीरपणे पाहायला लागलो. याच काळात ओशो भेटले आणि जगण्याचे सगळे संदर्भ बदलले. एखाद्या विषयाकडे, घटनेकडे पहायचे अनेक कंगोरे, दृष्टीकोन असू शकतात, हे जाणवले. पुढे वर्षभरात जे. कृष्णमूर्तीसुद्धा विमला ठकारांच्या मध्यस्थीने भेटले. एका निबंधाच्या निमित्ताने विवेकानंद भेटले. निबंध तर लिहून पूर्ण झाला नाही, पण नव्याने भेटलेले विवेकानंद आश्चर्यचकित करणारे होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

भारतीय तत्त्वज्ञानाशी ओळख करून घेत असतानाच जितके समजतील तितके बाबासाहेब आंबेडकर वाचत होतो. पदवीच्या दुसऱ्या वर्षाच्या सत्रात नामदेव ढसाळांच्या कवितेशी परिचय झाला. त्यानंतर बहुतेक सगळे साठोत्तरी कवी वाचले. मा. पुरुषोत्तम पाटील पुस्तकं वाचायला देत होते.

धुळ्यातील एका चहाच्या दुकानावर बसलेलो असताना पेपर कटिंगवर एक छोटीशी झेन कथा वाचण्यात आली. आणि परत जगण्याकडे बघण्याचा एक नवाच दृष्टीकोन समोर आला. एम.एस्सी.ला गेल्यावर तत्त्वज्ञानाचं वाचन थोडं कमी झालं. त्या दोन वर्षांत भौतिकशास्त्र, चित्रकला आणि ललितकलांविषयी वाचन अधिक झालं. सूक्ष्मजीवशास्त्र शिकत असताना पाच वर्ष अनुवांशिकीशास्त्र (Genetics) शिकल्याचा खूप उपयोग मला या संशोधनाच्या वेळी झाला. शिक्षण वाया जात नाहीच.

२.

ऑक्टोबर २०००च्या Outlook मासिकामध्ये ‘Horseplay in Harappa’ हा लेख वाचण्यात आला. आणि तो लेख वाचल्यानंतर सिंधू संस्कृतीसोबत असलेला लपंडाव पुन्हा समोर आला. हा लेख म्हणजे माझ्या या अभ्यास विषयातला टर्निंग पॉईंट होता. अकादामिक क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणावर खोटेपणा, आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या अकाडेमियामध्ये अक्षरशः लाज घालवणारा फ्रॉड काही वैदिक विचारी भुरट्या लोकांना करायची काय गरज होती? त्यानंतर ‘मेलुहा सभ्यता’ संदर्भात हळूहळू वाचन वाढवायला सुरुवात केली. मात्र २० वर्षांपूर्वी मराठीत या विषयवार फार पुस्तकं नव्हती. तशी आजही फार आधिकारिक म्हणावी, अशी पुस्तकं या विषयावर आजही मराठीत नाहीत. मराठीत एकाच जातीच्या लोकांनी या विषयावर एकांगी पुस्तकं लिहिलेली दिसून येतात.

जसजसा मेलुहा सभ्यतेचा शोध घ्यायला सुरुवात केली, तिचा एनिग्मा अधिकाधिक वेढून घ्यायला लागला. मेलुहा सभ्यता आणि बौद्ध सभ्यता यांच्यात दिसणारं धूसर साम्य आताशा थोडंफार स्पष्ट दिसायला लागलं होतं. मानवी सभ्यतेच्या इतिहासात बुद्ध हे ‘क्वांटम लीप’ आहेत, हे जाणवायला लागलं. कारण बुद्धांचा आणि रूढ अर्थाने ज्ञात असलेल्या वैदिक धर्माचा काहीही संबंध नाही, हेसुद्धा लक्षात यायला लागलं होतं. आणि ऐतिहासिक कथनातून वर्चस्व टिकवून ठेवता येतं आणि राबवता येतं, असं एक प्रबळ वैदिक कथानक उभारलेलं आहे, तेसुद्धा समजायला लागलं होतं. या कथनाच्या आधारे सगळ्या इतिहासाची मांडणी केली जाते आणि याच चौकटीच्या आधारे या कथनाला विरोध सुद्धा केला जातो, हेसुद्धा लक्षात आलं.

