प्राच्यविद्या पंडित, बौद्ध व पाली ग्रंथांचे प्रकांड पंडित प्रा. डॉ. मोहन गोविंद धडफळे यांच्या संकलित लेखांचा संग्रह ‘संमोहनम्’ या नावाने नुकताच मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये प्रकाशित झाला आहे. महेश अ. देवकर व लता महेश देवकर यांनी संपादित केलेला हा संग्रह ‘देशना बौद्ध आणि संबंधित विद्या अध्ययन संस्था’ आणि ‘पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित करण्यात आला आहे. या पुस्तकाला संपादकांनी लिहिलेल्या मनोगताचा हा संपादित अंश...
..................................................................................................................................................................
बौद्ध व पाली ग्रंथांचे प्रकांड पंडित, पट्टीचे शिक्षक व वक्ते, प्रस्थापित परंपरांच्या मूलगामी अर्थाचा सातत्याने धांडोळा घेणारे एक व्यासंगी विद्वान असा नावलौकिक मिळवलेले डॉ. मोहन गोविंद धडफळे हे प्राच्यविद्येच्या आधुनिक पिढीतील एक महत्त्वाचे नाव. त्यांचा जन्म १० ऑगस्ट १९३७ रोजी पुणे येथे झाला. त्यांचे वडील इंग्रजी अमदानीत रेल्वेमधे नोकरीला होते. तीन बहिणी व एक भाऊ अशी चार भावंडे असणाऱ्या प्रा. धडफळे यांचे शालेय शिक्षण पुण्यामध्ये सुरुवातीला रमणबाग व नंतर मॉडर्न हायस्कूल या शाळांमध्ये झाले. अनुक्रमे १९५९ व १९६१ साली ते संस्कृत व पाली विषय घेऊन बी.ए. व एम्.ए. परीक्षा विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले. पुढे १९७७ साली ‘Synonymic Collocations in the Tipitaka : A Study’ (त्रिपिटकातील समानार्थक प्रयोग : एक अध्ययन) या मध्ययुगीन भारतीय भाषाशास्त्राशी संबंधित विषयावर संस्कृत, प्राकृत भाषा व भाषाशास्त्राचे प्रख्यात विद्वान डॉ. अ. मा. घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली.
१९६१ ते १९९७ या कालावधीत त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात संस्कृत व पाली भाषांचे पूर्ण वेळ अध्यापन केले. याच काळात त्यांनी पुणे विद्यापीठ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे देखील अतिथी प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. ते या दोन्ही विद्यापीठांचे पीएच.डी.साठीचे मान्यताप्राप्त मार्गदर्शक होते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
अध्यापनकार्यासोबत सरांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या संस्कृत विभागाच्या प्रमुखपदाची धुरा सांभाळली. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सचिवपदी होते. आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दहा वर्षांत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या उप-प्राचार्यपदाचा अतिरिक्त भारदेखील त्यांच्याकडे होता. १९९६ ते १९९९ दरम्यान टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला आणि ललितकला विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणून त्यांनी काम पाहिले. १९९९ ते २००२, तसेच २००६ ते २००८ या कालावधीत ते भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचे मानद सचिव होते. पुण्यात १९९५ साली स्थापन झालेल्या बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेचे ते स्थापनेपासून २८ मार्चपर्यंत कार्याध्यक्ष होते.
आपल्या संशोधन कारकिर्दीत त्यांनी पाली व संस्कृतसोबत प्राकृत, कन्नड, व अवेस्ता या भाषांवरदेखील प्रभुत्व मिळवले. भारोपीय भाषाशास्त्र, आर्यभारतीय भाषाशास्त्र, व द्रविडी भाषाशास्त्र हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय. त्यातूनही विशेषत्वाने दक्षिण-पूर्व आशियाई अध्ययन हा त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा अखिल भारतीय प्राच्यविद्या परिषद व त्यासारख्या अन्य प्रतिष्ठित परिषदांमधे पाली-बौद्ध अध्ययन, द्रविडी भाषाशास्त्र, दक्षिण-पूर्व आशियाई अध्ययन तसेच वेद व अवेस्ता या विषयांच्या सत्राध्यक्षतेची धुरा सांभाळली. मुंबई विद्यापीठाची विल्सन फिलॉलॉजिकल लेक्चर्स, शि. प्र. मंडळींची कौशिक व्याख्यानमाला, कालिदास स्मृतिव्याख्यानमाला (रत्नागिरी), स्वामी केवलानंद व्याख्यानमाला (टिळक महाराष्ट्र विद्यापीठ), एच्. डी. वेलणकर स्मृतिव्याख्यानमाला इत्यादी प्रसिद्ध व्याख्यानमालांमध्ये व्याख्याने देण्याचा मान त्यांना मिळाला. भारताबाहेरदेखील अमेरिकेतील शिकागो व मिशिगन विद्यापीठ येथे त्यांनी व्याख्याने दिली. तसेच इटलीतील तुरिन, फिनलंडमधील हेलसिंकी, जपानमधील क्योतो तसेच रोमेनियामधील बुखारेस्ट येथील आंतरराष्ट्रीय परिषदांमधे त्यांनी निबंधवाचन केले.
