या तिसऱ्या खंडात जे लेख घेण्यात आले आहेत ते संकीर्ण आहेत. पण किरकोळ नक्कीच नाहीत. गांधीजी आणि भाषा ही चर्चाही तितकीच महत्त्वाची, जितकी गांधीजी आणि मार्क्सवाद...
ग्रंथनामा - झलक
रमेश ओझा
  • ‘गांधी - खुर्द आणि बुद्रुक’ (खंड ३)चे मुखपृष्ठ
  • Fri , 04 March 2022
  • ग्रंथनामा झलक गांधी - खुर्द आणि बुद्रुक Gandhi - Khurd aani Budruk रमेश ओझा ramesh Oza

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन यांच्या संयुक्त प्रकल्पाअंतर्गत साकारलेल्या

१) गांधी : जीवन आणि कार्य - संपादक - किशोर बेडकिहाळ

२) गांधीविचार आणि समकालीन विचारविश्व - संपादक अशोक चौसाळकर

३) गांधी - खुर्द आणि बुद्रुक - संपादक रमेश ओझा

या त्रिखंडात्मक वैचारिक ग्रंथाचे आज पुण्यात संध्याकाळी ‘विश्वकोश निमिती मंडळा’चे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांचे हस्ते प्रकाशन होत आहे. त्यानिमित्ताने दुसऱ्या खंडाला ज्येष्ठ अभ्यासक रमेश ओझा यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

..................................................................................................................................................................

मराठी माझी मातृभाषा नाही आणि सामान्यत: मी माझ्या मातृभाषेशिवाय दुसऱ्या भाषेत लिहीत नाही. दुसऱ्या भाषेत लिहिण्याचा मला सराव नाही. आणि माझ्या लिखाणाला मातृभाषेत जी धार येते, ती अन्य भाषेत येऊ शकत नाही. पुष्कळ वेळा मला दुसऱ्या भाषेत लिहिण्याचे निमंत्रण मिळाले आहे, पण प्रत्येक वेळी मी नाही म्हटले. मात्र या वेळी जेव्हा विजयने माझे नाव सुचवले, तेव्हा मी त्याला नकार देऊ शकलो नाही. मनात एक दोन विचार आले. पण मी गप्प राहिलो. त्या वेळी मी विचार केला की मी किमान प्रस्तावना लिहिण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. कारण ह्या सर्व प्रक्रियेत माझे काही उत्तरदायित्व आहे. मी मराठी ग्रंथाची प्रस्तावना लिहिण्याच्या सूचनेच्या स्वीकाराची तीन महत्त्वाची कारणे आहेत.

पहिले कारण असे की माझ्यावर मराठी भाषेचे उपकार आहेत. मी आणि गांधीजी दोघेही गुजराथी. त्यांचे बहुतांश लिखाणही गुजराथीत, जे मी २० वर्षांचा होईपर्यंत बरेचसे वाचून काढले होते. माझे संगोपन गांधीवादी-समाजवादी परिवारात झाले. गुजराथेतील सर्वोदय परिवारही मोठा. मी नियतकालिकेही खूप वाचायचो, तरीही मी गांधीजींना एका विशिष्ट दृष्टिकोनातून समजू शकलो ते मराठी भाषेमुळे. अंदाजे चाळीस वर्षांपूर्वीची घटना आहे. माझा मित्र प्रदीप खेलूरकरने मला नरहर कुरुंदकरांचे पुस्तक ‘शिवरात्र’ भेट दिले, जे मी थोडा प्रयत्न करून वाचू शकलो. त्यातील विवेचनाची प्रगल्भता पाहून मी इतका प्रभावित झालो की कुरुंदकरांचे अधिकाधिक साहित्य मी वाचत गेलो. मी अत्यंत नम्रपणे सांगण्याची हिंमत करू शकतो की, मी रससूत्र, मराठी साहित्यकृतीची समीक्षा, सिद्धान्तचर्चा आणि संगीतचर्चा यांसहित समग्र कुरुंदकर वाचला आहे. या वाचनातून हळूहळू मराठी विश्लेषणात्मक साहित्याचे दार माझ्याकरिता उघडत गेले.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

त्यानंतर मी गं. बा. सरदार, आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, नलिनी पंडित, भा. ल. भोळे, ना. य. डोळे, यशवंत सुमंत, आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे, दा. न. गोखले, धनंजय कीर, तात्यासाहेब केळकर, स. ह. देशपांडे, राजेंद्र व्होरा, मधु लिमये, मे. पुं. रेगे, वसंत पळशीकर, सु. श्री. पांढरीपांडे, ना. ग. गोरे, दि. के. बेडेकर, शरद पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, इरावती कर्वे आदी वाचले. या शिवाय ‘साधना’, ‘मागोवा’, ‘माणूस’, ‘नवभारत’, ‘पूर्वा’, ‘बायजा’, ‘स्त्री’, ‘ललित’ यांसारखी नियतकालिके, आणि दिवाळी अंकांचे वाचनही मी केले आहे.