इतिहास संशोधनातला हा एक अत्यंत मायावी असा सापळा आहे. याच्यात न अडकता आपल्याला आपल्याच पद्धती शोधून काढाव्या लागतील हे स्पष्ट झालं. कारण वैदिक ब्राह्मणी पद्धतीने त्या कथनाला केलेला विरोध अंतिमत: त्याच्या पथ्यावरच पडतो हे सरळ आहे. जे काही सामाजिक ऐतिहासिक तथ्य म्हणून समोर उपलब्ध आहे, त्याचं वाचन वेगळ्या स्वतंत्र दृष्टीने करायला हवं हे निश्चित केलं. आणि इतिहासाच्या उलट्या वाचनाची तार्किक पद्धती शोधून काढली. का, कसे, कशामुळे, कुणामुळे, कुणासाठी, केव्हा, अशा प्रश्नांच्या तपासणीखाली प्राप्त आणि आवश्यक तथ्ये आणली.

भारतीय इतिहास हा कोणत्याच काळात एकरेषीय नव्हता. भारतासारख्या देशाचा इतिहास कधीही, कोणत्याच काळात एकधर्मीय वा एकरेषीय असू शकत नाही. हे सगळ्यात आधी इतिहासाच्या उलट वाचनाने दाखवून दिलं. आणि आपण मांडत असलेल्या इतिहास वाचनासाठी कुणाचीही मान्यता मिळवायची गरज नाही. कारण ते सामाजिक इतिहासाचं समांतर आणि पर्यायी वाचन असणार आहे. आणि हे वाचन प्रस्थापित व्यवस्थेला अप्रियच ठरणार आहे. कारण ते प्रस्थापितांच्या हितसंबंधांना आणि वर्चस्वाला प्रश्न विचारणारं आहे. मात्र प्रश्न तर विचारावेच लागतील. इतिहास वाचनाचं उदाहरण म्हणून ‘बुद्धधम्म चिकित्सेची दुसरी चौकट’ हा लेख मुद्दाम या ग्रंथात देत आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

सगळ्या गोष्टी या आशयाच्या वाचनाच्या दृष्टीकोनावर आणि त्याच्या अर्थनिर्णयनावर ठरत असतात. याचं महत्त्व नीट कळावं म्हणून ऋग्वेदातील पुरुषसूक्ताच्या वाचनाचं देता येईल. जरी या सूक्तात वर्णाश्रमाची निर्मिती सांगितली असली तरी त्यात वर्ण हे जन्मानुसार मिळतील, असं कुठं सांगितलेलं आहे? तिथे फक्त वर्णांची उत्पत्ती सांगितली आहे, जन्मलेल्या लोकांची नाही. म्हणजेच ऋग्वेदसुद्धा सांगत नाही की, वर्ण हे जन्मानुसार मिळतात. वर्णांची निश्चिती ही नंतर घडणारी सामाजिक प्रक्रिया होती. मात्र कोणीतरी जाणीवपूर्वक अर्थाचा अनर्थ करणारं वाचन केलं आणि समाज नियमांविषयक सगळे संदर्भच बदलले. त्यातून झालेले दुष्परिणाम किती भयंकर झाले, ते गेली हजार वर्षे भारतीय बघतच आहेत.

३.