सरांच्या विपुल व महत्त्वाच्या विषयांवरील ग्रंथसंपदेत ‘Some Aspects of (Buddhist) Literary Criticism’ (१९७५), ‘Synonymic Collocations in the Tipitaka : A Study’ (१९८०), ‘Indo-Italica’ (२००९), ‘Sanskrit Language and Its Grammars’ (२००९) या इंग्रजी व पाली बौद्ध संत साहित्य (२००४), साहित्य सावित्री (२००९), बौद्ध धर्म भाष्यकार : धर्मानंद कोसंबी (२०१०) इत्यादी मराठी ग्रंथांचा समावेश होतो. याव्यतिरिक्त त्यांनी प्रा. वा. शि. आपटे स्मृतिग्रंथ (१९७८) तसेच टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या ‘मानवी स्मृती’ (१९९३) या ग्रंथांच्या संपादनाचे महत्त्वपूर्ण काम केले.
इंग्रजी व मराठीसोबत प्रा. धडफळे यांनी अभिजात संस्कृत व पाली भाषेतून स्वतंत्र ललित साहित्याची निर्मिती केली. यामधे त्यांची ‘सरस्वतीसदनम्’ (१९९९), ‘वाजिराजमत्ताङ्गिनीयम्’ व ‘अनसूयाशारद्वतम्’ (२०१०) ही तीन संस्कृत नाटके, तसेच ‘धम्मानन्दचरिया’, ‘गन्धितयह्वचरियागाथा’ (२०१२) या पाली पद्यरचना आणि ‘उत्तरमारचरितम्’ या पाली नाटकाचा समावेश होतो. त्यांनी ‘भगवदज्जुकम्’ या कवी बोधायनलिखित पारंपरिक संस्कृत सट्टकाचे सरल संस्कृतामध्ये आधुनिक रूपांतर केले. त्यांच्या या अभिनव नाट्यकृतीला महाराष्ट्र शासनाच्या संस्कृत नाट्यस्पर्धेत पाच बक्षिसे मिळाली. फिल्म इन्स्टिट्यूटनिर्मित व के. बी. जॉन दिग्दर्शित ‘पुनउत्थान’ या पहिल्यावहिल्या पाली चित्रपटाचे सरांनी संहितालेखन केले. एन्. डी. नाडकर्णी यांच्या ‘अष्टावक्रगीता,’ गंगाधर महांबरे यांच्या ‘भावगीतकार ज्ञानेश्वर’ (२००८), डॉ. गं. ना. जोगळेकर यांच्या ‘अभिनव भाषाविज्ञान’ (१९८७) व दिगंबर रणपिसे यांच्या ‘महापरिनिर्वाणसूत्र’ या ग्रंथांना त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिल्या. याच्या जोडीला इंग्रजी, मराठी, व संस्कृत भाषांमधून विविध विषयांवरील शंभराहून अधिक संशोधनपर व ललितलेख त्यांच्या नावावर जमा आहेत.
.................................................................................................................................................................
‘संमोहनम्’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीची अनुक्रमणिका -
.................................................................................................................................................................
शिक्षणक्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल प्रा. धडफळे यांना देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षण संस्थेचा ऋग्वेद पुरस्कार, पर्शियन टीचर्स असोसिएशनचा दानिशमंद मुमताज-इ-फारसी पुरस्कार व इंडियन सोसायटी फॉर बुद्धिस्ट स्टडीजचा मंजुश्री पुरस्कार इत्यादि पुरस्कार मिळाले.
संशोधनविषयांचे वैविध्य, त्यांची व्याप्ती, व लेखनातील झपाटा ही प्रा. धडफळे यांच्या संशोधनाची प्रमुख वैशिष्ट्ये म्हणता येतील. शास्त्रीय विषयांचे लालित्यपूर्ण व मनोरंजक सादरीकरण हा त्यांच्या लेखनशैलीचा स्थायिभाव म्हणावा लागेल. विविध भाषा, त्यातील शब्दरूपे, त्यांच्या अर्थच्छटा, व त्यांचे परस्परसंबंध याविषयीचे त्यांचे विचार मूलगामी व नावीन्यपूर्ण आहेत. विविध परंपरा, पारंपरिक संकेत, व तात्त्विक मतप्रवाह यांचा मागोवा घेण्यात त्यांचे संशोधन गुंतलेले दिसते. संपर्कात आलेल्या महनीय व्यक्तींविषयीचा पुरेपूर आदर व त्यांच्याशी असलेले भावनिक नातेसंबंध सरांच्या चरित्रात्मक लेखनातून प्रकट झाले आहेत. प्रा. धडफळे यांच्या संस्कृत व पाली रचना त्या भाषांवरील त्यांची हुकुमत व त्यांनी कमावलेली अभिजात भाषाशैली यांचा प्रत्यय देणाऱ्या आहेत.