आता मला असे वाटते की बहुतेक गुजराती अभ्यासकांप्रमाणे मी जर केवळ कशोरीलाल मश्रुवाला, विनोबा भावे आणि दादा धर्माधिकारी यांसारख्या गांधी विचारांच्या भाष्यकारांचे आणि इंग्रजी अभ्यासकांचे वाचून गांधीजींना समजून घेण्याचा प्रयत्न केला असता, तर मला गांधी तसा समजला नसता, जसा मला मराठीतील गांधीविषयक चिंतन-लिखाणातून समजला. गांधी समजण्यासाठी महाराष्ट्राचा राजकीय-सामाजिक पट, त्यावर पडलेली गांधींची (समर्थक-विरोधक) छाप, एकूण महाराष्ट्रातील गांधीविषयक वैचारिक चिंतन वाचणे आवश्यक आहे. मराठीत खूप वाचलेले असल्याने मला त्याचा लाभ झाला, हे ही प्रस्तावना लिहिण्यामागचे पहिले कारण. मला हे कबूल केले पाहिजे की, मराठीइतका बहुआयामी विमर्श माझ्या मातृभाषेत, गुजराथीत झालेला नाही.

दुसरे कारण महाराष्ट्राची विलक्षणता होय. आधुनिक भारताचा चेहरामोहरा महाराष्ट्राने घडवला आहे. महाभारताविषयी असे म्हटले जाते की विश्वातील सर्व प्रश्न त्यात आहेत व जे महाभारतात नाही, ते विश्वात नाही. महाराष्ट्राविषयीही आपण असे म्हणू शकतो की भारताच्या राजकारणात जेवढे प्रश्न व त्यांचे पैलू आहेत, ते सर्व महाराष्ट्राने दिलेले आहेत. महाराष्ट्राने प्रश्न उभे केले आहेत, महाराष्ट्रात त्यावर सांगोपांग वाद-विवाद व चिंतन झाले आहे, महाराष्ट्राने त्यांचे विश्लेषण केले आहे, महाराष्ट्राने वितंडवादही केला आहे, महाराष्ट्राने प्रबोधनही केले आहे, महाराष्ट्राने प्रचार केला आहे, महाराष्ट्राने वादप्रतिवादही केला आहे. महाराष्ट्राने एक गोष्ट मात्र केलेली नाही आणि ती म्हणजे संवाद. आश्चर्याची गोष्ट ही आहे की, महाराष्ट्रात संपूर्ण १९व्या शतकात आणि त्यानंतरही झडलेल्या वादात कुठलीही बाजू घेणाऱ्याला कोणालाही असे वाटले नाही की आपण समोरच्याची बाजूही ऐकून घेतली पाहिजे. थोडक्यात सांगायचे तर महाराष्ट्राच्या विमर्शाने आखाड्याचे स्वरूप धारण केलेले दिसते.

सनातनी-सुधारक, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, महार-महारेतर, वेदोक्त-पुराणोक्त ह्यांसारखी शकले महाराष्ट्रात पडली किंवा जी होती ती सर्व घनीभूत झाली. स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्रीय राजकारणात या विभाजनरेषा मुरल्या आणि पक्क्या झाल्या. परंपरेच्या चिकित्सेची तसेच राजकीय अजेंडायुक्त इतिहासलेखनाची सुरुवातही महाराष्ट्रानेच केली. उदाहरणार्थ महात्मा फुलेंनी ‘ब्राह्मणांचे कसब’ लिहून ब्राह्मणांवर आरोपनामा दाखल केला. तसेच विनायक दामोदर सावरकरांनी ‘सहा सोनेरी पाने’ लिहून हिंदूंवर शौर्याचे रोपण केले आणि अठराशे सत्तावनच्या बंडाला प्रथम स्वातंत्र्ययुद्ध म्हणून त्याचे उदात्तीकरण केले. या विचारकांनी त्यांच्या तात्कालीन राजकीय आवश्यकतेनुसार संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचे केवळ पुनर्लेखनच केले नाही, तर त्यांची जवळपास स्वतंत्र निर्मिती केली आहे.