संपूर्ण भारतात कधीही वैदिक वा ब्राह्मणी धर्माचं वर्चस्व नव्हतं. अगदी तुकड्या-तुकड्यातही नव्हतं. मात्र असा भ्रम, भास भारतीय बहुजनांच्या स्मृतीभ्रंशाच्या आधारे निर्माण करण्यात गेल्या दोन शतकात वैदिकांना आलेले दिसते. याला कारण ब्रिटिशांनी भारतीय समाज व्यवस्थेची केलेली संशोधनात्मक मांडणी होय. आणि असे करत असताना, त्यांना जी काही माहिती उपलब्ध करून देण्यात आली, आणि ब्रिटिशांचे ज्या चौकटीत प्रबोधन करण्यात आले, ती चौकट आणि वृत्ती त्याला कारणीभूत ठरली. आणि हे प्रबोधन करण्याचे काम तत्कालीन ब्राह्मणांनी केले. निकोलस बी. डर्क या मानवाभ्यास शास्त्रज्ञाने कोणत्या ब्रिटिश अभ्यासकाचे प्रबोधन कोणत्या ब्राह्मणाने केले, याविषयी व्यवस्थित माहिती दिली आहे. चुकीच्या माहिती देण्यातून झालेल्या संशोधनाचे निष्कर्षसुद्धा चुकीचेच निष्पन्न झाले यात काय आश्चर्य आहे.

भारतात (बौद्धधम्म वगळता) कोणत्याही एकाच धर्माचं अस्तित्व आणि प्रभाव कधीही नव्हता. ‘मनुस्मृती’ मानणाऱ्या वैदिक धर्माच्या लोकांचा धर्म हा इतरांपेक्षा खूप वेगळा आणि अत्यंत मर्यादित होता. आजचं उदाहरण द्यायचं तर भारतातल्या पारशी किंवा इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माचं देता येईल. या धर्मांची एक, मर्यादित धार्मिक व्यवस्था आज सहअस्तित्वात आहे. तसंच मर्यादित अस्तित्व मनुस्मृती मानणाऱ्या लोकांचं इसवीसनाच्या आठव्या ते नवव्या शतकापर्यंत होतं. सम्राट अशोकाला संस्कृत भाषा अस्तित्वात आहे, हे सुद्धा माहीत नव्हतं. यावरून वैदिक लोकांच्या मर्यादेची कल्पना येऊ शकते.

भारतीयांमध्ये असलेले हे सूक्ष्म धार्मिक भेद ब्रिटिशांना आकळले नाहीत. आणि भारतीय समाजरचनेचं त्यांचं प्रबोधन तत्कालीन ब्राह्मणांनी जाणीवपूर्वक पूर्वग्रहदूषितपणे केलं. त्याचा दुष्पपरिणाम म्हणून भारतीयांना ब्रिटिशांनी एकरेषीय, एकांगी हिंदू नावाच्या धर्मात कोंबलं. या एकरेषीय धर्माला एकच एक ग्रंथसुद्धा असावा म्हणून त्या ‘भगवद्गीता’ ग्रंथाची निवड करण्यात आली, जो ब्राह्मण स्वत:च्या घरातसुद्धा ठेवत नव्हते. गीतेचं वाचन, पठन करणे ब्राह्मणांमध्ये निषिद्ध होतं. त्या भगवद्गीतेला समस्त हिंदू धर्मियांचा प्रमाण ग्रंथ म्हणून मान्यता दिली.

मध्ययुगापूर्वी भारतीय लोकांचं धार्मिक शहाणपण फार थोर होतं. जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपला धार्मिक व्यवहार निवडण्याचं स्वातंत्र्य भारतीय नागरिकांना होतं, म्हणून एकाच घरात महानुभावी, नाथपंथीय, वैष्णव, शाक्त, अघोरी, शैव, वारकरी विचारधारा मानणारे लोक शांतपणे जगत असत. एकमेकांपासून भिन्न असलेले पंथ एकमेकांच्या सहजीवनाच्या आड येत नव्हते. ब्रिटिशांना त्यांच्या एकेश्वरवादी विचारसरणीमुळे हे भेद लक्षात येणं शक्य नव्हतं. भारतीयांचे सूक्ष्म धार्मिक व्यवस्था योग्य आणि नीटपणे समजून सांगण्याचं काम त्यांना माहिती देणाऱ्या लोकाचं होतं. जे त्यांनी अत्यंत जाणीवपूर्वक केलं नाही. आणि परिणामी भारतीयत्वाची धार्मिक वीण उसवली.

जातिव्यवस्था निर्मितीबाबतसुद्धा अशीच अत्यंत चुकीची माहिती निर्माण केली गेली आहे. जातिव्यवस्था ही फार प्राचीन आहे, असे समस्त भारतीयांसह जगभर स्थापित होण्याचे कारणसुद्धा हेच ब्रिटिशांचे केलेले प्रबोधन होय. वास्तवात आठव्या आणि नवव्या शतकानंतर भारतात जातिव्यवस्था निर्माण झाली आहे. आणि सुरुवातीला तिचे स्वरूप सतत बदलते होते. मात्र इस्लामी राजकीय आक्रमणं जशी वाढत गेली, तशी समाजात ब्राह्मणी वर्चस्व मोठ्या प्रमाणावर वाढत गेलं. मध्य युगात राजसत्ता आणि सामान्य बहुजन यांच्यामध्ये वैदिक ब्राह्मणांची पोलादी भिंत उभी राहिली. धर्माच्या नावाने राजकीय सत्तांना त्यांनी सामाजिक अधिक्षेप करू दिला नाही आणि त्या आधारे बहुजनांवर आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. आणि शतकानुशतके बहुजनांचं शोषण करीत राहिले.

आपण कोणत्या तरी परक्या राजकीय सत्तेचे गुलाम आहोत, याची जाणीव किमान नऊशे वर्षे सामान्य बहुजनांना ब्राह्मणी व्यवस्थेने होऊ दिली नाही. आपण पारतंत्र्यात आणि गुलाम आहोत, याची जाणीव ब्राह्मणेतर समाजाला महात्मा गांधी यांच्या प्रयत्नांमुळे झाली. दहाव्या शतकानंतर झालेल्या इस्लामी आक्रमणामुळे ब्राह्मणी प्रभाव वाढत गेला, तशी जातिव्यवस्था आणि जातीयता वाढत गेली. या सगळ्या शतकांचा लेखाजोखा व्यवस्थित मांडला तर जातिव्यवस्थेचे स्वरूप लक्षात येऊ शकते.

इथे लक्षात घ्यायचा मुद्दा म्हणजे जेम्स लेनसारख्या व्यक्तीला एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा बहुजन ब्राह्मणेतर शिकलेल्या लोकांची संख्या पुरेशी आणि निर्णायक असतानासुद्धा जाणीवपूर्वक अत्यंत हीन स्वरूपाची माहिती देताना त्यांची जीभ कचरली नाही. जेव्हा माहितीचे पूर्ण स्त्रोत त्यांच्या ताब्यात होते, तेव्हा त्यांनी काय गोंधळ माजवला असेल, याचा अंदाजसुद्धा करता येत नाही. अशा, वैदिक ब्राह्मणांनी अठराव्या, एकोणीसाव्या आणि विसाव्या शतकापर्यंत भारतीय समाज, इतिहास, संस्कृती याबाबत परकीय, पाश्चात्य अभ्यासकांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन केलं.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

तात्पर्य म्हणजे, ब्रिटिशांच्या या सगळ्या अभ्यासाला एक वैदिक ब्राह्मणी चौकटच स्थायी स्वरूपात त्यांनी प्रदान केली. त्यामुळे आपसूकच आधुनिक भारतात कोणत्याही प्रकारचा सामाजिक वा ऐतिहासिक अभ्यासाला ब्राह्मणी दृष्टीकोनातूच बघितले जाते. अगदी ब्राह्मणी व्यवस्थेला विरोध करणारेसुद्धा कळत-नकळत सगळी चिकित्सा ब्राह्मणी चौकटीतूनच करत असतात. म्हणून आधीच्या सगळ्या चौकटी नाकारून सगळ्या भारतीय ऐतिहासिक तथ्यांची स्वतंत्र दृष्टीकोनातून चिकित्सा व्हायला हवी. त्यासाठी दृष्टीकोन पद्धती निर्माण करणे आवश्यक आहे. इतिहासच नव्हे तर एकूण सामाजिक, राजकीय चिकित्सेचा पर्यायी अवैदिक, अनार्य आणि अब्राहमणी दृष्टीकोन निर्माण, विकसित आणि प्रस्थापित करायला हवा. नाहीतर ब्राह्मणी व्यवस्थेतून केला जाणारा विरोधसुद्धा ब्राह्मणी चौकटीतच केला जातो आणि त्यातून एका मर्यादेपलीकडे फार काही हाती लागत नाही.

उदाहरण म्हणून वैदिक ब्राह्मणांची गुणवत्ता किंवा मेरीटचं सांगता येईल. ब्राह्मणांचं मेरीट किंवा गुणवत्ता म्हणजे ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ या प्रकारची आहे. जेव्हा कोणीही स्पर्धेत नसणार तेव्हा हे जिंकणार. त्यासाठी इतर कोणी स्पर्धेत उतरणार नाहीत, याची ते साम, दाम, दंड, भेद अशा गोष्टी वापरून काळजी घेणार. गेल्या हजार वर्षांच्या इतिहासात यांच्या गुणवत्तेने भारताला किंवा एकूण जगाला काडीचंही योगदान दिलेलं नाही. ना भाषाशास्त्रात, ना साहित्यात, ना विज्ञानात, ना वैद्यकशास्त्रात, कुठल्याही कौशल्याच्या आणि सर्जनशील कलात्मक कामाचा आणि यांचा कधीही संबंध नव्हता. म्हणून कला, संगीत, स्थापत्य, शिल्पकला, नृत्य अशा विषयांत यांची गुणवत्ता शून्याच्याही खाली मायनसमध्ये आहे. इतरांनी केलेल्या कष्टांवर आणि कामांवर आपला हक्क सांगायचा यातच यांनी गुणवत्ता कमावली होती. नागार्जुन, चरक, सुश्रुत, वाग्भट वास्तवात हे सगळे रसायनीविज्ञ, औषधीविज्ञ (आयुर्वेद नव्हे) सगळेच्या सगळे बौद्ध होते. मात्र खोट्या प्रोपोगंडाच्या आधारे ते सगळे ब्राह्मण होते आणि त्यांनी निर्माण केलेलं ज्ञान ब्राह्मणांनी निर्माण केलं होतं, असं सगळ्या बहुजन, वैदिक ब्राह्मणपीडितांवर ठसवून ठेवले आहे.

दुसरं उदाहरण, राशी आणि त्यावर आधारलेलं ज्योतिषशास्त्र हे मूळातच ग्रीकांनी भारतात आणलं. त्याआधी वैदिकांचा आणि ज्योतिषी वगैरेंचा काहीही संबंध नव्हता. राशीभविष्य त्यांच्या कडून घेतल्यानंतर त्याच्या आधारावर सगळ्या बहुजनांचा मेंदूच त्यांनी ताब्यात घेतला. जे ज्ञान केवळ व्यापाऱ्यांना, सैन्याला किंवा प्रवासाला निघालेल्या लोकांच्या दिशा मार्गदर्शन या एकमेव कामासाठी प्राचीन काळी वापरात येत होतं, त्या भौगोलिक ज्ञानाच्या आधारे एकविसाव्या शतकात बहुतेक भारतीय आपल्या आयुष्याचे सगळे महत्त्वाचे निर्णय आंधळ्यापणे घेतात. भौगोलिक ज्ञानावर लग्न जुळविणारा, गृहप्रवेश करणारा, आपल्या मुलांची नावे ठेवणारा भारत हा एकमेव देश असावा. सगळ्या दिशा या सारख्याच असतात, हे म्हणणारे बुद्ध म्हणून कालातीत थोर वाटतात.

स्मृतीभ्रंशात जगणाऱ्या बहुजनांना याची जाणीव नाही की कल्पनाही नाही. ते आपापल्या जातीय गंडातच मश्गुल आहेत आणि त्यातच खूश आहेत. त्यांना ज्या व्यवस्थेत ते जगतात, त्या व्यवस्थेचं नेमकं आकलन नाही. आणि त्यांना ते करवूनही दिलेलं नाही. आपण शूद्र आहोत, याची जाणीवसुद्धा ब्राह्मणेतर बहुजनांना समजत नाही. ते अस्पृश्यांना शूद्र समजत असतात. अस्पृश्य म्हणजे शूद्र नव्हे हे त्यांना कळत नाही. शूद्र आहेत म्हणजे वर्णधर्मात आहेत. अस्पृश्य वर्णधर्मात नाहीत म्हणून त्यांचा वर्णधर्माशी काहीही संबंध नाही. याच वर्णधर्मात न जाता एक प्रचंड सामाजिक संघर्ष आपल्या वैचारिक आणि बौद्धिक स्वातंत्र्यासाठी अस्पृश्यांनी केला. शेवटी या संघर्षात ते अस्पृश्य झाले पण कोणाचेही वर्चस्व स्वीकारले नाही.

बहिष्कार ते अस्पृश्य होणे, असा दीर्घ सामाजिक संघर्ष आठव्या ते दहाव्या शतकात झाला. एक प्रचंड मोठी किंमत अस्पृश्यांनी आपल्या मूळ बौद्धधम्मात राहण्यासाठी चुकविली. मात्र शूद्र ओबीसी आपला मूळ धम्म सोडून ‘मनुस्मृती’ आधारित वर्णव्यवस्थेत गेले. ज्या अस्पृश्यांनी आपला मूळ बौद्धधम्म सोडला नाही, त्यांना बहिष्कृत करत अस्पृश्य केले. अस्पृश्यांनी केलेल्या या वैचारिक आणि बौद्धिक संघर्षाची अढी शूद्रांच्या नेणीवेत कायमस्वरूपी घट्ट बसली आणि ते प्रत्येक पिढीत आजतागायत हस्तांतरित होत आहे. आपण अस्पृश्यांचा द्वेष का करतो, असा प्रश्ना शूद्रांना पडत नसावा. अन्यथा त्यांनी काहीतरी शोध घेतला असता आणि आपल्यात वसत असलेल्या द्वेषाचे मूळ खणून काढले असते.

शिवाय त्यांना अस्पृश्य, दलितांचा द्वेष करण्यासाठी प्रत्येक काळात कारणं पुरवली गेली आहेतच. आपल्या शूद्र असण्याची सल कुठेतरी असणारच. नाहीतर जवळपास सर्वच शूद्रांनी ब्राह्मण बनण्याचा प्रयत्न केला नसता. मात्र कोणत्याही शूद्राने ब्राह्मण बनण्याचा प्रयत्न केला, तर ब्राह्मण त्या शूद्रांना लगेच त्यांची जागा दाखवतात. सोनारांनी ब्राह्मणी पद्धतीचं धोतर घातलं म्हणून भर रस्त्यात ब्राह्मणांनी त्यांची धोतरं फेडल्याचा पेशवाईतील इतिहास फार जुना नाही. तरी अशा शूद्रांच्या निष्ठा वर्णधर्माप्रती आजही कायम आहेत. आणि कितीही अपमानित झाल्यानंतरसुद्धा कायम राहणाऱ्या शूद्रांच्या या वर्णधर्माप्रती असलेल्या निष्ठा जोवर शिल्लक आहेत, तोवर वैदिक ब्राह्मणी व्यवस्थेला केसाइतकाही तडा जाणे शक्य नाही. तसाही प्रत्येक अपमानित माणूस महात्मा ज्योतिबा फुले होता नाही.