प्रा. धडफळे हे आमचे शिक्षक आणि मार्गदर्शक. युरोपात प्रचलित असलेल्या ‘Kleine Schriften’च्या धर्तीवर सरांच्या लेखांचं संकलन प्रसिद्ध करावं, हा विचार जवळपास दहा वर्षं जुना आहे. सरांनी त्यांचे काही इंग्रजी, मराठी, संस्कृत, आणि पाली लेख आमच्याकडे या संग्रहासाठी सोपवले. साधारणपणे २०० पानांच्या या सर्व लेखांचं टायपिंग आणि मुद्रितशोधनही पुरं झालं. परंतु आमच्या इतर प्रकल्पांमुळे आम्हाला या कामासाठी जास्त वेळ देता आला नाही. १८ ऑक्टोबर २०१९ रोजी सरांनी अखेरचा श्वास घेतला. जरी त्यांना काही शारीरिक व्याधी होत्या, तरी ते इतक्या लवकर आपल्यातून जातील असं आम्हाला अजिबातच वाटलं नव्हतं. सरांच्या जाण्यानं एका मोठ्या पोकळीची आणि त्यांच्या हयातीत हा संग्रह आम्ही प्रकाशित करू शकलो नाही, याची आम्हाला तीव्रतेनं जाणीव झाली.
सरांच्या निधनानंतर श्रीमती नलिनी धडफळ्यांनी जेव्हा सरांचा व्यक्तिगत ग्रंथसंग्रह बघायला सुरवात केली, तेव्हा त्यांना आमच्याकडे नसलेले सरांचे प्रकाशित आणि अप्रकाशित असे अनेक लेख सापडले. याशिवाय इतर काही लेख आहेत का, हे शोधण्याअगोदरच भारतात टाळेबंदी जाहीर झाली. यामुळे सरांच्या संग्रहातील शेवटच्या कपाटातील साहित्य तपासता आले नाही. पुढच्या काही महिन्यांत आम्ही नव्याने मिळालेले सर्व लेख वाचले.
..................................................................................................................................................................
उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...
हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -
https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal
................................................................................................................................................................
इंग्रजी अप्रकाशित लेखांच्या बाबतीत आम्ही असे ठरवले की, जे बऱ्यापैकी पूर्ण होते तेवढेच या संग्रहात समाविष्ट करायचे. परंतु मराठीमधील अप्रकाशित लेखांची संख्या जरी जास्त असली तरी प्रकाशित करण्यासाठी त्यांच्यात अजून भर घालणे तरी आवश्यक होते किंवा आणखी संस्कार करणे तरी. सरांच्या अनुपस्थितीत यातील काहीच शक्य होणार नसल्याने या मराठी लेखांच्या संग्रहात त्यांच्या फक्त प्रकाशित लेखांचाच समावेश केला आहे.
नवे-जुने सर्व लेख नजरेखालून घातल्यावर असे लक्षात आले की, २०११ मध्ये जो संग्रह फक्त २०० पानांचा होता तो आता जवळपास ७०० पानांपर्यंत पोचला आहे. त्यामुळे आम्ही हे सर्व साहित्य दोन भागांमध्ये प्रकाशित करण्याचे ठरवले. एका संग्रहात इंग्रजी लेख व दुसऱ्यात मराठी लेख. सरांनी लिहिलेले संस्कृत लेख आणि त्यांच्या दोन पाली रचनांचा या दोन्ही संग्रहांमध्ये समावेश करण्याचाही निर्णय आम्ही घेतला.
या संग्रहात समाविष्ट झालेले सरांचे लेख संस्कृत अर्थमीमांसा (Semantics), काव्यशास्त्र, कोशविज्ञान, व्युत्पत्ती, वेद, अवेस्ता, अभिजात संस्कृत, पाली, व मराठी साहित्य, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध आणि बौद्ध तत्त्वज्ञान अशा वेगवेगळ्या विषयांशी संबद्ध आहेत. या संग्रहामध्ये सरांनी पालीमध्ये लिहिलेल्या आचार्य धर्मानंद कोसंबी यांच्या चरित्राचाही समावेश आहे. त्याचबरोबर बृहन्महाराष्ट्र प्राच्यविद्या परिषदेच्या वेद व अवेस्ता विभागासाठी सरांनी दिलेले अध्यक्षीय भाषण आणि गीतारहस्य जयंतीच्या निमित्ताने दिलेली दोन व्याख्यानेही या संग्रहात समाविष्ट केली आहेत. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ख्यातनाम भारतविद्याभ्यासकांवर सरांनी लिहिलेल्या स्मरणलेख आणि गौरवलेखांचा यातील समावेश.