भारतात ईस्ट इंडिया कंपनीने अनेक राजकीय संस्थाने खालसा केली किंवा जिंकून हिसकावून घेतली. परंतु पेशवाई बुडाल्याचा चित्पावन ब्राह्मणांवर जो खोल घाव झाला, त्याची परिणती हळूहळू ब्राह्मणांमध्ये नैराश्य आणि सूडाच्या राजकारणापर्यंत झाली. ते घाव आजही तसेच आहेत ह्याला तर महाराष्ट्राची कमाल म्हणावी लागेल! एका टोकाला कट्टर सनातनतेचा ‘अहिताग्नी’ विझू न देणारे परम सनातनी अहिताग्नी राजवाडे, तर दुसऱ्या टोकाला ‘सबै भूमी गोपाल की’ आणि ‘जय जगत्‌’ म्हणणारे विनोबाही चित्पावन ब्राह्मण आणि दुसरीकडे सत्यशोधक आंदोलन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्यकर्तेही महाराष्ट्राने दिलेत. स्वत:च्या पत्नीला शिक्षण देण्यात जिथे सुधारक कमी पडले, तिथे ब्राह्मणांसहित सर्व शूद्र व स्त्रियांसाठी शाळा सावित्रीबाई फुले या शूद्र स्त्रीने सुरू केली. सामाजिक न्यायासाठी आंदोलन प्रथम महाराष्ट्राने सुरू करून त्याचे ‘ब्राह्मणेतर’ असे नामाभिधानही केले. पण ‘ब्राह्मणेतर’ आंदोलनाला किंवा सशक्तीकरणाच्या चक्राला मराठ्यांच्या स्वार्थापर्यंत मर्यादित करण्याचे कामही महाराष्ट्रात झाले. त्यानंतर बहुजन समाजात फाटाफूट व्हायला सुरुवात झाली. समाजसुधारक म्हणून ख्याति पावलेल्या आगरकरांनी महात्मा फुलेंना ‘रेव्हरंड फुले’ म्हटले तेही याच महाराष्ट्रात.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

साने गुरुजींनी पंढरपूर मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी सत्याग्रह केला. तेव्हा नखशिखांत गांधीवादी व ऋजुहृदयी गुरुजींना तुम्ही ‘कोब्रा’ का? असा प्रश्न विचारण्याचे साहसही महाराष्ट्रच करू जाणे. असे तर अनेक प्रसंग लिहिता येतील. तात्पर्य हेच की टेफ्लॉन काचेला दगड मारला तर त्याला जेवढ्या भेगा पडतील, तितके तुकडे महाराष्ट्राच्या समाजजीवनात झालेले आहेत. ध्रुव किंवा विभाजनरेषा ह्यांना तर काही सीमाच नाही. गांधीजी १९१५ साली भारतात आले तोपर्यंत महाराष्ट्रात अनेक बेटे निर्माण झाली होती. ते एकमेकांपासून दुरावलेले होते. त्यांच्यामध्ये आग्रह आणि अटी होत्या. दोषारोपण आणि शंका घेतल्या जात होत्या. प्रत्येक जण दुसऱ्याचे पाय ओढत होता आणि धोबीपछाड मारीत होता. महाराष्ट्राने जितके विस्तृत, सखोल, चिंतन केले तितकेच ध्रुवही रचलेत. सर्वत्र नकारात्मकता पसरवली. हे लोण हळूहळू राष्ट्रीय राजकारणात पसरले.

भारतात परतल्यावर गांधीजी महाराष्ट्राची उपेक्षाही करू शकत नव्हते. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या खास पद्धतीच्या राजकारणात कुण्या एका बेटावर उभे राहतील असे त्यांचे व्यक्तिमत्त्वही नव्हते. म्हणून तर त्यांनी म्हटले होते की, महाराष्ट्र इतका जागृत व समृद्ध आहे की देशाला माझी (गांधींची) जराही आवश्यकता नाही, पण महाराष्ट्राचा रोग आहे वितंडवाद. भारतात आल्यावर या सर्व ध्रुवांना किंवा बेटांना नाकारण्याचे पहिले काम गांधींनी केले असे म्हणता येईल. ‘माणूस दमदार आहे, पण आपल्या कामाचा नाही’ असा गांधींविषयीचा अभिप्राय दादासाहेब खापर्डेपासून वा. रा. कोठारींपर्यंतच्या (मराठी) मंडळीमध्ये समान होता.

गांधीजी जेव्हा प्रत्येक समाज विशेषाच्या धारणा नाकारत होते, तेव्हा असे म्हणतात की, लोकमान्य टिळकांना प्रश्न पडला होता की, हा माणूस कुठल्या जातीचा आहे. त्यांनी कर्नाटक केसरी गंगाधर देशपांडेंना गांधींच्या कुळाविषयी माहिती काढण्यास सांगितले होते. लोकमान्यांचे शिष्य न. चिं. केळकर यांनी तर ‘केसरी’मधील आपल्या लिखाणात म्हटले होते की, ‘गांधीजी फार वर्षे विदेशात राहिल्याने त्यांना भारताच्या राजकीय-सामाजिक वास्तवाचे भान नाही. अनुभवाने थोड्या काळात त्यांची अक्कल ठिकाणावर येईल व त्यांना उमगेल की भारतात जर राजकारण करावयाचे असेल तर कोणत्यातरी समाज विशेषाचा खांदा जरूरी आहे. यामुळे राजकारणात बार्गेनिंग (काही तू घे, काही मी घेतो) करण्याची शक्ति मिळते.’

थोडक्यात शक्तीचा स्रोत समाज विशेषाच्याच मागे असतो आणि आग्रह व अटींद्वाराच भारतात राजकारण केले जाऊ शकते असा समज गांधींच्या आगमनापूर्वी भारतात दृढ झाला होता. या विचाराचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झालेला होता आणि तो राष्ट्रीय मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी गांधीजींचे भारतात आगमन झाले. आत्ताच नमूद केल्याप्रमाणे गांधीजी महाराष्ट्राची उपेक्षाही करू शकत नव्हते आणि महाराष्ट्राने रचलेल्या ध्रुव आणि विभाजनरेखा यांचा स्वीकारही करू शकत नव्हते. भारताचा १९१५ नंतरचा इतिहास हा गांधी व महाराष्ट्र यांच्या परस्पर संघर्षाचा, देवाणघेवाणीचा थोडक्यात वैचारिक एनकाउंटरचा आहे, ज्याचा अजूनही अंत झालेला नाही. आग्रही महाराष्ट्र आणि आग्रहांना नाकारणारा गांधी हे त्या एनकाउण्टरचे स्वरूप होते व आहे.

गांधीजींनी आपल्या अडीच दशकांच्या विदेशवास्तव्यात हे जाणले की, जगापुढील सवांत मोठे अरिष्ट म्हणजे विकासाच्या नावावर पश्चिमेने विकसित केलेली भुलवणारी, भोगवादी संस्कृती आहे. आधुनिक राज्याची रचना आणि राष्ट्रवादाची संकल्पना या बाबी प्रजेचा पुरुषार्थ व उत्थान यांचे मार्ग म्हणून ओळखल्या जात असल्या तरी त्या मुळात ह्या भुरळ पाडणाऱ्या संस्कृतीच्या रक्षणासाठी निर्मिल्या गेल्या होत्या.

१९०९ सालचा गांधी-सावरकर संवाद हे एका अर्थाने गांधींचे महाराष्ट्रासोबतचे एनकाउंटरच होते. तसे पाहिले तर गांधी-महाराष्ट्र एकाउंटरची सुरुवात ही १९०९ सालीच झाली होती. भारतात आल्यावर गांधीजींना हे लक्षात आले की, भारतीय राजकारणाचे अरिष्ट हे महाराष्ट्राने निर्मिलेली बेटे व आग्रह हे आहे. विभाजन रेषा आहेत. बायनरीज आहेत. पश्चिमेच्या सभ्यतेसोबत गांधीजींच्या एनकाउंटरचा परिपाक ‘हिंदस्वराज’ नामक ग्रंथात मिळतो, तर महाराष्ट्रासोबतच्या गांधीजींच्या एनकाउंटरचा परिपाक गांधींच्या हत्येत मिळतो.

१९१५ नंतरचे गांधीजींचे राजकारण महाराष्ट्राने निर्मिलेल्या विभाजन रेषा सांधण्याचे राजकारण आहे. आधुनिक भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की कोणाच्यातरी भिन्न आवाजाला जागा मिळाली. संवादाची भूमिका बनवली गेली. राष्ट्रीय वितंडवादाची जागा राष्ट्रीय चिंतन व विमर्शाने घेतली. या विभाजनरेखा बुजवण्यातही मराठी माणसांनी गांधीजींना मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि तितक्याच प्रमाणात त्यांना सतावलेही. मी गांधीजींविषयीच्या तिसऱ्या खंडाची प्रस्तावना लिहिली पाहिजे, याचे हे दुसरे कारण.

तिसरे कारण या ग्रंथाचे स्वरूप होय. या खंडाला ‘संकीर्ण’ नांव देण्यात आले आहे. गुजराथी भाषेत, ज्यात कुठलाही केंद्रीय विषय नाही, अशा मिश्र लेखांच्या स्वरूपाला ‘प्रकीर्ण’ म्हटले जाते (गुजराथीत संकीर्ण म्हणजे संकुचित). तसे तर गांधीजींच्या जीवनात कुठलीच गोष्ट संकीर्ण नव्हती. बकरीला चारा टाकणे, ही पण तितकीच गंभीर बाब होती, जितके स्वराज मिळवणे. महाराष्ट्रात एकाच गावाला खुर्द व बुद्रुक म्हणण्याची पद्धत आहे, उदा. गागोदे खुर्द व गागोदे ब्रुद्रुक. गांधीजींच्या बाबतीत ही फूटपट्टी लावता येत नाही आणि म्हणायचेच असेल तर असे सांगू शकता की, गांधी खुर्दने गांधी ब्रुद्रुक घडवला.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

भाषा, अक्षर, लेखनशुद्धी, लिपिसुधार, साहित्य, सौंदर्य, संगीत, स्वच्छता, वेळेचे नियोजन, नियमितता, व्यक्तीची ओळख व तिच्याकडून काम काढून घेण्याचे कसब, आंदोलने व कार्यक्रमांचे नियोजन, श्रम, व्यायाम, आरोग्य, उपचार अशा जगाच्या सर्व प्रश्नांमध्ये गांधीजींनी सखोल लक्ष घातले. रूढ अर्थाने प्राथमिकता म्हणून कुठली गोष्ट त्यांच्या जीवनात नव्हती. शेतकऱ्यांचा वेळ वाचेल व अधिक उत्पादनही घेता येईल अशी शेतीची अवजारे निर्मावी. यामध्ये वेळ वाचवण्यासाठी म्हटले, श्रम वाचवण्यासाठी नव्हे. जीवनाला सार्थक करायचे असेल तर वेळ वाचवला पाहिजे, जो कुटुंबाकरिता देता येईल, राष्ट्रयज्ञात देता येईल, स्वत:करिता देता येईल; बाकी श्रम वाचवण्याची वृत्ती ही आळशी मनोवृत्ती आहे.

आताच्या विकासाची सर्व ओढाताण श्रम वाचवण्याची व उरलेला वेळ सुख-सुविधा भोगण्यासाठी खर्च घालण्याची आहे. इंधनाची बचत होईल, स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार नाही व वेळेची बचतही होईल अशा निर्धूर चुली स्त्रियांसाठी बनवण्यात याव्या. उरलेला वेळ स्त्री मुलांना व समाजाला देऊ शकेल. शेतकरी व स्त्रियांना राष्ट्रयज्ञात जोडण्याची गांधींची ही तजवीज मिठाच्या सत्याग्रहापेक्षा जराही कमी महत्त्वाची नव्हती. सर्व कामांना एकसारखी प्राथमिकता. भारताचे १० कोटी लोक जर रोज एक तास वाचवू शकले, तर किती मोठा शक्तिसंचय होईल आणि रचनात्मक कामात त्याचा उपयोग होईल, याचे महत्त्व गांधीजींसाठी जराही कमी नव्हते.

व्यक्ती म्हणून मी खुर्द गांधीत अधिक रस घेतो. गांधीजींचे दक्षिण आफ्रिकेतील सहकारी हेनी पोलॉक यांची पत्नी मली पोलॉक तिच्या आठवणीत लिहिते- ‘गांधीजींची श्रवणशक्ती अदभुत होती. गांधीजी जेव्हा ऐकत, तेव्हा बोलणाऱ्याच्या डोळ्यात असे पाहत आणि तितक्याच एकाग्रतेने ऐकत की जणू तुम्हाला वाटावे की तुमच्या शिवाय व तुम्ही जे सांगताय त्याशिवाय जगात महत्त्वाचे काहीच नाही.’ त्यांच्या या गुणामुळे गांधीजी, बोलणाऱ्याने हुशारीने लपवलेले किंवा आपल्या मर्यादेमुळे न सांगितलेले, ते समजू शकत. गांधीजींना ‘चतुर बनिया’ बनवण्यात त्यांच्या या श्रवणशैलीचा मोठा भाग होता. तसेच कुणाला असे वाटता नये की त्याच्याकडे लक्ष नाही, हा त्याचा अपमान आहे, हा नीतीपाठही होता.

या तिसऱ्या खंडात जे लेख घेण्यात आले आहेत ते संकीर्ण आहेत. पण किरकोळ नक्कीच नाहीत. गांधीजी आणि भाषा ही चर्चाही तितकीच महत्त्वाची, जितकी गांधीजी आणि मार्क्सवाद. या खंडात एकूण २२ लेखांचा समावेश केला आहे.

श्री. सुरेश द्वादशीवार यांनी गांधीजी आणि त्यांचे गूढ नामक लेखात गांधींचे गूढ रहस्य शोधण्याचा प्रयत्न केला आहे. जो माणूस पहिल्या नजरेत अव्यवहारी, आदर्शवादी, भोळसट वाटत होता, त्याच्याविषयी ‘जशास तसे’ वागणारे परम व्यवहारी लोकमान्य टिळक स्वत:च्या अनुयायांना सांगून गेले की यापुढे भारताचे नेतृत्व हे गांधी करतील. लोकमान्यांना कळले होते की हा माणूस अव्यवहारी नसून राजकारणाला नवी दिशा देऊ इच्छिणारा एक प्रयोगवीर आहे.

द्वादशीवारांनी गांधीजींविषयीच्या प्रचंड गैरसमजाची तीन कारणे दिली आहेत.

श्री. पन्नालाल सुराणा यांचे गांधीजी व जातिव्यवस्था ह्या विषयाची चर्चा करणारे दोन लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत.

प्रा. फक्रुद्दीन बेन्नुर यांनी ‘गांधीजींची धर्म, वर्ण, जाती आणि अस्पृश्यता- यावरील इतिहासशास्त्रीय चिकित्सा’ असा एक विशाल कॅनव्हास घेऊन लेख लिहिला आहे. गांधीजींबाबतचे गैरसमज मुख्यत: त्यांच्या धर्मविषयक भूमिकेमुळे झाले आहेत. ते अहिंसक समाजरचनेसाठी आवश्यकतेनुसार धर्माचा उपयोग करतात. स्वत:च्या पद्धतीने धर्मवचनांचा अर्थ लावतात, धर्मसमन्वय करतात, धर्मातील रूढ वा प्रस्थापित अर्थांची आणि आदेशांची उपेक्षा करतात, जरूर पडली तर त्यांना विरोधही करतात. धर्मविचार हाताळतांना गांधीजी यशस्वी झालेत की पराजित हा एका स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे. प्रा. बेन्नुर ह्यांनी ह्या बाबतीत काही दिशादिग्दर्शन केल्याचे आढळते.

नलिनी पंडित त्यांच्या चिकित्सक अभिप्रायांविषयी विख्यात आहेत. ‘महात्मा गांधी : राजकारण व तत्त्वज्ञान’ या लेखात नलिनीताई म्हणतात की गांधीजी बाह्य अर्थाने धार्मिक असले तरी त्यांच्या काळातील पुरोगामी सुधारकांपेक्षा अधिक प्रगतीशील होते. त्यांनी अध्यात्मनिष्ठ मानवतावादाविषयी एक संकल्पना मांडलेली आहे, ज्या विषयी खूप थोडे बोलले गेले आहे. गांधीजींनी सामान्य माणूस समजू शकेल अशी सुबोधता आणि भावनात्मकता यांकडे अधिक लक्ष दिले होते व विचारांची सूक्ष्मता व सातत्य याकडे कमी लक्ष दिले.

 प्रा.मधु दंडवते यांचा ‘भारतीय समाजवादावरील गांधीजींचा प्रभाव’ हा लेख या ग्रंथात समाविष्ट केलेला आहे. लेखक म्हणतो, ‘गांधीजींच्या विचारधारेमधील मानवतावादी दृष्टी व समाजवादामधील शास्त्रीय, बुद्धिप्रामाण्यवादी व ऐहिक भूमिका यांच्या संयोगातून भारतीय समाजवाद समृद्ध झाला आहे, हे नि:संशय. हे समृद्ध तत्त्वज्ञान मानवतावादी लोकशाही समाजवादी भारत निर्माण करणाऱ्यांना मार्गदर्शक ठरेल.’

नानासाहेब गोरे यांचा गांधीजींच्या विश्वस्त कल्पनेविषयीचा लेख या खंडात घेतला आहे. विश्वस्त संकल्पनेचा अर्थ आपण धनिकांचा मालकीहक्क हिरावून न घेता, त्यांच्या स्थूल संपत्तीचा व्यापक जनहितार्थ उपयोग करायला हवा असे मानतो.

प्रा.राम जोशी यांनी गांधीजींच्या शिक्षण विचारांबद्दल लिहिले आहे. सुशिक्षित व्यक्तीला शारीरिक श्रम हे हलक्या प्रतीचे व लज्जास्पद वाटू लागल्यावर सवर्ण-अवर्ण, शिक्षित-अशिक्षित, सुसंस्कृत-असंस्कृत, शहरी-ग्रामीण असे भेद पडून रुंदावत जातात. गांधीजींना माणसा-माणसातील भिंती तोडायच्या होत्या व त्याकरता त्यांनी नवीन शिक्षणपद्धती विकसित केली. आचार्य भागवतांनी त्यास ‘समुच्चय शिक्षण’ असे नाव दिले.

महात्मा गांधी विज्ञानविरोधी होते असा एक गैरसमज सर्वत्र पसरलेला आढळतो. पण प्रभाकर नानावटी लिहितात की, जर विज्ञानाचा अर्थ निरीक्षण, परीक्षण आणि संशोधन असेल तर गांधीजींना वैज्ञानिक म्हणायला हवे. प्रयोगशाळेत वैज्ञानिक ज्याप्रमाणे प्रयोग करत असतो, त्याप्रमाणे प्रत्येक काम ते अगदी एकाग्र होऊन करत व परिणामांचे आकलनही करत, आवश्यकतेनुसार सुधारणा करत व कधी कधी प्रयोग बदलूनही पाहत. त्यांची दृष्टी वैज्ञानिकाची होती. शिवाय कोणत्याही प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी पर्याय शोधण्याची प्रखर जिज्ञासा गांधीजींच्या ठायी होती. ही जिज्ञासावृत्तीच त्यांचे वेगळेपण दाखवते.

गांधीजींच्या या वैज्ञानिक दृष्टीबद्दल अजून एक लेख या खंडात समाविष्ट केला आहे. तो रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी लिहिला आहे. ते लिहितात की, गांधीजी विवेकवाद मानत होते, परंतु त्यांनी विवेकवादाला सर्वोच्च मूल्य मानले नव्हते. कारण अगदी स्पष्ट आहे. गांधीजींची बांधीलकी सत्याशी होती. ते सत्यशोधक होते, म्हणून ते सत्याची कोणतीही शक्यता नाकारणारे नव्हते.

या खंडात नीलकंठ लोखंडे यांनी गांधीजींच्या आश्रमजीवनाविषयी एक मननीय लेख लिहिला आहे. आश्रमात गांधीजी आत्मशक्ती जागृत करत होते व सहजीवन प्रयोगाद्वारे परक्यांना आपलेसे करीत साम्राज्यशक्तीला आव्हान देत होते.

रामदास भटकळ यांचा ‘गांधी आणि भाषा’ हा लेख या खंडात आहे. सत्य-अहिंसेशिवाय अन्य तीन गोष्टींची गांधीजींनी उपासना केली- हिंदू-मुस्लिम एकता, अस्पृश्यतानिवारण व हरिजनांना न्याय आणि भाषा. गांधीजींसाठी भाषा हा नेहमी आवडीचा, साधनेचा व आधुनिक भारत घडवण्यासाठी आवश्यक असा विषय राहिलेला आहे. भटकळांनी गांधीजींचा भाषाविचार व भाषाव्यवहार याबाबत आपल्या लेखातून विस्तृतपणे मांडणी केली आहे.

डॉ. गणेश देवींनी आपल्या लेखातून गांधीजींच्या भाषाव्यवहाराविषयी थोड्याशा वेगळ्या, तत्त्वज्ञानाच्या अंगाने प्रतिपादन केले आहे. त्यांचा हा लेख वेगळ्याच लयीने जातो. त्या लयीचा आस्वादच आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातो.

ह्या ग्रंथातील माधव चोळे यांचा ‘गांधी विचारांची सद्य:कालीन उपयुक्तता’ नामक लेख २०१७ साली ‘नवभारत’मध्ये प्रकाशित झालेला आहे. गांधीजींच्या उपयोगितेची चर्चा जितकी त्यांच्या समकालीनांनी केली त्यापेक्षा अधिक त्यांच्यानंतरच्या लोकांनी केली व त्याहीपेक्षा अधिक ती आज होताना दिसते. गांधीजींच्या उपयोगितेविषयी संपूर्ण जगात जितके प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यापेक्षा अधिक भारतात होत आहेत.

प्रा. श्याम पाखरे यांनी ‘गांधीचे राजकारण : लिंगभावात्मक दृष्टिकोण’ असा एक मननीय लेख लिहिला आहे. गांधीजींनी त्यांच्या आत्मकथेत मांसाहार केल्याचा उल्लेख आहे. मांसाहाराने पौरुष प्राप्त करून इंग्रजांना देशातून हाकलून लावायचे व देश स्वतंत्र करावयाचा असे त्यांच्या मनात होते. मुसलमानांमध्ये हिंदूंपेक्षा अधिक पौरुष असते व भारतीयांपेक्षा युरोपियनांत अधिक पौरुष असते असा त्याकाळी दृढ समज होता. इंग्रजांनीही असा समज पसरविला होता याचा उल्लेख श्याम पाखरे यांनी या लेखात केला आहे.

गांधीजींनी दंडाऐवजी आत्म्यात शक्ती शोधून पौरुषाची व्याख्याच बदलून टाकली. पौरुष प्राप्त करण्यासाठी मांसाहार करण्याची आवश्यकता नाही, शाखांवर लाठी फिरवण्याची गरज नाही, शत्रुगोटातील स्त्रियांचे चारित्र्य लुटण्याची गरज नाही, इतिहासाच्या पुनर्लेखनाची गरज नाही, टोळ्या बनवून आव्हान देण्याची व गोंगाट करण्याची गरज नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ‘हे बायकांचे काम नाही’ असे म्हणून समाजाच्या अर्ध्या अंगाला राष्ट्र घडविण्याच्या कार्यात उंबरठ्याबाहेर ठेवणे जरुरीचे नाही. गरज आहे ती कशाचीही भीती न बाळगता, कथित पौरुषवाल्यांच्या डोळ्यात डोळे घालून आपले म्हणणे मांडण्याची. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून आत्मविश्वासपूर्वक बोलाल, तेव्हा तुम्ही स्वत:च शक्तीचे स्वरूप धारण कराल.

गांधीजी फक्त सत्यशोधक नव्हते, शक्तिशोधकही होते. त्यांच्या सत्याग्रहात सत्य आणि शक्तीचा समन्वय झालेला दिसतो. गांधीजींनी शक्तीवर चढवलेला पौरुषाचा लेप काढून टाकताच हिरण्यमय पात्रासारखे शक्तीचे खरे स्वरूप प्रकट झाले. ती शक्ती लिंगनिरपेक्ष आहे, ती सात्त्विक व शीतल आहे, ती गोंगाट करणारी नसून संथगतीने वाहणाऱ्या प्रवाहासारखी आहे. ती शक्ती सर्वसमावेशक आणि सार्वत्रिक आहे. जो कुठल्याच कामाचा नाही असे संबोधण्यात येते त्यालाही कामाचा बनविणारी ही शक्ती आहे. ती मातृहृदयी आहे, ती भीतही नाही व भिववीतही नाही. गांधीजींनी परिवर्तनाच्या आंदोलनाला तथाकथित पौरुषाच्या जाळ्यातून मुक्त करीत तिला लिंगनिरपेक्ष, सार्वत्रिक, सात्त्विक, मुलायम आणि दादा धर्माधिकारींच्या शब्दात सांगायचे तर ‘ललित’ स्वरूप दिले.

आधुनिकोत्तरवाद सध्या चर्चेत आहे किंवा असे म्हणणे अधिक सटीक होईल की, त्याची तशी फॅशन आहे. या जगात समाजाची चिकित्सा जितक्या ऐरणींवर करण्यात येते, तितक्या ऐरणींवर गांधींना तपासले जाते. एका अर्थाने गांधीजींचा हा विजयच म्हणावा लागेल. त्यांची प्रासंगिकता नाकारण्यासाठीही ती आधी स्वीकारावी लागते.

माझ्या मतानुसार आधुनिकोत्तरवादीही गांधीजींच्या प्रेमात असतील असे दिसत नाही. कारण की त्यांनी ठरविलेल्या चौकटीत गांधीजी पुरेपूर सामावू शकत नाहीत. ‘हिंदस्वराज’मध्ये पश्चिमी सभ्यतेची गांधीजींनी केलेली समीक्षा आहे हे खरे पण ती आधुनिकोत्तरवादी नाही. गांधीजींच्या सांस्कृतिक प्रतिवादात वकिलीचा आविर्भाव नाही. प्रा.सु.श्री. पांढरीपांडे यांनी ‘आधुनिकोत्तरवाद आणि गांधी’ नामक लेखात आधुनिकोत्तरवादाचे जनकत्व गांधीजींना बहाल केले आहे. पुढे लेखकाने ‘आधुनिकोत्तरवाद’ काय आहे हे विस्तारपूर्वक आणि खूपच साध्या भाषेत समजावले आहे. मात्र ह्या लेखात गांधीजींना आधुनिकोत्तरवादाचे जनकत्व दिल्यानंतर ते सिद्ध केलेले नाही. मला वाटते ते शक्यही नाही. असे असले तरी गांधीजींच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीशी जे परिचित आहेत. त्यांना आधुनिकोत्तरवादाच्या ऐरणीवर पुन्हा एकदा गांधीजींच्या सांस्कृतिक भूमिकेला तपासणे नक्कीच आवडेल.

ह्या खंडात ‘गांधीजी आणि आधुनिक मराठी साहित्य’ असा गो.म. कुलकर्णी यांचा सविस्तर आणि विचारगर्भ लेख घेतलेला आहे. मी. ह.ना. आपटेंपासून जी.ए. कुलकर्णीपर्यंतचे मराठी साहित्य वाचले आहे, ते एक रसिक म्हणून. साहित्याची समीक्षा करण्याची माझी कुवत नाही. म्हणून गो.म. कुलकर्णीच्या लेखाविषयी काही लिहिणे ही माझी धृष्टता ठरेल. मी लेखकाची उपेक्षा करत नाही. पण मला माझ्या मर्यादांचे भान आहे, हे मी अधोरेखित करू इच्छितो.

या खंडात कुमार गंधर्वांनी राग मल्हारमधून ‘गांधी राग’ कसा रचला त्याची गोष्ट आहे. प्रसिद्ध मराठी साहित्यकार दि.के. बेडेकर यांचे दोन लहानसे ललितलेख व तेही बेडेकरी शैलीत असलेले या खंडात सामावण्यात आले आहेत. ते दोनही लेख अर्थगंभीर व रसपूर्ण आहेत. म्हणून माझ्या कुठल्याही प्रकारच्या इंगिताविना वाचकांनी त्यांचा आस्वाद घ्यावा.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शेवटी मला इतकेच मांडायचे आहे की, गांधीजींचे समग्र आयुष्य दोन भागात विभागाले गेले आहे, किंवा दोन टोकाचे एनकाउंटर त्यांना करावे लागले होते. एका बाजूला विकासाच्या पाश्चात्य अवधारणेला त्यांनी आव्हान दिले, जे ‘हिंद स्वराज’मागील दर्शन आहे आणि दुसऱ्या बाजूला महाराष्ट्राने निर्माण केलेल्या विभाजनरेखा, बेटे, ध्रुव त्यांनी निष्प्रभ केले. महाराष्ट्रसोबतच्या त्यांच्या ह्या एनकाउंटरची परिणती गांधीहत्येत झाली.

माझे असे मत आहे की पन्नास वर्षांनंतर, गांधीजींच्या द्विशताब्दीवर्षी, भारताची अस्मिता आणि हिंदू पौरुष यांच्यातील संघर्ष निमाला असेल. एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्राने निर्मिलेल्या विभाजनरेखा बुजलेल्या असतील आणि भ्रामक आधुनिकतेसमोर गांधीजींची प्रासंगिकता निर्णायक ठरली असेल. तो गांधी युगानयुगे जिवंत राहील.

गांधी - खुर्द आणि बुद्रुक’ (खंड ३) - संपादक - रमेश ओझा

सेवाग्राम कलेक्टिव्ह आणि साधना प्रकाशन

पाने - ३००

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......