या सगळ्या सामाजिक संक्रमणात एक ठाम आणि निश्चित असलेली गोष्ट म्हणजे आपल्या मानसिक, वैचारिक, बौद्धिक आणि मूळ धम्मासाठी स्वातंत्र्यासाठी जबर किंमत मोजणारा एक मोठा समूह होता. ज्याने स्वत:चा मेंदू आणि बुद्धी आणि विचार करण्याची क्षमता कुणाच्याही हवाली केली नाही. तो अस्पृश्य झाला पण आपल्या वैचारिक बौद्धिकतेचे रक्षण प्राणपणाने केले. अस्पृश्य असणे ही लाजीरवाणी नव्हे तर अभिमानास्पद बाब होती. कारण इतका त्रास सहन करूनही अस्पृश्यांनी आपली बुद्धी कुणाच्या चरणी गहाण ठेवली नाही. नंतर कितीही धार्मिक लेपनं आणि अस्तरं चढवली असली तरी अस्पृश्यता सामाजिक संघर्षातून आलेली परिणती होती. या सगळ्या संघर्षावर काळाच्या विस्मृतीची धूळ बसत गेली आणि समाजाच्या जाणीव-नेणीवेच्या खोल गर्तेत हा इतिहास विलुप्त झाला. त्याच्या ज्या काही खुणा होत्या, त्या भाषेच्या जीवाश्मात शिल्लक राहिल्या. सगळा ब्राह्मणेतर समाज मृतवत स्मृतीभ्रंशात गेला. त्यांना या स्मृतीभ्रंशातून जागं करण्यासाठी सामाजिक इतिहासाचं नव्याने, स्वतंत्र दृष्टीने वाचन करावे लागणार आहे. त्याचा हा एक प्रयत्न आहे.

४.

मेलुहा सभ्यतेचा शोध घेताना हे लक्षात आलं की, संपूर्ण ज्ञात मानवी इतिहासात बुद्ध ही एक विलक्षण घटना आहे. आणि बुद्धांचाच विचार धरून सांगायचं झालं, तर कोणतीही भव्य घटना अशी अचानक घडत नाही. बुद्ध घडण्याची घटना अशी अचानक घडू शकत नाही. बुद्ध ही घटना समजून घेण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या तत्त्वज्ञानाचा मूळ गाभा समजून घेणे आवशयक आहे, हे जाणवले. तेव्हा मेलुहाचा शोध घेत असतानाच बुद्धांच्या प्रतीत्यसमुत्पाद सिद्धांताचा शोध घ्यायला सुरुवात केली. बौद्ध सभ्यतेत खूप मोठी आणि प्रचंड विद्यापीठे उभी राहिलेली दिसतात. जी किमान पंधराशे ते दोन हजार वर्षे नियमित सुरू होती. ती अशी अचानक उद्भवू शकत नाहीत. त्यासाठी किमान काही पूर्वपीठिका, मार्गदर्शन किंवा कल्पनाना अस्तित्वात असणे आवश्यक आहे. आणि या परंपरेचा उलगडा मेलुहा सभ्यतेत झाला.

मोहोंजोदारो किंवा हडप्पा, धोलाविरा आणि प्राचीन बौद्ध विद्यापीठे यांचा दृश्यात्मक आढावा घेतल्यावर वास्तव लक्षात आले. मोहोंजोदारो, हडप्पा, धोलाविरा ही केवळ व्यापारी शहरे नव्हती, तर ती त्या काळात मेलुहा लोकांनी उभारलेली विद्यापीठेसुद्धा होती. नालंदा, तक्षशीला, विक्रमशीला, सोपारा अशी बौद्ध विद्यापीठे म्हणजे मेलुहा विद्यापीठांचे सातत्य होती. त्यांच्या स्थापत्यात किंवा रचनेत फार काही फरक नाही. हे केवळ वरवर पाहिल्यानेसुद्धा लक्षात येते.

हे सगळं अभ्यासत असताना लक्षात आलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेलुहा सभ्यतेचा काळ आणि बौद्ध सभ्यतेचा काळ यांच्यात फार जास्त अंतर नसावे. कारण प्राचीन मेलुहा सभ्यता अदृश्य झाल्यानंतर अचानक प्रचंड, महाकाय बौद्ध सभ्यता अंधारातून अवतरू शकत नाही. कोणतंही ज्ञान असं टपकत नाही, तर ते निरंतर अशा प्रक्रियेतून निर्माण होत असतं. बौद्ध सभ्यतेत निर्माण झालेलं ज्ञान हेसुद्धा अशा निरंतर प्रक्रियेतून निर्माण झालेलं होतं. आणि हे ज्ञान मेलुहा सभ्यतेपासून सतत चालत आलेलं होतं.

दुसरं उदाहरण, मेलुहा लिपीतूनच धम्मलिपी उत्क्रांत झालेली आहे, हे दिसतं. पहिलं उदाहरण म्हणजे दोन्ही सभ्यतेतील विद्यापीठे. कारण बौद्ध सभ्यता मेलुहा सभ्यतेचे थेट सातत्य आहे, हे तर स्पष्टच आहे. मग किमान हजार वर्षं काळाचा जो विलय दिसतो तो कशामुळे? हा काळाचा झालेला विलय भारतीय भूमीवर वैदिक सभ्यतेचं ठिगळ चिकटवण्यासाठी केलेला असण्याची शक्यता असू शकते, असा अंदाज बांधता आला. कारण हजार वर्षांचा काळ पूर्णपणे अंधारात राहू शकत नाही.

एकूणच मेलुहा सभ्यतेचा भारतीय इतिहास एखाद्या ‘ट्रिजर हंट’सारखा आहे. यात नकाशे, कोडे, जिगसॉ पझल, गुप्त लिपी असं सगळं आहे. भारतीय इतिहासात जाणीवपूर्वक निर्माण केलेले खूप गोंधळ आहेत. मिटवून टाकलेला इतिहास, त्याच्या टाकलेल्या खुणा आहेत. बदलून टाकलेल्या ओळखी आहेत. खोटेपणाची अस्तरं, धार्मिक लेपनं आहेत. यातून वास्तव शोधून काढणं जवळपास दुरापास्त होतं. नीरक्षीरविवेकाने, बाबासाहेब आंबेडकरांनी घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची कास न सोडता, प्राप्त साधनांच्या आधारे जितकं इतिहासाचं समांतर वाचन करता आलं, ते या ग्रंथात केलेलं आहे. अर्थात इतिहासाचं वाचन आणि संशोधन ही प्रक्रिया निरंतर चालणारी आहे. ती संपत नसते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

एक महत्त्वाचा मुद्दा इथे मुद्दाम सांगायचा आहे. तो सांगणे आवश्यक नाही तरी. हे सगळं वाचत असताना, अभ्यासात असताना ऋग्वेदाचा अभ्यास करताना जो आनंद मिळाला, तो शब्दांत सांगता येणार नाही. एक वेगळीच ‘tranquility’ (मराठी शब्द सुचत नव्हता) त्यातून मिळते. त्या अनुभूतीतून लक्षात आलं- उगाच नाही लोकं ऋग्वेदाचा अभ्यास करत. ऋग्वेदात दैवी असं काहीच नाही. तरीसुद्धा एक गुरुत्वाकर्षण आहे जे वाचकाला, अभ्यासकाला खूप आत ओढून घेतं, संमोहित करतं. आणि पुन्हा पुन्हा स्वत:कडे खुणावतं.  

५.

सदर ग्रंथात काही महत्त्वाचे आणि आवश्यक मुद्दे एकापेक्षा अधिक वेळा आशयाची गरज म्हणून आलेले आहेत. मेलुहा सभ्यतेविषयी रोज नव्याने माहिती समोर येत आहे. तेव्हा ती माहिती सतत अद्ययावत होतच राहील. एक ठाम निश्चित असणारी गोष्ट म्हणजे भारतीय सामाजिक संरचनेची मुळे ही मेलुहा सभ्यतेपासून सुरू होतात. आणि तिथूनच सामाजिक संरचनेचं खोदकाम करायला हवं. कोणत्याही प्रकारच्या परिवर्तनाच्या चळवळीत काम करणाऱ्या लोकांनी या मेलुहा सभ्यतेचे महत्त्व लक्षात घेतलेले नाही. ते त्यांनी लक्षात घ्यावे. इतिहासाचं बळ पाठीशी असल्याशिवाय वर्तमानाच्या लढाया लढता येत नाही की, जिंकताही येत नाही. वैदिक विचारांचे लोकं का मेलुहा सभ्यता जीवाचं रान करून, वाटेल ती किंमत मोजून स्वत:ची असल्याचं सिद्ध करण्याचा प्रयत्न का करतायत, हे जर लक्षात घेतले तर ही मेलुहा सभ्यता सध्याच्या संक्रमण काळात भारतीय समाजासाठी किती महत्त्वाची आहे, ते लक्षात येईल.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......