याप्रमाणे सर्व लिखाणाचे मुख्य विषयांच्या आधारे वर्गीकरण करून झाल्यावर प्रत्यक्ष संपादनाचे काम सुरू झाले. पालीसाठी सरांनी काही वेळेस पाली टेक्स्ट सोसायटीची संस्करणे तर काही ठिकाणी नव नालंदा महाविहाराची संस्करणे वापरली होती. आम्ही या संग्रहासाठी पाली टेक्स्ट सोसायटीची संस्करणे वापरण्याचा निर्णय घेतला. पालीची इ-टेक्स्ट्स उपलब्ध असल्याने हा बदल करणे सहजसाध्य झाले. पुढचा आणि जास्त गंभीर प्रश्न होता तो हा की बऱ्याच लेखांमध्ये ग्रंथसूची एकतर अपुरी होती किंवा दिलेली नव्हती. सरांच्या विशेष अभ्यासाची, आवडीची क्षेत्रे खूप होती आणि त्यांचे वाचन दांडगे होते. त्यामुळे सरांनी उल्लेखिलेले सर्व ग्रंथ मिळवणे टाळेबंदीच्या काळात फारच अवघड गेले. www.archive.org आणि www.jstor.org यासारख्या वेबसाईट्समुळे आम्हाला बरेचसे ग्रंथ आणि लेख ऑनलाईन उपलब्ध झाले.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
..................................................................................................................................................................
याशिवाय सरांनी जिथे आयुष्यभर वाचन, संशोधन केले त्या भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराच्या ग्रंथालयाची या कामी पुष्कळ मदत झाली. प्रत्येक उद्धरण तपासून घेण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न केला आहे. जिथे लेखाच्या अनुषंगाने संदर्भ पुरवणे आवश्यक आहे असे वाटले, तिथे त्यांची नव्याने भर घातली आहे. काही पुस्तके किंवा लेख आम्हाला मिळू शकले नाहीत. अचूक संदर्भ न सापडलेल्या अशा उद्धरणांच्या आधी ताराचिन्ह वापरले आहे. लेखांमधल्या शुद्धलेखनाच्या किंवा इतर चुका दुरुस्त केल्या आहेत. परंतु तशा दुरुस्त्या केल्याचे तळटिपांमध्ये दर्शवलेले नाही. प्रत्येक लेखाला स्वतंत्र संदर्भसूची देण्याऐवजी पुनरुक्ती टाळण्यासाठी सर्व ग्रंथाला एकच संदर्भसूची देणे आम्हाला जास्त सोयीचे वाटले. ती ग्रंथाच्या शेवटी दिली आहे.
भारतविद्या, भाषाशास्त्र, आणि कोशविज्ञानात रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हा ग्रंथ एक अमोल ठेवा ठरेल, याची आम्हाला खात्री आहे. संस्कृत आणि पाली साहित्याच्या क्षेत्रात भरघोस काम केलेल्या काही अभ्यासकांच्या जीवनात डोकावण्याची संधी, या ग्रंथाच्या निमित्ताने आपल्याला मिळेल. आमच्या लाडक्या सरांच्या फक्त अभ्यासू वृत्तीचेच प्रतिबिंब या संग्रहात पडले आहे, असे नव्हे तर त्यांच्या चिकित्सक, चौकस, आणि मिश्किल वृत्तीचेही दर्शन आपल्याला यातून होईल.
वाचकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सरांच्या लेखनशैलीला साजेसे असे नाव आम्ही या लेखसंग्रहासाठी शोधत असताना प्रा. बहुलकर यांनी ‘संमोहनम्’ हे नाव सुचवले. आम्हाला आशा आहे की, हा संग्रह विद्वानांच्या पसंतीस उतरेल आणि प्रा. मोहन गोविंद धडफळे नावाचे हे ‘संमोहन’ (गारूड) सदैव त्यांच्या मनावर अधिराज्य करत राहील.
संमोहनम् - संपा. महेश अ. देवकर, लता महेश देवकर
देशना बौद्ध आणि संबंधित विद्या अध्ययन संस्था, पुणे
पाली आणि बौद्ध अध्ययन विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
मराठी आवृत्तीचे मूल्य - ६०० रुपये
इंग्रजी आवृत्तीचे मूल्य - ८०० रुपये
पुस्तकासाठी संपर्क - deshanainstitute@gmail.com, palilibrary@unipune.ac.in किंवा
विठ्ठल पवार - ९०२१७ १८६१९
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment